मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, १८ डिसेंबर, २०१९

संस्कृतीतरंग !




कालच्या पोस्टमध्ये वर्णन केलेल्या बैठकीनंतर मला एक दिवसीय प्रशिक्षणाला धाडण्यात आलं. धाडण्यात आलं हा सयुक्तिक शब्दप्रयोग अशासाठी की अशा प्रशिक्षणांना हजेरी लावण्याबाबत मी फारसा उत्सुक नसतो. जगभरातील विविध संस्कृतीच्या लोकांसोबत काम करताना कोणत्या मनोवृत्तीची (Mindset) आवश्यकता आहे ह्याविषयी हे प्रशिक्षण होते. ह्या प्रशिक्षणांची एक गंमत असते. आम्ही संवादाद्वारे प्रशिक्षण करतो असं म्हणत ही मंडळी आपल्याकडूनच बरंचसं वदवून घेतात. अधुनमधुन चर्चेला मार्गावर आणण्याचं काम ही मंडळी चोख बजावतात. 

ह्या प्रशिक्षणात एक मजेशीर मुद्दा प्रशिक्षकांनी मांडला. आपण भारतीय लोक कसे भावनिकरित्या सगळीकडे गुंतत राहतो हा तो मुद्दा !पाश्चात्य देशातील सहकारी आला की कंपनीच्या प्रवेशद्वाराशी रांगोळ्या काढतो. त्यांना कुर्ता, साड्या नेसवुन रंगीबेरंगी कपड्यात छायाचित्रे काढतो. हल्ली तर त्यांना बॉलीवूडच्या गाण्यांवर नृत्यसुद्धा करावयास लावतो! पण हेच आपण तिथं अमेरिकेत एका आठवड्यासाठी गेलो तर बऱ्याच वेळा आपले आपण असतो. एखादया सायंकाळी सर्वांसोबत डिनरला जाऊन आलो की सामाजिक बांधिलकीचं ओझं बहुदा संपते. अर्थात ह्याला हल्ली बरेच सन्माननीय अपवाद निर्माण झाले असावेत. 

अजून एक मुद्दा समजा आपले आणि ह्या परदेशी सहकाऱ्यांचे व्यावसायिक संबंध संपुष्टात आले की बऱ्याच वेळा त्यांच्या बाजुनं वैयक्तिक ऋणानुबंध कमी होतात. पुन्हा एकदा कदाचित ही निरीक्षणे काही वर्षापुर्वी खरी असावीत. हल्ली ह्यात खुप बदल घडुन आला आहे. मुख्य मुद्दा आपल्या आणि पाश्चात्य संस्कृतींमध्ये कसा फरक होता हे समजुन घेऊन त्यानुसार आपल्या व्यावसायिक अपेक्षांमध्ये, वागणुकीत योग्य बदल घडवून आणण्याविषयी होता. काही प्रशिक्षणार्थी पूर्वेच्या आणि युरोपातील सहकाऱ्यांसोबत कार्यरत आहेत. त्यांनीही आपले अनुभव मांडले. 

ह्यातील आपल्या संस्कृतीतील भावनिक गुंतवणुकीच्या मुद्द्याचा धागा पकडुन पुढे सरकूयात. ह्या सोशल मीडियाचा उद्रेक ज्या वेळी सर्वप्रथम झाला त्यावेळी काही काळातच आपण सर्वांनी ह्याच्या माध्यमातुन जुन्या काळाकडे धाव घेतली. जुन्या संस्कृतीला, गाण्यांना, मित्रमंडळींना एकत्र आणलं! आपण सर्व अगदी भावनाविवश होत ह्या जुन्या काळाच्या आठवणीत आकंठ बुडून गेलो. चाळिशीनंतर करिअर वगैरे गौण बाब आहे, ज्याच्या भोवताली मित्रमंडळी तोच खरा  श्रीमंत वगैरे वाक्य ऐकावयास आली! 

पण काही मंडळींनी मात्र ह्याच सोशल मीडियाचा वापर करत आपल्या करियरला नवचैतन्य दिलं. नव्यानं झेप घेतली. सत्तरीच्या पलीकडं सुद्धा व्यावसायिक क्षेत्रात सक्रिय राहण्याचा चंग बांधला. 

वरील दोन परिच्छेदात मांडलेल्या दोन भिन्न मतप्रवाहांपैकी कोणता एक बरोबर आणि दुसरा  चुकीचा असं मी म्हणत नाही. दोन्हींच्या आपल्या परीनं चांगल्या वाईट बाजु आहेत. गेल्या महिन्यातील माझ्या अनुभवावरुन मी दुसऱ्या पर्यायाकडे काहीसा झुकला गेलो असलो तरी ही तात्कालिक स्थिती असु शकते. 

सारांश इतकाच की सांस्कृतिकदृष्या पाहायला गेलं तर आपण भावनिक मंडळी! त्यामुळं आपले बरेचसे निर्णय भावनेच्या भरात घेतले जाण्याची शक्यता अधिक असते. ह्या गोष्टीचे भान राखत योग्य ठिकाणी उपलब्ध माहितीच्या आधारे सारासार विचार करुन बौद्धिक निर्णय घ्यावा ही विनंती!

मंगळवार, १७ डिसेंबर, २०१९

रस्सीखेच



जवळपास दोन महिन्यानंतर आजची ही पोस्ट ! डिसेंबराच्या पहिल्या सोमवार - मंगळवारी एक वरिष्ठ पातळीवरील बैठकीला हजेरी लावली. अमेरिकेहुन उच्च अधिकारी आले होते. आपला देश का व्यवस्थित चालतो हे जाणुन घ्यायला अशा बैठकी उपयोगी पडतात. दोन दिवसाच्या ह्या बैठकींमध्ये एकेका मिनिटाचा हिशोब ठेवून सादरीकरण केलं गेलं. पुढील वर्षाच्या नियोजनासाठी ही बैठक असल्यानं उपस्थित मंडळी अगदी तन्मयतेनं सर्व सादरीकरणात सहभागी होत होती. व्यावसायिक पातळीवरील जोशात येऊन प्रश्नोत्तरे होत होती. 

ह्यातील एका गटाच्या सादरीकरणात माझाही सहभाग होता. तयारी अगदी बऱ्याच दिवसांपासुन सुरु होती. कोणती स्लाईड कोणी सादर करायची, तिथं नेमकं काय बोलावं ह्याची सखोल तयारी करण्यात आली होती. प्रेसेंटेशन्सना व्यावसायिक रुप देण्यासाठी एका वेगळ्या गटाची मदत घेण्यात आली. सादरीकरण बऱ्यापैकी चांगलं पार पडल्यानंतर आम्ही सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.  

बऱ्याच कंपन्यांमध्ये ह्या प्रकारातील व्यावसायिक बैठका होत असतात. इथं प्रत्येक  शब्दाचा, प्रत्येक मिनिटाचा हिशोब द्यायचा असतो. त्यामुळं प्रत्येक स्लाईड, स्लाईडवरील प्रत्येक वाक्य / शब्द खरोखर आवश्यक आहे का? त्यांची क्रमवारी योग्य आहे का ह्याचा सर्वागीण विचार केला जातो. हा झाला आपला प्रगतशील भारत! इथं तुमच्या कर्तृत्वावर आपलं भाग्य घडविण्याची तुम्हांला पुरेपूर संधी दिली जाते. 

ह्या भारताकडुन भोवतीच्या दुसऱ्या भारताकडं वळल्यानंतर मात्र बरीच निराशा होते. ह्या भारतात तुमच्या कर्तुत्वाला वाव मिळेलच ह्याची खात्री नसते कारण इथं प्रस्थापितांचे राज्य असतं. गेल्या काही महिन्यांतील घटना पाहिल्या तर सारासार विचार करण्याच्या वृत्तीपासून आपण अधिकाधिक दुर जात चाललो आहोत असं दिसतं. 

ब्लॉग लिहुन कोणताही प्रश्न सुटेल ह्याच्यावरील माझा विश्वास बऱ्याच आधी उडाला आहे. त्यामुळं हल्ली पूर्वीइतक्या जोमानं ब्लॉग लिहणं मी खुपच कमी केलं आहे. हल्ली सर्वसामान्य लोकांमध्येसुद्धा वडीलधारी / जाणकार माणसांचे ऐकुन घेण्याची तयारी राहिली नाही. 

व्यावसायिक जगात प्रत्येकाला एक विशिष्ट अधिकाराची जागा दिली गेली असते. कोणी अधिकाराच्या पोस्टवर किती काळ राहावं ह्याचा निर्णय योग्य मंडळी घेत असतात. एकदा का एक व्यक्ती अधिकाराच्या जागी नियुक्त झाली की तिचे निर्णय ऐकून घेणं हे त्या व्यक्तीच्या संघातील सर्वांना बंधनकारक असते. त्यामुळं त्या संघातील निर्णयांत, कृतीत एकवाक्यता येते. संघाच्या यशस्वी होण्याच्या शक्यतेचे प्रमाण वाढीस लागते. 

आपल्या सार्वजनिक जीवनात सुद्धा कुठंतरी व्यावसायिक जीवनातील ह्या तत्वाची अंमलबजावणी व्हायला हवी. नाहीतर एकीकडं व्यावसायिक क्षेत्र आपल्या देशाला पुढे नेत राहणार परंतु बाकी क्षेत्रात योग्य व्यक्ती अधिकाराच्या जागी नसल्यानं आपल्या देशाच्या प्रगतीवर प्रचंड मर्यादा निर्माण होत राहणार ! ही रस्सीखेच थांबायला हवी ! 

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

गहरा पानी


स्वस्वीकृत मानसिकता 

९ वर्षांपुर्वी ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती त्यावेळी मी एक आदर्शवादी मनोधारणा बाळगुन होतो. ब्लॉग लिहुन कुठंतरी समाजात चांगलं परिवर्तन होईल अशी ही मनोधारणा होती. कदाचित त्यावेळी माझा समाजात वावर कमी होता. तसा तो आताही कमीच आहे. परंतु जो काही वाढला त्यावरुन एक गोष्ट उमजुन आली. लोकांची मानसिकता बदलणं ब्लॉगद्वारे साध्य होणं शक्य नाही. ही मानसिकता कशानं बदलु शकते हे ज्याला कोणाला समजलं तो धन्य ! अर्थात मानसिकता बदलायची गरज आहे तरी काय हाही एक मोठा प्रश्न आहे. पुर्वी संस्कृती टिकविण्यासाठी  धडपड करण्याची जी मानसिकता होती तिचं प्रथम आर्थिक स्थैर्य मिळविण्याच्या मानसिकतेत परिवर्तन झालं. आर्थिक स्थैर्य हा काहीसा दुय्यम मुद्दा झाल्यावर सध्या काहीशी स्वस्वीकृत मानसिकता झाली आहे. मला समाजाकडुन ठराविक वेळानं काहीतरी acceptance मिळायला हवं अशी ही स्वस्वीकृत मानसिकता ! ह्या स्वस्वीकृत मानसिकतेच्या पल्याड अनेक मंडळी आहेत, ज्यांना अशा वारंवारच्या स्वीकृतीची गरज भासत नाही. पण आठवड्यातील ५० तास कार्यालयीन कामात, काही काळ सोशल मीडियावर व्यतित करणाऱ्या माझा अशा लोकांशी संपर्क येणार कसा?

उच्चवर्गात समाविष्ट होण्याची मानसिकता  

आपल्या देशात आपण घराबाहेर पडलो की आपल्याला प्रचंड गर्दीचा मुकाबला करावा लागतो. ह्या गर्दीमुळं आपल्या मनात अदृश्य तणाव निर्माण होतो. आपण ऑफिसात, शाळाकॉलेजात वेळेवर पोहोचु की नाही हा निर्माण होणारा तणाव एका पातळीवरचा! परंतु ह्या गर्दीमुळं निर्माण होणारा दुसरा तणाव म्हणजे जीवनातील प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी आपल्याला ह्या सर्वांशी मुकाबला करावा लागणार ही काहीशी छुपी भावना आपल्या मनात निर्माण होते. ह्या सर्वसामान्य लोकांच्या पलीकडं आपण स्वतः आणि आपल्या कुटूंबियांनी येनकेनप्रकारे जावं अशी जिद्द आपण नकळत मनात बाळगु लागतो.
ह्यातही बराच वर्ग असा असतो जो गर्दीपासुन वेगळा राहण्यासाठी म्हणुन शांत गावांची निवड करतो, एक अनुभवसमृद्ध जीवन जगतो. पण आठवड्यातील ५० तास कार्यालयीन कामात, काही काळ सोशल मीडियावर व्यतित करणाऱ्या माझा अशा लोकांशी संपर्क येणार कसा? 

आता सर्वसामान्य लोकांच्या पलीकडं जाण्याचे काही मार्ग म्हणजे राजकारणी , उद्योगपती बनणे, अभ्यासाद्वारे प्रगती करणे वगैरे वगैरे. ह्यातील पहिल्या दोन मार्गांशी माझा बादरायण संबंध नाही. तिसऱ्याशी काही प्रमाणात असावा. परत एकदा आपल्याला भोवताली दिसणाऱ्या गर्दीचा आणि अभ्यासाद्वारे पुढे जाऊ पाहणाऱ्या आपल्या मानसिकतेचा काही संबंध आहे का हे आपण पाहुयात! 
हल्ली शिक्षणक्षेत्रात competition खुप वाढली आहे हे मराठी माणसाच्या आवडीच्या आघाडीच्या वाक्यांपैकी एक असावं. आजच्या पोस्टला गाभा वगैरे नाही. ही मिसळपाव पोस्ट आहे. तरीही जर काही गाभा असला तो हा इथं पुढच्या परिच्छेदात आहे.
काही दिवसांपुर्वी मी बारावीचे Integrated क्लास घेणाऱ्या एका आघाडीच्या संस्थेच्या शाखाप्रमुखाला भेटलो. त्यानं काही महत्वाची वाक्यं मला सांगितली. 

१) खोलवर पाण्यात जाऊन कोणी बुडत नाही, उथळ पाण्यातच बहुतेक जण बुडतात. IIT Advanced परीक्षेचे विश्लेषण करणारी जी संस्था आहे तिच्या विश्लेषणानुसार त्या परीक्षेतील ५० -६० % टक्के भाग तुम्हांला वर्षभराच्या नियमित सरावाच्या आधारे सहजरित्या सोडविता यायला हवा. असं असलं तरी मोजक्या विद्यार्थ्यांनाच ह्या परीक्षेत ५० -६० % आणि त्यावर टक्के मिळविता येतात. तो म्हणाला कारण सोपं आहे, बहुतांशी मुलं सोप्या प्रश्नांच्या उत्तरातच चुका करतात

२) आता इथं महत्वाचा मुद्दा म्हणजे सोपा आणि कठीण प्रश्न कोणता हे आपल्याला ओळखता यायला हवं ! कठीण प्रश्न ओळखुन अशा परीक्षांमध्ये त्या प्रश्नांपासुन दूर राहता यायला हवं हे आम्ही मुलांना शिकवतो असे तो म्हणाला! 

३) मुलांनी परीक्षेत भावनाविरहित स्थितीत राहणं शिकावं असं तो म्हणाला. सोपा प्रश्न दिसला आणि आपण अगदी उत्साहित झालो की चुका होण्याची शक्यता वाढीस लागते त्यामुळं भावनाविरहित स्थिती महत्त्वाची !
आता गर्दीच्या / Competition च्या  मुद्द्याशी आणि वरील ३ मुद्द्यांशी सांगड घालण्याचा प्रयत्न करुयात. वरील ३ मुद्दे हे हल्ली काही प्रमाणात दुर्मिळ होत चाललेल्या स्थिर मानसिकतेशी निगडीत आहेत. तुमची Competition बाहेरील वाढलेल्या लोकसंख्येशी अजिबात नाही, ती आहे तुमचं मन स्थिर ठेवण्याच्या तुमच्या क्षमतेला अबाधित ठेवण्याशी !
हा मुद्दा मला केवळ शिक्षणक्षेत्रातच नव्हे तर व्यावसायिक क्षेत्रात सुद्धा बऱ्याच प्रमाणात जाणवतो. तुमच्या व्यावसायिक कौशल्यांच्या इतकीच तुमची नियमितता, स्मरणशक्ती, लोकांशी व्यवस्थित बोलण्याची कला, प्रत्येकाला त्याच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करुन देण्याची संधी उपलब्ध करुन देणं ह्या सर्व घटकांवर तुमचं यश अवलंबुन असतं. हे सर्व घटक तुम्हांला कुठून मिळतात, तर लहानपणी तुमच्यावर झालेल्या संस्कारांतुन ! तर मुलांना योग्य बोर्डातून, कॉलेजातुन शिक्षण देण्यासोबत संस्कार द्यायला विसरु नका !



बऱ्याच वेळा होतं त्याप्रमाणं पोस्टचा आणि फोटोचा संबंध नाही !!


सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१९

बारावीच्या पाल्यांची तणावाची स्थिती !



अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशाच्या पुर्वतयारीच्या दृष्टीनं अकरावी-बारावी या इयत्तेमध्ये कोणत्या शिकवणी वर्गांमध्ये प्रवेश घ्यावा याबाबतीत बहुतांशी पालकवर्गात संभ्रमाचे वातावरण आहे. मला जी काही माहिती मिळाली आहे ती माहिती मी इथे संक्षिप्त स्वरुपात मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. मला ही माहिती माझे कंपनीतील सहकारी आणि माझा अभियांत्रिकी महाविद्यालयातील मित्र राहुल ह्यांनी दिली आहे. त्यांचे मनःपुर्वक आभार! 

सर्वप्रथम आपल्याला लक्षात घेणे आवश्यक आहे की सद्यकालीन अभियांत्रिकी महाविद्यालयांचे तीन प्रकारात आपण वर्गीकरण करु शकतो.  
१) पहिला प्रकार म्हणजे VJTI / SPCE आणि मुंबईतील सर्व अभियांत्रिकी विद्यालये.  यातील बहुतांशी विद्यालय सीईटी ह्या प्रवेशपरीक्षेतील गुणांच्या आधारे तुम्हाला प्रवेश देतात. सीईटी परीक्षा २०० गुणांची असुन ती एकच प्रवेशपरीक्षा असते

या सर्व प्रकारात बारावीच्या एचएससी बोर्डाच्या परीक्षेचे माहात्म्य कमी होत असलं तरी ह्या बोर्डाच्या परीक्षेत तुम्हांला किमान ७५ टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. 

२) दुसरा प्रकार म्हणजे स्वतःची प्रवेशपरीक्षा घेणाऱ्या बिट्स पिलानी आणि व्ही आय टी सारखी अभियांत्रिकी महाविद्यालये!  

या विद्यालयांची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी काहीशी वेगळी तयारी विद्यार्थ्यांना करावी लागते. 

३) तिसरा प्रकार आयआयटीच्या प्रवेश परीक्षा! 

आयआयटीच्या प्रवेश परीक्षा दोन पातळीवर घेण्यात येतात. आयआयटी मेन्स या परीक्षेद्वारे प्रथम पात्रता फेरी घेण्यात येऊन त्याद्वारे आयआयटी ॲडव्हान्स या परीक्षेला पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. आयआयटी मेन्स या परीक्षेला बसण्याची विद्यार्थ्यांना दोन वेळा संधी मिळते.  जानेवारी आणि एप्रिल अशा दोन महिन्यात ही परीक्षा घेण्यात येऊन ह्या दोघातील सर्वोत्तम कामगिरी विचारात घेतली जाते. या परीक्षेत गुणांची विशिष्ट पातळी पार केल्यास तुम्हाला आयआयटी ॲडव्हान्स परीक्षेला बसता येतं.  परीक्षेतील संपूर्ण भारतातील तुमच्या क्रमांकानुसार तुम्हाला कोणत्या आयआयटीमध्ये कोणत्या शाखेत प्रवेश मिळतो हे ठरवले जाऊ शकते.  सर्व आयआयटीचे प्रथम पसंतीची  आयआयटी / द्वितीय पसंतीची आयआयटी असे काहीसे अलिखित वर्गीकरण आढळुन येतं.  विद्यार्थ्यांचा काही विशिष्ट आयआयटी निवडण्याकडे कल दिसून येतो जसे की मुंबईची आयआयटी सर्व भारतभर प्रसिद्ध आहे! एखाद्या प्रसिद्ध नसलेल्या आयटीमध्ये प्रथम पसंतीची नसलेली शाखा घेण्यापेक्षा VJTI /SPIT मध्ये प्रथम पसंतीची शाखा निवडणे हा उत्तम पर्याय असू शकतो. 

यामध्ये अजून एक मुद्दा आहे. तो म्हणजे जर  तुमचा मुलगा मुलगी सीबीएससी बोर्डामध्ये दहावीपर्यंत शिकत असेल तर अकरावी बारावी मध्ये सुद्धा हेच बोर्ड चालू ठेवायचे की एचएससी बोर्डाशी संलग्न असलेल्या अकरावी बारावी या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा? सध्या बऱ्याच ठिकाणी बोर्डाच्या परीक्षेमध्ये किमान ७५ टक्क्यांची अट घालण्यात आल्यानं तुलनेनं सोप्या असलेल्या HSC बोर्डात प्रवेश घेण्याकडं विद्यार्थ्यांचा कल दिसुन येतो.  

आता महत्त्वाचा मुद्दा!! म्हणजे या तीन प्रकारच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आपल्या पाल्याला मदत करू शकेल किंवा त्याची शक्यता वाढवू शकेल असा नक्की कोणता क्लास आहे ज्यात आपण प्रवेश घ्यायला हवा !

सुरवात करूयात वर उल्लेखलेल्या तिसऱ्या प्रकाराकडे
ज्या विद्यार्थ्यांना आयआयटी मध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठी पेस, Allen, Resonance हे शिकवणी वर्ग नक्कीच उत्तम मानले जातात.  यातील Allen, Resonance हे शिकवणी वर्गांच्या कोटा शहरात मुख्य शाखा आहेत आणि मुंबई शहरात त्यांच्या इतर शाखा आहेत. या तिन्ही शिकवणी वर्गात प्रवेश घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रवेश परीक्षा द्यावी लागते. त्यात मिळणाऱ्या गुणांनुसार तुम्हाला त्यांच्या फीमध्ये सवलत मिळू शकते. असं म्हटलं जातं की जर तुम्ही यातील कोणत्याही एका शिकवणी वर्गाच्या प्रवेश परीक्षेत उत्तम गुण मिळवले आणि ते तुम्ही ती गुणपत्रिका घेऊन तुम्ही बाकीच्या क्लासेसकडे गेलात तर त्या गुणांच्या आधारे सुद्धा तुम्हाला त्यामध्ये सवलत मिळू शकते! लक्षात येण्यासारखा अजून एक प्रकार म्हणजे हे सर्व शिकवणी वर्ग एकमेकांचे चांगले शिक्षक पळवण्याच्या मागे लागलेले असतात असे ऐकिवात आहे. ज्या विद्यार्थ्यांचा आयआयटीमध्ये प्रवेश घेण्याचा मानस दृढ असतो त्यांच्यासाठी हे वरील तीन शिकवणी वर्ग उत्तम होत!!

आय आय टी ऍडव्हान्सची परीक्षा उत्तीर्ण होणे अथवा त्याची तयारी करणे हे काहीसे मानसिक तणावाचे कारण बनू शकतं! आणि यामुळेच साधारणतः अकरावीच्या दुसऱ्या सत्रामध्ये काही विद्यार्थ्यांचा निर्णय बदलून ते बाकीच्या दोन पर्यायांच्या दृष्टीने तयारी करू लागतात. अशा वेळी मात्र जर तुम्ही त्यावरील तीन शिकवणी वर्गात जात असाल तर मात्र काहीशी बिकट परिस्थिती होऊ शकते. कारण या शिकवणी वर्गांचे लक्ष आयआयटीच्या प्रवेशपरीक्षेकडे असते आणि तुम्हाला ह्या क्षणी मात्र या क्लिष्ट अभ्यासक्रमांमध्ये तिळमात्र रस नसतो. 

२) दुसरा प्रकार म्हणजे स्वतःची प्रवेशपरीक्षा घेणाऱ्या बिट्स पिलानी आणि व्ही आय टी सारखी अभियांत्रिकी महाविद्यालये! जर तुम्ही सुरुवातीपासून बिट्स पिलानी अथवा व्ही आय टी सारख्या संस्थांमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय ठरवला असेल तर तुम्ही प्रामुख्याने या संस्थांच्या प्रवेश परीक्षेसाठी तयारी करून घेणाऱ्या शिकवणी वर्गांमध्ये प्रवेश घेऊ शकता! इथं प्रवेश घेतल्यास आय आय टी ऍडव्हान्सच्या क्लिष्ट अभ्यासक्रमावर लक्ष देण्याचे तुमचे श्रम वाचू शकतात! 

३) VJTI / SPCE आणि मुंबईतील सर्व अभियांत्रिकी विद्यालये.
ज्याप्रमाणे या दोन संस्थांच्या प्रवेश परीक्षेसाठी तयारी करून घेणारे खास असे प्रवेश वर्ग आहेत त्याचप्रमाणे सीईटीसाठी खास प्रवेश तयारी करून घेणारे शिकवणी वर्ग आहेत हे बहुदा सायन्स परिवार यासारख्या शिकवणी वर्गांचा समावेश होतो. 

आपल्या मुलाची क्षमता किती आहे आणि त्या क्षमतेनुसार त्याच्यासाठी कोणता पर्याय योग्य असेल हे आपल्याला आधीपासुन कळायला हवं असंच सर्व पालकांना वाटत असतं. परंतु हे माहिती करुन घेण्यासाठी खात्रीलायक असा मार्ग नाही. त्यामुळं सर्वजण सर्वात महत्वाकांक्षी पर्यायाची म्हणजेच IIT Advanced ची तयारी करुन घेणाऱ्या शिकवणी वर्गांची निवड करतात. हे क्लास घेणारे सुद्धा स्वतःचा फायदा नजरेसमोर ठेऊन तुमच्या मुलाच्या खऱ्या क्षमतेचं चित्र केव्हाही तुम्हांला सांगत नाही. साधारणतः एका वर्षांनी वगैरे आपल्याला IIT Advanced झेपणार नाही हे उमजुन चुकलेली अनेक उदाहरणं मी ऐकली आहेत. परंतु ह्यावेळी तुमचे परतीचे सर्व मार्ग कापले गेलेले असतात. त्यामुळं भावनाविवश न होता आपल्या मुलांच्या क्षमतेचं वस्तुनिष्ठ परीक्षण करुन मगच योग्य पर्याय निवडावा !

बाकी ह्या सर्व बारावीला असणाऱ्या मुलांना इतक्या तणावातून आपण का जायला भाग पाडत आहोत? स्थानिक अभियांत्रिकी प्रवेशासाठी स्थानिक बोर्डाची परीक्षा आणि IIT प्रवेशासाठी IIT च्या परीक्षा असा सोपा मार्ग का अवलंबु नये? अगदीच झालं तर स्थानिक अभियांत्रिकी प्रवेशासाठी स्थानिक बोर्डाच्या परीक्षेसोबत तुम्हांला IIT मेन्स विचारात घेता येईल. जेणेकरून मुलांची एका अधिकच्या प्रवेशपरिक्षेतुन (CET) सुटका होईल. 

इथं दोन बाबी जाणवतात. पहिली म्हणजे आपण शिक्षणक्षेत्राचा बाजार मांडला आहे. पालकांकडुन अव्वाच्या सव्वा पैसे उकळण्याचे ह्या प्रवेशपरीक्षा हे एक साधन बनले आहे. दुसरी बाब म्हणजे आयुष्य अधिकाधिक क्लिष्ट बनविण्यात आपला कोणी हात धरु शकणार नाही !


मी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अभियांत्रिकी प्रवेशासाठी बारावीचे क्लासेस ही पोस्ट लिहिली होती. त्याच पोस्टमध्ये थोडा बदल करुन आज ही पोस्ट लिहत आहे. 



शनिवार, २८ सप्टेंबर, २०१९

लेट गो ते मायेचे पंख !


बहुदा "लेट गो" हा आजच्या जीवनांचा मुलमंत्र असावा! कार्यालय अथवा कार्यालयाबाहेरील आपले वैयक्तिक, सार्वजनिक जीवन असो! हल्ली अप्रत्यक्ष संघर्षाचे प्रसंग वारंवार येत असतात. हल्ली कोणी थेट वाद घालत नाही. मोजक्या शब्दांतुन कटु संदेश दिला जाणं, महत्त्वाच्या बैठकी, समारंभ, चर्चा ह्यातुन वगळलं जाणं किंवा आपल्या उपस्थितीची दखल घेतली न जाणं अशा प्रसंगांना बऱ्याच वेळी जनांना तोंड द्यावे लागते. दुनियेत हल्ली वाचाळ अर्थात Loud जनांचे प्रमाण वाढत चालले आहे.  आपलं अस्तित्व जाणवुन देण्यासाठी अशा मोठ्यानं आरडाओरडा करण्याच्या संस्कृतीचा प्रसार वेगानं होऊ लागला आहे. 

बहुतांशी संवेदनशील माणसे अशा अनुभवामुळे एकतर निराश होतात किंवा काही प्रमाणात खचुन जातात. या प्रसंगातून बाहेर येण्यासाठी त्यांना एक तर काही काळ जाऊ देण्याची किंवा कोणाच्या मानसिक आधाराची गरज लागते.  प्रत्येक वेळी अशा प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी काळ जाऊन देणे शक्य होत नाही. कारण अशा अप्रिय प्रसंगांची आणि आपली भेट वारंवार होत असते.  त्यामुळे आपल्याला मानसिक आधार देऊ शकेल अशा व्यक्तीची आपल्याला बऱ्याच वेळा गरज भासत असते. 

पुढील काळात लोकांशी केवळ बोलून त्यांना मानसिक आधार देणाऱ्या व्यक्तींना खूपच मागणी येईल असं मला वाटतं! मुळ मुद्द्याकडे परत वळूयात!  इथं बहुदा आपल्या या संवेदनशील स्वभावाकडं आत्मपरीक्षणाच्या नजरेतुन पाहणं इष्ट! आपल्याला कोणी काही बोललं तर त्याचा एका विशिष्ट मर्यादेपर्यंत विचार करावा, एका विशिष्ट मर्यादेपर्यंत त्याला उत्तर देण्यात आपली शक्ती खर्च करावी. त्यापलीकडे आपण डेटा पॉईंट तत्व लक्षात घ्यावे. 

आपल्या आयुष्यात असंख्य डेटा पॉईंट असतात. ह्यातील काही कार्यालयात, काही वैयक्तिक जीवनात आणि काही तुमच्या दररोजच्या प्रवासात येतात. यातील प्रत्येक डेटा पॉईंटमध्ये तुम्हाला विजय मिळवणं शक्य नसतं. त्यामुळे एखाद्या डेटा पॉईंटमध्ये तुम्हांला जर काहीसा अप्रिय अनुभव येत असेल तर त्यामुळे आपल्या स्वतःच्या मनातील आपल्या विषयीच्या प्रतिमेला तडा जाऊ देऊ नये.  इथे हमखास आपल्या मनातील आपली ही प्रतिमा उंचावता येईल येईल असा एखादा डेटा पॉईंट निवडावा, स्वतःला चांगल्या मनस्थितीत आणावं आणि आयुष्यात पुढं जावं! नाहीतर इतक्या संघर्षपूर्ण जीवनामध्ये तुम्हांला सतत मानसिक त्रास सहन करावा लागेल. 

आता हे झालं सध्याच्या पिढीचे! पुढच्या पिढीचं कसं होणार याबाबतीत मात्र काहीशी चिंताजनक अशी परिस्थिती आहे. या पिढीची त्यांच्या मनामधील स्वप्रतिमा कशी आहे याविषयी बरंच संशोधन व्हायला हवं! या नवीन पिढीतील बऱ्याच मुलांच्या मनात स्वतःच्या एका अवास्तव प्रतिमेचं भुत शिरलेलं असतं. ही आभासी प्रतिमा त्यांनी आणि कदाचित त्यांच्या पालकांनी बनवून ठेवलेली असते. आयुष्याच्या सुरुवातीच्या काही वर्षात या आभासी प्रतिमेचे अस्तित्व सुरक्षित ठेवणे त्यांना शक्य जाते. परंतु त्यानंतर मात्र ही आभासी प्रतिमा आणि आपण वेगळे आहोत याचे खडतर जाणीव त्यांना होऊन जाते. 

आपल्या मागच्या पिढीने आपल्याला आपल्या कठीण काळात विनाअट त्यांच्या पंखाखाली घेतलं. आपण कधीकाळी संकटात सापडलो तर कशामुळे आपण संकटात सापडलो याची अजिबात चौकशी न करता unconditionally  त्यांनी आपल्याला आधार दिला. परंतु हीच घटना आपल्या आणि पुढील पिढीच्या बाबतीत मात्र कशाप्रकारे घडेल याविषयी मी साशंक आहे.  एकतर ही पुढील पिढी ज्यावेळी त्यांना मानसिक आधाराची  गरज असेल त्यावेळी खरोखर आपल्याला साद देईल का याविषयी आपण खात्री देऊ शकत नाही. कदाचित दुसऱ्यांची (यात त्यांचे पालकसुद्धा समाविष्ट ) मदत मागणे  हे त्यांना कमीपणाचे वाटू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे असा प्रसंग उद्भवला असता या पिढीला पंखाखाली घेणे हा जो प्रकार आहे त्यासाठी आपण कितपत तयार आहोत हा प्रश्न ज्याचा त्याने स्वतःला विचारला हवा!  

सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९

Happening जागा, गोष्टी वगैरे वगैरे



बहुसंख्य वर्गापासुन आपणाला वेगळं दाखविण्याची मानसिकता कदाचित पुर्वीपासुन अस्तित्वात असेल. हल्ली ही मानसिकता अधिक प्रकर्षानं व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळं सहजगत्या जाणवु सुद्धा लागली आहे. Happening Places चे मुळ उदाहरण बहुदा  Page ३ वर अवतीर्ण होणाऱ्या पार्ट्या हे असावं. सेलिब्रिटी / वलयांकित माणसं वेगळी आणि आपण वेगळे ही मानसिकता पुर्वी अस्तित्वात असायची. मग आपण सुद्धा Happening Places च्या स्थानिक आवृत्त्या का निर्माण करु नयेत हा विचार जनमानसात जोर धरु लागला. इथं मग बहुसंख्य वर्गापासुन दुर पळता पळता बहुसंख्य वर्गच Happening Places / थिंग्स मध्ये समाविष्ट होण्याची, त्यांचं वेगळेपण नाहीसे होण्याची शक्यता निर्माण झाली.   

Happening Places / Things ची बहुसंख्यांनी अंगिकारलेली उदाहरणे आजुबाजूला मुबलक प्रमाणात सापडतात. निसर्गरम्य ठिकाणांना भेटी, दीर्घ पल्ल्याच्या शर्यती, सामाजिक कार्य, आपत्कालीन जनसमुदायाला मदत, विशिष्ट नैसर्गिक घटनेला भेट ह्या खरंतर खरोखरीचा निर्मळ मानसिक आनंद देणाऱ्या गोष्टी! पण आपण Happening Places/ Things मध्ये समाविष्ट आहोत हे  दर्शविण्याचा हेतू ज्यावेळी ह्या गोष्टींत शिरतो त्यावेळी मात्र मग त्यातील निर्मलता काही प्रमाणात गढुळ बनते. ह्या गोष्टी करणारे सर्वचजण केवळ ह्या हेतूने ह्यात शिरकाव करतात असं मला अजिबात म्हणायचं नाही, तरी पण !!!

Happening Places / Things ची अजुन एक आवृत्ती म्हणजे आपल्या पाल्यांचा आयुष्यातील Happening Path !! विशिष्ट बोर्डात शालेय / महाविद्यालयीन शिक्षण, IIT किंवा तत्सम संस्थेत प्रवेश, परदेशशिक्षण वगैरे वगैरे ! आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर यश म्हणजे काय ह्याचा आपण एक बिंदु ठरवुन दिलेला आहे! ह्या विविध टप्प्यावरील बिंदूंना जोडुन काढलेली रेषा म्हणजेच हा Happening Path! ह्या रेषेपासून आपलं अंतर थोडंजरी वाढलं की बेचैन व्हायला होतं आपल्याला ! पण गंमत पहा ना ! शिक्षण संपल्यावर हा Happening Path तुम्हांला / तुमच्या पाल्याला एका शिखरावर सोडुन देतो आणि मग पुढं काय होऊ शकतं ह्याविषयी कोणीही खात्रीलायक मार्ग सांगु शकत नाही!

आपल्याला ह्या Happening गोष्टींचं इतकं वेड का असतं? आपण इतरांच्या नजरेतुन कुल व्हावं म्हणुन कदाचित ! गंमत अशी झालीय मित्रांनो, आपण सर्वचजण ह्या शर्यतीत उतरल्याने ह्यात न उतरणारे आता कुल वाटु लागलेत ! परवा एक मित्र भेटला, अगदी सहजपणे तो म्हणाला, अरे मी फेसबुक, व्हाट्सअँप, ट्विटर अगदी कुठेही नाही आणि त्यावाचुन माझं काही अगदी अडत नाही ! मला इतका कुल वाटला तो सांगु !!!

रविवार, ८ सप्टेंबर, २०१९

आधुनिक काळातील शिक्षकवर्गासमोरील आव्हानं !


नुकत्याच येऊन गेलेल्या शिक्षकदिनाच्या निमित्ताने आधुनिक काळातील शिक्षकवर्गासमोरील असणाऱ्या आव्हानांचा आढावा घ्यावा असे आमचे नातलग संदेश राऊत यांनी सुचविले. 

शिक्षक हे पुढील पिढी घडवत असतात हे पुर्वी म्हटलं जायचं, लोकांच्या मनात खरोखरीची ती भावना असायची! त्यावेळी शाळा-कॉलेजातील वर्गात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांची मानसिकता कशी असावी याचा आपण विचार करुयात.  गुरुवर्य हा भगवंतासमान ही विचारधारणा घेऊन बहुतांशी विद्यार्थी शाळा-कॉलेजात जात असत. यामागं बहुदा घरातील शिकवण, संस्कार कारणीभुत असावेत. शिक्षकांकडून जे काही ज्ञान मिळतं त्यामुळं मुलं मार्गाला लागतात, शिक्षकांकडुन मुलांवर जीवनावश्यक संस्कार होतात ही धारणा त्यावेळी पालक बाळगुन असत.  

शिक्षकांना योग्य आर्थिक मोबदला देणं हे त्याकाळी फारसे प्रचलित नव्हतं. परंतु आपल्या परीने शेतातील पिकणारं धान्य, आपल्या व्यवसायातील उत्पादित होणाऱ्या वस्तु ह्या शिक्षकांना भेट देऊन शिक्षकांप्रती आपल्याला असलेला आदर व्यक्त केला जात असे.  ज्ञानधारणेसाठी विद्यार्थी बहुतांशी शिक्षकांवर अवलंबुन असत. ग्रंथवाचन वगैरे मार्ग महाविद्यालयात गेल्यावर उपलब्ध होत असत, परंतु सर्वानाच ते सहजासहजी उपलब्ध नसत. शिक्षकांना फी दिली म्हणजे त्यांच्याकडून ज्ञान मिळवण्याचा आपला हक्क आहे ही भावना जी आज मुळ धरु लागली आहे,  ती त्या काळी अस्तित्वात नव्हती. 

बहुतांशी शिक्षक वर्ग हा विषयाशी संबंधित संदर्भग्रंथांचं खोलवर वाचन करीत असे. त्यामुळे बऱ्याच वेळा शालेय / महाविद्यालयीन वर्गांमध्ये मुलांना एका अमर्याद अशा ज्ञानदालनाची आनंददायी सफर घडत असे! केवळ शब्दांनी आणि शिक्षकांच्या आदर्श वर्तवणुकीच्या माध्यमातुन मुलांची आयुष्य घडत, त्यांच्यावर जन्मभराचे संस्कार होत असत. मुलांचा मेंदु हा ज्ञानग्रहणासाठी शाळा-कॉलेजात आल्यानंतरच सक्रिय होत असे.  घरी असताना त्यांच्याकडं ज्ञानग्रहणासाठी शालेय पुस्तकांव्यतिरिक्त फारसे स्त्रोत उपलब्ध नसत. त्यामुळं शिक्षकांसमोर ज्ञानासाठी आसुसलेला विद्यार्थीवर्ग उपलब्ध असे. 

शिक्षकांच्या वैयक्तिक आयुष्याच्या दृष्टीतून पाहिलं असता बऱ्याचवेळा त्यांना शिक्षक ह्या भुमिकेच्या जोरावर वैयक्तिक आयुष्यातील जबाबदाऱ्यांपासुन काहीशी सुटका मिळत असे. एकंदरीत शिक्षकानं आर्थिकदृष्ट्या यशस्वी व्हायलाच हवं असं दडपण नसे ! शिक्षकांना दैवत्वाच्या गाभाऱ्यात बसवुन त्यांच्याप्रती असलेलं आपलं आर्थिक दायित्व झटकुन टाकायला समाज मोकळा होत असे. 

काळ खुप बदलला. विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांची मानसिकता बदलली. 
शिक्षकांपुढे बरीच आव्हानं दिसुन येत आहेत. आपल्या आर्थिक स्थितीकडं दुर्लक्षच करायला हवं ही मानसिकता शिक्षकवर्गानं  बऱ्याच प्रमाणात झटकुन दिली, कारण त्यांच्या वैयक्तिक जीवनातील भुमिकेविषयी त्यांना मिळणारी सुट काळानुसार नाहीशी झाली. आर्थिकदृष्ट्या केवळ शाळा, कॉलेजातील नोकरीवर अवलंबून राहणे अशक्यप्राय बनलं.  त्यामुळे उत्तम शिक्षकांना या पेशाकडे कायमचं टिकवून धरणे कठीण होत चाललं आहे! ज्ञानधारणेपेक्षा गुण मिळविण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढु लागला. त्यामुळे शिक्षक म्हणजे गुण मिळवून देणारे एक साधन आणि आपण त्यासाठी फीचे मोल मोजणारे उपभोक्ता ही अत्यंत चुकीची भावना काही प्रमाणात निर्माण झाली.  

त्याचप्रमाणे घरामधील संवादांमधुन शिक्षकांविषयी दिसण्यात येणारी आदरभावना सुद्धा संपुष्टात येत चालली आहे.  ज्ञान मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांकडे असंख्य स्त्रोत निर्माण झाले आहेत. पुर्वी  शिक्षक मिळालेल्या माहितीची वैधता तपासुन घेऊन त्यानंतरच ते विद्यार्थ्यांपुढे मांडत असत. ती अचुकतेची शक्यता विद्यार्थ्यांपुढे आज उपलब्ध असलेल्या सर्वच साधनांच्या बाबतीत खरी ठरत नाही. इंटरनेटच्या माध्यमातुन मिळालेलं  बरेचसं ज्ञान हे जरी शंभर टक्के अचूक नसलं तरी त्यावर विद्यार्थ्यांचा विश्वास बसण्याची शक्यता जास्त असते. या सहजासहजी मिळालेल्या माहितीच्या आधारावर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उगाचच बळावतो.  पुर्वी एखाद्या विषयाबाबतीत कोरा करकरीत मेंदु घेऊन शिक्षकांपुढे येऊन बसणारा विद्यार्थीवर्ग आज उरला नाही. हा विद्यार्थीवर्ग आधीच काही बरोबर आणि काही चुक अशा संकल्पनांचं ओझं घेऊन शिक्षकांपुढं बसतो. अशावेळी त्यांच्या मेंदुतील चुकीच्या संकल्पनांना दुर करुन योग्य संकल्पनांना त्या मेंदुत जागा करण्याची वाढीव जबाबदारी शिक्षकवर्गापुढं आहे! 

शिक्षकांकडून आपल्याला संस्कार, जीवनज्ञान मिळतं अशा काही संकल्पना अस्तित्वात आहेत याची जाणीवच या विद्यार्थ्यांना नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांशी वर्गांमध्ये संवाद साधताना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागते. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नातं हे काहीसं  मित्रत्वाकडे झुकणारे असावं ह्या अधिकच्या ओझ्याचे बोजे शिक्षकवर्गावर आहे. 

कुठंतरी एक मोठी चुक घडत आहे. गुरुजनांविषयी असणारा आदर पुढील जीवनातील व्यक्तीच्या संस्कारी वर्तवणुकीचा पाया बनत असे. आयुष्यात केव्हाही आपण चुकीचं वागल्यास आपल्या शिक्षकांना काय वाटेल हा विचार सदैव मनात राही! आज ह्या विचाराचं बंधन विद्यार्थ्यांवर नाही! 

राहता राहिला शिक्षकवर्ग! दैवत्वाच्या गाभाऱ्यात अजुनही त्यांनी राहावं ही पालकवर्गाची अपेक्षा, उच्चशिक्षणाच्या आपल्या महत्वाकांक्षांना त्यांनी येनकेनप्रकारे बळ द्यावं ही विद्यार्थीवर्गाची अपेक्षा आणि शेजारच्या घरातील कमावत्या माणसाप्रमाणे त्यांनीही पैशाचा ओघ सुरु ठेवावा ही घरातल्या माणसांची अपेक्षा!  ह्या पुर्णपणे भिन्न दिशांना तोंड करुन असणाऱ्या अपेक्षांच्या ओझ्याखाली वावरत जमेल तितकं ज्ञानग्रहणाचे आणि ज्ञानदानाचे कार्य हा शिक्षकवर्ग आजच्या काळात बजावत आहे !

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...