मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, ११ ऑगस्ट, २०१९

सरदार पटेल अभियांत्रिकी विद्यालय स्थापत्यशाखा स्नेहसंमेलन



काही वर्षांपुर्वी महाविद्यालयीन जीवनाचा नकोनकोसा वाटणारा निरोप घेऊन आम्ही सर्व मित्रमंडळी विविध दिशांना विखरलो. काहीजणांनी पदव्युत्तर शिक्षणाचा मार्ग पत्करला, काहीजणांनी नोकरी पत्करली. त्यानंतर आयुष्य आम्हां सर्वांना वेगवेगळ्या प्रकारे भेटत राहिलं, आम्ही सुद्धा एकमेकांना छोट्यामोठ्या ग्रुपच्या स्वरूपात अधुनमधून जमेल तसे भेटत राहिलो. परंतु एकत्रितपणे भेटण्याचा योग आला नव्हता. 

ह्या वर्षी मात्र एकत्रितपणे भेटण्याचा विचार बऱ्यापैकी जोर धरु लागला.  सुरुवातीला साठ जणांच्या बॅचपैकी बरेचजण ह्या स्नेहसंमेलनाला उपस्थित राहु शकतील अशी आशा वाटली होती. अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर या देशांमध्ये बरेचसे सहाध्यायी वास्तव्य करुन आहेत. ठरवलेल्या 10 ऑगस्ट ह्या दिवशी स्नेहसंमेलनाला उपस्थित राहणे काहीजणांना  जमत नाही हे लक्षात आल्यानंतर ज्या लोकांना जमतंय त्यांना एकत्र घेऊन या दिवशी हे स्नेहसंमेलन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

सतेज,  सुगंध, सचिन या मंडळींनी ठाणे येथील ब्ल्यू रुफ क्लब ह्या रिसॉर्टचं आरक्षण आदल्या शनिवारी भर पावसात केलं. बावीसजणांनी ह्या स्नेहसंमेलनासाठी आपला सहभाग निश्चित केला होता. अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या आमच्या या सर्व मित्रमंडळींनी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. ही सर्व मंडळी एकत्र आल्यावर त्यांच्या आयुष्यातील अनुभवांविषयी बोलणं व्हावं ही कल्पना आशुतोषने मांडली. 

अभियांत्रिकी शिक्षण समाप्त झालं त्यावेळी आयुष्याच्या एका भव्य पटावर आम्ही सर्व उतरलो होतो. आयुष्य सुंदर असतं असं म्हटलं जातं ते खरं असलं तरी आयुष्याची ही सुंदरता सर्वांनाच काही सहजासहजी अनुभवायला मिळत नाही.  जसंजसं  प्रत्येकजण आपले अनुभव सांगू लागला तसतसं  "The journey has been sinusoidal" मंदारचे हे शब्द बहुतांशी सर्वांच्याच आयुष्याला लागू पडले आहेत हे आम्हांला जाणवत गेलं.  काहींचं या आयुष्याच्या आलेखाच्या शिखरावरील आगमन लवकर झालं तर काहींना शिखरावर पोहोचण्यासाठी प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली. 

या बावीसजणांच्या समुहाच्या अनुभवांची व्याप्ती खूप मोठी आहे. काहींनी आपल्या स्थापत्य अभियांत्रिकीशी बांधिलकी कायम राखत स्थापत्य अभियांत्रिकीच्या विविध शाखांमध्ये आपले करियर प्रगतीपथावर नेले आहे.  यात Structural Engineering, Environmental Engineering, Geotechnical Engineering ह्या आणि अनेक स्थापत्यशाखेच्या उपशाखांचा समावेश होतो. 

धारिया जोडप्याने स्वतंत्रपणे व्यवसाय सांभाळत जी उंची गाठली आहे ती नक्कीच कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे त्यांची मुलगी ही बुद्धिबळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांत सहभाग घेते.  हे दोघेही आपल्या या व्यवसायाला सांभाळत तिच्यासोबत देशभर आणि विदेशात सुद्धा प्रवास करीत असतात. प्रवासात असताना सुद्धा आपल्या क्लायंटसना खोळंबुन राहायला लागु नये ह्यासाठी त्यांनी आपल्या व्यवसायात जे संगणकीकरण केले आहे, बहुतांशी निर्णय हे परदेशातूनसुद्धा एका माऊसच्या क्लिकवर घेण्याची क्षमता विकसित केली आहे ते ऐकून खूप आनंद झाला. 

ठाकूरदेसाई जोडप्याची मुलगी ही राष्ट्रीय पातळीवर बॅडमिंटन खेळते.  तिच्या बॅडमिंटन खेळातील कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी ठाकूरदेसाई जोडप्याने आपल्या करिअरमध्ये बऱ्याच तडजोडी केल्या आहेत. परंतु या तडजोडी कराव्या लागल्या असुनसुद्धा दोघेही आज उच्चपदस्थ आहेत. मुलीविषयी बोलताना आई कशी भावनाविवश होऊ शकते ह्याचा अनुभव आम्ही घेतला. 

द्वि / त्रिपदवीधर अशी मंडळीसुद्धा उपस्थित होती. त्यांची मनोगते ऐकून धन्य व्हायला झालं. विविध देशांतील आपल्या वास्तव्याचे सुरेख वर्णन जोशी आणि आफळे ह्यांनी नमुद केले. इतके वर्षांनीही आम्ही खेळकरपणा बाळगुन ठेवला आहे. त्यामुळे उगाच नडायला (खास कॉलेजचा शब्द!) म्हणुन परदेश सुंदर आहे तसा भारतही सुंदर आहे ह्याची प्रेमळ आठवण सुद्धा करुन देण्यात आली! गुंतवणूक क्षेत्रामध्ये महत्त्वाचे योगदान देणाऱ्या समितचे मनोगत सुद्धा अगदी प्रांजळ होते. प्रवासक्षेत्रात आपला व्यवसाय उभ्या करणाऱ्या माधुरीने आपले अनुभव नमुद केले. अंबानी कुटुंबियांच्या खांद्याला खांदा लावून ज्याने काम केलं असं म्हणण्याइतकी जवळीक निर्माण करणारा मिश्किल राहुल आपले अनुभव सादर करत होता. गुण्यानं आपलं मनीचे मनिला मनोगत दिलखुलासपणे सादर केलं. आदल्या रात्री मनिलाहुन प्रदीर्घ प्रवास करुन आलेल्या सतीशचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. त्यानं सादर केलेल्या काही स्टेप्सचा आज मी सराव केला.

सतेज आमच्यावर काही काळ नाराज झाला. ह्याची सुरुवात खरंतर मीच केली. बोलताना सहजपणे मी खरोखर स्थापत्यशास्त्र शाखेसाठी योग्य माणूस होतो का याविषयी शंका निर्माण केली.  अजुन एक दोघांनी त्याची री ओढली. हे सर्व ऐकणारा सतेज काहीसा नाराज झाला होता. आपल्या मनोगतामध्ये त्याने आपली ही खंत व्यक्त केली. बाकी कोणाला काही वाटो पण मला मात्र स्थापत्य शाखा नक्कीच आवडत होती अशा आपल्या भावना त्याने व्यक्त केल्या. एक व्यावसायिक म्हणून मुंबईत कार्यरत असताना येणारे वास्तववादी अनुभव त्याने अत्यंत सुरेखरित्या नमुद केले. 

बोलताना सतत खुर्ची मागे ढकलणाऱ्या मंगेशला पाहून त्याच्याविषयी वाटणाऱ्या काळजीपायी सुगंध सदैव बेचैन होत होता. शेवटी न राहवुन त्यानं मंगेशला थांबवलं! त्याची ही बेचैनी पाहून शेवटी मंगेश एका जागी स्थिरावला! बहुभाषिक वर्ग असला तरी बोलताना अधून मधून मराठीचा वापर होत होता, त्यामुळेच की काय गुजराथी भाषिक नीताने आपल्या पटेल या आडनावावर सुरेख कोटी केली. ती म्हणाली की माझे आडनाव पटेल असल्याने मी तुम्हां सर्वांकडुन बरीच आशा बाळगून होते! परंतु शेवटी तुम्ही सर्वांनी निराशा केलीत ! 

जेवण अत्यंत स्वादिष्ट होते. श्रावणी शनिवार असल्याने केवळ शाकाहारी पर्यायांकडे लक्ष देत जेवणाचा निखळ आनंद घेतला. जेवणानंतर आलेल्या आमच्या होस्टने आम्हांला काही मनोरंजक खेळ खेळायला लावून आमचं शैथिल्य नाहीसं केलं. त्यानंतर मग आमच्यात निर्माण असलेल्या नवचैतन्याचा फायदा घेत त्याने आम्हांला  जोडीनाच करावयास लावला.  इथं करावयास लावला हा शब्दप्रयोग सुरुवातीच्या काही क्षणापुरताच योग्य ठरेल. त्यानंतर मंडळी अगदी सुटलीच! लोकांनी धमाल नृत्य केली.  ह्या नृत्याच्या सार्वजनिक मीडियावरील प्रसिद्धीचे मर्यादित अधिकार आणि त्यासंबंधित अत्यंत कठोर अटी ह्यामुळं हा अप्रतिम नृत्याविष्कार इथं सादर करता येणार नाही. त्यामुळे वाचक वर्ग एका अप्रतिम सादरीकरणाला मुकला तरी माझा नाईलाज आहे!

हल्ली हाय टी  नावाचा प्रकार प्रमाणाबाहेर प्रचलित होऊ लागला आहे! कुठं उंचावर चहाची किटली ठेवून त्यातील चहा तुम्हांला प्राशन करायला भाग पाडत असावेत असा तुमचा जर समज होत असेल तर तुम्ही कदाचित एकटे नाही आहात! यामध्ये चहासोबत तुम्हाला एक किंवा अधिक नाश्त्याचे  पदार्थ दिले जाता.  काल पेश करण्यात आलेला बटाटवडा चविष्ट होता. आमच्यातील जी काही मंडळी दीक्षित वगैरे फॉलो करत होती (अथवा करत असावीत असा आम्हांला संशय आहे ) त्यांनी कालच्यापुरता आपला नित्यक्रम बाजूला ठेवला होता! परंतु बटाटवडा नक्कीच चविष्ट होता. 

त्यानंतर राहुलने सर्वांना वर्तुळाकार मांडणीमध्ये बसून आपला आवडता चित्रपट आणि त्यानंतर कोणत्याही चित्रपटातील आवडते संवाद सांगण्यास सांगितले. हे सर्वांना विचार करण्यास भाग पाडणारे होते. राहुल हा महाविद्यालयीन  जीवनापासुन हिंदी / इंग्लिश चित्रपटांविषयी उत्तम व्यासंगी म्हणुन प्रसिद्ध आहे. मंडळी एव्हाना बरीच मनमोकळेपणाने गप्पा मारु लागली होती. त्यामुळं दोन रुपये तिकीट दर असलेल्या चित्रपटाला आपण कसे दररोज हजेरी लावत होतो वगैरे चर्चा ऐकावयास मिळाल्या! आजही कॉलेजातील शेवटच्या बाकावर बसुन केलेल्या धमालीची आठवण येते हे सांगताना नीताच्या डोळ्यात अश्रुंनी प्रवेश केला. 

त्यानंतर चर्चा पर्यायी व्यवसायांकडे वळली.  ही देखील एक उत्तम चर्चा झाली. आर्थिक प्राप्ती आणि मानसिक समाधान या दोन घटकांमध्ये कुठेतरी पर्यायी व्यवसायांचे निर्णय घुटमळत असतात. प्रत्येक व्यक्ती आपल्या जडणघडणीनुसार आणि आयुष्यातील सद्यस्थितीनुसार हा निर्णय घेत असावी.  

खरंतर साडेपाच-सहा होत आले तरी तिथून पाय काढायची इच्छा होत नव्हती. परंतु घोडबंदर सु(?)प्रसिद्ध ट्रॅफिक जॅमच्या  भयाने आम्ही तिथून सहा वाजता काढता पाय घेतला!  एका संस्मरणीय स्नेहसंमेलनाची सांगता झाली! सायंकाळी केलेल्या चर्चेनुसार पुढील स्नेहसंमेलनासाठी अजुनइतका दीर्घकाळ आम्ही नक्कीच थांबणार नाहीत हा दृढ निर्धार व्यक्त करण्यात आला !

शनिवार, ३ ऑगस्ट, २०१९

संसार से भागे फिरते हो !



एका निवांत अशा शनिवार सकाळी आज फुरसतीने जाग आली. कोणालाही शाळा ऑफिसात जायचे नसल्यामुळे जाग येऊन सुद्धा घड्याळाकडे पाहण्याची तसदी घेतली नव्हती. परंतु ज्यावेळी उठून घड्याळाकडे पाहिलं, त्यावेळी सव्वासात वाजलेले पाहून काहीसं आश्चर्यच वाटलं. पावसाळी ढगांनी अंधार केला असल्यामुळे इतके वाजून गेले तरी कळलंच नाही. 

प्रत्येक शनिवारी सकाळी मनात काहीशी संभ्रमाची परिस्थिती असते.  पुढील दोन दिवस नक्की काय करावं म्हणजे मनाला समाधान वाटेल हा विचार शनिवार सकाळी चहा पिताना प्रकर्षानं वावरत असतो. ह्या क्षणी आपल्यासमोर काही पर्याय असतात. वसईला एखादी फेरी मारावी, सर्व कुटुंबियांना भेटुन यावे, मुंबईतील नातेवाईकांना भेटावं  हा पहिला विचार डोक्यात घोळत असतो. 

कार्यालयीन कामांमध्ये विचार करुन धोरणात्मक निर्णय घेण्यासारख्या काही बाबी असतात. पाचही दिवस यावर सखोल विचार करण्यासाठी आपल्याला वेळ मिळालेला नसतो.  साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी यासाठी काही वेगळा वेळ काढून मनातील विचार सुसंगतपणे मांडावेत, ते योग्य लोकांपुढे ई-मेल द्वारे पोहोचवावे हा विचार प्रामुख्यानं मनात येतो. 

घरातील पत्नी आणि मुलगा यांच्यासोबत क्वालिटी टाइम व्यतित करावा हाही विचार मनात असतोच! परंतु आपण ज्यावेळी क्वालिटी टाइम व्यतित करण्याच्या, त्यांच्यासोबत गप्पा मारण्याच्या मूडमध्ये असतो त्यावेळी त्यांनीसुद्धा त्याच मूडमध्ये असणे आवश्यक नसते. अशाप्रकारे चहा संपेपर्यंत मनामध्ये ह्या सर्व आदर्शवादी विचारांची यादी अस्ताव्यस्त स्वरुपात का होईना पण तयार झालेली असते!

शनिवार हळूहळू पुढे सरकत जातो. दैनंदिन व्यवहारातील गोष्टी बऱ्याच वेळा प्राधान्यक्रमात आदर्शवादी विचारांच्या वरती जात राहतात. या सर्व प्रकारात अजून एक गोष्ट होत राहते. शनिवारचे इतके तास गेले तरीही आपण ठरवलेल्या गोष्टींपैकी एकही गोष्ट सुरु केली नाही ह्याविषयी काहीशी अस्वस्थता मनात निर्माण झालेली असते. इथे लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे आधी जे काही घडून गेलं ते विसरून जाऊन उपलब्ध असलेल्या साप्ताहिक सुट्टीचा उर्वरित प्रत्येक मिनिट आणि तास ह्यांचा आपण मुळ उत्साहाने आदर्शवादी गोष्टींवर काम करण्यासाठी वापर करू शकतो. 

या आठवड्यात एका रात्री परत येताना मीनाकुमारीची बरीचशी गाणी कारमध्ये ऐकण्याचा योग आला. त्यामध्ये आधी ऐकलेलं, पुन्हा आवडून गेलेलं "संसारसे भागे फिरते हो भगवान को क्या पाओगे " हे गाणं पुन्हा ऐकलं.  दुसऱ्या दिवशी सकाळी ते युट्युबवर पाहिलं, व्हाट्सअप स्टेटसवर टाकून दिलं! व्हाट्सअँप स्टेटस किती दिवसांनी, मिनिटांनी बदलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न नाही का? शेवटी भगवंत हा काही केवळ मंदिरात, तीर्थक्षेत्रातच वास्तव्य करत नाही. आपली जी काही कर्तव्यं आहेत ती कर्तव्यं व्यवस्थितपणे पार पाडत असताना, पार पाडल्यावर जी काही कर्तव्यपूर्तीची भावना वा समाधान मनात निर्माण होते ते सुद्धा भगवंताचे एक रूप होय! त्यामुळे आपल्या कर्तव्यपूर्तीच्या भावनेकडे प्रत्येकाने योग्य लक्ष देणे हे आवश्यक आहे. 

आता परत वळुयात ते शनिवार सकाळच्या चहाच्या वेळी बनवलेल्या आदर्शवादी दृष्टिकोनातून बनवलेल्या आपल्या टुडू लिस्ट मधील गोष्टींकडे! शनिवार पुढे सरकत जातो, शनिवारी रात्री थोडं उशिरा झोपुन विकेंडला अजून जास्त लांबवल्याचं समाधान मानता येतं! 
ह्या सर्वात कधी एकदाचा रविवार उजाडतो ते समजत नाही! एकदा का रविवार उजाडला की रविवारचे सर्व व्याप आटपून सायंकाळ कधी उजाडते हेही समजत नाही! मग मनात उतरते ती एक असमाधानाची भावना!! शनिवारी सकाळी बनवलेल्या आदर्शवादी यादीतील फार कमी कामे पूर्ण झालेली असतात, एका अत्यंत व्यग्र अशा सप्ताहाची चाहूल तुमच्या मनात अस्वस्थता निर्माण करीत राहते!

परंतु याच गोष्टीकडं तुम्हांला दुसऱ्या प्रकारे पाहता येईल. तुमच्यापुढं व्यग्र राहण्यासाठी बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत,  तुमच्याभोवती तुमच्याकडून अपेक्षा असणारी बरेच माणसे आहेत! हे सर्व घटक तुम्ही दुनियेतील काही सुदैवी माणसांपैकी एक असल्याचे प्रतिक आहे.  त्यामुळे रविवार संध्याकाळी केवळ एकच गाणे ऐकावे संसार से क्या भागे फिरते हो !

जाता जाता आज सकाळी पडणाऱ्या धुंद पावसाचं एक छायाचित्र ह्या पोस्टच्या सुरुवातीला ! पावसामुळं काही कामं टाकुन घरात बसणाऱ्या मला माझे ऑफिसात गेलेले मित्र कदाचित "बारिश से क्या डरके बैठे हो !" म्हणत असावेत !!

गुरुवार, १८ जुलै, २०१९

आमची सत्यनारायण पुजा !



आमच्या आजोबांनी म्हणजेच भाऊंनी १९६० च्या दशकामध्ये आमच्या वसईच्या घरी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पुजा घालण्याची प्रथा सुरु केली. भाऊ १९७२ साली गेल्यानंतर त्यांच्या मुलांनी, सुनांनी ही प्रथा आजतागायत वसईच्या घरी सुरू ठेवली आहे.  

सत्यनारायणाची पुजा गावांमध्ये हे अत्यंत साध्या प्रकारे केली जाते. हे पुजेचे मूळ रुप, हा साधेपणा अजुनही आमच्या घरातील पुजेमध्ये टिकून राहिला आहे.  ऋतूकालानुसार उपलब्ध असणारी फुले, फळे, दुर्वा सत्यनारायण देवतेला वाहून शिऱ्याचा प्रसाद बनवावा आणि आप्तेष्टांना सोबत घेऊन सत्यनारायण देवतेचे  पूजन करावे.  ही सत्यनारायणदेवतेच्या पुजेमागची मूळ संकल्पना! 

ज्यावेळी भाऊंनी ही पुजा सुरू केली त्यावेळी पाटील कुटुंबीय एकत्र घट्ट विणले गेले होते.  शेती आणि शेतीला पूरक असे उद्योग यावरच संपूर्ण पाटील कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालत असे.  काळानुसार पाटील कुटुंबीयांनी विविध नोकरी, व्यवसायक्षेत्रात पदार्पण केले. दैनंदिन जीवनातील एकमेकांशी येणारा संपर्क कमी झाला.  या पुजेच्या निमित्ताने सर्वांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट, निवांतपणे काही क्षण गप्पा मारणे हेसुद्धा या गुरुपौर्णिमेच्या पूजेनिमित्त साध्य होते. 

या पूजेमध्ये बऱ्याचशा गोष्टी अजूनही पूर्वापार जशाच्या तशा चालत आल्या आहेत. वाडीतून केळीची छोटी रोपे आणून चौरंगाभोवती मखर सजविणे, वाडीतील तुळस, दुर्वा इत्यादी पूजेसाठी आवश्यक सामुग्री गोळा करणे या गोष्टी अजूनही ही त्याच श्रद्धेने पार पाडल्या जातात. गावातील जुनी मंडळी अजूनही मोठ्या श्रद्धेने सत्यनारायणाच्या पूजेला आपली हजेरी लावतात,  जुन्या आठवणी निघतात! या जुन्या आठवणी ऐकून नेहमीप्रमाणे आम्ही मंडळी खुश होतो. 

खरंतर हा मोसम खूप पावसाचा! बाकी गावकरी मंडळीपासून आम्ही एका पाण्याच्या ओढ्याने (स्थानिक भाषेत वळ) वेगळे काहीसे वेगळे पडलो आहोत. सर्व मंडळी पुर्वी या पाण्यातून बिनधास्तपणे पूजेसाठी अथवा गणपतीमध्ये जुन्या घरी गणपती दर्शनासाठी येत जात करीत. परंतु आता या ओढ्यातून मार्गक्रमण करण्याची इच्छाशक्ती विविध कारणांमुळे नाही. 

केवळ पाटील कुटुंबीयच नव्हेतर आजीच्या माहेरचे घरत कुटुंबीय, गावातील घरत, वर्तक कुटुंबीय,  मोठ्याआईच्या माहेरचे वर्तक कुटुंबीय ही सारी मंडळी वर्षानुवर्षे पावसाचा मुकाबला करीत सत्यनारायणाच्या पूजेला येत असतात. या साऱ्यांना भेटून खूप बरं वाटत असतं! काळाच्या ओघात यातील काही जुनी मंडळी आपल्यातून निघून गेली,  त्यांच्या आठवणीसुद्धा या प्रसंगाने पुन्हा एकदा निघतात ! पुजा करण्यासाठी किशोर भटजी आले होते!  या किशोरभटजींचे कुटुंबीय पाटील कुटुंबीयांचे परंपरागत पौरोहित्य सांभाळणारे!  हाही भुतकाळाशी जोडणारा एक दुवा! वयोमानापरत्वे बेन, जिजी ह्यांचं मुंबईहुन येणं कमी झालं आहे ! 

उपस्थित मंडळींशी बोलताना एक गोष्ट मात्र प्रकर्षानं जाणवली.  उपस्थितांमध्ये हे बहुतांश जुनी मंडळी होती. नवीन पिढीतील बरेचजण विविध कारणांमुळे पूजेला  येऊ शकले नाहीत.  परंपरेच्या हातातून निसटून जाऊ पाहणाऱ्या अनेक अनमोल दुव्यांपैकी हाही एक दुवा ठरणार नाही ना ही एक नकोशी वाटणारी भावना या निमित्ताने जाणवून गेली. 

जितकं जमेल तितका हा पुजेचा वारसा टिकवावा हा विचार मनात नक्कीच आहे! 

श्री सत्यनारायणदेवताय नमः !




शनिवार, १३ जुलै, २०१९

२०१९ क्रिकेट विश्वचषक !


पावसाच्या अवकृपेमुळे दोन दिवस चाललेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा एक अनपेक्षित पराभव झाला. ह्या पराभवामुळं अखिल भारतवर्षाचा या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील रस संपुष्टात आला.  खऱ्या क्रिकेटरसिकांनी विजय आणि पराभव यापलीकडं जाऊन खेळाचा आनंद लुटावा,  या स्पर्धेच्या निमित्ताने ज्या काही सुखद आठवणी गोळा करता आल्या त्या मनाच्या कप्प्यात घट्ट झाकून आयुष्याच्या पुढील प्रवासास निघावे या उद्देशाने या स्पर्धेतील काही मनोरंजक क्षणांचा घेतलेला हा आढावा !

यश मिळवण्यासाठी गुणवत्ता आणि व्यावसायिकता याचं योग्य मिश्रण तुमच्या संघामध्ये असावं लागतं. पुर्वी निव्वळ गुणवत्तेच्या आधारे कमी प्रमाणात असलेल्या तुमच्यातील व्यावसायिकतेला झाकून ठेवून तुम्हाला यश मिळवता येणं शक्य होतं.  यशासाठीचं हल्लीच्या काळातील व्यावसायिकतेचे आवश्‍यक प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.  त्यामुळेच की काय उपांत्य फेरीत व्यावसायिकतेने खेळ करणारे चार  संघ प्रवेश करते झाले. व्यावसायिकचे उदाहरण द्यायचं झालं तर विराट कोहलीच्या मुलाखतीमधील एका विधानाचा इथं संदर्भ देता येईल. त्यानं हल्ली जाणीवपुर्वक एकेरी, दुहेरी धावांवर भर दिल्याचं चित्र दिसुन येतं. आपल्या विकेटला सहजासहजी गमवायचं नाही ह्यावर त्याचा भर दिसुन येतो. 

विश्वचषक स्पर्धेची सुरुवात यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यांने झाली. या विश्‍वचषक स्पर्धेच्या दरम्यान डिव्हिलियर्सने आपल्याला दक्षिण आफ्रिकेच्या संघामध्ये समाविष्ट करण्यासाठी अखेरच्या क्षणी केलेल्‍या विनंतीची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये पोहोचली. जर हा गुणवान खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या संघात असता तर नक्कीच काहीसं वेगळं चित्र पहावयास मिळालं असतं. या सामन्यातील पहिल्याच षटकात इमरान ताहिरने बेयरस्टोचा बळी घेऊन आपल्या सुप्रसिद्ध अशा जोरदार धावेचा रसिकांना आनंद लुटू दिला.  इंग्लंडने  रचलेलं ३११ धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिका संघाला न पेलविल्यानं ह्या संघाचा पराभव झाला. 

विश्वचषक स्पर्धेमध्ये तुमचा संघ कशी सुरुवात करतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. खरंतर या स्पर्धेच्या साखळी स्वरूपामुळे एखाद्या बलाढ्य संघाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यातील पराभवाने खचून जायचं तुम्हाला कारण नसतं. हा संघ साखळी स्पर्धेत केव्हा न केव्हा तरी तुम्हाला भेटणारच असतो. परंतु सुरुवातीच्या दोन किंवा तीन सामन्यात जर तुमचा पराभव झाला तर मग मात्र परिस्थिती  काहीशी गंभीर स्वरूप धारण करते, तुम्ही पॅनिक बटन दाबू शकता. दक्षिण आफ्रिका संघाची परिस्थिती सुद्धा स्पर्धेत काहीशी अशीच झाली. बांगलादेशाच्या विरुद्धच्या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय त्यांच्या अंगाशी आला.  त्यानंतरच्या भारताविरुद्धच्या पराभवानंतर मग मात्र त्यांची परिस्थिती अधिकच बिकट झाली.  हा खरं तर एक गुणी संघ! परंतु देशातील क्रिडाविषयक काही धोरणांमुळे संघाच्या निवडीमध्ये घातली गेलेली कृत्रिम बंधने या संघाच्या स्वास्थ्यावर परिणाम करतात!

पाकिस्तानचा संघ दोन रुपं बाळगून असतो असं गंमतीने म्हटलं जातं! एक रुप ज्यामध्ये हा संघ अत्यंत गुणवान खेळाडूंचा समूह असतो! उत्तम गोलंदाजी, फलंदाजी यांचं बहारदार प्रदर्शन करून रसिकांची मने जिंकून घेतो.  दुसऱ्या रुपामध्ये मात्र हा संघ विनोदीपणाकडे झुकणाऱ्या अगदी प्राथमिक चुका करतो! त्यांचं हे रूप त्यांना दारुण पराभवाकडे घेऊन जातं.  वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यामध्ये त्यांनी आपल्या दुसऱ्या रूपाचे प्रदर्शन करीत एक मोठा पराभव स्वीकारला! हा पराभवच आणि त्यातील मोठ्या धावगतीच्या फरकामुळं शेवटी त्यांना बाद फेरीतील प्रवेशापासून वंचित ठेवून गेला. 

तिसऱ्या सामन्यांमध्ये न्युझीलँडने श्रीलंकेला 136 धावांत गुंडाळून दहा गड्यांनी एक मोठा विजय संपादन केला. न्यूझीलंडची गोलंदाजी ही आपलं एक भेदक रुप बाळगून आहे. अनुकूल परिस्थिती मिळताच ते आपलं हे भेदक रुप बाहेर काढतात.  भारतानं ह्या विश्वचषक स्पर्धेच्या सराव सामन्यातसुद्धा त्याचा अनुभव घेतला आहे.  त्यामुळे उपांत्य फेरीतील सामन्यात ढगांचा मैदानावरील आवरण आणि खेळपट्टीवरील काहीसा ओलसरपणा याची साथ मिळताच त्यांनी भारताच्या आघाडीच्या फलंदाजांची जी काही दाणादाण उडवली ती पूर्णपणे अनपेक्षित होती असे म्हणता येणार नाही! 

चौथ्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने अपेक्षेनुसार अफगाणिस्तान संघाचा पराभव केला. चेंडू अयोग्य पद्धतीने हाताळल्याबद्दल एक वर्षाची बंदी घातले गेलेले डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ या दोन्ही गुणवान खेळाडूंच्या पुनरागमनाची ही पहिलीच स्पर्धा होती.  डेव्हिडने आपल्या बहारदार फलंदाजीने ही स्पर्धा गाजवली.  या सुंदर फलंदाजीचा श्रीगणेशा त्यानं अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात करत एक बहारदार अशी ८९ धावांची खेळी सजविली. 

पाचव्या आणि सहाव्या सामन्यांमध्ये दोन अनपेक्षित निर्णयांची नोंद झाली अन स्पर्धेत एक अत्यंत चुरसदायक स्थिती निर्माण होण्यास आरंभ झाला. पाचव्या सामन्यामध्ये बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयासाठी 331 धावांचे लक्ष्य ठेवले होते. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी प्रयत्नांची शर्थ करून सुद्धा त्यांना केवळ 309 धावांपर्यंतच मजल मारता आली. 

या स्पर्धेच्या आधी या स्पर्धेमध्ये एका डावात 500 धावांची मजल नक्की मारली जाईल अशा प्रकारची चर्चा जोरात होती. परंतु जाणकार खेळाडूंनी मात्र या चर्चेला जास्त प्रोत्साहन दिले नाही.  द्विपक्षीय मालिकेमध्ये ज्या वेळेस केवळ दोनच संघ सतत पाच-सहा सामने खेळत असतात त्यावेळी हे काही प्रमाणात शक्य असू शकते. परंतु ज्यावेळी एका महिन्याच्या कालावधीत तुम्ही ही वेगवेगळ्या नऊ संघांचा मुकाबला करीत असतात त्यावेळी एकदम ५०० धावांची मजल गाठणे एक जवळपास अशक्यप्राय आहे असे जाणकारांचे आणि माझे सुद्धा मत आहे!  खरं म्हणायला गेलं तर बांगलादेश विरुद्ध ३३० धावांची मजल मारणे हे दक्षिण आफ्रिकेला शक्य व्हायला हवे होते. परंतु विश्वचषक सामन्यातील एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग आणि त्याच्या सोबतीने प्रत्येक षटकामागे वाढत जाणारे दडपण याचा मुकाबला त्यांना करता आला नाही. त्यानंतरच्या सहाव्या सामन्यात पाकिस्तान आपलं गुणवान खेळाडूंचं पहिलं रुप बाहेर काढलं. आणि इंग्लंडच्या संघाला वास्तवात आणून सोडले. त्यांनी केलेल्या 348 संख्येचा पाठलाग करताना इंग्लंड संघ 334  धावाच गाठू शकला. काही खेळाडूंना मोठ्या स्पर्धेच्या मंचावर आपली कामगिरी उंचाविण्याची कला अवगत असते. वहाब रियाझने ह्या स्पर्धेत ह्या कलेचा प्रत्यय क्रिकेट रसिकांना आणुन दिला. 

ही स्पर्धा सुरू होण्याआधी अफगाणिस्तान संघाकडून फार मोठ्या अपेक्षा बाळगल्या जात होत्या. हा संघ स्पर्धेच्या कालावधीमध्ये किमान दोन ते तीन धक्कादायक निर्णयांची नोंद करेल. अशी अपेक्षा या गुणवंत खेळाडूंनी भरलेल्या संघाकडून केली जात होती.  परंतु या स्पर्धेआधी संघामध्ये काहीतरी गडबड झाली असावी. कर्णधार असलेल्या अफगाणला बाजूला सारून गुलबदीनची कर्णधार म्हणून नेमणूक करण्यात आली.  या अंतर्गत अस्थिर वातावरणाचा परिणाम म्हणून की काय हा संघ संपूर्ण स्पर्धेमध्ये दोन तीन वेळा विजयाच्या अगदी समीप येऊन सुद्धा विजयरथ सीमारेषेपलीकडे नेऊ शकला नाही.  श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेला २०१ धावात रोखूनसुद्धा त्यांना ४० षटकात हे आव्हान पार पाडता आले नाही. 

जगातील सर्वाधिक रसिकसंख्येच्या अपेक्षांचे ओझे बाळगणारा भारतीय संघ शेवटी एकदाचा पाच जून रोजी मैदानात उतरला. दक्षिण आफ्रिका या आधीचे दोन सामने हरल्यामुळे इथे दोन शक्यता निर्माण झाल्या होत्या.  पहिली म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा आत्मविश्वास डळमळीत झाला असून त्यांच्याकडून फारशा संघर्षाची अपेक्षा करता येण्यासारखी नव्हती.  दुसरी शक्यता म्हणजे ते पेटून उठून आपली सर्वोत्तम कामगिरी पेश करतील.  परंतु क्रिकेटच्या दृष्टीने पाहिलं तर दुर्दैवी अशी पहिलीच शक्यताच प्रत्यक्षात उतरली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला भारतासमोर फारसे आव्हानात्मक लक्ष्य उभे करता आले नाही.  भारतीय संघाने शेवटी जरी काहीसा मोठा असा भासणारा विजय मिळवला असला तरी साधारण ४० व्या षटकाच्या आसपास आवश्यक असलेल्या धावगतीचे प्रमाण प्रति चेंडू एक धाव इतके झाले होते.  हार्दिक पांड्याने एक छोटीशी अशी चमकदार खेळ करून भारताची नैया पार केली. रोहितने ह्या स्पर्धेचा यशस्वी श्रीगणेशा केला !

त्यानंतर झालेल्या न्युझीलँड बांगलादेश या सामन्यामध्ये न्यूझीलंडने अपेक्षेनुसार बांगलादेशचा पराभव केला.  परंतु बांगलादेशने न्यूझीलंडच्या ८ खेळाडूंना तंबूत धाडून सामन्यांमध्ये काहीशी चुरस निर्माण केली होती.  बांगलादेश संघ तरुण खेळाडूंचा संघ असून त्याचे भवितव्य एकंदरीत उज्वल दिसते.  शकीब हसनने आपल्या फलंदाजीच्या उत्तम प्रदर्शनाच्या जोरावर बांगलादेशच्या संघाला एक लक्षात राहण्याजोग्या स्पर्धेचे योगदान दिले. 

ऑस्ट्रेलिया वेस्टइंडीज हा सामना रंगतदार झाला. वेस्ट इंडिज संघामध्ये अत्यंत गुणवत्तापूर्ण अशा तरुण खेळाडूंचा भरणा करण्यात आला आहे.  या तरुण खेळाडूंच्या सोबतीला गेल, रसेल यांच्यासारखे अनुभवी खेळाडू सुद्धा आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यामध्ये एकावेळी वेस्ट इंडिज संघ विजयासाठी उत्तम स्थितीमध्ये होता. परंतु शेवटी मोक्याच्या क्षणी गोंधळ केल्यामुळे त्यांनी एक सुवर्ण संधी गमावली.  या गुणवत्तापूर्ण संघाच्या आपल्या गुणवत्तेला न्याय न देण्याच्या वृत्तीचे मला बऱ्याच वेळा वाईट वाटते!

त्यानंतरच्या काही सामन्यांमध्ये पावसानेच आपले वर्चस्व गाजविले. पाकिस्तान श्रीलंका हा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. 

इंग्लंडने बांगलादेश विरुद्ध ३८६ धावांचा डोंगर उभा केला.  बांगलादेशने या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला खरा परंतु ते खरोखर गंभीर असे आव्हान मात्र निर्माण करु शकले नाहीत. 

पावसाच्या  व्यत्ययामध्ये न्यूझीलंडने मात्र आपल्या विजयाचा मेरू पुढे नेणं सुरु ठेवलं.  त्यांनी अफगाणिस्तानचा एका एकतर्फी लढतीमध्ये सात गडी राखून पराभव केला. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशातील क्रिकेटच्या मैदानावरील वैमनस्य आता रंग पकडू लागले आहे. भारतानं शिखर धवनच्या शतकाच्या आणि विराट कोहली, रोहितच्या अर्धशतकाच्या जोरावर ३५२ धावांचे एक मोठाले आव्हान ऑस्ट्रेलिया पुढे उभे केले.  ऑस्ट्रेलिया संघ एव्हाना भरात आला होता.  त्यांनी स्मिथ आणि करी यांच्या मदतीने या धावसंख्येचा जोरदार पाठलाग केला. परंतु भुवनेश्वर कुमारने एका षटकामध्ये दोन बळी मिळवून त्यांच्या पाठलागाची गाडी रुळावरून घसरवुन टाकली. ह्या सामन्यात शिखर धवनला झालेल्या दुखापतीमुळं त्याला दुर्दैवानं स्पर्धेबाहेर व्हावं लागलं. मागं वळुन पाहता भारतासाठी हा एक मोठा दुर्दैवी क्षण ठरला! 

सुरुवातीच्या चमकदार सामन्यानंतर विंडीजचा संघ एव्हाना खराब कामगिरी करू लागला होता. इंग्लंडने पुढील सामन्यात त्यांचा आठ गडी राखून पराभव केला.  आयपीएलमध्ये नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या रसेलकडून विंडीजने फार मोठ्या अपेक्षा केल्या असणार.  परंतु दुर्दैवानं रसेल सुरुवातीच्या सामन्यांमध्ये या अपेक्षांना साजेशी अशी कामगिरी करू शकला नाही.  त्यानंतर जखमी झाल्यामुळे त्याला विश्वचषक स्पर्धेला रामराम करावा लागला. 

श्रीलंकेविरुद्धच्या साखळी सामन्यात ऍरोन फिंचने कप्तानाला साजेशी अशी कामगिरी करत दीडशतक ठोकले.  ३३४ धावांचे आव्हान श्रीलंकेला अजिबात पेलवले नाही, त्यांना एका मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.  सतत तीन पराभवाला सामोरे जावे लागल्याने या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याची भीती असलेल्या दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानवर मात्र एका मोठ्या विजयाची नोंद केली. अफगाणिस्तान संघासाठी हा विश्वचषक निराशाजनक होत असल्याची ही ग्वाही होती.  संपुर्ण आशिया खंडाचे लक्ष लागुन राहिलेल्या भारत पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तानचा ८९ धावांनी मोठा पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणाच्या सरफराजच्या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.  भारत आणि पाकिस्तान सामन्यात या दोन संघातील कामगिरीत, गुणवत्तेत आणि व्यावसायिकतेत बरीच मोठी तफावत दिसून आली. 

नंतरच्या सामन्यात मात्र पाकिस्तानने  या पराभवामुळे आलेले नैराश्य दूर सारून उत्तम कामगिरीची नोंद केली. निराशाजनक होत चाललेल्या विश्वचषक स्पर्धेत ३२१ धावा उभारूनसुद्धा वेस्ट इंडिजला बांगलादेशने नमवले.  इथं शकीब हसन आणि लिटन दास या जोडीने चौथ्या विकेटसाठी १८९ धावांची नाबाद भागीदारी रचून विंडीजला पराभूत करण्यात मोलाचा वाटा बजावला.  स्पर्धेच्या या टप्प्यावर फलंदाजांसाठी अत्यंत अनुकूल वातावरण निर्मिती झाली होती. 

त्यानंतरच्या सामन्यात कप्तान इओन मॉर्गन याच्या विक्रमी १७ षटकाराच्या जोरावर इंग्लंडने स्पर्धेतील सर्वाधिक ३९७ धावांची नोंद केली. त्यानंतर अफगाणिस्तानला २४७ धावांमध्ये रोखून एका मोठ्या विजयाची प्राप्ती केली.  स्पर्धेच्या या टप्प्यावर आघाडीवर असणारे ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड आणि इंग्लंड हे चार संघ आणि इतर संघ अशी स्पष्ट विभागणी दिसत होती.  त्यामुळे ही विश्वचषक स्पर्धेतील साखळी सामने एका विशिष्ट मार्गाने होतील अशी भिती वाटू लागली होती.  

उपांत्य फेरीतील प्रवेशाचे आपले आव्हान कायम राखण्यासाठी न्यूझीलंड विरुद्धचा आपला सामना जिंकणे दक्षिण आफ्रिकेसाठी अत्यावश्यक बनले होते.  परंतु पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात त्यांना न्यूझीलंड समोर फारसे मोठे लक्ष ठेवता आले नाही.  त्यानंतर विल्यम्सनने कप्तानाला साजेसी अशी १०६ धावांची नाबाद खेळी करून आपल्या संघाला एका कमी धावसंख्येच्या सामन्यात चुरशीच्या सामन्यात विजय मिळवून दिला. 

बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या वॉर्नरच्या १६६ धावांच्या मोठ्या खेळीच्या जोरावर त्यांनी ३८१ धावांची मोठी धावसंख्या उभारली.  बांगलादेशने पुन्हा एकदा लढत देत ३३३ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतरचा श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील सामना एकतर्फी होईल असाच सर्वांनी अंदाज बांधला होता.  परंतु लसित मलिंगाने ४३ धावात ४ बळी घेत आपल्या संघाला एक अविस्मरणीय विजय मिळवुन दिला आणि श्रीलंकेच्या विश्वचषक स्पर्धेतील आव्हानात नवीन जान आणली.  बेन स्टोक्सने एक अप्रतिम खेळी करत नाबाद ८२ धावा केल्या.  ४७ व्या शतकाच्या पाचव्या चेंडूवर एकेरी धाव घेतल्याने मार्क वूडला शेवटचा एक चेंडू खेळावा लागला.  दुर्दैवानं तो तेथे बाद झाला.  जर हा त्यावेळी बाद झाला नसता तर पुढील तीन षटकात काय घडले असते याचा अंदाज बांधणे मनोरंजक ठरु शकते!

भारतीय संघाचा सध्याचा फॉर्म बघता भारत अफगाणिस्तान ही लढत एकतर्फी होण्याची अटकळ सर्वांनी बांधली होती. परंतु ह्या सामन्यामध्ये खेळपट्टीवर मंदगतीने चेंडू येत होता असे असे म्हटले गेले. कारण काहीही असो,  भारताला अफगाणिस्तानसारख्या संघासमोर फक्त २२४ धावसंख्या उभारता आली. भारताच्या पराभवाची स्पष्ट चिन्हे मध्यंतराच्या वेळी दिसत होती.  परंतु या स्पर्धेत वेळोवेळी भारतीय गोलंदाजांनी कठीण परिस्थितीतून भारतीय संघाला बाहेर काढले आहे.  या सामन्यातसुद्धा या कमी धावसंख्येला या गोलंदाजांनी विजयी धाव धावसंख्येत परिवर्तित केले. इथं शमीने एका हॅट्ट्रिकची सुद्धा नोंद केली. हा एक गुणी गोलंदाज सातत्याने भारतीय संघात या स्पर्धेत स्थान मिळवू शकला नाही यातच भारतीय गोलंदाजांची श्रेष्ठत्वाची कल्पना येते. 

त्याच दिवशी दुपारी सुरू झालेल्या दिवसरात्र सामन्यात न्यूझीलंडने कप्तान विल्यम्सन याच्या मोठ्या १४८ धावांच्या खेळीच्या जोरावर २९१ धावा उभारल्या.  विंडीजचा डाव गडगडला असता ब्रेथव्हाईटच्या एका अभूतपूर्व खेळीने विंडीजला एका अशक्यप्राय विजयाच्या समीप नेऊन ठेवले होते.  ब्रेथव्हाईट ज्यावेळी सीमारेषेवर झेलबाद झाला तो फटका जर सीमारेषेबाहेर गेला असता तर विंडीज हा सामना जिंकला असता! तुम्ही विजयाच्या इतक्या समीप जाऊन सुद्धा त्या पासून वंचित राहू शकता याचं हे अत्यंत दुर्दैवी असे उदाहरण होते!  मागं वळून पाहता जर हा षटकार गेला असता तर न्यूझीलंड कदाचित उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रवेश करु शकले नसते!  भारत आणि पाकिस्तान यांच्यात उपांत्य फेरीचा सामना झाला असता! 

उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवण्यासाठी पाकिस्तानला यापुढील सर्व सामने जिंकणे आवश्यक होते. त्या दृष्टीने खेळ करीत त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ३०८ धावा उभारल्या. दक्षिण आफ्रिकेला या धावसंख्येचा पाठलाग करता आला नाही त्यांना केवळ २५९ धावांपर्यंत मजल मारता आली. 1992 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तान संघाची साखळी फेरीतील कामगिरी ही या स्पर्धेतील कामगिरीशी मिळतीजुळती होती.  त्यामुळे हा संघ आता उपांत्य फेरीत मजल मारून विश्वचषक सुद्धा पटकावेल अशा आशयाचे संदेश सोशल मीडियावर एव्हाना पसरू लागले होते!

बांगलादेशने आपल्या श्रेष्ठ कामगिरीचे प्रदर्शन करीत अफगाणिस्तानवर ६२ धावांनी विजय मिळवला.  ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याकडे सर्वांचे लक्ष होते.  आरोन फिंचच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २८५ धावांचे लक्ष्य उभारले.  बॅरेनडॉफ आणि स्टार्क जोडगोळीने इंग्लंड ला इंग्लंडच्या फलंदाजांना आपला जम बसवू दिला नाही. पुन्हा एकदा स्ट्रोकने चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन करत ८९ धावांची झुंजार खेळी उभारली. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आपल्या उत्तम खेळाची पुनरावृत्ती करत पाकिस्तानने न्यूझीलंडवर सुद्धा सहा गडी राखून एका दिमाखदार विजयाची नोंद केली.  आता त्यांचे केवळ अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्याविरुद्ध सामने शिल्लक असल्याने आणि न्यूझीलंडचा खेळ एव्हाना काहीसा ढेपाळल्याने पाकिस्तानच्या उपांत्य फेरीतील प्रवेशाच्या आशा उंचावल्या होत्या. 

भारताने आपली विजयी वाटचाल सुरू ठेवत वेस्टइंडीज वर १२५ धावांनी दिमाखदार विजय मिळविला. पार्टी स्पॉयलर नावाची एक इंग्रजी भाषेत संज्ञा आहे.  दक्षिण आफ्रिका आपलं उपांत्य फेरीतील प्रवेश करण्याचे आव्हान जरी संपुष्टात आलं असलं तरी पार्टी स्पॉयलरची भूमिका बजावण्यासाठी एव्हाना सज्ज झाले होते.  त्यांच्या भूमिकेचा पहिला फटका बसला तो श्रीलंकेला!  श्रीलंकेवर त्यांनी एका दणदणीत विजयाची नोंद केली. या पराभवामुळे मात्र श्रीलंकेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. 

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सामना चुरशीचा होईल अशी अटकळ बऱ्याच जणांनी बांधली होती. सराव सामन्यात सुद्धा अफगाणिस्तानने पाकिस्तानचा पराभव केला होता.  227 धावांचे माफक लक्ष्य अफगाणिस्तानने उभारले होते. पाकिस्तान या धावसंख्येचा सहज पाठलाग करील असे चित्र डावाच्या सुरुवातीला होते.  परंतु डावाच्या मधल्या वेळी त्यांनी अचानक विकेट गमावून हे आव्हान खूप कठीण बनवून टाकले होते.  एका वेळी तर त्यांना चार षटकात जवळपास ५० धावांची गरज होती. अशावेळी स्पिनर चांगली गोलंदाजी करत असताना देखील कप्तान गुलबदिन  याने स्वतः गोलंदाजीला येण्याचा अनाकलनीय निर्णय घेतला. हाच निर्णय अफगाणिस्तानसाठी अत्यंत घातक ठरला. 

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फलंदाजांना माफक धावसंख्येत बाद करुन सामन्यात चुरस निर्माण केली होती.  परंतु उस्मान ख्वाजा आणि कॅरी या दोघांनीही उत्तम फलंदाजीचे प्रदर्शन करीत २४३ ही एक चांगली धावसंख्या उभारण्यात आपल्या संघाला मदत केली.  नंतर स्टार्कने आपल्या भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन करीत पाच बळी देत न्यूझीलंडचा संघ १५७ धावांमध्ये गुंडाळला.  अशाप्रकारे स्टार्क हा स्पर्धेच्या अंतिम टप्प्याच्या वेळी फॉर्ममध्ये येत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. ह्या अंतिम  टप्प्याला हल्ली Business End असे संबोधिलं जातं. यावेळी गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया संघाने आघाडीचे स्थान पटकाविले होते.  भारतीय आणि इंग्लिश संघ ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत कसे भेटू नये यासाठी उत्सुक असावेत असे वाटण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली होती. 

गुणतक्त्यात आता अशी परिस्थिती निर्माण झाली होती की भारत आणि इंग्लंड या सामन्याकडे पाकिस्तान बांगलादेश या देशांचे लक्ष लागून राहिले होते.  भारताने जर इंग्लंडला हरविले असते हे तर या दोन्ही संघांना उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असती.  त्यामुळे उपखंडातील सर्वच देश भारताला या सामन्यात पाठिंबा देत आहेत असे चित्र निर्माण झाले होते. परंतु इंग्लिश संघाच्या बलवान फलंदाजीच्या जोरावर त्यांनी ३३७ एक मोठी धावसंख्या उभारली.  राहुल सुरुवातीला अगदी कमी धावसंख्येवर बाद झाल्यावर सुद्धा रोहित आणि विराट यांनी संथ गतीने का होईना परंतु विकेट्स न गमावता एका चांगल्या धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. परंतु शेवटी ३३७ ही धावसंख्या भारतासाठी थोडी अधिकच डोईजड ठरली.  पांड्या जोपर्यंत मैदानावर होता तोपर्यंत हीच धावसंख्या पार करण्याच्या आशा काही प्रमाणात शाबूत होत्या.  परंतु त्यानंतर मात्र भारतीय फलंदाजांना हवा तेवढा धावसंख्येचा वेग राखता न आल्यानं भारत पराभूत झाला.  भारत पराभूत झाल्याचे दुःख भारतीय संघ आणि चाहत्यांपेक्षा आपल्या शेजाऱ्यांना जास्त झाले. 

श्रीलंकेने वेस्ट इंडिजचा २३ धावांनी पराभव केला.  या सामन्यात फर्नांडोने शतक झळकावले.  उपांत्य फेरीतील आपल्या प्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यासाठी भारताला बांगलादेशवर विजय मिळवणे आवश्यक होते.  बांगलादेश संघ हा भारतीय संघाला हल्ली नेहमीच अटीतटीचा सामना लढा देत असतो.  इथं सुद्धा नियमित विकेट जात असताना देखील भारताला शेवटपर्यंत तणावात ठेवण्यात बांगलादेशने यश मिळवले होते.  शेवटी बुमराहनेच आपल्या शेवटच्या षटकामध्ये लागोपाठ दोन बळी मिळवत भारताला विजय मिळवून दिला.  भारतीय चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.  या पराभवामुळे बांगलादेशचे या विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले. 

आता पाकिस्तानचे लक्ष इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन संघात होणार्‍या सामन्याकडे लागले होते.  जर या सामन्यात न्युझीलँड जिंकलं असतं तर पाकिस्तानच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या आशा केवळ त्यांच्या बांगलादेशवरील विजयावर अवलंबून राहिल्या असत्या.  परंतु इंग्लंडने आपल्या पुढील सामन्यात न्यूझीलंडचा ११९ धावांनी दणदणीत पराभव केला. आता उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी पाकिस्तानसाठी पुढे एक केवळ अशक्यप्राय असे गणिती शक्यता उपलब्ध राहिली होती. त्यांना बांगलादेश विरुद्ध प्रथम फलंदाजी करत किमान तीनशे पंधरा/ सोळा धावांनी विजय मिळविणे आवश्यक बनले होते.  याचाच अर्थ असा की प्रथम फलंदाजी करून चारशे-पाचशे अशी मोठी धावसंख्या उभारून मोजक्या धावसंख्येत संपूर्ण बांगलादेश संघ बाद करणे त्यांना आवश्यक होते.  या सामन्याआधी इतिहासात क्रिकेट मैदानात असलेले झाड आणि त्यावर अडकलेला चेंडू यामुळे फलंदाजांनी कशा बऱ्याच धावा पळून काढल्या याविषयीची मनोरंजक माहिती ती क्रिकेट रसिकांपुढे ठेवण्यात आली. 

वेस्टइंडीजने आपल्या पुढील सामन्यात अफगाणिस्तानचा 23 धावांनी पराभव केला.  एक महान खेळाडू असलेल्या क्रिस गेलचा हा शेवटचा विश्वचषक सामना असल्याची शक्यता होती.  गणिती शक्यतांवर  अवलंबून असलेल्या पाकिस्तानला बांगलादेश विश्वर हवा तितका मोठा विजय मिळवता आला नाही.  त्या दोन्ही संघांचे आव्हान संपुष्टात आले.  या क्षणी स्पर्धेतील केवळ दोन सामने साखळी सामने बाकी राहिले होते.  या दोन सामन्यातील निर्णयावर उपांत्य फेरीतील लढती कोणत्या संघांमध्ये दरम्यान होणार हे अवलंबून होते. भारताने तर अपेक्षेनुसार श्रीलंकेवर विजय मिळविला. याच सामन्यादरम्यान रोहित शर्माने एकाच विश्वचषक स्पर्धेत विक्रमी असे पाचवे शतक झळकाविले.  पार्टी स्पॉईलर बनलेल्या दक्षिण आफ्रिकेने एका चुरशीच्या लढ्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा दहा धावांनी पराभव करुन उपांत्य फेरीतील लढतीत फेरफार करून टाकला. आता उपांत्य फेरीतील लढती भारत विरुद्ध न्यूझीलंड आणि इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशा होणार होत्या. न्यूझीलंडविरुद्ध आपला उपांत्य फेरीचा सामना होणार म्हणून एकंदरीत भारतीय रसिकांमध्ये आणि संघांमध्ये काहीसं आनंदाचे वातावरण होते. न्यूझीलंड विरुद्धचा सामना भारतासाठी खरोखर सोपा जाणार की काय हे केवळ आपल्याला भविष्यकाळ सांगू शकणार होता! 

२०१९ च्या विश्वचषक साखळी स्पर्धेतील सामन्यांचा हा थोडक्यात गोषवारा! आज ह्या स्पर्धेच्या अंतिम सामन्याची पुर्वसंध्या ! कोट्यवधी क्रिकेट रसिकांनी ह्या पुर्वसंध्येविषयी बरीच काही स्वप्नं रंगवली होती, त्यांचा स्वप्नभंग करणारी ही पुर्वसंध्या ! पण रसिकांनो माझं एकच सांगणं - उद्या क्रिकेटच्या ह्या चार वर्षातुन रंगणाऱ्या महोत्सवाचा समारोप होणार आहे. स्पर्धेतील अनेक टप्पे  केलेले दोन संघ एकमेकांशी झुंजणार आहेत! निखळ मनाने त्याचा आनंद लुटा ! Tomorrow, let Cricket be the winner!

बुधवार, ३ जुलै, २०१९

असुनी भोवताली सारे!




गेल्या आठवड्यात बालपणीचा एक खास मित्र हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आम्हां सर्वांचा कायमचा निरोप घेऊन स्वर्गवासी झाला.  गेल्या एका वर्षात चाळीस-पंचेचाळीस वयोगटात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अचानक सर्वांना सोडून गेलेला हा माझ्या माहितीतील पाचवा तरुण! 

हे काही वय नाही जिथं अशा आजाराने या भूतलावरील यात्रा अचानक संपवावी! हे असं वय जिथं मागची आणि पुढची अशा दोन्ही पिढ्या तुमच्यावर अवलंबून असतात. अशावेळी या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर किती मोठा आघात झाला असेल, ईश्वर त्यांना ह्या परिस्थितीतून उभं राहण्याची कशी काय शक्ती देत असेल ह्याचा विचार सुद्धा करवत नाही!  आजची ही पोस्ट दोन भागात विभागली गेली आहे. 

How is my life treating me?

अशा दुर्दैवी घटनांनंतर त्या टाळता येण्यासाठी ह्या व्यक्तींना कोणती काळजी घेता आली असती, किंबहुना ह्या वयोगटातील सर्वांना कोणती काळजी घेता येण्यासारखी आहे याविषयी प्रत्येकजण हिरीरीने आपली मते मांडत असतो.  त्यानं नियमित व्यायाम करायला हवा होता, आहाराबाबत शिस्त बाळगायला पाहिजे होती, नियमित विश्रांती घ्यायला हवी होती, मद्यपान आटोक्यात ठेवायला हवं होतं वगैरे वगैरे!

हल्ली मला या सल्ल्यांविषयी काही बोलावेसं वाटत नाही. इथं माझं एकच म्हणणं आहे ते म्हणजे तुमचं आयुष्य तुम्हाला कसं वागवत आहे ही गोष्ट फारशी तुमच्या नियंत्रणात नाही!  तुमच्या दैनंदिन नोकरीच्या प्रवासात तुम्हांला किती कष्ट सहन करावे लागतात,  तुमच्या नोकरी-व्यवसायात तुम्ही किती प्रमाणात स्थिरावला आहात, तुमच्या कौटुंबिक जीवनात किती शांतता आहे हे सारे घटक तुम्ही कितीही प्रामाणिक प्रयत्न केले तरी बऱ्याच अंशी तुमच्या नियंत्रणापलीकडे असतात! 

त्यामुळे नियमित / शिस्तीचा आहार, नियमित व्यायाम,  विश्रांती हे सर्व घटक जणू काही चैनीच्या बाबी आहेत असं वाटावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे . त्यामुळे दुसऱ्या कोणाची परिस्थिती नक्की कशी आहे हे माहीत नसेल तर सहसा त्याविषयी टिप्पणी करू नये.  अजुन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे एखादा मित्र खरोखर अडचणीत असेल तर त्याला प्रत्यक्ष व्यावहारिकदृष्ट्या अथवा भावनिकदृष्ट्यासुद्धा आधार देण्याची खरोखरीची तयारी कितीजण दाखवतात?  त्यामुळे जणू काही प्रत्येकजण आपला आयुष्याचा लढा एकट्यानेच लढत असतो असे वाटावं ही परिस्थिती निर्माण झाली आहे !!

Have we lost our sensitivity / empathy altogether?
अजुन एक मुद्दा म्हणजे आपल्या समाजाची झपाट्याने ऱ्हास पावत चाललेली संवेदनशीलता! जी व्यक्ती आपल्यासोबत लहानाची मोठी झाली ती व्यक्ती आपल्याला अचानक सोडून गेल्यावर तिचे अंतिम दर्शन घ्यायला आपल्यातील किती जण जातात हासुद्धा कळीचा मुद्दा!  याबाबतीत मी सुद्धा मोठ्या प्रमाणावर दोषी आहे! 

सोशल मीडियामधील ग्रुपवर,  मग तो फेसबुक वा व्हाट्सअप वरील असो;  ज्या ग्रुपवर ही व्यक्ती आपल्यासोबत सदस्य होती तिथं या व्यक्तीच्या निधनानंतर काही काळ तरी विनोद अथवा फुकाचे फॉरवर्ड करु नयेत इतकी तरी संवेदनशीलता आपण दाखवावी अशा मताचा मी होतो! परंतु हल्ली अगदी दुसर्‍या दिवसापासून या संवेदनशीलतेचा अंत झाल्याचे दिसून येते! 

कालाय तस्मै नमः !!

शनिवार, १५ जून, २०१९

युवराज - नियतीला पडलेलं एक सुंदर स्वप्न!



कलाक्रीडा क्षेत्रामध्ये दोन प्रकारचे कलाकार, क्रीडापटू असतात! पहिल्या प्रकारातील मंडळी ही चाकोरीबद्ध मार्गाने,  महत्प्रयासाने आपली कला अथवा क्रीडाकृत्ये पार पडत असतात.  यामध्ये कर्तव्यपुर्ती करणे हा एक महत्त्वाचा भाग असतो.  त्यामुळे होतं काय की ह्या कलेचा आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकांना अथवा रसिकांना ह्या सादरीकरणातुन दिलखुलास आनंद मिळण्याची शक्यता कमी असते.  दुसऱ्या प्रकारातील कला-क्रीडाकार हे आपल्या मनाचे राजे असतात! कलंदर असतात! दुनियेनं आखुन दिलेल्या रितीप्रमाणे आपलं आयुष्य जगणं, आपली कला सादर करणे त्यांना मंजूर नसतं!  आपली कला, क्रीडा ते आपल्या मर्जीनुसारच रसिकांसमोर सादर करीत असतात.  मात्र जेव्हा केव्हा त्यांची भट्टी जुळून येते त्यावेळी त्यांनी सादर केलेला नजराणा हा रसिकांच्या मनात कायमचा घर करुन बसतो! असाच एक मनस्वी खेळाडु युवराज सिंग!! 

युवराज या आठवड्याच्या सुरुवातीला अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर करता झाला! माझा भावनाविवश होणारा मित्र राकेश याचा मला निरोप आला युवराजवर जमेल तितकं लिही!! माझ्या मनातही थोड्याफार प्रमाणात विषय हा विचार खूप घोळत होताच! राकेशनं सांगताच त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. 

युवराजने अचानक निवृत्ती घेतली असावी का? मला तरी नाही वाटत.  ज्या संघाविरुद्ध खेळताना तो पेटुन उठायचा,  त्याच्या डोळ्यांमध्ये ती चमक भरलेली दिसायची,  त्या ऑस्ट्रेलिया संघाचा भारताने आदल्या दिवशी विश्वचषक स्पर्धेच्या एका चित्तथरारक लढतीमध्ये पराभव केला होता. बहुधा त्या विजयाने तृप्त होऊनच युवराजने आपली निवृत्ती जाहीर केली असावी हा माझा सिद्धांत!  

माझं मन बरेच वर्षे मागे गेलं.  ते २००० साल होतं. मी इंग्लंडमध्ये असताना केनियामध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली जात होती.  तिथं विशीसुद्धा न गाठलेला,  (मिसरुड सुद्धा पुर्ण न फुटलेला ! हा मराठीतील आवडता शब्दप्रयोग !)  एक पंजाबी युवक भारतातर्फे आपले पदार्पण करीत होता.  आपल्या पहिल्याच सामन्यात त्यानं एका दिलखुलास खेळीचा नजराणा भारतीय प्रेक्षकांसमोर पेश केला.  त्याची ८४ धावांची ही खेळी भारताला ऑस्ट्रेलियावर विजय मिळून दिली गेली! एका युवराजाचे आगमन झाले होते!! बाकी काही महिन्याची मैत्री असलेले माझे इंग्लिश मित्र युवराजने त्यांचा पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानं त्याच्यावर बेहद खुश होते !

नावाने युवराज असला तरी त्याच्या आयुष्याची पटकथा काही एखाद्या सिनेमातील काल्पनिक राजकुमाराच्या जीवनकथेसारखी आनंदभरी नव्हती.  बहुदा त्यामध्ये दुःखाचे क्षणच अधिक पेरलेले असावेत.  त्याच्या आयुष्यात लहानपणापासूनच नियतीने संघर्षाच्या क्षणांची पेरणी केली होती.  बालपणात केव्हातरी आई-वडिलांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता.  युवराज आपल्या आईसोबत राहू लागला.  खरंतर वडील भारतातर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले खेळाडू !परंतु युवराजने मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे त्यांचा आणि युवराजचा अबोला अनेक वर्षे टिकून राहिला.  ते बहुदा खूप कडक असावेत.  क्रिकेट सोडून बाकी कोणताही खेळ युवराज ने खेळावा हे त्यांना मंजूर नव्हते, मित्रमंडळींबरोबर जास्त भटकणे सुद्धा त्यांना खपत नसावे.  या सर्वांमुळे कुठेतरी हा युवराज आपल्या वडिलांपासून मनानं आणि संगतीने दुरावला गेला. गेल्या आठवड्यात त्याच्या आईच्या मुलाखतीची काही क्षणचित्रे पाहायला मिळाली. त्यात युवराज फलंदाजीला आला की मी प्रत्यक्ष त्याची फलंदाजाची पहात नाही असं ती म्हणाली !  कारण मी जर त्याची फलंदाजी पाहायला लागले तो तात्काळ बाद होतो अशी त्या भोळ्या माऊलीची भाबडी समजूत!!

२००० सालच्या त्या स्वप्नवत आगमनानंतरसुद्धा युवराज भारतीय संघात कायमचा स्थिरावला असे नाही.  एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याचे स्थान जरी बऱ्यापैकी पक्के असले तरी कसोटी संघात मात्र त्याला सुरुवातीच्या काळात क्वचितच स्थान मिळाले.  मुलाखतीत बोलताना त्यानं ह्याचा उल्लेख केला.  त्यावेळच्या संघाच्या मधल्या फळीत राहुल, सचिन, गांगुली, लक्ष्मण यांच्यासारखे रथी-महारथी होते. त्यामुळे यातील कोणी दुखापतग्रस्त झाला तरच बाकीच्यांना संधी मिळायची.   ऐन उमेदीच्या काळात त्याला कसोटी संघाबाहेर राहावं लागलं.  

कालांतराने T20 प्रकारानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चंचूप्रवेश करून विविध आंतरराष्ट्रीय लीगद्वारे चांगलंच बस्तान बसविले.  २००७  सालच्या ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेतील दारुण पराभवानंतर भारतीय संघ लगेचच तीन-चार महिन्यांनी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या T20 सलामीच्या विश्वचषक स्पर्धेसाठी गेला होता.  एका विसरण्याजोग्या ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेनंतर या T20 विश्वचषक स्पर्धेत मात्र भारतानं अविस्मरणीय कामगिरी करत ह्या चषकावर आपले नाव कोरले.  या सर्व स्पर्धेत लक्षात राहण्यासारखा क्षण म्हणजे स्टुअर्ट ब्रॉडला युवराजने एका षटकांमध्ये ठोकलेले सहा षटकार!  आणि ह्याला कारणीभूत ठरलं ते इंग्लंडच्या एका खेळाडूनं या षटकाआधी युवराजला डिवचणं! या देखण्या पंजाबी तरुणाचे रक्त खवळले की काय होऊ शकतो याचा पुरावा साऱ्या विश्वाने त्यादिवशी अनुभवला.  भारताने हा सामना आणि मग त्या पुढे विश्वचषक स्पर्धा देखील जिंकली! 

२००८ साली आयपीएलचे भारतात आगमन झाले.  युवराज पंजाब किंग्स इलेव्हनतर्फे अधुनमधुन धमाकेदार खेळ्या खेळत राहिला! मग आली ती  २०११ साली भारतात आयोजित केली गेलेली विश्वचषक स्पर्धा! या स्पर्धेत युवराज पुर्ण बहरामध्ये होता! फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रांमध्ये त्याने आपल्या कर्तुत्वाची झलक दाखवत या स्पर्धेचा प्लेयर ऑफ द टुर्नामेँट हा किताब पटकावला! भारताला विश्वचषक स्पर्धा जिंकून देण्यात त्यानं मोलाचा वाटा दिला! त्यानंतर कसोटीतील मधल्या फळीतील ते चार दिग्गज एकामागून एक निवृत्त होत गेले. मधल्या फळीतील काही जागा रिकाम्या झाल्या.  परंतु सरासरीकडे लक्ष देत शिस्तबद्ध खेळ खेळण्याची सवय युवराजला कधीच अंगवळणी पडली नाही.  तो आपली जिंदगी जगला तो आपल्या मर्जीने! 

या आठवड्यात मुलाखतीत तो म्हणाला सुद्धा! "या कालावधीत माझी कसोटी सरासरी ही सदैव तीस-पस्तीसच्या आसपास घोटाळत राहिली! काश मलाही सरासरी पन्नाशीच्या आसपास नेता आली असती तर!!"  या सुमारासच नियतीने या युवराजच्या आयुष्याच्या कथेमध्ये एक एका कष्टदायी पर्वाची पेरणी केली होती.  या जिंदादिल पंजाबी युवकाला कर्करोगाने ग्रासले होते.  ही बातमी जाहीर होताच अवघा भारत हळहळला! परंतु हा युवराज कर्करोगासारख्या असाध्य रोगाला हार मानणाऱ्यातला नव्हता.  त्यानं  मोठ्या जिद्दीनं  या कर्करोगाला तोंड दिलं  आणि विजयी होऊनच तो बाहेर पडला. अमेरिकेतील इंडियानापोलिस येथे हे कर्करोगावर उपचार घेत असताना आपल्या मनस्थितीविषयी तो मुलाखतीत बोलत होता. अनिल कुंबळे म्हणाला की तिथं सुद्धा तो आपल्या या आधीच्या खेळांच्या चित्रफिती पहात होता.  बरं झालं की की पुन्हा एकदा पुनरागमन दणक्यात साजरं करायचं याची स्वप्न पाहत होता. या पठ्ठ्याने हे हे साध्य केलं सुद्धा! 

जरी त्याला आंतरराष्ट्रीय खेळामध्ये ते पुन्हा आपलं स्थान पक्क करता आलं नाही तरी तो आयपीएलमध्ये धडाकेबाज खेळ्या करत राहिला. यावर्षी मात्र सुरुवातीला त्याला कोणत्याच फ्रॅन्चाइसीने  आपल्या संघांमध्ये घेण्यास फारसा रस दाखवला नाही.  शेवटी मुंबई इंडियन्सने  त्याला एक करोड या किमतीवर आपल्या संघात घेतलं. सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये तो खेळला देखील!  परंतु तो सुरुवातीचा जोष, ती चमक कुठेतरी हरवली होती! हे जसं क्रिकेट रसिकांना समजलं तसं किंबहुना त्याहून आधीच युवराजला सुद्धा जाणवलं होतं.  एका मानी माणसाला आपल्या उतरणीला लागलेल्या कलेचं  सर्व जगासमोर प्रदर्शन करणं कदाचित खूपच जिव्हारी लागलं असावं! म्हणूनच त्यांना सन्मानपूर्वक निवृत्ती घेणे पत्कारला असावं !

युवराजने  मध्यंतरीच्या काळात विवाह केला आहे.  आता त्याचे वडिलांशी संबंधसुद्धा सुधारले आहेत! "क्रिकेटला देण्यासाठी माझ्याकडे अजून बरंच काही आहे.  मी आत्ताच निवृत्त झालो आहे.  काही काळ थोडी विश्रांती घेऊन मी कोणत्या ना कोणत्या रुपात तरी क्रिकेटला माझे योगदान देणे सुरू ठेवीन!"  युवराज म्हणाला!! आम्ही सर्व क्रिकेट रसिक त्याची आतुरतेने वाट पाहू!!

युवराज तु कायमचा लक्षात राहशील ते तुझ्या मैदानावरील राजेशाही वावरण्यामुळं,   गोलंदाजाने टाकलेला चेंडू येताना तुझ्या त्या डोळ्यातील  दिसणाऱ्या चमकीमुळे आणि एखादा षटकार ठोकतानादेखील चित्रकाराने आपल्या कुंचल्याचा एक हळुवार फटकारा मारावा त्याप्रमाणं जाणवणाऱ्या त्या नजाकतीमुळे!! 

युवराज लौकिकार्थानं जरी तुला महाराज बनता आलं नसलं तरी आम्हां साऱ्या क्रीडा रसिकांच्या हृदयावर मात्र तू नक्कीच साम्राज्य गाजवलं आणि गाजत राहशील! आयुष्यातील तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला आम्हां सर्वांच्या मनःपुर्वक शुभेच्छा !!

बुधवार, ५ जून, २०१९

सहकुटुंब भोजन !



काल निरर्थकपणे टीव्हीवर वाहिन्यांवर सर्फिंग करत असताना मी एका हॉलीवुड चित्रपटावर स्थिरावलो.  काही वेळानं तिथं एका कुटुंबाच्या सहभोजनाचा आनंददायी प्रसंग पहावयास मिळाला. एक आनंदी कुटुंब समोर ठेवलेल्या नानाविध चविष्ट पदार्थांनी युक्त अशा मेजवानीचा आस्वाद घेत होतं. वातावरण अत्यंत खेळीमेळीचं होतं.  आजोबा, आजी, त्यांची मुलं, नातवंडं अशी विविध वयोगटातील आनंदी माणसं एकत्रपणे त्या सणाच्या दिवशी मेजवानीचा आनंद लुटत होती.  पारंपरिक अमेरिकन कुटुंबात असा प्रसंग थँक्स गिविंग्जच्या दिवशी अनुभवायला मिळतो.  

हॉलिवूड चित्रपटात इटालियन, मेक्सिकन कुटुंबातसुद्धा अशा मेजवानीचा आनंद एकत्रपणे लुटणाऱ्या कुटुंबांचे चित्रीकरण आपल्याला आढळते.  आपल्याकडे सुद्धा अशा आनंदी प्रसंगाचं चित्रपटात केलेलं चित्रण आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळाला आहे.  "हम साथ साथ है",  "हम आपके है कौन!"  अशा सुरज बडजात्या निर्मित लांबलचक वाक्यभर शीर्षक असलेल्या चित्रपटात असे प्रसंग हमखास असु शकतात.  ह्या कुटुंबासोबत त्यांना त्यांच्या ताटात आग्रहाने विविध स्वादिष्ट पदार्थ वाढणारे त्यांचे वर्षानुवर्षे असणारे सेवकसुद्धा आपल्याला आढळतात. परंतु या व्यक्तींना नोकर म्हणून अजिबात संबोधले जात नाही, कुटुंबातील एका सदस्याप्रमाणेच त्यांना प्रेमाची वागणूक दिली जाते.  मराठी चित्रपटात, बकेटलिस्टमध्ये सुद्धा फारशा मोठ्या नव्हे परंतु एकत्र जेवणाऱ्या कुटुंबाचे चित्रण आढळते.  इथं फरक असा की माधुरी एकच भाजी मसाले आणि विविध जिन्नसांच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमधुन बनवताना आपल्याला आढळते.  इथं  नोकरवर्गाची उपस्थिती आपल्याला जाणवत नाही. 

चित्रपटातील कुटुंबाची एकत्रित जेवण घेण्याचे हे प्रसंग आपलं लक्ष मराठी कुटुंबातील एकत्र जेवणाच्या कालपरत्वे दुर्मिळ होत चाललेल्या परंपरेकडे वेधून घेतात. पुर्वी ज्याकाळी लोकांचे शिक्षण, व्यवसाय हे आवाक्यात होते, त्यावेळी सायंकाळच्या जेवणास लोक सर्व कुटुंबातील सदस्य घरी उपस्थित असत व एकत्रपणे जेवण घेणे हे काहीसे बंधनकारक असायचे. तिथं बहुदा कुटुंबप्रमुख अत्यंत गंभीर चेहरा करून बसत असावा.  आपल्याकडून कोणत्याही पदार्थांमध्ये त्रुटी तर राहिली नाही या शंकेने आणि त्याप्रती निर्माण झालेल्या भयाने वावरणारी गृहिणीसुद्धा असायची. कुटुंबातील बालकवर्ग आपण दिवसातील केलेल्या अनेक प्रमादांपैकी कोणता प्रमाद आपल्याला इथं बोलणी खायला लावु शकेल ह्याची भिती बाळगुन असावा.  एकंदरीत काहीसे भयप्रद वातावरण या जेवणाच्या टेबलावर असावे असा मला संशय आहे. 

कालांतराने लोकांच्या शाळा-कॉलेजांच्या आणि नोकरीच्या वेळा बदलल्या.  त्यामुळे दैनंदिन जीवनात एकत्र जेवणाला बसण्याची वेळ क्वचितच येऊ लागली.  सुसंवादाची एक हुकलेली संधी या एका चांगल्या परंपरेला हळूहळू तिलांजली देण्यास कारणीभूत ठरू लागली.  एकत्र जेवण घेण्याची सवय दैनंदिन जीवनात सुटल्याने सुट्टीच्या दिवशीसुद्धा शक्य असुनसुद्धा संपुर्ण कुटुंब एकत्रितपणे जेवणाचा आनंद घेताना दिसत नाही.  

यामागे नक्की कारणे काय असावीत? सद्यकालीन जगाच्या बहुतेक समस्यांमागे मोबाईलचा अतिवापर हे कारण असावे असं विधान सरसकटपणे केलं जातं. या धर्तीवर या परिस्थितीला म्हणजेच एकत्रितपणे कुटुंबाने जेवण न घेण्याच्या समस्येला मोबाईलचा अतिवापर काही प्रमाणात कारणीभूत आहे असे ढोबळमानाने विधान आपण करू शकतो.  परंतु या समस्येकडे काहीसे खोलवर जाऊन बघण्याची गरज आहे. एखाद्या प्रसंगात,  समारंभात व्यक्ती का सहभागी होते ह्याचं मुख्य कारण म्हणजे या सहभागामुळे काहीतरी एक आनंदी अनुभव मिळण्याची शक्यता त्या व्यक्तीला जाणवत असते! आता एकत्रित जेवण घेताना आनंदाचा कोणता अनुभव आपण सर्व व्यक्तींना मिळवून देत असतो हा प्रश्न सर्वांनी आपल्याला विचारणे आवश्यक आहे.  

कुटुंबप्रमुखाच्या दृष्टिकोनातून आपलं संपूर्ण कुटुंब एकत्र बसून जेवण घेत आहेत ही बाब आनंद देऊ शकते.  गृहिणीच्या दृष्टिने आपण मनापासून केलेल्या जेवणाचा आनंद आपल्या सर्व प्रिय व्यक्ती एकत्रितपणे बसुन घेत आहेत ही एक आनंददायी भावना या अनुभवातून मिळू शकते. जेवणातील एखादा पदार्थाची भट्टी जराशी सुद्धा चुकली तरी जितक्या तत्परतेने सदस्य आपली प्रतिक्रिया नोंदवितात त्याच तत्परतेने भट्टी जमुन आलेल्या पदार्थाचं कौतुक सुद्धा करणं गृहिणीला मोठी स्फुर्ती देऊ शकतं !  कुटुंबातील मुलांच्या दृष्टीनं मात्र हा प्रसंग ह्या काळातसुद्धा बऱ्याच घरांत धोक्याची नांदी देणारा असतो.  आईवडील याप्रसंगी आपण केलेल्या चुकांचा पाढा आपल्यासमोर वाचून दाखवणार ही सुप्त भिती  त्यांच्या मनात असू शकते.  भोजनप्रसंगी टीव्ही चालू ठेवून भोजन करण्याची पद्धत असेल तर संवादाच्या शक्यतेला अजून एक अडथळा निर्माण होतो.  या सर्व घटकांमध्ये माझ्यामते तरी कुटुंब प्रमुखाची महत्त्वाची जबाबदारी आहे.  कुटूंबप्रमुख म्हणजे पुरुष असे मी  गृहीत धरले आहे.  आता या गृहीतकामुळे माझा निषेध होण्याची शक्यता आहे! गृहिणीने जेवणाआधीचे दोन ते तीन तास जेवण बनवण्यात घालविले असल्याने जेवण होईस्तोवर ती हुश्श म्हणून सुटकेचा निश्वास टाकत असते!  त्यामुळे एकत्रितपणे जेवण घेताना संवाद सुरू ठेवण्याची तिच्याकडून अपेक्षा करणे हे काहीसे चुकीचे ठरते.  तिचं लक्ष बऱ्याच प्रमाणात आपण बनविलेल्या पदार्थांना सर्वांचा प्रतिसाद कसा मिळत आहे याकडं लागण्याची शक्यता आहे! कुटुंबातील मुलं ही नवीन पिढीची प्रतिनिधी आहेत.  संवादाचा आरंभ आपणसुद्धा करू शकतो या संकल्पनेची नवीन पिढीला जाणीव नाही. त्यांच्या मते आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे ही इतकी संवादाची त्यांच्याकडून कुटुंबातील बाकीच्या सदस्यांची अपेक्षा असावी. त्यामुळे आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन ही मंडळी आपले लक्ष गॅझेटकडे वळवितात. अशावेळी त्यांना आणि गृहिणीला संवादात सहभागी करून घेण्यासाठी कुटुंब प्रमुखाने काहीतरी मनोरंजक विषय चर्चेसाठी घेणे आवश्यक आहे. चर्चेमध्ये हे बाकीच्या सदस्यांना त्यांची मते विचारणे, ते मते मांडत असताना त्यांच्याकडे लक्ष देणे अशा वर्तवणुकीची कुटुंबप्रमुखाकडून अपेक्षा आहे.  कालांतरानं बाकीची मंडळी सुद्धा ह्यात पुढाकार घेतील. कुटुंबातील सदस्यांमधील बंध अतूट ठेवण्यासाठी एकत्रितपणे भोजन करणे हा एक सहज उपलब्ध असणारा मार्ग आहे, ती आपली परंपरा आहे. तिचं पालन जमेल तितकं आपण करुयात हेच सांगणं !

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...