मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

मंगळवार, १९ डिसेंबर, २०१७

विमानप्रवास - मुलभूत माहिती - भाग २



विमानात प्रवेश केल्यावर आपण आपल्या आसनाकडं प्रस्थान करतो. आपलं आसन शोधणं हा सोपा प्रकार असला तरी काही अक्षरं आणि खिडकीचे आसन ह्यांच्या बाबतीत क्वचितच गोंधळ होऊ शकतो. इथं आपल्याला खिडकीचे आसन मिळावं असं कितीही वाटत असलं तरी सीट क्रमांकानुसार आसनस्थ व्हावं लागतं. केबिन लगेज वरच्या कप्प्यांमध्ये ठेवणं किंवा समोरील सीटच्या खाली ठेवणं हे पर्याय तुमच्याकडे असतात. 

अमेरिकेतील स्थानिक प्रवासात तुमच्याकडं confirmed ticket नसलं आणि तुम्ही प्रतीक्षायादीवर पहिल्या दोन - तीन क्रमांकात असाल तर तुम्ही गेटजवळ येऊन थांबु शकता. जर तुम्ही frequent flier असाल तर तुम्हांला अशा परिस्थितीत confirmed ticket मिळण्याची शक्यता वाढीस लागते. एअरलाईन्स ज्यांना घाई नाही अशा प्रवाशांना काही डॉलर्स देऊन नंतरची फ्लाईट घेण्यास प्रोत्साहित करते. 

सर्व प्रवासी आसनस्थ झाले की "All Passengers are Boarded" अशी घोषणा केली जाते. सर्व प्रवासी आसनस्थ झाले आणि सर्वांच्या बॅग्स विमानाच्या पोटात शिरल्या की मग विमान आकाशात झेपावण्यास तयार होते. अशा वेळी हवाईसुंदरी वर्ग सुरक्षाप्रात्यक्षिक करुन दाखवतो. "Please fasten your seat belts" वगैरे ठीक असतं पण "कुर्सी की पेटिया" वगैरे आलं की माझं लक्ष विचलित होतं. आणि तसं म्हणायला गेलं तर खरोखर आणीबाणीचा प्रसंग ३५००० फूट उंचीवर आला तर ह्या सर्व सुचनांमधील नक्की काय आठवेल आणि त्याचा कितपत उपयोग होईल ह्याविषयी मी साशंक असल्याने मी बहुदा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. 

विमानानं उड्डाण केलं आणि ते त्याच्या ठराविक उंचीवर (साधारणतः ३५००० फीट) स्थिरस्थावर झालं की मग बऱ्याच गोष्टी घडू लागतात. तुम्ही आपल्या समोर असलेल्या स्क्रीनवरील उपलब्ध सिनेमे, संगीत किंवा विमानाचा प्रवासमार्ग ह्याचा आनंद लुटू शकता. समोरील स्क्रीनचा रिमोट आणि हेडसेट नक्की कुठं लपवुन ठेवले आहेत आणि ते कसे वापरायचे ह्याविषयी प्रत्येक विमानाचे मॉडेल वेगवेगळ्या पद्धती अवलंबत असल्यानं तुम्ही काही वेळ गोंधळून गेलात तर त्यात तुमचा दोष नाही आणि तुम्ही एकटे नाही आहात. विमानाचा प्रवासमार्ग स्क्रीनवर येत असताना मी बराच वेळ तो पाहत राहतो. आखाती देशावरुन विमान जात असल्यास रात्रीच्या वेळी खाली दिसणारी गावं आणि त्या गावातील मिणमिणते दिवे माझे लक्ष वेधून घेतात. इथं विमानाला आपत्कालीन उतरणं करावं लागलं तर तिथली लोक आपलं स्वागत कसं करतील वगैरे विचार माझ्या मनात येतात. परंतु पॅसिफिक किंवा अटलांटिक महासागरावरुन उड्डाण करीत असताना आपत्कालीन उतरण्याचे विचार मनात येऊन देणं योग्य नाही हे मी मनाला बजावतो. 

प्रत्येक विमानाच्या वेळेनुसार त्यात जेवण, नास्ता प्रवाशांना कधी आणुन द्यायचा ह्याविषयी मापदंड असतात. ह्याविषयी आपण मनात बांधलेले आडाखे कधी कधी चुकतात. दोन आठवड्यापुर्वी फ्रँकफर्टला जाताना पहाटे तीन वाजता निघणारं विमान एक तास उशिरानं म्हणजे चार वाजता निघालं. सुरुवातीला संत्र्याचा रस स्वागतपेय म्हणुन देण्यात आल्यावर मी पुढील खाद्यपदार्थाची अपेक्षा केली होती. पण अपरडेकवर असलेली बहुतांश जर्मन मंडळी विमान ३५००० फूट उंचीवर जाताच आपली सीट आडवी करुन डोक्याखाली उशी घेऊन, अंगावर पांघरूण घेऊन अगदी शिस्तीतल्या लहान मुलासारखी झोपुन गेली. संपुर्ण अंधार! मला खरंतर झोप येत नव्हती पण सर्व मंडळी (आणि ती ही हिटलरच्या देशातील) झोपली असताना लपवुन ठेवलेला रिमोट आणि हेडसेट शोधुन त्याचा योग्य वापर करण्याचा मार्ग शोधून काढणं आणि त्या प्रयत्नात होणाऱ्या आवाजानं सहप्रवाशांची झोप मोडणं मी प्रशस्त समजलं नाही. त्यामुळं मी ही आपली सीट आडवी करुन झोपून गेलो. आणि अहो आश्चर्यम ! मला कधी नव्हे ती दोन तास झोप लागली सुद्धा! दोन तासाने उठलो तरीही सर्व शिस्तबद्ध मंडळी झोपलीच होती. मग मी सीट सरळ करुन खिडकीबाहेर पाहू लागलो. सुर्योदयापासून विमान अधिकाधिक दूर जायचा प्रयत्न करीत होते. 

विमानप्रवासात देण्यात येणारी जेवणं, ड्रिंक्स, नास्ता ह्या बाबतीत काही निरीक्षणं मी केली. आपण तिकिटाचे पैसे भरले आहेत त्यामुळं त्याचा पुरेपूर उपयोग करणं आणि आपल्याला नको असलं तरी नुसतंच चव घ्यायला म्हणुन देण्यात येणारं प्रत्येक मील स्वीकारणं कितपत योग्य आहे ह्याचा आपण विचार करायला हवा. कर्तृत्वाने भारतीय मंडळी मोठी झाली आहेत पण सार्वजनिक जीवनातील आचारपद्धतीत अजुन सुधारणेस प्रचंड वाव आहे. काटे, सुरी आणि चमच्यानं व्यवस्थित जेवता येणं ह्याचं प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या जमेल तितक्या सर्व भारतीयांनी (त्यात मी सुद्धा समाविष्ट ) घेणं आवश्यक आहे. 

अजुन एक मुद्दा! विमानातील lavatory मधील पद्धती थोड्या वेगळ्या असतात. आपण वापरण्याआधी तिथं जी स्वच्छता असते ती आपण तिचा वापर केल्यानंतरसुद्धा तशीच असली पाहिजे ह्याचं भान आपण सर्वांनी राखणं आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे आपण भारतीय ह्या विषयावर बोलत नाही पण इथंही सुधारणेस प्रचंड वाव आहे. 

(क्रमशः)

भाग १ - 
http://patil2011.blogspot.in/2017/12/blog-post.html

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...