आधीच्या चार पोस्ट्सना चांगला प्रतिसाद! आमच्या सहलीच्या मंडळींचा whatsapp ग्रुप. त्यातील महिला मंडळीनी प्राजक्ताने काढलेल्या फोटोसाठी वेगळी खास प्रतिक्रिया दिली. धन्यवाद मंडळी! हा whatsapp ग्रुप बराच सक्रिय आहे आणि त्यावर बरीच उदबोधक चर्चा सुरु असते.
आम्ही थकलेभागले जीव रात्री त्या हेरिटेज हॉटेलात शांतपणे झोपलो होतो. थंडी बऱ्यापैकी होती. गाढ झोपेत असताना अचानक फोनची बेल वाजली. अंधार किट्ट होता. त्यामुळे फोन नक्की कुठाय हे शोधायलाच प्राजक्ताला थोडा वेळ लागला. किरकिर वाजणारी लाकडी फरशी, रात्रभर चालु ठेवावा लागणारा गीझर ह्यामुळे काहीतरी संशयास्पद वातावरण वाटत होते. त्यामुळे फोन उचलला, तर "आपका देड बजे का वेक अप कॉल!" समोरून रिसेप्शनवरुन सभ्य गृहस्थ बोलत होता. मला आता खर तर प्राजक्ताकडून स्फोटक प्रतिक्रियेची अपेक्षा होती. पण बहुदा अगदी गाढ झोपेत असल्याने तिने "ठीक हैं!" म्हणुन फोन ठेवला. मग काही मिनिटातच दुरच्या एका खोलीत पुन्हा फोनची बेल वाजली. त्या सभ्य गृहस्थाने झोपेत आम्हांला चुकून फोन लावला होता हे स्पष्ट होते.
रात्रभर तापत असलेल्या गीझरकडे मी सकाळी लवकर उठून प्रेमाने पाहिलं आणि त्याला किती ताप आला आहे ह्याचा अंदाज घेतला. थंड हवेच्या ठिकाणी धो धो गरम पाणी सोडणारा गीझर असण्यासारखं सुख नाही. पण इथला गीझर मात्र संशयास्पद होता. माझं स्नान मी सचैल वगैरे न करता आटपत घेतलं. प्राजक्ताला सुद्धा गरम पाणी मिळालं पण बाळ सोहम ज्यावेळी स्नानगृहात प्रवेश करते झाले तेव्हा गीझर महाशय थंड होत आले होते. सुरुवातीला कोमट असलेला पाण्याचा प्रवाह आंघोळीच्या ओघात हळुहळू थंडपणाकडे झुकू लागला. परंतु आपण बहुदा आधीच उशीर केला आहे आणि त्यात अजुन जर थंड पाण्याची तक्रार केली तर बाबांचे लेक्चर ऐकावयाला लागेल ह्या भितीने सोहमने निमुटपणे स्नान आटपले.
मधल्या काळात रुम सर्विसचा बेड टी येऊन गेला. त्या बिचाऱ्याकडे आम्ही पिण्यासाठी गरम पाणी मागवलं. काहीशी त्रासिक मुद्रा करुन तो परत गेला आणि काही वेळाने गरम पाणी घेऊन आला. "हे बेड टी वाले फक्त एकदाच येणार, जरी तुम्हांला थोडा वेळानंतर चहा हवा असेल तरी त्याच वेळी घेऊन ठेवा, ते नंतर परत येणार नाहीत!" आम्हांला सांगण्यात आलेली ही सुचना आम्ही चांगलीच लक्षात ठेवली होती.
मनातुन नाराज आणि बाहेरुन थंडावलेल्या सोहमला घेऊन आम्ही नाष्ट्याला आलो. त्यावेळी सर्वांकडेच ह्या गीझरच्या मनोरंजक कथा होत्या. त्यामुळे आपण एकटेच नाही आहोत ह्या भावनेने सोहमचे दुःख कमी झाले. काही जणांनी पाच वाजता उठून आंघोळ करून मग झोपी जाणे पसंत केले होते. दीड वाजताचा वेक अप कॉल द्यायला लावणारा पाहुण्याने ह्या गीझरचा इतका धसका घेतला होता की काय अशी शंका माझ्या मनात उगीचच येऊन गेली.
आज सकाळी जीपने नैनिताल तलावाकडे जायचं होतं. आम्ही आता बऱ्याच ठिकाणी जीपने जायला सरावलो होतो. जीपमध्ये आठ-आठ जण बसायचे. आम्ही, तारकर कुटुंबीय आणि भोळे जोडपे मिळून बरोबर आठजण व्हायचो. सोहम आणि श्रीया ह्यांनी हीच मंडळी एकत्र असली पाहिजेत अशी समजुत करुन घेतली होती आणि त्यामुळे आज सकाळी त्या दोघांनी एक जीपमध्ये मोक्याच्या जागा पटकावल्या. बस क्रमांक दोन मधील काही स्त्रियांनी ह्या जीपमध्ये प्रवेश करण्याची तयारी दर्शविताच "ही आमची जीप आहे" असं सांगुन ही मंडळी मोकळी झाली! त्या काकुबाई / आजीबाई चांगल्याच वैतागल्या.
नयना मंदिराच्या परिसरात आम्ही उतरलो. हा परिसर अगदी नयनरम्य होता. इथं सर्व धर्माची प्रार्थनास्थळे आपणास थोड्या थोड्या अंतरावर आढळतात. सर्वप्रथम आम्ही नयना देवीच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो. ह्या मंदिराच्या जवळच हनुमान आणि गणेशाची मंदिरे आहेत. सर्व मंडळीनी छायाचित्रणात बराच वेळ घेतला. "आदि - जीन्स आणि टी शर्ट कधीतरी घालत जा आणि मग त्याचे फोटो आम्हांला पाठव" अशी मागणी निऊचे यजमान ह्यांनी खास अमेरिकेहुन केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन काढलेला हा फोटो!
ह्यानंतर वेळ होती ती नैनिताल तलावात नौकाविहाराची! सचिनने नौकाविहारास जाण्याआधी ह्या तलावाच्या नावाच्या व्युत्पत्तीची पौराणिक आणि ऐतिहासिक कहाणी आम्हांला सांगितली!
पार्वतीने शंकराशी विवाह केला ही गोष्ट तिचा पिता दक्ष ह्यांना अजिबात पसंत नव्हती. दक्ष हे अतिश्रीमंत होते तर शंकर हे भोळा सांब! दक्ष ह्यांच्याकडे एकदा मोठा समारंभ होता. पण पार्वतीला त्या समारंभाचे निमंत्रण मिळाले नाही. आपल्याच पित्याकडील समारंभास आमंत्रणाची गरज नाही अशी मनाची समजुत काढत पार्वती त्या समारंभास जाऊन पोहोचली. परंतु त्या समारंभात सुद्धा तिला शंकराविषयी काही जण अपमानास्पद वक्तव्य करताना आढळले. एकंदरीत ह्या अपमानाने व्यथित होऊन पार्वतीने तिथल्या एका आगीत उडी मारुन प्राणाची आहुती दिली. तिचा देह कैलास पर्वताकडे घेऊन जात असताना त्या देहाचे ६४ तुकडे भारतातील विविध ठिकाणी पडले आणि त्या त्या ठिकाणी शक्तीपीठे स्थापन करण्यात आली. तिचा डोळा ह्या ठिकाणी पडला आणि तिथं ह्या तलावाची निर्मिती झाली. त्यामुळे ह्या तलावाचा आकारसुद्धा काहीसा डोळ्याच्या आकाराचा आहे असं म्हटलं जातं. ही झाली पौराणिक कथा!
ऐतिहासिक कथा नावाच्या निर्मितीशी संबंधित नाही. नरसिंग नावाचा ठेकेदार ह्या तलावावर आणि आजुबाजूच्या आपला मालकी हक्क सांगत होता. बॅरॉन नावाच्या इंग्लिश माणसाने नरसिंग ह्यास कपटाने तलावाच्या मध्याशी नेलं आणि मग त्याच्या डोक्यावर पिस्तुल ठेवुन त्याला जबरदस्तीने कागदपत्रांवर सही करण्यास भाग पाडलं.
ही कहाणी ऐकून झाल्यावर प्रत्यक्ष नौकाविहाराची वेळ होती. बोटीत शिरण्याआधी लाईफ जैकेट घालण्यास सांगण्यात आलं. अशा प्रसंगी किंवा विमानात उड्डाण करण्याआधी सुरक्षा सुचना ऐकताना माझ्या मनात पुर्णपणे दुर्लक्ष करण्याची भावना निर्माण होते. खरोखर काही कठीण प्रसंग उद्भवला तर ह्या सगळ्या लुटपुटीच्या उपायांचा काही उपयोग असणार नाही अशीच माझ्या मनात भावना असते.
ह्या तलावातील विहार खरोखर सुंदर अनुभव होता. वातावरणात सुखद गारवा होता. मंद वारा वाहत होता.
आजुबाजूला ओळखीची कुटुंबे दिसत होती. तारकर कुटुंबियांची बोट सुद्धा आसपास होती. इथे सुद्धा खरतर सोहमला शर्यतीची भावना निर्माण व्हायला हवी होती पण एकंदरीत तलावाच्या पाण्याच्या खोलीकडे त्याचे लक्ष केंद्रित असल्यानं तो शर्यत वगैरे प्रकार काही काळापुरता विसरला असावा. ह्या तलावाच्या पाण्याची खोली १६० फुट की २०० फुट ह्यावरून तारकर आणि त्यांचा बोटवाला ह्यांचं चांगलंच बौद्धिक झडलं ! तारकर ह्यांनी तलावाच्या अधिक पुढील भागात बोट नेण्याची इच्छा व्यक्त केल्यावर त्यांच्या बोटवाल्याने अधिक पुढे जाण्यासाठी जास्तीच्या पैशाची मागणी केली. ती अव्वाच्या सव्वा मागणी ऐकुन तारकरांनी त्यास नकार दिला. मी लहानपणापासुन आज्ञाधारक असणार त्यामुळे आपल्याला ठरवून दिलेल्या मार्गाच्या पलीकडे अजुन जावं असले विचार माझ्या मनात सहजा येत नाहीत!
बोटीचा प्रवास संपला. आता वेळ होती ती राजभवनला भेट देण्याची! परंतु राजभवनच्या भेटी एकेक तासाने असतात त्यामुळे आमच्याकडे काही मोकळा वेळ होता. आम्ही पुन्हा शॉपिंग मॉलमध्ये आलो. इथे सकाळी आम्हांस एक बुद्धधर्मियांचा समुह प्रार्थनेत मग्न असलेला दिसला होता. आम्ही परतलो तरीसुद्धा त्यांची प्रार्थना सुरु होती. ते त्या शॉपिंग मॉल मधील दुकानदार होते. आता इथं खरेदी करण्याशिवाय पर्याय नव्हता. मसुरीचा कासवमानेचा स्वेटर फारसा न आवडल्याने अजुन एका स्वेटरची खरेदी मी केली. भोर ह्यांनी सुद्धा स्वेटर घेतला. दोन्ही स्वेटरचे बस क्रमांक १ च्या सहप्रवाशांकडून मनःपुर्वक अभिनंदन करण्यात आले. बाकीचे लोक कौतुक करतात मग प्राजक्ताने सुद्धा त्या स्वेटरचे कौतुक केले. ग्रुपमधुन सहलीला जायचा हा फायदा! नाहीतर आपल्या खरेदीचे कौतुक बायकोच्या तोंडून ऐकण्याचा प्रसंग विरळाच! कासवमानेचा स्वेटर बहुदा आतमध्ये कोठेतरी फुरगटून बसला असावा.
तिथं फिरत असताना सोहमचा रिझर्ल्ट घोषित झाल्याची बातमी फोनद्वारे आली! नव्वदापैकी विज्ञान ८९, गणित ८५, फ्रेंच ८१ असे भरघोस गुण मिळाल्याने आमच्या तंबुत आनंदाचे वातावरण पसरले ! विज्ञानात ८९ मिळालेच कसे ही सोहमच्या मनात खदखदणारी शंका त्याने न राहवून मला एका कोपऱ्यात घेऊन बोलवुन दाखविली. असं क्वचितच होतं त्यामुळे त्याचा आनंद घे असा मी त्याला सल्ला दिला.
वेळ होताच आमच्या जीपगाड्या राजभवनकडे निघाल्या! तिथं पोहोचल्यावरसुद्धा आम्हांला काही काळ प्रतीक्षा करावी लागली. शेवटी एकदाचं आम्हांला राजभवनात प्रवेश मिळाला. इथं एक अधिकृत मार्गदर्शक आम्हांला मार्गदर्शन करणार होता. उन्हाळ्याच्या कालावधीत राजभवन इथं हलविलं जातं. पुर्वी राजभवनाचा सर्व परिसर सर्वसामान्य लोकांसाठी मोकळा होता. परंतु भेट देणाऱ्या लोकांनी ह्या भागाची म्हणावी तशी काळजी न घेतल्या गेल्याने मधल्या काही काळात पर्यटकांना राजभवन प्रवेश बंद करण्यात आला होता. पण सध्याचे राज्यपाल के. के. पॉल ह्यांनी काही निर्बंध घालुन हे भवन पुन्हा प्रवेशासाठी उघडलं. हा परिसर अगदी हिरवागार आणि प्रसन्न होता. हे राजभवन किंवा त्याचा प्रदर्शनी भाग बकिंगहम राजवाड्याची काहीशी प्रतिकृती आहे असे ही तो मार्गदर्शक म्हणाला. २००० साली भेट दिलेल्या बकिंगहम राजवाड्याच्या भेटीतील फक्त "Change of the Guard" हाच प्रकार आता माझ्या लक्षात आहे.
लहान मुलांना आयुष्यात तुला काय बनावेसे वाटतं असं विचारण्याची पुर्वी पद्धत होती. हल्ली मी लहान नाही आणि काळसुद्धा पुर्वीचा नाही. पण समजा मला चुकून कोणी माझी इच्छा विचारली तर माझं उत्तर असेल "राज्यपाल / राष्ट्रपती " ह्या राजभवनाचा हा सुरेख परिसर पाहुन मनात दाटून ठेवलेली माझी ही इच्छा पुन्हा उफाळुन आली.
राजभवनात प्रवेश केल्यावर सुरुवातीलाच एक भव्य वृक्ष दिसला. ह्या वृक्षाच्या तीन मुख्य फांद्यांनी त्रिशुळाचे रुप धारण केले होते.
राजभवनाच्या मुख्य इमारतीत प्रवेश केल्यावर छायाचित्रणास परवानगी नव्हती. आतली वास्तु आलिशान आणि भव्य होती. छतावरील माथ्याच्या बिंदुवर काचेचे छत होते ज्यातुन थेट सूर्यकिरण आत येण्याची सोय होती. वातावरणात इंग्लिशपणा ओथंबून भरला असल्याचा मला भास होत होता. आतल्या भिंतीवर १९०१ सालापासुन होऊन गेलेल्या इथल्या राज्यपालांची नावे लिहिली होती. २०२७ - आदित्य पाटील माझ्यासमोर स्पष्टपणे नाव दिसु लागलं. मस्तपैकी पुस्तकं वाचायची आणि राज्यसरकार बरखास्त करायची मी मनोरथे रचू लागलो होतो.
आतील काही भाग आरक्षित होता. तिथं पर्यटकांना प्रवेश निषिद्ध होता. आत फायरप्लेस सुद्धा होती. वजन आणि उंची करण्याची तात्कालीन उपकरणे तिथं होती.
राजभवनाची सफर झाल्यानंतर बाहेर फोटोग्राफीला वेळ देण्यात आला. सर्वांनी आपापले फोटो काढले, दुसऱ्यांचे काढले. एव्हाना मी सुद्धा ह्या फोटो सेशन्सला सरावलो होतो.
आम्ही जेवणासाठी पुन्हा हेरिटेज वास्तुला परतलो. हेरिटेज वास्तुमध्ये अगदी जुन्या पेहरावातील माणसे आसपास वावरताना दिसतील ही आशा मात्र फोल ठरली. भरपेट जेवणानंतर मस्तपैकी ताणून देण्याचा मोह होत होता. आता केबलकारने स्नो वैली पॉइंट आणि मग नंतर शॉपिंग मॉल असा कार्यक्रम होता. जर आम्ही एकटे गेलो असतो तर नक्कीच मस्त झोप काढली असती.
पावणेतीनला परत आम्ही जीपमध्ये बसलो आणि मुख्य मार्केटमध्ये आम्हांला सोडण्यात आलं. आमची सुट्टी असली तरी नैनितालमधील लोकांना नव्हती. आणि त्यामुळे त्यांचे दैनंदिन व्यवहार चालु होते. रहदारी व्यवस्थित होती आणि मुलांची शाळा नुकतीच सुटली होती. आम्हाला सायंकाळी ह्याच ठिकाणाहुन हॉटेलला फोन करुन जीप मागवायची होती.
नैनिताल येथील स्टेट बँक ऑफ़ इंडियाची शाखा !
आम्ही थोडं वरती चढुन डावीकडे वळुन केबलकारच्या रांगेत जाऊन बसलो. बहुदा वेळेची गफलत झाली असावी किंवा आज गर्दी कमी असावी. आम्हांला ज्याची तिकिटे मिळाली ती केबल कार चार वाजुन दहा मिनिटांची होती. बराच वेळ वाट पाहणंच आता आमच्या हाती होतं. आमच्यासोबत केबलकारची वाट पाहणाऱ्या लोकांत शाळेची मुले सुद्धा होती. ऑफिसातील लोक जशी संधी मिळेल तसं त्यांना केबलमध्ये संधी देत होते.
शेवटी एकदाचा आमचा क्रम लागला. ह्या केबल कारचा टप्पा मसुरीच्या केबलपेक्षा बराच लांब होता. जसजशी केबल वरती जाऊ लागली तसतसे नैनितालचे विहंगम दृश्य नजरेसमोर येऊ लागलं.
आम्ही केबलकार मधुन उतरलो. वातावरणात बराच थंडावा होता. इथुन थोडीशी कठीण चढण होती आणि मग तिथुन बर्फाच्छादित हिमालयीन शिखरांचे दर्शन होण्याची शक्यता होती. जर तुम्ही आधी सिमला - मनालीला जाऊन आला असाल तर तुम्हांला ह्या वर्णनाने सुद्धा फारशी उत्सुकता वाटणार नाही. ती थोडीफार काठीण्याची वाट पार करीत आम्ही वरती पोहोचलो तर वातावरण पुर्णपणे स्वच्छ नसल्याने ही शिखरे दिसू शकणार नसल्याचे आम्हांला सांगण्यात आलं.
आम्ही ह्या गोष्टीचे फारसे वाईट वाटून न घेता पर्यायी आकर्षणाचा शोध चालु ठेवला. तिथं नेमबाजीसाठी खालील दरीकडे जाणाऱ्या मार्गावर विविध लक्ष्य ठेवण्यात आली होती. तारकर ह्यांनी अप्रतिम नेमबाजीचे प्रदर्शन घडवीत त्या दुकानदाराने नेमुन दिलेल्या सर्व लक्ष्यांचा भेद केला. माझे नेमबाजी कौशल्य मला चांगलेच ठाऊक असल्याने सार्वजनिक ठिकाणी त्याचं प्रदर्शन मी टाळतो. तारकर ह्यांनी दिलेल्या काही टिप्समुळे सोहमच्या नेमबाजीत लक्षणीय सुधारणा दिसुन आली.
मग आम्ही खाली उतरलो. तिथं वीणा वर्ल्डचा चहा आणि गरमागरम भेळ होती. तिथं Dashing Car चा खेळ सुद्धा होता.
मी, सोहम, सचिन तारकर, श्रीया आणि अजुन एक बाहेरचा अशा पाच गाड्या रिंगणात उतरल्या. ह्यात त्या बाहेरच्याला उगाचच ठोकर देणे ही आमची प्राथमिक रणनिती होती. पण जर का तो खुप दूर गेला तर मात्र मग आपसात मारामारी करणे हा दुसरा मार्ग होता. पाच दहा मिनिटांच्या रणधुमाळीनंतर आम्ही समाधानी मनाने बाहेर पडलो. अशा वेळी रिंगणात बायको दुसरी कार घेऊन असावी असे किती पुरुषांना वाटते कोण जाणे!
ह्या निसर्गरम्य भागाची काही चित्रे !
आता परत केबलकारने खाली उतरण्याची वेळ होती. ह्या केबलकारच्या मार्गाचे तिच्या प्रवेशदारावरुन घेतलेलं हे छायाचित्र!
खाली उतरल्यानंतर आम्हांला पुन्हा शॉपिंगसाठी वेळ देण्यात आला होता. माझ्या चेहऱ्यावरील भाव लक्षात घेता ह्या माणसाला शॉपिंगसाठी बोलावण्यात अर्थ नाही हे प्राजक्ता जाणुन गेली. नैनिताल मैदानात क्रिकेटचा सामना चालु होता. बहुदा महाविद्यालयीन स्पर्धा असावी. प्रत्येक षटकानंतर धावसंख्या घोषित करण्यात येत होती. पहिली फलंदाजी करणाऱ्या संघाने वीस षटकात १६२ धावा केल्या होत्या. पाठलाग करणाऱ्या संघाने १५ षटकात २ गड्यांच्या मोबदल्यात १२० ची मजल गाठली होती. बहुदा हा संघ आरामात लक्ष्य साध्य करणार असं मला वाटुन गेलं पण त्यानंतर गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांनी अगदी टिच्चून गोलंदाजी केली. माझ्या आजुबाजूला स्थानिक लोक सुद्धा मोठ्या तन्मयेतेने सामना पाहत होते. कोणताही क्रिकेट सामना प्रत्यक्ष मैदानात जाऊन पाहण्यास मला नेहमीच खुप आनंद मिळतो. मैदानाच्या सीमारेषेबाहेर मुलांचा फुटबॉलचा खेळ चालु होता. चेंडू क्वचितच मैदानात जायचा, एक दोनदा किक माझ्याकडे आली. त्यांनी अंकल म्हणण्याआधीच मी उठून त्यांना बॉल दिला!! पाठलाग करणारा संघ का कोणास ठाऊक शेवटची आवश्यक गती पकडू शकला नाही आणि आठ धावांनी सामना हरला.
सामना संपला आणि मग मी बायकोपोराच्या शोधात शॉपिंग मॉल धुंडाळू लागलो. साधारणतः कोणत्या प्रकारच्या दुकानाकडे प्राजक्ता आकर्षित होऊ शकते ह्याचा आता मला साधारणतः तर्क करता येतो. माझा अंदाज अचुक ठरला. त्या भागातच मला ही मंडळी भेटली. नशिबाने खरेदी करण्यासारखं त्यांना फारसं काही मिळालं नव्हतं. पुढील तासभर आम्ही तिथला सर्व भाग उगाचच पायदळी घातला. खरेदी करण्यासाठी योग्य अशा वस्तु आणि दुकानाच्या शोधार्थ आम्ही पुन्हा एकदा नयना देवीच्या परिसरात येऊन पोहोचलो. इतक्या सगळ्या दुकानात लटकवून ठेवलेले गॉगल पाहुन सोहमच्या मनात पुन्हा एकदा गॉगल खरेदीची भावना निर्माण झाली होती. पण शेवटी मनासारखा गॉगल त्याला मिळाला नव्हता.
साडे सातच्या सुमारास आम्ही सर्व त्या नाक्याच्या ठिकाणी पोहोचलो. आमच्या आधी सुद्धा आमची काही मंडळी तिथं पोहोचली होती. हॉटेलला फोन करुन जीप बोलाविण्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ चालले होते. "ड्रायव्हर अभी निकला, पाच मिनट में पोहोचता ही होगा!" असे साचेबद्ध उत्तर सर्वांना मिळत होते. शेवटी ह्या भुतलावरील सर्व समस्यांचे उत्तर ज्याच्याकडे आहे त्या सचिन आणि मंडळींना आम्ही फोन लावला. मग काही वेळातच दोन जीप्स आल्या. पहिल्या जीपमध्ये सर्व महिला वर्गाला लोकलमधील गर्दीप्रमाणे समाविष्ट करण्यात आलं.
शेवटी एकदाचे आम्ही हॉटेलात पोहोचलो. उद्याच्या कार्यक्रमात २०० मीटर चढणीचा रस्ता मंडळींना पार करायचा आहे असे सचिन सांगत होता. तिथं वन्य प्राण्यांचा झु होता. तो न पाहता आपण थेट कोर्बेटचा रस्ता पकडला तर असा एकंदरीत मतप्रवाह सर्व बसमधील प्रवाशांत उमटू लागला. ह्या एकंदरीत चर्चेच्या वातावरणातच रात्रीचं जेवण आटोपलं.
ह्या हेरिटेज हॉटेलच्या आतल्या भागाचा हा फोटो! ह्या हॉटेलात प्रिती झिंटा आणि हृतिक रोशन हे कोण्या एका चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान वास्तव्य करून राहिले आहेत असे आम्हांला सांगण्यात आले.
रात्री झोपण्याची वेळ झाली होती. उद्याचा वेकअप कॉल दीड वाजता न येण्याबद्दल देवाला साकडं घालुन, गीझर महाशयांना उद्या सकाळी आमच्यावर कृपा करण्याची विनंती करुन आम्ही निद्रादेवीच्या अधीन झालो.
आधीच्या भागाच्या लिंक्स
http://patil2011.blogspot.in/
http://patil2011.blogspot.in/
http://patil2011.blogspot.in/
http://patil2011.blogspot.in/2016/04/blog-post_17.html
(क्रमशः)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा