मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, २९ जून, २०२४

२०२४ - युरोप सहल - प्रस्तावना






नुकत्याच आटोपलेल्या बारा दिवसांच्या युरोप दौऱ्यानंतर मनात अनेक सकारात्मक भावना दाटल्या आहेत. भव्य ऐतिहासिक वास्तू, निसर्गाची डोळ्यात साठवून ठेवण्यासारखी क्षणाक्षणाला समोर येणारी रूपं आपल्याला थक्क करत राहतात. देशानुसार बदलणारं भोवतालच्या निसर्गाचं सौंदर्य, रूप नुसतं अनुभवायचं नसतं तर निवांत क्षणी त्याचा सखोल अभ्यास करायचा असतो. खूप थोड्या कालावधीत इतकं काही अनुभवायला मिळतं की हे थोड्या सावकाशपणं अनुभवायला मिळायला हवं होतं असं वाटत राहतं. 

वीणा वर्ल्डतर्फे आयोजिलेल्या ह्या सहलीत आम्ही इंग्लंड, फ्रान्स, नेदरलँड्स (हॉलंड), बेल्जियम, लक्सेनबर्ग, जर्मनी, स्वित्झर्लंड, लिचेनस्टिन, ऑस्ट्रिया, इटली, सॅन मरिनो, व्हॅटिकन सिटी (जगातील सर्वात छोटा देश) अशा बारा देशांना धावती भेट दिली. युरोप अनुभवायच्या अनेक पद्धती आहेत. ही सहल बहुदा तोंडओळख ह्या प्रकारात मोडणारी. पुढं वेळ, पैसा, तब्येत ह्या सर्वांचे समीकरण जुळून आलं तर ह्या देशांतील आवडलेल्या ठिकाणांना निवांत भेट देण्याची इच्छा सदैव मनात राहील. 

केवळ एकच ठिकाण निवडायचं झालं तर स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया मधील एखाद्या अनामिक डोंगरातील एका छोट्या घरात होम स्टे च्या माध्यमातून आठवडाभर रहायला आवडेल. यजमानांकडे एका सायकलची विनंती करायची आणि सकाळी नाश्ता आटपून त्या हिरव्यागार डोंगरांच्या दिशेनं कूच करायचं. वाटेत येणाऱ्या झऱ्यांतील निर्मळ जलाने तहान भागवावी, अधूनमधून झाडांखाली हिरव्यागार गवतावर लोळत पडावं. चरणाऱ्या गायींना हळुवार स्पर्श करावा, रात्री नऊ - दहापर्यंत आकाशात रेंगाळणाऱ्या दिनकरावर विसंबून न राहता सायंकाळी परत यजमानाच्या घरी परतावं, त्यांनी बनविलेल्या रुचकर पास्ता, पिझ्झाचा आस्वाद घेऊन झोपी जावं. 

पुढील भागांत मुंबईपासून सुरु झालेल्या आमच्या प्रवासाचा, प्रत्येक देशात काय अनुभवलं ह्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न राहील. जे काही अनुभवता आलं नाही त्याविषयी अर्थात अधिकारवाणीने बोलता येणार नाही. तरीही त्याविषयी टिपणी करण्याचा प्रयत्न राहील. एअर इंडियाविषयी काही नकारात्मक, काही सकारात्मक अभिप्राय, वीणा वर्ल्डसोबत प्रवास करत असल्यानं इमिग्रेशन, दूरदूरची ठिकाणं एका दिवसांत कूच करण्यात आलेली सहजता, राहण्याची नाश्ता-जेवणाची उत्तम सोय, सहल व्यवस्थापक अतुल भोबे ह्यांनी अत्यंत व्यावसायिकपणे  तरीही माणुसकीची शिंपड करत पार पाडलेली सहल, भारताच्या क्रयशक्तीने जगभर निर्माण केलेला दबदबा, त्यामुळं भारतीय संस्कृती, भोजनपद्धतीला स्वीकारण्यासाठी चाललेली पाश्चात्य देशांची धडपड, त्यामुळं कुठंतरी सुखावणारं आपलं मन पण त्याचबरोबर सुधारलेल्या आर्थिक स्थितीमुळं आपल्या देशवासीयांच्या वागण्यात जाणवणारा आणि काहीसा उद्धटपणाकडं झुकणारा आत्मविश्वास पाहून दुखावणारं आपलं मन हे सारं काही जमेल तसं पुढील दहा - बारा भागांत सादर करण्याचा प्रयत्न राहील. खरंतर घाईघाईनं ब्लॉगपोस्ट प्रसिद्ध करण्याची माझी खासियत. पण ह्यावेळी मात्र शांतपणे हे प्रवासवर्णन प्रसिद्ध करण्याचा माझा प्रयत्न राहील. दीर्घकाळ थांबलो तर दैनंदिन आयुष्यातील संघर्ष ह्या निसर्गरम्य आठवणींना पुसून टाकण्याचा किंवा त्यांना विरळ बनविण्याचा धोका राहीलच. So All the Best - Aditya !!

रविवार, २६ मे, २०२४

अनियोजित महानगर वाढ आणि संभाव्य धोके !



आपल्याभोवताली सर्वत्र महानगरांचा कायापालट सुरू आहे.  जर मुंबई शहरात आपण राहत असाल तर सभोवताली मोठ्या वेगानं पसरणारे गगनचुंबी इमारतींचे जाळं, विविध ठिकाणी उभारले जाणारे उड्डाणपूल आणि सर्वत्र खणलेले रस्ते हे चित्र आपल्याला सतत दिसत राहतं.  आजच्या लेखाचा विषय मुंबई शहरात उभारल्या जाणाऱ्या गगनचुंबी इमारती आणि ह्या इमारतींना आवश्यक असणाऱ्या मूलभूत सोयींचं प्रशासनानं कसं सखोल, विचारपूर्वक नियोजन केलं पाहिजे याविषयी आहे.  

पाणीपुरवठा 

सर्वात प्रथम मुद्दा डोळ्यासमोर येतो तो म्हणजे ह्या इमारतींमध्ये  वास्तव्य करण्यास येणाऱ्या नागरिकांसाठी आवश्यक पाणीपुरवठ्याची तरतूद कशा प्रकारे करण्यात आली आहे? जर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणलोट क्षेत्रामध्ये व्यवस्थित पाऊस पडला आणि ही वाढती लोकसंख्या ध्यानात घेऊन आखल्या गेलेल्या सर्व अतिरिक्त पाणीपुरवठाच्या योजना वेळीच पूर्ण झाल्या तर कदाचित सर्वकाही आलबेल असू शकेल.  परंतु एखाद्या वर्षी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने कृपादृष्टी केली नाही तर इतक्या प्रचंड लोकसंख्येला कसा पाणीपुरवठा करणार हा एक मोठा यक्ष प्रश्न होऊ शकतो. मुंबईच्या पाणीपुरवठ्याला प्राधान्य देऊन बाकीच्या शहर, गावांचे पाणी मुंबईकडं खेचलं जाऊ शकतं, पण नैतिकदृष्ट्या ही चुकीची उपाययोजना आहे. 

पावसाच्या पाणीसाठवणाविषयी (Rainwater Harvesting) काही बांधकाम व्यावसायिक जागरूकता दाखवितात. परंतु ह्याची अधिक व्यापकतेने अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. ही बाब जर ऐच्छिक असेल तर ती बंधनकारक करायला हवी.  

प्लॅस्टिक वापर आणि कचरा व्यवस्थापन 

प्लॅस्टिकबंदी ही हल्ली तात्कालिक घटना बनली आहे. काही काळ अचानक प्रशासन जागं होतं आणि प्लॅस्टिकबंदी घोषित केली जाते. काही काळाने पुन्हा येरे माझ्या मागल्या असा प्रकार दिसून येतो. उंच इमारतीमधील रहिवाशी सुजाण असल्याची आशा आपण करू शकतो. त्यामुळं त्यांनी ह्याबाबतीत जागरूकता दाखवावी ह्यासाठी खास प्रयत्न केले जावेत. 

सुका आणि ओला कचरा असे वर्गीकरण करून मगच तो कचरापेटीपर्यंत पोहोचावा ह्याबाबत सुद्धा हीच गोष्ट दिसून येते. ह्या बाबतीत अत्यंत कडक नियम लागू का केले जात नाहीत ही माझ्या समजुतीपलीकडली गोष्ट आहे. दैनंदिन दिवसात जर प्रत्येक नागरिकाने ह्यासाठी काही मिनिटं राखून ठेवली तर पर्यावरण हानी वाचविण्यासाठी आपण मोठा हातभार लावू शकतो. 

विद्युतपुरवठा 

मुंबई शहरातील उन्हाळा हा अत्यंत दाहक होऊ लागला आहे. पूर्वी केवळ मे महिन्यात AC सुरु व्हायचे, पण हल्ली वर्षातील अनेक महिन्यात वातानुकूलित यंत्रणेशिवाय घरात बसणे जवळपास अशक्य होऊ लागले आहे. नवीन पिढीनं शाळेपासूनच वातानुकूलित यंत्रणेनं थंड केलेल्या वर्गात दिवस काढल्याने त्यांना AC शिवाय घरात बसणं म्हणजे मानवाधिकार हक्कांची पायमल्ली वगैरे प्रकार वाटू शकतो.  या इमारतींमध्ये प्रचंड संख्येने निर्माण झालेल्या सदनिकांची वातानुकूलित यंत्रणा सुरू ठेवण्यासाठी अत्यंत मोठ्या  प्रमाणात अधिक विद्युतनिर्मिती करणे आवश्यक आहे. ह्या अत्याधुनिक घरांना प्रत्येक गोष्टीसाठी विद्युत पुरवठ्याची गरज लागते.  त्याच बरोबर या बऱ्याच  इमारतींमध्ये पार्किंगसाठी पहिले सात-आठ मजले राखून ठेवण्यात येतात.  बऱ्याच इमारतीमध्ये त्यातील रहिवाशांच्या कार या उद्वाहकाच्या साहाय्यानं वर खाली केल्या जातात. 

इमारतींमध्ये रहिवाशांना, इस्त्रीवाले, झोमॅटो, ऍमेझॉन डिलिव्हरी मुले ह्या सर्वांना वर खाली आणण्यासाठी उद्वाहकांना सतत मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा करावा लागतो.  मुंबई शहराला हा इतका अतिरिक्त विद्युतपुरवठा सातत्यानं २४ तास करणे शक्य होणार आहे का याचा विचार करणे खूप गरजेचे झाले आहे. 

आपत्कालीन नियोजन (डिझास्टर मॅनेजमेंट) हे एक सद्यकाळातील अत्यावश्यक तंत्र आहे.  ज्या काळी आपत्कालीन परिस्थिती उद्भवते त्यावेळी विविध मूलभूत सुविधा कशा सुरळीतपणे चालू ठेवल्या जाऊ शकतील, अशा वेळी निर्णय घेण्याचे अधिकार नक्की कोणाकडे असतील याविषयी अत्यंत बारकाव्यांनिशी  नियोजन करणे आवश्यक असते. हे नियोजन लिखित स्वरूपात असणं आणि आपत्कालीन परिस्थिती घोषित करणाऱ्या अधिकारी व्यक्तीची निवड करणे ह्या सर्व गोष्टी सुस्पष्ट असाव्यात, वेळोवेळी त्यांची तपासणी करून त्यांना अचूक स्वरूपात ठेवायला हवं. 

मुंबईला विद्युतपुरवठा करणारी यंत्रणा जर काही मिनिटं किंवा तासांकरता  खंडित झाली तर या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनावर त्याचा कसा परिणाम होईल याचा सखोल अभ्यास कशा पद्धतीने केले करण्यात आला आहे हे सर्व नागरिकांना माहीत असणे आवश्यक आहे.  साधा मुद्दा म्हणजे जर विद्युत पुरवठा खंडित झाला आणि बॅकअप प्लॅन म्हणून असलेली जनित्र यंत्रणा सुद्धा जर बंद पडली तर उंचावरील मजल्यावर राहणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांना आणीबाणीची परिस्थितीत सुरक्षितरित्या कसं खाली आणता येईल ह्याचं नियोजन झालेलं असणं आवश्यक आहे. 

वाहतुकीवर पडणारा अतिरिक्त ताण 

या इमारतींमध्ये प्रत्येक सदनिकेत सरासरी दीड ते दोन कार असणार. ही सर्व वाहने सकाळी किंवा संध्याकाळी गर्दीच्या वेळी एकत्र रस्त्यावर आली तर त्या रस्त्यांची क्षमता हा अतिरिक्त ताण सहन करण्यासाठी सक्षम आहे का याचा विचार कितपत करण्यात आला आहे? प्रशासनाला सतत रस्ते खोदून ठेवण्याची सवय आहे.  रस्त्याच्या एका भागात थोडं जरी खणकाम केलं तरी  बराच लांबवर त्याचे परिणाम जाणवतात.  या उंच मजल्यांच्या इमारतींच्या आसपास ही वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाण आता अत्यंत वारंवारतेने दिसून येणार आहे. अशावेळी रुग्णवाहिका, अग्निशमनदलाची वाहने ह्यांना आपल्या लक्ष्य असलेल्या ठिकाणी पोहचण्यास विलंब होऊ शकतो जो जीवघेणा ठरू शकतो. 

अग्निशमन दलावर पडणारा ताण 

सात ते आठ मजली उंच इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर पोहोचण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा मुंबई अग्निशामक दलाकडे आहे. त्यांनी अशा इमारतींमध्ये अग्निशमन करण्याचे आपले कौशल्य वारंवार प्रदर्शित केले आहे. आपल्या सर्वांना त्याचा यथार्थ अभिमान आहे,  परंतु आता मुंबई शहराच्या विविध भागांच्या उंच इमारती झाल्या आहेत की एकाच वेळी समजा तीन चार ठिकाणी दुर्दैवाने अशा उंच इमारतींमध्ये आग लागली तर मुंबई अग्निशमन दलाकडे  या आगी विझवण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात लागणारं मनुष्यबळ आणि यंत्रणा देखील उपलब्ध आहे का याचा कोणी विचार केला आहे का?

नागरिकांचे मनोस्वास्थ  
अशा इमारतींमध्ये राहणाऱ्या एकट्या राहणाऱ्या वयस्कर नागरिकांच्या मनोस्वास्थ्याचा सखोल विचार करायला हवा? पाचव्या सहाव्या मजल्यावर राहताना  आपण जमिनीजवळ असल्याची भावना सुखदायक असते. काही अनिष्ट प्रकार घडला तर कसे का होईना आपण खालच्या मजल्यापर्यंत पोहोचू शकतो असा आत्मविश्वास किमान सत्तरीपर्यंच्या नागरिकांमध्ये तरी असतो.  परंतु समजा असे नागरिक पन्नासाव्या मजल्यावर राहत असतील तर मात्र त्यांच्या मनात हे भय सदैव राहणार की काही अनिष्ट प्रसंग उठवला तर आपण कसे खाली पोहोचू शकतो?  त्याच बरोबर या मजल्यांवर जो सतत वेगानं वारा वाहत असतो त्याचे परिणाम कसे होतात हे येणारा काळच आपल्याला सांगेल. 

गगनचुंबी इमारतींचा भविष्यातील पुनर्विकास  
साधारणता १९८० - ९० साली बांधण्यात आलेल्या इमारती आता पुनर्विकासासाठी जात आहेत.  त्या इमारतींना ज्यावेळी उद्ध्वस्त केले जाते त्यावेळी जे  सिमेंट, स्टील आणि अतिरिक्त सामानाचे जे भंगार निर्माण होतं ते शहराबाहेरील डम्पिंग ग्राउंड वर टाकलं जातं.  आज निर्माण होणाऱ्या या तीस - चाळीस मजल्याच्या इमारती पुढील ५० वर्षानंतर ज्यावेळी पुनर्विकासासाठी जातील त्यावेळी निर्माण होणारा बांधकाम साहित्याचा हा अतिरिक्त भार आपल्या जमिनीवर किती प्रदूषणाचे ओझे निर्माण करणार आहे केवळ याचा विचारच असह्य होतो. 

मुलांसाठी मोकळी मैदानं 

ह्या सर्व उंच इमारतीमुळं लोकसंख्येचं केंद्रीकरण होत आहे. ह्या एकत्रित लोकसंख्येला आवश्यक मैदानं आपण पुरवत आहोत का? कमी मैदानांमुळं मुलांना खेळण्यासाठी आणि नागरिकांना चालण्यासाठी मोकळ्या जागांची कमतरता भासणार आहे. वातानुकूलित व्यायामशाळेतील व्यायाम सर्वांनाच परवडणारा नसतो आणि तसंही म्हटलं तर मोकळ्या जागेतील खेळण्याचालण्याशी त्याची तुलना होऊ शकत नाही. 

सारांश 

आपल्याभोवताली  शहरात अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडत आहेत. त्या आपल्याला दिसतात, जाणवतात.  परंतु आपल्याला त्याविषयी फारसं काही बोलता येत नाही.  कारण हे असंच होणार हे सर्वांनी एकंदरीत गृहीत धरले आहे की काय अशी भोवतालची परिस्थिती आहे.  परंतु ज्यावेळी एखादी दुर्घटना घडते त्यावेळी मात्र मग या सर्वांना माहीत असलेल्या गोष्टीच या दुर्घटनेस कारणीभूत ठरल्या आहेत हे जाणवतं.  मुंबई शहर आणि त्यात या झपाट्याने वाढणाऱ्या गगनचुंबी  इमारती या अशा अनेक समस्यांचे मूळ बनणार आहेत.  या संभाव्य समस्यांची प्रशासनास जाण आहे का, प्रशासनानं आपत्कालीन नियोजन किती सखोलपणे केले आहे आणि त्या नियोजनाचे ऑडिट करण्यात आले आहे काय हेच मुद्दे आज मला या पोस्टद्वारे मांडायचे आहेत. नागरिकांच्या बाजूनं विचार करायचा झाला तर भविष्यात मुंबई शहरात राहण्यासाठी आवश्यक असलेली मानसिक कणखरता आपण दाखवू शकतो ह्याचं आत्मपरीक्षण त्यांनी करणं आवश्यक आहे. 

मुंबई हे राहण्यासाठी गेली शंभर - दीडशे वर्षे एक उत्तम नगर, महानगर होतं. ह्या शहरात आपल्या पुढील पिढीसाठी एका किमान दर्जाच्या आयुष्याची तजवीज करून ठेवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.  

शनिवार, ११ मे, २०२४

नाच ग घुमा !

 

शहरी दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य घटक असणाऱ्या, घरकामात मदत करणाऱ्या स्त्रियांवर आधारित हा एक सुरेख चित्रपट!  नम्रता संभेराव, मुक्ता बर्वे आणि सारंग साठ्ये ह्यांच्या नितांत सुंदर अभिनयानं सजलेला हा चित्रपट एक महत्वाचा सामाजिक विषय आपल्यासमोर मांडतो. 

आपल्या घरात घरकामासाठी आपल्या मदतीला येणारी स्त्री आपला स्वतःचा संसार सांभाळून, घरकामं आटपून मगच आपल्या घरी येत असते हे आपल्या सर्वांना मनाच्या एका कोपऱ्यात ठाऊक असतं. पण जेव्हा दैनंदिन दिवसाच्या वेळापत्रकाशी जुळवून घेतानाची तारेवरची कसरत सुरु होते त्यावेळी ह्या गोष्टीचा विसर पडतो. कदाचित घरच्या स्त्रीच्या तोंडून ह्या स्त्रियांना बोलणी ऐकावी लागतात. ही बोलणी उशिरा येण्यावरून, छोट्या चुकांवरून असू शकतात. दुसऱ्यांच्या घरात जाऊन काम करत असताना अशी बोलणी करणं हे किती अपमानास्पद असू शकतं ह्याची जाणीव हा चित्रपट करुन देतो. बऱ्याच वेळेला घरकामात मदत करणाऱ्या ह्या स्त्रियांची गावाकडील घरं बऱ्यापैकी मध्यमवर्गीय असतात. परंतु तिथं उदरनिर्वाहाचं माध्यम उपलब्ध नसल्यानं नाईलाजानं त्यांना शहरात स्थलांतर करावं लागतं. इथलं राहणीमान एकट्याच्या पगारात परवडण्यासारखं नसल्यानं मग ह्या स्त्रियांना ही कामं स्वीकारावी लागतात. 

चित्रपटात दाखविल्याप्रमाणं एकदा का घरातील स्त्री आणि ह्या घरकामात मदत करणाऱ्या स्त्रियांचे भावबंध जुळले की ह्या स्त्रिया अगदी आपल्या स्वतःच्या घराप्रमाणं ह्या घरातील कामं करतात. चित्रपटात म्हटल्याप्रमाणं मुक्ता बर्वे कधी घरातील कपाटांना कुलुपं लावत नाही, आपल्या मुलीला बिनधास्त नम्रताच्या स्वाधीन करून जाते, मुलीच्या शाळेत आपल्यानंतर नम्रताचा फोन नंबर देते. हे सारं पैशाच्या पलीकडील असतं. आणि हो ह्या स्त्रियांच्या अचानक घेतलेल्या सुट्टयांमुळं त्यांचा पगार कमी करण्याचं कठोर कृत्य टाळावे. तुम्हांला ह्या पगारात कपात केल्यानं / न केल्यानं फारसा फरक पडत नाही, पण त्यांना त्यांच्या संसारात मोठा फरक पडू शकतो हे लक्षात ठेवावं. 

मुंबईतील प्रत्येक स्त्रीनं बघावा असा हा चित्रपट! Empathy (कल्पनेनं दुसऱ्याच्या अंतरंगात शिरून त्या व्यक्तीच्या भावना जाणून घेण्याची कुवत!) ही भावना ह्या स्त्रियांच्या बाबतीत दाखवावी ही जाणीव हा चित्रपट अगदी सुरेखपणे दर्शकांना करून देतो. चित्रपटाचे सादरीकरण अगदी परिपूर्ण नसले तरीही मुख्य संदेश, ही जाणीव दर्शकांपर्यंत अगदी अचूकपणे पोहोचवतो. बाकी ह्या संपूर्ण पोस्टमध्ये ह्या घरकामात मदत करणाऱ्या स्त्रियांना ज्या नेहमीच्या संज्ञेने संबोधिले जाते त्याचा वापर मी हेतुपूर्वक टाळला आहे. त्यांना सन्मानानं वागणूक देण्याच्या प्रक्रियेतील ह्या संज्ञांचा वापर न करणे ही पहिली पायरी असू शकते. 

 

शनिवार, ३० मार्च, २०२४

Life in A Metro !



सुट्टीमय आठवडा !

या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन दिवसाची साप्ताहिक सुट्टी मिळण्याचा प्रसंग अत्यंत विरळाच! यामुळे मधला कामाचा आठवडा देखील फक्त तीन दिवसाचा झाला. त्यानिमित्ताने बऱ्याच जणांनी आपल्या स्वतःच्या सुट्ट्यांचा वापर करून एक मोठी सुट्टी स्वतःला बहाल करून घेतली.  मला मात्र या दोन तीन दिवसांच्या सुट्ट्यांवर समाधान मानणे इष्ट वाटले. 

गेल्या शनिवारी कारने वसईला जाताना मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडीला सामोरे जावं लागलं. ह्या महामार्गाचे काँक्रेटीकरण केले जात असल्यानं आणि मोठाले ट्रक रस्त्यावर एकदम आल्यानं ही वाहतूक कोंडी झाली होती. एक तासाचा प्रवास तीन तासांचा झाला. भविष्यातील सुखांसाठी वर्तमानकाळातील कष्टांना तोंड द्यावं लागतं हे समजावत मागील पिढीप्रमाणं ह्या पिढीचं देखील आयुष्य व्यतित होणार हे नक्की !

दुसऱ्या तीन दिवसाच्या साप्ताहिक सुट्टीचा काल पहिला दिवस होता.  तीन दिवस सुट्टी आली की चिंतन संमेलन घोषित करावे असे मी स्वतःला बजावतो.  या वेळेला तिन्ही दिवस घरात बसून काढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.  माणसांना जर सुखी राहायचं असेल तर त्यांना शांतपणे घरात बसता येता यावं या तत्त्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे.  या तत्त्वांमध्ये अजून काही उपतत्त्वांचा समावेश करता येऊ शकतो.  जसे की तिन्ही दिवसात झोमॅटो, स्विगीवरून काहीही न मागवणे,  आयपीएल सामने अधूनमधून बघावेत पण त्यात अजिबात  गुंतून जाऊ नये.  आज सुट्टीच्या दुसऱ्या दिवशी मनात आलेले हे विविध विचार. 

आधुनिक आहार - वैद्यकीय साखळी!

शालेय अभ्यासक्रमात जैवसाखळीचे चित्र विज्ञान विषयात समाविष्ट असायचे.  सूर्यकिरणांपासून वनस्पतींना मिळणारी ऊर्जा, त्याचा वापर करून हरितद्रव्याच्या माध्यमातून वाढणाऱ्या वनस्पती, त्या वनस्पतीवर उपजीविका करणारे शाकाहारी जीव, शाकाहारी जीवांवर उपजीविका करणारे मांसाहारी प्राणी वगैरे वगैरे...  याच जैवसाखळीचा संदर्भ घेऊन आजच्या आधुनिक शहरातील दोन नवीन साखळीचे उदाहरण द्यावेसे वाटते.  

पहिली म्हणजे प्रोटीनचा आहारात वापर करून मग जिममध्ये जाणं ही एक साखळी.  ही थोडीफार आरोग्यदायी साखळी असे म्हणता येईल.  पण यातही शरीरावर सतत जड अन्न पचवण्याचा भार पडत असावा.  

दुसरी साखळी म्हणजे मुंबईसारख्या शहरांतील मोजक्या जागेतील घरात सोफ्यावर बसून / बिछान्यात लोळत भ्रमणध्वनी, स्मार्ट टिव्ही वगैरे माध्यमातून सतत वेब सिरीज, सिनेमा यांचा आनंद घेत झोमॅटो, स्वीगीवरून मागवलेल्या तेलकट, खारट पदार्थांचे सेवन करणे.  हे सर्व अंगाशी येण्याची चिन्हे दिसू लागताच विविध वैद्यकीय चाचण्या करणं आणि विविध औषधांच्या आहारी जाणं.  हे सर्व टाळायचं असेल तर आपण सर्व घरी बनवलेलं साधंसुधं अन्न  ग्रहण करण्याची शिस्त का दाखवू शकत नाही हा एक मूलभूत प्रश्न निर्माण होतो. आपल्याला जिभेवर नियंत्रण ठेवता न आल्यामुळे या सर्व समस्या निर्माण होत आहेत याची जाणीव दुर्दैवाने आपणा सर्वांना नाही. 

दुधी, पडवळ, शिराळा, गलका, तोंडली  ह्या हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश केल्यास, संध्याकाळचे स्नॅक्स न घेता आठच्या आत मोजकं जेवल्यास भले तुम्ही अरनॉल्ड होणार नाहीत पण तब्येत प्रसन्न राहील आणि सकाळी उठताच तुम्हांला कडकडून भूक लागलेली असेल. 

महानगरातील प्रवास - सुखदुःखाचा संमिश्र अनुभव 

मुंबई शहरात फिरताना संताप निर्माण होण्याची शक्यता जवळपास ७० टक्के असावी असा माझा कयास आहे.  हे सर्व मुंबईत सर्वत्र खणल्या गेलेल्या रस्त्यांमुळे होत असावं.  बहुतांशी रस्ते वारंवार परतपरत का खोदावे लागतात  हे माझ्याप्रमाणेच अनेक मुंबईकरांना पडलेले कोडे!  या रस्त्यांच्या खणण्यामागं  आणि त्यानंतरच्या त्यांच्या बुजविण्यामागं मोठं अर्थकारण दडलेलं आहे हे एक मोठं उघड गुपीत आहे. ह्यामुळं जिथं तीन मार्गिकांच्या दोन, किंवा दोनांच्या एक मार्गिका होतात त्यावेळी दोन सेकंदाआधी रडारवर कुठेही नसलेला रिक्षावाला अचानक डाव्या बाजूनं येऊन आपल्याला कट देऊन जातोच वर छद्मी हास्य सुद्धा देतो. अशावेळी तोंडी अपशब्द येऊ नयेत ह्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. 

परंतु मेट्रोचा प्रवास करताना मात्र आपल्याला काहीसं बरं वाटतं.  मुंबईतील उन्हाळा आत्ताच सुरू झाला आहे.  त्यात वर उल्लेखल्याप्रमाणं खणलेल्या रस्त्यांमुळे सर्वत्र वाहतूक कोंडी झालेली आहे.  अशावेळी आपण थंडगार मेट्रोमध्ये बसून आगाऊ रिक्षावाल्यांशी हुज्जत न घालता शांतपणे आपल्या कार्यालयात पोहचू शकतो यासारखे सुख नाही.  

मेट्रोमध्ये विविध प्रकारचे लोक भेटतात.  त्यातील वानगीदाखल दिलेली ही काही उदाहरणे! तीन चार आठवड्यापूर्वी एक कॉलेजकुमारी आणि तिचा मित्र माझ्या बाजूला बसले होते.  भोवतालच्या अर्ध्या डब्याला ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात ती कॉलेजकुमारी आपल्या आत्तापर्यंतच्या तीन अयशस्वी नात्यांविषयी त्या मित्राला सांगत होती.  आपल्या परीने ही सर्व नाती टिकवण्याचा मी कसा प्रयत्न केला आणि तरीही ही का यशस्वी झाली नाहीत हा प्रश्न ती त्या मित्राला विचारत होती.  माझ्यातच काही प्रश्न नाही ना असा प्रश्न तिनं त्याला विचारला. त्याला उत्तर न सुचल्यानं त्यानं तिला आपला रुमाल देऊ केला. 

दुसरी घटना.  ही मेट्रो स्टेशन कधी कधी गोंधळून टाकणारी आहेत. तिथं क्वचितच तुम्हांला नक्की कोणत्या दिशेला जायचं आहे ह्याविषयी संभ्रम निर्माण होऊ शकतो.  महाशिवरात्रीच्या दिवशी माझ्यासमोर एक मध्यमवर्गीय मराठी महिला मस्त मोबाईलवर गप्पा मारत बसली होती. दहिसरच्या पश्चिमेला ती मेट्रोमध्ये चढली होती आणि तिला दक्षिणेकडे असलेल्या मीठचौकीकडं जायचं होतं. तिनं आधी उत्तरेकडे जाऊन वळण घेत दक्षिणेच्या गुंदवलीला जाणारी मेट्रो पकडली. तिच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या.  काही वेळाने तिला भान आलं आणि मीठचौकी हे स्टेशन अजून का येत नाही.  याची पृच्छा तिने सहप्रवाशांकडे केली.  त्यावेळी आपण उलट्या दिशेने जाणाऱ्या मेट्रोमध्ये बसलो आहोत याचा साक्षात्कार तिला झाला.  त्यानंतर तिने मीठचौकीला जाण्यासाठी नक्की काय करावे यासाठी विविध सहप्रवाशांनी तिला सूचना देण्यास सुरुवात केली.  मीही त्यात सहभागी होतो.  एकंदरीत सल्ले देण्यात आपल्या देशातील लोकांमध्ये सदैव उत्साह दिसून येतो. परंतु स्टेशनवर उतरून तिला योग्य मेट्रोमध्ये बसवून देण्यासाठी ना लोकांकडे वेळ होता ना माझ्याकडं !

तिसरा प्रसंग म्हणजे एका अकरा वर्षाच्या मुलीची आई आधीच्या स्टेशनवर उतरून गेली पण मुलगी मात्र मेट्रोमध्येच थांबली. आईने बहुदा आधीच्या स्टेशनवर मेट्रो अधिकाऱ्यांना कळवलं असावं. तत्परतेनं मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी पुढील स्टेशनवर संपर्क केला. ती मुलगी काही वेळापूर्वी नेमकी आमच्यासमोर उभी होती.  त्या मुलीच्या वर्णनाची  संपूर्ण मेट्रोमध्ये घोषणा केली गेली.मेट्रोचे  तीन चार अधिकारी ज्यामध्ये महिला अधिकारी सुद्धा समाविष्ट होत्या तत्परतेने येऊन त्या मुलीला घेऊन गेले. मेट्रोचा अनुभव नक्कीच सुखावह आहे. ह्या आठवड्यात एक दिवस मी लोकल ट्रेनने यायचा निर्णय घेतला. त्यातील गर्दी, उकाडा हे सारं पाहता हा केवळ अपवादात्मक निर्णय असेल हे नक्की! 

समाज प्रतिबिंब !

भोवतालच्या समाजातील मनाला खटकणारे विविध मुद्दे ! ह्यातील प्रत्येकावर खरंतर बरंच काही लिहिता येईल पण वाचकांनी आपापली मतं ठरावावीत म्हणून मी जास्त काही भाष्य करणार नाही. 

  • तत्वांचा, निष्ठेचा अभाव असणाऱ्या IPL स्पर्धा , राजकीय पक्षांनी लढविलेल्या निवडणुका ह्यांनी व्यापून टाकलेली प्रसारमाध्यमं ! 
  • पंचवीस - तीस वर्षांपूर्वी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आलेल्या संधींच्या महासागरामुळं युवकांच्या पसंतीयादीवर खूप मागे ढकलली गेलेली पारंपरिक अभियांत्रिकी क्षेत्रं ! आणि आता chat gpt, dev in ह्या सारख्या संगणकाला प्राप्त झालेल्या आज्ञावली निर्माण करण्याच्या क्षमतेमुळं लाखोंच्या संख्येनं माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात प्रवेश घेतलेल्या युवकांच्या मनात आलेलं अस्थिरतेचे भय. जगातील बदलांचा वेग इतका झपाट्यानं वाढला आहे की पुढं कोणतंही करिअर हे स्थिर नसणार ह्याविषयी शंका नाही. अशावेळी तुम्हांला मनोबल देणारी कुटुंबसंस्था आपणच गेल्या काही वर्षात आपल्या कर्माने नष्ट वा कमकुवत केली. पुढील पिढीला तुम्ही मुद्देसूद धीर कसा देणार ह्याची तयारी चाळीशी पार केलेल्या सर्वांनी करणं समाजस्वास्थ्यासाठी फार महत्वाचं ठरणार आहे. "घाबरू नकोस, धीर धर सर्व काही ठीक होईल !" वगैरे विधानं कामाची नाहीत. उलट आमच्या पालकांना आमच्या समस्यांची जाण नाही असा समज होऊन ही नवीन पिढी अजूनच आपल्यापासून दूर जाईल. 
  • व्यापक मानसिकतेचा अभाव - नवीन पिढीमध्ये नकार पचविण्याच्या क्षमतेचा अभाव आहे असं विधान करता करता कधी एक समाज म्हणून आपण सुद्धा त्याच मानसिकतेमध्ये पोहोचलो हे आपल्याला समजलं नाही. आपल्या विरोधात कुणी काही बोललं, लिहिलं की त्यांच्याशी तावातावानं वाद घालणारे आपण आपल्यालाच अनोळखी वाटू लागलो! 
  • मराठी व्यावसायिक कुटुंबांची तिसऱ्या पिढीपलीकडे टिकू न शकण्याची सातत्यानं दिसणारी उदाहरणं - एका मराठी अग्रगण्य वर्तमानपत्रात ह्या आठवड्यात आलेल्या लेखातील बरीच विधानं मला पटली. ह्यावर माझी मतं - मराठी समाज बोलण्यालिहिण्यात बरीच शक्ती वाया घालवतो. शारीरिक, बौद्धिक मेहनत करण्याची तयारी / जिद्द  नसणं,  वैयक्तिक / व्यावसायिक नातेसंबंध टिकविण्याच्या क्षमतेचा अभाव, संवादाद्वारे कोणी विनाकारण दुखावलं जाणार नाही ह्याची दक्षता घेण्याचा अभाव, मोठी स्वप्नं पाहण्यात कदाचित होणारी हयगय ही काही कारणं असावीत. 
माझा एकच साधा जीवनमंत्र ! प्रत्येक दिवशी आपण आपली सर्वोत्तम कामगिरी कशी बजावू शकतो ह्याचा सकाळी आराखडा बनविणं आणि दिवसभरात अगदी हिरिरीनं त्याचा पाठपुरावा करणं. संपूर्ण मनुष्यजीवन खूपच क्लिष्ट बनलं आहे, त्यामुळं बहुतांशी वेळा सुख, स्थैर्य ह्यांचा आपल्याला पाठपुरावाच करत रहावं लागेल. आयुष्यात हवं ते मिळालं नाही म्हणून जवळच्या लोकांवर त्याचा राग काढणं सोडून द्या, त्यांना गृहीत धरू नका. ते तुमच्या सोबतीला असतील तर आहे त्या परिस्थितीत तुम्ही खूप आनंदी राहू शकता !
चिंतन सत्र समाप्त ! 

रविवार, २५ फेब्रुवारी, २०२४

भटकंतीचा महिना !

२६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी ह्या २९ दिवसांत चांगलीच भटकंती झाली. त्यातील बहुतांशी प्रवास कामानिमित्त आणि एक जवळचा प्रवास शालेय स्नेहसंमेलनासाठी झाला. एकंदरीत आठ वेळा विमानानं उड्डाण केलं. त्यासोबत आठ वेळा लँडिंग सुद्धा झालं हे ओघानं आलंच.   

अमेरिकेतील दोन ठिकाणच्या टीमची भेट झाली. विल्मिंग्टनला एक ऑफसाईट झालं. ऑफसाईटमध्ये चांगली चर्चा झाली. इशा कार्यालयात भेटायला आली. बराच वेळ तिच्या अमेरिकन जीवनाविषयी बोलली.  निशांक, निऊकडे चार दिवस मस्त गप्पा मारल्या. निरंजना, शर्व, निशांकची बहीण ममता भेटले. होळीवरचा आशय तिथं भेटला, त्याच्यासोबत मस्त जेवण केलं. विल्मिंग्टनला शालेय वर्गातील अजय, नंदा भेटायला आले. त्यांच्या आणि कल्पेशसोबत (नंदाचे यजमान) सुद्धा चांगली चर्चा झाली. प्लॅनोला नवीन संघाशी ओळख झाली. तिथं भारतातून स्थलांतरित झालेले मित्र भेटले. झूमवर नेहमी बोलणारा फेमी पुन्हा प्रत्यक्षात भेटला. भारतीय आणि अमेरिकन रेस्टोरंटमध्ये स्वादिष्ट अन्नावर चांगला आडवा हात मारला. शनिवार सकाळी निऊसोबत कार्यसिद्धी हनुमान मंदिरात जाऊन आलो. योगायोगानं तिथं त्याचवेळा सुरु झालेल्या आरतीला उपस्थित राहण्याचं भाग्य मिळालं. 

विल्मिंटन कार्यालय, तिथले सहकारी, तिथलं हॉटेल ह्याची अगदी सवय झाली आहे.  सकाळी साडेसातला कार्यालयात जाऊन साडेचारच्या आसपास घरी निघण्यासारखं सुख नाही. थंड हवामान आणि स्निग्ध / दुग्धजन्य पदार्थांचं सेवन केल्यानं चेहरा उजळला असे प्राजक्ता म्हणाली . मुंबईत आठवडाभरात तो पूर्वीसारखा दमलेला झाला ही गोष्ट वेगळी! अमेरिकेतील यंदाचा जेट लॅग माझ्यासोबत मित्रत्वाने वागला. मध्यरात्री एक वाजता जरी त्यानं मला उठवलं तरी नंतर दोन तासानं झोपू देण्याची कृपा त्यानं माझ्यावर केली. 

अमेरिकेत हॉटेलवरून निघताना तिथंच एक केबिन बॅग सोडून येण्याचा विसरभोळेपणा मी केला. पण त्यातील शर्ट आणि मोबाईल चार्जर परवा अमेरिका, हैदराबाद ते भारतातील ऑफसाईट अशा मार्गानं माझ्यासोबत पोहोचले. मूळ चार्जर परतल्याने भ्रमणध्वनीची कळी खुलली! 

नेहमीप्रमाणं ह्यावेळी कमी खायचं पासून सुरवात करत आता पुढील आठवड्यात फक्त गलका, दुधी, पडवळ खायचं अशी समजूत घालत विमानात आलेले बहुतांश सर्व पदार्थ हादडले. त्यात काही वेळानं आता इतकं खाल्लं तर अजून थोडं जास्त खाल्लं तर काय फरक पडतो अशा स्वतःच स्वतःच्या घातलेल्या समजुतीचा भाग होता. त्यामुळं तिथं निघताना जो काही फिट आदित्य होता तो विमानातील चोवीस तासांत जरा सुटला. 

गेल्या रविवारी शालेय मित्रांचं वार्षिक स्नेहसंमेलन झालं. अधिकाधिक लोकांनी आपलं मनोगत मांडल्यानं मोगॅम्बो खुश हुआ! व्यक्त होणं ही मनुष्याची आवश्यक गरज आहे हे आता अधिकाधिक लोकांना जाणवु / पटू लागलं आहे. त्याहून महत्वाचं म्हणजे ते आता व्यक्त होण्यासाठी पुढं येऊ लागले आहेत.  बहुतांश मित्रमैत्रिणींनी मुद्देसूद विचार मांडले. परत आल्यानंतर आईला प्रथमच भेटल्यावर तिनं तब्येतीविषयी समाधान व्यक्त करतानाच  थोड्या सुटलेल्या पोटाकडं व्यायामाकडं दुर्लक्ष करू नकोस असा मोलाचा सल्ला दिला. 

गुरुवार, शुक्रवार कंपनीतील सीनियर लोकांचं ऑफसाईट झालं. विविध विषयांवर चांगली चर्चा झाली, पुढील काही वर्षांच्या नियोजनाविषयी बौद्धिकं घेण्यात आली. ह्या चर्चेसोबत पुन्हा एकदा सुग्रास भोजन, नाश्त्याचे (दोन्ही वेळा) अगणित पर्याय आपल्याला मोहात पाडण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. कौतुकाची बाब म्हणजे मी ह्यावेळी मात्र स्वतःवर नियंत्रण ठेवलं. शुक्रवारी रात्री मुंबईला परतीसाठी मूळ वेळ पावणेअकरा असलेल्या विमानाची उड्डाणवेळ पाच वेळा पुढे ढकलली जात शेवटी ते पहाटे पाच वाजता मुंबईला निघालं. पण सोबत सात सहकारी असल्यानं सुरुवातीला आलेला संताप, चीड नंतर एका धमाल चर्चेत आणि गेम्समध्ये घालवलेल्या एका चांगल्या आठवणीत परिवर्तित झाले. 

शनिवारी सकाळी घरात परतल्यावर पुढील काही महिने तरी आपली भ्रमणकक्षा फक्त मुंबई, वसईपर्यंत मर्यादित ठेवणार असं आश्वासन मी दिलं. बघुयात !!! 

ह्या सर्व भ्रमंतीतील हे निवडक फोटो! 



 










































रविवार, ११ फेब्रुवारी, २०२४

विमानाच्या घिरट्या आणि त्रस्त मी !

अमेरिकेहून भारतात परतीचा प्रवास म्हटलं तर संयमाची कसोटी पाहणारा असतो. ह्या प्रवासात tail wind ची दिशा प्रवासाला अनुकूल असल्यानं भारतातून अमेरिकेला जाताना लागणाऱ्या वेळेपेक्षा परतीचा प्रवास लवकर होतो. असं असलं तरीही विमानतळावर तीन चार तास आधी पोहोचणे, मधल्या लंडनसारख्या ठिकाणी तीन चार तासाचा थांबा अशा प्रकारामुळं एकंदरीत प्रवास चोवीस तासांच्या आसपास होतो. 

त्यामुळं जेव्हा आपण भारताच्या जवळ येतो त्यावेळी विमानाबाहेर पाडण्यासाठी आतुर झालेलो असतो. काल रात्री माझं लंडनहुन मुंबईला येणारं विमान असंच अगदी मुंबईजवळ आलं होतं त्यावेळी समोरील स्क्रीनवरील चित्रपट सोडून मी विमानाचा मार्ग दर्शविणाऱ्या नकाशांकडे वळलो.  आपल्या गंतव्य स्थळाचे  अंतर ३१९ मैल आणि तिथं पोहोचण्यासाठी लागणारा वेळ ५४ मिनिटं हे एकंदरीत ठीक गणित वाटलं.  

 

हे विमानाचे नकाशे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे आपल्या समोर सादर केले जातात. ते सर्व पाहत असताना थोडा वेळ गेला. त्यानंतर मी पुन्हा खालील नकाशा तपासला. आता गंतव्य स्थळ १०५ किमी आणि वेळ ३९ मिनिटं असं समीकरण सादर करण्यात आलं. विमानाचा वेग कमी झाला की काय असा विचार मनात आला. 


थोड्याच वेळात मला मोठा धक्का बसला. आता विमान पुन्हा अरबी समुद्रात शिरलं होतं. 

वैमानिक घोषणा तर व्यवस्थित करत होता, त्यामुळं त्याचं डोकं फिरलं की काय ही शंका घ्यायला फारसा वाव नव्हता. 


मग मात्र वैमानिकाचे डोके ताळ्यावर आले असावे. त्यानं कच्छ आखातात वळण घेतलं. वैमानिक गुगल मॅप वापरत असावा. मी सुटकेचा थोडा निःश्वास टाकला.  केबिनमध्ये जाऊन त्याच्याशी बोलायचा माझा विचार मी काही काळ स्थगित केला. 



वैमानिकाकडे थोडा वेळ लक्ष दिले नाही असा विचार करून मी ज्यूस वगैरे प्राशन करण्याकडे मोर्चा वळविला. पाच मिनिटं माझं दुर्लक्ष झालं आणि पुन्हा वैमानिकानं गोंधळ घातला. वैमानिक थेट महाराष्ट्रात खोलवर घुसला होता. संगमनेर वगैरे गावांच्यावर आमचे विमान होते. 


आता माझा संताप संताप झाला होता. वसईवरून विमान घेऊन मला माझ्या बॅगांसकट पॅराशूटमधून खाली उतरव असे सांगण्यासाठी त्याच्याकडं जावं असा मी विचार केला होता. पण पुन्हा एकदा वैमानिकाने वळण घेतलं.  


आता मात्र वैमानिकाने थेट मुंबईच्या धावपट्टीकडे विमानाचा मोर्चा वळविला. आणि पुढील सात आठ मिनिटांत आम्ही मुंबईत उतरलो होतो. 
विमानतळावर उतरणाऱ्या विमानांची गर्दी असली का असा प्रसंग ओढवतो. आपल्या विमानाचा क्रमांक येईपर्यंत विमानाला अशा घिरट्या घालाव्या लागतात. विमानाच्या घिरट्या किती लांबवर असतात हे काल (आज भल्या पहाटे अनुभवलं) ते आपल्यासमोर मांडावं असं वाटल्यानं हा लेखनप्रपंच !

गुरुवार, ११ जानेवारी, २०२४

टोपणनाव - एक धावता ऊहापोह


टोपणनावांवरून उद्भवलेल्या वादळाच्या निमित्ताने टोपणनावांच्या उत्पत्तीचा आणि एकंदरीत टोपणनावांवरून व्यक्तींच्या आयुष्यात घडणाऱ्या बदलांचे विश्लेषण करण्याचा हा प्रयत्न. 

टोपणनावाचे विविध प्रकार

१. नावांचे अपभ्रंश करून पडलेली टोपणनावे - जसे की परागचे पॅडी, सुनीलचे सनी,  संदीपचे सॅंडी. तुमची आडनावे सुद्धा तुमच्या टोपणनावाचे जनक असू शकतात. पाटील आडनावाच्या व्यक्तींना पाटला ह्या नावाने संबोधिणे हा भोवतालच्या सर्व व्यक्तींचा जन्मसिद्ध हक्क असतो. आडनावावरून काही उपहासात्मक काव्यंसुद्धा रचली जाऊ शकतात. 

यात अजूनही एक उपप्रकार म्हणजे तुमची इंग्लिशमधील आद्याक्षरे एकत्र करून बनवलेले तुमचे नाव जसे की AD, AP, CD वगैरे

२. शरीरवैशिष्ट्यावरून पडलेली टोपणनावे - उदाहरणार्थ घाऱ्या, लंबू वगैरे!  यातही एक उपप्रकार असतो तुमचे शरीरवैशिष्ट्य एखाद्या प्राण्याशी, पक्ष्याशी  मिळतेजुळते असेल तर त्यांचे नाव तुम्हाला पडू शकते

३. प्रसिद्ध व्यक्तीशी दिसण्यात किंवा इतर बाबतीत असलेले साधर्म्य - उदाहरणार्थ डावखुरा आणि चष्मा लावणाऱ्या मित्राला लॉईड म्हणून संबोधिणे. गबाळी केशरचना चित्रविचित्र आवाजात बोलणाऱ्यास शाहरुख वगैरे (ह्या वाक्यावरून माझा निषेध वगैरे होऊ शकतो) 

४. पूर्वीच्या एकत्र कुटुंबपद्धतीत प्रेमाने संबोधण्यासाठी वापरण्यात येणारी टोपण नावे - जसे की माई, अक्का, बेबी, अण्णा.  हल्ली एकत्र कुटुंबपद्धती लयास जात असल्यामुळे ही टोपणनावे आता मागे पडली आहेत. 

५. स्वभाववैशिष्ट्यावरून पडणारी टोपणनावे -  जसे की चिडका, आगाऊ,  वॉल.  यामध्ये या विशेषणयुक्त टोपणनावापुढं त्या व्यक्तीचे नांव सुद्धा जोडले जाऊ शकते जसे की आगाऊ जॉन !

६. वयानुसार पडणारी टोपणनावे - बालक, आजोबा, काका, मामा. जेव्हा विविध वयोगटातील माणसे काही सामायिक गोष्टींमुळं एकत्र येत राहतात त्यावेळी त्यातील अल्पसंख्य वयोगटातील माणसांना त्यांच्या वयानुसार टोपणनावे पडू शकतात. 

७.प्रेमिकांमधील केवळ दोघांत वापरण्यासाठी टोपणनावे - बेब, सोना, डूड. ह्यावर जाणकार अधिक प्रकाश टाकू शकतात

वर उल्लेखलेले टोपणनावाचे  प्रकार हे सर्वसमाविष्ट असतीलच असे नाही परंतु हे सर्वसाधारणपणे आढळणारे टोपणनावाचे प्रकार आहेत.  

आता आपण बघणार आहोत टोपणनाव पडण्याची आणि ती स्वीकृत होण्याची प्रक्रिया! 

प्रकार एक, तीन , चार आणि सहामध्ये आपल्याला पडलेल्या टोपणनावाविषयी आपल्याला सहसा फारसे वाईट वाटण्याचे किंवा राग येण्याचे कारण नसतं.  त्यामुळे अशाप्रकारे निर्मित झालेले टोपण नाव स्वीकारण्यास आपण खूप उत्सुक नसलो तरीही ते वापरले तरी आपण जास्त काही नाराज होत नाही.  टोपणनावांचा वापर होण्याची जी काही अनेक कारणे आहेत त्यात तुम्हाला उल्लेखण्यासाठी सोय हे एक कारण असलं तरी बऱ्याच वेळा तुम्हांला राग यावा अशी सुप्त इच्छा देखील असू शकते.  एक, तीन , चार आणि सहामध्ये  ज्याच्याविषयी टोपणनाव वापरलं जातं त्याला राग येण्याची शक्यता कमी असते त्यामुळे टोपणनाव वापर वापरणाऱ्या समुदायाला त्यातून आसुरी आनंद फारसा  काही मिळत नाही.  

दोन आणि पाच या प्रकारात मात्र आपल्या मित्रांना चिडवण्याची खुमखुमी हा सुप्त घटक टोपणनावाच्या निर्मिती आणि वापरामागे दडलेला असतो.  त्यामुळे या प्रकारांतील टोपणनावांच्या स्वीकृतीची प्रक्रिया विविध स्थितींमधून जाते.  पहिली स्थिती म्हणजे नकाराची!  आपल्याला हे टोपणनाव देऊ नये अशी त्या व्यक्तीची पहिली प्रतिक्रिया असते.  या प्रतिक्रियेतून संतापाचा आणि प्रतिकाराचा देखील उद्भव होऊ शकतो.  हळूहळू पर्याय नसल्याने कालांतराने या या नकाराचे रूपांतर स्वीकृतीमध्ये होऊ शकते.  परंतु यामध्ये सुद्धा अनेक अटी असू शकतात.  जसे की हे टोपणनाव कोणी आणि कुठे वापरावं यासाठी मार्गदर्शक संहिता निर्माण केली जाऊ शकते. या मार्गदर्शक संहितेचे उल्लंघन झाल्यास आणीबाणीचे प्रसंग उद्भवू शकतात. असे झाल्यास या टोपणनावाच्या निर्मात्याला आनंदाच्या उकळ्या फुटू शकतात.  

वेळेअभावी ही पोस्ट इथेच आवरती घेत आहे.  परंतु टोपणनावांच्या उगमामागे खूप मोठी सर्जनशीलता दडलेली आहे.  त्याची सर्वांना जाणीव असावी हा ह्या पोस्टमागील उद्देश. टोपणनावांच्या निर्मितीची प्रक्रिया अशीच पिढ्यानपिढ्या सुरू राहो आणि मनुष्यजातीतील सर्जनशीलता फुलत राहो ही सर्वशक्तीमानाकडे प्रार्थना. ह्या विषयावर जर का अजून कोणी डॉक्टरेट केली नसल्यास इच्छुकांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा!


कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...