मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, ८ फेब्रुवारी, २०१५

लेक लाडकी ह्या घरची…

पूर्वी वाक्य कानावर पडायचं, "पोरीला त्या घरी दिली!" कधी कधी "पोरीला त्या गावात दिली" असंही बोललं जायचं. जणू काही ज्याच्याशी लग्न लागणार तो नवरा मुलगा अगदी नगण्यच असायचा, निर्णयप्रक्रियेत त्याला फारसं महत्त्व नसायचं. बहुदा त्यावेळची परिस्थिती सुद्धा काही प्रमाणात ह्याला कारणीभूत असेल. शेतकरी कुटुंब असेल तर मुलीचं संपूर्ण आयुष्य कसं जाणार हे त्या कुटुंबाच्या जमीनजुमल्यावर अवलंबून असायचं. 

हल्ली असं ऐकायला मिळत नाही. कारणं अनेक! हल्ली लग्न जमविण्याची संधी आईवडिलांना कमी प्रमाणात मिळते. आणि मिळाली तर लग्न मुलाकडे, त्याच्या कर्तुत्वाकडे पाहून मग लग्न जमवलं जातं. फार तर फार त्याच्या आईवडिलांची चौकशी केली जाते. ह्याला कारणीभूत एक महत्वाचा मुद्दा म्हणजे हल्ली "पोरीला त्या घरी दिली!" ह्या वाक्यात जे घर अभिप्रेत होतं, अशी घर फार दुर्मिळ झाली आहेत. 

हे घर म्हणजे एक संस्था होती; हल्लीच्या भाषेत बोलायचं झालं तर एक पॅकेज होती. त्यात असायचं घराचं अंगण, घराभोवतीची बाग, घरामागचं तुळशीवृंदावन, विहीर, रहाट, मायेच्या गायी, उन्हापासूनच नव्हे तर संसारातील तापत्या क्षणापासून विसावा देणारा वटवृक्ष! आणि ह्यात सासरची असली म्हणून काय झालं पण प्रेमाची सावली देणारी माणसं असायची. सासू जरी अगदी कडक असली तरी कळत नकळत मायेच्या क्षणाचा शिडकावा करायची! सासरेबुवा शिस्त कधीकधी आपल्या सुनेसाठी थोडी हळवी व्हायची. घरात जर मोठी सून म्हणून प्रवेश केला असेल तर घरची संपूर्ण जबाबदारी अंगावर पडायची. धाकटे दीर अगदी मुलासारखे नसले तरी त्यांची काळजी घेण्याइतपत लहानच असायचे. धाकट्या नणंदा लग्नाच्या असायच्या. त्यांची आणि ह्या मोठ्या वहिनीची छोटी मोठी गुपिते असायची. घरी कामाला असणारे गडी माया लावून जायचे. आता हे सगळं वर्णन काहीसं आदर्श चित्र निर्माण करत आहे हे मान्य! 

ह्यात एक महत्वाचा मुद्दा यायचा. लग्नानंतर नवऱ्याबायकोच्या प्रेमाच्या नात्याला त्या काळात मुक्तपणाचा फारसा वाव लाभला नाही.  ह्या नात्याविषयी ना जास्त बोललं जात असावं ना एकमेकांविषयी असलेल्या प्रेमाच्या अभिव्यक्तीला वाव असायचा. एकंदरीत घरात आलेल्या सुनेच्या आयुष्याचा बहुतांशी भाग हा तिने त्या घरासाठी आणि घरातील कुटुंबियासाठी व्यतीत करावा अशीच अपेक्षा असायची. आणि ह्याच कारणासाठी घराकडे पाहून मुलगी दिली जायची. नवऱ्याशी जुळो वा ना जुळो, तो तर महत्वाचा घटक नाही. पण बाकीचे सर्व घटक जे तिचं बहुतांशी आयुष्य कसं जाणार हे ठरवणार ते चांगले असले म्हणजे झालं अशी विचारसरणी असायची. बाकी मुलीची स्वतःची अशी ठाम मते बनायच्या आधीच अल्पवयात लग्न लावून द्यायचा ह्या मंडळींचा अट्टाहास असायचा.

हल्ली हे घर नाहीसं झालं, फ्लॅट आले. नवऱ्याव्यतिरिक्त ज्यांच्याशी संवाद साधला जायचा अशी दीर, जाऊ, नणंद ही समवयस्क आणि पुतणे, पुतणी, भाचेमंडळी ह्या सर्वांशी संपर्क कमी झाला. जोवर राजाराणीच्या संसारात सगळं काही सुरळीत चाललं असतं त्यावेळी ह्या मंडळींची उणीव सुद्धा भासत नाही; पण जर कुठं काही बिनसलं तर ही सारी मंडळी, आणि आधी वर्णिलेले सर्व घटक मामला एका विशिष्ट मर्यादेच्या पलिकडे न जाऊ द्यायला सहायभूत ठरायचे. आणि हो आधी वर्णिलेल्या गावात अशी किती चांगल्या संस्था म्हणून बनलेली घर आहेत हा घटक सुद्धा टोकाची भूमिका घेण्यापासून मंडळींना थांबवायचा.  म्हणूनच मुलगी कोणत्या गावात दिली हे महत्वाचे!



अजून एक वाक्य आठवलं - सून आणावी ती गरिबाघरची आणि पोरगी द्यावी ती श्रीमंताघरी! हे वाक्याकडे मी आधी फारसं लक्ष दिलं नव्हतं. आज थोडा विचार केल्यावर असं वाटायला लागलं की गरिबाघरची मुलगी संस्काराचे बाळकडू अगदी कोळून प्याली असेल आणि ती आपल्या घरचं संस्कारमय वातावरण कायम ठेवेल ह्याची शाश्वती! आणि आपली मुलगी संस्कारमय घरातील श्रीमंताघरी जाऊन तिथे संस्कारांची पेरणी करेल! तिला लक्ष्मीची काळजी करायला नको! 

गेले ते दिन गेले! ना ती घरे राहिली ना त्या घरांची संस्कृती! ही घरं सोडून आपण प्रगती गाठली. पण प्रगती केवळ एका पिढीत आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यापर्यंतच गाठून चालत नसतं. वयाच्या तिशीच्या आसपास प्रगतीची शिखरे गाठलेली पण मग पुढे काय करायचं हे न कळलेली अनेक उदाहरणं पाहायला मिळतात; प्रगतीचा आलेख कमी वेगाने वर गेला तरी चालेल पण आपण गाठलेल्या प्रगतीचा पाया त्या पातळीवर दुसऱ्या पिढीला देता आला पाहिजे! आणि नेमक्या ह्या मुद्द्यावर ह्या घरांची उणीव अधिकाधिक जाणवते!! प्रगती गाठलेला माणूस कदाचित चुकू शकतो पण उंचावलेलं एक घर मात्र पुढची पिढी घडवायला कधीच चुकणार नाही!

गुरुवार, ५ फेब्रुवारी, २०१५

सांग सांग भोलानाथ!!

 
जानेवारी मध्ये अचानक वाचनात आलं. बहुदा तिसरा किंवा चौथा सोमवार होता तो! वर्षातील सर्वात कंटाळवाणा दिवस म्हणून जाणकार लोकांनी त्या दिवसाची निवड केली होती. त्यामागे अनेक कारणे दिली होती. बरीचशी मला पटली नाहीत. मग मी मला कंटाळा येणारे क्षण शोधावयास लागलो. 
जानेवारी हा नक्कीच सर्वात कंटाळवाणा महिना! माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी तर अधिकच! डिसेंबर महिन्यात सर्व अमेरिकन सहकारी, बॉस वगैरे सुट्टीवर असतात म्हणून कार्यालयात खूप मोकळे (कमी तणावाचे) वातावरण असते. वर्षभर राखून ठेवलेल्या बऱ्याच सुट्ट्या वापरायची संधी मिळते. मुलांच्या शाळेत सुद्धा परीक्षेचा मारा कमी असल्याने त्या पातळीवर सुद्धा मोकळेपणा मिळतो. वसईत क्रिसमसमध्ये धमाल करून झालेली असते. आणि मग अशा वातावरणातून जानेवारी उजाडतो. गेले दोन तीन वर्षे १ जानेवारीची सुट्टी आमच्याकडे बंद झाली आहे पण अमेरिकेच्या ऑफिसात सुरूच आहे. त्यामुळे वर्षाची सुरुवात चांगली होते. म्हणजे नवीन वर्षातील एक सुट्टी सुरुवातीलाच न गेल्याचे समाधान मिळते आणि अमेरिकेची मंडळी सुट्टीवर असल्याने मिटिंगचा तणाव नसतो. 
पण त्या नंतर मात्र कठीण काळ उगवतो. सुट्टीवरून कामावर परतणाऱ्या माणसांचे दोन प्रकार असतात. 
पहिल्या प्रकारातील माणसे आता सुट्टी घेतली त्यात ताजेतवाने होऊन मग नवीन जोमाने कामाला लागतात. नवीन वर्षाचे निर्धार, कामाच्या याद्या वगैरे बनवून बाकीच्यांना भंडावून सोडतात. ह्यात एक महत्वाचा मुद्दा असतो - उत्साहाच्या भरात आपल्याला वाटणारा कामाच्या प्राधान्याचा क्रम आपल्या बॉसच्या, संघटनेच्या प्राधान्यक्रमाशी मिळताजुळता आहे की नाही हे तपासून पाहणे फार महत्वाचे असते. नाहीतर प्रत्येक क्षणी कामात गर्क राहण्याच्या अट्टाहासापायी चुकीच्या दिशेने खूप पुढे जायला होते. 
दुसऱ्या प्रकारातील माणसे जानेवारीत तापायला (म्हणजेच पूर्ण जोमाने कामाला लागायला किंवा झोन मध्ये यायला) जरा वेळ घेतात. ह्यातही उपप्रकार असतात. ह्यातील काहीजण चलाख असतात. जोवर योग्य दिशा मिळत नाही तोवर ते थंड घेतात. एकदा का योग्य दिशा मिळाली की मग अगदी झपाट्याने कामाला लागतात.  अजून एक खोलवर मुद्दा. नेहमीच स्मार्ट बनून काम करणे शक्य नसते. स्मार्ट काम आणि यांत्रिक काम ह्याचे परिस्थितीनुसार योग्य मिश्रण जमायला हवं.
दुसरा प्रकार जन्मजात आळशी असतो. जितका वेळ चालढकल करता येईल तितका वेळ चालढकल करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. 

ह्यात काही गोष्टी आपण करू शकतो. जसे की रविवारी झोपण्याआधी सोमवारची जमेल तितकी तयारी करणे, सोमवारी नेहमीच्या वेळेपेक्षा आधी ऑफिसात पोहोचून तिथल्या वातावरणाला सरावायचा प्रयत्न करणे. सोमवारी एखादी हलकीफुलकी (विषयावरील) बैठक ठेवणे वगैरे वगैरे!
इतकं करून सुद्धा बेभान मन एखाद्या गंभीर बैठकीच्या वेळी सुद्धा कुठंतरी भरकटत रहातं. चेहऱ्यावरील भाव आणि मनातील विचार ह्यांचा संबंध जोडला जाऊ नये म्हणून मग खूप प्रयत्न करावे लागतात! 

बाकी मग मंगळवार संध्याकाळ वगैरे उजाडली की हळूहळू मन प्रसन्न व्हायला लागतं. ह्यात दोन प्रकारे हातभार लागतो. दोन दिवस कार्यालयात काम करून मन ताळ्यावर आलं असतं आणि दुसरं म्हणजे शुक्रवार संध्याकाळ जवळ येत चालली असते. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातला एक आनंदक्षण म्हणजे शुक्रवार संध्याकाळ! तुम्ही कितीही मोठ्या पदावर गेलात, प्रोजेक्ट कितीही बिकट परिस्थितीत असले तरी माणसाने शुक्रवार संध्याकाळ आपल्याला हवी तशी अनुभवावी! त्या वेळेला मनात कामाचे कोणतेही विचार येऊ देऊ नयेत! तळीराम मंडळींनी ऐच्छिक ठिकाणे गाठावीत!
  वर्षे भराभर निघून जातात. सोमवार ते शुक्रवार हा प्रवास कसा पटकन संपला हे जसं समजत नाही तसे जानेवारी ते डिसेंबर हा प्रवासही झटकन संपत जातो.  वयाच्या / व्यावसायिक कारकीर्दीच्या दृष्टीने विचार केला तर आपण बुधवारपर्यंत पोहोचलो असतो. पण इथला शुक्रवार मात्र जमेल तितका पुढे ढकलावासा वाटतो!

आपण वयाने मोठे होत जातो, वाढलेल्या वयानुसार आणि कदाचित वाढलेल्या अनुभवामुळे आपण वरच्या पदावर जाण्याची शक्यता वाढीस लागते. अगदी उच्चपदस्थ लोकांनी उदात्त विधान करण्याची पद्धत असते. त्याचप्रमाणे थोडेसं वरती पोहोचलो की मग आपणसुद्धा अशी काही विधानं करू लागतो. पण एक सत्य मात्र कायम राहते. बालवाडीत आईने वर्गात सोडल्यावर डोळ्यात येणारे अश्रू जरी लपवता येत असले तरी नजर मात्र दरवाजाकडे लागून रहायची. तसंच अजूनही सोमवारी ऑफिसात कार्ड स्वाईप करताना सुद्धा भावना मात्र तीच असते!

बुधवार, २८ जानेवारी, २०१५

आप यूँ फासलों से ...


 
लहानपणी ऐकलेलं, आवडलेलं हे गाणं मधूनच रेडिओवर लागलं की मग पुन्हा अस्वस्थ करून जातं. ह्या गाण्याचा अर्थ जाणून घ्यायचा कधी प्रयत्न केला नव्हता, तरीही हे गाणं का कोणास ठाऊक कुठतरी मनात कायम दडून राहत. आज थोडी फुरसत मिळाली आणि मग ठरवलं की जरा गाण्याचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करावा.

चित्रपट १९७७ सालचा शंकर हुसेन. गीत जां निसार अख्तर ह्यांचं. एका हिंदू बापाने वाढविलेल्या अनाथ मुस्लिम मुलाची ही कथा! कथानकात खोलवर जाण्याचे इथे प्रयोजन नाही. त्या काळी नायकाला सर्वस्व मानणाऱ्या नायिकांचे चित्र रेखाटलं जायचं. जसं ते चित्रपटातून दर्शविलं जायचं तसंच गीतातून सुद्धा प्रकट व्हायचं. हल्ली सर्व काही, प्रेमासकट  डोकं ताळ्यावर ठेवून केलं जात असल्याने अशा भावना व्यक्त केल्या जात नाहीत. 


आप यूँ फासलों से गुजरते रहे
दिल से कदमों की आवाज़ आती रही 


दूर कोठून तरी तू असाच जात होतास, पण माझ्या हृदयात मात्र तुझ्या पावलांचे नाद घुमत राहिले.  

आहटों से अंधेरे चमकते रहे
रात आती रही, रात जाती रही







केवळ तुझ्या चाहुलीने अंधारात आशेचे किरण चमकत राहिले. अशा अनेक रात्री आल्या आणि निघून गेल्या!


गुनगुनाती रही मेरी तनहाईयाँ
दूर बजती रही कितनी शहनाईयां
जिंदगी, जिंदगी को बुलाती रही



आजूबाजूला आनंदाचे अनेक प्रसंग येत होते. माझे एकटेपणाचे नाद असेच आसमंतात  घुमत राहिले. माझ्यातील जिवंतपणाची चिन्ह माझ्या सर्वस्वाला म्हणजेच तुला कायम बोलावत राहिली. 


कतरा कतरा, पिघलता रहा आसमान
रूह की वादियों में ना जाने कहा
एक नदी दिलरुबा गीत गाती रही







आकाशातून अधूनमधून वर्षा होत राहिली. (माझ्या नयनांतून अधूनमधून अश्रू वाहत राहिले).  दरीखोऱ्यातून भटकणाऱ्या आत्म्याच्या मनात एक प्रेमाचे गाणं कायम गुंजत राहिलं.


आप की गर्म बाहों में खो जायेंगे
आप की नर्म जानों पे सो जायेंगे
मुद्दतों रात नींदे चुराती रही


तुझ्या उष्ण बाहुपाशात मी विरघळून जाईन. तुझ्या मऊशार छातीवर मी निद्रा घेईन. अशाच आशेवर रात्रभर माझी झोप अधूनमधून चाळवत राहिली.
 
ह्या गीताच रसग्रहण करण्याचा प्रयत्न म्हणजे एक शिवधनुष्य उचलण्यासारखा होता. तो व्यवस्थित झेपला नाही हे मध्यंतरी जाणवले. 

त्यानंतर मग अशीच काही नायिकेच्या भावनांचे विविध पैलू उलगडून दाखविणारी काही गीते मला आठवली. ह्या प्रत्येक गीताचं रसग्रहण करण्याचा पुन्हा प्रयत्न मी करणार नाही. पण प्रत्येक गीतातील प्रेयसीची  जाणवणारी एक मुख्य भावना इथे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे

२) अजनबी कौन हो तुम जबसे तुम्हे देखा हैं!

ह्या गीतात एका अनोळखी व्यक्तीला भेटल्यावर नायिकेचे विश्वच पूर्णपणे बदलून गेलं आहे. संपूर्ण विश्वच आपल्या नजरेत सामावून गेल्याचा तिला भास होत आहे. फुलांच्या प्रत्येक गुच्छात, गाण्याच्या प्रत्येक ओळीत तिला हा अनोळखी माणूस भेटत आहे. कित्येक वर्षे ज्याची वाट पाहिली तो पाऊस एकदाचा आला असा भास तिला होत आहे. प्रत्येक श्वासातून शहनाईचे सूर उमटल्याचा तिला भास होत आहे. अंधाराने भरलेल्या माझ्या विश्वात आशेचा एक किरण आला आहे. जेव्हा रात्र येते त्यावेळी तुझा मोहक गंध पूर्ण आसमंतात भरून राहतो. 

बाकी ह्या गाण्यातील गोंडस विनोद मेहरा आणि सुंदर शबाना केवळ लाजबाबच!



३) ये मुलाकात एक बहाना हैं!
प्यार का सिलसिला पुराना हैं!

आपल्या दोघांचं प्रेम जन्मोनजन्म चालू आहे. ही भेट तर केवळ एक निमित्त आहे. आपण इतके जवळ येऊयात की हृदयाचे नाद एकमेकांत मिसळून जातील. मी ज्यावेळी माझ्या प्रियकराच्या मिठीत असेन त्यावेळी संपूर्ण विश्वातील सुखे माझ्या पायाशी लोळण घेत असल्याचा भास मला होतोय. स्वप्नं तर काचेहून नाजूक असतात, ती तुटू नयेत म्हणून खूप काळजी घ्यावी लागणार आहे!!

४) सावन के झुले पडे, तुम चले आओ!

निसर्ग कधी अचानक अगदी सुंदर रूप घेऊन आपणासमोर येतो, तर कधी पाऊस, बर्फवृष्टी, सूर्यास्त अशी हळव्या माणसाला अधिकच भावूक बनविणारी रूपे घेऊन आपणासमोर येतो. अशावेळी ती प्रिय व्यक्ती जवळ असावी अशी भावना उफाळून येते.

५) बहारों मेरा जीवन भी सवारों, कोई आये कहिसें, तुम पुकारो!

हे गीत पण काहीसे सावन के झुले पडे सारखंच! फरक इतका की अजून नायिकेला कोणी जवळचा मिळाला नाहीये! फुलांनी बहरलेल्या बागेत फिरताना ह्या निसर्गाने माझे जीवनसुद्धा असेच बहरून टाकावे असे मनोगत नायिका व्यक्त करीत राहते. माझ्या हृदयाला धडकणे तुम्हीच शिकवलं आहे आणि त्यामुळे तुम्हांलाच मी दोष देईन! आता माझा अंत पाहू नका, कोणी माझ्या हातात बांगड्या आणून भरा, माझ्या वेणीत गजरा माळा आणि मला सजवून माझ्या नायकाची भेट घडवून द्या अशी आर्जवं ही नायिका करीत आहे. जवळजवळ अर्ध शतक नायक म्हणून वावरलेला देव आनंद आजूबाजूला बागडत असल्याने नायिकेची आपण चिंता करण्याचं काम नाही!!
 

६) दिल तो दिल, दिल का ऐतबार क्या कीजिये 
आ गया तो किसीपे प्यार क्या कीजिये!

हृदयाची तऱ्हाच वेगळी! त्याच्यावर विश्वास कसा ठेवावा! त्याच्यामुळे आपण कोणाच्या प्रेमात पडलो तर आपण काय करू शकणार? बाकी मग पूर्ण गीतभर राखी प्रेमाने झालेली आपली हालत व्यक्त करीत राहते.

७) आप की नज़रों ने समझा प्यार के काबिल मुझे 
दिल की ऐ धड़कन ठहर जा, मिल गयी मंज़िल मुझे!

 इथे आपल्याला प्रियकर भेटल्याने अगदी धन्य झालेली नायिका हे गीत गात आहे. ह्यातील एक ओळ लक्षात राहते 

क्यों तूफ़ानोसे डरु मैं, मेरा साहिल आप हैं 
कोई तूफ़ानोसे कह दे मिल गया साहिल मुझे!

मागच्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी आप यूँ फासलों से ने सुरु केलेली ही गाण्याची मैफिल यु ट्यूबच्या सूचनांची अधिकच बहरत गेली! पूर्वी विविधभारतीवर ऐकलेली ही गीते यु ट्यूबमुळे प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद देऊन गेली! धन्य ती लता, जुन्या गायिका आणि धन्य ते पूर्वीचे गीतकार!!

रविवार, १८ जानेवारी, २०१५

व्यक्ती ते वैचारिक संस्था!!!!



मध्यंतरी एका लग्नाच्या मांडवात एक परिचित व्यक्ती भेटली .  "तू या प्रसंगाला दिसला नाहीस .तु त्या ठिकाणी उशिरा आलास. "  अशी तिने नेहमी प्रमाणे माझी हजेरी घेतली. मी काहीतरी बहाणा काढून वेळ मारून नेली.  
काही वेळानंतर ही व्यक्ती एका घोळक्यात बसली होती. ह्या सर्वजणी मांडवातील जवळजवळ प्रत्येक व्यक्तीचे निरीक्षण करण्यात आणि त्या व्यक्तीवर टिपणी करण्यात गुंतलेल्या होत्या. त्यांचे खास लक्ष नवीन पिढीतील लोकांकडे विशेषतः नुकत्याच संसारात पडलेल्या मुलींकडे होते. उपलब्ध माहिती आधारे त्या ह्या सर्वांविषयीची आपली मते अगदी मोकळ्या मनाने मांडत होत्या.
नंतर मग एक अगदी जवळचे कुटुंबीय भेटले. ते पूर्ण लग्न समारंभात सर्व काही व्यवस्थित चालले आहे की नाही ह्याची खात्री करून घेत होते. हे आमचे कुटुंबीय म्हणजे सर्व माहितीचा, धार्मिक विधीचा ज्ञानकोषच!! ज्ञात असलेल्या सर्व प्रथांना कालानुसार योग्य रूप देऊन त्या प्रथा पाळण्यास समाजातील सर्व व्यक्तींना मदत करण्यास त्यांचा सतत हातभार लागतो. 

१> गावात अशा अनेक व्यक्ती भेटतात, ज्या आयुष्याच्या एका टप्प्यावर एका विशिष्ट विचारसरणीचा पुरस्कार करू लागतात. ही घटना काही एका क्षणात होत नसते. ही जडणघडणीची प्रक्रिया लहानपणापासून चालू असते. आयुष्यात कधीतरी ह्या जडणघडणीच्या प्रगतीचा टप्पा एका विशिष्ट पातळीला पार करतो आणि त्या व्यक्तीला ही विचारसरणी बाह्य जगापुढे मांडण्याचा आत्मविश्वास प्राप्त होतो. छोट्या मोठ्या घटनांमधून मग ह्या व्यक्तीचा आत्मविश्वास बळावू लागतो आणि मग ही व्यक्ती अधिकृतरित्या त्या विचारसरणीची प्रतिनिधी बनते. ही व्यक्ती पारंपारिक वागण्याचा पुरस्कार करणारी संस्था बनली असे आपण म्हणूयात. 

२> उदाहरण १ मध्ये उल्लेखलेली व्यक्ती सार्वजनिक जीवनात संस्था म्हणून वावरण्याइतपत आत्मविश्वास बाळगून असते. पण प्रत्येक वेळा असे होते असं नाही. बहुतेक सर्वच जण आयुष्याच्या एका टप्प्यावर एका विशिष्ट प्रकारे विचार करू लागतात. ह्यातील काही भाग अनुवांशिक घटकातून, काही ज्या भागात तुम्ही वाढलात तिथल्या चालीरितीमधून आलेला असतो. जर तुम्ही समजा एकाच प्रकारच्या वातावरणात कायम राहिलात तर तुमच्या विचारसरणीच्या कक्षा रुंदावत नाहीत. मग तुम्ही थोड्या मर्यादित विभागातील विचारांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था बनता! पण तुम्ही ह्या विचारसरणीचे अगदी हिरिरीने प्रतिनिधित्व करण्याची शक्यता मात्र जास्त असते. ह्या उलट जर तुम्ही आयुष्यभर जगात वेगवेगळ्या ठिकाणी फिरलात तर तुमच्या अनुवांशिक आणि जन्मभूमिद्वारे तुम्हांला मिळालेला एका विशिष्ट पद्धतीचा वैचारिक वारसा आपली संहती, तीव्रता कोठेतरी गमावून बसतो. तो माणूस आधुनिक विचाराचा म्हणून गणला जात असला तरी त्याला आपण वैचारिक संस्था म्हणू शकत नाही. 

३> तरुण वयात होणारे पती पत्नीचे वाद हे बऱ्याच वेळा त्यांच्या व्यक्तिगत विचारसरणीतील फरकामुळे होत असतात. पण जसजसे वय वाढत जाते तसतसे त्यांचे वैचारिक संस्थामध्ये परिवर्तन होत जाते. मग संघर्ष दोन संस्थामधील मतभेदासारखे वाटू लागतात. 

४> काही व्यक्ती एखाद्या विषयात खोलवर संशोधन करतात. मग त्यांचे त्या विषयाच्या ज्ञानकोषात रुपांतर होते. पण सहसा अशा व्यक्ती शांत राहणे पसंत करीत असल्याने त्यांचं बोलघेवड्या संस्थात रुपांतर होत नाही; बऱ्याच वेळा लिहिणाऱ्या संस्थात रुपांतर होते!

व्यक्तीरुपातील अशा विविध संस्था आपल्या आसपास वावरत असतात. सामाजिक जीवनात वावरताना हल्ली मी व्यक्तींचे निरीक्षण करीत असतो आणि त्यांचं संस्थात रुपांतर झालं आहे का ह्याचा विचार करतो. असंच माझंही कोणीतरी निरीक्षण करीत असणार!

एक गोष्ट मात्र खरी की ह्या व्यक्तीसंस्था आपल्या संस्कृतीचे हस्तांतरण करण्यात मोलाचा वाटा बजावत असतात.

शनिवार, १० जानेवारी, २०१५

अलिप्ततावाद!!


 
मागील शनिवारी विक्रम गोखले ह्यांचं चतुरंग मधील सदर वाचलं. आपल्या वडिलांनी आपल्याला जीवनातील तत्त्वज्ञानाचे धडे कसे दिले हे त्यांनी अगदी सुंदरपणे मांडलं होतं. त्यांचं एक वाक्य खूप लक्षात राहिलं. "पन्नाशीच्या आसपास केव्हातरी अलिप्ततावाद लक्षात आलेला मी  एक पुरुष आहे!" 
ह्या वाक्याने मनात आलेले हे विचार! विक्रम गोखले ह्यांना ह्यातील कोणता अलिप्ततावाद अभिप्रेत होता ह्यावर भाष्य करण्याचं धाडस मी करणार नाही.
लहानपणी आपण प्रत्येक गोष्टीत अगदी रस घेत असतो. ह्या नाविन्यपूर्ण जीवनातील प्रत्येक गोष्ट शिकण्याची उमेद आपण बाळगून असतो. हळूहळू आपण आयुष्यातील अनुभवाला सामोरे जाऊ लागतो. काही सुखदायक तर काही कटू! प्रत्येकाची हे अनुभव पचविण्याची क्षमता वेगवेगळी असते. काहींना पहिल्या काही कटू अनुभवांतच वैराग्य येतं तर काहीजण संकटाचे, दुःखाचे पहाड पेलून सुद्धा आयुष्यातील उत्साह राखून असतात. 
एखाद्या व्यक्ती सभोवतालच्या परिस्थितीपासून, समाजापासून अलिप्त बनून का वागू लागते? ज्या क्षणी एका व्यक्तीचे सभोवतालच्या व्यक्तींच्या स्वभावाशी प्रथम मतभेद होतात, त्या क्षणी दोन प्राथमिक शक्यता असतात. एकतर ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर नियंत्रण मिळवायला पाहू शकते किंवा दुसऱ्या व्यक्तीला आपल्यावर नियंत्रण मिळवू देऊ शकते. समजा अशा ताणतणावाच्या प्रसंगांची वारंवारता वाढत गेली तर मग ती व्यक्ती त्या दुसऱ्या व्यक्तीला टाळण्याची मानसिकता दाखवते. हीच स्थिती एखाद्या व्यक्तीबाबत सभोवतालच्या परिस्थिती किंवा समाजासोबत निर्माण होऊ शकते. एखादी व्यक्ती भोवतालच्या परिस्थितीशी पूर्णपणे मिसळून घेऊ शकत नाही. मग ती ह्या परिस्थितीला टाळू लागते. अशी परिस्थिती 
वैयक्तिक, व्यावसायिक किंवा सामाजिक जीवनात येऊ शकते. 
वैयक्तिक जीवनात समजा जीवनसाथी अचानक काही कारणांमुळे अलिप्तपणे वागू लागला तर? काही वेळा दोघही अलिप्तपणे वागतात तर काही वेळा एकच अलिप्तपणे वागतो. अशा वेळी दुसऱ्या जोडीदाराची अवस्था बिकट होऊ शकते. काही वेळा एखादा जोडीदार बाकीच्या कुटुंबियांशी अलिप्तपणे वागू लागतो. भारतीय विवाहसंस्थेत अशी अलिप्तता आयुष्यभर घेऊन जगणारी अनेक जोडपी असू शकतात. हा फार मोठा गहन विषय आहे जो एका पोस्टमध्ये हाताळण्याजोगा नाही. गेल्या काही वर्षात प्रसिद्ध पुरुषांच्या पत्नींनी विवाहात आयुष्यभर झालेली आपली घुसमट पुस्तकरुपात प्रसिद्ध करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. पुरुष मात्र अशा गोष्टीमुळे बहुदा घुसमट करून घेत नाहीत. एकतर त्यांचा मित्रपरिवार मोठा असतो. पुरुषांना त्यांच्याशी बराच वेळ घालवता येतो आणि मग वैयक्तिक जीवनातील अलिप्तपणाची कसर भरून काढण्याचे माध्यम त्यांना उपलब्ध होते. नोकरी न करणाऱ्या स्त्रियांना मात्र काही वेळा असे माध्यम उपलब्ध न झाल्याने मग मोठा प्रश्न निर्माण होतो. 
व्यावसायिक जगात सुद्धा असे प्रश्न निर्माण होतात. माणसं चुकीच्या ठिकाणी नोकरीस आणि मग दुसरा पर्याय नसल्याने अशा ठिकाणी अडकून बसतात. एकतर ती आवश्यकतेपेक्षा जास्त पात्रता बाळगून असतात किंवा कमी! आता तुम्ही म्हणाल की आवश्यकतेपेक्षा जास्त पात्रता बाळगून असणाऱ्या लोकांनी अडकून बसायचे कारण काय? आर्थिक, कौटुंबिक कारणं अशा गोष्टींमुळे असे प्रसंग उद्भवतात. कधी कधी कार्यालयातील प्रभावी गटाशी न जुळल्याने मग लोक आपलं अलिप्ततेचे एक घरटे बनवून राहतात. 
वरील दोन प्रकारच्या अलिप्ततेपेक्षा कमी गांभीर्याची अलिप्तता म्हणजे सामाजिक अलिप्तता! आजूबाजूच्या सामाजिक रूढीशी, चालीरितींशी आपलं जमत नाही असं एखाद्याला वाटू शकतं आणि मग तो सामाजिक समारंभात मिसळणे टाळू लागतो किंवा कमी करतो. कधी कधी आर्थिक, शैक्षणिक पात्रतेच्या कमाल किंवा किमान पात्रता गाठल्याने सुद्धा काही जण सामाजिक दृष्ट्या अलिप्त राहणे पसंत करतात. 
काही वेळा एखादा समाजच बाकीच्या समाजापासून अलिप्त राहू लागतो. सामाजिक जीवनात आपल्यापेक्षा कमी बौद्धिक पातळीच्या लोकांनी कब्जा करून गोंधळाची परिस्थिती निर्माण केल्यास बुद्धीजीवी वर्ग सामाजिक जीवनात अलिप्ततेचे धोरण स्वीकारतो. 
पुन्हा एकदा वैयक्तिक अलिप्ततावादाकडे! म्हणायला गेलं तर मनुष्य समाजप्रिय, संवादप्रिय प्राणी! वैयक्तिक जीवनात अलिप्ततावाद स्वीकारायला लागल्यास अर्थात संवाद कमी होतात. एकमेकांशी व्यवहार अगदी गरजेपुरता होतात. काहींना हे झेपतात कारण त्यांचा स्वभाव मुळी असतोच तसा! पण काहींना मात्र हे बाह्यस्वरुपात स्वीकारलेलं अलिप्ततेचे धोरण आतून अगदी छळत असतं. पण पर्याय नसतो!
शेवटी वयानुसार आलेला अलिप्ततावाद! "भौतिक सुखांचा उपभोग घेण्याचं माझं वय निघून गेलं, आता मला बाह्यजगातील सुखापासून अलिप्त राहिलं पाहिजे", "माझ्या अवतीभोवती तरुण मंडळी आहेत त्यांना माझा त्रास नको" असे विचार काही जणांच्या मनात ठराविक वयानंतर येऊ लागतात आणि मग अशी माणसं भोवतालच्या व्यवहारातून अंग काढून घेत मनुष्यजातीला ज्ञात असलेल्या पुढच्या मार्गाची तयारी म्हणून अध्यात्ममार्गाला लागतात!
बाकी इतक्या उत्साहाने ब्लॉग पोस्ट्स लिहिणाऱ्या नवोदित लेखकाला प्रतिक्रिया देताना मात्र आपण सारी मंडळी अलिप्ततावाद दाखवतोच की!

रविवार, ४ जानेवारी, २०१५

नववर्षचिंतन !


 
नवीन वर्षाचा काळ एक मैलाचा दगड असतो. आपल्या आयुष्यातील एक वर्ष सरलं. विविध लोक आयुष्याच्या विविध टप्प्यात एकंदरीत आयुष्याची दिशा आणि मार्ग ठरून गेला आहे हे मानतात. निवडलेला नोकरी - व्यवसाय, विवाह हे घटक ह्यात विशेष हातभार लावतात. हे झालं सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत; पण आपल्यातीलच काही लोक आयुष्याच्या प्रत्येक क्षणी ह्या विश्वाच्या, पृथ्वीच्या, मानवी जीवनाच्या अगाध पैलुंमधील जमतील तितकी रहस्य उलगडून पाहण्याच्या प्रयत्नात असतात. नवीन वर्षाच्या क्षणी मग मानवाने आखलेल्या पुढील टप्प्यातील म्हणजेच पुढील वर्षातील आपल्याला जमण्यासारखी उद्दिष्टे ठरवतात. 
मी आपला साधा माणूस! जीवनाची दिशा, मार्ग बऱ्यापैकी आखली गेली आहे असं मानणारा. त्यामुळे काही मोठा फेरबदल जीवनात संभवत नाही. तरीसुद्धा आता छोट्या वाटणाऱ्या काही गोष्टी आयुष्यात मोठा फरक घडवू शकतात हे मागच्या काही वर्षात अनुभवाने शिकलो. त्यामुळे त्या संदर्भात काही निर्धार करणे चांगले असते. आता निर्धार हा शब्द अगदी अचूक आहे असे म्हणता येणार नाही. प्रामाणिक प्रयत्न हा चांगला शब्द असू शकतो. येत्या वर्षात काही चांगल्या गोष्टी नव्याने करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायचा. खरं म्हणजे ह्यात गाजावाजा न करता हा सुद्धा भाग यायला हवा. ह्या पोस्टमुळे गाजावाजा न करता हा भाग मात्र चुकला जाणार. तर मग मूळ मुद्द्याकडे - ह्या वर्षी ज्या गोष्टींचे प्रामाणिक प्रयत्न करायचं ठरवलं आहे त्या अशा,
१> शांत राहण्याची सीमा विस्तारित करायचा प्रयत्न करणे. वर्षात अनेक प्रसंग असे येतात जे तुमच्या सहनशक्तीचा अंत पाहतात. त्या क्षणानंतर चांगली वाट आपल्यापुढे येईल असा विश्वास मनात बाळगणे आणि ही शांत राहण्याची आपली क्षमता अधिक सक्षम करणे. 
२> क्रोधाच्या प्रसंगी शांत राहणे आणि एकंदरीत आपली मनःस्थिती चांगली ठेवणे ह्या म्हटल्या तर एकमेकांशी संबंधित गोष्टी आहेत. कार्यालयात तुमच्यावर जर जबाबदारीचं काम असेल तर तुमची मनःस्थिती चांगली असायला हवी. जबाबदारीचं काम म्हणजे नक्की काय? ज्या कामामध्ये तुम्ही बुद्धीचा वापर करता किंवा अनेकजणांच्या कामावर देखरेख ठेवता; ते जबाबदारीचं काम! थोडक्यात म्हणजे तुम्ही ह्या कामात उपलब्ध माहितीचा उपयोग करून निर्णय घेत असता. ह्यातील काही अल्पकालीन तर काही दीर्घकालीन असतात. काही धोरणात्मक असतात. तर असे महत्त्वाचे निर्णय योग्य प्रकारे घेण्यासाठी मनःस्थिती चांगली ठेवण्याचा प्रयत्न करीन. मनःस्थितीबरोबर उपलब्ध माहितीविषयी माझे ज्ञान वाढविण्याचा प्रयत्न करीन; जेणेकरून चांगले निर्णय घेण्याची माझी क्षमता वाढीस लागेल. 
३> गेल्या आठवड्यात वाचलं, की लोकांचं एकंदरीत ब्लॉगिंग ह्या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याचं प्रमाण कमी झालं आहे. हेच वाक्य दुसऱ्या प्रकारे मांडायचं झालं तर गंभीर, एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करून मांडलेले विचार ब्लॉगद्वारे कमी प्रमाणात हाताळले जातात. हा मुद्दा माझ्याही मनाला पटला. त्यामुळे ह्या वर्षी खरोखर विचारपूर्वक, मानवी स्वभावाचा अभ्यास करून मगच पोस्ट्स टाकत जाईन. बहुदा कथा हा प्रकार अगदी कमी होईल. आणि पोस्ट्स टाकायची घाई करणार नाही. लिहिलेली पोस्ट पुन्हा वाचून, गरज असल्यास त्याची पुनर्मांडणी करून मगच टाकीन. आणि हो पुन्हा एकदा एकंदरीत वाचकसंख्येच्या मागे लागून लोकप्रिय विषयावर लिहीण्याचा अट्टाहास धरणार नाही. 
४> बोलताना, लिहिताना विशेषकरून दुसऱ्या व्यक्तीविषयी आपली मते व्यक्त  करताना शब्दांचा सुयोग्य वापर केला आहे की नाही ह्याची पुन्हा पुन्हा खातरजमा करून घेईन. एकंदरीत सभोवतालच्या भारतीय समाजाची आक्रमक वृत्ती वाढत चालली आहे. आत्मविश्वास आणि अहंकार ह्यातील सीमारेषा धुसर होत चालल्या आहेत. पारंपारिकतेच्या एका टोकाला बसून सभोवतालच्या बदलत्या दुनियेला ज्ञान देण्याचा आव कमी आणीन!
५> माझी सामाजिक जीवनात प्रत्यक्ष कृतीचे प्रमाण नगण्य आहे. ह्या गोष्टीला प्राध्यान्यक्रमात कसे वरचे स्थान देता येईल ह्याचा विचार करीन. 

एक गोष्ट मात्र जी गेली काही वर्षे करत आहे ती करणे चालूच ठेवीन! आणि ती म्हणजे मुलाच्या मागे अभ्यासासाठी लागणे! एका मल्लाची गोष्ट आहे. तो मल्ल एकदा रिंगणात सर्वांसमोर मोठ्या बैलाला अगदी सहजासहजी उचलतो. सर्वजण अगदी अचंबा व्यक्त करतात. त्यातील एकजण त्या मल्लाला विचारतो, "इतका मजबूत बैल; त्याला तू कसे उचलु शकलास?" मल्ल म्हणतो, "हा बैल जेव्हा छोटे वासरू होते; तेव्हापासून त्याला मी दररोज उचलतो आहे! त्याचे वजन जसे वाढत गेले तसा मी माझा व्यायाम आणि आहार वाढविला!" 
सात - आठ वर्षांनी बारावीचे पाटील क्लासेस निघतील, तेव्हा लोक सुद्धा मला असाच प्रश्न विचारतील, "अरे आदित्य, बारावीचा इतका कठीण अभ्यासक्रम तू इतका कसा सहजासहजी शिकवू शकतोस?"

बुधवार, ३१ डिसेंबर, २०१४

भेटीगाठी!!


 
गेले काही दिवस वसईत बराच मुक्काम होता. आधी लग्नानिमित्त आणि मग सुट्टी मिळाली म्हणून. ह्या कालावधीत वसईत खूप माणसं भेटतात. अगदी लहाणपणापासून ओळखीतली ते नव्याने ओळख झालेली. थोडी फुरसत असल्याने माणसं मनमोकळेपणाने बोलण्याची शक्यता जास्त असते. 
जुन्या ओळखीतले लोक भेटतात. मन भूतकाळात जातं. गप्पांचा ओघ जुन्या आठवणीकडे जातो. कधी दोघांनाही ह्या आठवणी हव्याहव्याशा वाटतात, तर कधी एकालाच! काही माणसं जगतात वर्तमानकाळात पण मनाने भूतकाळात अडकून बसलेली असतात. काहीजण भूतकाळाला  फक्त फुरसतीच्या क्षणी आठवू शकण्याची क्षमता बाळगून असतात. काहीजणांना भूतकाळातील फक्त चांगले क्षण आठवतात तर काहींना भूतकाळातील कटू स्मृती कायम छळत राहतात. 
चौधरीबाई आणि त्यांच्या यजमानांच्या लग्नाला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी जवळच्या नातेवाईकांना आणि आम्हां शेजाऱ्यांना एका सुंदर सोहळ्यासाठी आमंत्रित केलं. हे दोघं अगदी साधेपणाने आयुष्य जगले.   त्यांचा कुटुंबीय असलेल्या रॉबर्ट ह्याने अस्खलित मराठीत सुंदर भाषण केलं. हे जोडपं अगदी साधेपणाने आयुष्य जगलं, त्यांनी मोठा बंगला वगैरे उभारला नसेल, महागड्या गाड्या विकत घेतल्या नसतील पण एक साधं सुधं सार्थक जीवन जगलं. बाई जेव्हा बाजारातून काही भाजी वगैरे घेऊन यायच्या किंबहुना अजूनही येतात तेव्हा त्यांचे यजमान तात्काळ पुढे येतात. पिशवी घेतात; घरकामात त्यांना अजूनही मदत करतात. चौधरीबाई काहीशा भावनाविवश झाल्या होत्या. त्यांचं मन भूतकाळात गेलं. मुलांना सांभाळायचा प्रश्न तेव्हाही यायचा. काही काळ आईकडे तामतलावला शाळेत सोडून यायची वेळ आली. त्याकाळी बस रिक्षा सहजासहजी मिळत नसल्याने संध्याकाळी त्या लहान मुलीला घेऊन सुमारे दीड किलोमीटर अंतर चालत यावे लागत असे. पुढे चुलतदिरांनी सुद्धा लहान मुली सांभाळायला मदत केली. 
ह्याच दिवशी (२७ डिसेंबर १९६४) रोजी चौधरी बाईंच्या यजमानांच्या बहिणीचा सुद्धा विवाह झाला होता. त्या दांपत्याला  सुद्धा व्यासपीठावर बोलावून शुभेच्छा देण्यात आल्या. एकाच दिवशी बहीण भावांची लग्न लावायची जबाबदारी त्यांच्या पालकांनी पेलली. ही पद्धत अजूनही कधी कधी पाहायला मिळते. काही लोक ह्या पद्धतीविषयी साशंक असतात. त्यांनी ह्या दोन दीर्घकाळ विवाहबंधनात बद्ध असलेल्या जोडप्यांकडे पाहून निशंक व्हावे असे एक वक्ता म्हणाला. दोन तीन वक्त्यांनी हल्लीच्या काळात विवाहसंस्था कठीण काळातून जात असताना ह्या जोडप्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असे वक्तव्य केले. 
राहून राहून असंच  वाटत गेलं - स्वयंप्रगतीचा ध्यास आणि शांत जीवन ह्या दोन रेषा कधी एकत्र जाऊ शकत नाहीत. कोण्या एकाचा त्याग पती पत्नीतील एकाला किंवा दोघांना करावा लागतोच. ती गोष्ट कोणती आणि त्याग कोणी करायचा ह्याविषयी नवराबायकोचं एकमत व्हावं लागत. पूर्वी हे विचार न करता होत असे कारण पर्याय कमी होते. आता मात्र परिस्थिती कठीण आहे. 
सुट्टीनिम्मित परदेशाहून आलेली मंडळी जसजशी सुट्टी संपू लागली तशी खिन्न होत गेली. आमच्या गल्लीत काही दिवसांपूर्वी एक दुःखद घटना घडली. आमच्या एक शेजारी, ज्या अगदी चांगल्या हिंडत्या फिरत्या होत्या, त्यांना सुमारे सहा महिन्यापूर्वी एका असाध्य आजाराचे (बहुदा ALS) निदान झाले. दोन्ही मुले, जावई परदेशात! दोन्ही मुले अगदी प्रेमळ! त्यांनी आपल्या परीने खूप प्रयत्न केला.शक्य असतील तितके उपचार केले, पैशाकडे पाहिलं नाही. पण ईश्वराच्या मनात मात्र वेगळंच होतं. काही दिवसांपूर्वी ह्या बाई देवाघरी गेल्या. अंकल एकटेच राहिले. त्यांना सोडून परदेशी जाताना मुलांच्या मनात काय भावना निर्माण झाल्या असतील ह्याची कल्पनासुद्धा करवत नाही. 
बहिण निऊ तीन वर्षे अमेरिकेत राहून तीन आठवड्याच्या सुट्टीवर आली होती. तिचीही सुट्टी जशी संपायला आली तशी तिच्या चेहऱ्यावर उदासी दिसू लागली. ज्या सुट्टीची इतक्या आतुरतेने वाट पाहिली ती इतक्या झटकन संपून जाईल ह्याची कल्पना केली नव्हती. शर्व आणि निरंजना सुद्धा मजेत होते. तीन वर्षांच्या मधल्या कालावधीत त्यांच्यात फारसा काही फरक पडलेला वाटला नाही. म्हणजे त्यांचा भारतीयपणा बऱ्यापैकी शाबूत आहे. निऊ आणि निशांकला ह्याचे श्रेय द्यायला हवं. शर्वला तर अमेरिकन असेंटमध्ये त्याच्याशी बोलण्याचा माझा प्रयत्न फारसा भावला नाही. मी अमेरिकेत राहिलो तरी मला मराठी समजतं असं सांगून त्याने माझी आणि स्वतःची सुद्धा सुटका केली. 
सुश्रुत दोन वर्षांनी न्यूझीलंड वरून आला. त्याने स्वरूपदादाच्या लग्नात खूप काम केलं. त्याची सुट्टी सुद्धा संपत आली. काहीसा हिरमुसला झाला तो! भारतात मनासारखी नोकरी मिळाली तर पुढे कधीतरी परत येईन असे म्हणाला. जबाबदारी त्याच्या चेहऱ्यावर, बोलण्यात जाणवत राहिली.

अजून काही लोक भेटत राहिले. काहींना आयुष्याने समृद्धी दिली होती. त्यांच्या चेहऱ्यावर समृद्धी उठून दिसत होती. काहींना आयुष्याने कष्ट दिले होते. तरीही हे लोक आयुष्यात जमेल तसा आनंद शोधत होते. पैसा आणि आनंद एकत्र नांदायला हवेत असं नाहीच. 


काही दिवस देवपूजेची जबाबदारी माझ्यावर पडली. पडली म्हणण्यापेक्षा मी आनंदाने घेतली. आजीने कधी लहान असताना पूजा कशी करायची हे दाखवलं होतं. त्यातलं किती लक्षात आहे हे माहित नाही. आता स्वतःच्या समजुतीनुसार पूजा करतो. 
बंबाच्या गरमागरम पाण्याने आंघोळीस मजा आली. आंघोळ संपवू नये असेच वाटायचे. सकाळी लवकर आंघोळ आटोपल्यावर दिवस कसा मोठा वाटतो. उत्साहाने भारून गेल्यावर क्षणनक्षण पुरेपूर चांगल्या कार्यात घालवावासा वाटतो. 

ताम्हाणात दुधसाखरेच्या नैवेद्याची वाटी, सोबत अभिषेक केलेल्या देवांना कोरडे करण्यासाठी घेतलेल कापड आणि अंगणातल्या फुलांची परडी. अंगणात जास्वंदाची तीन चार रंगांची झाड आहेत. पावसाळ्यात ती अगदी फुलांनी बहरून जातात. पावसाळ्यातील जमिनीचा ओलावा आता संपत आला आहे. त्यामुळे ह्या झाडांची फुले ओसरू लागली आहेत. आता वडील ह्या झाडांना पाणी द्यायला सुरु करतील. तर ह्या जास्वंदाची लाल, भगवी, पिवळसर फुले आणि टगर आणि अजून एक दोन झाडांची पांढरी फुले अंगणात सकाळी फुलतात. त्यांनी परडी तशी भरते. मग ताम्हाण, फुलांनी भरलेली परडी घेऊन पूजेला लागायचं. वर म्हटल्याप्रमाणे मी केलेली पूजा शास्त्रोक्त नसते. पण भावना महत्वाची! आजीने बऱ्याच देवांच्या मूर्ती देव्हाऱ्यात मांडल्या होत्या. काळानुसार थोडा त्यात बदल झाला पण बहुतांशी ठेवण तशीच आहे. ह्या सर्व देवांना क्रमाक्रमाने ताम्हाणात घ्यायचं, त्यांना अभिषेक घालायचा, कपड्याने (ह्याला एक चांगला शब्द आहे जो आता आठवत नाही) त्यांना कोरडं करायचं आणि मग त्यांच्या जागी पुन्हा त्यांची मांडणी करायची. मग सहाणेवर चंदन घासून त्यांना गंध लावायचा, कुंकू लावायचं. दुध साखरेचा नेवैद्य दाखवायचा. देवाला दिवा, अगरबत्ती लावायचं. मग तांब्यातल उरलेलं पाणी मागच्या दारी असलेल्या तुळशीला घालायचं. ते जास्तच उरलं असेल तर मग विहिरीत सोडून द्यायचं.  पूजा करत असताना खरं तर विशिष्ट स्तोत्र वगैरे म्हणायला हवं. माझी मर्यादा मारुतीस्तोत्र, गणपतीस्तोत्रच्या पलीकडे जात नसल्याने आलटून पालटून त्यांच्या सहाय्याने पूजा आटोपायची. शाळेत असताना पारनाक्यावरील कॉंग्रेस भवनात किंवा अजून एका हॉलवर सार्वजनिक गणपतीच्या वेळी पठण स्पर्धा होत. त्यावेळी मारुतीस्तोत्र पठनाची स्पर्धा असे. त्यात मला बहुदा उतेजनार्थ बक्षीस मिळे आणि दोन रुपये मिळत. त्या निमित्ताने मारुतीस्तोत्र पाठ झालं ते झालं! 

पावसाळ्यात अंगणाच्या एका कोपऱ्यात दुर्वानी बराच प्रसार केला होता. पावसाच्या पाण्यावर त्या मस्त भरारून आल्या होत्या. मोठीआई सकाळी उठून त्यातील मोजक्या देवपूजेला घेऊन जायची. जमिनीतला ओलावा संपला आणि दुर्वांची सुकलेली पानं दिसू लागली. त्या भागातली दुर्वांची मुळं मरू लागली. दोन दिवस त्यांना पाणी देऊन जगवायचा मी प्रयत्न केला. पुढे पण टिकली तर किती बरं होईल! अंगणातलं प्राजक्ताचं झाड अजून हिरवंच आहे पण बहर मात्र थोडा कमी झाला आहे.

होळीवर भाजीसाठी अनेक फेऱ्या झाल्या. बहुतेक सर्व भाजीवाल्या भाजीच्या दर्जाविषयी अगदी स्पष्ट सांगतात. ह्या मोसमातील होळीवरची भाजी अगदी मन प्रसन्न करून टाकते. मुळा, माठ, तांदूळका, लाल माठ, पालक, खापरा, लहान मेथी, मोठी मेथी - पालेभाजीचेच अनेक प्रकार! ह्या काळात अल्कोल आणि नवलकोल अशा दोन प्रकारची सुद्धा भाजी येते. थोडंस कळायला लागल्यापासून अल्कोल आणि अल्कोहोलचा काहीतरी संबंध असावा असा मला दाट संशय होता. कोथिंबीरसुद्धा मस्त दिसत होती. तिच्या हिरव्यागार रंगावर खुश होत चांगल्या दोन जुड्या घेतल्या. घरी काय होईल ह्याची पर्वा न करता! दुधी तर अगदी कोवळा मिळाला. पडवळ, वाल वांगी, फरसबी, भेंडी, पापडी, सिमला मिरची, पातीचा कांदा ह्यांनी समग्र पिशव्या काठोकाठ भरल्या. पण सफेद वेलचीची केळी, संत्र, डाळिंब, सफरचंद ह्यांना जागा तर करावीच लागली. कांदे बटाटे सुद्धा अगदी मस्त होते. ओला कांदा मस्त लाल दिसत होता. हा चांगला दिसतोय, तो पण चांगला दिसतोय असं करता करता चांगले दोन किलो झाले. पस्तीस रुपये किलोचा भाव देताना शरद पवार आठवले! कांदे बटाट्यांना स्कूटरच्या पोटात बसवले. त्या नाजूक स्कूटरवर मी आणि समग्र भाजीचे प्रतिनिधित्व घेऊन कसाबसा घरी आलो. 
दुसऱ्या एका दिवशी मासळीमार्केटला गेलो. पापलेटचे भाव अगदी आकाशाला भिडलेले होते. ३ पापलेट म्हणे २००० रुपये. त्यांनी सांगितलेल्या भावाचा थेट अर्धा भाव सांगायचा हा प्राजक्ताने सांगितलेला नियम आचरणात आणण्याचे धारिष्ट झाले नाही. पैसा उगाच खर्च नाही करायचा. मग मोर्चा कोलंबी, बोंबील आणि गोळीचं खारं ह्याच्याकडे वळवलं. गोळीचं खारं अगदी मस्त मिळालं. तिने थोडं महागच दिलं पण ताजेपणा अगदी भरभरून दिसत होता. तिला जरा चिडवायला "पण नक्की ताजं आहे ना?" असे मी पैसे देता देता शुद्ध मराठीत विचारलं. "आ, मी दररोज इथे बसे नयं? असे तिने गुश्श्यातच प्रत्त्युत्तर दिलं. मोठ्या कोलंबीचा सहाशेचा वाटा असा भाव सांगितल्यावर मी छोट्या कोलंबीकडे मोर्चा वळवला. ती कोळीण बिचारी चाळीस चाळीस असे दोन वाटे द्यायला तयार झाली. सोलून देशील का? असे मी फारशी अपेक्षा न ठेवता विचारलं. आणि ती तयार सुद्धा झाली. दहा मिनिटात तिने कोलंबी सोलून दिल्यावर मी शंभरची नोट तिच्या हाती सोपवल्यावर तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले.
वसईच्या कला क्रीडा महोत्सवाचे पंचविसावे वर्ष! तुम्ही जर मुंबईत राहणारे असाल तर नक्की ह्या प्रदर्शनाला भेट द्या! दरवर्षी २६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर ह्या कालावधीत हे प्रदर्शन भरतं. वसई विरार परिसरातील विविध शाळा नृत्य, गायन, सुगम संगीत, छायाचित्रण, क्रीडास्पर्धांत भाग घेतात. धावण्याच्या, कबड्डी, खोखोच्या, बॉक्सिंगच्या स्पर्धा होतात. रांगोळी विभाग तर अप्रतिमच! बाकी मग शरीरसौष्ठव, मिस वसई,  पर्सनॅलिटी स्पर्धा सुद्धा होतात. ह्या स्पर्धेच्या आयोजनात काम करणाऱ्या आणि कधीही व्यासपीठावर येऊ न शकलेल्या कार्यकर्त्यांना मनापासून सलाम! ह्या महोत्सवात उतेकर फिशरी ह्यांनी मस्त्य आणि पक्षीप्रदर्शनाचा जो विभाग मांडला आहे तो केवळ अप्रतिम! डोळ्याचे पारणे फेडून टाकणारा! असंच एक साधं घर असावं आणि त्यात असा एक फिश टैंक असावा. त्यातल्या त्या माशांच्या हालचालीकडे आणि त्या दगडांवरील धावणाऱ्या सूक्ष्म रेषांकडे तासंतास पाहत राहावं. मन भरून जायला इतकंस पुरेसं आहे ना! पक्षीप्रदर्शनात अगदी इवलेसे पक्षी होते. हे हिमालयातील दुर्मिळ पक्षी असावेत अशी माहिती तज्ञ प्राजक्ता ह्यांनी पुरवली. दुसऱ्या क्षणाला मी हिमालयातील ऋषी बनून गुहेत बसलो होतो आणि हे पक्षी माझ्या गुहेसमोरील आकाशाला भिडणाऱ्या सूचीपर्णी वृक्षावर विहार करीत होते. 
वसईच्या थंडीत अशा मस्त संध्याकाळी वडा पाव वगैरे खाण्याच्या आमच्या इच्छेवर आम्ही आश्चर्यकारकरित्या विजय मिळवला. मैदानाच्या एका कोपऱ्यात मांसाहारी पदार्थांचे स्टॉल लागले होते. त्यातील वाडवळ स्टॉवर जाऊन वधडी ह्या खास वसई पदार्थाची एक डिश घेतली. 
सुट्टी संपत आली होती. अगदी लहानपणापासून ज्या वातावरणात दिवस घालवले तिथेच पुन्हा जवळजवळ दोन आठवडे होतो. ऑफिससुद्धा नशिबाने शांत होते. अशाच वातावरणात कायम राहावं असा विचार अनेकदा मनात येऊनसुद्धा गेला. पण कर्तव्य बोलावत होतं. अमेरिकेतील माझ्या कंपनीच्या कार्डची जबाबदारी जणू काही मीच माझ्या खांद्यावर घेतली होती. सोमवार सकाळी कार काढली आणि बोरीवलीला परतलो. 
२०१४ खरंतर येत्या दोन तासात संपेल पण माझ्यासाठी ते रविवारी रात्रीच वसई मैदानावरून परतताना संपलं होतं. 
आपणा सर्वांना २०१५ आरोग्यपूर्ण आणि सुखासमृद्धीच जावो ही शुभेच्छा!

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...