मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, १७ एप्रिल, २०१६

वीणा वर्ल्ड - हरिद्वार मसुरी नैनिताल जिम कोर्बेट नॅशनल पार्क - दिवस ४

आज २८ मार्च! प्रवासाचा चौथा दिवस. ३६० किमी पार करण्याचा दिवस. स्पष्ट सांगायचं झालं तर आजच्या दिवसात बसमध्ये बसून बाहेरचा निसर्ग पाहण्यापलीकडे बाकी फारसं काही काम नसणार ह्याची स्पष्ट कल्पना होतीच

सकाळी साडेपाचला उठुन बॅग्स भरण्यात मोलाची भुमिका बजावली. सोहम सातला उठला आणि साडेसातपर्यंत आम्ही सर्व बॅग्स खोलीबाहेर काढून नाष्ट्याला हजर झालो. उपमा, वेज सैंडविच, बटाटावडा वगैरे पदार्थ आमच्या पाहुणचारासाठी हजर होते. इथे खिदमतीला हजर होते असा शब्दप्रयोग करण्याचा मोह होत आहे. बसने हरिद्वारच्या दिशेने ८:१० च्या सुमारास प्रस्थान केलं. मसुरीला येण्याचा हाच रस्ता असल्याने निसर्गदृश्यांमध्ये काहीसा तोचतोचपणा आला होता.



वळणाचा रस्ता आला की "मोड़ों पर ध्यान दे" ह्या खास मोठ्या अक्षरात लिहिल्या गेलेल्या सूचनेकडे वारंवार लक्ष जात होते. आधीच्या भागात वर्णिलेल्या बुरांश ह्या आरोग्यदायी गुलाबी फुलांचा फोटो घेण्याची आज संधी मिळाली

 

उतरणीचा रस्ता असल्याने झपाट्याने कापला गेला. डेहराडून आलं आणि गेलं. घड्याळात पाहिलं तर ९:०५ झाले होते. इथून हरिद्वार ६५ किमी अंतरावर आहे असा रस्त्यावरचा बोर्ड सांगत होता. आधीच्या अनुभवांवरुन रस्त्यावरच्या पाट्यांवरील अंतरावर विश्वास ठेवावा की सचिनच्या म्हणण्यावर ह्याविषयी काहीशी मनात साशंकता निर्माण झाली होती

 आता आम्ही सपाट प्रदेशात आलो होतो. बहुदा ह्या दोन बस ड्रायव्हरनी शॉर्टकट घेण्याचा निर्णय घेतला असावा. आमच्या बसच्या ड्रायव्हरला ह्या रस्त्याविषयी फारशी खात्री नसावी त्यामुळे त्याने मागच्या बस ड्रायव्हरला पुढं जाऊ दिलं.  आम्ही आता अगदी हिरव्यागार प्रदेशातून कूच करत होतो. रस्ता तसा अरुंदच होता. मध्येच सोहमला बस लागण्याची भावना उत्पन्न झाली होती. त्यामुळे मध्येच सपाट भागात नैसर्गिक सादेला ओ देण्यासाठी बसमधील लोकांनी बस थांबविली असता त्याने त्याचा फायदा घेत आपली अस्वस्थता दुर केली. ठाकुर बाईंनी आपल्याजवळील ऑरेंज गोळ्या सोहमला दिल्या, त्याच्यासोबत आम्हीसुद्धा त्या मटकावल्या!










११ वाजताच्या सुमारास बस एका बऱ्यापैकी दिसणाऱ्या संकुलापाशी थांबली तेव्हा आम्हांला हा थांबा नक्कीकशासाठी ह्याचा बोध होईना. पण "मंडळी पुढे बराच काळ चांगलं उपहारगृह नसल्याने आपण आताच जेवण करणार आहोत!" ह्या सचिनच्या घोषणेने आम्ही भानावर आलो. नशिबाने हॉटेलवाल्याला सुद्धा इतक्या लवकर जेवण तयार करण्याची सवय नसावी. त्यामुळे आम्हांला थोडी फुरसत मिळाली. म्हणायला गेलं तर ११:३० वाजता ऑफिस असल्याने सकाळी साडेदहाला जेवायला बसणाऱ्या मला तक्रार करण्याची गरज नव्हती, पण कुठे तो बोरिवलीतला आरोग्यदायी नाष्टा, जेवण आणि कोठे हे मनाला भुरळ पाडत सर्व निर्बंध तोडावयास भाग पाडणारा नाष्टा आणि जेवण!

हॉटेलचा परिसर चांगला होता. वेळ मिळताच फोटोग्राफी सुरु झाली.


प्राजक्ताने तिच्या भ्रमणध्वनीत काढलेली काही सुंदर फुलांची सुंदर चित्रे







जेवण ठीक होतं. जेवणाच्या टेबलवर सचिन तारकर मला नैनितालला अजुन किती वेळ लागेल आणि आपण हा रस्ता घ्यायला हवा असं सांगत होते. मग गप्पा ऑफिसाकडे वळल्या. मला हे ऑफिस कसं दरवर्षी सुट्ट्या घ्यायला प्रोत्साहित करते वगैरे मी मोठ्या अभिमानाने सांगत होतो

जेवणानंतर बस सुटल्या. आता बस क्रमांक २ चा ड्रायव्हर आमच्या बसवर आला होता. पुढील प्रवासात ह्याची बस चालविण्याची पद्धत आमच्या बसमधील मंडळींना फारशी काही रुचली नाही. त्याने एक दोनदा अगदी अचानकपणे ब्रेक मारले.

लगेचच हरिद्वार आलं. पहिल्या दिवशीच्या मुक्कामाच्या
Regenta Orko's च्या समोरुन आमची बस गेली त्यावेळी आम्हांला अगदी आपण इथं वर्षानुवर्षे राहुन गेलो आहोत असं वाटुन गेलं. हरिद्वारचा हा रस्ता अगदी ओळखीचा वाटत राहिला. अर्धकुंभाच्या तयारीसाठी उभारलेल्या राहुट्यांचे हे छायाचित्र! चंडी देवी किंवा मनसादेवी ह्या दोघींपैकी एका देवीच्या मंदिराचे चित्र!


 

बसच्या काचेवरुन प्रतिबिंबित झालेला कॅमेराचा फ्लॅश नदीच्या पात्राच्या शेवटी एखादं UFO असावं असा भास निर्माण करीत आहे

बहुदा पहिल्या दिवशी आमच्या बसमधील काही मंडळीनी हरिद्वारच्या परिसरात "शौचालय कॉम्प्लेक्स" ह्या शब्दप्रयोगाचा वापर वाचला होता. काही मंडळींना हा शब्दप्रयोग भारी आवडला होता. त्यामुळे पुन्हा हरिद्वार येताच ह्या शब्दप्रयोगावरुन होणाऱ्या शाब्दिक कोट्यांना बसमध्ये उधाण आलं होतं.


आता बसने डावीकडे वळण घेतलं आणि गंगेच्या विशाल पात्राने आम्हांला दर्शन दिलं.  


 
गंगेवर १८ गेट्स आहेत त्यातील १डावे वळण घेण्या आधी आणि बाकीची दोन वळण घेतल्यावर! असं काहीसं सचिन सांगत होता. ती गेट्स छायाचित्रात पकडण्याचा हा काहीसा अयशस्वी प्रसंग!








इथं अगदी हल्ली हल्लीपर्यंत मानवी प्रेतं अंतिम संस्काराच्या वेळी अर्धवट दहन करुन तशीच सोडून देण्याची काहीशी अमानुष प्रथा अस्तित्वात होती असं ऐकण्यात आलं त्याविषयी खात्रीने काही माहित नसल्याने जास्त काही बोलत नाही.



आता पूर्णपणे सपाट भाग होता आणि दोन्ही गाड्या भरधाव सुटल्या होत्या. मध्येच एका ठिकाणी पोलिसांनी गाडी थांबवली. बस क्रमांक २ वाला भरधाव गाडी तशीच घेऊन गेला मात्र आमच्या ड्रायव्हरने अगदी शिस्तीत गाडी थांबवुन सर्व कागदपत्रे दाखविली




अधुनमधून शहरे येत राहिली. शहरे अगदी छोटी आणि बकालपणाकडे झुकणारी होती. प्रत्येक ठिकाणच्या दुकानावरील पाटीवरील आढळणारा जनपद हा शब्द काहीसा छळत राहिला. मग समजलं की जनपद म्हणजे जिल्हा!



उत्तर प्रदेशातील रेल्वे फाटकावर जर आपण अडकलो तर दोन दोन तास सुद्धा वाट पाहायला लागु शकते असं काहीसं सचिन म्हणाला होता. त्यामुळे आतास्तोवर कोठे अडकायला न लागण्याचा आनंद अवर्णनीय होता
 

इतकी लांबलचक पसरलेली हिरवीगार शेतं मग लोकांना हा भाग सोडून मुंबईसारख्या ठिकाणी का यावं लागतं असा विचार मनात आला होता. मग नंतर इतरांशी चर्चा करताना जाणवलं की ही शेती काही मोजक्या लोकांच्या हाती एकवटली होती. इतक्या विस्तीर्ण भुभागाची मालकी राखायची तर मग बंदुकी वगैरे प्रकार आलाच की अशी मी मनाची समजुत घालत होतो. गंगाजल वगैरे चित्रपट उगाच आठवत राहिले
नंतर ज्ञानात अजुन भर पडली. उत्तर प्रदेशचा बराचसा भाग ह्या वर्षी तसा रखरखीत आहे. आमचा मार्ग हिरव्यागार भागातुन गेला इतकंच!
 


ह्या भागातील राज्य परिवहनाच्या बसमधुन लटकुन जाणारी ही शाळा कॉलेजातील मुले!


म्हटलं तर फारसं काही घडत नव्हतं आणि मग दुपारच्या चहाचा थांबा आला. हा एक ढाबा होता. येथील वातावरण काहीसं अजीब होतं. कोठून तरी बंदुका घेतलेले डाकू अचानक उगवतील असं मला उगीचच वाटत राहिलं. नेहमीप्रमाणे सचिन आणि मंडळींची ह्या ढाबेवाल्यासोबत खास मैत्री होती. जुन्या पुराण्या ढाब्यात २ की ३ HD टीव्ही होते. त्यावरुन सचिन त्या ढाबेवाल्याची खेचत होता

स्वच्छतागृहाच्या बाहेर हातपंपाने बोरिंगचे पाणी काढण्याची सोय (गैरसोय) होती. बाहेर सश्याचा पिंजरा होता. सोहम त्याच्याशी खेळत राहिला



ह्या ढाब्याचा फोटो काढण्याची माझी खटपट भोर आणि ठाकूर हैराण होऊन पाहत होते. ह्यात ह्या माणसाला फोटो काढण्यासारखं काय दिसलं असे त्यांच्या चेहऱ्यावरील भाव अगदी स्पष्ट दिसत होते. "मी ब्लॉग लिहितो आणि त्यासाठी हे फोटो काढतो आहे!" मी सामान्य माणसांत मोडतो हे सिद्ध करण्यासाठी मी सांगुन टाकलं. "कशात Wordpress मध्ये वगैरे लिहिता का?" ठाकुरांच्या ह्या प्रश्नाने त्यांनी मला सामान्य (Normal) म्हणून स्वीकारलं आहे ह्याची मला खात्री पटली.


"मग ह्या चारा वाहुन नेणाऱ्याचा सुद्धा काढा ना!" भोर ह्यांच्या ह्या सूचनेने त्यांना अजुनही शंका वाटत असावी असे मला वाटून गेलं


पण मग भोर ह्यांनी आपल्या ह्या भागातील आठवणी सांगितल्या. उलट्या दिशेने वाहने हाकणारे ड्रायव्हर, एका क्रीडा संघाबरोबर आले असताना एका व्यवस्थापकाने नैनितालला जाण्यासाठी त्यांची आणि संघाची केलेली खाशी सोय ह्या सगळ्या रंगतदार आठवणींनी त्यांनी आम्हांला खुश केलं

मग पुन्हा बस सुरु झाली. आता सचिन आमच्या बसमध्ये पुढील भागात येऊन सर्वांसमोर उभा राहिला. अंताक्षरी सुरु करण्याची ही वेळ असल्याचा हा संकेत होता. स्नानगृहात किशोरची गाणी अगदी सुरेखपणे म्हणणाऱ्या (हे माझं वैयक्तिक मत) मला बसमध्ये मात्र माझा आवाज फारसा साथ देत नाही हे पुर्वानुभवावरून मी शिकलो होतो आणि त्यामुळे जोवर अगदी गरज पडत नाही तोवर तोंड उघडायाचं नाही हे मी ठरवुन ठेवलं होतं

मंडळी अगदी फॉर्मात होती. भोर, ठाकूर, तारकर, भिसे ह्या सर्व जोडप्यांनी एकाहून एक सुरेख गाण्यांचा नजराणा पेश केला. मग नवविवाहित भोळे जोडपं सुद्धा फॉर्मात येऊन गाऊ लागलं. आधी आग्रहाने गाणं म्हणायला लावायला लागलेल्या आरती आणि मनाली ह्यांनी मग अगदी ठेवणीतील नवीन गाणी गायली. ह्यातील मनाली ही सुद्धा जे पी मॉर्गन मध्ये आहे. सोहम आणि प्राजक्ता सुद्धा अगदी फॉर्मात असल्याने मी गप्प बसुन होतो. भोर बाईंनी माईकचा ताबा घेतला होता आणि आपल्या सुमधुर आवाजात एक लावणी संपुर्ण गाऊन दाखविली.

ह्या सर्व प्रकारात बाजूनं चाललेल्या अनियोजित शहरी भागाचे सुद्धा मी फोटो घेतले. सतत आमच्या ग्रुपवर "ह" हे अक्षर येत राहिलं आणि शेवटी मी न राहवून माझं आवडतं "हे चिंचेचे झाड" ह्या गाण्याची सुरुवात करुन दिली. उत्साही मंडळींनी ते पुर्ण करण्याची जबाबदारी पार पाडली.





ह्या सगळ्या धामधुमीत आम्हांला थोडा ट्रॅफिक जैम लागला. खरतरं आम्ही तिथं उजवीकडे वळणार होतो पण आम्हांला पोलिसानं थेट सरळ पाठवुन दिलं. हा थोडा जास्त अंतराचा रस्ता असणार होता. पण हा कॉर्बेट पार्कच्या जवळुन जाणारा होता. सुर्याच्या पिवळ्याधम्मक उन्हात न्हाऊन निघालेली विस्तीर्ण शेतं अगदी सुंदर दिसत होती. समुह गाणी गात होता आणि मी ह्यातील काही नजारे भ्रमणध्वनित टिपण्याचा प्रयत्न करीत राहिलो








नैनिताल अजुनही ३० किमी होतं आणि आता पुन्हा चढणीचा रस्ता होता. हा माहोल अगदी सुरेख होता. बसमधील मंडळी आपआपल्या गानकौशल्यावर खुश होऊन त्याच्या आठवणी काढत बसली असावी त्यामुळे बसमध्ये शांतता होती. मी खिडकीजवळ बसुन ह्या प्रवासाचा आनंद लुटत होतो

मधला एक थांबा आम्ही अगदी नैसर्गिक ठिकाणी घेतला. आता मात्र सुर्यास्ताची वेळ झाली होती.पुन्हा एकदा प्रसन्न वातावरणातुन बस चालली होती. मध्ये बैलपडाव वगैरे मनोरंजक नावाची गावे येत राहिली. ह्या शृंखलेत प्रथमच मी विडीयो लिंक्स देत आहे. त्यांची quality इतकीशी चांगली नाही पण ह्या भागाची सुंदरता वर्णन करण्याचा शब्दात प्रयत्न करण्यापेक्षा हा मार्ग मला इथं रास्त वाटला

https://www.facebook.com/AdityaPatil2011/videos/pcb.10153032445723078/10153032432568078/?type=3&theater  

आमचं नैनिताल मधलं हॉटेल असणार होतं, Hotel Chevron Fairhavens. हे एक हेरिटेज हॉटेल असणार होतं असं सचिन म्हणत होता. कोण्या ब्रिटीशकालीन पुरातन वास्तुचे हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आलं होतं. हॉटेलला पोहोचण्यासाठी ३० किमी असताना पासूनच त्याने प्रत्येकाने आपआपल्या खोलीतील हीटर रात्री झोपतानाच लावुन ठेवावा त्याशिवाय सकाळी गरम पाणी मिळणार नाही. आणि पहिल्या आंघोळीनंतर दुसऱ्याने आंघोळ करताना १० -१५ मिनिटाचे अंतर ठेवावं अशी सुचना केली. ह्या सुचनेचे गांभीर्य आम्हांला पुढील दोन दिवसात कळणार होतं

वातावरणात आता मस्त थंडावा जाणवु लागला होता. हा चढ नक्कीच मसुरीपेक्षा कठीण वाटत होता. खरतरं समुद्रसपाटीपासून मसुरीची उंची नैनितालपेक्षा थोडीशी जास्त पण सभोवताली असलेल्या नैसर्गिक हिरवेपणामुळे नैनितालला थंडी जास्त जाणवत होती

पुन्हा एकदा बस हॉटेलच्या थेट आवारात गेली नाही. इथे जीपने आमचं स्वागत केलं. सर्व स्त्री आणि बच्चे मंडळी वेगळ्या जीपमध्ये आणि पुरुष मंडळी वेगळ्या जीपमध्ये आणि लगेज अजुन वेगळ्या जीपमध्ये असा मामला होता. नैनिताल मध्ये आम्ही शिरलो. आतल्या गल्लीबोळातून फिरत असताना जीप अचानक एका ठिकाणी थांबली. टेकऑफ पूर्वी विमान क्षणभर थांबत तसं आणि मग साधारणतः दोनशे मीटरचा अगदी तीव्र चढणीचा रस्ता त्या जीपने एका दमात पार केला

एकदाचं हेरिटेज हॉटेल आलं होतं. ह्या हेरिटेज हॉटेलमधला हा आतला नजारा! पुन्हा एकदा रुचकर जेवण होतं. खोल्यातील फरशी लाकडी होती. कुठेही पाऊल टाकलं की करकर आवाज करणारी. हेरिटेज हॉटेल म्हणुन ऊर अभिमानाने भरुन येत असला तरी काही सोयी चांगल्या असायला हव्या होत्या असं वाटत राहिलं. भिसे ह्यांच्या खोलीत काही प्रॉब्लेम असल्याने त्यांना रुम बदलुन मिळाली

मासुम मधील "तुजसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूँ मैं!" ह्या गाण्यापासून आवडून गेलेल्या नैनिताल शहरात आपण प्रवेश केला ह्याचा मनोमन आनंद मला होत होता


(क्रमशः)


आधीच्या भागांच्या लिंक्स 
http://patil2011.blogspot.in/2016/04/blog-post.html


 
 



https://www.facebook.com/AdityaPatil2011/videos/10153032411118078/




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...