मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, २० मे, २०२३

अप्पू


खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. दंडकारण्य जंगलात एक हत्तींचा कळप राहत असे. ह्या कळपाचे नेतृत्व एक अनुभवी हत्तीण देवयानी करत असे. कळपात एक दोन नर हत्तींचा अपवाद वगळला तर सर्व हत्तिणी आणि त्यांची बालके होती. ह्यातील एक बाल हत्ती म्हणजे अप्पू ! 

कळपातील हत्तीचं आयुष्य कष्टदायक असलं तरीही त्यात धमाल सुद्धा होती. प्रचंड आकारमानाच्या ह्या हत्तींना दररोज प्रचंड प्रमाणात हिरवा चारा लागत असे. दररोज अरण्याच्या विविध भागात सर्वांना चाऱ्याच्या शोधात घेऊन जाणं ही देवयानीची मोठी जबाबदारी होती.  अरण्यात वाघ, सिंहांचे मोठमोठे कळप असत. वाघ, सिंह सहसा कळपातील हत्तींच्या वाट्याला जात नसत. पण देवयानीने आयुष्यभरात बरंच काही पाहिलं होतं. संधी मिळाली की वाघ सिंह झुंडीने हत्तीच्या कळपातील बालकांना लक्ष करीत असत. 

यंदा पाऊस कमी झाल्यानं देवयानी चिंतेत होती. भरपेट चारा खाऊन झाल्यानंतर हा कळप नदीत येथेच्छ डुंबायला जात असे. ह्या वर्षी नदीचे पात्र बऱ्याच आधीपासून अरुंद सुरुवात झाली होती.  उन्हाळासुद्धा जणू काही अत्यंत तीव्र होता.  एके रात्री पेंगुळलेला अप्पू आपल्या आईची वाट पाहत होता. पण देवयानी, आई आणि अजून दोन अनुभवी हत्तिणी एका गंभीर चर्चेत गुंतल्या होत्या. शेवटी बिचारा अप्पू एकटाच जागेवर झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळच्या थंड वाऱ्यानं अप्पुला जाग आली. बाजूला आई गाठ झोपलेली होती. रात्रीच्या आठवणीने अप्पू पुन्हा रागावला आणि बाहेर चालायला लागला. पण आईनं त्याची शेपटी ओढली. अप्पूने वळून पाहिलं तर ती झोपलेलीच होती. हाच प्रकार दोन तीनदा झाल्यावर मात्र अप्पू चिडला.  "काल रात्री मला गाई गाई करायला का आली नाहीस ?" त्यानं रागानं आईला विचारलं. आई काहीच बोलली नाही. 

अजून दोन आठवडे गेले. नदीचे पात्र आता बहुतांश सुकले होते. जिथं हे सर्व हत्ती मनसोक्त डुंबायचे तिथं आता पोटभर पाणी मिळायची सुद्धा मारामार झाली होती. एके रात्री चेहऱ्यावर गंभीर भाव घेऊन आई अप्पूकडे आली. "अप्पू, उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, आपण आपलं गांव सोडून मोठ्या नदीच्या दिशेनं जात आहोत" आई म्हणाली. अप्पुला मोठाच धक्का बसला. आजूबाजूची माकडं अप्पूचे लाड करीत. हळूच एखादं गोड फळ अप्पुकडे झाडावरून फेकीत. बाजूची हरणे अप्पूकडं पाहून हसत. त्यांना घाबरविण्यासाठी अप्पू त्यांच्या दिशेनं लुटुपुटीची धाव घेत असे. दररोज दिसणारा एक ससा देखील अप्पुच्या परिचयाचा झाला होता.  ह्या सर्वांना सोडून जायचं अप्पूच्या जीवावर आलं होतं. पण आई ऐकायच्या मनःस्थितीत नव्हती. अप्पू बिचारा हिरमुसला होऊन झोपी गेला. 

"अप्पू, उठ लवकर!" आई आपल्या सोंडेने अप्पुला उठवत होती. अजूनही खरंतर अंधारच होता. पण इतका लांबवर पल्ला गाठायचा म्हणजे सकाळी लवकर निघणं आवश्यक होतं. सर्वांनी पुर्व दिशेला चालायला सुरुवात केली. सुरुवातीला अजूनही डोळ्यावर झोप असल्यानं अप्पुला वेगानं चालायला कठीण जात होते. पण थोड्याच वेळात त्यानं वेग पकडला. भोवतालचा नवीन प्रदेश पाहून अप्पू खरंतर हरखून गेला होता.  पण कळपाला एके जागी थांबायला वेळ नव्हता. "आई, देवयानी आजीला नक्की रस्ता कसा काय माहिती आहे?" अप्पूने आईला प्रश्न विचारला.  मनातील प्रश्न मोकळेपणानं विचारायचं स्वातंत्र्य जसं लहान मुलांना असतं तसं मोठ्यानं सुद्धा असतं तर किती बरं झालं असतं असा विचार आईच्या मनात आला. तिच्या मनात सुद्धा नेमका तोच प्रश्न होता. तिनं सुद्धा त्यांच्या जंगलापलीकडं बाहेर पडण्याची ही पहिलीच वेळ होती. "तिला सगळं काही माहिती असतं" तिनं वेळ मारून नेली. 

एव्हाना अप्पूच्या पोटात कावळे ओरडू लागले होते. ह्या भागात वृक्ष कमी असल्यानं वाढत्या उन्हाचा तडाखा अप्पुला अधिकच लागत होता.  "आई मला भूक लागली" चालताचालता अप्पू म्हणाला. "आता थोड्याच वेळात आपण थांबू हं !" आईने त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. "अर्ध्या तासापूर्वी सुद्धा तू हेच म्हणाली होतीस" अप्पू केविलवाण्या चेहऱ्यानं म्हणाला. आता आईसुद्धा चिंतेत पडली होती. अजून तासभर जर हिरवागार चारा मिळाला नाही तर? मनात येणाऱ्या ह्या विचारला तिनं महत्प्रयासानं थोपविलं. कळपांच्या स्थलांतराच्या वेळी बालकांच्या जीवाला सर्वात जास्त धोका असतो हे ती जाणून होती.  काही वेळानं अप्पू बिचारा एका जागी दमून बसला. आईला क्षणभर समजलं सुद्धा नाही. पण लक्षात येताच लगेचच ती मागे  वळली. "अप्पू, उठ ना! मी आहे तुझ्यासोबत !" अंगातील सर्व बळ संचारून अप्पू उठला. आईच्या मनातील चिंता अधिकच गहिरी झाली होती. 

सुदैवानं काही वेळातच हिरवागार परिसर आला. अप्पूच्या अंगात नवीन बळ संचारलं. तिथं पोहोचताच त्यानं चाऱ्यावर ताव मारला. आईनं सुद्धा उंच झाडावरील चविष्ट पाला अप्पुला दिला. हा भोजनाचा कार्यक्रम अर्धा तासभर चालला. अप्पुला आता झोप अनावर झाली होती. काही वेळ अप्पुला झोपू देत असं आई नजरेने देवयानी आजीला समजविण्याचा प्रयत्न करीत होती. पण देवयानीच्या डोळ्यात वेगळीच चिंता होती. तिनं सर्व मोठया हत्तिणींना जवळ बोलावलं. "थोड्याच वेळात आपल्याला ज्या भागातून पुढं जायचं आहे तिथं सिंहांचा एक आक्रमक कळप आहे. त्या भागातून संक्रमण करणाऱ्या प्रत्येक प्राण्यांच्या कळपावर ते हमखास हल्ला करतात. आपल्याला अप्पूची खास काळजी घ्यावी लागेल" 

आईने मनोमनी देवाची प्रार्थना सुरु केली. अप्पुला केवळ पाच मिनिटेच झोपण्याची संधी मिळाली. ह्यावेळी त्याला उठविण्यासाठी देवयानी आजी आल्यानं त्याच्यापुढे पर्याय नव्हता. अचानक कळपाच्या सदस्यांच्या चेहऱ्यावर अप्पुला गंभीर भाव दिसू लागले. मोठ्या हत्तिणींनी अप्पूभोवतीकडे केले. "मला चालायला जमत नाही, तुम्ही माझ्याभोवती गर्दी करू नका!" अप्पू रागावून म्हणाला. त्याचं म्हणणं कोणी ऐकलं नाही.  अप्पुला भोवतालचं काही दिसत नव्हतं. अचानक हलकल्लोळ सुरु झाला. देवयानी आजी आणि अजून दोन मोठ्या हत्तिणी वेगानं पुढे धावत जाताना अप्पुला दिसल्या. आणि मग अप्पुला तो महाकाय सिंह दिसला. तो ह्या कळपावर आक्रमण करण्याच्या पवित्र्यात होता. परंतु देवयानी आजीच्या नेतृत्वाखाली हत्तिणींनी त्याचे हे आक्रमण यशस्वीरीत्या परतवून लावले. अप्पू आईच्या कुशीत दडला होता. इतक्यात आईनं मोठ्यानं आवाज दिला. कळपातील समोरील संरक्षक कवच दूर झाल्याची संधी साधत दुसरे दोन सिंह अप्पूच्या दिशेनं धावून येत होते. आईतील वाघीण जागी झाली. तिने मोठ्या शौर्याने एका सिंहावर आक्रमण करीत त्याला आपल्या पायानं जोरदार धक्का दिला. पण तिला अप्पुपासून काहीसं दूर जावं लागलं होतं. ती संधी साधत दुसरा सिंह अप्पूच्या अगदी जवळ पोहोचला. आईने हे पाहिलं आणि तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं. आता ती काहीही करू शकत नव्हती. येणाऱ्या दुर्धर प्रसंगाच्या कल्पनेनंच तिनं डोळे मिटले. क्षणभरातच तिच्या कानावर सिंहाची वेदनादायक गर्जना पडली. सुरवातीचा हल्ला परतविणाऱ्या देवयानीने हे नवीन आक्रमण पाहिलं होतं आणि दुसरा आडवळणाच्या मार्गानं ती तात्काळ अप्पूपाशी पोहोचली होती. काळ आला होता पण वेळ आली नव्हती ! 

काही काळ सिंहांचा कळप भोवताली फिरत राहिला. पण देवयानीच्या अनुभव आणि आक्रमकतेच्या पुढे त्यांची डाळ शिजली नाही. भेदरलेला अप्पू आणि काही न सुचू शकणारी आई निमूटपणे चालत होते. शेवटी सिंहांच्या कळपाने ह्यांचा नाद सोडला. देवयानीने एक विशिष्ट आवाज करत आता आपण सुरक्षित असल्याची सर्वांना सूचना दिली. थोड्याच वेळात रात्र झाली.  रात्र वैऱ्याची होती. अनोळखी प्रदेशात कोणत्या दिशेनं हल्ला होऊ शकतो ह्याचा अंदाज बांधणं अवघड होते. त्यात दिवसभर इतका लांबचा पल्ला गाठल्याने सर्वजण दमले होते. 

अप्पू थोड्याच वेळात सारं काही विसरला होता. कळप अंधारात एका जागी बसला होता. सुरक्षित अंतरावर अप्पू चारा खात होता. अचानक त्याला त्याच्याइतकंच छोटं दुसरं हत्तीचं पिल्लू दिसलं. अप्पू धावतधावत त्याच्यापाशी गेला. सोंडेने त्या पिल्लाला कुरवाळू लागला. "तुझं नांव काय?" अप्पूने त्याला विचारलं. "टिनू" त्यानं गोड आवाजात उत्तर दिला. टिनूसोबत फक्त त्याची आईच होती. "तुमचा कळप कुठे आहे? " अप्पूने त्याला विचारलं. "कळप म्हणजे काय? आम्हीतर दोघेच आहोत" टिनू म्हणाला. अप्पूच्या मनात एक विचार आला. तो धावत धावत आईकडं गेला. "आई, आई, तो बघ टिनू. तो आणि त्याची आई असे दोघेच राहतात, आपण त्यांना आपल्या कळपात घेऊयात का?" आईला सुद्धा ही कल्पना आवडली. पण तिला देवयानी आजीचं उत्तर माहिती होतं. तिनं देवयानीकडं पाहिलं. नजरेत ठाम नकार होता. 

रात्रभर अनुभवी हत्तिणी जागरण करत बसल्या. काही आक्रमक पशु जवळ येऊन पाहणी करत राहिले. परंतु ह्या कळपावर आक्रमण करणं कठीण असल्याचा निष्कर्ष काढून दूर गेले. टिनू आणि त्याची आई सुद्धा अवतीभवतीच राहिल्या. ह्यांचं आज निभावलं, पुढे ह्यांचं कसं व्हायचं ह्या विचारानं अप्पूची आई चिंताग्रस्त झाली. 

दुसरा दिवस उजाडला. दमछाक झालेला कळप नाईलाजानं पुढे निघाला. अजूनही बराच मोठा पल्ला गाठायचा होता. आजचं उन्ह काही वेगळ्याच तीव्रतेचं होते. अप्पू बिचारा पुरेपूर दमला होता. दुपारी तर एक वेळ अशी आली की तो बिचारा गलितगात्र होऊन जमिनीवर पडून गेला.दमलेल्या आईचे त्याला उठविण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ होत होते. कळप चिंताग्रस्त झाला होता. एका क्षणानंतर देवयानी कठोर निर्णय घेईल ह्याबाबत कोणाच्याच मनात शंका नव्हती. अचानक आईला दूरवर टिनू आणि त्याची आई दिसली. आईने टिनूच्या आईला आवाज देऊन बोलावलं. टिनू मोठ्या प्रेमानं जोरजोरात धावत आला. टिनूने सोंडेने अप्पुला गोंजारले. काही वेळ झाला तरीही अप्पूचा काहीच प्रतिसाद नव्हता. सर्वांच्या मनातील चिंता अजूनच गहिरी झाली होती. आणि अचानक अप्पूच्या पायांची हालचाल झाली. हळूहळू त्यांनं डोळे उघडले. टिनूला पाहताच अप्पू ताडकन उठून बसला. कळपाने हर्षोत्कार केला. अप्पूच्या आईने पुन्हा एकदा देवयानीकडे पाहिलं. तिला आश्चर्याचा धक्का बसला. तिच्या नजरेत होकार होता. अप्पुला कायमचा मित्र मिळाला होता. 

आता अप्पूच्या आणि कळपाच्या पायात नवीन बळ संचारलं होतं. सायंकाळ होत होती आणि त्या नदीचे विशाल पात्र कळपाच्या नजरेस पडले. सर्वजण धावतच नदीत शिरले. येथेच्छ पाणी प्याल्यानंतर पाण्यात खेळणाऱ्या अप्पू आणि टिनूकडे त्यांच्या माता आणि देवयानी मोठ्या कौतुकानं पाहत होते. पलीकडच्या काठावर वास्तव्य करणाऱ्या मगरीच्या समूहाला देवयानीच्या तीक्ष्ण नजरेने केव्हाच टिपले होते. पण त्यांची चिंता आज करण्याची तिची तयारी नव्हती. आपल्या कळपाला सुरक्षितपणे इतके अंतर आणणे हा तिच्या नेतृत्वगुणांचा मोठा विजय होता. पावसाळा येईपर्यंत इथंच कळपाला सुरक्षितपणे ठेवणे हेच तिचं ध्येय होतं.  छोट्या अप्पूच्या अनुभवविश्वात दोन दिवसांत अनेक वर्षांची भर पडली होती. अनेक वर्षानंतर जर त्याला हेच मार्गक्रमण करावं लागलं तर त्याला गेल्या दोन दिवसातील हा मार्ग पक्का लक्षात ठेवणं आवश्यक होतं. 

(Discovery / Animal planet किंवा तत्सम वाहिन्यांवर पाहिलेल्या सत्यघटनेवर आधारित! फक्त त्यातील टिनूला कळपात घेण्यात आले नाही. अप्पुला त्यांच्याच कळपातील दुसऱ्या पिल्लाने उठविले )

सोमवार, १ मे, २०२३

मेनफ्रेमपासून शिकण्यासारखं !


 

कार्यालयीन कामाबद्दल खोलात काही लिहायचं नाही हा अलिखित नियम मी ब्लॉग लिहिताना पाळतो. तरीही काही खास प्रसंगी कार्यालयीन घटना पोस्ट लिहण्यास उद्युक्त करतात.  तर मेनफ्रेमचा ५९ वा वाढदिवस आम्ही ह्या महिन्यात साजरा केला. मेनफ्रेम तशी प्रसिद्धीपासून दूर राहणारी. त्यामुळं पोस्टला फोटो दिलाय तो मेनफ्रेमचा प्रतिस्पर्धी क्लाउड (ढगाचा !). 

मेनफ्रेमपासून बरंच काही शिकण्यासारखं ! वर्षानुवर्षे सातत्यानं दशलक्षाच्या पटीतील ग्राहकांची माहिती अत्यंत वेगानं हाताळून शांतपणे काम करणारे हे मेनफ्रेम संगणक ! माहिती आणि संगणक क्षेत्रातील आधुनिकीकरणामुळं गेले कित्येक वर्षे म्हटलं तर हे धोक्याच्या पटलावर आहेत. परंतु ह्या मेनफ्रेम संगणकावरील लक्षावधी ओळींची क्लिष्ट आज्ञावली ज्या सफाईदारपणे काम करतेय त्यामुळं तिला सहजासहजी बदलणं भल्याभल्यांना कठीण जात आहे. ह्यात सर्वात महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे मेनफ्रेमवर जी आज्ञावली आहे त्याद्वारे जे अनेक व्यावसायिक नियम लक्षावधी ग्राहकांच्या डेटावर अंमलात आणले जातात, त्यात खूपच खोलवर क्लिष्टता आहे. ह्यालाच Domain Knowledge असं म्हटलं जातं. 

माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अजूनही एक असा वर्ग आहे जो ह्या व्यावसायिक नियमांच्या ज्ञानाच्या आधारे आपलं स्थान अबाधित राखून आहे. मुद्दा असा आहे की Domain Knowledge आणि तंत्रज्ञान ह्यात नक्की समन्वय कसा साधावा?  तुम्ही कितीही काही म्हणा पण एका विशिष्ट वयानंतर बहुतांशी व्यावसायिकांची तंत्रज्ञानात होणाऱ्या सततच्या बदलासोबत त्या वेगानं बदलण्याची क्षमता काही प्रमाणात कमी होत जाते. पण जर तुमच्याकडं खोलवर Domain Knowledge असेल तर तुम्ही ह्या झपाट्यात टिकाव धरण्याची शक्यता वाढीस लागते. 

त्यामुळं माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रत्येक वर्षांच्या शेवटी आपण कोणत्या नवीन भाषा शिकलो ह्यासोबत आपण Domain Knowledge मध्ये काय भर घातली ह्याचा आढावा घेणं आवश्यक आहे. इथं ह्यासोबत एक महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे आपल्याजवळील ह्या व्यावसायिक ज्ञानाला विविध व्यासपीठांवर सादर करण्याची कला. हे व्यावसायिक ज्ञान तुम्हांला कनिष्ठ प्रोग्रॅमर्ससमोर, तुमच्या बरोबरच्या व्यवस्थापकांसमोर, CIO समोर आणि ज्यांना ह्यातील ओ की ठो समजत नाही अशा लोकांसमोर सादर करावं लागतं. अशावेळी आपल्याला  समोर असलेल्या गटानुसार  त्याच माहितीचे विशिष्ट  शब्दांत, उपलब्ध वेळेनुसार, त्यांना रुचेल अशा पद्धतीनं सादरीकरण करता यायला हवं. बऱ्याच वेळा CIO / CEO माणसं आपल्याला सांगतात की "तुझ्याकडं तुझा मुद्दा समजावून द्यायला ९० सेकंद आहेत, त्यात तुला काय म्हणायचंच ते सांग!"

अजून एक मुद्दा स्मरणशक्तीचा. काही दीर्घकालीन चालणाऱ्या प्रोजेक्ट्स मध्ये एक - दीड वर्षांपूवी चर्चिला गेलेला मुद्दा अचानक परत ऐरणीवर येतो. अशावेळी त्यावेळी नक्की काय ठरलं होतं ह्यासंबंधी तुम्हांला एक तर तात्काळ आठवून सांगता यायला हवं किंवा त्यावेळचे ई - मेल झटकन शोधून काढता यायला हवं. इथं तुमची शिस्तबद्धता कामास येते. शिस्तबद्धतेवरून आठवलं ते म्हणजे तुमची नियमितता. महत्वाच्या कॉल्ससाठी वेळेवर हजर राहणं, त्या कॉलसाठी आपल्याकडून जी माहिती अपेक्षित आहे त्यासाठी पूर्वतयारी करून ती माहिती सादर करणे ह्या वरकरणी छोट्या वाटणाऱ्या गोष्टी ecosystem मध्ये  नक्कीच नोंदल्या जात असतात. ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून तुमचा ब्रँड बनत जातो. ही नियमितता आणण्यासाठी तुमच्या जीवनात जर एक विशिष्ट वेळापत्रक असेल, आहारात शिस्त असेल तर त्याचा नक्कीच उपयोग होतो. 

शेवटचा मुद्धा म्हणजे तुमचं People Skill. लोकांना तुमच्यासोबत काम करायला कितपत आवडतं हा मुद्दा एका विशिष्ट वर्षांच्या अनुभवानंतर महत्वाचा बनत जातो. इथं तुमच्या वागण्यात कितपत खरेपणा (genuine) आहे, वरिष्ठ आणि कनिष्ठ लोकांसमोर तुमच्या वागण्यात सातत्य आहे का वगैरे मुद्दे महत्वाचे असतात. अर्थात काही लोकांसाठी ह्या मुद्द्यापेक्षा यशाच्या शिड्या वेगाने चढणे हे  अधिक महत्वाचे असते. 

हा लेख लिहिण्याचं प्रयोजन - ह्या क्षेत्रातील नवीन पिढीला हा संदेश द्यायचा आहे की माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दीर्घकालीन पल्ला गाठण्यासाठी सतत  तंत्रज्ञान शिकण्यासोबत जुन्या काळातील अनेक मुल्यांचा अंगीकार करणे हे सुद्धा महत्वाचं आहे.  तात्काळ यशाइतकीच  दीर्घकालीन संयत कारकीर्द सुद्धा समाधानकारक असते! 

(तळटीप - हा माणूस मेनफ्रेमपासून आरंभ करीत इथं कसा पोहोचला असा प्रश्न तुम्हांला पडला असेल तर तुम्ही एकटे नाही आहात, मी ही तुमच्यासोबत आहे !)

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...