भारताला लौकिकार्थानं स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे झाली. आपण खऱ्या अर्थानं स्वतंत्र झालो का ह्याविषयी माझे काही विचार !
१. स्वातंत्र्य नक्की कशापासून मिळवायचं आहे ह्या विषयी प्रत्येकाच्या विचारात प्रचंड तफावत आहे. आहार, पोषाख ह्या मुलभूत गोष्टींपासून सुरु होणारी स्वातंत्र्याची आस जीवनाच्या अनेक पैलूंना इतक्या खोलवर स्पर्शून जाते किंबहुना त्या पैलूंमध्ये इतका आमूलाग्र बदल घडवून आणते की ही आस धरणारी व्यक्ती नक्कीच मनात कुठंतरी खोलवर हादरते. ह्यात आपण रेखाटलेलं स्वातंत्र्याचं चित्र आपल्या पुढील पिढीने ज्या महाकाय प्रमाणात पुढं नेलेलं असतं त्याचा मोठा वाटा असतो. पण आपण हादरलो आहोत हे बाहेरच्यांशी सोडा पण स्वतःशीही कबूल करण्याचं स्वातंत्र्य आपण गमावून बसलो असतो.
२. पाश्चिमात्य देशांच्या अर्थव्यवस्थेवर आधारित नोकऱ्या गेल्या अनेक वर्षांत प्रचंड प्रमाणात वाढल्या. भारताच्या महानगरातील विशिष्ट वर्गाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्यात ह्या नोकऱ्यांनी मोठा हातभार लावला. परंतु ह्या नोकऱ्या करताना तिथल्या संस्कृतीशी आधारित आहार, पोषाख, सण, विवाहपद्धती ह्यांनी कधी हळूच आपल्या जीवनात प्रवेश करत मग ठाण मांडलं हे आपल्याला समजलंच नाही. इतकंच काय आपली माय मराठी भाषा देखील ह्या आक्रमणाखाली दबली गेली. ह्या साऱ्यातून आपल्याला स्वातंत्र्य मिळावं असं आपल्याला वाटतंय का हा मुलभूत प्रश्न !
३. वरील मुद्दा लक्षात घेता पाश्चिमात्य देशांनी प्रभावित केलेली जीवनपद्धती प्रथम महानगरात प्रवेश करती झाली. त्यानंतर चित्रपट, मालिका ह्याद्वारे तिचा शिरकाव गावागावांत होऊ लागला. संपूर्ण भारताचं चित्र लक्षात घेतलं तर फार मोजक्या लोकांना ही जीवनपद्धती स्वीकारणं आर्थिकदृष्टया शक्य आहे. पण सोशल मीडियाने आपल्या घराघरांत ठाण मांडून बसायला मदत केलेल्या ह्या जीवनपद्धतीपासून आपल्याला स्वातंत्र्य मिळेल का हा मोठा प्रश्न !
४. आपलं वस्तुनिष्ठ परीक्षण करून, मोठ्यांचा / जाणकारांचा सल्ला घेऊन त्यानुसार वागावं ह्या मानसिकतेला आपण केव्हांच तिलांजली दिली आहे. हल्ली भारतातील बहुसंख्य लोक विविध कारणास्तव स्वतःला श्रेष्ठ समजू लागले आहेत. ह्या अकारण श्रेष्ठत्वाच्या भावनेतुन आपल्याला स्वातंत्र्य मिळावं ही माझी इच्छा !
५. मुद्दा क्रमांक दोन वर आधारित जीवनशैलीसाठी आवश्यक किती गंगाजळी तुमच्यापाशी असावी ह्याचे मोठाले आकडे अर्थतज्ञ मांडत आहेत. प्रात्यक्षिक दृष्ट्या विचार करता फार मोजक्या लोकांना ही गंगाजळी जमविणे शक्य आहे. ह्या मोठमोठ्या आकड्याच्या दडपणातून मुक्त होण्याचं स्वातंत्र्य तुम्हांला मिळावं ही माझी इच्छा !
अखेरीस फेसबुकवरील माझ्या प्रत्येक पोस्टला लाईक मिळायलाच हवेत ह्या मनातील सुप्त इच्छेपासून सुद्धा मला कधीतरी स्वातंत्र्य मिळावं ही माझी माझ्यासाठी इच्छा !
येत्या शुक्रवारी येणाऱ्या भारताच्या स्वातंत्र्यदिनी ह्या विविध छुप्या पारतंत्र्यातून मला आणि तुमची इच्छा असल्यास तुम्हांला स्वातंत्र्य मिळावं ही शुभेच्छा !
खूप योग्य विचार, मुद्देसूद मांडणी आणि हळूच चिमटा घेण्याची नर्मविनोदी शैली
उत्तर द्याहटवा