( इशारा - तुम्ही काही सकारात्मक वाचन करण्याच्या हेतु मनात बाळगुन असाल तर ही पोस्ट ह्या क्षणी वाचु नये.
Disclaimer - वरील फोटोचा आणि पोस्टचा अजिबात संबंध नाही !)
एकंदरीत ह्या पोस्टमधील विचारांची सुरुवात गेल्या महिन्यात आलेल्या अमेरिकन पाहुण्यांच्या सोबत झालेल्या संवादातून झाली. छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयातील एका अप्रतिम चित्राकृतीचा आनंद घेताना माझी अमेरिकन बॉस मला म्हणाली, " ही चित्राकृती प्रत्यक्षात साकार करण्यासाठी कलाकारास किती दिवस, महिने, वर्ष खर्च करावी लागली असतील ना?" तिच्याशी मी पुर्णपणे सहमत झालो. त्यानंतर चर्चेचा रोख हा सध्याची पिढी एखाद्या गोष्टीवर किती वेळ खर्च करु इच्छिते / शकते याकडे वळला. ह्या चर्चेत एक महत्त्वाचा मुद्दा निघाला. एखाद्या कलाकृती पुर्ण करण्यास सद्यकाळात एखाद्या कलाकारास चार-पाच वर्षे लागली तर इतका काळ आपण किंवा हे कलाकार कौतुकाशिवाय राहु शकतील का?
थोडक्यात म्हणजे instant gratification प्रकाराने व्याप्त सद्यपिढीतील लोकांच्या संख्येची पातळी धोक्याच्या पातळीच्या पल्याड गेली आहे. एखाद्या कलाकृतीमध्ये किंवा एखाद्या विषयावर दीर्घकाळ खोलवर परिश्रम करण्याची तयारी असलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आता या गोष्टीकडे आपणास एका वेगळ्या दृष्टीकोनातून पहावं लागेल. आपल्यापुढे जे काही सादर केलं जात आहे त्यातील किती टक्के सादरीकरण हे खोलवर अभ्यास करुन सादर केलं गेलं आहे हा भाग अत्यंत महत्वाचा ठरतो.
आपल्या मेंदूला जे काही खाद्य आपण देतो त्याचा स्त्रोत कोणता आहे ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. जर आपण आपल्या मेंदूला सातत्याने सोशल मीडियावर ठेवलं तर तिथं बऱ्याच प्रमाणात उथळ गोष्टी सादर केल्या जात आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे ज्यांच्या जीवनातील डेटा पॉइंट्सची संख्या अत्यंत मर्यादित आहे अशा लोकांनी सोशल मीडियावर घातलेला धुमाकूळ! ही माणसे जीवनातील शक्य असलेल्या विविध शक्यतांपैकी अत्यंत मर्यादित शक्यतांमध्ये आपले जीवन व्यतित करीत असतात. हाच मर्यादित भाग म्हणजे संपुर्ण विश्वातील घडामोडींचे क्षेत्र अशी यांची समजूत असते. त्यामुळे जर आपण सतत अशा पोस्टमध्ये गुंतून राहिलात तर या विश्वामध्ये घडत असलेल्या बाकीच्या खोलवर आणि अर्थपूर्ण अशा गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी तुमच्याकडे वेळ राहत नाही. सर्वांसोबत प्रवाहात राहण्याच्या या इच्छेने प्रेरित होऊन तुम्ही काही काळ सर्वांशीच संपर्क ठेवू इच्छिता. परंतु यामध्ये अशा लोकांशी जास्त संपर्क आल्यामुळे तुमच्या पदरी निराशाच येण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे मग तुमचा कल हा पुन्हा एकदा आपल्या कोषामध्ये जाण्याच्या वृत्तीला दुजोरा देण्याकडे वळतो.
आज एका यशस्वी व्यक्तीशी बोलण्याचा योग आला असता त्या व्यक्तीनं सुद्धा हीच बाब अधोरेखित केली. संगीतश्रवण, पुस्तकांचे वाचन ह्यात आपण कसे स्वतःला रमवुन घेतो हे अगदी सहजरित्या तिनं मला समजावुन सांगितलं. समाजातील तारतम्य असणाऱ्या लोकांच्या सामाजिक वावराला प्रतिकुल असं वातावरण सध्या निर्माण होत आहे असं विधान त्यांनी केलं. जर तुम्ही संवदेनशील आणि तारतम्य असणारे असाल तर हल्लीच्या सामाजिक जीवनात तुमचा फारसा टिकाव लागणार नाही असा निष्कर्षसुद्धा आमच्या चर्चेतुन निघाला. परंतु असा विचार करुन सामाजिक जीवनातील वावर कमी केल्यास तुम्हांला जे एकलेपण येऊ शकतं त्याचा प्रतिकार करण्यासाठी आवश्यक असणारे मनोबल तुम्ही बाळगुन असायला हवं ! तारतम्य असणाऱ्या लोकांच्या सामाजिक जीवनातील घटत्या प्रमाणामुळं समाजस्वास्थावर होणाऱ्या विपरीत परिणामांची चिंता कोणाला असेल का ही शक्यता तशी कमीच !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा