मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, २१ नोव्हेंबर, २०१५

अश्रू - वि. स. खांडेकर

Netbhet.com
पुस्तक प्रदर्शनात घेतलेल्या तीन पुस्तकांपैकी वि. स. खांडेकरांची अश्रू ही कादंबरी एक. कथा म्हणून बघितली तर साधीसुधी. एका आदर्शवादी शिक्षकाचा १९५० च्या आसपास तुटपुंज्या पगारात संसार चालविण्यासाठी, आपल्या मुलाचा एक साधा ३० रुपयाची सायकल आणून देण्याचा हट्ट पुरविण्यासाठी आणि आपल्या बहिणीच्या लग्नासाठी २००० रुपये हुंडा जमा करण्यासाठी चाललेला संघर्ष हे वरवर पाहता दिसणारे कथेचे सार! खांडेकर आपल्या मराठी भाषेच्या वैभवाची खैर करताना आढळतात
वानगीदाखल 'रात्र तलम चंदेरी  वस्त्र नेसून विश्वाच्या वीणेवर विश्रांतीची शांत रागिणी आळवू लागली होती . तिच्या एकेक मध्यम  स्वराची एकेक सुंदर तारका होत होती'.काळानुसार मराठी भाषेत कसकसे बदल होत गेले हा संशोधनाचा विषय होऊ शकतो आणि १९५० च्या दशकातील भाषेचं प्रतिनिधित्व करणारं म्हणून ह्या पुस्तकाची निवड होऊ  शकते

कथेतील  महत्वाचे पात्र नायकाच्या पत्नीचे. ती जरी नायकाची पत्नी असली तरी नायिका नाही. ह्या एकत्र कुटुंबात सर्वांच्या जबाबदाऱ्या पार पाडत आयुष्य व्यतित करणे हीच तिची कहाणी आहे, हेच तिचे विश्व आहे. 
कहाणीत खांडेकरांनी उमेच्या मनात शंकरविषयी असलेल्या प्रितीभावनेचे सुरेख वर्णन केलं आहे. कथेतील उमेची प्रिती जशी मूक आहे तशीच खांडेकर ह्या भावनेसाठी वापरलेली भाषा सुद्धा सूचक आहे. 
बाह्य जगाच्या दृष्टीने अगदी सामान्य असलेल्या आपल्या पतीला उमा मात्र अगदी मनापासून पूजत असते. आपल्याच वाट्याला आर्थिक तंगी का यावी असला प्रश्न तिला पडत नाही. समजा हीच परिस्थिती आजच्या युगातील एखाद्या जोडप्याच्या वाट्याला आली असती तर त्या पत्नीला आपल्या पतीविषयी असे निरामय प्रेम जपणे शक्य झाले असते का?
ह्याचं उत्तर नाही असण्याचीच शक्यता जास्त आहे. आणि ह्याचे मुख्य कारण म्हणजे हल्लीच्या युगात स्त्रीचे विश्व उमाइतके मर्यादित राहिलं नाही. ते खूप व्यापक बनलं आहे. ह्या स्त्रीच्या मनात सुरु असणाऱ्या विचारचक्राची वैविधता बरीच व्यापक बनली आहे. जीवनात येणाऱ्या विविधांगी अनुभवामुळे व्यापक बनणारे हे विचारचक्र ह्या आधुनिक स्त्रीला मानसिक समाधानाच्या उंच पातळ्यांवर नेऊन ठेवते आणि अशा प्रकारे मानसिक समाधान अनुभवणारी स्त्री ज्यावेळी आपल्या पतीशी संवाद साधते त्यावेळी जर तिचा वारंवार अपेक्षाभंग होत असेल तर ती हळूहळू स्वतःभोवती एक कोश विणू लागते आणि मग तारा कधी जुळल्याच जात नाहीत. हल्लीच्या युगातील आर्थिकदृष्ट्या गांजलेल्या पुरुषास ही विवंचना बाजूला ठेवून आयुष्यातील बाकीच्या बाबींच्या जोरावर आपल्या पत्नीशी चांगल्या प्रकारे सुसंवाद साधणे कितपत शक्य आहे?

ह्या पुस्तकाच्या आरंभी खांडेकरांनी प्रस्तावनासदृश्य 'दोन शब्द' लिहिले आहेत आणि शेवटी ह्या पुस्तकाची 'पार्श्वभूमी' लिहिली आहेत
'दोन शब्द' मधून खांडेकरांनी आपल्या साहित्यिक कारकिर्दीचा आढावा घेतला आहे. १९३० साली लिहिलेल्या "हृदयाची हाक" ह्या कादंबरीला त्यांना रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. त्यानंतर त्यांच्या लेखन कर्तृत्वाचा आलेख उंचावतच राहिला होता. पण काही कालावधीनंतर ते काहीसे सुप्तावस्थेत गेले. अश्रू ह्या कादंबरीआधीची दहा वर्षे त्यांची कोणतीही कादंबरी प्रकाशित झाली नाही. ह्या सर्वांची मीमांसा त्यांनी ह्या "दोन शब्द" ह्या प्रस्तावनेत केली आहे

"पार्श्वभूमी" मध्ये ते १९०० सालच्या आसपास हरिभाऊ आपटे ह्यांनी वर्णिलेल्या मध्यमवर्गाचा संदर्भ देतात. आणि ती परिस्थिती १९५० सालापेक्षा कशी वेगळी होती ह्याचे पृथ्थकरण करतात. गेल्या शंभर वर्षात मागे वळून पाहिले असता जीवनात खूपच स्थित्यंतरे झाली आहेत असं त्यांना जाणवलं. मला ही एक महत्वाची बाब वाटली. हल्लीची म्हणजे २०१५ सालची मंडळी सुद्धा आमच्या लहानपणी असं होतं तसं होतं असे म्हणत असतात. अगदी नेमकी तीच भावना १९५० च्या सुमारास खांडेकरांच्या मनात सुद्धा होती. म्हणजे फारसे काही चिंतेचे कारण नाही हो मंडळी

खांडेकरांच्या नजरेतून गेल्या काही वर्षात यंत्रयुगाने सामाजिक जीवन व्यापून टाकलं. ह्या यंत्रयुगाने सामान्य माणसांच्या जीवनात ज्याप्रमाणे सुखसोयींच्या संधी उपलब्ध केल्या त्याचप्रमाणे अनेक पटींनी क्लिष्टताही निर्माण केली. खांडेकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर "सुंदर फुलपाखरांच्या रंगीबेरंगी पंखावरून भयंकर साथीचे जंतू जिकडे तिकडे पसरावेत, तसे ह्या युगाचे कर्तुत्व विचारवंतांना वाटू लागलं आहेहे युग ज्याप्रमाणे कॅन्सरसारख्या असाध्य रोगांवर उपाय आणते त्याचप्रमाणे अणुबॉम्बची विध्वंसकतासुद्धा हे युग निर्माण करते. पुन्हा एकदा यंत्रयुगाविषयी खांडेकरांनी जी भावना व्यक्त केली आहे नेमकी तीच आज संगणकयुगाविषयी बाळगून आहोत. यंत्रयुग झालं , आज संगणकयुग बहुदा आणखी काही वर्षांनी यंत्रमानव आणि संगणक ह्यांचं एक संयुक्त युग असेल आणि त्यात माणसे कुठेतरी जीव मुठीत धरून हीच भीती व्यक्त करतील. कालाय तस्मे नमः!! 

गेल्या पन्नास वर्षात दिसलेला अजून एक फरक खांडेकर मांडतात. टिळक आगरकरांनी जो स्वार्थत्यागाचा आणि ध्येयवादाचा कित्ता घालून दिला तो महाराष्ट्रातील पुढल्या दोन पिढ्यांना पुरला. नव्या इंग्रजी शिक्षणाचे फायदे जुन्या विद्येकडून तिकडे वळलेल्या मध्यमवर्गीयांच्या पदरात पडले. त्यामुळे बराच काळ आदर्शवाद बाळगताना सुद्धा आर्थिक विवंचनेचे सावट मध्यमवर्गीयांवर कधी आलेच नाही. पण पहिल्या महायुद्धानंतर मात्र परिस्थिती पालटली. आणि मग त्यानंतर गांधींजीचा उदय झाला. मध्यमवर्गीयांचा ध्येयवाद अजूनही काही प्रमाणात शाबूत राहिला होता. पण इंग्रजी अंमल जसजसा सुस्थिर होऊ लागला तसतसा मध्यमवर्गीयांचा एकजिनसीपणा मोडला. त्यांच्या परंपरागत निष्ठा द्विधा झाल्या. समाजातील एक थर आर्थिक ध्येयांच्यामागे धावताना दिसला

खांडेकरांची विश्लेषणशक्ती अत्यंत खोलवर आहे ह्याची प्रचीती ह्या पार्श्वभूमी लेखनातून वारंवार येत राहते. पैशाची ऊब नसली की माणसाच्या जीवनावर एक प्रकारची प्रेतकळा येते.खालच्या वर्गातील लोकांची पैशाच्या अभावी जी कुतरओढ होते ती शारीरिक गरजांची असते; ह्या उलट पैशाअभावी मध्यमवर्गीयाला मात्र भावनिक आणि वैचारिक कुतरओढीला सामोरे जावे लागते. अगदी खालच्या वर्गाने परंपरेने आणि परिस्थितीने त्याच्या इच्छा, वासना आणि अपेक्षा मर्यादित केलेल्या असतात. त्यामुळे अपेक्षाभंगाचे दुःख मध्यमवर्गाइतके ह्या वर्गाच्या वाट्याला येत नाही
जवळजवळ वीस पाने खांडेकर आपल्याला ह्या अगदी खोलवर विश्लेषणाने खिळवून ठेवतात. अखेरीस ते एक महत्वाचा मुद्दा मांडतात
जगाच्या दृष्टीने अतिशय सामान्य व्यक्तीचे चित्र रंगवणे कितपत महत्वपूर्ण आहे? त्याच वेळी त्यांचे दुसरे मन त्यांना उत्तर देई, "विसाव्या शतकानं दिलेली सर्वश्रेष्ठ देणगी म्हणजे त्याने सर्वसामान्य माणसाला दिलेलं महत्त्व!" असामान्यत्वाचे आकर्षण जगाला वाटावे हे स्वाभाविक आहे. पण जीवनातील अधिक भाग कुणाचा असतो? मुठभर असामान्यांचा की शेकडा नव्व्याण्णव असलेल्या सामान्यांचा? आजवर राजांनी, वीरांनी,संतांनी, तत्वज्ञानी लोकांनी, कवींनी आणि शास्त्रज्ञांनी ह्या सामान्य माणसाला बोलू दिले नव्हते पण आज ह्या सामान्य माणसाची वेळ आली आहे. सामान्य माणूस भलेही काही असामान्य करत नसेल पण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा चुकीचे पाऊल न उचलण्याचा पराकोटीचा संयम हा मध्यमवर्गीय दाखवतो आणि तेच ह्याचे असामान्यत्व!!

खरंतर केवळ कथा वाचून मी ज्यावेळी पुस्तक बाजूला ठेवलं तेव्हा केवळ भाषा वैभवाच्या शाही प्रदर्शनाने मी सुखावून गेलो होतो. कथेचा अचानक झालेला शेवट मला काहीसा रुचला नव्हता. पण दुसऱ्यांदा पुस्तक जेव्हा हाती घेतलं तेव्हा "दोन शब्द" आणि "पार्श्वभूमी" नजरेस पडलं आणि मग ह्या पुस्तकाकडे पाहण्याचा एक दुसरा दृष्टीकोन मिळाला. कथेतील नायकाचं जे व्यक्तिमत्व आहे , त्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंची उलगड खांडेकरांच्या ह्या मनोगतातून मिळाली. पुस्तकं कसं वाचावं हे ह्या खांडेकरांनी समजावून दिलं. घाईघाईने  पाने नजरेआड करणे म्हणजे पुस्तक वाचणे नव्हे हे मला जाणवलं. खांडेकरांसारखा व्यासंगी लेखक असेल तर पुस्तक कसं अगदी मन लावून वाचावं हे मी शिकलो! मराठी भाषेतील ह्या श्रेष्ठ साहित्यिकाचे धन्यवाद! नाताळच्या सुट्टीत ह्या पुस्तकाचे अजून एक वाचन करावे असं म्हणतोय, अजून बरेच पैलू उलगडतील हे नक्की!! 

बुधवार, ४ नोव्हेंबर, २०१५

हूल - भालचंद्र नेमाडे


सद्यकालीन मनुष्यास अतिशय वेगवान जीवन जगण्याची सवय लागली आहे. एखादा तास, एखादा दिवस समजा आपल्या मनासारखं घडलं नाही तर आपण प्रचंड अस्वस्थ होतो. हे मनासारखं म्हणजे नक्की काय ह्याची समज आपणास असतेच असेही नाही. पण आपल्याला गतीमय जीवन जगायचं व्यसन लागलं आहे. अशावेळी मोठ्या शहराच्या बाहेरील  कसे जीवन जगत असतात ह्याचा आपल्यास पुर्णपणे विसर पडलेला असतो किंबहुना त्याची जाणीव आपणास नसते आणि अशाप्रकारे शांतपणे आयुष्य  जगण्याच्या लोकांच्या क्षमतेविषयी आपलं अज्ञान असतं. 
शनिवारी पत्नीसोबत शॉपिंगला गेलो असताना प्रत्येक विक्रेत्यापाशी तिचा चोखंदळपणा पाहून व्यक्त होणाऱ्या माझ्या नाराजीविषयी तात्पुरता उपाय म्हणून मला पुस्तकांच्या स्टॉलवर पिटाळण्यात आलं. तिथं तासभर घालवून मी तीन पुस्तकं घेतली त्यातील हूल हे पहिलं! 
पुस्तकाची कथा चांगदेव ह्या नायकाभोवती फिरते. पदव्युत्तर शिक्षण घेऊन इंग्रजी विषयाचा प्राध्यापक बनलेला चांगदेव मुंबईतील जीवनाला कंटाळून एका गावातील कॉलेजात नोकरी स्वीकारतो. ह्यात बराच आदर्शवाद असतो. आपल्या देशास स्वातंत्र्य मिळाले आहे, आपल्याकडे योग्य ते शिक्षण आहे तर मग आपण ह्या देशात कोठेही नोकरी करू शकतो हा तो आदर्शवाद! अडीचशे रुपये पगार - पगार मिळविण्यासाठी सर्व काही सहन करावी लागण्याची मनोवृत्तीअधूनमधून चांगदेवाला मनाला लागून राहत असते. पगार कितीही वाढला तरी हल्लीच्या युगातसुद्धा आपल्या सर्वांना हीच भावना सलत असते ही मात्र खरी गोष्ट!  

सुरुवातीलाच ह्या आदर्शवादाला तडा देणाऱ्या घटना घडत जातात. लेक्चरच्या वेळापत्रकाची आखणी करताना पर्यवेक्षक स्वतःसाठी आणि स्त्री प्राध्यापकांसाठी सोयीच्या वेळा आखून घेतो तर चांगदेवला सकाळचे पहिली आणि सायंकाळची सर्वात शेवटची तासिका देण्यात येते. एखाद्या विषयासाठी पुस्तके लावताना सुद्धा खास ओळखीतील प्राध्यापकांची पुस्तके अभ्यासक्रमाला लावली जातात. बदमाश मुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या वर्गावरील तासिका चांगदेवला दिल्या जातात. मुलांना मार्क्स मिळायला सोपे जावे म्हणून नोट्स देण्यास चांगदेवचा तत्वतः विरोध असतो. वर्गात फारच थोडी मुले अशी असतात ज्यांना शिकविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमात रस असतो. बाकीची सर्व मुले वर्गात प्रचंड गोंधळ करीत असतात. अगदी चांगदेवला पाठमोरा असताना डस्टर मारण्याइतपत त्यांची मजल जाते. मग मात्र चांगदेव आक्रमक रूप धारण करतो. त्या आणि अन्य मस्तीखोर मुलांस तो चांगलाच चोप देतो. ह्यात गुंड म्हणून ज्याची ख्याती आहे अशा गुंड मुलास सुद्धा तो सोडत नाही
हा गुंड मुलगा कॉलेज बाहेर चांगदेवची वाट पाहत राहतो. बाकीचे प्राध्यापक त्याला सोबत देण्याची इच्छा व्यक्त करतात. पण चांगदेव एकटा जातो आणि मग तो गुंड मुलगा अवसान न दाखवता आल्याने खजील होऊन परततो

अविवाहित पुरुषांना गावात खोली देण्यास तयार नसतात. गावात अविवाहित मुलींचे प्रमाण जास्त असल्याने त्यांच्या पालकांना काळजी वाटत असते आणि त्याचप्रमाणे पाण्याची प्रचंड टंचाई असल्याने आंघोळीला एक अधिक माणूस आल्यास प्रश्न गंभीर होऊ शकतो अशीही मनोधारणा असते. त्यामुळे लॉजवर गायकवाड नावाच्या माणसासोबत राहण्याशिवाय चांगदेव कडे दुसरा पर्याय नसतो. गायकवाड म्हणजे सिगारेटची चिमणी असते. वयाच्या तिशीकडे पोहोचत आल्याने त्याच्या लग्नाचा प्रश्न गहिरा होत चाललेला असतो. गायकवाड आर्थिकदृष्ट्या संपन्न असतो म्हणजे चांगला बारा हजाराची शिल्लक बँकेत जमा असते! ह्या वरून आणि अडीचशे रुपये पगारावरून हा काळ बराच जुना असल्याची जाणीव आपणास होते. प्राध्यापक लोक त्यांना कॉलेजातील मुलींशी संपर्काची संधी मिळत असल्याने सुदैवी असे ह्या गायकवाडचे म्हणणे असते


 
पुस्तकात मग कॉलेजातील राजकारणाचे वर्णन येतं. प्राचार्य तसे चांगल्या स्वभावाचे असतात. विद्यार्थी वर्गाची सबुरीने घेण्याचं त्यांचं धोरण असतं. शबीर नावाचा सहप्राध्यापक मग त्याला काही महत्वाचे सल्ले देतो. मुलांना आपल्याविषयी आपुलकी वाटली पाहिजे असा सल्ला देतो. सतत कडक राहून परिस्थिती सुधारणार नाही ह्याची जाणीव तो चांगदेवाला करून देतो. काही अंशी चांगदेवाला हा सल्ला पटतो. अडीचशे रुपये पगारावर महिन्याचा खर्च चालवणे चांगदेवाला कठीण जात असल्याने तो केवळ दोन शर्टावर दिवस काढत असतो. ही गोष्ट कॉलेजात कशी चेष्टेचा विषय बनली आहे ह्याची जाणीव शबीर त्याला करून देतो. पैशाची अडचण असली तरी उधारीवर कपडे खरेदी करायला काही हरकत नाही असाही सल्ला देतो. केवळ सल्ला देऊन थांबत नाही तर आपल्या ओळखीवर चांगदेवाला उधारीवर कपडे विकत सुद्धा घेऊन देतो. प्राध्यापकाला केवळ अडीचशे रुपये पगार असल्याने त्यांच्यावर अशी परिस्थिती उदभवणार ह्याची गावातल्या लोकांना जाणीव असतेच त्यामुळे उगाचच औपचारीकतेचा बुरखा पांघरण्यात काहीही अर्थ नाही ह्याची शबीर त्याला जाणीव करून देतो.  

पावसाचा अभाव असल्याने गावातील अस्वच्छतेचे वर्णन अधूनमधून येत राहते. अगदी अंगावर येण्याइतपत ते स्पष्टपणे नेमाडे ह्यांनी मांडले आहे. गावातील लोकांचे बोलणेसुद्धा अगदी थेट! मुलींची प्रकरणे वगैरे प्रकार अगदी भीडभाड न ठेवता स्पष्ट शब्दात मांडणारे! चांगदेव प्रमाणे आपल्याला सुद्धा मग ह्या भाषेची हळूहळू सवय होऊ लागते.
शारंगदेव नावाचे ज्येष्ठ प्राध्यापक असतात. ते एका रविवारी चांगदेवाला जेवावयास घरी बोलावतात. सुग्रास जेवणाने चांगदेव सुखावतो तर त्यांची पत्नी विमा पॉलिसीत्याच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न करते. खाल्ल्या अन्नाची भीडभाड न बाळगता तो स्पष्टपणे आपल्या आर्थिक स्थितीचे कारण पुढे करून नकार देतो. पुढे हे प्रकरण कॉलेजात बराच काळ चघळले जाते. चांगदेवाला ह्याचे परिणाम भोगावे लागतील असेही बाकीचे सहकारी त्याला सांगतात. 

पवार हा चांगला सहकारी चांगदेवाला भेटतो. चांगदेव मध्ये आजारी पडल्यावर मात्र तो बरीच खटपट करून त्याला आपल्यासोबत राहायला आणतो. त्याच्या सोबत त्याची म्हातारी आई असते. ह्याचेही लग्न जमले नसते त्यामुळे आई बरीच काळजीत असते आणि चांगदेवने ह्यात पवारला मदत करावी अशी तिची अपेक्षा असते. एका स्थळात चांगदेव पुढाकार घेतो सुद्धा! पण वधुपक्ष खूपच चिकित्सक निघतो. पवारच्या पूर्वपिढ्यांची शहानिशा करण्यात त्यांना खूपच रस असतो आणि त्यात खात्रीलायक माहिती न आढळण्याने ते पवारच्या गावापर्यंत चौकशी करत पोहोचतात. पवारच्या भावाला ही गोष्ट फारच अपमानस्पद वाटते आणि मग तो सुद्धा हुंड्याची मागणी पुढे करतो आणि मग लग्न मोडते.

मधून झोपे प्रकरण सुद्धा उद्भवते. हा इसम आपल्या शिकवणीला येणाऱ्या मुलीशीच लग्न करून मोकळा झालेला असतो. त्याची मनोवृत्ती अगदी वेगळ्या प्रकारची असल्याने तो चांगदेवाला सतत त्याचप्रकारचे सल्ले देत असतो. स्त्रीमुक्तीवाल्यांच्या हातात हा झोपे सापडला तर त्याचे खरे नाही
 
चांगदेवला एकटेपण खायला उठले असते. आणि मग त्याची भेट सावनुर भगिनीशी होते. ह्या भगिनीतील पारुशी चांगदेवचे सुत जुळू लागते.  गावात आलेला अविवाहित प्राध्यापक एका वर्षापेक्षा जास्त एकटा राहू शकत नाही हा आपला सिद्धांत खरा ठरल्यामुळे त्याच्या सहकाऱ्यांना आणि गायकवाडला बरे वाटते. पारू काहीशी महात्वाकांशी असते. ह्या असल्या छोट्या गावापेक्षा चांगदेवने मोठ्या गावात नोकरी शोधून चांगल्या भवितव्याचा शोध घ्यावा असे ती चांगदेवला सुचवते. एव्हाना स्थिरावत आलेला चांगदेव स्त्रीहट्टापुढे नामोहरम होऊन सर्वत्र अर्ज करण्यास सुरुवात करतो. त्याच्यात अजूनही शिल्लक असलेला आदर्शवाद त्याला आपण बाहेर नोकरी शोधत आहोत हे सर्वांना उघडपणे सांगण्यास उदयुक्त करतो. पण बाहेर सुद्धा परिस्थिती फारशी चांगली नसते ह्याची जाणीव त्याला होत राहते. एक वेळ तर अशी येते की न घर का न घाट का अशी त्याची स्थिती होईल का अशी शंका निर्माण होते. शेवटी सुदैवाने त्याला नोकरी मिळते पण तोवर महत्वाकांक्षी पारू हवाई सुंदरीचा ध्यास घेऊन त्याची परीक्षा देऊन आलेली असते. त्यामुळे हे प्रकरण असेच अर्धवट सोडून चांगदेव नव्या नोकरीच्या गावी निघतो. पुन्हा एकदा स्थिर आयुष्याच्या शोधात!

एका पूर्णपणे वेगळ्या विश्वात नेमाडे आपल्याला फिरवून आणतात. ह्या विश्वात अजिबात गती नाही. नेमाडे ह्यांनी स्वतःच्या अथवा त्यांच्या परिचयातील कोण्या माणसाच्या अनुभवावरून ही कथा लिहिली का हे समजावयास वाव नाही. कथेच्या शेवटात सुद्धा ठोस असे काही घडत नाही. नायक थोड्या कमी पगाराच्या नोकरीवर दुसऱ्या गावात निघून जातो. जिच्यासाठी ही सारी धडपड केली ते पारू प्रकरण सुद्धा अपूर्णच राहते.  चांगदेवचे आपल्या कुटुंबापासून पूर्णपणे अलिप्त राहणे ह्याचा उलगडा मला झाला नाही. पुस्तकाच्या पहिल्या पानावर चांगदेव चतुष्टय :२ असे लिहिले असल्याने बहुदा ह्याचा पहिला भाग वगैरे असावा असे वाटते

आपण आयुष्य "अर्थ" पूर्ण बनविण्याचा इतका आटोकाट प्रयत्न करीत असताना आपल्या भोवताली अशी अनेक माणसे असे आपल्या दृष्टीने "अर्थ" हीन जीवन जगत असतात आणि त्यातही समाधान मानून घेत राहतात ही जाणीव हे पुस्तक अधोरेखित करते. हे पुस्तक एकदा घाई घाईत वाचून काढलं आणि ही पोस्ट लिहिली. आता एकदा दिवाळीच्या सुट्टीत जर सवडीने वाचून काढायचं

आधुनिक काळात जीवनानुभवाच्या अगदी मर्यादित मार्गावरून आपण वावरत असताना अशा एका पूर्णपणे वेगळ्या विश्वाच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारे हे पुस्तक मला नक्कीच आवडलं. जीवनाचा दृष्टीकोन आपल्याला बदलता आला नाही तरी त्याकडे कधीकाळी जमेल तेव्हा बदलण्याच्या दृष्टीने पाहिले पाहिजे ही जाणीव निर्माण झाली हे ही नसे थोडके!! अगदी संथ जीवनाचे वर्णन ज्या कौशल्याने नेमाडे ह्यांनी हाताळले आहे त्याची दाद द्यावी ती थोडकी. बघायला गेलं तर सर्व पात्रे अगदी सामान्य ; परंतु त्यांना एक विशिष्ट व्यक्तिमत्व आहे आणि त्या व्यक्तिमत्वाचा पदर जसजसं पुस्तक पुढे जातं तसा उलगडत जातो. ह्या पुस्तकाविषयी काहीही माहित नसताना केवळ स्वयंस्फुर्तीने हे विकत घेतलं आणि एक वेगळा अनुभव मिळाला

वाचनसंस्कृती जपली पाहिजे हे मात्र नक्की! प्रत्येकाने विकत घेऊन पुस्तके वाचलीच पाहिजेत. ह्या निमित्ताने मला वेळोवेळी उत्तम पुस्तकांचा सल्ला देणाऱ्या अनुपचे आभार मानून ही पोस्ट आवरती घेतो.

सोमवार, २६ ऑक्टोबर, २०१५

शोध स्वः त्वाचा !!

हल्ली चाकोरीबद्ध आयुष्य जगण्याला जनांच्या नजरेतून फारशी किंमत राहिली नाही. जे काही करायचे ते स्वानंदासाठी, स्वतःच्या विकासासाठी. ह्या विकासातून कुटुंबाचा आर्थिक विकास साधला जातो आणि मग कुटुंबातील अन्य सदस्यांचा बाकीचा विकास आपोआप साधला जाईल अशी हल्लीची सर्वमान्य विचारधारणा आहे. मी बराच काळ ह्याला वैचारिक विरोध केला. कालबाह्य म्हणून सतत गणना केली जाऊ लागल्यावर मी माझे मत सार्वजनिकरित्या मांडणे हल्ली सोडून दिले आहे किंवा अगदी कमी केले आहे. 
काल अचानक पाब्लो नेरुदा या नोबेल पारितोषिक विजेत्या जगप्रसिद्ध कवीची एक कविता वाचनात आली. 


तुम्ही प्रवासाला नाही जात,
भटकत नाही.
तुम्ही वाचतच नाही काही,
जगण्याच्या हाका पडतच नाहीत तुमच्या कानावर,
चुकून कधी नाही देत तुम्ही
स्वत:च्याच पाठीवर शाबासकीची थाप.
याचा अर्थ,
तुम्ही मरताय हळूहळू.

स्वत:चं मन मारून, तडजोड करून जगता तुम्ही.
मायेनं कुणी मदत करायला येतं, तर तेही
नाकारता तुम्ही.
याचा अर्थ, तुम्ही मरताय हळूहळू.

सवयीेंचे गुलाम बनता आहात तुम्ही,
रोज त्याच त्या मळक्या वाटेवर चालताय तुम्ही,
चुकून कधी नव्या रस्त्यानं जाऊन पाहत नाही,
चुकून कधी वाट चुकत नाही,
परक्या अनोळखी माणसांना भेटत नाही,
त्यांच्याशी काही बोलत नाही,
अंगावर चढवत नाही, नवेकोरे पूर्वी न
वापरलेले रंग.
याचा अर्थ, तुम्ही मरताय हळूहळू.

छातीत धडधडतच नाही तुमच्या,
तुमचं पॅशन काय हेच आता आठवत नाही तुम्हाला,
भावनांचा अतिरेकी कल्लोळ नाही जाणवत आतल्या आत,
नाही तुटत पोटात,
नाहीच येत पाणी डोळ्यात.
याचा अर्थ, तुम्ही मरताय हळूहळू.

या कामात मन रमत नाही, असं वाटतं;
तरीही तुम्ही चिकटून बसता
त्याच नोकरीला.
नाही पटत ‘त्या’ व्यक्तीशी तरी,
संपलंय प्रेम हे माहितीये तरी,
तुम्ही रेटत बसता ते नातं,
आयुष्य बदलण्याचा धोकाच नको म्हणता,
सोडत नाही चाकोरी,
झपाटून झोकून देत नाही स्वत:च्या
स्वप्नांसाठी स्वत:ला,
तोलूनमापून सुरक्षित जगण्याचे सल्ले झुगारून देत,
एक संधीही देत नाही स्वत:ला,
स्वत:साठी जगण्याची.
आयुष्यच बदलून टाकण्याची.
याचा अर्थ
तुम्ही मरताय...
हळूहळू...

- पाब्लो नेरुदा

प्रथमदर्शी मला ही कविता आवडली. मी अगदी लाईक वगैरे ठोकला. पण पुन्हा वाचली; अजून एकदा वाचली. मग मात्र मी काहीसा अस्वस्थ झालो. ह्यातील बरेचसे मुद्दे मला लागू होतायेत असे मला वाटू लागलं. म्हणजे मी अगदी तोलूनमापून अरसिक वृत्तीने आयुष्य जगतो की काय असे ह्या कवीला म्हणायचं आहे असा समज मी करून घेतला. 

माझा कंपनीतला बॉस नेहमी सांगत असतो. "महत्वाच्या चर्चेच्या वेळी भावनात्मक विचार करणे सोडून द्या! कोणी एखादा मुद्दा आपल्याविरुद्ध मांडला की तो आपल्यावर वैयक्तिक हल्ला आहे असे समजणे सोडून द्या. तरच तुम्ही ह्या जगात टिकू शकाल!" 
हेच तत्व मी इथे अवलंबिण्याचे ठरविले. पहिल्या कडव्यातील काही गोष्टी जसे की भटकणे, वाचणे हे मी मर्यादित प्रमाणात हल्ली मी करतो. पण भारतातील बराच मोठा वर्ग असा आहे की ज्यांना ह्या बाबतीतील आपल्या इच्छा कौटुंबिक जबाबदारीपायी पूर्ण करता येत नाही. अगदी मन मोडून राहावं लागतं. सर्व पाश सोडून ते काही आपल्या मनाच्या इच्छा पूर्ण करू शकत नाहीत काय? त्यांना अडवतो तो आपल्या मागे आपल्या चिमुरड्या बालकांचे कसे होईल ह्याचा विचार! आपली लठ्ठ पगाराची ऑफर / नोकरी सोडून घरी सांसारिक जबाबदारी सांभाळण्यासाठी बसलेल्या गृहिणीच्या मनात काय भावनाकल्लोळ चालला असेल ह्याची आपण कल्पना करू शकतो. 

पुढे एक ओळ भयंकर खटकली. 

नाही पटत ‘त्या’ व्यक्तीशी तरी,
संपलंय प्रेम हे माहितीये तरी,
तुम्ही रेटत बसता ते नातं,



कोण्या एका व्यक्तीशी पटणे वा न पटणे ही काही एकमार्गी प्रक्रिया नव्हे. एका व्यक्तीच्या स्वभावाच्या समजा "क्ष" म्हणजे १५ छटा असतील आणि त्याच्या जीवनसाथीच्या २०! म्हणजे कोणत्याही वेळी एकूण ३०० पैलूच्या जोडीच्या शक्यता त्या संसारात नांदू शकतात. त्यातील काही आनंददायी असतील तर काही दुःखदायी! आपल्या जीवनसाथीचा कोणता पैलू त्या क्षणी सक्रिय आहे आणि त्याची आपला पैलू बदलायची त्या क्षणी क्षमता काय आहे हे जाणून घेऊन गरज पडल्यास त्या क्षणी आनंद निर्माण करणारा आपल्या स्वभावाचा पैलू जागृत करणे म्हणजे संसारातील खरं प्रेम! मोठाल्या कविता, सुंदर भेटी ही सर्व प्रेमाची रूपं महत्वाची आहेतच पण संसारात हा आता वर्णिलेला मुद्दा फार महत्वाचा!

अजून एक मुद्दा! सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील एक दिवस निर्विघ्न पार पाडण्यासाठी त्या माणसाला किती संघर्ष करावा लागतो ह्या विषयी बोलण्याची आपल्याकडे पद्धत नाही. सकाळी घरच्या जबाबदाऱ्या पार पाडून अत्यंत तणावपूर्वक असा प्रवास करून सामान्य माणूस ऑफिसात पोहोचतो आणि त्यानंतर तिथल्या कामाच्या आणि माणसांच्या बदलत्या रुपाला तोंड देत तो आपले ध्येय पार पाडतो. कर्तुत्ववान, यशस्वी लोकांचे कौतुक करण्याची पद्धत पूर्वापार चालत आली आहे पण सामान्य माणसाच्या संघर्षाला आणि त्यातून त्याने / तिने साध्य केलेल्या छोट्या छोट्या यशाला नगण्य मानण्याची चूक कोणी करू नये. 

आयुष्याच्या एका वळणावर मुलाबाळांच्या जबाबदाऱ्या संपतात किंवा कमी होतात अशा वेळी आपल्याला संधी मिळू शकते स्वः त्वाचा शोध पुन्हा एकदा घ्यायची! आणि त्यावेळी ह्या कवितेतील बोध घ्या! पुन्हा उफाळून उठा! आणि आपल्या इच्छा पुऱ्या करा. आणि पाब्लोला  ठणकावून सांगा "आम्ही हळूहळू मेलो नव्हतो! आम्ही नव्या पिढीच्या जीवनांकुराला जोपासण्यात मग्न होतो!" 

हे सगळे भावना बाजूला ठेवून सुचलेले विचार! काल मात्र भावनांच्या भरात एक उत्तर दिलेच!

चाकोरीबद्ध आयुष्य जगणे ही आमची पहिली पसंद कधीच नव्हती!
पण नेत्रदीपक काही करण्यासाठी जबाबदाऱ्या झुगारून देणे आम्हांला पटले नाही!!! 
 

रविवार, ११ ऑक्टोबर, २०१५

सरमिसळ - २०१५ !!

गेल्या वर्षी मी whatsapp वर का नाही अशी पोस्ट लिहिली आणि ह्या वर्षी whatsapp ला सामील झालो. मी आदर्शवादी उरलो नाही की whatsapp ला सामील झालो ह्याचे खास स्पष्टीकरण द्यावे. गेल्या चार पाच महिन्यातील माझ्या संचारानंतर काही जाणवलेल्या गोष्टी.

१) इथे गैरसमज, मानापमान ह्या गोष्टींना खूप वाव आहे. आपल्याच ग्रुप मधला एखादा आपल्या अपडेट्सना मुद्दाम लाईक करत नाही, आपण एखादा महत्त्वाचा अपडेट टाकला की मुद्दाम दुसराच अपडेट टाकून बाकीच्या लोकांचे लक्ष वेधून घेतो वगैरे वगैरे. 

२)मग काही लोक अनवधानाने नाराज होतात. ग्रुप सोडतात, किंवा अचानक आपला सक्रियपणा सोडून निष्क्रिय बनतात. पण इथेही बऱ्याच वेळा लोकांना दुःखद अनुभव येतो. म्हणजे लोकांना काहीतरी फरक जाणवेल आणि मग ते आपल्याला विचारतील, "काय झालं?" असे घडण्याची शक्यता त्यांना वाटत असते. पण बऱ्याच वेळा इतर लोकांना ह्या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही किंवा असे आपणास वाटण्याची शक्यता असते. पण कित्येकदा लोक खूप कामात गर्क असतात किंवा इतका विचार करण्याची तसदी घेत नाही. अधून मधून मनाला बरे वाटण्यासाठी किंवा स्वतःचे कौतुक करून घेण्यासाठी आपण whatsapp ला सामील झालो आहोत ह्याचे भान ठेवावं. 

३) मला इथे एक गोष्ट खटकली ती म्हणजे ग्रूप मध्ये एखादा निवर्तल्याची बातमी टाकली जाते आणि काही तासातच लोक विनोद वगैरे टाकायला सुरुवात करतात. माझ्या मते त्या दिवसापुरतं तरी लोकांनी थोडं शांत राहायला हरकत नाही. 

४) एक गोष्ट मात्र खरी की सद्यपिढीशी सतत संपर्कात राहायला हे माध्यम उपयोगात पडतं. 

५) इथे विविध गटात आपल्याला खूप आदर्शवादी विचार ऐकायला मिळतात. लोक त्यांना लाईक वगैरे करतात. मी ह्या बाबतीत मात्र फारसा उत्साही नसतो. हे आदर्शवादी विचार वाचायला वगैरे ठीक असतात पण ते जीवनाचा संघर्षाची उत्तरे अगदी सोप्या तत्त्वात सांगण्याचा प्रयत्न करतात. 

६) आयुष्य इतकं सोपं अजिबात राहिलं नाही. सतत बदल घडवून आणण्याचा मनुष्याचा हव्यास त्याच्या मानसिक स्वास्थाच्या मुळाशी येणार आहे. अभियांत्रिकी शाखेनंतर माहिती आणि तंत्रज्ञान, व्यवस्थापन ही भारतात मोठ्या पगाराच्या नोकऱ्या देणारी क्षेत्रे. पण इथे शाश्वतता क्षणभंगुर असते. आपण ज्या कंपनीत काम करतो तिथलं व्यवस्थापन, त्यांची धोरणे, आपल्या कामाचं स्वरूप, आपले सहकारी ह्यांचं एक चित्र आपल्याला मनातल्या मनात रेखाटून ठेवावं लागतं आणि त्यानुसार आपली धोरणं आखावी लागतात. प्रत्येक दिवसअखेर ह्या चित्रात काय बदल झालेत आणि त्यामुळे आपल्या धोरणात काय बदल घडून आणावेत ह्याचा विचार करावा लागतो. ज्या क्षेत्रात स्थैर्य आहे अशाही क्षेत्रात आपण लोकांचे आयुष्य किती त्रासदायक करता येईल ह्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. अभियांत्रिकी शाखेत शिकविणाऱ्या शिक्षकांनी डॉक्टरेट केल्याशिवाय त्यांचा पुढील वेतनश्रेणीसाठी विचार केला जाणार नाही ही ह्यातीलच एक बाब! जणू काही ह्या शिक्षकांच्या शिकविण्याच्या दर्ज्यावर त्यांच्या डॉक्टरेटचा मोठा परिणाम होणार आहे. 

७) दुसऱ्या मुद्यात म्हटल्याप्रमाणे लोक फारसा विचार करण्याची तसदी घेत नाहीत. पण हे पूर्ण विधान नाही. लोक दुसऱ्यांच्या बाबतीत फारसा विचार करण्याची तसदी घेत नाहीत. पण स्वतःच्या बाबतीत मात्र ते अगदी जागरूक असतात. सोशल मीडियात दुसऱ्यांच्या बाबतीत फारसा विचार न करण्याची वृत्ती ज्या वेळी प्रत्यक्ष जीवनात डोकावू पाहते त्यावेळी मात्र गंभीर परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे आपला सामाजिक जीवनातील प्रत्यक्ष सहभाग कायम ठेवणे आवश्यक आहे. 

आता काही दुसऱ्या विषयांकडे! गेल्या आठवड्यात दगडी चाळ चित्रपट पाहिला. चित्रपट चांगला आहे. कथा काल्पनिक आहे. अंकुश चौधरीचा चित्रपटातील वावर अगदी सहजरीत्या आहे. पूजा सावंत दिसलीय सुरेख आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे तिचा अभिनय अगदी सहजसुंदर वाटतो!  मकरंद देशपांडे अगदी अरुण गवळीसारखाच दिसतो. पण गंभीरता राखण्याचा नियम पाळताना अभिनयाच्या बाकी छटा दाखवायला फारसा वाव मिळाला नाही असं मला वाटून गेलं. 
ह्या चित्रपटातील मला वाटलेली मुख्य त्रूट म्हणजे हाणामारीचे प्रसंग फारसे वास्तववादी झालेच नाहीत. अगदी सुरुवातीला मामा आमदारावर हल्ला करतो तो प्रसंग किंवा लग्नाच्या वरातीचा खोटा बहाणा निर्माण करून एका मोठ्या असामीस पोलीस संरक्षणातून बाहेर काढतो हे न खुललेले प्रसंग! मराठी चित्रपटांची संख्या झपाट्याने वाढतेय पण कथा, चित्रीकरणावर घेतली जाणारी मेहनत किंवा वेळ आणि बजेट ह्यांचे गणित अजूनही फारसं जमताना दिसत नाही. हा चित्रपट मी वसईला ३ ऑक्टोबरला म्हणजे प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्या दिवशी पाहिला. चित्रपटगृहात अवघे २० - २५ लोक होते. वसई म्हणजे चित्रपटाची लोकप्रियता आजमावून पाहण्यासाठी योग्य उदाहरण नसले तरी पण हे चित्र योग्य नाही. 

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे ह्यांच्या उपक्रमाला दाद द्यावी तितकी कमी! ह्यावर बरेच लेख वाचनात आले. दरवर्षी पडणाऱ्या पावसावर एकाच प्रकारचे पिक घेण्याची मनोवृत्ती सोडावी हा एक महत्त्वाचा विचार त्यातून समजला. मुख्य म्हणजे आपण आत्महत्या करून आपल्या मागे राहणाऱ्या कुटुंबियांची स्थिती काहीच सुधारत नाही आहोत ह्याच भान ह्या शेतकऱ्यांनी राखायला हवं. मुख्य म्हणजे ह्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा प्रयत्न करावयास हवा. प्रत्येक गावात पाणी साठविण्याची छोटी तळी वगैरे निर्माण करायला हवीत. अण्णा हजारे ह्यांनी राळेगणसिद्धीचा असाच पाणी साठवणुकीची व्यवस्था करून कायापालट केला होता असे मागे वाचनात आले होते. त्याचे अनुकरण करता येईल काय ह्याचा विचार करायला हवा. मुख्य म्हणजे राजकारणी लोकांना कायमस्वरुपात हा प्रश्न सोडविण्यात स्वारस्य नसणार हे सर्वांनी समजून घ्यायला हवे. त्यामुळे स्थानिक / गावपातळीवर एखादा तरुण नेता निवडावा आणि त्याचे म्हणणे सर्वांनी ऐकून गावात मोठे वृक्ष लागवड करावेत. सुबाभूळ हे असेच कमी पाण्यावर वाढणारे आणि जनावरांना चाऱ्यासाठी उपयोगी पडणारे झाड! त्याची आणि संबंधित वृक्षांची लागवड करता येईल ह्याचा विचार करावा. आपले शेत एखादी कंपनीप्रमाणे चालवावे अशीही पोस्ट वाचली. त्यात सुद्धा मिश्रपिकांचा पर्याय सुचविण्यात आला होता.

विविध विषय मांडले! विषयांची खोली गाठली गेली नाही. पूर्वीच्या काळी बहुतांशी लोक ज्या गोष्टी करायचे त्यात खूप खोलवर जायचे कारण विद्या / ज्ञान ह्यांना पैशात रूपांतरित करायचं दडपण नसायचं. काळ बदलला बहुतांशी लोकांनी विविध कारणांचा बहाणा निर्माण करून स्वतःमागे पैसे कमवायचा सोस लावून घेतला आहे. पण ज्ञान, तत्वनिष्ठता सर्व काही मागे पडत चालले आहे. समाज बदलवू शकत नसलो तरी आपल्या घरी तरी ह्या मूल्यांना टिकविण्याचा आटोकाट प्रयत्न करूयात!

शनिवार, ३ ऑक्टोबर, २०१५

वारसदार - भाग ८

"आई कालच माझा वाढदिवस साजरा झाला आणि आज सकाळसकाळी तुला ही कसली चेष्टा सुचतेय?" आईने मोठा धीर करून ही बातमी नीलाच्या कानावर तिच्या हातात दुधाचा कप देताना घातली आणि तिची ही अपेक्षित अशीच प्रतिक्रिया तिच्या कानावर पडली. मग बाबांना मध्ये पडावे लागेल. बाबांनी सुध्दा आईच्या बातमीला दुजोरा दिल्यावर नीला मात्र अगदी कॉलेजला जायला उशीर होत असताना देखील थांबली. हे प्रकरण अगदीच गंभीर दिसत होते. "ठीक आहे! मी विचार करते" असे म्हणून आपली सॅक उचलून ती कॉलेजला निघाली.  
नेहमीची बस पकडून ती आत शिरली. आज कसं कोणास ठाऊक पण एका स्टॉपनंतर तिला खिडकीजवळची सीट मिळाली सुद्धा!! बसताक्षणी तिचं विचारचक्र सुरु झालं. ह्या पक्षाचे तिकीट म्हणजे विजयाची बरीच शक्यता होती. आपलं आयुष्य अगदी बदलून जाणार होतं. पण अचानक आपली निवड करण्यामागच कारण तिला समजेना. पक्षात इतके इच्छुक असताना पक्ष आपली निवड का करेल? म्हणजे ह्या मागे रावांचा हात असणार! पण राव केवळ आपल्या नियोजनकौशल्यावर खुष होऊन इतकं मोठं पाऊल उचलतील ह्याची तिला खात्री वाटत नव्हती. म्हणजे नक्कीच त्यांच्या मनात दुसरा कोणता तरी विचार असणार! दुसरा कोणता म्हणजे? आमदारकी आपल्याच घरात राहावी असं तर त्यांच्या मनात नसणार ना? नीलाच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. कॉलेजचा स्टॉप जवळ आला होता. उगाच सुताने स्वर्ग गाठू नकोस! बसमधून उतरता उतरता तिने स्वतःला बजावलं. आठव्या सत्राच्या सबमिशनचा आज शेवटचा दिवस होता. सबमिशन आटोपता आटोपता दुपारचे चार वाजले. आता दोन आठवड्याची अभ्याससुट्टी समोर होती. सर्व मुलांचे लक्ष ह्या दोन आठवड्यात अभ्यासाचा पर्वत कसा उचलायचा ह्याकडे होते. पण नीलाच्या मनात मात्र दुसरंच वादळ सुरु होते. तिला दोन दिवसात मोठा निर्णय घ्यायचा होता. तिची भिरभिरणारी नजर सुशांतला शोधतेय हे शलाकाला कळायला नेहमीप्रमाणे वेळ लागला नाही. "तो कॉम्पुटर लॅब मध्ये असावा!" नेहमीप्रमाणे अगदी गंभीर चेहरा करत आणि नजर दुसरीकडे ठेवत शलाका म्हणाली. आज तिच्या ह्या सुज्ञतेला दाद देण्याचाही नीलाचा मूड नव्हता. त्या दोघी कॉम्पुटर लॅबच्या बाहेरून चक्कर मारायला आणि सुशांत लॅबमधून बाहेर पडायला एकच गाठ पडली. "सुशांत मला तुझ्याशी काही बोलायचं!" तिच्या ह्या अनपेक्षित वाक्याने सुशांत काहीसा आश्चर्यचकित झाला. कॉलेजबाहेरच एक हॉटेल होते तिथं दोघं निघाली. बरेच दिवस दोघांचं असं काही बोलणं झालं नव्हतं. त्या दोघांना एकत्र चालताना पाहून त्यांच्याकडे फिरून फिरून वळणाऱ्या नजरांकडे लक्ष देण्याचे सुद्धा भान आज नीलाकडे नव्हते. पण सुशांतला मात्र बरंच टेन्शन आलं होतं. म्हटलं तर आज कॉलेजातला शेवटचा दिवस होता. ह्या नंतर अभ्याससुट्टी आणि मग दोन आठवडा भर चालणारी परीक्षा! त्यानंतर सर्व पक्षी उंच आकाशात भरारी घ्यायला निघून जाणार होते. त्यातील कोण्या दोघांना एकत्र घरटे वसवायची इच्छा असल्यास त्यांना दोघांना आताच निर्णय घ्यायचा होता. पण हा निर्णय घ्यायचा अधिकार आणि मुख्य म्हणजे घरटे उभारायची ताकद ह्या दोघांकडे होती का हा महत्वाचा प्रश्न होता. 
"सुशांत मला तुझ्या बाबांच्या पक्षाकडून आमदारकीच्या तिकीटाची ऑफर देण्यात आली आहे!" नीलाच्या ह्या पहिल्याच वाक्याने सुशांत अगदी भुईसपाट झाला. त्याच्या चेहऱ्यावरील हावभावावरून ह्याला ह्या प्रकरणातील काहीच माहिती नाही ह्याची नीलाला खात्री पटली. "मग तू काय ठरवलं आहेस?" बाकी काहीच न सुचल्यामुळे तो हे वाक्य बोलून गेला. नीलाला काय उत्तर द्यायचं हे उमगत नव्हतं. सुशांतला ह्या प्रकरणातील काहीतरी माहित असेल आणि तो आपल्याला हा निर्णय का घेतला गेला ह्याची अधिक माहिती देऊ शकेल अशी जी आशा तिने ऊरी बाळगली होती ती निष्फळ ठरली होती. आपल्या दोघांच्या भवितव्याविषयी काय असं त्याला विचारावं असाही विचार तिच्या मनात क्षणभर आला. पण निर्णय घेण्याच्या बाबतीत आजस्तोवर सुशांतने तिला पूर्ण निराश केलं होतं आणि आजही ह्याच्याकडून फारशी काही अपेक्षा करावी असं काही वेगळं चिन्ह तिला दिसत नव्हतं. "बघू काय करायचं ते! आई बाबा म्हणतील तेच मी करीन!" तिच्या चेहऱ्यावरील निराशा सुशांतला स्पष्ट दिसत होती. "चल मग निघुयात! तुला अभ्यास करायचा असेल नाही!" नीला म्हणाली. खरं तर तिरक्यात बोलण्याचा तिचा स्वभाव नव्हता पण आज सुशांतकडून तिची पूर्ण निराशा झाली होती आणि म्हणून हे वाक्य तिच्या तोंडून गेलं होतं. "एक मिनिट थांब नीला!" सुशांतच्या चेहऱ्यावर प्रथमच तिला खंबीर भाव दिसत होते. "मला तु आवडतेस! माझं तुझ्यावर प्रेम आहे असं मला वाटत पण प्रेम ह्या विषयाची गहनता समजण्याइतपत माझी पात्रता आहे असं मला वाटत नाही! मला तुझ्याशी लग्न करायची इच्छा म्हटलं तर आहे पण माझं माझ्या करियर मध्ये स्थिरस्थावर होणे मला अधिक महत्त्वाचं  वाटत! मला स्थिरस्थावर व्हायला किती वेळ लागेल हे मला माहित नाही! पण ज्या दिवशी मी स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभा असेन त्या दिवशी मी तुला साद घालीन आणि माझ्या सादेला प्रतिसाद द्यायला तू जर त्या दिवशी तयार असशील तर मग आपल्या दोघांत कोणीच येऊ शकणार नाही!" गेले दोन तीन वर्षे आपल्या मनातील विचार सुशांतने एका दमात सांगून टाकले होते. आणि शेवटी त्याने नीलाचा हात हातात घेऊन आश्वासकपणे हळूच दाबला होता. 
आकाशातील सर्व मळभ दूर झाल्यासारखं नीलाला वाटत होतं. "थॅंक यू सुशांत! थॅंक यू सो मच!!" वेटरला बिल आणण्याची खूण करत नीला म्हणाली. इतकं बोलून अगदी भावनाविवश झालेल्या सुशांतमध्ये तिला अडविण्याचे सुद्धा तभान राहिलं नव्हतं. त्याचं आपल्याकडे लक्ष नाही हे पाहून नीलाने हळूच रुमालाने आपल्या डोळ्यात येऊ पाहणारे आनंदाश्रू पुसले होते. 
"कुलकर्णींना सांगा मी निवडणूक लढवायला तयार आहे!" रात्री आईबाबा आणि नीला असे सर्वजण जेवायला बसले असताना नीला सहजपणे म्हणाली. दोघांच्याही तोंडातला घास तोंडातच राहिला. आपली पोरगी इतका मोठा निर्णय इतक्या लगेच घेईल ह्यावर विश्वास ठेवणं त्यांना काहीसं कठीण जात होतं. 
पुढचे काही दिवस अगदी धामधुमीत गेले. एका २१ वर्षाच्या अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या मुलीला मुख्य राजकीय पक्षाने तिकीट देण्याची बातमी राज्यपातळीपर्यंत जाऊन पोहोचली. त्यामुळे नीलाने अर्ज दाखल करण्याच्या दिवशी मीडियाचे बरेच लोक हजर राहिले. नशिबाने निवडणूक एक महिन्यावर होती. त्यामुळे अर्ज भरून आल्यावर नीला थेट अभ्यासात गुंतली. तिने पुन्हा एकदा अभ्यासात स्वतःला झोकून दिलं. आठव्याचे पेपर चांगले गेले. म्हणजे अजूनही चांगले जाऊ शकले असते पण इतक्या सगळ्या व्यवधानाकडे पाहता ठीक गेले. 
आणि मग मात्र तिने प्रचारात स्वतःला झोकून दिलं. पक्षाची यंत्रणा अगदी सुसज्ज होतीच आणि एका तरुण चेहऱ्याला तिकीट मिळालं म्हणून सर्व तरुणाई अगदी बेहद्द खुष होती. फेसबुक, whatsapp वरील प्रचार खुद्द नीला सांभाळत होती आणि पारंपारिक प्रचार कुलकर्णी सांभाळत असल्याचं चित्र दिसत होतं. असं असलं तरी पडद्यामागून राव सर्व सूत्र सांभाळत होते. आणि एका प्रचार सभेला  खुद्द सुशांतने हजेरी लावली तेव्हा नीलाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आयुष्याचे रंग अगदी हातात आल्यासारखं तिला वाटत होतं. ह्या सगळ्या सुसूत्र प्रचारामुळे विरोधकांनी आधीच हार मानल्यात जमा होती. नीलाचे आईवडील मात्र अगदी बेचैन होते. आपली अगदी छोटी मुलगी अचानक मोठी झाली होती आणि आता तिच्याशी दोन शब्द बोलणं सुद्धा अशक्य झालं होतं. 
निवडणूक शांतपणे पार पडली. आणि निकालाचा दिवस उजाडला. अगदी पहिल्या फेरीपासूनच अपेक्षेनुसार नीलाने मोठी आघाडी घ्यायला सुरुवात केली होती. आणि मग नीलाचा विजय घोषित होताच सर्वत्र उत्साहाला उधाण आलं!! एका मध्यमवर्गीय घरातील मुलगी आमदार झाली होती.
आठव्याचा निकाल जाहीर झाला. आणि तिथेही नवनिर्वाचित आमदारांनी विशेष प्राविण्य मिळवलं होतं. आता RBS ला जॉईन होणे शक्य नव्हते. सुशांत एकटाच बंगलोरला निघाला होता. 
राव आणि कुलकर्णी आनंदात घरी बसले होते. रावांचे राजकीय पुनर्वसन करण्याच्या प्रक्रियेतील पहिली पायरी नीलाच्या विजयाने साध्य झाली होती. आता रावांना आर्थिक घोटाळ्यातील आरोपांपासून मुक्त करणे आवश्यक होते. आणि त्यासाठी त्यांना मित्तलवर लक्ष केंद्रित करावे लागणार होते. ही योजना कशी आखायची ह्याचा विचार राव करीत होते. बरीच मेहनत करावी लागणार अशी चिन्ह दिसत होती. "राव हे प्रकरण इतकं काही कठीण नाही! ही पहा मी बनवलेली योजना!!" असं म्हणत कुलकर्णीनी एक फाईल रावांच्या हाती सुपूर्त केली. काहीशा आश्चर्यचकित झालेल्या रावांनी जसजशी त्यातील कागदपत्रे चाळावयास सुरुवात केली तसतसे त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचे भाव दिसू लागले. पूर्ण फाईल चाळून त्यांनी बाजूला ठेवली तेव्हा रात्रीचा एक वाजला होता. कुलकर्णी अजूनही बाजूलाच बसले होते. रावांनी प्रसन्न मुद्रेने त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. "मित्तल आता पहा! बुद्धीबळाच्या खेळातील धमाल!!" रावांनी एक आत्मविश्वासपूर्वक गर्जना केली!
(क्रमशः) 

शनिवार, २६ सप्टेंबर, २०१५

वारसदार - भाग ७

सुधीररावांना तुरुंगात टाकल्याच्या बातमीमुळे सर्वत्र खळबळ माजली होती. सुशांत तर अगदी बेचैन झाला होता. रात्री आई जेवायला तयारच नव्हती त्यावेळी तो तिची समजूत घालू पाहत होता. त्यावेळी गीताताईंनी त्याला सुधीरराव कसे अडचणीत सापडले होते ह्याची पूर्ण हकीकत सांगितली होती. त्यावेळी मात्र सुशांत पूर्ण पश्चात्तापदग्ध झाला होता. आपले वडील इतक्या संकटात असून सुद्धा आपण त्यांची मदत करू शकलो नाही आणि केवळ आपल्याच विश्वात मग्न राहिलो ह्याची त्याला राहून राहून खंत वाटत होती. 
सुधीरराव रात्रभर दगडी फरशीवर तळमळत होते. इतक्या आरामदायी जीवन व्यतीत केलेल्या त्यांच्यासाठी हा मोठा बदल होता. आजूबाजूला डास घोंघावत होते. आणि बाजूच्या कैद्यांची गडबड चालूच होती. रात्र कशीबशी सरली. सकाळी अगदी विमग्न मनःस्थितीत बसले असताना अचानक त्यांना कुलकर्णी भेटावयास येताना दिसले. त्यांच्या नुसत्या दर्शनानेच रावांना हायसं वाटलं. कुलकर्णी आणि रावांची साथ गेल्या दोन दशकांची होती.  रावांच्या राजकीय कारकीर्दीच्या भरभराटीच्या प्रवासाचे ते जवळचे साक्षीदार होते. कुलकर्णीनी रात्रभरात योग्य ती पावले उचलली होती. रावांची ताबडतोब चांगल्या कक्षात रवानगी करण्यात आली. इथे चांगल्या प्रकारच्या सुविधा होत्या आणि मुख्य म्हणजे घरून जेवणाचा डबा पाठविण्याची परवानगी मिळवण्यात सुद्धा त्यांना यश मिळाले होते. 
"जामीन मिळवण्यात मात्र सहजासहजी यश मिळणार नाही!" कुलकर्णी रावांना सांगत होते. उद्योगपती मित्तलने आपलं जाळे अगदी काळजीपूर्वक विणले होते. सध्यातरी रावांचा नाईलाज होता. 
रावांसाठी आणि गीताताईसाठी दिवस अगदी कष्टमय चालले होते. सुशांतसाठी सुद्धा काही फारसं सोपं नव्हतं आपल्या आईवडिलांची ही स्थिती पाहणे! तरीही त्याने नेटाने आठव्या सत्राचा अभ्यास सुरु ठेवलाच होता. नीलाची मनःस्थिती सुद्धा काही वेगळी नव्हती. मनावर ताबा न राहून ती एके दिवशी सुशांत कॉलेजात असतानाची संधी साधून गीता ताईंना भेटण्यास गेली होती. त्यावेळी तिला अगदी जवळ घेऊन त्या हमसाहमशी रडल्या होत्या. "मला ह्यावेळी अगदी राहून राहून वाटत मला एक मुलगी हवी होती!" त्यांच्या ह्या उद्गाराने नीलाला सुद्धा अगदी गहिवरून आलं होतं. 
कुलकर्णी श्रेष्ठींशी सतत संपर्क साधून होते. रावांना ह्या षडयंत्रातून सोडविण्याचे त्यांचे आटोकाट प्रयत्न सुरु होते. पण ह्यासाठी काही काळ लागणार होता. स्वच्छ प्रतिमेच्या शोधात असणाऱ्या श्रेष्ठीसाठी तुरुंगात असणाऱ्या रावांचे अस्तित्व त्रासदायक बनत चालले होते. कुलकर्णीतर्फे रावांवर आमदारपदाचा राजीनामा देण्याचा दबाव टाकण्यात येत होता. परंतु कुलकर्णी आणि राव ही जोडगोळी सुद्धा कमी पावसाळे पाहिलेली नव्हती. आमदारपदाचा राजीनामा देण्याच्या मोबदल्यात काहीतरी पदरात पाडून घ्यायला हवे होते. 
"आपल्या कंपूतील उमेदवार फेरनिवडणुकीला हवा!" रावांनी अशा एका भेटीत कुलकर्णीना आपली भुमिका स्पष्ट केली. हल्लीच्या वातावरणात कोणावर विश्वास टाकण्यासारखी परिस्थिती राहिली नाही. ह्यावर त्यांचे आणि रावांचे एकमत झाले. काही क्षणभर शांतता होती. "सुशांतला उभा करून पाहिलं तर!" कुलकर्णी बऱ्याच वेळाने बोलले. क्षणभर रावांच्या डोळ्यात त्यांना चमक दिसली पण मग लगेचच त्याची जागा काहीशा खिन्नतेने घेतली. "भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या बापाच्या मुलाला कोण तिकीट देणार?" राव म्हणाले. "आणि हो मला नाही वाटत सुशांतला राजकारणात काही रस आहे!" आपल्याच उद्गाराने राव अजूनच निराश बनले. काही क्षण असेच निराशेत गेले आणि अचानक रावांना काहीतरी आठवलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर अचानक उजाळा चमकून गेला. त्यांनी कुलकर्णीच्या कानात काहीतरी सांगितलं. भेटीची वेळ संपत आल्याचा निरोप घेऊन पहारेकरी आला त्याची रावांना आता पर्वा नव्हती.  पुढच्या दोन दिवसातच रावांच्या आमदारकीच्या राजीनाम्याची बातमी सर्वत्र झळकली. 
आपल्या हातातील पत्ता घेऊन कुलकर्णी त्या कॉलनीत शिरले. वॉचमनने काहीशा कुतूहलाने त्यांच्याकडे पाहत त्यांना हवा असलेल्या सदनिकेचा पत्ता सांगितला. कुलकर्णीनी दाराची बेल वाजवली. आतून बराच आवाज येत होता. नीलाच्या आईने दरवाजा उघडला. नीला आपल्या एकविसाव्या वाढदिवसाचा केक कापण्याच्या तयारीत होती. कुलकर्णीना पाहून सर्वजण काहीसे संभ्रमात पडले. "काही नाही मी सहज आलोय! नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!" कुलकर्णी प्रसंगावधान राखून बोलले. 
नीलाच्या मैत्रिणीच्या घोळक्यात काहीसं कंटाळलेल्या तिच्या वडिलांनी हीच संधी साधून मग कुलकर्णीना आतल्या खोलीत नेलं. आईने सरबत आणि केक आणला आणि ती खोलीबाहेर जायला निघाली. इतक्यात "तुम्ही जरा दोन मिनिटे थांबता का?" कुलकर्णी म्हणाले. काहीशी आश्चर्यचकित झालेली आई मग तिथेच उभी राहिली. 
पुढील दोन मिनिटे कुलकर्णी बोलत होते आणि नीलाचे आईबाबा अगदी अवाक होऊन ऐकत होते. एकविसाव्या वाढदिवशीच त्यांच्या मुलीला एका मुख्य राजकीय पक्षाकडून आमदारकीच्या तिकीटाची ऑफर देण्यात आली होती. कुलकर्णीनी आपले काम केले. "दोन दिवसात पुन्हा संपर्क करतो" असे म्हणून ते निघून सुद्धा गेले. पण नीलाच्या आईबाबांचे मात्र पूर्ण लक्ष विचलित झाले होते. बाहेर वाढदिवसाची पार्टी जोरात चालू होती पण इथे मात्र ह्या दोघांच्या मनात मोठे वादळ उठले होते. 

(क्रमशः)

शनिवार, २९ ऑगस्ट, २०१५

वारसदार - भाग ६

 
RBS च्या बंगलोर शाखेतील निवडीने नीलाच्या अंगात नवीन जोम शिरला होता. मनावर घेतलं तर आपणसुद्धा अगदी स्कॉलर जनतेच्या बरोबरीने अभ्यास करू शकतो हे तिला नव्यानेच जाणवलं होतं. केवळ हेच सिद्ध करायचं होतं की आणखी काही हे मात्र तिला उमगत नव्हतं. सुशांतची सुद्धा तिथंच निवड झाली हे तिला कळलं होतं. अजून काही महिने बाकी असल्याने तिने फारसं दडपण घेतलं नव्हतं. 

वरवर पाहिलं तर सुशांतचे आयुष्य अगदी दृष्ट लागण्याइतपत परिपूर्ण होतं. तो महाविद्यालयातील एक टॉपर होता, एक लठ्ठ पगाराची नोकरी त्याने मिळवली होती. बाबा नवनिर्वाचित आमदार होते. लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदत नाहीत असं म्हणतात खरं; पण सुशांत आणि रावांच्या घरी मात्र ह्या दोघीही सुखाने नांदताना वर वर का होईना पण दिसत होत्या. 

हे झालं वरवरचं चित्र! पण मनातून मात्र सुशांत विचलित होता. आमदारकी मिळाल्यावर घरी आता वेगळ्या प्रकारची लोक भेटायला यायला लागली होती. पूर्वी नियमितपणे घरी येणारे साधे सुधे कार्यकर्ते बाबांना भेटायला उत्सुक असायचे पण बहुदा त्यांना भेटण्यासाठी बाबांकडेच वेळ नसायचा. त्यांना भेटण्यासाठी वेळ नाही अशी सबब पुढे करणाऱ्या बाबांकडे मात्र मोठ्या उद्योगपतींना भेटण्यासाठी वेळ असायचा. त्यांच्या ह्या बैठकी मात्र बराच वेळ चालायच्या. पूर्वी वर्षातून क्वचितच एखाद दुसऱ्यांदा मदिरासेवन करणारे बाबा आता ह्या श्रीमंती लोकांच्या सहवासात नियमितपणे उंची मद्य प्राशन करू लागले होते. एकदा आईने ह्याबाबतीत त्यांना विचारलं सुद्धा! "हल्ली इतकं टेन्शन येतं कि अधून मधून घ्यावीच लागते!" त्यांचं हे उत्तर त्यांना स्वतःलासुद्धा पटत नसल्याने आईला पटण्याची तर त्यांनी अपेक्षासुद्धा केली नव्हती. 

सुशांतला नीला कॉलेजात दिसायची पण भेटायची नाही. दोघांच्याही शाखा वेगवेगळ्या होत्या आणि नेमके वर्ग दोन वेगवेगळ्या मजल्यावर होते. नीलाविषयी सुशांत मनात अगदी गंभीरपणे विचार करीत होता. आपलं  तिच्यावर प्रेम वगैरे आहे की नाही हे समजून घेण्याचा त्याचा अट्टाहास नव्हता. त्याला नीला हवी होती पत्नी म्हणून आणि तिथंच त्याचा मोठा संभ्रम होता. ज्या प्रकारे आपल्या घरातील वातावरण बदलत चाललं होतं ते त्याला अजिबात पटत नव्हतं. एक सुसंस्कृत मध्यमवर्गीय घर पूर्णपणे पैशाच्या मागे धावताना दिसत होतं. पैसा कमावणे चुकीचं असं त्याचं केव्हाही म्हणणं नव्हतं पण बाबा ज्या लोकांच्या संगतीत अधिकाधिक वेळ घालवत आहेत ती लोक सरळ मार्गांनी जाणारी नाहीत हे न समजण्याइतका तो आता लहान राहिला नव्हता. एकदा आईकडे त्याने विषय सुद्धा काढला होता. तिलाही हे सारं पटत नव्हतं पण बहुदा बाबांवर श्रेष्ठींकडून निधी गोळा करण्याची जबाबदारी टाकली गेली होती ह्याची कुणकुण तिला लागली होती. बाबांचा बहुदा नाईलाज झाला असावा असं तिचं म्हणणं होतं. सुशांतला तिचं हे म्हणणं काही पटलं नव्हतं. 

अशा ह्या बदलत्या घरात नीलाला सून म्हणून आणण्याची त्याची मानसिक तयारी झाली नव्हती. आपण चांगलीशी नोकरी मिळवावी आणि जमलं तर स्वतंत्र घरट उभारायचं इतक्या थराला तो गेला होता. पण नीलाचं वागणं मात्र त्याला गोंधळात टाकायचं. आधी तिने बाबांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता त्यावेळी एका शब्दानेसुद्धा मी ही जबाबदारी घेऊ का असं तिने त्याला विचारलं नव्हतं आणि त्यामुळे तो काहीसा दुखावला गेला होता. तरी पण नंतर अधून मधून जेव्हा नीला त्याला शंका विचारायची तेव्हा तो सुखावला जायचा. प्रत्यक्ष व्यक्त केल्या गेल्या नसल्या तरी एकमेकांविषयीच्या भावनांची त्यांना जाणीव होती. म्हणजे सुशांतला तर नक्कीच होती. पण बहुदा नीलाला त्याने त्या भावनांचं उघडपणे प्रकटीकरण केलेलं आवडलं असतं. आणि तिथंच गाडं अडलं होतं. आणि मग हे RBS प्रकरण उद्भवलं होतं. नीला आणि सुशांत ह्यांची एकत्रपणे निवड झाल्यावर कॉलेजातील टवाळ कंपूला आयताच विषय मिळाला होता. तसं म्हटलं तर सुशांतने त्याच्याकडे दुर्लक्षच केलं असतं पण एके दिवशी नीलाची सुद्धा RBS मध्ये निवड होण्यात रावांचा हात आहे अशी  अगदी धादांत अफवा कॉलेजात पसरविण्यात दृष्ट प्रवृत्तींना यश मिळालं होतं. आणि तेव्हापासून तर क्वचितच होणारी नजरभेट आणि लपून दिलेलं हसू सारं काही संपल होतं. आता तर नीला पूर्णपणे अभ्यासात गुंतून गेली होती. अशा वेळी आपल्या भावना तिच्यापर्यंत पोहोचविल्या तर उगाचच ती डिस्टर्ब व्हायला नको म्हणून सुशांत सुद्धा गप्प राहिला होता. हे वर्ष काय बघता बघता निघून जाईल आणि मग त्यानंतर आपण विचारपूर्वक कृती करूयात असंच त्याने ठरवलं होतं. 

दारची बेल वाजली तेव्हा नीलाची आई काहीशी आश्चर्यचकित झाली. नीला कॉलेजात गेली होती आणि बाबा ऑफिसात! अशा वेळी घरी कोण येणार अशा विचारातच तिनं दरवाजा उघडला. समोर शलाकाला पाहून तिला आश्चर्यच वाटलं. "हिला आज कॉलेज वगैरे कसं नाही!" अशा विचारातच त्यांनी तिचं स्वागत केलं. "ये ना शलाका! आज किती दिवसांनी येतेस तू!" त्यांनी शलाकाला म्हटलं. शलाका हॉलमध्ये खुर्चीवर बसली. "आज माझं किनई माझ्या चुलत मावशीकडे काम होतं म्हणून मी आज दांडी मारली कॉलेजला!" नीलाच्या आईची साशंक नजर चुकवायचा प्रयत्न करीत शलाका बोलत होती. "हो का! सहजच  काम निघालं वाटतं मावशीकडे !" आई म्हणाली. शलाकाने एक दीर्घ श्वास घेतला. "मावशी, मला खास तुमच्याशीच बोलायचं होतं! म्हणून कॉलेजात न जाता मी थेट आज इथे आले!" शलाकाने थेट मुद्द्यालाच हात घातला. 

पुढील जवळजवळ दीड तासभर दोघी बोलत होत्या, नीला आणि सुशांतबद्दल! नीलाला सुशांत मनापासून आवडला आहे हे तिच्या प्रत्येक कृतीतून शलाकाने गेलं वर्षभर पाहिलं होतं. पण आता ज्या प्रकारे रावांचे शत्रू जिथे संधी मिळेल तिथे ह्या दोघांना त्रास देण्याचा प्रयत्न करीत होते त्यामुळे नीलाला खूपच मानसिक त्रास होत होता. आणि त्यामुळेच तिनं स्वतःला अभ्यासात पूर्णपणे गुंतवून घेतलं होतं. "मावशी, तिला बंगलोरला कोणत्याही परिस्थितीत जाऊन देऊ नका! म्हणजे जिथं सुशांत जाईल तिथं नको! त्या दोघांचं भलं होईल अशीच माझी मनापासून इच्छा आहे पण हे राजकारणी लोक आपापसातल्या वैरापायी उगाच ह्या दोघांचा बळी घायला नकोत!" शलाका अगदी कळकळीने सांगत होती. आईला तिचं म्हणणं बऱ्यापैकी पटत होतं पण नीलाला समजवायचं कसं हा मोठा प्रश्न होता. शेवटी मग मी बाबांशी बोलून बघते असं म्हणत आईने शलाकाचा निरोप घेतला. रात्री मग बाबांशी आईने हा विषय काढल्यावर ते ही चिंतेत पडले. 

दिवस भरभर निघून जात होते. सातव्या सेमिस्टरची परीक्षा हा हा म्हणता आली आणि संपून सुद्धा गेली. नीलाने पूर्णपणे अभ्यासात झोकून दिलं होतं परिणामी पेपर अगदी झकास गेले आणि निकाल लागला तेव्हा त्याची प्रचिती आली सुद्धा! तिच्या शाखेत नीला दुसऱ्या क्रमांकावर आली होती. सुशांत आपला पहिला क्रमांक राखून होता. दिवसागणिक नीलाच्या आईवडिलांची चिंता वाढत चालली होती. बंगलोरला जाऊ नकोस हे नीलाला कसं सांगायचं हे त्यांना समजत नव्हतं. "आपण सुधीररावांशी थेट बोलूयात का? " आईच्या ह्या प्रश्नाकडे बाबांनी साशंक नजरेने पाहिलं. तिला नक्की काय म्हणायचं आहे हे त्यांना समजल नव्हतं. "म्हणजे थेट लग्नाविषयी विचारून पाहिलं तर!" काहीही म्हणतेस तू असं बाबांनी नजरेनेच तिला ताबडतोब उत्तर दिलं खरं पण मग ते सुद्धा त्या पर्यायावर थोडा गंभीरपणे विचार करू लागले. जर रावांनी हो म्हटलं असत तर सर्वच प्रश्न सुटणार होते. पण जर नाही म्हटलं तर! त्यांचं डोकं सुद्धा चालेनासं झालं होतं. 

गेले काही दिवस सुधीररावांची वाढती बेचैनी गीताताईंच्या लक्षात येत होती. शेवटी न राहवून त्यांनी रावांना विचारलं. "सर्व काही ठीक चाललंय ना! कामाचा खूप ताण होतोय का! नाहीतर तुम्ही कशी आठवडाभराची सुट्टी काढा बरं! आपण मस्तपैकी कोकणात जाऊन येऊयात! मस्त थंडी पडली असेल तिथं!" आपल्या अनुपस्थितीत सुशांतचे हाल होतील हे माहित असूनसुद्धा गीताताई म्हणाल्या. रावांची बेचैनी त्यांना पाहवत नव्हती. "गीता मी पूर्ण फसवला गेलो गं! एक मोठे आर्थिक प्रकरणात मोठा उद्योगपती आणि पक्षश्रेष्ठी ह्यांच्यात मी मध्यस्थी करत होतो. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं पण अगदी शेवटच्या क्षणी त्या उद्योगपतीला ते कॉन्ट्रैक्ट न देता दुसऱ्या कोणाला तरी देण्यात आलं! आता तो उद्योगपती पूर्ण बिथरला आहे. त्याचे भली मोठी रक्कम ह्या व्यवहारात अडकली आहे. तो श्रेष्ठींचा तर बदला घेऊ शकत नाही पण तुम्हांला पूर्णपणे आयुष्यातून उठवून टाकीन अशी धमकी त्याने मला दिली आहे!" डोळ्यातील अश्रुंवर ताबा न ठेवता आल्याने त्यांना मोकळेपणाने वाहून देत राव म्हणाले. गीताताईना हा मोठा धक्काच होता. आतापर्यंत अगदी सचोटीने व्यवहार करणारे राव ह्या प्रकरणात असे कसे अडकू शकतात ह्याचाच त्यांना उलगडा होत नव्हता. पुढील काही दिवस त्या रावांना धीर देण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होत्या. पण परिस्थितीत काहीच फरक पडत नव्हता. 

निवडलेल्या सर्व विद्यार्थ्यांना RBS ने संपर्क केला होता. आणि बरीच कागदपत्रे भरून मागितली होती. काल रात्रीच नीलाने हा विषय आईवडिलांकडे काढला तेव्हा ते दोघे अगदी गप्पच राहिले होते. ही गोष्ट अगदी उत्साहात असलेल्या नीलाच्या कशी कोणास ठाऊक पण लक्षात आली नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून नीला चहाचा कप घेत खुर्चीवर विसावली. सवयीप्रमाणे तिनं वर्तमानपत्राचे मुख्य पान उघडलं आणि तिचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना! "आमदार सुधीरराव ह्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली काल रात्री अटक!" अगदी मोठ्या अक्षरातील ही बातमी वाचून क्षणभर तिच्या डोळ्यासमोर काळोखी आली!

(क्रमशः )

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...