मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, २७ मार्च, २०१७

वायथिरी रिसॉर्ट - वायनाड



गेल्या आठवड्यातच झेंड्याची एक पोस्ट व्हाट्सअँपवर फिरत होती. एक चांगला शिकलासवरलेला  उच्चपदस्थ इंग्लिश माणुस चाळीशीनंतर रेल्वेस्थानकात झेंडा दाखविण्याचं काम स्वीकारतो. मनातील आशाआकांक्षाना न्याय देण्यासाठी म्हणून! 

अगदी त्या प्रमाणात नव्हे पण किंचित थोडीशी परिस्थिती सध्या माझी झाली आहे. आयुष्यात बऱ्याच तडजोडी करताना अधुनमधून जेव्हा संधी मिळेल तेव्हा अगदी झेंडा दाखविण्याइतपत नव्हे पण जमेल तितकं मनाचं पुर्णपणे ऐकायला हवं असं हल्ली खुप वाटत राहतं. अशा ठिकाणी जावं जिथं मनाची आणि आपली मनसोक्त भेट होईल. मनात साचुन राहिलेल्या ताणतणावाचा  जमेल तितका निचरा करावा ह्या हेतूनं मुंबईबाहेरील पर्यटकांचा फारसा गलबला नसलेल्या ठिकाणाचा आम्ही शोध घेत होतो. अचानक माहितीजालावर वायनाड येथील वायथिरी रिसॉर्ट समोर आलं. त्या रिसॉर्टचे फोटो, तिथं भेट दिलेल्या पर्यटकांचे अभिप्राय वाचताना मनानं ठरवुन टाकलं की ह्याच रिसॉर्टला भेट द्यायची. 

खरंतर मी अगदी पारंपरिक पद्धतीनं विचार करणारा मनुष्य! अवास्तव खर्च टाळणारा! पण आधी म्हटल्याप्रमाणं झेंड्याचा प्रभाव हल्ली जाणवु लागलेला! कधीतरी मनाला झोकून द्यावं ह्या विचारसरणीचा अधिकाधिक प्रभाव पडू लागलेला! त्यामुळं काहीशा महागड्या अशा ह्या रिसॉर्टचं आरक्षण मी एरव्ही केलं नसतं पण ह्या विचारसरणीमुळे केलं! 

परंतु ह्या रिसॉर्टमधील वास्तव्यात चारही दिवस मन अगदी प्रसन्नतेनं न्हाऊन निघालं. चार वेळेला अत्यंत सुग्रास असा जिभेला सुखावणारा पक्वान्नांचा आविष्कार, खोलीच्या समोरुन वाहणारा नैसर्गिक झरा! ह्या झऱ्याचा आसमंत भारून टाकणारा आणि मनाला शांतता देणारा असा सदैव आवाज!  खोलीत टीव्ही न देण्याची व्यवस्थापनाची उत्तम कल्पना आणि त्यामुळं रात्री आपसूक सर्व काही शांत होऊन जायचं! तिथल्या वास्तव्यातील चार दिवसात एकदाही गाडीचा हॉर्न सुद्धा ऐकायला आला नाही. आणि त्यामुळं मनाला हवी असणारी शांतता मिळाली! व्यावसायिक जीवनात नक्की तणाव कशानं येतो हे हमखास एका मुद्द्यावर बोट ठेवून सांगता नाही येणार. पण ज्यांच्याशी आपण १००% सहमत नाही अशा असंख्य गोष्टी वेगानं आपल्यावर आदळत असतात. आपलं मूळ मत आणि ह्या गोष्टींसाठी आपण केलेली तडजोड ह्यामुळं आपल्या मनाला झालेला त्रास हळुहळू साचत जातो आणि मग तणावाची निर्मिती होते. असे दोन तीन दिवस मनसोक्त शांतता मिळाली की मनात अशा साचुन राहिलेल्या गोष्टींना एका मोठ्या चित्राच्या चौकटीत व्यवस्थित बसवता येतं आणि मग आपला धोरण नक्की करता येतं. हे मोठं चित्र एकदा का स्पष्ट झालं की मन अगदी शांतशांत होतं. मुंबई शहर ह्या बाबतीत भयंकर मागं पडतं. इथं माणसाला शांतता नावाची गोष्ट मिळतच नाही. एका मुंबईला पुर्ण भारताचं प्रतिनिधी मानुन मग आपण परदेशी जायची स्वप्नं पाहतो! 

असो आजचं हे प्रवासवर्णन माझ्या आधीच्या प्रवासवर्णनांपेक्षा बरंचसं वेगळं आहे. इथं दररोज सकाळ - दुपार - संध्याकाळी काय केलं ह्याच वर्णन आढळणार नाही. पुढं कधी वेळ मिळाला तर माझ्या पारंपरिक पद्धतीनं ह्या प्रवासाचं वर्णन करणारी पोस्ट लिहीन सुद्धा! पण ही पोस्ट आहे काहीशी मुक्त!   

हे रिसॉर्ट निःसंशयपणे महागडं! पण दाट जंगलाच्या मध्यभागात जर आपल्याला स्वतःला आणि कुटुंबियांना ट्रीट करुन घ्यायचं असेल (राजेशाही वागणूक द्यायची असेल - हे मराठी भाषांतर) तर निर्विवादपणे ह्या रिसॉर्टचा भारतात अव्वल नंबर असावा! 

पर्यटनाचे विविध प्रकार असतात. आधीच्या प्रवासवर्णनात मी त्यांचं बऱ्यापैकी मला जमेल तसं वर्णन केलं आहे. ह्यावेळी आमचा हेतू अगदी स्पष्ट होता. आम्हांला जमेल तितकं ताणमुक्त व्हायचं होतं आणि स्वतःला सुखावून घ्यायचं होतं. त्यामुळं ह्या रिसॉर्टच्या आसपास काही फिरण्यासारखी ठिकाणं आहेत का ह्या फारसा पूर्वाभ्यास करण्याची आम्ही तसदी घेतली नाही.    

हे रिसॉर्ट पंचतारांकित आहे, पण पंचतारांकित रिसॉर्टमधील पाककला जशी बऱ्याच वेळा मूळ पारंपरिक पाकशास्त्रापासुन दुरावली जाते तसला प्रकार इथं आढळला नाही. इथल्या खानसाम्यानं मूळ दाक्षिणात्य / केरळीय पाककलेशी आपली नाळ राखून ठेवली आहे. मग तो सकाळच्या नाश्त्याच्या वेळचा आरोग्यपूर्ण तेलातील चविष्ट मसालाडोसा असो, दररोज समोर येणारे चिकन, मटणाचे वैविध्यपूर्ण प्रकार असोत, की सुकविलेल्या माशाचं आमट असो नैसर्गिक चव प्रत्येक पदार्थात ओतप्रोत भरली होती. प्रत्येक पदार्थात दालचिनी आणि तत्सम मसाल्यांच्या पदार्थांचा मुबलक वावर होता. मोदकांच्या लाडवांसारखा अगदी स्वादिष्ट केरळीय लाडू होता. गोडधोड खिरीचं दररोज एक नवीन रूप आम्हांसमोर यायचं! कालं (clamp) नावांचा एक दर्दी मस्त्यप्रेमींचा खाद्यप्रकार आहे तोही समोर आला आणि squid ला देखील इतकी अप्रतिम चव असते ह्याचा मला प्रथमच साक्षात्कार झाला! सुकेळीचं गोडसर केळं भोवतालच्या आवरणासकट तळून खवय्यासमोर पेश केल्यास त्याच्या मुखातून आपसूकच वाहवा असे शब्द बाहेर पडतात हे सुद्धा मी अनुभवलं. सर्व खाद्य प्रकार जितके शक्य होतील तितके आजमावेत असा निग्रह केल्यानं वारांची बंधनं शनिवारी गळून पडली! जिभेचे लाड पुरविताना इतकं सारं पोटाने सहन केल्यावर मग लक्ष वळायचं ते गोडधोडाकडं! अभिजात पाश्चिमात्य केक, पुडिंग, आईस्क्रीम, फळं ह्यांच्यासोबत तोडीसतोड अशा पारंपरिक दाक्षिणात्य खिरीसुद्धा मनाला मोहावयाच्या! मग बिचारं पोट! ते सुद्धा म्हणायचं - "दोस्त - जिंदगी जी ले यार !!" आणि मग आम्ही नव्या जोमानं पुढं सरसावायचो!
भाताचे विविध प्रकार भोवताली असताना दररोज नित्यनिमानं दहिभात, वरणभात घेणाऱ्या प्राजक्ताच्या निग्रहास मी मनापासुन दाद द्यायचो!  

आता वळूयात काही छायाचित्रांकडं ! इथं तीन प्रकारची छायाचित्र आहेत! 

१) रिसॉर्टचा परिसर मला जितका धुंडाळता आला तितक्या परिसरातील! 
२) परिसरातील विविध वनसंपत्तीचे माहिती देणारे बोर्ड  
३) पुकोट तलावाच्या (POOKOT LAKE) भोवताली घेतलेल्या एका अविस्मरणीय फेरफटक्याची

१) रिसॉर्ट परिसर - सकाळी सहा वाजता एकट्यानं हॉटेल परिसराची रपेट मारताना ऐकू येणारे आणि चित्तवृत्ती प्रफ्फुलीत करणारं  विविध पक्ष्याचं गुंजन! सकाळी पावणेसहाच्या आसपास अगदी माणसासारखा शीळ घालणारा पक्षी ह्या रिसॉर्टमध्ये आढळतो! आमच्या वास्तव्यातील प्रत्येक दिवशी आम्ही त्याची ही मंजुळ शीळ अनुभवली आणि मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवली! 



एका सायंकाळी घेतलेला हा फोटो! संधिप्रकाश काढता पाय घेत असताना मानवनिर्मित दिव्यांनी आपला प्रभाव दाखविण्यास सुरुवात केली असतानाचा! 





रिसॉर्टमधील प्रसिद्ध लक्ष्मणझुला! जगातील कोण्या एखाद्या ठिकाणी छायाचित्रकार म्हणुन मी सर्वात जास्त फोटो काढले असतील तर ते हेच हे मी अगदी खात्रीपूर्वक सांगू शकतो! अगदी कोणत्या अँगलने कोणतं झाड चांगलं येत, दिवसाची वेळ कोणती चांगली, IPAD चांगला कि तिचा फोन चांगला की माझा - सर्व काही ठाऊक असे मजला! 

पण इथं मात्र फोटो केवळ त्या झुल्याचे! 



ही वाट दूर जाते! मनात न राहवुन पुढं येणाऱ्या आयुष्याविषयी विचार डोकावतात!  





२) परिसरातील विविध वनसंपत्तीचे माहिती देणारे बोर्ड  


















आकारानं जगातील सर्वात मोठ्या खारींत गणली जाणारी हीच ती Giant Malabar Squirrel! भोजनघराच्या प्रवेशद्वाराशी हिचा वावर असायचा आणि येणाऱ्या जाणाऱ्याकडून केळ वगैरे मिळतंय का असा तिचा प्रयत्न असायचा! 
तिला खायला देऊ नये अशी  स्पष्ट शब्दात  दिलेली सूचना लोक सरळसरळ धुडकावून लावायचे! 


भोजनघराच्या चारी बाजूंना तारेचं कुंपण ज्यांच्यामुळे घालायला लागलं त्या माकडांचा हा प्रतिनिधी! हा तर चक्क जाळ्यांतून हात पुढं करुन काहीतरी मलासुद्धा द्या अशी विनवणी करायचा!


 सायंकाळी पाहुण्यांच्या मनोरंजनार्थ विविध कलाकार कार्यक्रम प्रस्तुत करायचे. हॉटेलात परदेशी पाहुण्यांचा सुद्धा वावर असल्यानं हा गायक इंग्लिश आणि हिंदी अशी दोन्ही गाणी गात होता. मी चांगल्या मूडमध्ये होतो आणि जर ह्यानं  पाहुण्यावर्गापैकी कोण्या एकाला गाणं म्हणायची संधी दिली तर पुढं होऊन गाणं म्हणायचा माझा मानस ह्या गायकाने सतत दीड - दोन तास गाणी म्हणुन हाणून पाडला! 



रिसॉर्टच्या ब्युटिकमध्ये काम करणारी ही गुणी नर्तिका! कुचीपुडी आणि भारतनाट्यम असे दोन आव्हानात्मक कलाप्रकार तिनं दोन वेगवेगळ्या रात्री सादर केले! गेली १९ वर्षे ती ह्या कलेची साधना करते असे व्यवस्थापक गोपालकृष्णन म्हणाले. 

हे व्यवस्थापक अगदी आपलं काम चोख बजावणारे आणि प्रत्येक अतिथीकडं व्यवस्थित लक्ष पुरविणारे! हे रिसॉर्ट भर जंगलात असल्यानं इथं सरपटणाऱ्या प्राण्यांचा मुक्त वावर आहे! इथं येणाऱ्या प्रत्येकाला आपण नैसर्गिक वातावरणात राहण्याचा निर्णय स्वतःहून घेतला आहे आणि त्यामुळं अशा नैसर्गिक जीवांपासून काही जखम झाल्यास व्यवस्थापन जबाबदार असणार नाही ही बाब मान्य करावी लागते! ही झाली अधिकृत बाब पण पहिल्याच दिवशी एका पाहुण्याला जळू (Leech) डसली असताना ह्या व्यवस्थापकांनी वैयक्तिकरित्या त्याच्यावर उपचार केले! 




खोलीबाहेर वाहणारा झरा एके ठिकाणी साठून त्याचं छोट्या नैसर्गिक जलसाठ्यात रूपांतर झालंय. तिथं मग माश्यांच्या शोधात येणारे पक्षी तासनतास स्थितप्रज्ञावस्थेत बसून राहायचे. असाच हा एक पक्षी!   


त्यांना पाहून "आदित्य - तू सुद्धा सर्वसंगपरित्याग करुन इथंच (इथंच म्हणजे रिसॉर्टमध्ये नव्हे तर बाहेरच्या जंगलात !!) वास्तव्य कर!" अशी अंतर्मनाची हाक ऐकू यायची. म्हटलं तर प्राजक्ताची सुद्धा ह्याला तयारी! पण ह्याच बाल्कनीत रिसॉर्टच्या वायफायचा अगदी क्षीण सिग्नल अधुनमधून यायचा. आणि हा क्षीण सिग्नल पकडण्यासाठी ह्या पक्ष्यांच्या स्थितप्रज्ञतेला तोडीस तोड देणारा सोहम बाल्कनीत आपली सर्व उपकरणं घेऊन बसायचा. त्याच्याकडं पाहत आणि जीवनातील भौतिक सुखांची आठवण करुन देणाऱ्या खोलीतील सर्व सुविधांकडे पाहत माझा सर्वसंगपरित्यागाचा निर्धार गळून पडला!


३) पुकूट तलावाच्या (POOKOT LAKE) भोवताली घेतलेल्या एका अविस्मरणीय फेरफटक्यादरम्यान घेतलेली काही छायाचित्र ! ह्या रिसॉर्टपासून पाच - सहा किलोमीटरच्या आसपास असणारा हा पुकूट तलाव! ह्याची प्रतिमा घेणं राहून गेल्यानं माहितीजालावरून घेत आहे! ह्या पोस्टमधील एकमेव बाह्य प्रतिमा! 


ह्या पोस्टनं प्रभावित होऊन तुम्ही कधीकाळी वायनाडला गेलात तर नक्की ह्या तलावाला भेट द्या! आणि ह्या तलावाचा फेरफटका नक्की घ्या ! भोवती अगदी दाट जंगल आहे. फेरफटक्याच्या सुरुवातीलाच फाल्कन (ससाण्याने) एका सर्पाला आपल्या मजबुत चोचीत घट्ट पकडून धरल्याचं आणि त्याच्यासकट आकाशात झेप घेतल्याचं अविस्मरणीय दृश्य आमच्या नजरेस पडलं! प्राजक्तानं ते तिच्या भ्रमणध्वनीत टिपलं सुद्धा! कधीमधी वाटाघाटी यशस्वी ठरल्या तर ते चित्र ह्या पोस्टमध्ये समाविष्ट करीन!

ह्या चालीत सुरुवातीला दिसलेलं बांबूचं दाट बन! 


घनदाट जंगल, विस्तीर्ण जलाशय विविध रूपांत सामोरा येत राहिला!







चैतन्यपुर्ण हिरवाई !



जंगलात लाकडं, मध गोळा करुन त्यावर उपजीविका करणारी एक जंगलकन्या! पोस्ट दुसऱ्यांदा वाचताना हे वाक्य गायब झाल्यास वाचकांनी योग्य बोध घ्यावा! 



















बघता बघता वायनाडमधील वास्तव्य संपलं! वायनाडवरून परतताना उतरणीच्या मार्गावरून घेतलेला हा एक त्या उंच भागाचा फोटो! 



आज दुपारीच परतलो ते कालिकतहुन परतण्याच्या असलेल्या मर्यादित पर्यायांमुळं! मनात असलेलं ह्या साऱ्या काही नैसर्गिक आठवणी, उत्स्फुर्त विचार कार्यालयीन इ-मेल मुळे प्रभावित होण्याच्या शक्यतेमुळे गेल्या तीन तासांत फोटो अपलोड करणं आणि मनातील मुक्त विचार मांडून टाकणं हे एका झपाट्यात जमेल तसं जमवलं! 
आधी म्हटल्याप्रमाणं जर जमलं तर आधीच्या प्रवासवर्णनासारखा दर दिवसाचा हिशोब देणारं वायथिरीचं प्रवासवर्णन पुढं कधीतरी लिहीन! 

बुधवार, १५ मार्च, २०१७

तु अशी जवळी ..

सद्यकाली व्यावसायिकदृष्ट्या  यशस्वी होण्याच्या शक्यतेत स्त्री आणि पुरुष ह्या दोघांत फारसा फरक राहिला नाही. व्यावसायिक कारकिर्दीत आरंभीच्या काही वर्षात दोघंही अगदी खांद्याला खांदा लावून काम करत असतात. त्यानंतर विवाह हा एक महत्वाचा मैलाचा दगड आयुष्यात येतो. विवाहामुळं स्त्रीच्या करियरवर परिणाम होण्याची शक्यता तुलनेनं अधिक असते. अपत्यप्राप्तीनंतर तर हा परिणाम अधिकच जाणवतो. मुलं सात आठ वर्षांची झाली की संसार काहीसा स्थिरस्थावर होत असतो. 

ह्या दरम्यान कळत नकळत एक गोष्टघडत असते. पुरुषानं विशेष काळजी घेतली नाही तर स्त्री आणि मुलं ह्यांचं एक अजून वेगळं विश्व निर्माण होऊ लागतं.  आपलं करियर, मित्रमंडळी आणि सामाजिक जीवन ह्यात पुरुष अधिकाधिक गुंतला जातो. बाकी दोन घटकांचं ठावूक नाही पण करियरच्या बाबतीत एक क्षण असा येतो की पुरुषाला आपण शिखरपल्याड पोहोचल्याचं जाणवतं. जोवर हा क्षण पुरुषाच्या आयुष्यात येत नाही तोवर पुरुषांचं व्यवस्थित चाललं असतं. पण ज्यावेळी हा क्षण येतो त्यावेळी पुरुष काहीसा गांगरतो. 


आपलं करियर त्यानं पुर्णपणे शाश्वत घटक गृहित धरला असतो. पण ज्याक्षणी त्याला ह्या घटकाचं अशाश्वत रूप जाणवतं त्यावेळी तो एकंदरीत परिस्थितीचा पुनर्विचार करतो. त्यानं जरी घराकडं काहीसं दुर्लक्ष केलेलं असलं तरी आपलं घरातील स्थान मात्र कायम गृहित धरलं असतं. आणि अशा ह्या वेळी ह्यातील काही पुरुषवर्ग आपलं घरातील स्थान पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. आपण घरातील आपल्या मूळ स्थानापासुन किती दूर गेला आहात आणि आपल्या प्रयत्नात किती खरंखुरेपण आहे ह्यावर ह्या प्रयत्नांची यशस्विता अवलंबुन असते. 

काहीजणांना मग दूरवर असणारी कातरवेळ दिसू लागते. बाकी सर्व घटकांची अशाश्वतता जाणवते आणि अशा वेळी गाण्याच्या ओळी तोंडी येतात - तू अशी जवळी रहा!!

(तळटीप - ही पोस्ट काहीशी स्त्रीधार्जिणी आहे असा पुरुषवाचकांची प्रतिक्रिया होण्याची शक्यता मी आधीच ओळखली आहे.) 

गुरुवार, ९ मार्च, २०१७

My Space- जागतिक महिला दिवस !


कालचा जागतिक महिला दिवस संमिश्र भावनांसोबत संपला. अवतीभोवती वावरणाऱ्या सामाजिक, व्यावसायिक वा मानसिक स्थैर्याच्या दृष्टिकोनातून यशस्वी  स्त्रियांकडं पाहिलं की एका विशिष्ट दिवशी जागतिक महिला दिन साजरा करण्याऐवजी त्यांचं कौतुक दररोज करायला हवं हा मुद्दा नक्कीच पटतो. त्याचबरोबर असंख्य स्त्रियांच्या हक्कांची जाणीव करुन देण्याचं काम हा दिन करतो हे ही जाणवतं. पण ही जाणीव कृतीत परिवर्तित होत नाही ही खंत!

आधुनिक स्त्रीच्या यशात पुरुषांचा कितपत वाटा आहे ह्या विषयीच्या काही संदेशांची देवाणघेवाण काल वाचनात आली. विचार करताना मनात विचार आला की ज्या स्त्रियांना छोटीशी का होईना पण स्वतःची एक गोंधळ / अडथळा विरहीत अशी स्पेस जागा मिळते त्या स्त्रिया यशस्वी होण्याची शक्यता बरीच वाढते. अशी स्वतःची स्पेस मिळू शकलेल्या स्त्रिया ह्या जागेपेक्षा अनेक मोठ्या पटीने व्याप्ती असलेली क्षेत्रं काबीज करु शकतात. 

स्त्रियांच्या यशात पुरुषांचा वाटा असला तर हाच असू शकतो! आपल्या आयुष्यातील स्त्रीला तिची स्वतःची अशी तणावमुक्त स्पेस द्या! हल्ली अवतीभोवती वाघसिंह वावरत नाहीयेत त्यामुळं त्यांच्यापासुन स्त्रीचं संरक्षण करायचं नाहीय! पण तिच्या स्थिर मनोस्थितीला उपद्रवी ठरणारे असंख्य घटक वातावरणात वावरत असतात. त्यांना वेळीच ओळखुन त्यांच्यापासुन आपल्या स्त्रीच रक्षण करा!

ह्या पोस्टला अनुरुप अशी प्रतिमा शोधण्यासाठी 'Woman in a bubble' असा शोध घेतला असता असं जाणवलं की ह्या प्रतिमेचा दुसरा अर्थ सुद्धा होऊ शकतो! तुम्ही स्त्रीला एका विशिष्ट क्षेत्रात मर्यादित करु पाहत आहात! पण मला तो अर्थ अभिप्रेत नाहीये ! शांत अशी छोटीशी आपली स्पेस मिळालेली स्त्री त्याहुन कैक पटीनं मोठं क्षेत्र आपल्या विचारांनी, कर्तृत्वानं प्रभावित करु शकते!

Happy Women's Day!

रविवार, ५ मार्च, २०१७

गॅलरी!


खरंतर काही खास विचारशृंखला मनात ठेवून ही पोस्ट लिहायला घेतली नाही. गेल्या दोन तीन महिन्यातील प्रवासातील काही छायाचित्रे भ्रमणध्वनीची गॅलरी धुंडाळताना नजरेत भरली. म्हणताना आपण म्हणतो की वेळ कसा झटकन निघुन जातोय समजत नाहीये पण अशी काही छायाचित्रं पाहताना हे सारं काही गेल्या दोन तीन महिन्यात घडलं हे काहीसं आश्चर्यकारक वाटतं. प्रत्येक छायाचित्र पाहताना मनात त्यावेळी आणि आता आलेल्या काही विचारांना टिपण्णी म्हणून जोडतोय! 

१) सकाळी सूर्योदयाच्या वेळी मुंबई विमानतळाकडं प्रस्थान करताना नजरेस पडलेल्या दिनकराचं हे सुंदर रूप!  सकाळच्या वेळी अजुनही मुंबई माणसांतली वाटते. हवेत थोडाफार गारवा जाणवतो, वाहतूक व्यवस्थित वेगानं पुढं सरकत असते आणि माणसंसुद्धा एकमेकांशी काहीशा ओलाव्याने वागत असतात. किती दिवस टिकतंय हे मुंबईचं सकाळचं माणुसकीचं रूप कोणास ठाऊक!


२ ) बऱ्याच वेळा असं काही होतं की चिंतनासाठी एखादया मनोरम्य ठिकाणी आपल्याला बोलावलं जातं. पण जागृत वेळेपैकी ९०% वेळ बंदिस्त बैठकींच्या खोल्यात, जेवणात जातो. चर्चासुद्धा अगदी गहन आणि मेंदूला ताण देणारी असते आणि हे सर्व आटपुन आपण आपल्या रूमवर परततो.  अशावेळी क्षणभर अशा रुमवरील सुविधांना मनःपूर्वक दाद देऊन आपण निद्राधीन होण्याचा प्रयत्न करतो. 



३ ) बऱ्याच प्रयत्नपूर्वक रात्री कधीतरी झोप लागते. हॉटेलचा Wi-Fi पासवर्ड मिळाला असल्यानं सुरुवातीला झोप लागली नाही तरी थोडा वेळ निघतो. पण त्यामुळं पुन्हा मेंदू सक्रिय होऊन झोप लागण्यास अडथळा येतो. मग कधीतरी झोप लागते. पहिल्या दिवशीच्या धावपळीत लक्ष न दिलेल्या निसर्गाच्या सुंदर रूपांकडं आपलं लक्ष वेधलं जातं. सर्व काही सोडुन देऊन निसर्गासोबत जाऊन राहावं इथून सुरु झालेला विचार मग निवृत्तीनंतर नक्कीच निसर्गासोबत जाऊन राहू  इथपर्यंत येऊन पोहोचतो. आधुनिक भारतासोबत एक समांतर निसर्गरम्य भारत सुद्धा घडविण्यात पुढाकार घ्यायला हवा हा मनोदय पुन्हा उचल घेतो. 




४ ) हॉटेलच्या भल्यामोठ्या आवारात नास्त्यासाठी चालत जाताना आपसूकच मॉर्निंग वॉक होऊन जातो. परिसराचं सौदर्य न्याहाळण्यासाठी आपण सकाळी लवकर उठायला हवं होतं असं वाटून जातं. पक्ष्याचा मधुर किलकिलाट कानी पडतो. निसर्गाच्या निर्मात्यानं विविध पशुपक्ष्यांना एका मूळ रूपात निर्माण केलं. त्यातला एक माणुस सोडून बाकी सर्व आपलं मूळ स्वरुप टिकवून आहेत. त्यांच्याशी आलेला असा संपर्क मनाला नेहमी सुखावून जातो. 

नाश्त्याच्या वेळी, अजुनही भारताच्या बऱ्याच भागात लोकांना पोटभर अन्न मिळत नसताना आपण मात्र तिन्ही वेळ भरपेट खातआहोत ही अपराधी भावना मनात निर्माण होते. 


५ ) दुसऱ्या दिवसापर्यंत आपण सखोल दीर्घ चर्चेला सामोरं जाण्यासाठी आवश्यक असणारा आपल्या मेंदूचा कप्पा सक्रिय करण्यात यश मिळविलेलं असतं आणि त्यामुळं हा दिवस बंद खोल्यांत सुद्धा फारसा कठीण जात नाही. 

रात्रीची तरणतलावाच्या नजीकची पार्टी एक मनोहर नजराणा प्रस्तुत करते. पौर्णिमेचा चंद्र डोळ्यांना सुखावून जातो. मैफिल रंगलेली असते, मंडळी गप्पांत रंगून गेलेली असतात. यशस्वी मंडळींचा आत्मविश्वास आपणास बरंच काही शिकवून जात असतो.  


६ ) काही दिवसांनी पुन्हा एकदा दुसऱ्या एका ठिकाणी चिंतन बैठक! इथं मागच्या अनुभवावरून धडा घेऊन सकाळी लवकर उठण्याची काळजी घेतली जाते. थंडगार वारा चित्तवृत्ती प्रफुल्लित करुन जात असतो. 



७ ) रस्त्यापल्याड डोंगराची एक रांग आताशा स्पष्ट दिसू लागलेली असते. आणि त्या डोंगराच्या कुशीत दडलेल्या गावांना जाग येऊन तिथले मिणमिणते दिवे आपल्याला खुणावत असतात. अशा एखादया गावात छोटंसं घरकुल असावं असंही वाटून जातं. 

पूर्वेला उगवणाऱ्या सूर्याचं आगमन क्षणाक्षणाला जवळ येत असतं. आणि क्रिकेट खेळणारे सहकारी जागृत होऊन फोनाफोनी सुरु झाली असते.  






८ )क्रिकेट मैदानाच्या आसपास असणार हे झाड मला आवडुन जातं. 




अशा अधिकृत वा वैयक्तिक  सहली कुठंतरी मनात चिंतनास प्रवृत्त करतात. आयुष्य एका विशिष्ट दिशेनं चाललेलं असतं. कधीकाळी शाळा कॉलेजात असताना आयुष्याची कल्पलेली दिशा आणि प्रत्यक्षातील दिशा ह्याचा बऱ्याचदा ताळमेळ लागत नसतो. नेहमीच्या आयुष्याच्या रगाड्यात असला काही विचार करायला वेळच नसतो पण असले काही क्षण मात्र ही फुरसत मिळवून देतात. 

फोनची मेमरी भरगच्च झाल्यानं लक्ष गेलेल्या भ्रमणध्वनीच्या गॅलरीची साफसफाई करताना आलेले हे सर्व विचार ह्या पोस्टवर उतरवायला रविवारची ही संध्याकाळ किंचित फुरसत देते!   

बुधवार, १ मार्च, २०१७

कुणि जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या देवेंद्रा ?

दहिसर ते वांद्रा ह्या दोन उपनगरांना जोडणाऱ्या नवीन लिंक रोडवर सध्या मेट्रोचं काम जोरात चालु आहे. ह्या कामामुळं ह्या लिंक रोडवर वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. माझा बोरिवली ते मालाड हा खरंतर २५ ते ३० मिनिटांचा प्रवास! हल्ली ह्याच प्रवासासाठी किमान एक तास वेळ लागत आहे. भविष्यातील सुखद प्रवासासाठी त्रास सहन करण्याची आमची नक्कीच तयारी आहे पण ह्या अंतरिम कालावधीत आखल्या जाऊ शकणाऱ्या योजना आणि काही प्रश्न मी नोंदवू इच्छित आहे.

१> एकाच वेळी पश्चिम द्रुतगती मार्ग आणि नवीन लिंक रोड ह्यावर काम सुरु करण्याच्या निर्णयामागची विचारधारा कोणी अधिकृत व्यक्ती स्पष्ट करेल का?
२> ह्या मेट्रोचं काम पुर्ण होण्याच प्रस्तावित वेळापत्रक आणि त्या वेळापत्रकानुसारची प्रगती जनतेस वेळोवेळी उपलब्ध केली जावी
३> ह्या मार्गावरील वाहतुकीचा होत असलेला खोळंबा पाहता ह्या दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या वाहनांसाठी अधिक कालावधीसाठी हिरवा सिग्नल करणे अपेक्षित आहे.
४>  एकाच वेळी पश्चिम द्रुतगती मार्ग आणि नवीन लिंक रोड ह्यावर काम सुरु झाल्यावर बऱ्याच लोकांनी पर्यायी मार्ग म्हणुन स्वामी विवेकानंद मार्गाची निवड करुन पाहिली. पण ह्या मार्गावर सुद्धा प्रचंड बॉटलनेक्स आहेत. आणि त्यामुळं तिथंही वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊ लागली आहे. स्वामी विवेकानंद मार्ग खड्डाविरहित करणं आणि बॉटलनेक्स हटवणं ह्यावर शासकीय यंत्रणेने प्राधान्यक्रमानं लक्ष पुरवायला हवं.
५> विविध कारणास्तव रस्ते खोदून ठेवणं, नाकाबंदी करणं हे प्रकार अजुनही नवीन लिंक रोडवर नेहमीप्रमाणं सुरु आहेत. मेट्रोचे काम पाहता ह्या दोन प्रकारांपासून ह्या मार्गाला मुक्तता देण्याची मी विनंती करतो.
६> सध्याच्या नियोजनानुसार रस्त्याच्या काही भागात एक मार्गिका मेट्रोच्या कामासाठी आरक्षित केली आहे. मग थोडा भाग मोकळा आणि पुन्हा आरक्षण असला प्रकार आहे. होतं काय की रिक्षावाले आणि काही कारवाले ह्या मधल्या मोकळ्या भागात वेगानं पुढे जाऊन पुन्हा मधल्या मार्गिकेत यायचा प्रयत्न करतात आणि मग समजुतीच्या अभावी शंख निनाद करताना बराच वेळ वाया जातो. 


उच्चविद्याविभुषित भारतीय लोकांनी अमेरिकेत जाऊ नये असं आपणा सर्वांना वाटतं. पण सुखानं ऑफिसात जायला मिळणं हा मुलभूत हक्क आपल्याला मिळायला हवा ह्याची सरकारला थोडी तरी पर्वा असावी असं ह्या सर्वाना वाटणं स्वाभाविक आहे.

खालील छायाचित्रे मीठ चौकी सिग्नलच्या आधीची आहेत. नेहमी  प्रवासास २ ते ३ मिनिटे लागतात. काल  प्रवासानं ३० मिनिटं घेतली. 









पावसाळा ३ महिन्यावर आलेला आहे. वेळीच योग्य उपाययोजना न केल्यास येत्या पावसाळ्यात ह्या मार्गावर अभूतपूर्व वाहतुककोंडी होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो ह्याची प्रशासनाने जाणीव ठेवावी हीच पूर्वसुचना  ह्या पोस्टद्वारे लेखक देऊ इच्छितो  


२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...