मराठी समुदायामध्ये एकंदरीतच नाट्य, संगीत, वाचन, लेखन इत्यादी प्रकारांची आवड दिसून येते. आजच्या पोस्टचा मुख्य विषय मराठी समुदायातील वाचन आवडीविषयी आहे. मराठी माणसं खूप वाचन करतात किंबहुना करायची असं म्हणायला हळूहळू सुरुवात करावी लागेल.
पुर्वी मोठमोठाल्या कादंबऱ्या गाजायच्या, लेखक प्रसिद्ध व्हायचे. हल्ली कादंबरी हा प्रकार काहीसा मागे पडला असावा, म्हणजे कादंबरी प्रसिद्ध होत नाही असे नाही. परंतु त्यांना म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाही. एखाद्या विषयावर इतका वेळ वाचन करणे यासाठी लागणारा संयम हल्ली कमी होत चालला असावा. दुसरी गोष्ट म्हणजे तेवढ्या दमाचे कादंबरीकार जरी असले तरी त्यांना योग्य प्रसिद्धी मिळत नाही.
माणसं आता छोट्या पुस्तकांकडे अथवा मासिकांकडे वळली असावीत असं म्हणावं तरी दिवाळी अंकांचीसुद्धा हल्ली म्हणावी तितकी चलती दिसुन येत नाही. मराठी माणसाने बहुदा हल्ली ऑनलाइन वाचनाकडे आपला मोर्चा वळविला असावा. परंतु एक गोष्ट मात्र मराठी माणसे नियमीतपणे करत असल्याचे आपल्याला आढळून येते! ती गोष्ट म्हणजे वर्तमानपत्रांचे वाचन!!
यातील काही मराठी माणसे वर्तमानपत्र वाचनाबाबतीत अत्यंत चोखंदळ असतात. त्यांच्या वर्तमानपत्र वाचनाच्या वेळा ठरलेल्या असतात. बऱ्याच वेळा वर्तमानपत्र वाचण्यासाठी त्यांनी आपली एक जागा सुद्धा निश्चित केलेली असते. या वेळेत त्यांना कोणी व्यत्यय आणलेला त्यांना आवडत नाही. मराठी माणसे वर्तमानपत्रात नक्की काय वाचतात हा एक संशोधनाचा विषय ठरू शकतो. प्रारंभास ती माणसे राष्ट्रीय पातळीवरील बातम्या वाचत असावीत. राष्ट्रीय पातळीवरील घेण्यात येणाऱ्या निर्णयांपैकी साधारणता तीस ते चाळीस टक्के निर्णय हे चुकीचे अथवा अपुऱ्या माहितीवर आधारीत असावेत याविषयी सर्व मराठी माणसांची खात्री असते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरील बातम्यांकडे त्यांचा मोर्चा वळतो. परंतु ह्या बातम्या मात्र काहीशा त्रोटक पद्धतीने मराठी पेपर सादर केल्या जात असल्याने त्यांना या बातम्यांमध्ये राष्ट्रीय पातळीवरील बातम्याइतक्या चुका काढता येत नाहीत. पाऊस कधी पडणार, कांद्याचे भाव बाजारपेठेत उतरले का, मोसमातील पहिला आंबा वाशीच्या बाजारपेठेत केव्हा येणार आणि यंदाचा पावसाळा कसा आहे या विषयांवर कुठे बातमी आहे का यावर यांचे बरोबर लक्ष असते!!
आता वळूयात ते मराठी माणसाच्या सर्वात आवडत्या सदराकडे! बहुसंख्य मराठी माणसे एका प्रतिशयत वर्तमानपत्राचा अग्रलेख मोठ्या एकाग्रतेने वाचतात. या अग्रलेखात मराठी भाषेतील अत्यंत जुने, क्लिष्ट शब्द किंवा वाक्प्रचार वापरले जातात. त्यामुळे हा लेख वाचून त्यातील काही बरेचसे शब्द आपल्याला न कळल्यास आपण तरी बौद्धिक वाचन केले आहे याचा प्रचंड मानसिक आनंद या वाचकांना होतो. ह्या संपादकीयामध्ये एखाद्या गंभीर समस्येचे किंवा राजकीय प्रश्नाचे उकलन केले गेलेले असते. या समस्यांचा अथवा राजकीय प्रश्नांचा आणि मराठी माणसांचा प्रत्यक्ष जीवनात बादरायण संबंधसुद्धा असण्याची शक्यता जरी कमी असली तरी त्या प्रश्नाची अथवा समस्येची संपूर्ण बाजू समजून घेण्यास या अग्रलेखाचा काही प्रमाणात उपयोग होतो. प्रत्येक वर्तमानपत्र एका विशिष्ट विचारसरणीचा किंवा राजकीय प्रणालीचा प्रसार करीत आहे अशी मराठी माणसांची ठाम समजूत असते. त्यामुळे या समजुतीला खतपाणी घालणारे निरीक्षणे या अग्रलेखातून शोधण्यात, आणि ती आपल्या मित्रमंडळींमध्ये मांडण्यात मराठी माणसांना प्रचंड आनंद मिळतो!! साधारणतः हा अग्रलेख वाचण्यास ही माणसे ४५ मिनिटे ते एक तास घेत असावीत! त्यातील फारच क्लिष्ट अथवा महत्त्वाच्या वाटणाऱ्या ओळींना अधोरेखित करतात. मी अशी काही माणसे सुद्धा पाहिली आहेत ज्यांनी संपुर्ण अग्रलेख अधोरेखित केला आहे. अशा प्रकारे एकंदरीत अग्रलेखामुळे पेन कंपनीचा सुद्धा खूप फायदा होतो!!
त्यानंतर वाचकांचा मेंदू हे समजून घेण्यास अर्धा तास घेत असावा. ह्या प्रयत्नात दुपारची झोप वगैरे आटोपली की मग ही माणसे या अग्रलेखावर चर्चा करण्यास सज्ज होतात. या चर्चेदरम्यान आपली सखोल मते मांडून झाली आणि बऱ्याचजणांशी मतभेद झाले की मग या सर्वांना खूप मानसिक समाधान मिळते!! मग रात्रीचं जेवण घेऊन ही माणसे वाट पाहत असतात ती दुसऱ्या दिवसाच्या वर्तमानपत्राची आणि त्यातील अग्रलेखाची!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा