मराठी शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकांत ज्यांच्याशी आपला परिचय झाला, ज्यांच्या आदरणीय व्यक्तिमत्त्वांनी आपल्याला भारावून सोडलं अशा व्यक्ती बऱ्याच वर्षांनी अचानक वर्तमानपत्रे, मासिके ह्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सामोऱ्या येतात तेव्हा मन त्या आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलायला लागतं. भावनामय अवस्थेतून बाहेर आल्यानंतर त्या लेखातील सखोल माहिती वाचल्यानंतर अशा व्यक्तींच्या ज्ञानाविषयी प्रचंड आदराची भावना निर्माण होते. अशीच भावना भारतीय राष्ट्रवादाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादाभाई नवरोजी ह्यांच्याविषयी आज त्यांच्या जन्म द्विशताब्दीनिमित्त लोकसत्तेने प्रसिद्ध केलेल्या दोन लेखांमुळं निर्माण झाली. एका ऋषितुल्य व्यक्तिमत्वाविषयी निरंजन राजाध्यक्ष आणि गोविंद तळवळकर ह्या अभ्यासू लेखकांनी लिहिलेल्या लेखांतील काही महत्वाचे मुद्दे माझ्या मतांसहित इथं उद्धृत करत आहे. गोविंद तळवळकर ह्यांच्या व्यासंगाविषयी बोलण्याचं धारिष्टय मी करू नये.
आजच्या काळात अर्थशास्त्रज्ञांची एक मोठी फौज दिमतीला घेऊन एखादी वित्तीयसंस्था देशाचं आर्थिक उत्पादन मोजण्याचं काम करते. दादाभाईंनी केवळ कागदोपत्री असलेल्या माहितीच्या आधारे एकट्यानं हा भार उचलला. शेतकऱ्यांकडून घेतलेल्या कर्जाच्या माहितीच्या आधारे भारताच्या कृषी उत्पादनाचा अंदाज बांधून त्यांनी त्याला खाणकाम, वन उत्पादन आणि इतर क्षेत्रातील उत्पन्नाची जोड दिली. त्यांच्या अंदाजानुसार त्याकाळी असलेलं भारताचं ३४० कोटी वार्षिक उत्पन्न (दरडोई केवळ २० रुपये) आपल्याला तत्कालीन भीषण दारिद्याची जाणीव करून देते. अत्यंत धक्कादायक मुद्दा म्हणजे त्याकाळी तुरुंगात असणाऱ्या कैद्यांचे पोषण हे बाहेर असलेल्या मुक्त नागरिकांपेक्षा चांगल्या प्रकारे होत असे.
कालांतरानं दादाभाई नवरोजी ह्यांनी जी 'ड्रेन थिअरी' मांडली त्यात भारतातून निर्माण होणारी संपत्ती विविध मार्गानं कशी देशाबाहेर नेली जात आहे ह्याच्या विविध मार्गांचा उल्लेख करण्यात आला होता. ब्रिटिश प्रशासकांचं प्रचंड पगार, त्यांना मिळत असणारं सेवानिवृत्ती वेतन, भारतात मिळणाऱ्या फायद्याचं ब्रिटनमध्ये हस्तांतरण इत्यादी मुख्य मुद्यांचा समावेश होतो. अर्थात त्यांच्या ह्या ड्रेन थिअरी मधील अनेक गृहीतकांविषयी काही प्रश्न उपस्थित निर्माण करण्यात आले. पण आपल्या लेखाच्या शेवटी राजाध्यक्ष ह्यांनी दोन अत्यंत महत्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहेत. पहिला मुद्दा म्हणजे कोणत्याही देशात राजकीय स्वातंत्र्य, समाजसुधारणा ह्यांच्या जोडीला आर्थिक प्रगती महत्वाची आहे ह्याची जाणीव दादाभाई ह्यांनी त्याकाळी निर्माण केली. दुसरा मुद्दा म्हणजे देशप्रेम दाखविण्यासाठी फक्त आंदोलने करण्याऐवजी माहिती आणि आकडेवारी वापरून लोकांचे प्रबोधन करण्याचा मार्ग त्यांनी निवडला. हे दोन्ही धडे आजच्या भारतासाठी उपयुक्त आहेत असे सांगून राजाध्यक्ष ह्यांनी आपल्या लेखाची सांगता केली आहे.
पहिल्या मुद्यात उल्लेखलेल्या राजकीय स्वातंत्र्य, समाजसुधारणा आणि आर्थिक प्रगती ह्या तीन घटकांचा आजच्या काळात विचार करता काही मुद्दे डोळ्यासमोर येतात. राजकीय स्वातंत्र्याचा आजच्या काळात अभिप्रेत असणारा सखोल अर्थ कोणता? शहरात समाजसुधारणेच्या इच्छित ध्येयांपेक्षा आपण नको तितके पुढे आलो आहोत पण खेड्यांमध्ये मात्र अजूनही बरंच काही गाठायचं आहे आणि आर्थिक प्रगतीची नक्की व्याख्या काय ? पर्यावरणाच्या होणाऱ्या हानीकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करू शकतो का?
दादाभाई नवरोजी ह्यांना बहुदा आपण राजकारणी असे संबोधू शकणार नाही. तरीही एका राष्ट्रीय नेत्यानं कशी अभ्यासू वृत्ती दाखवायला हवी त्याचे ते एक उत्तम उदाहरण होते. सखोल अभ्यास करणाऱ्या नेत्यांचे प्रमाण आजच्या काळात नक्कीच वाढायला हवं असा विचार मनात आल्यावाचून राहत नाही.
गोविंद तळवळकरांचा लेख हा त्यांच्या पुस्तकातील संपादित अंश आहे. त्यात काही समान मुद्दे आहेत. पण भारतातील गरिबीसाठी केवळ इंग्रजांना जबाबदार धरणं कितपत योग्य आहे ह्याचा योग्य ऊहापोह ह्या लेखात करण्यात आला आहे. इंग्रजांनी अधिक जकातीद्वारे भारतातील वस्त्रउद्योग, जहाजबांधणी उद्योग ह्यांना कसे पद्धतशीर मार्गानं अधोगतीस लावलं ह्याची सविस्तर माहिती इथं देण्यात आली आहे. दादाभाई नवरोजी ह्यांनी आपल्या पन्नास वर्षाच्या सार्वजनिक जीवनातील बराच काळ इंग्लंडमध्ये व्यतित केला. त्यामुळं व्यापार आणि उद्योग ह्यांचं महत्त्व त्यांना पटलं आणि इंग्लंडमधील आधुनिक विचारांची ओळख त्यांना मिळाली. त्याच्या प्रभावामुळं त्यांनी व्यापार आणि उद्योगाला प्रोत्साहन देण्याचा दृष्टिकोन १८६० सालापासूनच अवलंबिला. 'द्रष्टा' नेता म्हणतात त्याचं हे उत्तम उदाहरण!
लेखाच्या पुढील भागात दादाभाई, डिग्बी, कर्झन, के. टी. शहा ह्या तज्ञांनी मांडलेल्या एकंदरीत राष्ट्रीय उत्पन्न आणि त्या अनुषंगानं काढण्यात येणारं दरडोई उत्पन्न ह्या आकड्यात कसा फरक होता आणि त्यामागील कारणं ह्यांचा ऊहापोह करण्यात आला आहे. दीडशे वर्षापुर्वी सुद्धा प्रगत विचारसरणी आणि सखोल अभ्यासू वृत्ती ह्यांची सांगड घालणारे नेते आपल्याला लाभले होते हे आपलं सुदैव ! 'भारतीय आर्थिक राष्ट्रवादाची गंगा ह्या उदात्त ध्येयानं प्रेरित झालेल्या महर्षीनं परिवर्तित केली' विचाराला प्रवृत्त करणाऱ्या वाक्यानं ह्या लेखाचा शेवट होतो.
ह्या दोन लेखांनी माझ्यावर आज बराच सकारात्मक प्रभाव पाडला आहे. प्रतिकुल परिस्थितीत (आजच्या काळाच्या तुलनेत ज्ञानसंपादनास करावे लागणारे अथक परिश्रम) दादाभाई ह्यांनी सखोल अभ्यासाद्वारे ब्रिटिश साम्राज्यशाहीशी अधिकृत मार्गानं आर्थिक राष्ट्रवादासाठी कसा लढा दिला ह्याचं वर्णन मला उत्साहित करून गेलं. मोठं ध्येय प्राप्त करायचं असेल तर कठोर परिश्रमाला पर्याय नाही हे आपल्याला जरी माहीत असलं तरी दैनंदिन जीवनाच्या रगड्यात ही शिकवणूक कुठंतरी मनाच्या कोपऱ्यात ढकलली जाते. असे लेख ह्या शिकवणुकीला पुन्हा एकदा आपल्या मुख्य विचारांच्या प्रवाहात घेऊन येतात. सद्यपरिस्थितीत काहीसं निराश झालेलं मन पुन्हा एकदा अथक परिश्रमाची कास धरण्यास सज्ज होतं. धन्यवाद साप्ताहिक सुट्टीच्या दिवसातील पुरवण्या !
प्रखर देशाभिमानी, भारताचे पितामह दादाभाई नवरोजी यांना द्विजन्मशताब्दीनिमित्त त्रिवार वंदन. दिडशे वर्षांपूर्वी देशात राजकीय स्वातंत्र्य, समाजसुधारणा याबरोबरच आर्थिक प्रगती महत्त्वाची आहे, हे ओळखून त्यादृष्टीने सखोल अभ्यास व कठोर परिश्रमाने ब्रिटिश साम्राज्यशाहीशी आर्थिक राष्ट्रवादासाठी त्यांनी दिलेला लढा आपल्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे . भारताच्या राष्ट्रीय संपत्तीची पहिली गणना जनतेसमोर मांडणारे अर्थप्रबोधक दादाभाई नवरोजींसारखे महान व्यक्तिमत्त्व आपल्या देशाला लाभले , हे आपलं सद्भाग्य आहे. आज अशा व्यक्तीमत्त्वांची गरज आहे.
उत्तर द्याहटवाआदित्य भाई, तुम्ही अतिशय उद्बोधक असा लेख लिहिला आहे. दादाभाईंच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकून, ध्येयप्राप्तीसाठी कठोर परिश्रमाची कास धरली पाहिजे, हा दिलेला संदेश खूपच लाखमोलाचा आहे .खूप छान लेख लिहिला आहे.
प्रखर देशाभिमानी, भारताचे पितामह दादाभाई नवरोजी यांना द्विजन्मशताब्दीनिमित्त त्रिवार वंदन. दिडशे वर्षांपूर्वी देशात राजकीय स्वातंत्र्य, समाजसुधारणा याबरोबरच आर्थिक प्रगती महत्त्वाची आहे, हे ओळखून त्यादृष्टीने सखोल अभ्यास व कठोर परिश्रमाने ब्रिटिश साम्राज्यशाहीशी आर्थिक राष्ट्रवादासाठी त्यांनी दिलेला लढा आपल्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे . भारताच्या राष्ट्रीय संपत्तीची पहिली गणना जनतेसमोर मांडणारे अर्थप्रबोधक दादाभाई नवरोजींसारखे महान व्यक्तिमत्त्व आपल्या देशाला लाभले , हे आपलं सद्भाग्य आहे. आज अशा व्यक्तीमत्त्वांची गरज आहे.
उत्तर द्याहटवाआदित्य भाई, तुम्ही अतिशय उद्बोधक असा लेख लिहिला आहे. दादाभाईंच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकून, ध्येयप्राप्तीसाठी कठोर परिश्रमाची कास धरली पाहिजे, हा दिलेला संदेश खूपच लाखमोलाचा आहे .खूप छान लेख लिहिला आहे.
धन्यवाद शोभाताई ! आपल्यासारख्या जाणकार व्यक्तीकडून आलेली प्रतिक्रिया खूप समाधान देऊन जाते !
हटवाधन्यवाद भाई 🙏
उत्तर द्याहटवा