जेवल्यानंतर छोट्या इंद्रायणीला झोप येऊ लागली तशी सगुणाबाईनी सारवलेल्या खोलीत तिला एक घोंगड टाकून दिलं आणि अंगावर एक चादर ओढून दिली. इंद्रायणीनं मग आपल्या बाहुलीचा हट्ट धरला. कौतुकाने सगुणाबाईनी तिची ती जुनी बाहुली इंद्रायणीला आणून दिली. आपल्या इवलाश्या हातांनी इंद्रायणीनं बाहुलीला छातीशी घट्ट पकडलं. डिसेंबर महिन्यातला कोकणातला थंड वारा कौलारू घरातून आत शिरत होता. सगुणाबाई तिला हळुवार हातांनी थोपटू लागल्या. तिच्या नकळत त्यांनी तिच्या अंगावर चादरही ओढली. हळूहळू इंद्रायणीचे घारे डोळे पेंगू लागले. मोठ्या कौतुकाने झोपलेल्या ह्या आपल्या बाहुलीकडे सगुणाबाई काही वेळ कौतुकाने पाहतच राहिल्या.
अचानक त्यांना गोपाळरावांची आठवण झाली तशा त्या उठल्या. गोपाळराव आपल्या अभ्यासाच्या खोलीत लिखाणात मग्न होते. अशा वेळी त्यात व्यत्यय आणलेला त्यांना खपत नसे. माजघरात नजर टाकली तर यमुनाबाईंचा सुद्धा डोळा लागला होता. मग सगुणाबाई शंकरने आणून टाकलेल्या फणसाची वर्गवारी करण्यात गढून गेल्या. उद्या बाजारात ह्याला चांगला भाव नक्कीच येईल अशी आशा करायला हरकत नाही असे त्यांना वाटू लागले.
इतक्यात त्यांना गोपाळरावांच्या हालचालीचा आवाज आला. गोपाळराव तयार होऊन बाहेर निघाले सुद्धा होते. "असे अचानक कोठे निघालात?" मोठं धाडस करून सगुणाबाईंनी त्यांना विचारलं. "एक महत्वाची बैठक आहे नारायणरावांकडे!" असे म्हणत गोपाळराव निघाले सुद्धा! "आताशा ह्यांच्या नारायणरावांकडे खूप फेऱ्या व्हायला लागल्या आहेत" असा विचार करीत सगुणाबाई काहीशा चिंताग्रस्त झाल्या. ब्रिटिशांनी कोकणात अनेक ठिकाणी छापे घालण्यास सुरुवात केली होती. आणि अशा वेळी नारायणरावांसोबत गोपाळरावांच्या सततच्या बैठका सगुणाताईंना चिंतेत टाकत होत्या. नारायणराव एक दोनदा तुरुंगात जाऊन सुद्धा आले होते. अशाच चिंतेच्या विचारात असताना सगुणाबाईचा सुद्धा काही वेळ डोळा लागला. मग त्यांना जाग आली आणि त्या आपल्या कामाला लागल्या. थंडीचे छोटे दिवस असल्याने अंगणातील झाडांची देखरेख लवकर आटपायची होती. गोपाळरावांनी बाग अगदी मस्त बनविली होती. विविध रंगांची फुलझाडे अगदी डोळ्यांना तृप्त करीत.
सूर्य आकाशातून उतरणीला आला तशी छोटी इंद्रायणीची झोप पुरी झाली. आपल्याजवळच झोपलेल्या बाहुलीला पाहून ती हसली आणि तिची मस्त खळी पडली. काही वेळ ती तसाच घरातील आवाजाचा मागोवा घेत पडून राहिली. घरात तर सर्व शांत शांत होते. मग तिला आपल्या आईचा बागेत बोलण्याचा आवाज आला. मग एकदम उठून ती ओटीवर आली. सूर्याची अगदी कोवळी किरणे बागेतल्या झाडातून आपला मार्ग काढीत ओटीवर पसरली होती. सगुणाबाईनी काही फुले काढली होती. काही उनाडपणे पसरणाऱ्या वेलींना मार्गी लावले होते. आणि आता त्या चाफ्याच्या एका फुलाकडे लक्ष ठेऊन होत्या. ते कसे काढायचे असा त्यांना प्रश्न पडला होता. "आई!" छोट्या इंद्रायणीच्या आवाजाने त्या भानावर आल्या. मोठ्या कौतुकाने त्या तिच्याकडे पाहू लागल्या. "आई, मला पन बागेत ने ना!" इंद्रायणी म्हणाली.
आईने जशा तिला पायरीवरून उतरवून दिलं तसं इंद्रायणी बागेत पळत निघाली. बागेत पहिलंच तिला आवळ्याचे झाड दिसले. त्याचे काही छोटे आवळे खाली पडले होते. त्यातला एक तिने तोंडात घातला. सगुणाबाई तिची गंमत पाहत होत्या. "आंबत!" करत तिने तो आवळा फेकून दिला. मग हळूच ती थांबली. खाली पडलेल्या पालापाचोळ्यात एक छोटी चिमणी
दाणे शोधीत होती. "चिऊताई!" इंद्रायणीने तिला हाक मारली. चिमणीने तिच्याकडे पाहिलं. ही छोटी आपल्याला काही धोकादायक नसावी असे तिला वाटलं. पण इंद्रायणीने एक दोन पावलं पुढे टाकताच मात्र ती चिऊताई घाबरून उडून गेली. "मला चिऊताई पाहिजे!" काहीशा नाराजीने इंद्रायणीने आईकडे तक्रार केली. पण मग अंगणासमोरील रस्त्यावरून येणाऱ्या खिल्लाऱ्या बैलांच्या बैलगाडीच्या आवाजाने तिचं लक्ष वेधलं गेलं. ही बैलगाडी नजरेपलिकडे जाईस्तोवर मग ती एकटक तिच्याकडे पाहत राहिली. तिची बागेतील ही भेट बराच वेळ चालली असती, पण मग जसा अंधार होऊ लागला तसं सगुणाबाईंनी तिला हाक मारून बोलावलं.
"अजून गोपाळ कसा नाही आला?" इतका वेळ सगुणाबाईंच्या मनात असणारी चिंता यमुनाबाईंनी बोलून दाखवली. बराच वेळ त्याही गोपाळरावांच्या परतीच्या वाटेकडे डोळे लावून बसल्या होत्या. देवघरात दिवे लावून त्या तिघींनी प्रार्थना केली. प्रार्थना संपवून होताच इंद्रायणी म्हणाली, "आई मला भूक लागली!" तिला गरम गरम भाकरी वाढताना सगुणाबाईंच लक्ष दाराकडे लागून राहिलं होतं. आणि अचानक दारावर हाक ऐकू आली.
(क्रमशः)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा