मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, ३१ डिसेंबर, २०१८

अभिव्यक्ती


एखाद्या व्यक्तीच्या अभिव्यक्तीच्या प्रमाणामध्ये वयानुसार काही वेळा बदल होताना आपणास आढळतो. माझ्या बाबतीत सुद्धा असं झालं असावं असं मला माझ्या जवळच्या लोकांच्या प्रतिक्रियेवरुन जाणवतं. अगदी अबोल असणारा आदित्य गेल्या काही वर्षात खूपच बोलायला अथवा लिहायला लागला असं ज्यांनी मला लहानपणापासून जवळून पाहिले आहे ती लोक म्हणतात. 

स्वतःकडं निरपेक्ष वृत्तीने पाहण्याची क्षमता विकसित व्हायला हवी हे हल्ली मला उमजलं आहे. ज्यात आपलं अगदी जवळून परीक्षण होईल असे वैयक्तिक अथवा व्यावसायिक अनेक अनुभव आपल्या आयुष्यात वयोमानपरत्वे  येत राहतात. यातील प्रत्येक अनुभवात आपण आणि त्या अनुभवात ज्यांचे हितसंबंध गुंतले आहेत अशा अनेक व्यक्ती गुंतल्या असतात. यामधील प्रत्येक व्यक्तीचा आणि आपला त्या अनुभवापासून एक विशिष्ट निर्णय अपेक्षित असतो. वेगवेगळ्या व्यक्तींचे अपेक्षित निर्णय वेगवेगळे असले तरी शेवटी प्रसंग आणि त्याचा निर्णय मात्र एकच असतो.  

त्यामुळे होतं काय की ह्या प्रसंगानंतर ज्यांच्या अपेक्षेनुसार निर्णय लागला त्या व्यक्ती त्या प्रसंगाच्या मधुर स्मृती बरोबर ठेवून जातात. परंतु ज्या व्यक्तींच्या अपेक्षेनुसार त्या प्रसंगाचे निर्णय लागत नाही त्या व्यक्ती काहीशा खट्टू होतात.  त्या प्रसंगात सहभागी असलेल्या बाकीच्या लोकांना त्या व्यक्ती त्या विशिष्ट प्रसंगातील आपल्या अनुभवानुसार प्रतिक्रिया देतात. या प्रतिक्रियांना आपण खोलात जाऊन पाहिले असता त्यातील काही प्रतिक्रिया त्या प्रसंगात सहभागी असलेल्या घटकांविषयी असतात तर काही प्रतिक्रिया त्या प्रसंगातील विविध व्यक्तींनी दर्शविलेल्या स्वभाववैशिष्टयांबद्दल असतात.  यामध्ये आपल्याविषयी कोणी प्रतिक्रिया देणे हे साहजिकच होय. इथं आपण स्वतःकडे किती निरपेक्ष वृत्तीने पाहू शकतो या बाबीची परीक्षा होऊ लागते. 

मी जे काही करतो ते सर्वकाही परिपूर्ण आहे ही जी एक विशिष्ट मनोधारणा आहे ही प्रत्येक व्यक्तीच्या अंगी कमी जास्त प्रमाणात असते. या मनोधारणेचे अधिक प्रमाण व्यक्तीच्या अहंकारास कारणीभूत होते तर अत्यल्प प्रमाण व्यक्तीच्या आत्मविश्वासास हानिकारक बनू शकते. या चांगल्या प्रकारे जगायचे असेल तर तुमच्या अंगी असलेल्या विविध क्षमतेनुसार या भावनेचे एक विशिष्ट प्रमाण तुम्ही अंगिकारणे सर्वांसाठीच हितकारक असते. परंतु एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी ह्या भावनेचं योग्य प्रमाण नक्की काय हे कोणीच सांगु शकत नाही. 

मी स्वतः कडे तटस्थपणे पाहू शकतो काय?  या प्रश्नाविषयी आपण विविध व्यक्तींची मते लक्षात घेतली असता आपणास वेगवेगळे मतप्रवाह अनुभवयास मिळतात. यातील काही जणांकडून मला त्याची पर्वा / गरज नाही या प्रकारचे उत्तर मिळू शकतं. काही जणांचे उत्तर होय असे असू शकतं आणि माझ्या मते बहुतांशी लोकांना लोकांचे उत्तर होय असेच असते. फारच थोडे असे लोक असतात ज्यांना आपण स्वतःकडे निरपेक्ष वृत्तीने पाहू शकत नाहीत असं वाटतं. 

पुन्हा एकदा वळूयात ते वयोमानानुसार माणसांमध्ये होणाऱ्या अभिव्यक्तीच्या प्रमाणातील बदलाविषयी! माणसाच्या आयुष्यातील जे काही अनुभव येत असतात त्यामुळे माणसाच्या मनामध्ये बहुधा खूपच खळबळ निर्माण होत असावी. ही खळबळ तुम्ही किती प्रमाणात हाताळू शकता हा एक महत्त्वाचा घटक विचारात घेतला पाहिजे. ज्या लोकांच्या मेंदूमध्ये बाह्य जगतातील असंख्य वादळे पचवण्याची क्षमता असते त्या लोकांना आपल्या मनातील स्पंदने अथवा वादळे मनाबाहेर अभिव्यक्तीच्या रुपानं काढणं आवश्यक वाटत नाही. ते अभिव्यक्त होतच नाहीत असे नाही परंतु ही अभिव्यक्ती ते काही विशिष्ट प्रसंगी आपल्या मर्जीनुसार करतात. 

काही एक वर्ग असा असतो ज्याचा मेंदूला बाह्य जगतातून अनुभवयास मिळणाऱ्या घटनांवर प्रक्रिया करणे एका विशिष्ट मर्यादेपलीकडे शक्य होत नाही.  ह्या क्षमतेबाहेरील घटना मेंदूला संतृप्ततेला पोहोचू शकतात. या बिंदूपासून पुढे त्यांच्या मेंदूला प्रभावीपणे कार्यरत करायचे असेल तर त्यांना त्यांच्या मेंदूत निर्माण होणारी वादळे अभिव्यक्तीच्या रूपाने बाहेर काढणे आवश्यक बनते. त्यामुळे ही माणसे अचानक बोलू लिहू लागतात. आता हे बोलणे लिहिणे भोवतालच्या कितपत भावते आणि त्यांच्या प्रतिक्रिया कशा होतात यावर तुमचे पुढील अभिव्यक्तीचे प्रमाण अवलंबून असणे योग्य नव्हे. एखाद्या व्यक्तीची मते भोवतालच्या संपूर्ण जनसमुदायाला पटणे अशक्य होय. त्यामुळे आपल्या समविचारी मंडळींकडून आलेली दाद ही महत्त्वाची असते. काही माणसे तर अशी आपणास भेटतात ही त्यांची आणि आपली मते बहुतांशी सर्व प्रसंगी जुळून येतात. आपण दुसऱ्याची अभिव्यक्तीची गरज उत्तम श्रोत्याच्या रुपात कशी पुर्ण करु शकतो हा ही एक महत्वाचा घटक असतो. 

अभिव्यक्तीचे हे प्रमाण वयानुसार वाढतच जाण्याची शक्यता असते. (साधारणतः पस्तिशीनंतर हे प्रमाण अधिक वाढत जाण्याची शक्यता जास्त असते. पस्तिशीपर्यंत बहुदा आयुष्यातील विविध घटना शिक्षण, विवाह वगैरे पार पडलेल्या असतात म्हणुन हे कदाचित होत असावे.  अजुन एक मुद्दा म्हणजे साधारणतः  पस्तिशीच्या आसपास  तुमचे आनुवंशिक गुणधर्म काहीशा जास्त प्रमाणात तुमचा ताबा घेतात असं मला वाटतं . जर ह्यातील काही गुणधर्म तुम्हांला नकोसे वाटत असतील तर त्यांचा आणि तुमचा एक संघर्ष होऊ शकतो . जर तुम्ही खास प्रयत्न केले नाहीत तर by default हे गुणधर्म तुमचा ताबा घेतात . असो  हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे !!)  परंतु काही वेळा अधिकच प्रतिकूल प्रतिक्रिया मिळत गेल्या तर मग माणसे आपल्या भोवती कवच निर्माण करतात. परंतु त्यांच्या मनात होणारी विचारांची वादळे मात्र ते थोपवू शकत नाहीत. त्यामुळं त्यांची मनस्थिती बिघडण्याची शक्यता निर्माण होते. प्रत्येकाला आपली अभिव्यक्तीची गरज ओळखता आली पाहिजे. या गरजेनुसार या अभिव्यक्तीला बाहेर पडून देण्यासाठी एका योग्य माध्यमाची किंवा मित्रमंडळींची संगत निर्माण करणे हे आपल्या आणि आपल्या भोवतालच्या लोकांच्या हिताचे असते. 

काही दिवसांतच एकटेपण वाटणाऱ्या माणसांशी योग्य संवाद साधणाऱ्या संस्थांची निर्मिती झाल्यास आश्चर्य नाही!!

सरत्या २०१८ वर्षाला निरोप देणाऱ्या कालच्या सायंकाळीची वसईच्या घरुन घेतलेली छायाचित्रे !! 




पुन्हा भेटुयात पुढील वर्षी !!

सोमवार, १७ डिसेंबर, २०१८

Bucket List!





गैर नाही काही तुझं स्वत्व जपणं...

कथा मधुरा साने हिची ! एका सुखी कुटुंबातील आयुष्य जगत असताना अचानक हृदय प्रत्यारोपणाचा प्रसंग येतो. ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्यानंतर जिच्यामुळं आपल्याला हे नवीन आयुष्य लाभलं त्या मुलीचा शोध घेताना मधुराच्या हाती गवसते ती त्या मुलीची बकेट लिस्ट आणि मग सुरु होतो एक स्वत्वाचा शोध घेण्याचा प्रवास !

                                   मराठी पाऊल पडते ... !!!
चित्रपटात वाइन, व्हिस्की घे! बियर टकीला घेतला तर त्याबरोबर लिंबू घ्यायला विसरु नकोस असे सांगणारी आजेसासु आहे. परवा ती फुलराणी मध्ये सुनेसोबत ड्रिंक येणारी सासुबाई बघितली आणि आज नातसुनेला ड्रिंक्स घेताना नक्की काय करावं ह्याविषयी मार्गदर्शन करणारी आजेसासू पाहिली! नक्कीच मराठी पाऊल पडते ..... 

 Is bucket list related to mid life crisis...
बकेट लिस्ट काही वेळा असते ती राहून गेलेल्या मनातील खरोखरीच्या गोष्टींची (पहिला प्रकार) तर काही वेळा बनवली जाते ती जाणीवपुर्वक आपल्याला सर्वांनी गृहीत धरल्याच्या भावनेचा संताप येऊन (दुसरा प्रकार)!!

दुसऱ्या प्रकारात बकेट लिस्ट आणि मिडलाइफ (क्रायसेस) याचा संबंध असू शकतो काय? ज्यांच्यासाठी आपण आपल्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे वेचली ती मुले, नवरा कालांतराने आपल्या आयुष्यात दंग होतात. केवळ वेळच्या वेळी घरी जेवण देणारी आई / बायको आणि घराचं नेटकेपण ठेवणारी एक व्यक्ती अशी आपली ओळख होऊ लागली आहे की काय अशा असा संशय वाटु शकतो अशा घटना जेव्हा काहीशा सातत्याने घडू लागतात त्यावेळी मनात एक अगतिकता किंवा नैराश्य निर्माण होते.  तिथुनच उगम होऊ शकतो बकेट लिस्टचा! 

बकेट लिस्ट काहीवेळा खरोखर मनाला आनंद देऊन जाते! परंतु काही वेळा मात्र या बकेट लिस्टचा पाठलाग करताना आपल्या भोवतालची माणसं काहीशी दुरावली जातात आणि त्यावेळी मग निर्णय घ्यायचा असतो की आपली बकेट लिस्ट महत्त्वाची की भोवतालच्या माणसांची मनं जपणं  महत्त्वाचं?

इथं कुटुंबातील बाकीच्या सदस्यांसोबत असलेला संवाद (communication) महत्वाची भुमिका बजावतो. तुम्ही बराच काळ बाकीच्या सर्वांना लाडिक सवयी लावुन मग जर एका सुंदर सकाळी अचानक जागं होऊन ही माझी बकेट लिस्ट आणि हे घरातील नवीन नियम असं सांगणं चुकीचं आहे. कुटुंबातील बाकीचे सदस्य तुमचे ह्या निर्णयातील stakeholders आहेत.  They should have seen it coming / heading their way. 

सोनी टीव्हीचे ह्या चित्रपटांबद्दल आभार ! मधल्या एका रविवारी दाखविल्या गेलेल्या बापजन्म ह्या चित्रपटावर पोस्ट नाही लिहिली. त्यात सुद्धा योग्य संवादाअभावी गैरसमजाने दुरावल्या  गेलेल्या कुटुंबाची कथा वर्णिली गेली आहे.  कदाचित बदलत्या काळात मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील सदस्यांमधील संवादाचा दर्जा हा एका प्रबंधाचा विषय होऊ शकतो! 

याबाबतीत पुरुष मात्र म्हणायला गेलं तर सुदैवी असतात. निवृत्तीच्या काळापर्यंत नोकरी-व्यवसायानिमित्त बिझी राहून आपलं महत्त्व जपून ठेवतात. त्या कालावधीत जर त्यांनी कोणता छंद जोपासला तरीही त्यांचं कौतुक होतं किंवा जर निवृत्तीनंतर हा छंद जोपासला तरीही त्यांचे कौतुक होते. 

बकेट लिस्ट मध्ये दडलंय काय?


बकेट लिस्ट हा एका यादीचा प्रश्न न राहता तो नवरा बायकोमधील विसंवादाचा प्रश्न असु शकतो!  गृहिणीला बऱ्याच वेळा गृहीत धरुन निर्णय घेतले जातात.  ह्या गोष्टीची खंत तिच्या मनात कायमची राहून गेलेली असते आणि एखादा प्रसंग असा घडतो ज्यावेळी आयुष्यभराची राहिलेली ही खंत अचानक बाहेर पडते.  त्याप्रसंगी तिने दिलेली प्रतिक्रिया भोवतालच्या लोकांना आपण हिला कसं  गृहीत धरले याची जाणीव करुन देतो. 



यामध्ये नवऱ्याची महत्त्वाची भूमिका आहे. स्त्री आयुष्याच्या एका टप्प्यावर माहेरापासुन बऱ्यापैकी दुरावली जाण्याची शक्यता वाढीस लागते. सासरची मंडळी अवतीभवती असली देखील काही गोष्टी बोलण्यासाठी मात्र फक्त नवरा लागतो. नवरा या गोष्टी शांतपणे ऐकून घेत नसेल किंवा नवऱ्याशी खऱ्या अर्थानं संवाद साधता येत नसेल (ह्यात रोमान्सचा सुद्धा समावेश असु शकतो) तर मग मात्र स्त्री कोणता निर्णय घेईल हा स्त्रीवर आणि तिच्या निराशेच्या पातळीवर अवलंबून राहतो. 

नवरा हा जरी महत्वाचा घटक असला तरी ह्यात मुलं सुद्धा महत्वाची भुमिका बजावतात. बऱ्याच वेळा होतं काय की नवरा उदारमतवादी होऊ शकतो पण मुलं आईच्या बाबतीत कर्मठ बनतात. बाकी सर्वांनी आधुनिक बनलं तरी चालेल पण आईनं मात्र पारंपरिकच राहायला हवं अशी त्यांची भुमिका असु शकते. कदाचित ही प्राथमिक प्रतिक्रिया असु शकते; सुरुवातीच्या धक्क्यातुन बाहेर आल्यावर मग ही मुले आईचं हे नवीन रुप स्वीकारु शकतात. पुन्हा एकदा संवाद ही महत्वाची गोष्ट बनुन राहते. 


ह्या चित्रपटात  खरोखरच हृदय प्रत्यारोपण केलेल्या तरुण मुलीच्या बकेट लिस्टचा समावेश करणे आवश्यक होते का?  हा मला पडलेला प्रश्न!! केवळ मधुरा सानेची आपली स्वतःची अशी बकेट लिस्ट घेऊन त्याच्याभोवती पिक्चर गुंफता आला नसता का? प्रश्नाचे उत्तर द्या वाचक हो!!
बाकी चित्रपटातील भुमिकेला माधुरीनं योग्य न्याय दिला हे माझं मत!!

रविवार, ९ डिसेंबर, २०१८

Tale of Two Captains!



संपुर्ण इलेक्ट्रॉनिक मीडियाचा आवडता असणारा भारतीय संघ एव्हाना ऑस्ट्रेलियात चांगलाच स्थिरस्थावर झाला आहे. पहिला कसोटी सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला आहे. अशावेळी जगाच्या एका कोपऱ्यात साधारणतः पन्नास ते शंभर लोकांच्या उपस्थितीत पाकिस्तानी संघ आपले कसोटी सामने खेळत आहे. प्रथम ऑस्ट्रेलिया आणि आता न्युझीलँड या दोन संघांना पाकिस्तानने आपल्या मानलेल्या घरी म्हणजे आखातात कसोटी सामन्यासाठी बोलावले होते. 

मला हे कसोटी सामने जेव्हा संधी मिळते तेव्हा बघण्यास आवडतात. यामागे काही कारणे आहेत. पहिलं म्हणजे पाकिस्तानी संघ आपल्या मैदानावरील कारनाम्यांमुळे तुमचे सतत बऱ्यापैकी मनोरंजन करीत असतो. मी त्यांच्या संघाचा कप्तान असलेल्या सर्फराजचा चाहता आहे. हा माणूस त्याच्या मनात जे काही चाललं आहे ते जसंच्या तसं त्याच्या चेहऱ्यावर प्रदर्शित करतो. यष्टीरक्षण करता करता तो संघाचे नेतृत्व सुद्धा करीत असतो. त्यामुळे एखाद्या गोलंदाजाने खराब चेंडू टाकला किंवा क्षेत्ररक्षकाने ढिसाळ क्षेत्र रक्षण केले की हा गडी खूपच संतापतो! मग उर्दूमध्ये जोरदार शेलके शब्द वापरून त्या गोलंदाज अथवा क्षेत्ररक्षकाची निर्भत्सना करीत असतो. 

तो फलंदाजीला आल्यानंतर सुद्धा करमणुकीचे क्षण काही कमी नसतात.  ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तानचे फलदांज खेळपट्टीवर गप्पा मारत असताना धावबाद झाले ती घटना जगप्रसिद्ध झाली. परंतु परवाच्या दिवशी सर्फराज आणि पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज यासिर शहा मैदानावर फलंदाजीस उतरले असताना सुद्धा एक धमाल घटना घडली.  सर्फराजने चेंडू कव्हरमधुन टोलावला. त्याने दोन धावांची हाक दिली. परंतु यासिर महाशयांच्या पायातील बूट पहिली धाव घेत असताना निघाला. तरीसुद्धा सर्फराजच्या ही गोष्ट ध्यानात न आल्याने त्याने दुसऱ्या रनसाठी जोरदार धाव घेतली. आता आपला कप्तान वेगाने येतो आहे हे म्हटल्यावर यासिरने एका पायात बूट आणि दुसरा अनवाणी पाय या परिस्थितीत नॉनस्ट्रायकर एन्डकडे कूच करणे पसंत केले. परंतु या सर्व गडबडीत तो धावबाद झाला. त्यानंतर दहा - पंधरा सेकंद सर्फराज एकदम हातवारे करीत राहिला! तुझ्या पायातील बूट निघाला तर तूच मला सांगायचे नाही का? तो खुणावत होता.  बिचारा यासिर खाली मान घालून सीमारेषेबाहेर चालला होता. आपल्या हातवाऱ्यांकडे लक्ष देणारे मैदानावर कोणी नाही हे लक्षात आल्यावर सर्फराज अत्यंत दुःखी चेहऱ्याने खाली बसून शोक करीत राहिला. 



आता वळुयात आपण भारतीय क्रिकेट क्रिकेटपटूंकडे!! आपल्या देशातील क्रिकेट हल्ली इतक्या व्यावसायिकपणे खेळले जाते की आपल्या देशातील लहान बालके ज्यांना क्रिकेटचे शास्त्रोक्त शिक्षण दिले जात आहे त्यांच्याकडून अशा चुका क्वचितच घडताना दिसून येतात!! पूर्णपणे भिनलेल्या व्यावसायिक हे मुळे असे मजेशीर क्षण मात्र भारतीय क्रिकेटमध्ये अनुभवायला मिळत नाहीत!! न्युझीलंडसोबत झालेल्या पराभवामुळे काहीशा हताश झालेल्या सर्फराजने कप्तानपदावरून निवृत्त होण्याचा विचार मनात घोळत असल्याचे कबुल केले आहे!! एका जेन्युईन खेळाडूची कारकीर्द काहीशी धोक्यात आली आहे

आता वळुयात ते केन विल्यम्सन या एका अत्यंत गुणी खेळाडूकडे!! जो एक हुशार कप्तानसुद्धा आहे. तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावात ७४ धावांनी पिछाडीवर पडलेल्या न्युझीलंड संघाच्या दुसऱ्या डावातदेखील सुरुवातीच्या काही विकेट्स चटकन पडल्या होत्या. पण विल्यम्सनने एका नवोदित खेळाडूसोबत पाचव्या विकेटसाठी एक मोठी भागीदारी करुन न्यूझीलंडला सामन्यात परत आणले.  मग पाचव्या दिवशी सकाळी अचानक आक्रमण स्वीकारुन त्याने पाकिस्तानसमोर एक आव्हानात्मक लक्ष्य ठेवलं.  आखातामध्ये घेऊन आलेल्या फिरकी गोलंदाजांच्या मदतीने त्याने पाचव्या दिवशी एक रंगतदार विजय आपल्या संघाला मिळवून दिला. हा एक गुणी खेळाडू पुढील काही वर्ष आपल्या खेळाने आणि कप्तानगिरीने आपल्याला आनंद देत राहील हीच अपेक्षा! न्यूझीलंडचा हा पाकिस्तानवर मायभूमीपासुन दुर मिळविलेला ४९ वर्षानंतरचा विजय!

२०१४ साली निर्माण केलेल्या ह्या ब्लॉगच्या हिट काउंटची संख्या आता १ लाखाच्या आसपास आली आहे! त्यामुळे तुम्ही ह्या ब्लॉगचे १००००० वे  वाचक असु शकता !!! 
त्याआधीचा ब्लॉग http://nes1988.blogspot.com/  ह्यावर आपण आधीचे ब्लॉग वाचु शकतो ! 

मंगळवार, ४ डिसेंबर, २०१८

मला काहीच प्रॉब्लेम नाही !!



सोनी टीव्हीच्या मराठी वाहिनीवर चित्रपट पाहण्याचा हा तिसरा सलग रविवार!! मुरंबा, आंधळी कोशिंबीर आणि आता मला काहीच प्रॉब्लेम नाही हा चित्रपट! रविवार दुपारची एक वाजताची वेळ आणि जाहिरातीच्या कमी व्यत्ययामुळे रस टिकवून धरणारे नवीन मराठी चित्रपट या योगामुळे हे तिन्ही चित्रपट पुर्णपणे पाहिले गेले ! 

आंधळी कोशिंबीरवर पोस्ट लिहायची राहुन गेले.  दिमाग का भेजा करणारा असा हा चित्रपट! एखादी गोष्ट का होत आहे असा फारसा विचार करण्याची गरज नसणारा हा चित्रपट! चित्रपट पाहून कोणाही माणसाला आपण चित्रपट निर्मिती करू शकतो असा आत्मविश्वास निर्माण होण्यास हरकत नाही. 

आजच्या पोस्टचा विषय मला काहीच प्रॉब्लेम नाही चित्रपट! चित्रपटाचा विषय दोन्ही बाजूंच्या घरच्यांच्या विरोधाला न जुमानता लग्न करणाऱ्या जोडप्याविषयी! घरच्यांच्या विरोधाचे मुळ कारण लग्नाला नसुन लग्नामध्ये मानपान, रितीभाती किती स्वरुपात कराव्यात याविषयी न झालेलं एकमत हे आहे! त्यामुळे हे दोघेजण लग्न करुन मोकळे होतात. घरच्यांचा विरोध इतका कडवा असतो की पुढील सात वर्षे या दोघांशी दोन्ही बाजूचे काही संपर्क ठेवत नाहीत.  एखाद्या कंपनीच्या c.e.o. पदाच्या व्यक्तीला साजेसं असं घर, एक मुलगा आणि सतत कामात व्यग्र असणारे हे दोघं!!

स्पृहाच्या शब्दात सांगायचं झालं तर आयुष्य ऑटोपायलट मोडमध्ये चालू असतं. आता आयुष्यात पैसा महत्त्वाचा आहे कारण तुमची जीवनशैली उंचावली आहे, घराचे हप्ते भरायचे आहेत आणि त्यामुळे पैसा कमावणे हे प्राधान्यक्रमावर एक, दोन आणि तीन स्थान पटकावुन बसलेलं असतं.  त्यानंतर हा पैसा मिळवण्यासाठी जे घटक उपयुक्त किंवा सहाय्यक असतात अशा घटकांनासुद्धा ऑफिसाबाहेरील वेळेचा काही हिस्सा देणे क्रमप्राप्त आलेच! त्यामुळे येणाऱ्या पार्ट्या! सर्व आयुष्य कसं एक प्रेडिक्टेबल वळणावर असतं.  दोघांनाही काहीतरी आपल्या आयुष्यात कसली तरी कमतरता आहे हे जाणवत असतं. परंतु प्रत्येक दिवशी येणाऱ्या या कृत्रिम आयुष्यातील कृत्रिम घडामोडींमध्ये इतकं गुंतून जायला होतं की ही कमतरता नक्की काय आहे याचा शोध घेण्याची इच्छा असली तरी संधी मिळत नाही!

त्यात पडला तो स्पृहाचा काहीसा फटकळ आणि वरकरणी संतापी असा वाटणारा स्वभाव! बराच वेळा वापरली गेलेली फणसाची उपमा आपण तिच्या स्वभावाला देऊ शकतो. परंतु तिच्या स्वभावाचं बाह्यकरणी कठोर असं वाटणारं परंतु खरंतर थोड्या प्रयत्नाने भेदू जाऊ शकणारे कवच भेदण्याचा किंचितसा सुद्धा प्रयत्न छोटा महाजनी करत नाही. आजची ही एक सामाजिक समस्या आहे! हल्लीचे तरुण एखाद्या तरुणीच्या फटकळ स्वभावाला किंवा तापट स्वभावाला शांतपणे हाताळू शकतात काय आणि जर बहुतांशी तरुण ही क्षमता बाळगून नसतील तर त्याचे मूळ कारण काय?

चित्रपट या वळणावर या महत्त्वाच्या मुद्द्याचं खूप खोलवर विश्लेषण करेल अशी अपेक्षा निर्माण करीत असताना एखाद्या मराठी मालिकेसारखे न पटणारे, रुचणारे असे वळण घेतो. सात वर्ष दुरावलेली दोन्ही बाजूची मंडळी अचानक या दोघांच्या संपर्कात येतात. त्यानंतर कोकणातील स्पृहाच्या घरी जातात. त्यानंतर हा चित्रपटाचा मूळ गाभा असलेला विषय पोह्यावर पेरलेल्या शेवेसारखा अधूनमधून डोकावत राहतो. कोकणात गेल्यावर दुसऱ्याच कोणत्यातरी समस्यांचं चित्रपटांत आगमन होतं आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो आणि इथेच चित्रपटाची पकड कमी होते. इथं मराठी चित्रपटाने लक्षात घेण्यासारखा धडा म्हणजे तुम्ही चित्रपटातील मुख्य विषयाची कास अशी अचानक सोडता कामा नये.  विधवा स्त्रियांचे प्रश्न,  घरातील तिशीला पोहोचलेल्या परंतु निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नसलेल्या विवाहित मुलांची होणारी कुचंबणा वगैरे वगैरे!! सर्व सामाजिक प्रश्न तुम्ही एकाच चित्रपटात कोंबण्याचा प्रयत्न करू नये!!

काही वर्षापूर्वी बिफोर द सनराइज्,  आफ्टर द सन सेट तत्सम नावांची तीन चित्रपटांची एक शृंखला पाहिली होती. हे संपूर्ण चित्रपट केवळ एका जोडप्याच्या भावविश्वावर तारुन नेण्याचे सामर्थ्य दिग्दर्शकाने दाखवलं होते.  आपणसुद्धा असा काही प्रयत्न करून बघायला हरकत नाही.  प्रत्येक चित्रपटाचा त्याच्या विषयानुसार मांडणीनुसार एक हक्काचा असा प्रेक्षकवर्ग असू शकतो. परंतु तुम्हाला तो विषय पूर्णपणे खुलवता आला हवा आला पाहिजे.  एकाच चित्रपटात वेगवेगळ्या आवडीच्या प्रेक्षकांना खेचून घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यातील कोणताही वर्ग खुश न होण्याचीच शक्यता जास्त असते. 

मुरंबा काय की मला काहीच प्रॉब्लेम नाही हा चित्रपट काय,  श्रीमंतीकडे झुकलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील समस्या उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करणारे हे चित्रपट! स्पृहाची आई म्हणते सुद्धा, "आमच्या आयुष्यात सुद्धा ह्या गोष्टी घडल्या, पण त्या समस्या आहेत हे आम्हांला वाटलंच नाही!" आता कोणी एखाद्या दुष्काळग्रस्त भागातील जोडप्याच्या भावविश्वात कोणते प्रश्न निर्माण होत असतील याविषयी चित्रपट निर्माण करण्याचा प्रयत्न अथवा धाडस करेल काय? प्रेक्षकाला चकचकीत घरे, सुंदर कोकण, सुंदर नायिका वगैरे पॅकेज बनवून आकर्षित आपण करू शकतो.  परंतु भयावह वास्तवाचे दाहक चित्रण करून बरीचशी जनता ज्या परिस्थितीचा सामना करत आहे त्यावर सुद्धा चित्रपट बनवण्याचे धाडस आपण करायला हवे. 

बाकी स्पृहाचे छोट्या महाजनीला उद्देशून असलेले आणि लक्षात राहिलेले काही संवाद! "आपल्या दोघांना आयुष्याकडून नक्की काय हवं आहे हे शोधण्याचा आपण प्रयत्न करूयात!!" "तुझ्या मनात नक्की काय आहे हे खणून काढण्याचा मी गेली सात वर्षे प्रयत्न करीत आहे!!" स्त्रियांना असले प्रश्न वीकएंडलाच नवरे मस्त जेवुन ताणुन द्यायच्या तयारीत असतानाच का विचारावे वाटतात हे न उलगडणारं कोडं ! एकदा का भेजा फ्राय झाला की दुपारची झोप उडते हो राव ! बाकीच्या वेळी असल्या प्रश्नांना गंभीर मुद्रा करुन तोंड देण्यात आम्हांला काहीच प्रॉब्लेम नाही !!

शनिवार, १ डिसेंबर, २०१८

अग्रलेखांचे माहात्म्य आणि जनमानसावरील पगडा !!



मराठी समुदायामध्ये एकंदरीतच नाट्य, संगीत, वाचन, लेखन इत्यादी प्रकारांची आवड दिसून येते.  आजच्या पोस्टचा मुख्य विषय मराठी समुदायातील वाचन आवडीविषयी आहे. मराठी माणसं खूप वाचन करतात किंबहुना करायची असं म्हणायला हळूहळू सुरुवात करावी लागेल. 

पुर्वी मोठमोठाल्या कादंबऱ्या गाजायच्या,  लेखक प्रसिद्ध व्हायचे. हल्ली कादंबरी हा प्रकार काहीसा मागे पडला असावा, म्हणजे कादंबरी प्रसिद्ध होत नाही असे नाही. परंतु त्यांना म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाही.  एखाद्या विषयावर इतका वेळ वाचन करणे यासाठी लागणारा संयम हल्ली कमी होत चालला असावा.  दुसरी गोष्ट म्हणजे तेवढ्या दमाचे कादंबरीकार जरी असले तरी त्यांना योग्य प्रसिद्धी मिळत नाही. 

माणसं आता छोट्या पुस्तकांकडे अथवा मासिकांकडे वळली असावीत असं म्हणावं तरी दिवाळी अंकांचीसुद्धा हल्ली म्हणावी तितकी चलती दिसुन येत नाही. मराठी माणसाने बहुदा हल्ली ऑनलाइन वाचनाकडे आपला मोर्चा वळविला असावा. परंतु एक गोष्ट मात्र मराठी माणसे नियमीतपणे करत असल्याचे आपल्याला आढळून येते! ती गोष्ट म्हणजे वर्तमानपत्रांचे वाचन!!

यातील काही मराठी माणसे वर्तमानपत्र वाचनाबाबतीत अत्यंत चोखंदळ असतात. त्यांच्या वर्तमानपत्र वाचनाच्या वेळा ठरलेल्या असतात.  बऱ्याच वेळा वर्तमानपत्र वाचण्यासाठी त्यांनी आपली एक जागा सुद्धा निश्चित केलेली असते. या वेळेत त्यांना कोणी व्यत्यय आणलेला त्यांना आवडत नाही. मराठी माणसे वर्तमानपत्रात नक्की काय वाचतात हा एक संशोधनाचा विषय ठरू शकतो. प्रारंभास ती माणसे राष्ट्रीय पातळीवरील बातम्या वाचत असावीत. राष्ट्रीय पातळीवरील घेण्यात येणाऱ्या निर्णयांपैकी साधारणता तीस ते चाळीस टक्के निर्णय हे चुकीचे अथवा अपुऱ्या माहितीवर आधारीत असावेत याविषयी सर्व मराठी माणसांची खात्री असते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरील बातम्यांकडे त्यांचा मोर्चा वळतो. परंतु ह्या बातम्या मात्र काहीशा त्रोटक पद्धतीने मराठी पेपर सादर केल्या जात असल्याने त्यांना या बातम्यांमध्ये राष्ट्रीय पातळीवरील बातम्याइतक्या चुका काढता येत नाहीत.  पाऊस कधी पडणार, कांद्याचे भाव बाजारपेठेत उतरले का, मोसमातील पहिला आंबा वाशीच्या बाजारपेठेत केव्हा येणार आणि यंदाचा पावसाळा कसा आहे या विषयांवर कुठे बातमी आहे का यावर यांचे बरोबर लक्ष असते!!

आता वळूयात ते मराठी माणसाच्या सर्वात आवडत्या सदराकडे! बहुसंख्य मराठी माणसे एका प्रतिशयत वर्तमानपत्राचा अग्रलेख मोठ्या एकाग्रतेने वाचतात. या अग्रलेखात मराठी भाषेतील अत्यंत जुने, क्लिष्ट शब्द किंवा वाक्प्रचार वापरले जातात. त्यामुळे हा लेख वाचून त्यातील काही बरेचसे शब्द आपल्याला न कळल्यास आपण तरी बौद्धिक वाचन केले आहे याचा प्रचंड मानसिक आनंद या वाचकांना होतो. ह्या संपादकीयामध्ये एखाद्या गंभीर समस्येचे किंवा राजकीय प्रश्नाचे उकलन केले गेलेले असते. या समस्यांचा अथवा राजकीय प्रश्नांचा आणि मराठी माणसांचा प्रत्यक्ष जीवनात बादरायण संबंधसुद्धा असण्याची शक्यता जरी कमी असली तरी त्या प्रश्नाची अथवा समस्येची संपूर्ण बाजू समजून घेण्यास या अग्रलेखाचा काही प्रमाणात उपयोग होतो. प्रत्येक वर्तमानपत्र एका विशिष्ट विचारसरणीचा किंवा राजकीय प्रणालीचा प्रसार करीत आहे अशी मराठी माणसांची ठाम समजूत असते. त्यामुळे या समजुतीला खतपाणी घालणारे निरीक्षणे  या अग्रलेखातून शोधण्यात, आणि  ती आपल्या मित्रमंडळींमध्ये मांडण्यात मराठी माणसांना प्रचंड आनंद मिळतो!! साधारणतः हा अग्रलेख वाचण्यास ही माणसे ४५ मिनिटे ते एक तास घेत असावीत! त्यातील फारच क्लिष्ट अथवा महत्त्वाच्या वाटणाऱ्या ओळींना अधोरेखित करतात.  मी अशी काही माणसे सुद्धा पाहिली आहेत ज्यांनी संपुर्ण अग्रलेख अधोरेखित केला आहे. अशा प्रकारे एकंदरीत अग्रलेखामुळे पेन कंपनीचा सुद्धा खूप फायदा होतो!!

त्यानंतर वाचकांचा मेंदू हे समजून घेण्यास अर्धा तास घेत असावा. ह्या प्रयत्नात दुपारची झोप वगैरे आटोपली की मग ही माणसे या अग्रलेखावर चर्चा करण्यास सज्ज होतात. या चर्चेदरम्यान आपली सखोल मते मांडून झाली आणि बऱ्याचजणांशी  मतभेद झाले की मग या सर्वांना खूप मानसिक समाधान मिळते!! मग रात्रीचं जेवण घेऊन ही माणसे वाट पाहत असतात ती दुसऱ्या दिवसाच्या वर्तमानपत्राची आणि त्यातील अग्रलेखाची!!!

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...