मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

गुरुवार, १८ जुलै, २०१९

आमची सत्यनारायण पुजा !



आमच्या आजोबांनी म्हणजेच भाऊंनी १९६० च्या दशकामध्ये आमच्या वसईच्या घरी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पुजा घालण्याची प्रथा सुरु केली. भाऊ १९७२ साली गेल्यानंतर त्यांच्या मुलांनी, सुनांनी ही प्रथा आजतागायत वसईच्या घरी सुरू ठेवली आहे.  

सत्यनारायणाची पुजा गावांमध्ये हे अत्यंत साध्या प्रकारे केली जाते. हे पुजेचे मूळ रुप, हा साधेपणा अजुनही आमच्या घरातील पुजेमध्ये टिकून राहिला आहे.  ऋतूकालानुसार उपलब्ध असणारी फुले, फळे, दुर्वा सत्यनारायण देवतेला वाहून शिऱ्याचा प्रसाद बनवावा आणि आप्तेष्टांना सोबत घेऊन सत्यनारायण देवतेचे  पूजन करावे.  ही सत्यनारायणदेवतेच्या पुजेमागची मूळ संकल्पना! 

ज्यावेळी भाऊंनी ही पुजा सुरू केली त्यावेळी पाटील कुटुंबीय एकत्र घट्ट विणले गेले होते.  शेती आणि शेतीला पूरक असे उद्योग यावरच संपूर्ण पाटील कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालत असे.  काळानुसार पाटील कुटुंबीयांनी विविध नोकरी, व्यवसायक्षेत्रात पदार्पण केले. दैनंदिन जीवनातील एकमेकांशी येणारा संपर्क कमी झाला.  या पुजेच्या निमित्ताने सर्वांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट, निवांतपणे काही क्षण गप्पा मारणे हेसुद्धा या गुरुपौर्णिमेच्या पूजेनिमित्त साध्य होते. 

या पूजेमध्ये बऱ्याचशा गोष्टी अजूनही पूर्वापार जशाच्या तशा चालत आल्या आहेत. वाडीतून केळीची छोटी रोपे आणून चौरंगाभोवती मखर सजविणे, वाडीतील तुळस, दुर्वा इत्यादी पूजेसाठी आवश्यक सामुग्री गोळा करणे या गोष्टी अजूनही ही त्याच श्रद्धेने पार पाडल्या जातात. गावातील जुनी मंडळी अजूनही मोठ्या श्रद्धेने सत्यनारायणाच्या पूजेला आपली हजेरी लावतात,  जुन्या आठवणी निघतात! या जुन्या आठवणी ऐकून नेहमीप्रमाणे आम्ही मंडळी खुश होतो. 

खरंतर हा मोसम खूप पावसाचा! बाकी गावकरी मंडळीपासून आम्ही एका पाण्याच्या ओढ्याने (स्थानिक भाषेत वळ) वेगळे काहीसे वेगळे पडलो आहोत. सर्व मंडळी पुर्वी या पाण्यातून बिनधास्तपणे पूजेसाठी अथवा गणपतीमध्ये जुन्या घरी गणपती दर्शनासाठी येत जात करीत. परंतु आता या ओढ्यातून मार्गक्रमण करण्याची इच्छाशक्ती विविध कारणांमुळे नाही. 

केवळ पाटील कुटुंबीयच नव्हेतर आजीच्या माहेरचे घरत कुटुंबीय, गावातील घरत, वर्तक कुटुंबीय,  मोठ्याआईच्या माहेरचे वर्तक कुटुंबीय ही सारी मंडळी वर्षानुवर्षे पावसाचा मुकाबला करीत सत्यनारायणाच्या पूजेला येत असतात. या साऱ्यांना भेटून खूप बरं वाटत असतं! काळाच्या ओघात यातील काही जुनी मंडळी आपल्यातून निघून गेली,  त्यांच्या आठवणीसुद्धा या प्रसंगाने पुन्हा एकदा निघतात ! पुजा करण्यासाठी किशोर भटजी आले होते!  या किशोरभटजींचे कुटुंबीय पाटील कुटुंबीयांचे परंपरागत पौरोहित्य सांभाळणारे!  हाही भुतकाळाशी जोडणारा एक दुवा! वयोमानापरत्वे बेन, जिजी ह्यांचं मुंबईहुन येणं कमी झालं आहे ! 

उपस्थित मंडळींशी बोलताना एक गोष्ट मात्र प्रकर्षानं जाणवली.  उपस्थितांमध्ये हे बहुतांश जुनी मंडळी होती. नवीन पिढीतील बरेचजण विविध कारणांमुळे पूजेला  येऊ शकले नाहीत.  परंपरेच्या हातातून निसटून जाऊ पाहणाऱ्या अनेक अनमोल दुव्यांपैकी हाही एक दुवा ठरणार नाही ना ही एक नकोशी वाटणारी भावना या निमित्ताने जाणवून गेली. 

जितकं जमेल तितका हा पुजेचा वारसा टिकवावा हा विचार मनात नक्कीच आहे! 

श्री सत्यनारायणदेवताय नमः !




1 टिप्पणी:

  1. सत्यनारायण पूजा हा आपल्या सारख्या आस्तिक लोकांचा श्रद्धेचा किंवा हल्ली काही लोकांचा fashion चा भाग झालाय.
    मी पूर्वी बाबांसोबत, आता एकटा जेव्हा पूजेला जातो. तेव्हा अनेक गमतीजमती पहायला मिळतात. पूजेच कळवायलाच जेव्हा लोक येतात तेव्हापासून लोकांचं फेसरीडिंग करून मी अनुभवलं आहे.
    काही जण
    १)आपलं नेहमी प्रमाणे पूजा घालायची आहे असे सांगत येतात- यात बऱ्याचदा आहे ते चालू ठेवायचं हा उद्देश असतो.
    २) आपली दरवर्षी 2/3/4शनिवारी पूजा असते, आपलं 10 वा सुरू करू - यात आस्था असते.
    ३) यावर्षी पूजा करायचं ठरतंय. कधी करून टाकूया. या रविवारी बघा अगदी तास भरात चालेल - हे नक्कीच लोकांना बोलावून घरात नवीन केल्याचं दर्शन दाखवणं असत.

    काहींकडे दिलेल्या यादीतले अर्धे समान नसते, आपण पोहोचतो तेव्हा अंघोळ बाकी असते, सामान कुठे कुठे ठेवले त्याची शोधाशोध सुरू असते, आंब्याचे टहाळ नसतात. मखर तर दूर की बात.
    काहींकडे अगदी मखर बांधून,ताटात हळद कुंकू पासून सगळं व्यवस्थित काढून, तेला/तुपाचा दिवा भरून ठेवलेला असतो.


    श्रद्धेने करणारा असतो तो भले समान थोडं आणतो पण देवाला आणायचं म्हणजे आपण जे खाऊ शकतो तसे चांगले आणतो.
    कित्येक श्रीमंत पाहिले आहेत मी जे सर्वात स्वस्त असते ते टोस्ट लागलेले तांदूळ, खडे वाले गहू, शेंबलेली तुळस, अगदी ८-१० फुल घेऊन आलेले असतात.


    पूजा काय चालू आहे हे कित्येक जण बघत ही नाही. बाईका जेवणात बिझी, बसलेला आलेल्याना हे आल का ते आलं का बघण्यात गुंग.
    काही मात्र बसलेले अगदी आस्थेने जे सांगू ते करत करतात

    आमच्याकडे जेव्हा कोणी येते तेव्हा मी त्यांना हेच सांगतो, सामान किती ते महत्वाचं नाही तुमची आस्था किती दाखवता ते महत्वाचं

    उत्तर द्याहटवा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...