मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, १३ एप्रिल, २०१९

२०१९ - अमेरिकावारी - भाग २

निऊची मुलगी निरंजना ही कॉलेजच्या वसतिगृहामध्ये (ज्याला dormitory असे म्हटले जाते) राहते. आम्ही सर्वजण तिला भेटण्यासाठी गेलो. वसतिगृहामध्ये राहणाऱ्या आपल्या पाल्याला भेटायला ज्यावेळी पालक जातात त्यावेळी तो एक भावनाविवश करणारा जसा प्रसंग असतो त्याचप्रमाणे पालकांच्या विशेष करून मातांच्या कुतूहलाला खतपाणी घालणारा असा हा क्षण असतो!

वसतिगृहातील भव्य पॅसेज !


आम्ही त्या वसतिगृहाची आमच्या चौकस नजरांनी तपासणी करून, निरंजनाला तिच्या रोजनिशीविषयी अनेक प्रश्न विचारून वसतिगृहाबाहेर पडलो. वसतिगृहामध्ये राहणाऱ्या मुलांच्या खाण्यापिण्याची जी आबाळ होते त्यामुळे पालकांचा जीव तिळतिळ तुटत असतो. परंतु कष्टाविना फळ ना मिळते  या उक्तीचा प्रत्यक्षात अनुभव आयुष्याच्या उमेदीच्या काळात घ्यायचा असेल तर वसतिगृहामध्ये राहणे हे अनिवार्य आहे! निरंजना ह्या वसतिगृहात खुप परिश्रम घेऊन अभ्यास करत आहे. We are proud of you Niranjana!!

निरंजनाला सोबत घेऊन आम्ही एका भारतीय उपहारगृहात मनसोक्त जेवण घेतले.  त्यानंतर तिला परत वसतिगृहामध्ये सोडून आम्ही घरी परतलो. एव्हाना माझी झोप अनावर झाली होती. त्यामुळे पुढील पंधरा मिनिटात मी निद्राधीन झालो. इतके दिवस जरी मला जेट लॅग चालू असला तरी निऊच्या घरी मात्र मला मस्त झोप लागली. एकदा ज्यावेळी जाग आली त्यावेळी आपण नक्की कुठे आहोत हे समजण्यासाठी माझ्या मेंदूने चक्क ४५ सेकंद ते एक मिनिट इतका काळ घेतला. या कालावधीत मी न्यूयॉर्कच्या कोणत्यातरी एका हॉटेलमध्ये झोपलो आहे असे मला वाटत होते. इथं मी कसा काय आलो हे शोधून काढण्याचा माझा मेंदू प्रयत्न करीत होता. 

दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत उठून आंघोळ आटपून मी खाली उतरलो तोवर घेऊन एका चविष्ट नाश्त्याची तयारी करायला घेतली होती. निऊला पाटील घराण्यातील सुग्रण आई, काकींचा वारसा लाभला आहे. तिने सुग्रास पोह्याचा नाश्ता बनवला. त्यानंतर ती आणि निशांक माझ्याशी गप्पा मारता मारता आपला ट्रेडमार्क असलेल्या बिर्याणीची तयारी करण्यात गुंग झाली. निशांक आपल्या कामानिमित्त जगभर, अमेरिकाभर खूप फिरलेला आहे. बॅग पॅकिंग करण्यात तो अत्यंत निष्णात आहे. मी भरलेली बॅग पाहुन त्यात सुधारणेस भरपुर वाव असल्याचं त्यानं लगेच ताडलं. त्यानंतर पुढील काही मिनिटात माझ्या बॅगेचा कायापालट झाला होता. 

निऊने बनविलेल्या अतिशय रुचकर अशा बिर्याणीचा आस्वाद घेऊन मी निघण्याच्या तयारीस लागलो. हा अगदी भावनाविवश करणारा क्षण होता. निऊ, निशांक मला सोडण्यासाठी डल्लास विमानतळावर आले. माझ्या चेक इन बॅगेचे वजन ५३ पौंड झाल्यानं काहीशी धाकधुक मनात ठेवुन मी एजन्टकडे गेलो. परंतु त्यानं स्मितवदनाने सर्व काही स्वीकारत माझ्या मनातील धाकधुक नाहीशी केली. निऊ आणि निशांक हे सर्व अगदी काळजीपुर्वक नजरेने पाहत होते. बॅग चेकइन केल्यानंतर मी सुरक्षा तपासणीसाठी पुढे जाण्याआधी निऊ आणि निशांक ह्यांनी माझा भावपुर्ण निरोप घेतला ! 


मला अमेरिकेतील स्थानिक सुरक्षातपासणी आवडत नाही. जर तुम्हांला विशेष स्टेटस प्राप्त नसेल तर तुम्हांला बेल्ट, बुटं सर्व काही ट्रे मध्ये ठेवून सुरक्षा तपासणीला सामोरे जावं लागतं. आयपॅडला वेगळ्या ट्रे मध्ये ठेवावं लागतं. ही गोष्ट मला तशी आधीपासुनच खटकायची. ह्या वेळेला मी स्कॅनर मधुन बाहेर येऊन माझ्या सामानाची वाट पाहत असताना माझा  आयपॅड एका अमेरिकन बाईने उचलला. " I think it's mine" असे सौम्य शब्दांत तिला सांगुन मी तो आयपॅड उचलला. तिनं माझी माफीसुद्धा मागितली. बुट घालत असताना माझं तिच्याकडं लक्ष गेलं आणि तिचा जवळपास सारखाच दिसणारा आयपॅड आल्यावर आम्ही दोघेही हसलो. 

बिझनेस क्लासचा वापर करुन मी टर्मिनल बी वरील Admiral Club मध्ये प्रवेश केला. प्रवेश करतेवेळी चित्रात दर्शविलेली दोन कुपन्स मला देण्यात आली. 


इथं उपलब्ध असलेले दोन पर्याय किती विरोधाभास निर्माण करणारे आहेत ते पहा!  कुठं ते प्रीमियम ड्रिंक आणि कुठे ती पाण्याची बाटली!! ताजातवाना होऊन मी काउंटरवर गेलो आणि मोठ्या आत्मविश्वासाने ऑरेंज ज्यूसची मागणी केली.  त्यावेळी त्या काऊंटरवरील माणसाने मला जो काही लुक दिला त्यामुळे दुसरं कुपन पाण्याच्या बाटलीसाठी वापरण्याचे धाडस मी करू शकलो नाही. त्यामुळे थेट भारतात पोहोचलेल्या या दुर्दैवी कुपनचा फोटो आज मी आपणास सादर करू शकलो आहे. पुढे हे कुपन ज्यावेळी आपलं आत्मचरित्र लिहील त्यावेळी आपण ज्या महान कार्यासाठी या भूतलावर जन्म घेतला ते कार्य आपण आदित्य पाटील नामाच्या इसमाच्या हाती पडल्यामुळे कसं साध्य होऊ शकलं नाही याचा विस्तृत उल्लेख या आत्मचरित्रामध्ये नक्कीच असेल!!

रोमिंगवर असलेल्या माझ्या फोनवरून दोन तीन मित्रांना फोन केले.  ऍडमिरल क्लबचा याहून अधिक सदुपयोग आपल्याकडून होऊ शकत नाही हे लक्षात घेता मी तिथून बाहेर पडण्याचे ठरविले. माझ्या इप्सित गेटवर येऊन मी स्थानापन्न झालो. तेथून मला माझ्या लंडनला घेऊन जाणाऱ्या विमानाचे दर्शन झाले.  हे विमान भव्य होते. 


तिथं गेटच्या काउंटरवर उपस्थित असलेल्या महिला कर्मचारीने काहीजणांची नावे घेऊन त्यांनी आपले पासपोर्ट पडताळणीसाठी आणावेत अशी उद्घोषणा केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यात माझ्या नावाचा देखील समावेश होता. केवळ तीस सेकंदात तिने ही पडताळणी पूर्ण केली. हा काय प्रकार आहे हे तिला मी हसत हसत विचारले.  हा एकंदरीत प्रकार काय आहे आणि कोणाला ते अशा रँडम चेकिंगसाठी निवडतात याविषयी आपण पूर्ण अनभिज्ञ असल्याचं तिनं मला स्मित मुद्रेने सांगितलं. 

विमानात प्रवेश केल्यावर मात्र मी खूप खुश झालो. हे विमान जरी ब्रिटिश एअरवेजच्या नावाखाली कार्यरत असलं तरी ब्रिटिश एअरवेज आणि अमेरिकन एअरलाइन्स यांच्या कोड शेअरिंग भागीदारीत चालतं. त्यामुळे विमान अमेरिकन एअरलाइन्सचे होते. इथला बिझनेस क्लास खरोखरच राजेशाही थाटाचा होता.  प्रत्येकाला स्वतंत्र असे ओवरहेड केबिन आणि प्रशस्त अशी बसण्याची व्यवस्था होती. 




इथं माझ्या साठी आधीपासूनच भारतीय जेवणाची तरतूद करून ठेवण्यात आली होती.  आश्चर्याची गोष्ट म्हणजे पहिल्या जेवणामध्ये बहुदा पालेभाजीसदृश्य एक पदार्थ मला देण्यात आला होता. प्राजक्ताची पोच इथपर्यंत आहे की काय असा संशय आल्याशिवाय मला राहवलं नाही. विमान आता आपल्या ठरलेल्या स्थिर उंचीवर राहून मार्गक्रमणा करीत होते.  विमान उड्डाण करण्याच्या वेळी वैमानिकाने हवेमध्ये अस्थिर वातावरण असेल अशी आगाऊ सूचना देऊन ठेवली होती.  त्याला खरं ठरवण्यासाठी मध्येच एकदा चार-पाच मिनिटे विमान थरथरत राहिले. 

विमानाचा प्रवासाचा मार्ग दाखविणारे चॅनेल मी समोर लावून ठेवले होते. हे विमान आता उत्तरेच्या दिशेने चालले होते, कॅनडा वगैरे भागातून ध्रुवीय दिशेने ते गेले आणि मग दुसऱ्या बाजूने खाली उतरून लंडनला उतरले. या गोष्टीचा पुरावा म्हणून हा फोटो!!



एका क्षणी बाहेरील तापमान वजा 78 फॅरेनहाईट इतके होते हे पाहूनच विमानात सुद्धा मला थंडी वाजू लागली. 


त्यामुळे मग अंगावर पांघरुण घेऊन सीट आडवी करून मी झोपी गेलो.  साधारण दोन-तीन तासांनी जाग आली तेव्हासुद्धा प्रवासाचे पाच तास बाकी होते. त्यामुळे चित्रपट पाहण्याशिवाय दुसरा काही पर्याय माझ्यासमोर नव्हता.  बिफोर सनराइज्, बिफोर मिडनाइट आणि अजून एक अशा तीन भागात प्रस्तुत केल्या गेलेल्या एका जोडप्याच्या कहाणीचे तिन्ही भाग इथं उपलब्ध होते. ही शृंखला मला बऱ्याच प्रमाणात आवडते. या चित्रपटातील संवाद हे जोडप्यांच्या भावविश्वातील विविध पैलू अगदी सुंदरपणे उलगडून दाखवितात. बर्‍याच दिवसांनी सलगपणे हे चित्रपट पाहण्याची मला पुन्हा एकदा संधी मिळाली व मी ती सोडली नाही. 

अजून एक चित्रपट पाहून मी घड्याळाकडे नजर टाकली तेव्हा लंडन जवळ आल्याची चाहूल लागली होती. लंडन विमानतळावर मी टर्मिनल 3 वर उतरणार होतो. एक तास 50 मिनिटाच्या अंतराने टर्मिनल फाईव्हवरून माझं मुंबई विमान उड्डाण करणार होतं. ही दोन्ही टर्मिनल बऱ्यापैकी दूर आहेत.  त्यामुळे आमच्या विमानाला लंडनला उतरण्यास जर उशीर झाला तर मुंबईला निघणारे विमान मिळेल की नाही ही याविषयी मी काहीसा साशंक होतो. त्यात विमान योग्यपणे टर्मिनल 3 ला उतरले नाही. आम्हाला पायऱ्यांनी खाली उतरून बसने टर्मिनल 3 ला जावे लागणार होते. मी धावत जाऊन ती बस पकडली. ती बस आम्हांला टर्मिनल 3 कडे घेऊन गेली.  तिथं बाहेर पडताना ब्रिटिश एअरवेज एक कर्मचारी xpress कनेक्शनचे पासेस घेऊन उभी होती. त्यात मी माझ्या नावाचा देखील एक पास पाहिला. 


सर्व सुरक्षा तपासण्यांमध्ये हे आम्हाला प्राधान्य मिळावं म्हणून हा पास देण्यात आला होता. विमानतळावरील सर्व चिन्हांचा वापर करीत मी टर्मिनल फाईवकडे जाणाऱ्या गेटकडे गेलो. तिथं पुन्हा एकदा बसमध्ये बसून आम्ही टर्मिनल फाईवकडे जाण्यास निघालो.  हा रस्ता पाच ते सात मिनिटांचा होता. टर्मिनल पाचमध्ये पोहोचल्यावर अजुन एकदा सुरक्षा तपासणीला आम्हांला सामोरे जावे लागले.  ती तपासणी पार पाडून मी टर्मिनल फाईव्ह बी गेटच्या दिशेने निघालो.  त्यासाठी पुन्हा एकदा एक ट्रेन पकडावी लागली.  एवढे सर्व सोपस्कार पार पाडून शेवटी एकदाचा मी इच्छित गेटच्या समोर येऊन पोहोचलो. तिथं असलेल्या हीथ्रो विमानतळावरील फ्री वाय फाय वर लॉगिन करून घरी आणि निऊला मी हीथ्रोला व्यवस्थित पोहोचल्याची खबर कळविली. हे आटपून मी हुश्श करत होतो तितक्यात मुंबईला निघणाऱ्या विमानतळात विमानाचे बोर्डिंग चालू झाले होते. म्हणजे पहा की समजा मला या सर्व उपद्व्यापात थोडा काही उशीर झाला असता तर कदाचित मला हे विमान पकडण्यास कठीण परिस्थिती निर्माण झाली असती. 

बाकी एकदा विमानात बसल्यावर आधीच्या विमानात आणि या विमानात खूप फरक जाणवला. तिथं एअर होस्टेस म्हणून काम करणारे काहीसे वयस्क अमेरिकन पुरुष अत्यंत व्यावसायिकपणे आपले कार्य पार पाडत होते. परंतु इथं मात्र बर्‍यापैकी सावळागोंधळ दिसत होता.  या टप्प्यामध्ये झोपायचे नाही असे मी ठामपणे ठरविले होते.  त्यामुळे मी अजून काही चित्रपट,  येणारे सर्व काही खाद्यपदार्थ या सर्वांचा आस्वाद घेत राहिलो.  ज्याच्याशी आपलं काही देणं घेणं नाही अशा पदार्थांचा आणि पेयांचा समावेश असणारे हे मेनु कार्ड !




विमान शांतपणे मुंबईच्या दिशेने उड्डाण करीत राहिले. वैमानिक अधूनमधून उद्घोषणा करीत होता. एक प्रशंसनीय गोष्ट म्हणजे सदैव त्याने आपण ठरलेल्या वेळी मुंबईला पोहोचु हे आम्हांला सांगितले होते आणि विमान ज्यावेळी मुंबई विमानतळावर उतरले त्यावेळी अचूक 11:55 झाले होते.  झटपट इमिग्रेशन चेक आटपून मी आपली बॅग घेतली. माझी टॅक्सी घरच्या दिशेने भरधाव धावु लागली.

1 टिप्पणी:

  1. सुरेख लिहिलेय. तुमच्या बरोबर माझाही प्रवास घडला. Na पाहिलेली niu ani nishank आवडलेले आवडले

    उत्तर द्याहटवा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...