मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शुक्रवार, २० डिसेंबर, २०१९

तु असा / अशी ऐकत रहा !



आधुनिक काळात अनेक सुखं आहेत, तशा समस्याही आहेत! सोशल मीडिया वगळता आपण सहसा आपल्या आनंदी क्षणांची वाच्यता करण्याचं टाळतो. आपल्या समस्या एकंदरीत आपल्या विचारप्रक्रियेचा मोठा हिस्सा व्यापुन टाकतात. ह्यातील बऱ्याच समस्या त्वरित सुटणे शक्य नसते; त्यांच्यावर विचार करुन त्यांच्या उत्तरांच्या दिशेनं वाटचाल होईल हा ही ग्राह्य पर्याय नसतो. सतत आपल्या समस्यांचा विचार करत राहिल्यानं आपल्या सारासार विचार करण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होत राहतो. 

समस्यांनी त्रस्त झाल्यानं आपण सारासार विचार करत नाही आहोत हे ही आपल्यातील बऱ्याच जणांना उमगतं. त्यामुळं लवकरात लवकर ह्या मनःस्थितीतुन बाहेर कसं पडता येईल ह्याकडे सर्वांचा कल असतो. ह्यावर जालीम उपाय असा नाही. काळ हा सर्व समस्यांवर उपाय आहे हे आपण म्हणत असलो तरी काळाने एक समस्या आपल्या नजरेसमोरुन दूर करेपर्यंत बऱ्याच वेळा दुसऱ्या समस्येनं आपलं मनःपटल व्यापुन टाकलेलं असतं. 

ह्या सर्व प्रकारात हल्ली एक आशेचा किरण दिसु लागला आहे, तो म्हणजे आपल्या समस्या ऐकुन घेणारी, त्यावर योग्य सल्ला देणारी अशी मंडळी. आपल्या प्रत्येकाच्या अवतीभोवती बऱ्याच वेळा अशी मंडळी असतात. पण ती आपल्याला गवसली पाहिजेत! ह्या मंडळींची वैशिष्टयं कोणती हे पाहुयात. 

१) ही मंडळी प्रथम तुम्हांला पुर्णपणे व्यक्त होऊ देतात. आपल्याला व्यक्त होताना विचार आणि शब्द ह्यांची योग्य सांगड घालावी लागते. ही सांगड घालण्यासाठी ही मंडळी तुम्हांला मदत करतात. तुम्ही बोलायला आरंभ केल्यापासुन तुमच्या अंतिम मुद्दयापर्यंत प्रवास करताना तुम्ही भरकटत जाण्याची शक्यता निर्माण होते. ही मंडळी शांतपणे तुम्हांला मुळ रस्त्यावर आणुन सोडतात. 

२) तुमचे मुद्दे मांडत असताना तुमच्या भावनांचे चढउतार होत असतात; ही मंडळी तुम्हांला समजुन घेतात. तुमच्या बाह्यदर्शनी कठोर व्यक्तिमत्त्वाचे कोमल , हळवे कंगोरे ह्या मंडळींसमोर उघड करताना तुम्हांला कसलाही संकोच वाटत नाही, कारण ह्यांच्यावर तुमचा पुर्ण विश्वास असतो! 

३) अशा प्रकारे तुम्ही पुर्णपणे व्यक्त झालात की ह्या व्यक्ती तुम्हांसोबत  त्यांची मते शेयर करतात. ह्यात कोणत्याही प्रकारचं मतं लादणं हा प्रकार नसतो, असतो तो फक्त उपलब्ध माहितीचं विश्लेषण करुन शक्य असलेल्या विविध पर्यायांचा निरपेक्ष उहापोह! त्यात शक्य असल्यास ही मंडळी तुम्हांला अशाच मिळत्याजुळत्या अनुभवांची उदाहरणं देऊन तुमच्या चिंतेची तीव्रता कमी करतात. 


अर्थात सर्वांनाच अशा मंडळींची गरज असते असंही नाही ! काही कणखर व्यक्तिमत्वांमध्ये जीवनातील कठीणातील कठीण प्रसंगांना एकटेपणाने सामोरे जाण्याची क्षमता असते! अशा लोकांच्या मेंदुचे विश्लेषण कोणी मला पाठवाल का हो? 


बऱ्याच वेळा ह्या व्यक्ती आपल्या आयुष्यात अशी भुमिका बजावत आहेत ह्याविषयी आपण पुर्णपणे अनभिज्ञ असतो. त्यामुळं कधी त्यांना औपचारिकपणानं Thank You म्हणण्याचा विचारही आपल्या मनाला शिवत नाही! त्यांनाही ह्याची म्हणा अपेक्षा नसतेच! 

कधीकाळी ह्या मंडळींना सुद्धा कोणत्यातरी समस्येने ग्रासु शकते. पण होतं काय की आपण आपल्याच विश्वात रममाण असतो; त्यांनाही त्यांच्या समस्या आपणासोबत शेयर करण्याची कदाचित सवय नसते! कदाचित त्यांची नजर, सुप्त संदेश  आपल्याला हे सांगुन जात असावी! पण आपण हे सारं ग्रहण करण्याच्या मनःस्थितीत नसतो. 

विश्वाचा प्रवास आपल्या नजरेतुन असाच पुढे चालु राहतो !!

1 टिप्पणी:

  1. जेव्हा पांथस्त एकटा असेल, तेव्हा त्याने मार्गिका किंवा स्वताची पाउल वाट विचार करून निवडावी आणी सोबतीला चांगल्या विचारांची शिदोरी ठेवावी. वाईट वेळ हयाच शिदोरीवर काढता येते. चालताना वाटेत शिदोरीतील काही दाणे पेरत जावेत मागच्या पांथस्तासाठी. ऎकट्याने प्रवास करताना 'माथी पडेल ते जमेलच'ही मनात खूण गाठ बांधून ठेवावी. प्रवासातील चढ उतारांचा कार्यकारणभाव बाजूला ठेवून आस्वाद घ्यावा. आणी प्रत्येकक्षणी त्या क्षणापर्ययत केलेल्या मार्गक्रमणाचे समाधान आणि देवाची कृपा मानावी. कभी तो मेरे पैर मेरे लाख कोशिशो के बाद थक कर ठहर जायेगे। तो क्या हुआ मेरे ख्वाईशों के पर मंजिल तक उड पोहचही जायेंगे।

    उत्तर द्याहटवा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...