मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२०

Being हनुमा विहारी आणि चेतेश्वर पुजारा !



प्रत्येक व्यावसायिक भुमिका आपली एक वेगळीच काठिण्यपातळी घेऊन येते.  आज आपण शिरणार आहोत चेतेश्वर पुजारा, हनुमंता विहारि ह्या गुणी खेळाडूंच्या भुमिकेत ! खंडप्राय अशा संपूर्ण भारत देशाचे लक्ष वर्षातील बहुतांश वेळा T20 व एक दिवसीय सामन्यांकडं लागुन राहिलेलं असतं. वर्षातील सात-आठ महिने ह्याच  प्रकारचं झटपट क्रिकेट खेळलं जातं! हे अगदी झगमगाटात खेळलं जाणारं क्रिकेट; जिथं सर्व देशातील क्रिकेट समजणारा, अर्धवट समजणारा चाहतावर्ग लक्ष ठेवून असतो! 

पण विशिष्ट महिन्यात कसोटी क्रिकेट सामन्यांना महत्त्व येतं! जसं की नोव्हेंबर ते मार्च हा भारतातील कसोटी सामन्यांचा मोसम! आता चेतेश्वर, हनुमंताच्या भूमिकेत जाऊन विचार करुयात ! हे दोघे वर्षातील सात-आठ महिने भारतीय संघाच्या क्रेंद्रिय गटापासुन (Core Group) पासून दुरावलेले असतात. बापुडे एकलव्याप्रमाणे आपला सराव चालू ठेवतात.  त्यांना सरावासाठी कोणत्या प्रकारचे गोलंदाज उपलब्ध असतील याविषयी फारशी आशादायक परिस्थिती नसावी.  सौराष्ट्र अथवा तेलंगणातील काही स्थानिक गोलंदाजांपुढे किंवा बॉलिंग मशीनपुढे पाच सहा महिने  महिने सराव करून अचानक मग ऑस्ट्रेलियात जाऊन हॅझलवूड, स्टार्क सारख्या दिग्गज गोलंदाजांपुढं आंतरराष्ट्रीय सामना खेळायला सज्ज होणे हे  काही येरागबाळ्याचं काम नव्हे.  

त्यात सुद्धा दोन शक्यता निर्माण होतात.  फलंदाजीला अनुकूल अशा खेळपट्टीवर सामना खेळला जात असेल तर सलामीचे फलंदाज, तिसर्‍या-चौथ्या क्रमांकाचे फलंदाज मनसोक्त फलंदाजी करून घेतात. त्यामुळे हनुमंता विषयी मला जास्तच सहानुभूती वाटते.  फलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर त्याचा क्रमांक येण्यासाठी बराच वेळ जावा लागतो , ज्यावेळी त्याची फलंदाजी येते त्यावेळी बऱ्याच वेळा वेगाने धावा करण्याची सुद्धा गरज भासू शकते.  याउलट ज्या वेळी गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टी असते त्यावेळी आघाडीचे फलंदाज नांगी टाकू शकतात. मग हनुमंता आणि पुजारासारख्यांना डाव सांभाळण्याची जबाबदारी पेलावी लागते. 

ह्या पोस्टचा मुख्य मुद्दा असा की आपले सहकारी प्रसिद्धीच्या झोतात वर्षभर न्हाऊन निघत असताना या दोघांचा वर्षभरातील बराचसा काळ मात्र  एकलव्याप्रमाणे तपस्या करण्यात जातो. जगापुढे आपलं कौशल्य दाखवण्याच्या त्यांना फार मोजक्या संधी मिळतात. त्या मोजक्या संधी गमावल्या तर त्यांच्या कामगिरीवर टीका करण्यासाठी देशातील हजारो समीक्षक आणि लाखो चाहते आपल्या लेखण्या आणि समाजमाध्यमांचा आधार घेण्यासाठी सज्ज असतात. सद्यकालीन इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनच्या जमान्यातसुद्धा पुजारा आणि हनुमंतासारखे साधक अस्तित्वात आहेत. त्यांचं महत्त्व पटवून देण्यासाठी ही छोटीशी ब्लॉग पोस्ट! त्यांच्यापासुन काहीसा धडा आपण घेऊ शकतो! आपण आपलं काम मग ते  वलयांकित जगापासुन कितीही दूर असलं तरीही त्यावरील आपली श्रद्धा कायम ठेवावी ! जगातील प्रत्येक काम हे महत्वाचं आहे; लाखोंनी त्याची नोंद घ्यायला हवी असा अट्टाहास नको ! नेकीनं केलेल्या प्रत्येक कामाची नोंद जगातील योग्य व्यक्ती घेतातच !  

रविवार, २५ ऑक्टोबर, २०२०

स्वच्छंदी मेंदु !




आपला मेंदु बराच वेळ पुर्णपणे आपल्याला सेवा देत नाही किंवा आपलं ऐकत नाही असं हल्ली मला जाणवु लागलं आहे. ऑफिसच्या काही अत्यंत महत्वाच्या मिटींग्समध्ये तो कदाचित आपल्या सेवेसाठी १००% उपलब्ध असावा. कारण आपण ज्या देहात वास्तव्य करत आहोत त्या देहाला मुलभूत गरजा भागविण्यासाठी अर्थप्राप्ती करण्याची गरज आहे; ही अर्थप्राप्ती करण्यासाठी ह्या मिटींग्समध्ये ह्या देहाच्या मालकानं सर्वोत्तम कामगिरी करणे आवश्यक आहे; ह्या सर्वोत्तम कामगिरीसाठी त्याला आपल्या साहाय्याची गरज आहे हे तो जाणुन असतो. 

बाकीच्या बऱ्याच वेळी हा मेंदु multitasking च्या नावाखाली गोंधळ घालत असतो. खरंतर एखाद्या १५ मिनिटाच्या विशिष्ट कालावधीत दोन गोष्टी करणं ह्याला आपण जे multitasking म्हणतो ते चुकीचं आहे. कारण त्यातील एका विशिष्ट क्षणी आपण ह्यातील एकच गोष्ट करत असतो. एका विशिष्ट क्षणाला मीटिंगमधील संभाषण पुर्णपणे ग्रहण करणं आणि त्याच क्षणी आपल्या बॉसला मी तुमच्या ह्या मताशी सहमत नाही हे कळवणं ह्याला खरं  multitasking म्हणतात!!!

आता ह्याबाबतीत खुप शास्त्र असतं. काही काळापुर्वी ज्यावेळी तुम्ही नियमित ऑफिसला जात होता त्यावेळी तुम्ही नेहमीच्या रस्त्यानं कार चालवत न्यायचात. त्यावेळी कारसारथ्य करताना तुमच्या मेंदुला फारसं काम पडत नसे कारण तुमची subconscious memory बहुदा तुम्हांला मदत करत असते. आता इथं subconscious memory किंवा दुसरी कोणती मेमरी ह्याविषयी मी खात्रीलायकरित्या सांगु शकत नाही. पण मेंदुची बरीच क्षमता मोकळी राहत असल्यानं मेंदु बाकी दुसरा विचार करायला मोकळा असे! आता इथं मेंदु बऱ्याच वेळा ऑफिसातील गोष्टीचा विचार वगैरे करत असेल. पण हे विचार भरकटलेल्या ढगांसारखे असतात. त्यातुन काही ठोस निकाल लागण्यास क्वचितच मदत होते ! आता लॉकडाऊन संपल्यावर मेंदूला आणि जी कोणती मेमरी आहे तिला रस्ता आठवेल ना ह्याची चिंता करु नका कारण गुगल मॅप असेल !

काहीसा वेगळा प्रश्न रात्रीअपरात्री जाग आल्यावर निर्माण होतो. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीकडे तीन नोटपॅड असतात. पहिला म्हणजे संगणकातील / भ्रमणध्वनीतील नोटपॅड अँप, दुसरा पुर्वी ज्याला नोंदवही म्हणत तो पेनाने नोंदी करण्याचा नोटपॅड आणि तिसरा म्हणजे तुमच्या मेंदुतील नोटपॅड ! होतं असं की मेंदुला ऑफिसातील प्रश्न कसे सुटू शकतील ह्याविषयी प्रचंड बुद्धिमान कल्पना नेमक्या ह्याच वेळी सुचतात! आता ह्यांची नोंद ठेवण्यासाठी खात्रीचा उपाय म्हणजे पहिले दोन नोटपॅड ! परंतु अशा वेळी धडपड करत ह्या पहिल्या दोन नोटपॅडचा शोध घेणे हे गृहशांततेच्या दृष्टीनं धोकादायक असु शकतं ! त्यामुळं आपल्या तिसऱ्या नोटपॅडवर विश्वास ठेवत सकाळी सारे काही आठवेल अशी श्रद्धा बाळगणं इतकंच आपल्या हाती असतं ! आता मेंदुला ह्याच वेळी पुर्ण सक्रिय व्हायची गरजच काय हा माझा प्रश्न !

हल्लीची अजुन एक गोष्ट ! मी हल्ली पुजा करताना स्तोत्रपठण करतो. हे स्तोत्र दहा वेळा म्हणायचं असतं. परंतु देव्हाऱ्यातील देवांना गंध लावणं, फुलं वाहणे ह्या सर्वांमध्ये मी स्तोत्र कितीवेळा पठण केलं आहे हा आकडा बऱ्याच वेळा मी विसरतो. मग कमीवेळा पठण नको म्हणुन जास्तीचं म्हणतो. इथं मी माझ्या मेंदुच्या एकाग्रतेच्या अभावाला दोष देतो !  

एकंदरीत काय तर ह्या मेंदुच्या स्वच्छंदी वागण्यानं मी त्रस्त झालो आहे. ह्या मेंदुची आणि माझी बैठक ह्या आठवड्यात बोलविण्याचा माझा मानस आहे ! तुम्हांला माझ्या बाजुने काही मुद्दे सुचत असतील तर जरुर कळवा !

शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२०

सई बिराजदार - एक मराठी मैत्रीण !







 

हल्ली सुरु असलेल्या मालिकांमध्ये सुसह्य अशी मालिका म्हणजे माझा होशील ना  ? सुसह्य अशासाठी की प्रेक्षकांना आपल्याकडं खेचुन घेण्यासाठी उगाचच ह्यात थिल्लर गोष्टींचा आधार सध्या तरी घेण्यात आलेला नाही.  मालिकेत चित्रित करण्यात आलेलं आदित्य आणि त्याच्या मामांचं घर हा एक संस्कृतीचा उत्तम ठेवा ! एका कुटुंबप्रमुखाच्या आज्ञेत बाकी सर्व मंडळी गुण्यागोविंदानं कशी राहु शकतात ह्याचं वास्तववादी  चित्रण इथं आढळतं. कुटुंबप्रमुख ह्या पदावरील व्यक्तीचं प्रत्येक मत, त्याचं वागणं कुटुंबातील सर्व व्यक्तींना पटत असतं असं नाही, किंबहुना पटत नसतंच ! तरीही सर्वजण एकत्र राहतात. एकत्र का राहायचं ह्याचा प्रश्न कोणाला पडत नाही. पुर्वीच्या काळी दुसरा पर्याय नव्हता म्हणुन एकत्र राहायचे सारे ! आजच्या काळात पर्याय आहेत म्हणुन बरेचजण विखुरले ! मागच्या काळातील एकत्र राहण्यातील ज्या ज्ञात चुका आहेत त्या ओळखुन पुन्हा जिव्हाळ्याच्या माणसांना एकत्र आणता येईल का?  असो हा दुसऱ्या एका लेखाचा विषय !

आजच्या पोस्टचा विषय - सई बिराजदार! मालिकेतील आदित्यची  मैत्रीण ! प्रत्येक मराठी युवकाला अशी एक मैत्रीण असावीच ! मालिकेतला आदित्यचं सध्याचं चित्रण मध्यमवर्गीय वर्गातील ! अनेक संस्कृतीप्रिय मामांसोबत एकत्र राहणारा आदित्य आपसुक शिस्तबद्ध बनलेला आहे. आपल्याहुन मोठ्या पिढीसोबत बराच काळ व्यतित करावा लागत असल्यानं त्याच्या स्वभावात काहीसं गांभीर्य आलं आहे. महत्प्रयासानं पहिली नोकरी मिळाली असली तरी तिथला खाष्ट बॉस त्याला पहिल्या नोकरीच्या आनंदाच्या भावनेपासुन वंचित ठेवत आहे. अशा वेळी अचानक भेटलेली सई !

एखाद्या सुंदर तरुणीकडं प्रेयसी म्हणुन पहायचं असेल तर आपलं घराणं, आपलं शिक्षण, आपला पगार हे घटक  तिच्या घराण्याच्या जावई म्हणुन असलेल्या अपेक्षांना पुऱ्या पडणाऱ्या असाव्यात ही बऱ्याच मराठमोळ्या तरुणांची विचारसरणी ! बहुदा मराठी मुलं आपल्या आईवडिलांच्या आणि इतर मोठ्या मंडळींच्या संसाराचं जरा जास्तच निरीक्षण करत राहतात. त्यामुळं प्रेम क्षणभर पण बाकीचं कर्तव्य आयुष्यभर हीच भावना त्यांच्या मनात प्रामुख्यानं राहते. इथंही आदित्य सईला मैत्रिण म्हणुनच स्वीकारतो तो बहुदा ह्या घटकांमुळं ! तिला आपण आयुष्यात सुखी ठेवू शकणार नाही ह्या त्यानं समज करुन घेतला आहे! मनानं आदित्य कदाचित वीस - तीस वर्षे मागच्या काळात वावरत असावा असं मानल्यास वावगं ठरणार नाही !

सई ! सुंदर, श्रीमंतीचा आत्मविश्वास बाळगुन असणारी पण गर्व नसणारी, रोखठोक बोलणारी,  पारंपरिक संस्कारांविषयी आदर बाळगणारी सई ! आपल्या मनाविरुद्ध आपले आईवडील ज्याच्याशी आपलं लग्न लावुन देत आहे अशा श्रीमंत डॉक्टरला स्पष्ट नकार देणारी बंडखोर सई !आदित्य भेटल्यावर आपण त्याच्या प्रेमात  पडलो आहोत हे तिला तात्काळ कळलंय ! मुली ह्या बाबतीत मुलांपेक्षा स्मार्ट असतातच म्हणा ! पण तिच्यावर संस्काराचा अदृश्य प्रभाव आहे ! तिचे वडील जरी तिच्या आईच्या सईसाठी श्रीमंत वर शोधण्याच्या प्रयत्नांना वरवर साथ देत असले तरी ते बहुदा संस्कारप्रिय आहेत. मुलींचा स्वभाव काहीसा वडिलांवर जात असल्यानं सईसुद्धा संस्कारी ! आपल्याला आदित्य जरी आवडत असला तरी तो ह्या क्षणी प्रेमाचा इजहार (वजनदार उर्दु शब्द) करण्यास तयार नाही ह्याची तिला जाणीव आहे. तिला त्याविषयी घाई नाही ! तो आपल्याशी मोजकं बोलला, अधूनमधून दिसला तरी तिला ते पुरेसं आहे ! 

सई खट्याळ आहे. फार काळ हा खट्याळपणा दाबुन ठेवणं तिला जमणारं नाही! त्यामुळं गंभीर-गंभीर आदित्याची ती अधुनमधून खोडी काढते! ह्या आठवड्यात तर तिनं हद्दच केली ! शिस्तप्रिय आदित्यला तिनं एक दिवस एकदम बिनधास्त वागायला पटवलं ! खुप धमाल केली त्या दोघांनी ! त्रास देणाऱ्या बॉसची सुद्धा त्यांनी फिरकी घेतली!  
पण मग बॉसनं ओरडल्यावर आदित्यचं हे बिनधास्तपणाचं उसनं अवसान गळुन पडलं ! त्याच्यातल्या कर्तव्यदक्ष भावनेनं त्याच्यावर पुर्ण ताबा मिळविला. उगाच सईच्या नादी लागुन आपण हा मस्तीखोरपणा केला असं त्याला वाटलं ! मग त्याच्या तब्येतीची काळजी करत त्याला ऑफिसला जाऊ नको असं सांगणाऱ्या सईला तो वाटेल ते बोलला! चटकन तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती तात्काळ तिथुन निघुन गेली ! पण तो चक्कर येऊन पडला हे कळताच तात्काळ धावत त्याच्या घरी आली ! 

ह्या मालिकेच्या पट्कथाकारांचं, निर्मात्यांचं अभिनंदन ! ह्या क्षणापर्यंत त्यांनी एका सुंदर, मराठी संस्कृतीशी नातं राखणाऱ्या कलाकृतीची निर्मिती केली आहे ! पुढं आदित्य - सईचं काय होईल ? लग्न झालं तर हे नातं असंच सुंदर राहील का? अशा प्रश्नांचा उगाच विचार करायला नको ! काही गोष्टी, काही क्षण गोठवुन ठेवावेत असे असतात, अशाच वळणावर असलेली ही मालिका! 
नितांतसुंदर अभिनयाबद्दल सई, आदित्य आणि मामा मंडळींचं खूप अभिनंदन ! 

गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२०

जीवनगाणे गातच राहावे

यंदा लॉकडाऊन आणि त्याच्या अनुषंगानं आलेल्या वर्क फ्रॉम होममुळे वसईत राहण्याची सुवर्णसंधी लाभली.  मे महिन्यापासूनअंगणात नियमितपणे झाडांना पाणी देण्यास सुरुवात केली. त्यामुळे साधारणतः  जून महिन्यात पहिल्या पावसानंतर उगवणाऱ्या अनेक इवलीशी रोपटी मे महिन्यातच जमिनीबाहेर डोकावली होती. बहुदा हा नियमित पाणी देणारा कोण हे कुतूहल त्यांनी बाळगलं असावं. एकदा ही छोटी मंडळी आपल्या विश्वासावर जमिनीबाहेर आली की मग पाऊस पडेस्तोवर त्यांची काळजी घेणं ही माझी जबाबदारी होती. त्यांना असंच सोडणं इष्ट नव्हतं. 

मग जूनमध्ये सुरू झालेल्या पावसाने या बालमंडळींची चांगली काळजी घेतली.  सर्व घटक जुळून आल्यामुळं तेरड्याला जून महिन्यातच पहिलं फूल आलं. यंदा पाऊस खूप नियमितपणे पडत राहिला.  त्यामुळे सर्व फुलझाडं, मोठाले वृक्ष बहरत गेले.  यातील काही कायमस्वरूपी झाडं तर काही हंगामानुसार आपलं सौंदर्याविष्कार करुन सर्वांना प्रफुल्लित करुन गायब होणारी किंवा फुलांचा बहर आवरता घेणारी ! अशाच तीन झाडांची यावर्षी कॅमेरामध्ये टिपलेली ही वेगवेगळी रुपं!

तेरडा 

जुनमधील पहिलं फुल ! 


ऑगस्ट पहिल्या आठवड्यातील पुर्ण बहर 


आज सकाळ !  त्याला बिचाऱ्याला जोरदार पाऊस आणि आता सुरू झालेला प्रखर उन्हाचा तडाखा झेपला नाही !  


Well Played तेरडा ! पुढील वर्षी पुन्हा भेटु !

लीली सदैव बारा महिने अंगणात असेल. पण तिचा फुलांचा बहार संपत आला आहे! लिलीच्या रोपट्यांना जुलैमध्ये आलेला पहिला बहार !



फुले येण्यासाठी ह्या लिलीमधून एक लांबवर दांडा येतो. एका दांड्यातून चार ते पाच लिलीची फुलं उमलतात. ही फुलं दोन तीन दिवस राहतात. मग फुलं कोमेजतात. 



लिलीचे ऑगस्टमधील बहारदार रुप !


आता आज सकाळी पाहिलेलं बहुदा या पावसाळ्यातील हे शेवटचं फुल!



लीलीसोबत अंगणात असलेली गुलाबी पिवळ्या फुलांची इवली इवली रोपटी! त्यांना वॉटर लीली म्हणतात असं मनु म्हणाली!


पाणी नियमित दिलं तर ही छोटुली  बहुधा अशीच राहतील. आता त्यांच्या बिया या प्रकर्षानं दिसू लागल्या आहेत. निसर्गक्रम सुरु राहायला हवा ना !


मन काहीसं उदास होतं. तेरडा, लिली,  वॉटरलिली ही सर्व मंडळी आता पुढील पावसाळ्यापर्यंत दिसणार नाहीत म्हणून! पण हा तर निसर्गाचा जीवनक्रम नाही का? जन्माला आलेला प्रत्येक जीव आयुष्य जगुन एक दिवशी या भुतलावरील आपलं अवतारकार्य समाप्त करुन सर्वांचा निरोप घेणारच ना?

आता पुढील काही दिवसांत लक्ष वेधले जाणार आहे ते बाकीच्या फुलझाडांकडे आणि काही  रानटी झुडपांकडे! हे पहा एक जास्वंदीचे फूल!जणू काही आयपीएल सामन्यातील समालोचकापुढे माइक धरावा तसे ते माझ्या पुढे येऊन राहिलं !!




आज सकाळी एक  मशरूम छत्री अचानक माझ्या नजरेस पडली! 



पोस्टच्या शेवटी एक हे अस्सल रानटी झुडुप ! नाव वगैरे नाही पण त्यामध्ये एकवटलेलं रानवट सौंदर्य!


जीवन चलने का नाम !  

शनिवार, २६ सप्टेंबर, २०२०

The Sun Does Shine


 

ऍंथोनी रे हिंटन ह्या गृहस्थाचं हे आत्मचरित्र. आपण न केलेल्या खुनाच्या आरोपाखाली आयुष्यातील तीस वर्षे तुरुंगात व्यतित करताना आयुष्यातील अनमोल असं सारं काही गमावल्याची खंत जरी ह्या पुस्तकातुन सतत जाणवत असली तरी आपण निर्दोष असल्याची जाणीव लेखकाला सतत लढा देण्याची जिद्द देते. १९८५ साली वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी तुरुंगात गेलेला रे २०१५ साली एकोणसाठाव्या वर्षी मुक्त होतो ! 

रे चे बालपण अमेरिकेतील अलाबामा राज्यातील ग्रामीण भागात गेलं. श्वेतवर्णीयांचे बाहुल्य असलेल्या ह्या भागात एका गरीब कृष्णवर्णीय कुटुंबात त्याचा जन्म झाला. द्रारिद्र्य पाचवीला पुजलं म्हणावं अशी परिस्थिती ! खाणीत काम करणाऱ्या वडिलांचा तिथल्याच  एका अपघातात मृत्यू झाल्यावर साऱ्या भावंडाना वाढविण्याची जबाबदारी आई घेते. आईनं दिलेल्या संस्कारांची वर्णनं आणि त्यांनी रे ला इतक्या काठिण्यपुर्ण काळात दिलेल्या मानसिक बलाचे संदर्भ पुस्तकात येत राहतात. 

श्वेतवर्णीयांचं बाहुल्य असलेल्या अमेरिकेच्या ग्रामीण भागात कृष्णवर्णीयांना कसं संघर्षपुर्ण जीवन जगावं लागत असायचं किंबहुना अजुनही जगावं लागतं असेल ह्याची कल्पना सुरुवातीच्या प्रकरणांतून येते. अमेरिका हा भौगोलिकदृष्टया प्रचंड मोठा देश ! कार नसल्यावर इथलं जीवन प्रचंड कठीण! अशा वेळी दूरवर असलेल्या शाळेमध्ये रे आणि त्याचा धाकटा भाऊ चालत जात असत. चालत जाताना - येताना निर्मनुष्य भाग आला आणि एखादी कार रस्त्यानं येताना दिसली की त्या चालकाच्या नजरेस आपण पडु नये ह्याची त्यांना जी धडपड करावी लागायची ते वाचुन अंगावर काटा येतो ! कारण काय तर चालक जर डोकेफिरु निघाला तर जीवावर बेतण्याची पाळी यायची ! रे हा बेसबॉलचा तरबेज खेळाडु, परंतु एका सामन्यात होम रन करताना त्याच्या आईसमोर संपुर्ण स्टेडियमनं निगर म्हणुन त्याला संबोधिल्याचं आणि सामना जिंकुनसुद्धा मनातुन पराभव बाळगावं लागण्याचं शल्य रेच्या पदरी येतं. त्याची आई त्याला सदैव श्वेत लोकांशी कसं काळजीपुर्वक वागावं, त्यांच्या अपमानास्पद बोलण्यानं संतापुन न जाता मनावर कसा संयम ठेवायचा ह्याचं शिक्षण देत राहते ! 

शाळेनंतर खाणीतील नोकरी स्वीकारण्याची पाळी रे वर येते. खाणीत ज्यांनी आयुष्याची काही वर्षे काढली आहेत त्या कामगारांच्या ढासळलेल्या तब्येती तो आपल्या डोळ्यांनी पाहत असतो! अंधाऱ्या खाणीत असुरक्षित वातावरणात काम करताना ज्या भयावह स्थितीचा सामना करावा लागतो त्याचं वर्णन लेखकानं अत्यंत तंतोतंत केलं आहे. ह्या अंधारातील श्रीमंतीपेक्षा उजेडातील गरिबी मी स्वीकारीन असं म्हणत रे ही नोकरी सोडुन देतो ! 

तारुण्याच्या भरात रे कडुन काही चुका होतात. भावंडं उज्ज्वल भवितव्याच्या शोधात रे आणि आईला सोडुन वेगवेगळ्या ठिकाणी जातात. त्याआधी बऱ्याच तरुणींच्या सोबत त्याची मैत्रीही होते. त्यात एकाच वेळी त्यानं  मैत्री जोडलेल्या बहिणी आणि त्यापायी त्यातील छोट्या बहिणीशी मैत्री जोडण्यास इच्छुक असलेल्या तरुणाशी त्यानं पत्करलेल्या वैमनस्याचा उल्लेख येतो. कारशिवाय आईचं काठिण्यपुर्ण जीवन पाहता न आल्यानं रे कारची चोरी करतो आणि काही काळानं पकडला जातो.  रे ला आपली चुक उमजते. आईला आणि आपल्या जवळच्या मित्राला पुन्हा अशी चुक न करण्याचं आश्वासनसुद्धा तो देतो!

ह्या काळात सिल्विया नावाच्या तरुणीशी त्याची मैत्री जुळते. आणि तिच्यासोबत आयुष्य व्यतित करण्याची स्वप्नं तो पाहु लागतो. एका गॅरेजमध्ये त्याच्या रात्रपाळीची नोकरी सुरु होते. त्या कालावधीत त्या शहरात दोन खुन होतात आणि तिसऱ्या खुनाचा अयशस्वी प्रयत्न होतो. पोलीस आपल्या चौकशीचे सत्र सुरु ठेवतात. वाचलेला व्यवस्थापक आपल्यावर हल्ला करणाऱ्या युवकाचे वर्णन करतो. छोट्या बहिणीच्या प्रेमात रे ने ज्याच्याशी वैमनस्य पत्करलेलं असतं तो सूडानं पेटलेला युवक ह्या वर्णनाशी मिळताजुळता असा युवक मला माहिती आहे हे पोलिसांना सांगतो. त्यानंतर सुरु होते ती रे ची तीस वर्षांची स्वतःला निर्दोष शाबित करण्याची धडपड ! 

ज्या दिवशी तिसऱ्या खुनाचा प्रयत्न झाला त्यावेळी खरंतर रे आपल्या रात्रपाळीच्या कामावर असतो. ज्या गोळ्यांनी आधीचे खुन झालेले असतात त्या गोळ्या आणि रे च्या आईचे पंचवीस वर्षांपूर्वीचे पिस्तुल ह्याची खरंतर संगती लागत नसते. परंतु केवळ पोलिसांकडे उपलब्ध कारचोरीचं रेकॉर्ड आणि खऱ्याखुऱ्या गुन्हेगाराच्या वर्णनाशी असलेलं रे चे काहीसं साधर्म्य हे घटक त्याच्या विरुद्ध जातात. त्यानंतर पुस्तकात सामोरा येत राहतो तो अमेरिकेतील न्यायव्यवस्थेचा अस्तित्वात असलेला एक अदृश्य भेसुर चेहरा ! रे ने पॉलीग्राफ परिक्षेतुन सिद्ध केलेलं स्वतःचं निर्दोषित्व यंत्रणा पुर्णपणे झाकुन टाकते. रे ला देण्यात आलेला सरकारी वकील आपण १५०० डॉलर्स न्याहारीवर खर्च करतो असं उघडपणे सांगतो. तू निर्दोषी असशीलसुद्धा, पण तू नाही तर दुसरा कोणी कृष्णवर्णीय युवक आम्ही शोधला असता असं त्याला उघडपणे सांगण्यात येतं !

रे ची रवानगी ज्यांना देहांताची शिक्षा झाली आहे अशा कैद्यांच्या सोबत दुसऱ्या तुरुंगात होते ! इथं आपल्या कैदेचा बराचसा कालावधी रे घालवतो! सकाळी ३ वाजता नाश्ता, दहा वाजता दुपारचं जेवण आणि दुपारी २ वाजता रात्रीचं जेवण असा दिनक्रम असतो. त्याच्या खोलीपासुन काही मीटर अंतरावर विद्युतखुर्चीत देहांत देण्याची व्यवस्था असणारा कक्ष असतो. ज्यांची देहांताची तारीख पक्की झाली आहे अशा कैद्यांना १ महिना आधी पुर्वसुचना देण्यात येते. त्यानंतर त्या कैद्यांच्या होणाऱ्या मनःस्थितीचं वर्णन वाचुन मन उद्विग्न होते. प्रत्येक शिक्षेनंतर वातावरणात जो एक दर्प भरुन राहतो तो सहन करणं सर्वांना फार कठीण जातं ! ज्यावेळी कैद्याला प्रत्यक्ष देहांतशिक्षेसाठी घेऊन जातात त्यावेळी बाकीच्या कैद्यांना त्याचा सुगावा लागतो. मग संपुर्ण तुरुंग बाकी कैद्यांनी भिंतीवर, गजांवर हात, ताटल्या वाजवुन केलेल्या उच्चरवाने भरुन जातो! तु एकटा नाहीयेस आम्ही तुझ्या सोबत आहोत हाच ह्या कैद्यांनी आपल्या सोबत्याला दिलेला शेवटचा संदेश असतो ! कसा क्षण असेल हा ! 

बराच काळ रे ह्या देहांताच्या शिक्षेच्या सीमारेषेवर  हिंदकोळे घेत असतो. केवळ काही मीटर अंतरावर अनुभवलेल्या आपल्या अशा अनेक सहकाऱ्यांच्या मृत्युच्या वेळी पुढचा नंबर आपला असु शकतो हे कायमचं भय जाणवत राहतं. अशा परिस्थितीतसुद्धा आपल्या मनाचे स्थैर्य शाबुत ठेवण्यात  तो यशस्वी होतो. 

एका काळानंतर सरकारी वकील रे ची बाजु मांडायची असेल तर १५००० डॉलर्सची मागणी करतो. रे च्या आईनं आपलं घर गहाण टाकुन ही रक्कम उभी करावी असं सुचवतो. रे त्यास स्पष्ट नकार देतो ! अशा वेळी मग ब्रायन स्टीवन्सन नावाचा ऍटर्नी आणि त्याची संस्था त्याच्या पाठीशी उभी राहते ! रे च्या अंधारमय आयुष्यात आशेचा किरण येतो ! योग्य पुरावे गोळा करुन रे चे निर्दोषित्व सिद्ध केलं जाते ! तरीही मग बराच काळ सर्व सोपस्कार पार करत तीस वर्षांनी रे एकदाचा मुक्त होतो! 

खरंतर सुरुवातीच्या काही प्रकरणानंतर मी हे पुस्तक पुर्ण वाचलं नाही. हळुहळू वाचीन ! मी हे पुस्तक वाचायला का घेतलं? आयुष्याकडं बघण्याचा एक पुर्ण नवीन दृष्टिकोन हे पुस्तक देतं. संपुर्ण यंत्रणा एकत्र येऊन आपल्याविरुद्ध कसं धडधडीत षडयंत्र रचु शकते आणि एका उभारु लागलेल्या जीवनाला कसं नष्ट करु शकते ह्याचा अनुभव आपल्याला ह्या पुस्तकातुन येतो !  आपण किती साध्या गोष्टींनी निराश होतो, आपल्याजवळ असलेलं स्वातंत्र्य, असलेल्या किती छोट्यामोठ्या गोष्टी ह्याचं आपल्याला कधीच महत्व कळत नाही ! पुस्तकात एक वाक्य आहे - स्वातंत्र्याचं  खरं महत्व आपल्याला ते गमावल्यानंतर कळतं!

२०१५ साली सुटलेला रे आता आपलं आयुष्य पुन्हा उभारु पाहतोय ! एक यशस्वी वक्ता म्हणुन गणला जाऊ लागला आहे ! Hats off to you Anthony Ray Hinton! 

सोमवार, ७ सप्टेंबर, २०२०

दो आँखें बारह हाथ आणि शांताराम

शनिवारी रात्री लोकसभा वाहिनीवर दो आँखें बारह हाथ हा १९५७ सालचा व्ही. शांताराम यांचा गाजलेला चित्रपट पाहण्याचा योग आला. ह्यात योग येण्यासारखं काही विशेष असले प्रश्न मनात उपस्थित होऊन देऊ नकात ! हा चित्रपट तज्ञ मंडळींसोबत पाहत असल्यानं काही वेगळी माहिती सुद्धा मिळाली, त्यामुळं चित्रपटाची लज्जत अजुनच वाढली! 

चित्रपटाचं शीर्षक "दो आँखें बारह हाथ" च का ह्यावर मिनिटभर चर्चा झाली! मोठ्या आईनं हा चित्रपट १९५७ साली पाहिला असल्यानं ह्या चित्रपटातील अट्टल गुन्हेगारांची संख्या किती ह्याबाबतीत तिच्या मनात क्षणभर संभ्रम निर्माण झाला. पण मग बारह हाथ वरुन गुन्हेगार सहाच असावेत असा निष्कर्ष तिनं काढला ! माझं मन क्षणभर कार्यालयीन कामकाजात गेलं. शांताराम व्यवस्थापक आणि सहाजण  म्हणजे प्रत्यक्ष काम करणारे कर्मचारी ! पण व्यवस्थापकानं केवळ डोळयांची भुमिका बजावता कामा नये त्यानं Hands-on असायला हवं ! त्याला प्रोग्रॅमिंग सुद्धा करता यायला हवं. हा विचार मनात आलाच होता.  पण चित्रपटात नंतर शांताराम प्रत्यक्ष स्वतः कामासाठी ह्या सहाजणांसोबत उतरतो. त्यावेळी चित्रपटाचं शीर्षक दो आँखें चौदा हाथ असायला हवं होतं असा मनात विचार आलाच !

ह्या सहा बेरड गुन्हेगारांच्या मानसिकेत बदल घडविण्याचा निर्धार व्ही. शांताराम आपल्या अधिकाऱ्यांकडे व्यक्त करतात. आपल्या अधिकाऱ्यांचं मनपरिवर्तन करुन त्यांची परवानगी घेऊन एका ओसाड भागात ह्या सहा जणांना घेऊन येतात. मग सुरु होतो तो एक मोठा प्रवास ! ह्या गुन्हेगारांच्या सवयी सहजासहजी बदलणाऱ्या नसतात! परंतु माझा तुमच्यावर विश्वास आहे हे वेळोवेळी शांताराम त्यांना जाणवुन देत राहतात. कुठंतरी ह्या बाह्यरूपी पाषाणहृदयी वाटणाऱ्या बेरड गुन्हेगारांच्या मनात ओलावा निर्माण होत जातो. चित्रपटात मग संध्या प्रवेश करते. 

हा चित्रपट १९५७ सालचा ! शांताराम ह्यांचा जन्म १९०१ सालचा ! म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्यांचं वय ५५ च्या आसपास असावं ! पण चित्रपटातील त्यांच्या रंगरुपावरून ते खुप तरुण वाटत राहतात! शांताराम ह्यांनी एकंदरीत तीन लग्न केली ही माहिती मला काल कळली ! त्यांच्या प्रथम पत्नी विमलाबाई ह्यांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नीशी, जयश्री सौहृदाचे संबंध कायम ठेवले. १९५० ते १९६० कालावधीत शांताराम आणि संध्या ह्यांनी एकत्रितपणे अनेक चित्रपट केले आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. आणि कालांतरानं विवाहबद्ध झाले. संध्या आणि त्यांच्या वयात खुप अंतर होते ! विमलाबाई ह्यांनी संध्या हिच्याशी सुद्धा आयुष्यभर चांगले संबंध ठेवले ! ही सारी माहिती माहितीमायाजालावरुन साभार ! 

चित्रपटातील गाणी मोजकी पण सुरेख! 

सैंया झूठों का बड़ा सरताज निकला

ह्या गाण्यात वाद्य वाजवत जाणारी संध्या - आणि तिच्या मागं वाजत जाणारं ते छोटेसे शानदार वाद्य - ताशा ! हे पाहुन मोठी आईने अजुन आठवणी काढल्या. प्रकाशमामाला हा असा ताशा आणला होता. तिचे काका शांताराम ह्यांच्या अभिनयाचे मोठे चाहते होते वगैरे ! संध्या मोठी धीराची मुलगी ! इतक्या ओसाड भागातुन खेळणी विकायला जाताना तिला भय हा प्रकार माहिती नव्हता. ह्या बेरड गुन्हेगारांचा खट्याळपणा जागृत झाल्यावर ते तिची चेष्टामस्करी करीत. पण ही धीट मुलगी त्यांचा चांगलाच समाचार घेई ! 

ऐ मालिक तेरे बंदे हम 

हे एक अत्यंत अर्थपूर्ण गाणं !  

हे सर्वशक्तिमाना ! आयुष्यातील आमच्या सर्व चुका माफ कर ! आमच्याकडुन चांगली सत्कर्मे घडोत, आमचा जीवनप्रवास प्रामाणिकतेच्या मार्गानं होवो ! ज्या वेळी सर्व काही वाईट घडत असतं, आमचा स्वतःवरचा विश्वास डळमळीत झालेला असतो अशावेळी तुच आमच्या मदतीला धावून येतोस आणि आमच्या जीवनातील अंधःकार नाहीसा करतोस ! मनुष्याच्या अंगी अनेक कमतरता आहेत; त्यामुळं त्याच्या आयुष्यात अनेक दुःख निर्माण होतात! पण तु ही सारी दुःख दूर करतोस ! सध्याच्या करोनाच्या काळात अंगी धीर येण्यासाठी हे एक उत्तम गाणे ! 

संध्याने ह्या चित्रपटात आणि नवरंग मध्ये अत्यंत सुरेख नाच केलेत. परंतु ह्या काठिण्यपूर्ण नाचांमुळं तिला नंतर पाठीचा त्रास जडला ही जाणकारांनी दिलेली माहिती ! शांताराम ह्यांचं आडनाव कठीण असल्यानं त्यांनी व्ही शांताराम असं सुटसुटीत नाव स्वीकारलं ! पहिल्या बायकोपासुन चार आणि दुसरी बायको जयश्री हिच्यापासुन तीन अशी एकूण सात अपत्यं होती. संध्यानं सर्वांना आपलीच मुलं मानलं ! सध्या संध्या आपल्या मुलांच्या आधाराने जीवन व्यतित करत आहे ही माहिती कळली ! 

पुढं चित्रपटात मंडईतील भाजीविक्रेत्याला ह्या नव्या भाजीउत्पादकांपासुन स्पर्धेचं भय वाटु लागतं. खरंतर त्या मंडईतील दलालाचा समाचार घेण्यास ही मंडळी समर्थ होती! परंतु आपण कोणावरही हात उगारणार नाही ह्या शांताराम ह्यांना दिलेल्या वचनामुळं ते मुकाट्यानं मार सहन करतात. नंतर ह्याच दलालाच्या नीच कृतीमुळं शांताराम एका बैलाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडतात. परंतु ही मंडळी त्यांचा वारसा चालविण्याचा निर्धार व्यक्त करतात ! आणि आकाशातुन पाहणाऱ्या शांताराम ह्यांच्या दोन डोळ्यांच्या साक्षीनं चित्रपट संपतो ! 

ह्या काळातील जीवनातील साधेपणा त्याकाळातील चित्रपटांत सुद्धा उतरला आहे. साधी सरळ कथा, नितांत सुंदर अभिनय करणारे कलाकार, अर्थपुर्ण गाणी, जीवन उत्कटतेने जगणारी चित्रपटातील पात्रं ह्यामुळं हा चित्रपट प्रेक्षणीय बनतो ! मान हलवत, नजर डोळ्याच्या एका कोपऱ्यातुन दुसऱ्या कोपऱ्यात वेगानं हलविणारी संध्या लक्षात राहिली. पुर्वीच्या छायागीतमध्ये वारंवार प्रक्षेपित होणारं "आधा हैं चंद्रमा रात आधी " हे गाणं सुद्धा आठवलं ! 

शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२०

२०२१ - दहावी बारावी परीक्षा

 


ह्या आठवड्यातील दोन घटना !  

१) मुलाच्या ११ च्या प्रवेशासाठी मुंबईला फेरी झाली.  ही प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन करण्याची तयारी संबंधितांनी का दाखवली नाही ह्या प्रश्नाचा पाठपुरावा करण्याची जिद्द मी दाखवत नाही. त्यामुळं त्यांना दोष देण्यात अर्थ नाही. तिथलं वातावरण काहीसं असुरक्षित होतं. अधिकृत कागदपत्रं अगदी मोकळेपणानं हाताळली जात होती. सुरक्षित अंतर बाळगण्याचं भान कोणाला राहत नव्हतं. एक दोन मुलींनी तर बोलताना मास्क काढला होता. 

२) काल एका मित्राशी बोलणं झालं. त्याचा मुलगा आणि तो पवईला JEE Mains परीक्षेसाठी जाऊन आले होते. सर्वसामान्य लोकांसाठी लोकल बंद असल्यानं हल्ली रस्त्यावर प्रचंड वाहतुक कोंडी होते. परीक्षार्थींना लोकलने प्रवास करण्याची मुभा असल्यानं त्या दोघांनी हा पर्याय स्वीकारला. अंधेरी ते पवई कार (बहुदा उबेर / ओला ) केली. इतक्या प्रयत्नानंतर त्याचा मुलगा आयुष्याचं भवितव्य ठरविणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या परीक्षेला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाला. त्यानं साधारणतः तीन - चार तास पुर्णपणे अनोळखी मुलांच्या सानिध्यात घालवले. त्या भयाचं दडपण घ्यायचं की इतक्या महत्वाच्या परीक्षेवर लक्ष केंद्रित करायचं ह्या द्विधा मनःस्थितीत तो नक्कीच सापडला असणार !

JEE Mains परीक्षा तुलनेनं कमी विद्यार्थी देत असणार. ह्या वर्षीच्या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांसाठी काही बदल घडवुन आणण्याची वेळ निघुन गेली आहे. पण २०२१ साली जे विद्यार्थी दहावी, बारावी परीक्षेला बसणार आहेत त्यांच्या मनःस्थितीचा कोणी विचार करेल का? त्यांना किमान दोन मुद्द्यांवर अधिकृत यंत्रणा सुस्पष्टता देऊन त्यांचा मानसिक तणाव कमी करण्यास मदत करु शकतात. 

१) परीक्षेची तारीख जाहीर करणे - १२ परीक्षा  १ मे २०२१ ला आणि १० वी परीक्षा १५ मे २०२१ ला सुरु होतील. (तारखा केवळ उदाहरणासाठी !)  अशी घोषणा शिक्षणखात्यानं आताच करायला हवी !

२) दहावी - बारावी परीक्षा पुर्णपणे ऑनलाईन पद्धतीनं होतील. विद्यार्थी घरुन परीक्षा देऊ शकतील. परीक्षा "मुक्त पुस्तक संचार" (Open Book) पद्धतीने आयोजित केल्या जातील. ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅबलेट वगैरे देऊन त्यांना परीक्षा देण्यास अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. 

घरुन ऑनलाईन परीक्षा आणि ती सुद्धा "मुक्त पुस्तक संचार" पद्धतीनं ! आपल्या भुवया नक्कीच उंचावल्या गेल्या असणार !ही नक्कीच आदर्श परीक्षा व्यवस्था नसणार ! ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नक्कीच ह्यात अधिक अडचणींचा सामना करावा लागणार. त्यांना आधीच योग्य मार्गदर्शन मिळत नाही; यंदाच्या वर्षी  त्यात अधिक अडचणींचा मुकाबला करावा लागणार ! सर्व काही मान्य ! 

पण लक्षात ठेवा एका बाजुला ह्या सर्व अडचणी / ऑनलाइन पद्धतीतील त्रुटी आणि दुसऱ्या बाजुला ह्या भावी तरुण पिढीची सुरक्षितता ! ह्या दोन पर्यायांची आपण तुलना करत आहोत. आपण एका अभुतपुर्व परिस्थितीत वावरत आहोत. परीक्षापद्धतीतील परिपुर्णतेपेक्षा माझी पसंती केव्हाही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेलाच राहील ! हवं तर टक्के देण्याऐवजी ग्रेड्स द्या ! ९० च्या वर A+ , ७५ च्या वर A, ६० च्या  वर B वगैरे ! म्हणजे कदाचित एकेक गुण मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांवर येणारे दडपण कदाचित कमी होईल ! 

वरील विचार परिपुर्ण आहेत असा माझा दावा नाही !  परंतु विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्याचा आणि सुरक्षिततेचा विचार करुन संबंधितांनी त्वरित निर्णय घ्यावा आणि त्या दिशेनं पावलं उचलावीत ! आपल्या नागरिकांचं जीवन आपण ईश्वराच्या हवाली करुनच चालत आहोत ! त्याबाबत असणारी सरकारची अपरिहार्यता आपण समजु शकतो पण आपल्या भावी पिढीच्या स्वास्थ्याची आपण पुर्ण जबाबदारी उचलायला हवी ! 

 

पोह्यांचा ऊहापोह

पारंपरिक मराठी घरांमध्ये दररोज सकाळी सर्वसाधारणपणे शिरा, उपमा आणि पोहा हे तीन होतकरू उमेदवार आपला अर्ज दाखल करत असत. घरातील मुख्य गृहिणी विव...