आपलं आयुष्यात कोणासोबत मॅटर होऊ शकतं ह्याविषयी काही सांगता येत नाही. तरीही सध्या घरुन काम करत असल्यानं रिक्षावाल्यांसोबत मॅटर होत नाहीत. घराच्या समोर आंब्यांची दोन झाडं आहेत. ह्या झाडांवरील आंबे साधारणतः मे महिन्याच्या मध्यापासुन पिकायला सुरुवात होते. त्याच सुमारास खारीचा ह्या झाडांवरील कलकलाट वाढायला सुरुवात होते. तरी तौक्तेचा परिणाम म्हणून काही आंबे आधीच पडले.
झालं काय तर काल माझं ह्यातील एका खारीसोबत भांडण झाले. तिला झाडावरील आंबा खायचा होता. पिकलेला आंबा तिनं व्यवस्थित हेरला होता.अशा आंब्यांना खाली न पडू देता झाडांवर खाण्यात खरं कौशल्य ! पण नेमका तो आंबा खाली पडला ! म्हणजे तिला एकही चावा न मारता येता! मग ती त्याच्या सोबत खाली आली. इतका वेळ ऑफिसच्या कॉलमध्ये तिच्या कलकलाटाच्या येणाऱ्या व्यत्ययामुळं मी असाही वैतागलो होतो. त्यामुळं तिच्याशी पंगा घेण्याचं मी ठरविलं ! मी call मधून "I will be back in a minute!" म्हणत बाहेर आलो आणि तो आंबा ताब्यात घेतला.
इतक्या महत्प्रयासानं हेरलेला आंबा डोळ्यासमोर नाहीसा होताना पाहून खार खूप संतापली ! ती बराच वेळ कलकलाट करत राहिली. खारीला तुम्ही अगदी बिचारी समजत असाल तर तसं नाही ! जांभळाच्या झाडावरील खार दादागिरी करते असे आमच्या घरच्यांचे म्हणणं आहे. कदाचित मी उगाचच आंब्याच्या झाडावरील खारीवरील बदला घेतला
खारीविषयी ज्ञानी माणसं बरंच काही सांगतात! जसं की
त्या फळ लपवून ठेवतात आणि दुसरं दिसलं की पहिलं विसरतात मग ते रुजून झाडं येतात. म्हणून खार हा महत्वाचा दुवा आहे आपण खारीचा वाटा लहान समजतो.खरं तर ते महान कार्य आहे! गाजावाजा श्रेय न घेता केलेले!
बाकी मग खारीचा कलकलाट काही वेळानं थांबला. माझा कॉलसुद्धा आटोपला. मला माझ्या दुष्ट वागण्याविषयी थोडंफार वाईट वाटलं! आज सकाळी पुन्हा त्या झाडांवर जाऊन त्या खारीचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला पण त्या खारीने कॅमेरासमोर येण्यास चक्क नकार दिला ! बाकी तिने खारीच्या सोशल मीडियावर मी, पिकलेला आंबा आणि दुष्ट आदित्य वगैरे पोस्ट नक्कीच लिहिल्या असणार.
ती आणि तिची आजी ह्यांचा काल्पनिक संवाद !
छोटी खार - (मुळुमुळु रडत ) "आजी आजी त्या दुष्ट आदित्याने माझा आंबा नेला "
आजी - "कोण तो झाडांना पाणी घालणारा आदित्य ? तो तर प्रेमळ असेल असं वाटलं होतं. त्यानं आंबा नेला हो तुझा! असू दे, त्याला आपण धडा शिकवू.
छोटी खार - "कसा शिकवणार धडा?"
आजी - "तुला अजून झाडावर आंबे दिसताहेत ना हे दोन ! ते आज तू दुपारी सगळी माणसं झोपली की खाऊन टाक हं"
छोटी खार - "हं "
आजी - "बाकी मला सांग, तो आंबा खाली पडलाच कसा? आंब्याला खाली पडू न देता कसा खायचं हे किती वेळा शिकवलं आहे ना तुला? हल्लीची तुम्ही पोरं एक गोष्ट धड येत नाही तुम्हांला ! काही झालं की मोबाईल घेऊन बसता तुम्ही !
छोटी खार तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच गायब झाली होती आणि "मी, पिकलेला आंबा आणि दुष्ट आदित्य" ह्या पोस्टला आलेल्या प्रतिक्रियांना लाईक करण्यात गढून गेली होती !
😀 साधं सुध पण मस्त👌
उत्तर द्याहटवा