मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, २७ जून, २०२१

पाऊस कोसळतच असतो ..







रविवार सकाळ.पावसाला वाटतं म्हणून तो कोसळू लागतो. रविवार सकाळी अंघोळ आटपुन निवांत बसल्यावर पाऊस सुरु होण्यासारखं सुख नाही. पाऊस आकाशातून लक्षावधी थेंबांना घेऊन धरतीमातेकडे येत राहतो. त्यातील बरेचसे थेट धरतीमातेच्या कुशीत विसावतात. पण काही मात्र झाडापानांवर विसावतात, नाखुशीने मग धरणीमातेकडं झेपावतात. थेट धरणीमातेच्या कुशीत सामावणाऱ्या अथवा प्रथम झाडापानांवर विसावणाऱ्या थेंबांच्या मनात आपल्या बाबतीत भेदभाव झाला आहे ही भावनाच मुळी नसते. पाऊस कोसळतच असतो ... 

पाऊस माणसांत भावनांची वादळं निर्माण करतो. माणसं विचारात गढून जातो. ह्या विचारांत काही सुसूत्रता नसते. विचार उगम पावतात, मेंदूपर्यंत पोहोचतात. काही मनाला सुखावतात, काही कष्ट देतात. मनाला रविवारी सकाळी कष्ट देणाऱ्या विचारांचा राग येतो. मेंदू त्यांना प्रयत्नपूर्वक दूर सारतो. समोर गच्चीवर कावळा पावसापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी बसलेला असतो. कावळे सकाळी शांत असतात, पण सायंकाळी मात्र खूप कावकाव करतात.  पावसात आपल्याला स्वतःचं हक्काचं घरटं नसल्यानं दुसऱ्यांच्या गच्चीवर आश्रय घ्यावा लागतोय ही अपराधी भावना मुळी त्या कावळ्याच्या मनात नसते !पाऊस कोसळतच असतो ... 

मन मग मागच्या काही पावसाळ्यांच्या आठवणीत गुंततं. मनाला गुंतण्यासाठी काहीही चालतं. कारण मन सध्या काहीसं हळुवार बनलेलं असतं. मनालाच प्रश्न पडतो की आज आपलं हळवं रुप का सामोरं यावं? मन ह्यासाठी पावसाला जबाबदार धरतं. पाऊस सांगतो, "अरे सध्या माझे दिवस आहेत, मी रिपरिप करत पडीन किंवा धोधो कोसळेन. माझ्या आगमनानं बरेच लोक उत्साहित झाले आहेत, निसर्गाच्या हाकेला ओ देत बाहेर पडले आहेत" मनाला पावसाचं हे म्हणणं पटतं. आपल्या मनस्थितीबद्दल कोणाला जबाबदार धरणं चुकीचं आहे हे मनच मनाला समजावत राहतं. पाऊस कोसळतच असतो ... 

मनाला अचानक एक उक्ति आठवते.  "Life is about becoming better version of yourself!" मन बंडखोरीच्या पवित्र्यात असतं. सुधारित ह्या संज्ञेचा अर्थच सापेक्ष नाही का?  जर ह्या संज्ञेचे विविध अर्थ शक्य असू शकतात तर त्यातील एकाच अर्थाच्या अनुषंगानं सतत स्वतःच्या सुधारित आवृत्तीचा ध्यास का धरावा? पाऊस कोसळतच असतो ... 

कसोटीच्या मोक्याच्या क्षणी भारतीय संघाला आपलं better version का सादर करता आलं नाही ? आठवड्यातील सर्वच दिवशी तुला स्वतःच्या better version च्या स्थितीत का पोहोचता आलं नाही? मनाचं बहुदा बंडखोर रुप जागृत झालं होतं. भोवतालच्या परिसंस्थेतील असंख्य घटक तुझ्या सादर होणाऱ्या रुपावर प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या परिणाम करत असतात. तुझं better version सादर व्हायचं असेल तर त्यातील महत्वाच्या काही घटकांशी होणारा तुझा संबंध सकारात्मक असायला हवा ! जसं परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्याला वर्षभराच्या अभ्यासासोबत शेवटच्या काही दिवसातील / आदल्या दिवशी केलेली  उजळणी, पुरेशी झोप, आहार महत्वाचा असतो. मन का कोणास ठाऊक समाजावणीच्या रुपाकडे पोहोचले होते.  पाऊस कोसळतच असतो ...

हे सारे लाड आहेत. एकदा का कर्मभूमीवर पोहोचले की प्रत्येक वेळी better नव्हे तर best version देता यायलाच हवं. बहुदा मन sinusoidal स्थितीतून जात असावं. कर्मभूमीवर पोहोचल्यावर त्याआधी काही घडलं ते सारं विसरता यायला हवं आणि उपलब्ध माहितीआधारे सर्वोत्तम कामगिरी बजावता यायला हवी !  पाऊस कोसळतच असतो ...

मनाला विचारांचं द्वंद्व झेपेनासं होतं. कावळा उडून दिसेनासा होतो. उरलेसुरले थेंब धरणीमातेच्या कुशीत आपल्या सवंगड्यांना भेटून सुखावलेले असतात. रविवार आता दुपारकडे झुकलेला असतो. एव्हाना पाऊस थांबलेला असतो ! 

रविवार, २० जून, २०२१

शेरनी !



आपल्या सभोवताली घडणाऱ्या एखाद्या घटनेवर आधारित चित्रपट निर्मिती करताना दिग्दर्शकासमोर दोन पर्याय उपलब्ध असतात. व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवून वास्तवाला बाजूला सारून चित्रपट निर्मिती करायची. यामध्ये एक दिग्दर्शक म्हणून तुम्हांला जे कलानिर्मितीचे स्वातंत्र्य मिळालेलं असतं त्याचा तुम्ही वापर करत असता.  व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होण्यासाठी हा दृष्टिकोन आवश्यक आहे अशी बऱ्याच निर्मात्यांची बॉलिवूडमध्ये धारणा आहे.  दुसरा दृष्टिकोन म्हणजे ज्या पद्धतीने ही घटना वास्तवात घडत असावी ती त्याच पद्धतीने सादर करण्याचा आटोकाट प्रयत्न करणे. शेरनी या चित्रपटाच्या निर्माता आणि दिग्दर्शक आणि दुसरा दृष्टिकोन स्वीकारलेला आहे. 

ही कथा उत्तर भारतातील वनखात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या एका जंगलातील वाघिणीची आणि त्या जंगलातील वनअधिकारी असलेल्या विद्या बालनची ! प्रतीकात्मकदृष्टया पाहायला गेलं तर कथेत दोघीही परिस्थितीच्या शिकार होतात. त्यामुळं शेरनी हे  चित्रपटाचं शीर्षक म्हटलं तर दोघींनाही नजरेसमोर ठेवून  देण्यात आलं असावं ! मूळ समस्या - वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी मनुष्यवस्तीनं जंगलांत केलेला शिरकाव, जंगली प्राण्यांच्या नेहमीच्या येण्याजाण्याच्या मार्गात येणारी गावं, शेतं आणि त्यामुळं बकऱ्यांसारख्या माणसानं पाळलेल्या प्राण्यांच्या शिकारीसाठी चटावलेले रानटी प्राणी.  हा संघर्ष आहे तो मनुष्यांच्या दोन दृष्टिकोनांचा. वनअधिकारी, वनखाते आणि पशुमित्र एका बाजुला तर येऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वाघिणीने घेतलेल्या मनुष्यबळींचे भांडवल करु पाहणारे राजकीय नेते.  विकास आणि पर्यावरण संतुलन ह्या दोन्ही गोष्टी पूर्णपणे परस्परविरोधी (mutually exclusive) आहेत; त्या गुण्यागोविंदाने एकत्र नांदु शकत नाहीत अशा आशयाचं विधान चित्रपटात एकदा येतं ! 

अशा निबिड अरण्यात बहुतांशी पुरुषांचं अधिराज्य असलेल्या वनखात्यात वरिष्ठ पदावर असलेल्या स्त्री अधिकाऱ्यांच्या समस्या विविध प्रसंगांमधून आपल्यासमोर येत राहतात. त्यावर ही एक समस्या आहे अशी स्पष्ट टिपण्णी करण्याचा मोह इथं टाळण्यात आला आहे. राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी न पडण्याचा आटोकाट प्रयत्न विद्या करते. पण कधीही त्याविरुद्ध ती बंड करुन उठताना दिसत नाही. ह्या सर्व दांभिकपणाला कंटाळून मी नोकरी सोडून मुंबईला येते असंही ती आपल्या नवऱ्याला म्हणते. पण माझ्या नोकरीचं काही खरं नाही त्यामुळं तुझी सरकारी नोकरी कशीही करुन टिकवून ठेव असंच नवरा म्हणतो. 

मनुष्य आणि वन्यप्राणी सहजीवन तत्वांचे पालन करुन राहू शकतात ही विद्या, वन्यमित्र आणि विरोधकांची भावना. ह्याउलट मनुष्याचा जीव महत्वाचा आहे त्यामुळं ह्या वाघिणीला तात्काळ मारलं पाहिजे ही दुसऱ्या बाजूची विचारधारणा ! त्यांच्यासोबत पंचवीस वाघांची शिकार केलेला एक गर्विष्ठ शिकारी! वाघिणीला आपल्या दोन बछड्यांसह एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जायचं असतं. ह्या मार्गात मनुष्यवस्तीसोबतच एक मोठाली खाण सुद्धा असते. काही दिवसांपुर्वी DW ह्या जर्मन वाहिनीवर कोळशांच्या खाणीमुळं भारतातील पिढ्यानपिढ्या जंगलात राहणाऱ्या हजारो लोकांची आयुष्यं कशी उध्वस्त झाली आहे ह्यावर हृदयस्पर्शी माहितीपट पाहिला होता त्याची ह्या निमित्तानं आठवण झाली. 

हा चित्रपट एका संथ लयीत पुढं सरकत राहतो. अनुभवायचा असेल तर त्या आदिवासी पाड्यातील एक रहिवासी म्हणून ह्याकडं पाहावं. काला पत्थरसारख्या चित्रपटात खाण कामगारांच्या मूळ समस्येला हात घालण्याचा प्रयत्न नसतो.अशा  चित्रपटांत  ह्या समस्येमुळं प्रभावित काही पात्रांची कथा आपल्यासमोर येते. नायक नायिकेसोबत नाचगाणी करत, खलनायकाशी मारामारी करत त्या मोजक्या पात्रांना सुखी करतो आणि आपण आनंदी होतो. चित्रपट संपला की ती समस्या चित्रपटगृहातच ठेवून आपण आनंदी मनानं घरी यायचं असतं. शेरनी चित्रपटातील विद्या ही लौकिकार्थानं नायिका नाही. तिलाही आपल्यासारख्या समस्या आहेत, नोकरी टिकवायची आहे, त्यामुळं ती छोट्या विजयात समाधान मानते. हा चित्रपट आपण घरी पाहतो. चित्रपट पाहून विसरुन जाणं हे दिग्दर्शकाला आपल्याकडून अपेक्षित नाही. पर्यावरण विरुद्ध विकास हा जो काही लढा आहे त्यात माझी भूमिका कोणती आणि त्यासंदर्भात मी कोणते ठोस पाऊल उचलणार हा प्रश्न चित्रपट आपल्याला विचारतो. त्यामुळं घरात बसून शनिवारी सायंकाळी पाहिलेला हा चित्रपट आपल्या मनातच घोळत राहायला हवा हे ह्या शेरनीला आपल्याकडून अपेक्षित आहे ! 

(तळटीप - शेरनी म्हणजे सिंहीण ह्याची खात्री मी घरी विचारुन केली. परंतु चित्रपटात केवळ एकदा दर्शन देणाऱ्या ही शेरनी मराठीत वाघिणच आहे ही माझी समजूत !)

मंगळवार, ८ जून, २०२१

खार, पिकलेला आंबा आणि दुष्ट आदित्य

आपलं आयुष्यात कोणासोबत मॅटर होऊ शकतं ह्याविषयी काही सांगता येत नाही.  तरीही सध्या घरुन काम करत असल्यानं रिक्षावाल्यांसोबत मॅटर होत नाहीत. घराच्या समोर आंब्यांची दोन झाडं आहेत. ह्या झाडांवरील आंबे साधारणतः मे महिन्याच्या मध्यापासुन पिकायला सुरुवात होते. त्याच सुमारास खारीचा ह्या झाडांवरील कलकलाट वाढायला सुरुवात होते. तरी तौक्तेचा परिणाम म्हणून काही आंबे आधीच पडले. 

झालं काय तर काल माझं ह्यातील एका खारीसोबत भांडण झाले. तिला झाडावरील आंबा खायचा होता. पिकलेला आंबा तिनं व्यवस्थित हेरला होता.अशा आंब्यांना खाली न पडू देता झाडांवर खाण्यात खरं कौशल्य ! पण नेमका तो आंबा खाली पडला ! म्हणजे तिला एकही चावा न मारता येता!  मग ती त्याच्या सोबत खाली आली. इतका वेळ ऑफिसच्या कॉलमध्ये तिच्या कलकलाटाच्या येणाऱ्या व्यत्ययामुळं मी असाही वैतागलो होतो. त्यामुळं तिच्याशी पंगा घेण्याचं मी ठरविलं ! मी call मधून "I will be back in a minute!" म्हणत बाहेर आलो आणि तो आंबा ताब्यात घेतला. 



इतक्या महत्प्रयासानं हेरलेला आंबा डोळ्यासमोर नाहीसा होताना पाहून खार खूप संतापली !  ती बराच वेळ कलकलाट  करत राहिली. खारीला तुम्ही अगदी बिचारी समजत असाल तर तसं नाही ! जांभळाच्या झाडावरील खार दादागिरी करते असे आमच्या घरच्यांचे म्हणणं आहे. कदाचित मी उगाचच आंब्याच्या झाडावरील खारीवरील बदला घेतला

खारीविषयी ज्ञानी माणसं बरंच काही सांगतात! जसं की 

त्या फळ लपवून ठेवतात आणि दुसरं दिसलं की पहिलं विसरतात मग ते रुजून झाडं येतात. म्हणून खार हा महत्वाचा दुवा आहे आपण खारीचा वाटा लहान समजतो.खरं तर ते महान कार्य आहे! गाजावाजा श्रेय न घेता केलेले!

बाकी मग खारीचा कलकलाट काही वेळानं थांबला. माझा कॉलसुद्धा आटोपला. मला माझ्या दुष्ट वागण्याविषयी थोडंफार वाईट वाटलं! आज सकाळी पुन्हा त्या झाडांवर जाऊन त्या खारीचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला पण त्या खारीने कॅमेरासमोर येण्यास चक्क नकार दिला ! बाकी तिने खारीच्या सोशल मीडियावर मी, पिकलेला आंबा आणि दुष्ट आदित्य वगैरे पोस्ट नक्कीच लिहिल्या असणार. 

ती आणि तिची आजी ह्यांचा काल्पनिक संवाद !

छोटी खार - (मुळुमुळु रडत ) "आजी आजी त्या दुष्ट आदित्याने माझा आंबा नेला "

आजी - "कोण तो झाडांना पाणी घालणारा आदित्य ? तो तर प्रेमळ असेल असं वाटलं होतं. त्यानं आंबा नेला हो तुझा! असू दे, त्याला आपण धडा शिकवू. 

छोटी खार -  "कसा शिकवणार धडा?"

आजी - "तुला अजून झाडावर आंबे दिसताहेत ना हे दोन ! ते आज तू दुपारी सगळी माणसं झोपली की खाऊन टाक हं"


छोटी खार - "हं "

आजी - "बाकी मला सांग, तो आंबा खाली पडलाच कसा? आंब्याला खाली पडू न देता कसा खायचं हे किती वेळा शिकवलं आहे ना तुला? हल्लीची तुम्ही पोरं एक गोष्ट धड येत नाही तुम्हांला ! काही झालं की मोबाईल घेऊन बसता तुम्ही ! 

छोटी खार तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच गायब झाली होती आणि "मी, पिकलेला आंबा आणि दुष्ट आदित्य" ह्या पोस्टला आलेल्या प्रतिक्रियांना लाईक करण्यात गढून गेली होती ! 

गुरुवार, ३ जून, २०२१

Being नाओमी ओसाका


ह्या आठवड्यात एक लक्षवेधी घटना घडली.  नाओमी ओसाका ह्या जपानच्या महिला टेनिस खेळाडूने चार ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी एक असलेल्या फ्रेंच ओपन मधून आपला सहभाग काढून घेतला. ह्यात महत्वाची बाब म्हणजे ज्या कारणासाठी तिनं सहभागी होण्याचं नाकारलं ते कारण ! सामना संपल्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांसमोर जाण्यानं आपल्याला मानसिक तणाव येतो म्हणून तिनं प्रसिद्धीमाध्यमांसमोर जाण्यास नकार दिला होता.  पण ते आयोजकांना फारसं रुचलं नव्हतं. ही चर्चा काहीशी गंभीर होऊ लागताच तिनं सरळसरळ स्पर्धेतून अंग काढून घेतलं. 

मान्यवरांनी एक परिपूर्ण चित्र बनून जनतेसमोर यावं ह्या अवास्तव अपेक्षेनं आता बऱ्याच क्षेत्रात शिरकाव केला आहे. ह्याला मुख्य कारण म्हणजे प्रसारमाध्यमांचे आणि त्याच्या अनुषंगानं जाहिरातदारांचे वाढलेलं स्तोम ! काही दशकांपूर्वी असलेल्या प्रसारमाध्यमातील नोकऱ्यांच्या संख्या आता दहापटीने वाढल्या आहेत. ह्यांना सतत खाद्य हवं असतं लोकांपुढे ठेवण्यासाठी ! ह्यासाठी मान्यवर (Celebrity) हे एक सोपं लक्ष्य असतं. मान्यवरांच्या खासगी आयुष्यात काय चाललं आहे ह्यापासून प्रत्यक्ष  स्पर्धेत भाग घेण्यासाठी ते तयारी कशी करतात हे सर्व जाणून घेण्यासाठी आपल्या सर्वांना रस असतो.  ज्या कट्ट्यावर जास्तीत जास्त लोकांची गर्दी असते त्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर जाहिरातदार सुद्धा गर्दी करतात. 

प्रसिद्धीमाध्यमांसमोर सामोरं जाण्याचा तणाव येण्याचं कारण काय असावं? एखादा प्रसिद्ध खेळाडू ज्यावेळी प्रसिद्धीमाध्यमांसमोर येतो त्यावेळी त्याला / तिला अनेक निकषांवर जोखलं जातं. तुमची देहबोली, भाषेचा दर्जा, jargon वापरण्याची क्षमता, नर्म विनोद पेरण्याची खुबी आणि तुम्हांला politically correct राहता येणं ! एखादा अटीतटीचा सामना खेळल्यानंतर लगेचच ह्या सर्व गोष्टींना सामोरं जाणं ही सोपी बाब नाही ! आणि हो कदाचित तुम्ही ज्या संस्कृतीतून पुढे आला आहात त्याचादेखील तुम्ही ह्या साऱ्या सोशल मीडियावरील गोष्टींना कसं हाताळू शकता ह्यात महत्वाचा सहभाग असतो ! जपानची एक वाहिनी सध्या अधूनमधून पाहतो. बरेचसे शांत जीवनावरील, निसर्गाला जोडणारे कार्यक्रम पाहायला मिळतात ! बिचारी नाओमी कदाचित अशाच शांत जीवनसरणीची चाहती असेल ! 

प्रत्येक खेळाडूंचं व्यावसायिक आयुष्य मोजक्या वर्षांचं असतं. त्यामुळं ह्या वर्षांत अधिकाधिक कमाई करुन पूर्ण आयुष्यभराची पुंजी गोळा करुन ठेवण्याचा तणाव त्यांच्यावर असतो. पुर्वी पोट सुटलेला अथवा सीमारेषेकडं जाणाऱ्या चेंडूला सोबत देणारा खेळाडू संघात आपल्या फलंदाजीच्या जोरावर खपून जायचा कारण सर्वांचं लक्ष तो आपल्या बॅटीने किती धावा करतो किंवा एखाद्या नजाकतीच्या फटाक्याने चाहत्यांची मने अशी जिंकतो हेच महत्वाचं होते. आता खेळाडूचा फिटनेस, त्यानं क्षेत्ररक्षण करताना वाचविलेल्या धावा, सामन्यानंतर पत्रकार परिषदेला अगदी सहजरित्या सामोरं जाण्याची क्षमता ह्या साऱ्या गोष्टी महत्वाच्या ठरु लागल्या आहेत.  वार्ताहराने प्रश्न काहीही विचारु दे "Boyz Played well" ह्या वाक्यानं उत्तराची सुरवात करणाऱ्या आपल्या शेजारी राष्ट्रातील खेळाडूंची टर उडविण्यात आपला पुढाकार असतो ! 

कुठंतरी काहीतरी चुकतंय ! तुम्ही तुमच्या अंगी असलेल्या काही नैसर्गिक गुणांमुळं पुढे येता, पण एका विशिष्ट मर्यादेपलीकडे तुम्ही यशस्वी झालात तर तुमच्या आयुष्यावर तुमचा अगदी मर्यादित हक्क राहतो! तुम्ही आयुष्य कसं जगावं, सार्वजनिक जीवनात कसं वागावं ह्याची बरीचशी मार्गदर्शक तत्त्वं तुमच्यावर लादली जातात. आणि तुम्ही जे काही नसता ते तुम्हांला बनावं लागतं ! तुमचा हा संघर्ष तुम्हांलाच लढावा लागतो ! कारण वर्षातील बराच काळ You are Living Out of Suitcase ! मग विराटसारखा अत्यंत यशस्वी खेळाडू सुद्दा बऱ्याच वर्षांनी आपल्या मानसिक तणावांविषयी बोलायला धजावतो ! 

स्वतःशी प्रामाणिक राहिल्याबद्दल नाओमी तुझं अभिनंदन ! ह्याची व्यावसायिक किंमत तुला भोगावी लागेल! ह्या सगळ्याला आपणसुद्धा अप्रत्यक्ष का होईना हातभार लावत आहोत ही जाणीव आपण सर्वांनी बाळगावी ही किमान अपेक्षा ! हे सारं काही थांबण्यापलीकडं गेलं आहे ! ते केवळ पाहणं आपल्या हाती आहे ! पुढील पिढ्या बहुदा ह्या साऱ्याला तोंड द्यायची क्षमता बाळगूनच जन्माला येतील ! त्यामुळं चिंता करायची असेल तर ती आपण आपली करावी ! 

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...