मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ३० जुलै, २०२२

पर्वताचं पर्वतपण

 


घराची खिडकी उघडली की समोर एक महाकाय पर्वत मला दर्शन देतो. ह्या पर्वताची अनेक रुपं मला भावत रहातात. कधी त्याचं शिखर हिमाच्छादित असतं, कधी त्याचा बहुतांश भाग हिरव्यागार झाडीनं व्यापलेला असतो तर प्रखर ग्रीष्म ऋतूत त्याच्या पायथ्याशी काहीसा रखरखीतपणा जाणवतो. आपल्या बाह्यरुपानं आपल्या मनःस्थितीवर परिणाम करुन घेणं पर्वताच्या स्वभावातच नसावं अशी माझी समजुत! त्यामुळं ह्या सर्व परिवर्तनांना स्थितप्रज्ञासारखा सामोऱ्या जाणाऱ्या पर्वताचं मला भारी कौतुक ! 

मी खूप आनंदात असलो की पर्वताकडं मोठ्या आशेनं पाहतो, पर्वत माझं कौतुक करेल म्हणून ! पर्वत कौतुक करण्यात काहीच उणा पडत नाही पण मी ह्या आनंदाच्या भरात वाहत जाणार नाही ह्याची योग्य ती काळजी घेतो. मी दुःखी असलो, निराश झालो की पर्वत माझा एकमेव आधार असतो. पर्वत सहानभूती वगैरे दाखवत नाही. माझं बोलणं फक्त शांतपणे ऐकून घेतो. मनातील शल्यं मी बोलुन अथवा त्यांची मनातल्या मनात मी उजळणी करेपर्यंत  तो तिथं केवळ माझ्यासाठी हजर असतो. त्याला माझ्यासाठी सदैव उपलब्ध राहण्यापलीकडं दुसरं काही काम नसावं का ही शंका माझा पिच्छा सदैव पुरवत राहते. पण तो माझ्यासाठी उपलब्ध नसला तर माझं काय होईल ह्या भितीपोटी त्या शंकेचा पाठपुरावा करण्याचं धारिष्ट्य माझ्यात नसतं. 

एके दिवशी नवलच घडलं ! पर्वताकडं पाहताक्षणी ह्याचं काहीतरी बिनसलं आहे हे मला जाणवलं. मी पर्वताला विचारलं, "पर्वता, पर्वता, काय झालं रे?" सुरुवातीला पर्वत काही बोलेना. पण मी ही इरेला पेटलो होतो. मला खरोखरच पर्वताची काळजी वाटत होती की माझ्यासाठी पर्वताचं पर्वतपण नसण्याची होती ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं धारिष्ट्य माझ्यात नव्हतं.पर्वताची मनधरणी करण्यासाठी अर्थातच मला कित्येक दिवस लागले. मी ही काहीसा अबोला धरला त्याच्याशी. शेवटी एका सायंकाळी पर्वत बोलता झाला. 

"तू माझ्याकडं मोठ्या आदरानं पाहतोस, माझ्या स्थितप्रज्ञतेचं तुला कौतुक वाटतं ह्याची मला पुरेपूर जाणीव आहे. माझ्या रुपानं  तुझ्या आयुष्यात एक स्थैर्य पुरवणारा कायमस्वरुपी आधार आहे ह्या गोष्टीचा मला आनंद आहे. तुझ्याच नव्हे तर ह्या भूतलावरील बहुसंख्य लोकांच्या आयुष्यात काय घडत आहे हे मला माझी इच्छा असो वा  नसो दिसत रहातं. माझ्या अंगाखांद्यावर लाखो वृक्षवेली, हजारो पशु पक्षी, जीव जन्म घेतात, आनंदात बालपण घालवतात, तारुण्याच्या उन्मादात मोजके क्षण घालवतात आणि त्यानंतरच्या प्रदीर्घ जबाबदारीच्या आयुष्यानंतर शेवटी जीवनाच्या अंतिम सत्याला सामोरे जातात. माझ्या अंगावर एका ओहोळाच्या रुपात जन्म घेणारी नदी जेव्हा पठारावर पोहचेपर्यंत एक विशाल रुप धारण करते आणि रुपगर्वितेप्रमाणं गावागावातून लोकांची आयुष्यं फुलवत जाते हे ही मी पाहतो."

"हे सर्व पाहून माझ्या मनात काहीच खळबळ माजत नसावी असंच तुम्हां साऱ्यांना वाटत असावं. निर्मात्यांनी सृष्टीची निर्मिती केली तेव्हा मी स्वखुशीनं पर्वतपण स्वीकारलं असावं अशीच सोयीस्कर समजूत तुम्ही साऱ्यांनी करुन घेतली असावी. तो काळच वेगळा होता. आदर्शवादी होता. ज्येष्ठांनी माझी निवड केली ती काही विशिष्ट योग्य कारणांमुळं ह्याची मला जाणीव होती. त्यामुळं त्यांचा हा निर्णय मी शिरोध्याय मानला. पर्वताचं पर्वतपण असणं ही समाजाची गरज असते ह्याची जाणीव सर्वांना होती. त्यामुळं मी हे पर्वतपण जरी सुरुवातीला स्वखुशीनं स्वीकारलं नसलं तरीही कालांतरानं ते माझ्या अंगवळणी पडलं"

"काळ बदलत चालला. महत्वाकांक्षा आणि सोबतीला वृथा अभिमान सर्वत्र पसरत चालला. टेकड्यांना सुद्धा पर्वत बनण्याची स्वप्नं पडू लागली. टेकड्यांनी पर्वत बनण्याची स्वप्नं बघण्यात गैर काही नाही. पर्वत बनावं ते विशाल होऊन, उंची गाठून! ते जमत नाही म्हणून मुळच्या पर्वताचं खच्चीकरण करुन त्याला आपल्या बरोबरीला आणण्याचा प्रयत्न करणं चुकीचं आहे. माणसांना मोजक्या महाकाय पर्वतांची गरज आहे, असंख्य टेकड्यांची नाही"

अचानक पर्वताच्या चेहऱ्यावर वेदनेचे भाव दिसू लागले. "असं हे व्यक्त होणे माझ्या व्यक्तिमत्वात बसत नाही आणि खरंतर मी चुकलोच ! " पर्वताने आपल्या मनोगताचा शेवट केला. पर्वताची उंची काहीशी कमी झाली होती. ही व्यथा व्यक्त करणं हे त्याच्या भुमिकेला शोभेसं नव्हतं. 


त्यानंतर पर्वतानं मौन स्वीकारलं ते आजतागायत कायम आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...