गेले काही दिवस वसईत बराच मुक्काम होता. आधी लग्नानिमित्त आणि मग सुट्टी मिळाली म्हणून. ह्या कालावधीत वसईत खूप माणसं भेटतात. अगदी लहाणपणापासून ओळखीतली ते नव्याने ओळख झालेली. थोडी फुरसत असल्याने माणसं मनमोकळेपणाने बोलण्याची शक्यता जास्त असते.
जुन्या ओळखीतले लोक भेटतात. मन भूतकाळात जातं. गप्पांचा ओघ जुन्या आठवणीकडे जातो. कधी दोघांनाही ह्या आठवणी हव्याहव्याशा वाटतात, तर कधी एकालाच! काही माणसं जगतात वर्तमानकाळात पण मनाने भूतकाळात अडकून बसलेली असतात. काहीजण भूतकाळाला फक्त फुरसतीच्या क्षणी आठवू शकण्याची क्षमता बाळगून असतात. काहीजणांना भूतकाळातील फक्त चांगले क्षण आठवतात तर काहींना भूतकाळातील कटू स्मृती कायम छळत राहतात.
चौधरीबाई आणि त्यांच्या यजमानांच्या लग्नाला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी जवळच्या नातेवाईकांना आणि आम्हां शेजाऱ्यांना एका सुंदर सोहळ्यासाठी आमंत्रित केलं. हे दोघं अगदी साधेपणाने आयुष्य जगले. त्यांचा कुटुंबीय असलेल्या रॉबर्ट ह्याने अस्खलित मराठीत सुंदर भाषण केलं. हे जोडपं अगदी साधेपणाने आयुष्य जगलं, त्यांनी मोठा बंगला वगैरे उभारला नसेल, महागड्या गाड्या विकत घेतल्या नसतील पण एक साधं सुधं सार्थक जीवन जगलं. बाई जेव्हा बाजारातून काही भाजी वगैरे घेऊन यायच्या किंबहुना अजूनही येतात तेव्हा त्यांचे यजमान तात्काळ पुढे येतात. पिशवी घेतात; घरकामात त्यांना अजूनही मदत करतात. चौधरीबाई काहीशा भावनाविवश झाल्या होत्या. त्यांचं मन भूतकाळात गेलं. मुलांना सांभाळायचा प्रश्न तेव्हाही यायचा. काही काळ आईकडे तामतलावला शाळेत सोडून यायची वेळ आली. त्याकाळी बस रिक्षा सहजासहजी मिळत नसल्याने संध्याकाळी त्या लहान मुलीला घेऊन सुमारे दीड किलोमीटर अंतर चालत यावे लागत असे. पुढे चुलतदिरांनी सुद्धा लहान मुली सांभाळायला मदत केली.
ह्याच दिवशी (२७ डिसेंबर १९६४) रोजी चौधरी बाईंच्या यजमानांच्या बहिणीचा सुद्धा विवाह झाला होता. त्या दांपत्याला सुद्धा व्यासपीठावर बोलावून शुभेच्छा देण्यात आल्या. एकाच दिवशी बहीण भावांची लग्न लावायची जबाबदारी त्यांच्या पालकांनी पेलली. ही पद्धत अजूनही कधी कधी पाहायला मिळते. काही लोक ह्या पद्धतीविषयी साशंक असतात. त्यांनी ह्या दोन दीर्घकाळ विवाहबंधनात बद्ध असलेल्या जोडप्यांकडे पाहून निशंक व्हावे असे एक वक्ता म्हणाला. दोन तीन वक्त्यांनी हल्लीच्या काळात विवाहसंस्था कठीण काळातून जात असताना ह्या जोडप्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असे वक्तव्य केले.
राहून राहून असंच वाटत गेलं - स्वयंप्रगतीचा ध्यास आणि शांत जीवन ह्या दोन रेषा कधी एकत्र जाऊ शकत नाहीत. कोण्या एकाचा त्याग पती पत्नीतील एकाला किंवा दोघांना करावा लागतोच. ती गोष्ट कोणती आणि त्याग कोणी करायचा ह्याविषयी नवराबायकोचं एकमत व्हावं लागत. पूर्वी हे विचार न करता होत असे कारण पर्याय कमी होते. आता मात्र परिस्थिती कठीण आहे.
सुट्टीनिम्मित परदेशाहून आलेली मंडळी जसजशी सुट्टी संपू लागली तशी खिन्न होत गेली. आमच्या गल्लीत काही दिवसांपूर्वी एक दुःखद घटना घडली. आमच्या एक शेजारी, ज्या अगदी चांगल्या हिंडत्या फिरत्या होत्या, त्यांना सुमारे सहा महिन्यापूर्वी एका असाध्य आजाराचे (बहुदा ALS) निदान झाले. दोन्ही मुले, जावई परदेशात! दोन्ही मुले अगदी प्रेमळ! त्यांनी आपल्या परीने खूप प्रयत्न केला.शक्य असतील तितके उपचार केले, पैशाकडे पाहिलं नाही. पण ईश्वराच्या मनात मात्र वेगळंच होतं. काही दिवसांपूर्वी ह्या बाई देवाघरी गेल्या. अंकल एकटेच राहिले. त्यांना सोडून परदेशी जाताना मुलांच्या मनात काय भावना निर्माण झाल्या असतील ह्याची कल्पनासुद्धा करवत नाही.
बहिण निऊ तीन वर्षे अमेरिकेत राहून तीन आठवड्याच्या सुट्टीवर आली होती. तिचीही सुट्टी जशी संपायला आली तशी तिच्या चेहऱ्यावर उदासी दिसू लागली. ज्या सुट्टीची इतक्या आतुरतेने वाट पाहिली ती इतक्या झटकन संपून जाईल ह्याची कल्पना केली नव्हती. शर्व आणि निरंजना सुद्धा मजेत होते. तीन वर्षांच्या मधल्या कालावधीत त्यांच्यात फारसा काही फरक पडलेला वाटला नाही. म्हणजे त्यांचा भारतीयपणा बऱ्यापैकी शाबूत आहे. निऊ आणि निशांकला ह्याचे श्रेय द्यायला हवं. शर्वला तर अमेरिकन असेंटमध्ये त्याच्याशी बोलण्याचा माझा प्रयत्न फारसा भावला नाही. मी अमेरिकेत राहिलो तरी मला मराठी समजतं असं सांगून त्याने माझी आणि स्वतःची सुद्धा सुटका केली.
सुश्रुत दोन वर्षांनी न्यूझीलंड वरून आला. त्याने स्वरूपदादाच्या लग्नात खूप काम केलं. त्याची सुट्टी सुद्धा संपत आली. काहीसा हिरमुसला झाला तो! भारतात मनासारखी नोकरी मिळाली तर पुढे कधीतरी परत येईन असे म्हणाला. जबाबदारी त्याच्या चेहऱ्यावर, बोलण्यात जाणवत राहिली.
अजून काही लोक भेटत राहिले. काहींना आयुष्याने समृद्धी दिली होती. त्यांच्या चेहऱ्यावर समृद्धी उठून दिसत होती. काहींना आयुष्याने कष्ट दिले होते. तरीही हे लोक आयुष्यात जमेल तसा आनंद शोधत होते. पैसा आणि आनंद एकत्र नांदायला हवेत असं नाहीच.
काही दिवस देवपूजेची जबाबदारी माझ्यावर पडली. पडली म्हणण्यापेक्षा मी आनंदाने घेतली. आजीने कधी लहान असताना पूजा कशी करायची हे दाखवलं होतं. त्यातलं किती लक्षात आहे हे माहित नाही. आता स्वतःच्या समजुतीनुसार पूजा करतो.
बंबाच्या गरमागरम पाण्याने आंघोळीस मजा आली. आंघोळ संपवू नये असेच वाटायचे. सकाळी लवकर आंघोळ आटोपल्यावर दिवस कसा मोठा वाटतो. उत्साहाने भारून गेल्यावर क्षणनक्षण पुरेपूर चांगल्या कार्यात घालवावासा वाटतो.
ताम्हाणात दुधसाखरेच्या नैवेद्याची वाटी, सोबत अभिषेक केलेल्या देवांना कोरडे करण्यासाठी घेतलेल कापड आणि अंगणातल्या फुलांची परडी. अंगणात जास्वंदाची तीन चार रंगांची झाड आहेत. पावसाळ्यात ती अगदी फुलांनी बहरून जातात. पावसाळ्यातील जमिनीचा ओलावा आता संपत आला आहे. त्यामुळे ह्या झाडांची फुले ओसरू लागली आहेत. आता वडील ह्या झाडांना पाणी द्यायला सुरु करतील. तर ह्या जास्वंदाची लाल, भगवी, पिवळसर फुले आणि टगर आणि अजून एक दोन झाडांची पांढरी फुले अंगणात सकाळी फुलतात. त्यांनी परडी तशी भरते. मग ताम्हाण, फुलांनी भरलेली परडी घेऊन पूजेला लागायचं. वर म्हटल्याप्रमाणे मी केलेली पूजा शास्त्रोक्त नसते. पण भावना महत्वाची! आजीने बऱ्याच देवांच्या मूर्ती देव्हाऱ्यात मांडल्या होत्या. काळानुसार थोडा त्यात बदल झाला पण बहुतांशी ठेवण तशीच आहे. ह्या सर्व देवांना क्रमाक्रमाने ताम्हाणात घ्यायचं, त्यांना अभिषेक घालायचा, कपड्याने (ह्याला एक चांगला शब्द आहे जो आता आठवत नाही) त्यांना कोरडं करायचं आणि मग त्यांच्या जागी पुन्हा त्यांची मांडणी करायची. मग सहाणेवर चंदन घासून त्यांना गंध लावायचा, कुंकू लावायचं. दुध साखरेचा नेवैद्य दाखवायचा. देवाला दिवा, अगरबत्ती लावायचं. मग तांब्यातल उरलेलं पाणी मागच्या दारी असलेल्या तुळशीला घालायचं. ते जास्तच उरलं असेल तर मग विहिरीत सोडून द्यायचं. पूजा करत असताना खरं तर विशिष्ट स्तोत्र वगैरे म्हणायला हवं. माझी मर्यादा मारुतीस्तोत्र, गणपतीस्तोत्रच्या पलीकडे जात नसल्याने आलटून पालटून त्यांच्या सहाय्याने पूजा आटोपायची. शाळेत असताना पारनाक्यावरील कॉंग्रेस भवनात किंवा अजून एका हॉलवर सार्वजनिक गणपतीच्या वेळी पठण स्पर्धा होत. त्यावेळी मारुतीस्तोत्र पठनाची स्पर्धा असे. त्यात मला बहुदा उतेजनार्थ बक्षीस मिळे आणि दोन रुपये मिळत. त्या निमित्ताने मारुतीस्तोत्र पाठ झालं ते झालं!
पावसाळ्यात अंगणाच्या एका कोपऱ्यात दुर्वानी बराच प्रसार केला होता. पावसाच्या पाण्यावर त्या मस्त भरारून आल्या होत्या. मोठीआई सकाळी उठून त्यातील मोजक्या देवपूजेला घेऊन जायची. जमिनीतला ओलावा संपला आणि दुर्वांची सुकलेली पानं दिसू लागली. त्या भागातली दुर्वांची मुळं मरू लागली. दोन दिवस त्यांना पाणी देऊन जगवायचा मी प्रयत्न केला. पुढे पण टिकली तर किती बरं होईल! अंगणातलं प्राजक्ताचं झाड अजून हिरवंच आहे पण बहर मात्र थोडा कमी झाला आहे.
होळीवर भाजीसाठी अनेक फेऱ्या झाल्या. बहुतेक सर्व भाजीवाल्या भाजीच्या दर्जाविषयी अगदी स्पष्ट सांगतात. ह्या मोसमातील होळीवरची भाजी अगदी मन प्रसन्न करून टाकते. मुळा, माठ, तांदूळका, लाल माठ, पालक, खापरा, लहान मेथी, मोठी मेथी - पालेभाजीचेच अनेक प्रकार! ह्या काळात अल्कोल आणि नवलकोल अशा दोन प्रकारची सुद्धा भाजी येते. थोडंस कळायला लागल्यापासून अल्कोल आणि अल्कोहोलचा काहीतरी संबंध असावा असा मला दाट संशय होता. कोथिंबीरसुद्धा मस्त दिसत होती. तिच्या हिरव्यागार रंगावर खुश होत चांगल्या दोन जुड्या घेतल्या. घरी काय होईल ह्याची पर्वा न करता! दुधी तर अगदी कोवळा मिळाला. पडवळ, वाल वांगी, फरसबी, भेंडी, पापडी, सिमला मिरची, पातीचा कांदा ह्यांनी समग्र पिशव्या काठोकाठ भरल्या. पण सफेद वेलचीची केळी, संत्र, डाळिंब, सफरचंद ह्यांना जागा तर करावीच लागली. कांदे बटाटे सुद्धा अगदी मस्त होते. ओला कांदा मस्त लाल दिसत होता. हा चांगला दिसतोय, तो पण चांगला दिसतोय असं करता करता चांगले दोन किलो झाले. पस्तीस रुपये किलोचा भाव देताना शरद पवार आठवले! कांदे बटाट्यांना स्कूटरच्या पोटात बसवले. त्या नाजूक स्कूटरवर मी आणि समग्र भाजीचे प्रतिनिधित्व घेऊन कसाबसा घरी आलो.
दुसऱ्या एका दिवशी मासळीमार्केटला गेलो. पापलेटचे भाव अगदी आकाशाला भिडलेले होते. ३ पापलेट म्हणे २००० रुपये. त्यांनी सांगितलेल्या भावाचा थेट अर्धा भाव सांगायचा हा प्राजक्ताने सांगितलेला नियम आचरणात आणण्याचे धारिष्ट झाले नाही. पैसा उगाच खर्च नाही करायचा. मग मोर्चा कोलंबी, बोंबील आणि गोळीचं खारं ह्याच्याकडे वळवलं. गोळीचं खारं अगदी मस्त मिळालं. तिने थोडं महागच दिलं पण ताजेपणा अगदी भरभरून दिसत होता. तिला जरा चिडवायला "पण नक्की ताजं आहे ना?" असे मी पैसे देता देता शुद्ध मराठीत विचारलं. "आ, मी दररोज इथे बसे नयं? असे तिने गुश्श्यातच प्रत्त्युत्तर दिलं. मोठ्या कोलंबीचा सहाशेचा वाटा असा भाव सांगितल्यावर मी छोट्या कोलंबीकडे मोर्चा वळवला. ती कोळीण बिचारी चाळीस चाळीस असे दोन वाटे द्यायला तयार झाली. सोलून देशील का? असे मी फारशी अपेक्षा न ठेवता विचारलं. आणि ती तयार सुद्धा झाली. दहा मिनिटात तिने कोलंबी सोलून दिल्यावर मी शंभरची नोट तिच्या हाती सोपवल्यावर तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले.
वसईच्या कला क्रीडा महोत्सवाचे पंचविसावे वर्ष! तुम्ही जर मुंबईत राहणारे असाल तर नक्की ह्या प्रदर्शनाला भेट द्या! दरवर्षी २६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर ह्या कालावधीत हे प्रदर्शन भरतं. वसई विरार परिसरातील विविध शाळा नृत्य, गायन, सुगम संगीत, छायाचित्रण, क्रीडास्पर्धांत भाग घेतात. धावण्याच्या, कबड्डी, खोखोच्या, बॉक्सिंगच्या स्पर्धा होतात. रांगोळी विभाग तर अप्रतिमच! बाकी मग शरीरसौष्ठव, मिस वसई, पर्सनॅलिटी स्पर्धा सुद्धा होतात. ह्या स्पर्धेच्या आयोजनात काम करणाऱ्या आणि कधीही व्यासपीठावर येऊ न शकलेल्या कार्यकर्त्यांना मनापासून सलाम! ह्या महोत्सवात उतेकर फिशरी ह्यांनी मस्त्य आणि पक्षीप्रदर्शनाचा जो विभाग मांडला आहे तो केवळ अप्रतिम! डोळ्याचे पारणे फेडून टाकणारा! असंच एक साधं घर असावं आणि त्यात असा एक फिश टैंक असावा. त्यातल्या त्या माशांच्या हालचालीकडे आणि त्या दगडांवरील धावणाऱ्या सूक्ष्म रेषांकडे तासंतास पाहत राहावं. मन भरून जायला इतकंस पुरेसं आहे ना! पक्षीप्रदर्शनात अगदी इवलेसे पक्षी होते. हे हिमालयातील दुर्मिळ पक्षी असावेत अशी माहिती तज्ञ प्राजक्ता ह्यांनी पुरवली. दुसऱ्या क्षणाला मी हिमालयातील ऋषी बनून गुहेत बसलो होतो आणि हे पक्षी माझ्या गुहेसमोरील आकाशाला भिडणाऱ्या सूचीपर्णी वृक्षावर विहार करीत होते.
वसईच्या थंडीत अशा मस्त संध्याकाळी वडा पाव वगैरे खाण्याच्या आमच्या इच्छेवर आम्ही आश्चर्यकारकरित्या विजय मिळवला. मैदानाच्या एका कोपऱ्यात मांसाहारी पदार्थांचे स्टॉल लागले होते. त्यातील वाडवळ स्टॉवर जाऊन वधडी ह्या खास वसई पदार्थाची एक डिश घेतली.
सुट्टी संपत आली होती. अगदी लहानपणापासून ज्या वातावरणात दिवस घालवले तिथेच पुन्हा जवळजवळ दोन आठवडे होतो. ऑफिससुद्धा नशिबाने शांत होते. अशाच वातावरणात कायम राहावं असा विचार अनेकदा मनात येऊनसुद्धा गेला. पण कर्तव्य बोलावत होतं. अमेरिकेतील माझ्या कंपनीच्या कार्डची जबाबदारी जणू काही मीच माझ्या खांद्यावर घेतली होती. सोमवार सकाळी कार काढली आणि बोरीवलीला परतलो.
२०१४ खरंतर येत्या दोन तासात संपेल पण माझ्यासाठी ते रविवारी रात्रीच वसई मैदानावरून परतताना संपलं होतं.
आपणा सर्वांना २०१५ आरोग्यपूर्ण आणि सुखासमृद्धीच जावो ही शुभेच्छा!