मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१९

मावळत्या दिनकरा !


काहीशा अनामिक हुरहुरीनं सरत्या वर्षाचा आपण निरोप घेतो. जाणते झाल्यापासुन प्रत्येक महत्वाच्या टप्प्यावर आयुष्यातील अंतिम सत्याच्या  आपण अधिक जवळ पोहोचलो आहोत ही भावना मनाच्या कोपऱ्यात कुठंतरी डोकावते. सार्वजनिकरित्या ती थेट बोलुन दाखविण्याची प्रथा नसल्यानं हुरहूर वगैरे शब्दांचा आधार आपण घेत राहतो. 

हे २०२०! एका नव्या उमेदीनं मी तुझं स्वागत करत आहे ! त्यानिमित्त माझ्या मनातील हे काही विचार !

१) आयुष्यातील तुझ्या आधीच्या साथीदारांनी मला जे काही अनुभवांचे क्षण दिले त्यांना मी संकलित स्वरुपात स्मरणात ठेऊ इच्छितो. 

२) माझ्या आयुष्यातील संकटे, कठीण गोष्टी जितक्या सुस्पष्टपणे मला जाणवतात तितक्याच सुस्पष्टपणे माझ्या आयुष्यातील अस्तित्वात असलेल्या चांगल्या गोष्टींची, लोकांनी माझ्याशी केलेल्या चांगल्या वर्तवणुकीची मला जाणीव येऊ देत. 

३) माझ्या व्यावसायिक जीवनात मला एका विशिष्ट प्रकारची वर्तवणुक स्वीकारावी लागते. माझ्या मुळ स्वभावापासुन ही काहीशी वेगळी असु शकते. परंतु माझी व्यावसायिक आणि वैयक्तिक वर्तवणुक, विचारधारा वेगळी ठेवण्याची बुद्धी आणि शक्ती मला लाभो !

४) भोवतालचे लोक विविध ताणतणावाच्या प्रसंगातुन जात असतात. ह्याचा परिणाम त्यांच्या वर्तवणुकीवर होऊ शकतो. त्यामुळं प्रसंगी त्यांची माझ्याशी असलेली वागणुक माझ्या अपेक्षेपेक्षा वेगळी असु शकते, मला क्लेशदायक असु शकते. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत त्यांच्या अशा वागणुकीकडे तटस्थ मनोवृत्तीनं पाहण्याची शक्ती दे !

५) मी, माझं वागणं काही लोकांना आवडत / आवडणार नाही ही स्पष्ट शक्यता आहे हे सत्य मी मोकळेपणानं स्वीकारु शकु देत ! 

६) माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडुन शिकण्यासारखं बरंच काही असु शकतं. इतर गोष्टीपेक्षा ह्या शिकण्यासारख्या गोष्टीकडं माझं लक्ष सर्वप्रथम वेधलं जावो !

७) माझ्याकडुन चांगलं वाचन होवो. ह्या वाचनातील सुविचारांचे मला आकलन होवो आणि माझ्या जीवनाशी निगडित सुविचारांचे माझ्याद्वारे अंगिकरण  होवो !

८) स्थानिक, जागतिक पातळीवरील कोणत्याही ताणतणावाला तोंड देण्याची शक्ती माझे नातेवाईक, मित्र मला देतात. त्यांच्याशी मी सदैव संपर्कात राहू शको !

९) माझा निसर्गाशी असलेला संपर्क कायम राहो ! निसर्ग मला माझं जगणं समृद्धपणे जगण्याची प्रेरणा देत राहो !

आणि .... 

सातत्यानं ब्लॉगपोस्ट लिहुन त्यांच्या लिंक्स फेसबुक भिंतीवर, शेकडो व्हाट्सअँप ग्रुपवर पाठवुन नातेवाईक, मित्रगणांना त्रस्त करण्याची माझी इच्छाशक्ती कायम राहो !

बुधवार, २५ डिसेंबर, २०१९

ययाति - वि. स. खांडेकर



 गतकाळातील वैभवशाली साहित्यिक इतिहासाचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची संधी आपण जरी गमावली असली तरी सुदैवानं ह्या कालखंडातील उत्कृष्ट कादंबऱ्यांद्वारे ह्या सुवर्णकाळाचा अनुभव आजही आपण काही प्रमाणात घेऊ शकतो. वि. स. खांडेकर ह्यांच्या अश्रू ह्या कादंबरीचे मला झालेलं आकलन ह्या आधी एका पोस्टद्वारे केलं होतं. ह्या सिद्धहस्त लेखकाच्या ययाती ह्या अविस्मरणीय कादंबरीविषयीच माझं मनोगत मी इथं मांडत आहे. ह्या कादंबरीस १९७६ सालचा भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. 

वि. स. खांडेकर हे अत्यंत बुद्धिमान, प्रतिभाशाली साहित्यिक होते. त्यांनी दिलेल्या प्रस्तावनेतुन आणि पार्श्वभुमी ह्या विभागातुन कादंबरीतील विविध व्यक्तिरेखांचा त्यांनी केलेला अभ्यास आणि ह्या कादंबरीतुन सद्य समाजानं शिकण्यासारख्या असलेल्या अनेक गोष्टींचा उहापोह केला आहे. 

ययाती 

स्त्रीसुखासाठी आंधळा होऊन स्वतःच्या पुत्राकडं तारुण्याची मागणी करणारा एक निर्दयी पिता अशी ययातीची ओझरती ओळख घेऊन ह्या कादंबरी वाचनास मी आरंभ केला होता. कादंबरीच्या पुर्वार्धात ययातीच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलु खांडेकरांनी उलगडुन दाखविले आहेत. प्रत्यक्ष इंद्राला पराभुत करणाऱ्या पराक्रमी नहुष  राजाचा हा पुत्र. परंतु आपल्या पित्याकडुन विजयाच्या एक उन्मत्त क्षणी घडलेल्या चुकीमुळं मिळालेल्या शापाचे ओझे सदैव घेऊन वावरणारा! "नहुष राजाची मुले कधीही सुखी होणार नाहीत" हा तो शाप ! स्वतः खुप पराक्रमी. अश्वमेधाच्या घोड्यासोबत स्वतः स्वारी करत मोठमोठ्या राजे - महाराजांना स्वतःसमोर लोटांगणे घालावयास भाग पाडणारा ! आपल्या जन्माआधी राजमहालातील वैभवाचा त्याग करुन गेलेल्या आपल्या थोरल्या भावाशी म्हणजेच यतीशी त्याची ह्या प्रवासात अचानक भेट होते. यतीचं आपलं आयुष्य पुर्णपणे तपश्चर्येला वाहुन देणं ययातीला विचारात पाडतं. हे वादळ संपतं तितक्यात अंगिरस ऋषींच्या शांतीयज्ञात  राक्षसांकडुन होणाऱ्या संभाव्य हल्ल्यापासुन संरक्षणासाठी ययाती काही काळ त्या ऋषींच्या आश्रमात घालवितो. तिथं त्याची भेट कचाशी होते! ययातीच्या पत्नीचं म्हणजेच देवयानीचे पहिलं प्रेम हा कच ! परंतु एकंदरीत देवयानी प्रेमापेक्षा सामर्थ्याला महत्व देणारी ! त्यामुळं योगायोगानं भेटलेल्या ययातीला तो केवळ एका बलवान साम्राज्याचा चक्रवर्ती आहे म्हणुन पती म्हणुन स्वीकारण्यात तिला कोणताही संदेह नव्हता. परंतु ह्याच कारणामुळं ती ययातीची प्रेयसी केव्हाच बनु शकली नाही! म्हणुनच की काय ययाती मग शर्मिष्ठेकडं आकर्षिला गेला! ययातीचे शर्मिष्ठेकडे आकर्षित होणं प्रेमाच्या भुकेखातर असं जरी क्षणभर मानलं तरी त्याआधी आणि त्यानंतर त्यानं केलेल्या अनेक स्त्रियांच्या सहवासाचे कोणत्याही प्रकारे समर्थन करता येत नाही! 

इथं खांडेकर ययातीची तुलना आधुनिक काळातील मानवाशी करतात. त्यांच्याच शब्दांत सांगायचं झालं तर "शास्त्राने, यंत्राने आणि संस्कृतीनं निर्माण केलेलं आधुनिक सुंदर व संपन्न जगआजच्या ययातीपुढं पसरलं आहे. सुखोपभोगांची विविध साधने घेऊन ते त्याला पळापळाला आणि पावलोपावली मोह घालीत आहे!" १८५७ ते १९४७ च्या काळात पेटलेल्या पवित्र यज्ञकुंडांच्या ज्वाला विझुन गेल्या आहेत आणि मोठमोठे ऋत्विज यज्ञभूमी सोडुन गेले आहेत! - 

पहा किती सौंदर्यपुर्ण अशी ही उपमा! 

देवयानी 

देवयानी ही शुक्राचार्यांची कन्या ! पित्याचा महत्वाकांक्षी स्वभाव तिच्यात उतरलेला! आपल्या बालपणात शर्मिष्ठेचं वैभव तिनं अगदी जवळुन पाहिलेलं. आपल्या पित्याला, त्याच्या विद्वतेला कितीही मान असला तरी प्रत्यक्ष राजाकडे असणाऱ्या सत्तेविषयी तिच्या मनात सुप्त आकर्षण कायम वसलेलं असतं. त्यामुळं कचाविषयी तिच्या मनात आकर्षण असलं तरी त्याच्याशी विवाह करण्याचा विचार ती कधीच करत नसते. ययातीसोबत योगायोगानं झालेल्या एका भेटीमुळं तिला आपल्या महत्वाकांक्षांना मुर्त रुप देण्याची संधी आपसुक गवसते. जिच्या वैभवाच्या सावलीत आपलं बालपण घालवलं त्या शर्मिष्ठेविषयी असणाऱ्या असुयेमुळं ती तिला आपली दासी बनवुन आपल्यासोबत हस्तिनापुरात घेऊन येते. इथं तिला हवं असलेलं सत्तासामर्थ्य लाभतं. एक सम्राज्ञी म्हणुन देवयानी यशोगाथा बनली असली तरी एक पत्नी म्हणुन एक जिवंत शोकांतिका बनुन वावरत राहते! खांडेकरांनी ही कादंबरी लिहिताना ज्या स्रोतांचा संदर्भ घेतला आहे तिथं एका ठिकाणी ती ययातीने शर्मिष्ठेला तीन पुत्र दिले आणि आपल्याला दोनच पुत्र दिले अशी तक्रार करत असल्याचा उल्लेख आहे. म्हणजेच तिला ययातीने आपल्याशी केलेल्या प्रतारणेविषयी खंत नाही. पण तत्कालीन संदर्भानुसार स्त्रीला समाजात ज्या बाबींमुळं मान मिळायचा त्या पुत्रांच्या बाबतीत ययातीने दुजाभाव केल्याची खंत ती बाळगुन आहे.  

सद्यकालीन समाजाशी तुलना करता येनकेनप्रकारे प्रतिष्ठेच्या मागे लागलेल्या समाजातील मनोवृत्तींसोबत देवयानीची तुलना होऊ शकते. इथं ह्या प्रतिष्ठेच्या मागं धावताना जीवनातल्या गमावलेल्या अनेक अमुल्य गोष्टींचं भान अशा मनोवृत्तींना राहत नाही !

शर्मिष्ठा 

केवळ एका दुर्दैवी घटनेमुळं आपलं राजकन्यापद सोडुन देऊन शर्मिष्ठेला देवयानीचं दासीत्व पत्करावं लागतं. शुक्राचार्यांच्या रागीट स्वभावाची पुर्ण कल्पना असल्यानं त्यांच्या मुलीचा हा दुराग्रह पुर्ण न करण्यामुळं होऊ शकणाऱ्या सर्व संभाव्य धोक्यांचा तिला पुर्ण अंदाज आहे. आपल्या ज्ञातीसाठी स्वतःच्या जीवनातील सर्व सुखांचा ती त्याग करण्यास तयार होते. तिनं केलेल्या ह्या त्यागासाठी सद्यकालीन समाजात समांतर उदाहरण मिळणं तसं कठीणच! परंतु शर्मिष्ठा हस्तिनापुरात आल्यावर पुर्णपणे आपल्या नशिबाला दोष देत बसलेली दिसत नाही! ययातीने शर्मिष्ठेला वश केलं की त्यासाठी शर्मिष्ठेनं स्वतःहुन काही पावलं उचलली असावीत ह्याची खोलवर मीमांसा करण्याइतका  माझा अभ्यास नाही ! परंतु शेवटी ययातीच्या हृदयातील स्थानाच्या बाबतीत देवयानीवर कुरघोडी करण्यात ती यशस्वी होते! इतकंच नव्हे तर तिचा पुत्र पुरु अत्यंत सुस्वभावी आणि कर्तृत्ववान निघतो. पित्यासाठी आपलं तारुण्याच नव्हे तर देवयानीच्या मुलासाठी राज्यावरील आपला अधिकार सोडुन देण्यास तो तयार होतो. त्याच्या ह्या वागण्यानं देवयानीसारख्या स्त्रीचं हृदयपरिवर्तन करण्यात त्याला यशही मिळतं ! 

सद्यकालीन समाजातील आपल्या मेहनतीनं अधिकारपदाकडं वाटचाल करणाऱ्या वर्गाचं प्रतिनिधित्व शर्मिष्ठा करते असं ढोबळमानाने विधान आपण करु शकतो ! कठोर तपस्या करणारा कच बहुदा समाजातील ज्ञानपूजक वर्गाचं प्रतिनिधित्व करतो.

मुकुलिका, अलका या दासींची वर्णनं ह्या कादंबरीत विस्तारानं येतात. ह्या दासी कुशाग्र बुद्धीच्या असाव्यात. स्वपराक्रमावर मोठाली युद्धं जिंकुन आणणाऱ्या ययातीसारख्या यशस्वी सम्राटाला सर्वपरीनं त्या समाधानी ठेवतात! इथं एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो. देवयानी असो की ययातीची आई असो; सम्राज्ञीपणाच्या भूमिकेच्या ओझ्याखाली कुठंतरी ह्या स्त्रिया एक पत्नी म्हणुन कमी पडत असाव्यात !  आणि म्हणुनच ह्या बुद्धिमान दासींची ह्या कथांमध्ये आणि सम्राटांच्या आयुष्यात महत्वाची भुमिका ठरते !

खांडेकरांच्या प्रतिभेचा  मेरु ह्या कादंबरीत चौखेर उधळला आहे! आपल्या ह्या काळातील जीवनाचं हुबेहूब वर्णन ते वाचकांच्या डोळ्यासमोर उभं केलं आहे. मी पुर्णपणे ह्या कादंबरीशी आणि तात्कालीन व्यक्तिरेखांसोबत समरस होऊन गेलो ! एक अजरामर पौराणिक कथा आणि त्या कथेला यथायोग्य न्याय देणारा तितक्याच ताकदीचा प्रतिभाशाली साहित्यिक असा दुग्धशर्करायोग ह्या कादंबरीच्या निमित्तानं जुळून आला आहे. ह्या कादंबरीतील प्रत्येक वाक्य साहित्यिक श्रीमतीनं ओथंबुन भरलं आहे! ह्या रसाचा अत्यंत शांत मनःस्थितीत आस्वाद घेण्यासाठी ह्या कादंबरीचं पुन्हा सखोल वाचन करणं अनिवार्य आहे असा माझा समज आहे ! खांडेकरांना आणि त्यांच्या अफाट प्रतिभेला माझा सादर प्रणाम! सद्यकाल AI, ML, Cloud ह्या दिशेनं कितीही वेगानं जात असला तरी साहित्यातील अशा अमुल्य ठेव्यांचा आपण स्वतः आनंद घ्यावा आणि जमल्यास पुढील पिढीपर्यंत सुद्धा ह्या ठेव्यांचं हस्तांतरण करावं ही माझी कळकळीची विनंती!

शुक्रवार, २० डिसेंबर, २०१९

तु असा / अशी ऐकत रहा !



आधुनिक काळात अनेक सुखं आहेत, तशा समस्याही आहेत! सोशल मीडिया वगळता आपण सहसा आपल्या आनंदी क्षणांची वाच्यता करण्याचं टाळतो. आपल्या समस्या एकंदरीत आपल्या विचारप्रक्रियेचा मोठा हिस्सा व्यापुन टाकतात. ह्यातील बऱ्याच समस्या त्वरित सुटणे शक्य नसते; त्यांच्यावर विचार करुन त्यांच्या उत्तरांच्या दिशेनं वाटचाल होईल हा ही ग्राह्य पर्याय नसतो. सतत आपल्या समस्यांचा विचार करत राहिल्यानं आपल्या सारासार विचार करण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होत राहतो. 

समस्यांनी त्रस्त झाल्यानं आपण सारासार विचार करत नाही आहोत हे ही आपल्यातील बऱ्याच जणांना उमगतं. त्यामुळं लवकरात लवकर ह्या मनःस्थितीतुन बाहेर कसं पडता येईल ह्याकडे सर्वांचा कल असतो. ह्यावर जालीम उपाय असा नाही. काळ हा सर्व समस्यांवर उपाय आहे हे आपण म्हणत असलो तरी काळाने एक समस्या आपल्या नजरेसमोरुन दूर करेपर्यंत बऱ्याच वेळा दुसऱ्या समस्येनं आपलं मनःपटल व्यापुन टाकलेलं असतं. 

ह्या सर्व प्रकारात हल्ली एक आशेचा किरण दिसु लागला आहे, तो म्हणजे आपल्या समस्या ऐकुन घेणारी, त्यावर योग्य सल्ला देणारी अशी मंडळी. आपल्या प्रत्येकाच्या अवतीभोवती बऱ्याच वेळा अशी मंडळी असतात. पण ती आपल्याला गवसली पाहिजेत! ह्या मंडळींची वैशिष्टयं कोणती हे पाहुयात. 

१) ही मंडळी प्रथम तुम्हांला पुर्णपणे व्यक्त होऊ देतात. आपल्याला व्यक्त होताना विचार आणि शब्द ह्यांची योग्य सांगड घालावी लागते. ही सांगड घालण्यासाठी ही मंडळी तुम्हांला मदत करतात. तुम्ही बोलायला आरंभ केल्यापासुन तुमच्या अंतिम मुद्दयापर्यंत प्रवास करताना तुम्ही भरकटत जाण्याची शक्यता निर्माण होते. ही मंडळी शांतपणे तुम्हांला मुळ रस्त्यावर आणुन सोडतात. 

२) तुमचे मुद्दे मांडत असताना तुमच्या भावनांचे चढउतार होत असतात; ही मंडळी तुम्हांला समजुन घेतात. तुमच्या बाह्यदर्शनी कठोर व्यक्तिमत्त्वाचे कोमल , हळवे कंगोरे ह्या मंडळींसमोर उघड करताना तुम्हांला कसलाही संकोच वाटत नाही, कारण ह्यांच्यावर तुमचा पुर्ण विश्वास असतो! 

३) अशा प्रकारे तुम्ही पुर्णपणे व्यक्त झालात की ह्या व्यक्ती तुम्हांसोबत  त्यांची मते शेयर करतात. ह्यात कोणत्याही प्रकारचं मतं लादणं हा प्रकार नसतो, असतो तो फक्त उपलब्ध माहितीचं विश्लेषण करुन शक्य असलेल्या विविध पर्यायांचा निरपेक्ष उहापोह! त्यात शक्य असल्यास ही मंडळी तुम्हांला अशाच मिळत्याजुळत्या अनुभवांची उदाहरणं देऊन तुमच्या चिंतेची तीव्रता कमी करतात. 


अर्थात सर्वांनाच अशा मंडळींची गरज असते असंही नाही ! काही कणखर व्यक्तिमत्वांमध्ये जीवनातील कठीणातील कठीण प्रसंगांना एकटेपणाने सामोरे जाण्याची क्षमता असते! अशा लोकांच्या मेंदुचे विश्लेषण कोणी मला पाठवाल का हो? 


बऱ्याच वेळा ह्या व्यक्ती आपल्या आयुष्यात अशी भुमिका बजावत आहेत ह्याविषयी आपण पुर्णपणे अनभिज्ञ असतो. त्यामुळं कधी त्यांना औपचारिकपणानं Thank You म्हणण्याचा विचारही आपल्या मनाला शिवत नाही! त्यांनाही ह्याची म्हणा अपेक्षा नसतेच! 

कधीकाळी ह्या मंडळींना सुद्धा कोणत्यातरी समस्येने ग्रासु शकते. पण होतं काय की आपण आपल्याच विश्वात रममाण असतो; त्यांनाही त्यांच्या समस्या आपणासोबत शेयर करण्याची कदाचित सवय नसते! कदाचित त्यांची नजर, सुप्त संदेश  आपल्याला हे सांगुन जात असावी! पण आपण हे सारं ग्रहण करण्याच्या मनःस्थितीत नसतो. 

विश्वाचा प्रवास आपल्या नजरेतुन असाच पुढे चालु राहतो !!

बुधवार, १८ डिसेंबर, २०१९

संस्कृतीतरंग !




कालच्या पोस्टमध्ये वर्णन केलेल्या बैठकीनंतर मला एक दिवसीय प्रशिक्षणाला धाडण्यात आलं. धाडण्यात आलं हा सयुक्तिक शब्दप्रयोग अशासाठी की अशा प्रशिक्षणांना हजेरी लावण्याबाबत मी फारसा उत्सुक नसतो. जगभरातील विविध संस्कृतीच्या लोकांसोबत काम करताना कोणत्या मनोवृत्तीची (Mindset) आवश्यकता आहे ह्याविषयी हे प्रशिक्षण होते. ह्या प्रशिक्षणांची एक गंमत असते. आम्ही संवादाद्वारे प्रशिक्षण करतो असं म्हणत ही मंडळी आपल्याकडूनच बरंचसं वदवून घेतात. अधुनमधुन चर्चेला मार्गावर आणण्याचं काम ही मंडळी चोख बजावतात. 

ह्या प्रशिक्षणात एक मजेशीर मुद्दा प्रशिक्षकांनी मांडला. आपण भारतीय लोक कसे भावनिकरित्या सगळीकडे गुंतत राहतो हा तो मुद्दा !पाश्चात्य देशातील सहकारी आला की कंपनीच्या प्रवेशद्वाराशी रांगोळ्या काढतो. त्यांना कुर्ता, साड्या नेसवुन रंगीबेरंगी कपड्यात छायाचित्रे काढतो. हल्ली तर त्यांना बॉलीवूडच्या गाण्यांवर नृत्यसुद्धा करावयास लावतो! पण हेच आपण तिथं अमेरिकेत एका आठवड्यासाठी गेलो तर बऱ्याच वेळा आपले आपण असतो. एखादया सायंकाळी सर्वांसोबत डिनरला जाऊन आलो की सामाजिक बांधिलकीचं ओझं बहुदा संपते. अर्थात ह्याला हल्ली बरेच सन्माननीय अपवाद निर्माण झाले असावेत. 

अजून एक मुद्दा समजा आपले आणि ह्या परदेशी सहकाऱ्यांचे व्यावसायिक संबंध संपुष्टात आले की बऱ्याच वेळा त्यांच्या बाजुनं वैयक्तिक ऋणानुबंध कमी होतात. पुन्हा एकदा कदाचित ही निरीक्षणे काही वर्षापुर्वी खरी असावीत. हल्ली ह्यात खुप बदल घडुन आला आहे. मुख्य मुद्दा आपल्या आणि पाश्चात्य संस्कृतींमध्ये कसा फरक होता हे समजुन घेऊन त्यानुसार आपल्या व्यावसायिक अपेक्षांमध्ये, वागणुकीत योग्य बदल घडवून आणण्याविषयी होता. काही प्रशिक्षणार्थी पूर्वेच्या आणि युरोपातील सहकाऱ्यांसोबत कार्यरत आहेत. त्यांनीही आपले अनुभव मांडले. 

ह्यातील आपल्या संस्कृतीतील भावनिक गुंतवणुकीच्या मुद्द्याचा धागा पकडुन पुढे सरकूयात. ह्या सोशल मीडियाचा उद्रेक ज्या वेळी सर्वप्रथम झाला त्यावेळी काही काळातच आपण सर्वांनी ह्याच्या माध्यमातुन जुन्या काळाकडे धाव घेतली. जुन्या संस्कृतीला, गाण्यांना, मित्रमंडळींना एकत्र आणलं! आपण सर्व अगदी भावनाविवश होत ह्या जुन्या काळाच्या आठवणीत आकंठ बुडून गेलो. चाळिशीनंतर करिअर वगैरे गौण बाब आहे, ज्याच्या भोवताली मित्रमंडळी तोच खरा  श्रीमंत वगैरे वाक्य ऐकावयास आली! 

पण काही मंडळींनी मात्र ह्याच सोशल मीडियाचा वापर करत आपल्या करियरला नवचैतन्य दिलं. नव्यानं झेप घेतली. सत्तरीच्या पलीकडं सुद्धा व्यावसायिक क्षेत्रात सक्रिय राहण्याचा चंग बांधला. 

वरील दोन परिच्छेदात मांडलेल्या दोन भिन्न मतप्रवाहांपैकी कोणता एक बरोबर आणि दुसरा  चुकीचा असं मी म्हणत नाही. दोन्हींच्या आपल्या परीनं चांगल्या वाईट बाजु आहेत. गेल्या महिन्यातील माझ्या अनुभवावरुन मी दुसऱ्या पर्यायाकडे काहीसा झुकला गेलो असलो तरी ही तात्कालिक स्थिती असु शकते. 

सारांश इतकाच की सांस्कृतिकदृष्या पाहायला गेलं तर आपण भावनिक मंडळी! त्यामुळं आपले बरेचसे निर्णय भावनेच्या भरात घेतले जाण्याची शक्यता अधिक असते. ह्या गोष्टीचे भान राखत योग्य ठिकाणी उपलब्ध माहितीच्या आधारे सारासार विचार करुन बौद्धिक निर्णय घ्यावा ही विनंती!

मंगळवार, १७ डिसेंबर, २०१९

रस्सीखेच



जवळपास दोन महिन्यानंतर आजची ही पोस्ट ! डिसेंबराच्या पहिल्या सोमवार - मंगळवारी एक वरिष्ठ पातळीवरील बैठकीला हजेरी लावली. अमेरिकेहुन उच्च अधिकारी आले होते. आपला देश का व्यवस्थित चालतो हे जाणुन घ्यायला अशा बैठकी उपयोगी पडतात. दोन दिवसाच्या ह्या बैठकींमध्ये एकेका मिनिटाचा हिशोब ठेवून सादरीकरण केलं गेलं. पुढील वर्षाच्या नियोजनासाठी ही बैठक असल्यानं उपस्थित मंडळी अगदी तन्मयतेनं सर्व सादरीकरणात सहभागी होत होती. व्यावसायिक पातळीवरील जोशात येऊन प्रश्नोत्तरे होत होती. 

ह्यातील एका गटाच्या सादरीकरणात माझाही सहभाग होता. तयारी अगदी बऱ्याच दिवसांपासुन सुरु होती. कोणती स्लाईड कोणी सादर करायची, तिथं नेमकं काय बोलावं ह्याची सखोल तयारी करण्यात आली होती. प्रेसेंटेशन्सना व्यावसायिक रुप देण्यासाठी एका वेगळ्या गटाची मदत घेण्यात आली. सादरीकरण बऱ्यापैकी चांगलं पार पडल्यानंतर आम्ही सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.  

बऱ्याच कंपन्यांमध्ये ह्या प्रकारातील व्यावसायिक बैठका होत असतात. इथं प्रत्येक  शब्दाचा, प्रत्येक मिनिटाचा हिशोब द्यायचा असतो. त्यामुळं प्रत्येक स्लाईड, स्लाईडवरील प्रत्येक वाक्य / शब्द खरोखर आवश्यक आहे का? त्यांची क्रमवारी योग्य आहे का ह्याचा सर्वागीण विचार केला जातो. हा झाला आपला प्रगतशील भारत! इथं तुमच्या कर्तृत्वावर आपलं भाग्य घडविण्याची तुम्हांला पुरेपूर संधी दिली जाते. 

ह्या भारताकडुन भोवतीच्या दुसऱ्या भारताकडं वळल्यानंतर मात्र बरीच निराशा होते. ह्या भारतात तुमच्या कर्तुत्वाला वाव मिळेलच ह्याची खात्री नसते कारण इथं प्रस्थापितांचे राज्य असतं. गेल्या काही महिन्यांतील घटना पाहिल्या तर सारासार विचार करण्याच्या वृत्तीपासून आपण अधिकाधिक दुर जात चाललो आहोत असं दिसतं. 

ब्लॉग लिहुन कोणताही प्रश्न सुटेल ह्याच्यावरील माझा विश्वास बऱ्याच आधी उडाला आहे. त्यामुळं हल्ली पूर्वीइतक्या जोमानं ब्लॉग लिहणं मी खुपच कमी केलं आहे. हल्ली सर्वसामान्य लोकांमध्येसुद्धा वडीलधारी / जाणकार माणसांचे ऐकुन घेण्याची तयारी राहिली नाही. 

व्यावसायिक जगात प्रत्येकाला एक विशिष्ट अधिकाराची जागा दिली गेली असते. कोणी अधिकाराच्या पोस्टवर किती काळ राहावं ह्याचा निर्णय योग्य मंडळी घेत असतात. एकदा का एक व्यक्ती अधिकाराच्या जागी नियुक्त झाली की तिचे निर्णय ऐकून घेणं हे त्या व्यक्तीच्या संघातील सर्वांना बंधनकारक असते. त्यामुळं त्या संघातील निर्णयांत, कृतीत एकवाक्यता येते. संघाच्या यशस्वी होण्याच्या शक्यतेचे प्रमाण वाढीस लागते. 

आपल्या सार्वजनिक जीवनात सुद्धा कुठंतरी व्यावसायिक जीवनातील ह्या तत्वाची अंमलबजावणी व्हायला हवी. नाहीतर एकीकडं व्यावसायिक क्षेत्र आपल्या देशाला पुढे नेत राहणार परंतु बाकी क्षेत्रात योग्य व्यक्ती अधिकाराच्या जागी नसल्यानं आपल्या देशाच्या प्रगतीवर प्रचंड मर्यादा निर्माण होत राहणार ! ही रस्सीखेच थांबायला हवी ! 

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...