मे महिन्यात आलेला हा सुट्टीचा दिवस ! सोमवारी आलेली ही सुट्टी, ती ही लॉकडाऊनच्या कालावधीतील ! अचानक गवसलेले हे फोटो! आज पाहिलेल्या शेकडो फोटोतील हे मोजके फोटो! ह्या फोटोत का कोणास ठाऊक एक कोणतातरी समान धागा मला जाणवला ! हा धागा शब्दांत तंतोतंत पकडणं कठीणच !
बहुसंख्य फोटोत निसर्गाचं एक भव्य रुप सामोरं उभं ! ह्यात रुढार्थानं म्हणायला गेलं तर सौंदर्य असं भरलेलं नाही, तरीही त्यातलं शतप्रतिशत निसर्गपण मनाला भावतं ! कुठंतरी अस्पष्टपणे जाणवुन गेलेलं आपलं छोटेपण मनात एक निनावी भावना निर्माण करुन जाते.
ह्या पहिल्या फोटोत मला जाणवुन गेलं ते गवताचं विस्कटलेपण ! जिम कॉर्बेट नॅशनल पार्कातील हा फोटो ! इथं काही काळापुर्वी हत्तींचा कळप येऊन गेला असावा की काय असा अंदाज बांधायला मला उगाचच आवडतं! डाव्या कोपऱ्यात फोटोत डोकावणाऱ्या फांदीवर राहिलेल्या मोजक्या पानांच्या मनात कोणते विचार सुरु असतील ह्याचा थोडातरी अंदाज आपणास बांधता आला तर किती बरं होईल असं मला वाटुन जातं !
हे छायाचित्रही साधारणतः सारखंच ! फक्त इथं दुरवर डोकावणारी एक टेकडी ! पौर्णिमेच्या रात्री इथं हरिणांचा कळप ह्या विस्तृत पसरलेल्या गवताळ प्रदेशात कसा मुक्तपणं विहार करत असेल अशी कविकल्पना क्षणभर करावयास आपण मुक्त आहोत !
मार्च महिन्यात जवळपास शुष्क होत चाललेल्या नदीचं हे पात्र ! जेव्हा पावसाळ्यात हीच नदी अगदी रौद्र रुप धारण करत असेल तेव्हा तिच्या किनाऱ्याला उभं राहताना सुद्धा किती भय वाटत असणार ! ह्या नदीच्या पात्रात आता निवांत पहुडलेल्या त्या छोट्या दगडांना त्यावेळी नदीचा तो शक्तिशाली प्रवाह किती वेगानं ढकलत असावा ! कदाचित उंच पर्वतराजीतील एका विशाल पाषाणाचे आपल्या जोरदार प्रवाहानं नदीने तुकडे करत त्यांना हे रुप दिलं असणार ! रात्री ह्याच पाण्याच्या शोधात येणारे वन्य पशु! त्यांची दुनिया एक न्यारी असणार!
हे चित्र नक्की कुठून घेतलं ते आठवत नाही! परंतु ह्यात त्या डोंगरराईत मनुष्याने केलेली घुसखोरी इंचाइंचात जाणवते ! मनुष्यानं घुसखोरी केली नसती तर हे चित्र कसे दिसले असते ह्याचे कल्पनाचित्र रंगविण्यात मी दंग होतो !
दूरदूर पसरलेल्या भातशेतीचे हे मनोहर चित्र ! माझं लक्ष मात्र उजव्या कोपऱ्यात मनुष्यानं सुरु केलेल्या आणि कदाचित अर्धवट सोडुन दिलेल्या बांधकामाकडं जातं ! ह्या बांधकामातील एखाद्या विटेचे आत्मवृत्त असा निबंध लिहावयास कोणाला तरी उद्युक्त करावं अशी मला मनोमन इच्छा होत आहे !
हे ही सारखंच चित्र ! फक्त कोपऱ्यात दिसणारी एक टुमदार हवेली !त्यातल्या एका खिडकीत बसुन एका थंडीच्या सायंकाळी सूर्याच्या सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघालेली ही भातशेती पाहायला किती धमाल येणार !
नदीचं हे रोडावलेलं पात्र ! पण सांजवेळी मनात एक हुरहूर निर्माण करणारं! त्या नदीच्या पात्रावर बांधलेला तो एक चित्राला वेगळं रुप प्राप्त करुन देणारा हा पुल ! पावसाळ्यात ह्या नदीचं रौद्र रुप ह्या फारशा मजबुत न वाटणाऱ्या पुलावर उभं राहुन पाहताना मनात नक्की काय भावना निर्माण होतील कोणास ठाऊक !