मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, १८ डिसेंबर, २०१७

विमानप्रवास - मुलभूत माहिती - भाग १


खरंतर स्वतःसाठी गेल्या आठवड्यातील प्रवासाची नोंद ठेवणं योग्य ठरेल असा विचार प्रथम मनात आला आणि मग पोस्टमध्ये त्याचं रुपांतर करावं ह्यात तो परिवर्तित झाला. आंतरराष्ट्रीय प्रवास करताना आपणास सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या विविध टप्प्यांचे वर्णन करणं हा मुळ हेतू आहे. मुंबई विमानतळावर आपला प्रवास सुरु होत आहे असं इथं गृहितक आहे. 

१> विमानतळ प्रवेश 
आपल्याला विमानतळावर घेऊन येण्यासाठी केलेली कॅब  विमानतळाच्या प्रवेशद्वाराशी सोडते. तिथं उभा असणारा पोलीस आपल्याजवळ प्रवासासाठी आवश्यक असणारी कागदपत्रं आहेत की नाही ह्याची खातरजमा करुन घेतो. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी पासपोर्ट आणि योग्य तिकीट असणं आवश्यक आहे. हल्ली वेब चेकइनचा जमाना असल्यानं काहीजण आपल्या मोबाईलवरील बोर्डिंग पाससुद्धा वापरतात.  

२> चेक इन लगेज 
प्रवेश केल्यानंतर तिथल्या kiosk वर बोर्डिंग पास प्रिंट करण्याची सोय असते. जर तुमच्याकडे चेकइन बॅग्स नसतील तर तुम्ही बोर्डिंग पास घेऊन थेट सुरक्षा तपासणीच्या दिशेनं प्रस्थान करु शकता. चेकइन बॅग्सचे महत्तम वजन तुम्ही प्रवास करत असलेली एअरलाईन्स, तुमच्या तिकिटाचा क्लास ह्यावर अवलंबुन असते. एकदा का ह्या वजनदार बॅग्स तुम्ही त्या एअरलाईन्सच्या हवाली केल्या की तुमच्या डोक्यावरील ओझे बऱ्याच प्रमाणात कमी होते. ह्या क्षणी तुमच्या हातात पासपोर्ट, बोर्डिंग पास, चेक इन सामानाची रिसीट आणि तुमचं केबिन लगेज असायला हवं. 

३> सुरक्षा तपासणी 
आता आपली पावलं सुरक्षा तपासणीच्या कक्षाकडे वळतात. ह्या कक्षात शिरण्याआधी तुम्ही आपल्याजवळील द्रवपदार्थ एकतर संपवुन टाकायला हवेत किंवा त्यांच्या बाटल्या फेकुन द्यायला हव्यात. बिसनेस क्लासच्या तिकीटधारी लोकांसाठी हा काहीसा शांत अनुभव असतो पण इकॉनॉमी क्लासच्या तिकीटधारी लोकांसाठी हा तापदायक अनुभव असतो. इथं मोकळ्या ट्रे मध्ये आपलं केबिन लगेज, खिशातील सर्व ऐवज ठेवायचा आणि स्वतः सुद्धा X Ray तपासणीला सामोरे जायचं असते. काही ठिकाणी तुम्हांला आपले बुट, बेल्ट वगैरे सुद्धा ट्रे मध्ये काढून ठेवावे लागतात. X Ray तपासणी कक्षामध्ये दोन पावलं असतात त्यावर आपली पावलं ठेवून आणि हात वरती करुन ह्या तपासणीला सामोरे जायचं असतं. इथुन बाहेर पडल्यावर तात्काळ ट्रे मधुन येणाऱ्या आपल्या सामानाकडं लक्ष ठेवुन त्याचा ताबा घ्यायचा असतो. 

४> इमिग्रेशन 
सुरक्षा तपासणी झाली की इमिग्रेशन कक्ष आपणासमोर उभा ठाकलेला असतो. इमिग्रेशन अधिकारी तुमच्या पारपत्राची तपासणी करतो. तुम्हांला देशाबाहेर जायला सरकारने बंदी वगैरे घातली आहे का हे तपासुन पाहतो. ह्या कक्षाच्या पलीकडं एक रेषा असते, ही रेषा तुम्ही पार केलीत की तुम्ही भारत देशाच्या नियंत्रणापलीकडं गेलात असं काही प्रमाणात म्हणता येईल. इथं ड्युटी फ्री सामानांची गर्दी आढळून येते. त्याचप्रमाणं अडीचशे रुपये दरानं मसालाडोसा विकणारी दुकानं सुद्दा आढळून येतात. बिझनेस क्लास मधुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लाऊंज ह्या आलिशान कक्षाची सोय केलेली असते. इकॉनॉमी क्लास तिकीटधारी अधिक पैसे भरुन ह्या कक्षात प्रवेश घेऊ शकतात, इथं स्नॅक्स, मदिरा, फळं ह्यांचं मुक्त हस्ते वाटप करण्यात येत असतं. काही विमानतळावर प्रत्येक एअरलाईन्सची स्वतःची वेगळी लाऊंज असते तर काही ठिकाणी विमानतळ प्राधिकरण एका सामायिक लाऊंजची सुविधा पुरविते. मुंबई विमानतळाची GVK
लाऊंज ही एक सर्वोत्तम लाऊंज मानण्यास हरकत नसावी. 





काही लाऊंजमधुन (विशेष करुन जिथं प्रत्येक एअरलाईन्सची स्वतःची वेगळी लाऊंज असते तिथं) थेट विमानात प्रवेश करण्याची  असते, पण बाकी ठिकाणी मात्र ह्या लाऊंजच्या बाहेर येऊन आपल्याला आपल्या गेटसमोर वेळेत हजर होण्याची काळजी घ्यावी लागते. मुंबई विमानतळ हे शांत विमानतळ म्हणुन घोषित झाल्यानं इथं लेट लतीफ प्रवाशांसाठी घोषणा वगैरे प्रकार नसतो.  

५> बोर्डिंग 
विमानात प्रवेश करताना ज्यांच्या सोबत लहान मुलं आहेत, ज्या व्यक्ती व्हीलचेयर वर आहेत त्यांना सर्वप्रथम प्रवेश दिला जातो. त्यानंतर फर्स्ट क्लास, बिझनेस क्लास  इकॉनॉमी क्लास ह्या क्रमानं प्रवेश दिला जातो. काही वेळा सर्वात मागच्या आसनाच्या प्रवाशांना आधी सोडलं जातं. गेटवर आल्यानंतर तिथं दिल्या जाणाऱ्या सूचनांकडे लक्ष देणं इष्ट! गेटवर विमानप्रवेशाची वाट पाहत असताना आपल्याला बऱ्याच वेळा आपलं विमान दिसत असते. बऱ्याच एअरलाईन्सचे स्वतःच हब असते जसं की ब्रिटिश एअरवेजचे लंडन, Lufthansa चे फ्रँकफर्ट! ह्यांची विमान मुंबईला येतात. आपण लवकर आलेलो असलो की हे विमान उतरल्यावर गेटपाशी येताना दिसतं, मग त्यातील प्रवाशी उतरतात आणि मग विमानतळ कर्मचारी ह्या विमानाचा ताबा घेतात. शेकडो प्रवाशांना लागणारे दोन तीन वेळेचं जेवण / स्नॅक्स, नॅपकिन्स, शीतपेये आणि मदिरापेये, नवीन कापडं ही सर्व सामुग्री एका तासाभरात त्याच विमानात परत चढवली जाते आणि नऊ - दहा तासाचा प्रवास करुन आलेलं हे विमान पुन्हा तितक्याच अवधीच्या प्रवासासाठी सज्ज होते. प्रत्येक एअरलाईन्स ही आपली अधिकाधिक विमान हवेत जास्तीत जास्त वेळ कशी उडत राहतील ह्यासाठी प्रयत्नशील असते. 
अजून एक मुद्दा हा headwind आणि tailwind च्या संदर्भात! आता शनिवारी फिलाडेल्फिया ते फ्रँकफर्ट प्रवासात tailwind च्या मदतीने आमच्या प्रवासाचा अवधी आठ तासांवरून सात तासावर आला. इंधन बचतीसाठी tailwind फार मोलाचा !

(क्रमशः )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...