मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, २७ सप्टेंबर, २०२५

२०२५ सप्टेंबर अमेरिका भेट


कालच आटोपलेल्या अमेरिका भेटीचा छायाचित्राधारित संक्षिप्त वृतांत !

१४-९-२०२५ सकाळी १ वाजता 

लाउंजमध्ये कंटाळा आल्यानंतर गेटवर येऊन विमानाची वाट पाहत असताना मुसळधार पाऊस सुरु होता. अशा वेळी विमानात बसताना मन थोडं साशंक असतं. 


ब्रिटिश एअरवेजचे बाकी सगळं ठीक असलं तरी त्यांच्या काही विमानांमध्ये बिझनेस क्लासमधील  आसनरचना अगदी वैतागवाणी असते. आपण समोरच्या प्रवाशाच्या अगदी चेहऱ्याकडं निरखून पाहतो की काय असं वाटावं इतके आपण जवळ असतो. जेवणं वगैरे झाली की मधली काच वर येते, तोवर समोरचा प्रवासी आणि आपण ब्रिटिश एअरवेजच्या नावानं खडे फोडत असतो. 

ब्लॉगपोस्टच्या परंपरेनुसार जेवणाचं छायाचित्र! रविवार असल्यानं चिकनवर ताव मारायला हरकत नव्हती! 


लंडन यायला साधारणतः दीड तास वगैरे बाकी असताना आपल्याला नाश्ता दिला जातो. उड्डाण केल्यानंतर जेवण देतानाच एअरहोस्टेस (बहुदा हे पुरुष असतात) आपल्याला नाश्त्यासाठी तुम्हांला उठवायचं की नाही ह्याची खातरजमा करून घेतात.  खाण्यावर थोडं नियंत्रण ठेवावं असा निर्धार केल्यानं त्यातील फक्त फळं आणि स्वीट डिश घेतली. डिशमध्ये डावीकडे वर असलेला ब्रेड आणि त्याच्या बाजूला असलेले त्याचे सवंगडी बटर, जॅम मला नेहमीच खुणावत असतात.  सुरुवातीला नाही नाही म्हणत मी मग सुरी काट्यानं त्या ब्रेडचे तुकडे करून त्याला बटर, जॅमने चोपडून त्याचा आनंद घ्यायला पाहतो. मग कोणी पाहत नाही ना ह्याची खातरजमा करून मस्तपैकी हातानं तो ब्रेड आणि चहा ह्याचा आस्वाद घेतो.  विमानात, अमेरिकेत  सर्व काही थंडच मिळतं. सवय करून घ्यावी लागते. फळ, ब्रेड, चहा वगैरे एकत्र कसा घेऊ शकतोस असा प्रश्न विचारू नकात !


लंडन विमानतळ सुर्याच्या कोवळ्या किरणांनी न्हाऊन निघालं होतं. त्यात मी ही सामील झालो. टर्मिनल तीनकडे जायला फारच कमी प्रवाशी असल्यानं बस पुर्णपणे मोकळी असल्याचा अनुभव प्रथमच मिळाला !




विमानात इतकं भरपेट खाल्ल्यावर ब्रिटिश एअरवेजच्या लाउंजमध्ये बाकी काही खाण्याची इच्छा नसली तरी ही फळांचा आस्वाद घ्यायला हवाच. खूपच नैसर्गिक गोडवा असणारी ही फळं मला मनापासून आवडतात. महत्वाची कागदपत्रे असणाऱ्या आपल्या केबिन बॅग्स लाउंजमधील आपल्या सीटवर तशाच ठेऊन ही फळं आणायला जावं की नाही हा संभ्रम मला नेहमीच असतो.  हल्ली मी ह्या बाबतीत थोडा आत्मविश्वासपुर्ण झालो आहे हे मात्र खरे !





फिलाडेल्फिया इथं जाणाऱ्या विमानात खिडकीचे आसन मिळालं. शॅम्पेन हवं की संत्रारस ह्या प्रश्नात जिंकलेला संत्रारस आणि पाण्याची बाटली !


विमान जसजसं धावपट्टीकडे जायला लागलं तसं जगभरातील विविध खंडातील त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला आणि अर्थातच मला दर्शन दिलं. 










लंडन इतकं व्यस्त विमानतळ आहे की धावपट्टीवर येण्यासाठी अनेक विमानं एकामागे एक अशी रांगेत उभी असतातच पण अजून काही विमानं दुसऱ्या दिशेनं सुद्धा धावपट्टीवर प्रवेश करण्यासाठी सज्ज असतात. अशा वेळी बहुदा वैमानिक एकमेकाला नजरेनंच पहले आप वगैरे खुणावत असावेत असा मला दाट संशय आहे. 

ह्या स्थितीत पाच मिनिटांपूर्वी आपल्या बाजुला उभं असणारं विमान आकाशात झेपावतानाचा क्षण आपल्याला डोळ्यात साठवता येतो. 


आकाशातुन दिसणारं लंडन शहराचं मनोहर दृश्य मला नेहमीच मोहात पाडते. 




पुन्हा एकदा भोजनाची तयारी! माझा आवडता साल्मन मासा! खूपच चविष्ट होता हा !





अमेरिका जवळ आल्यावर पुन्हा एकदा फळं आणि काहीसा अगम्य पदार्थ !


इतक्या आलिशान विमानातील हा कप्पा काम करत नव्हता. त्यात पारपत्र ठेवून मी आरामात झोपलो होतो. मग तो उघडेनासा झाला म्हणून मी काही वेळ चिंतेत पडलो होतो. हा प्रकार दुसऱ्या वेळा घडल्यानंतर मात्र मी योग्य काळजी घेतली ! थोड्या वेळानं माझ्या समोरच्या सीटवरील प्रवाशास सुद्धा हाच अनुभव आल्याचं तो एअरहोस्टेसला सांगत होता ते ऐकून मी मिश्किलपणे गालातल्या गालात हसलो !



स्थानिक वेळेनुसार बारा वाजून पन्नास वाजता विमान फिलाडेल्फिया विमानतळावर उतरलं. सगळं काही अगदी झटपट आटोपून सव्वादोनच्या आसपास मी माझ्या खोलीत प्रवेश केला. 

हॉटेलच्या परिसराच्या बाजूलाच संगम नावाचं भारतीय उपहारगृह सुरु झालं आहे. तिथं सहकाऱ्यांसोबत रात्रीचे जेवण केलं.   



परंपरेनुसार ह्या भेटीतही माझा भयंकर जेट लॅग ह्या भेटीतसुद्धा माझ्या सोबतीला राहिला. पुढील दहा दिवस रात्री एक - दोन वाजता जाग येत राहिली. 

सोमवार पंधरा संप्टेंबर - सकाळी बैठकीच्या खोलीत प्रवेश करून आलेली सुर्याची कोवळी किरणं !


सोमवारी सकाळी कार्यालयातील पहिल्या दिवशी खिडकीतून दिसणारी ही झाडं ! दुपारी वाऱ्यानं ह्याची पानं अगदी वेगानं गळत राहिली. माझा २००५ सालापासूनच मित्र प्रशांत परांजपे भेटायला आला. तेव्हा त्याला मी स्कॉलरशिप परीक्षेतील प्रश्नांसारखा  प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. समोरील झाडांवर दहा लक्ष पंच्याहत्तर हजार पाचशे शहात्तर पर्ण आहेत. सध्या ही पाने मिनिटाला दहा ह्या वेगानं गळत आहेत. मला प्रश्न पूर्ण न करण्याची संधी देता तो मनापासून हसत सुटला. 



नुकत्याच झालेल्या यशस्वी implementation च्या ख़ुशीप्रित्यर्थ  Timothy's Riverfront Grill - Wilmington, DE इथं सहकाऱ्यांसोबत आम्ही भोजन केलं. तिथून दिसणारं नदीचं दृश्य !




गुरुवारी कंपनीत आमच्या मोठ्या ग्रुपची सहल होती. तिथं विविध खेळ (क्रिकेट, बास्केटबॉल) आयोजित करण्यात आले होते. भारतीय जेवण सुद्धा होते. त्या सहलीचा आनंद घेऊन हॉटेलवर परतल्यावर आम्ही हॉटेलच्या मागे असणाऱ्या nature trail वर गेलो.  अत्यंत दाट झाडीनं व्याप्त हा परिसर होता !



शुक्रवारी रात्री एका सहकाऱ्याने त्याच्या घरी आम्हां सर्वांना भोजनासाठी बोलावलं होतं. तिथं गाणं, टेबलटेनिस वगैरेचा आनंद आम्ही घेतला. 


शनिवारी सकाळी प्रसन्न मुद्रेतील आदित्य ! शनिवार सकाळ अमिश लोकांच्या वसाहतीवरील लेख पूर्ण करण्यात व्यतित केली. 


दुपारी माझा बालवाडीपासूनचा मित्र अजय हटकर भेटायला आला. माझ्या प्रत्येक भेटीत तो बहुदा येतोच ! त्याच्या सोबत मी आमची वर्गमैत्रीण नंदा सूर्यवंशी हिच्याकडे गेलो. तिथं खूप गप्पा आणि मस्त अशा मिसळपाव, इडलीचा आनंद घेतला. त्या रस्त्यावरील एक मनोहारी दृश्य !


रविवारी हॉटेलभोवती फेरफटका मारत असताना अचानक बदकांचा एक समूह त्या तळ्यात उडत येऊन विसावला !


मुंबईत इतका पाऊस पडत होता म्हणून की काय इथंही पाऊस सुरु झाला होता.  सकाळी आम्ही नाश्ता घेतो तिथल्या त्या डायनींग हॉलबाहेरील जास्वदींची मनोहारी फुलं !




बावीस सप्टेंबरला आम्ही जर्सी सिटी इथल्या कार्यालयात ट्रेनने गेलो ! जाताना एमट्रेक ह्या रेल्वे कंपनीच्या सुप्रसिद्ध अशा acela ह्या वेगवान गाडीनं penn station newark इथं गेलो. येताना Northeast Regional Train ने येताना थोडा गोंधळ उडाला. मूळ गाडी ५:४४ वाजता येणार असताना अँपवर ५:४८ वाजता येणार असे सांगण्यात आलं. त्यामुळं आम्ही काहीसे बेफिकीर असताना ५:४६ वाजता गाडी आली. इंडिकेटर नाही किंवा उद्घोषणा नाही! आमची गाडी आमच्या डोळ्यासमोर निघून गेली. सुदैवानं कार्यालयात आमची बाजू मान्य करण्यात येऊन आम्हांला पुर्ण परतावा देण्यात आला. आम्ही मग उबेरने लांबवर प्रवास करून आलो. 



मंगळवारी रात्री एका सहकाऱ्याच्या घरी आम्ही नवरात्रीनिमित्त त्यानं आणि त्याच्या कुटुंबीयांनी मांडलेल्या गोलूचं मनोभावे दर्शन घेतलं. त्यांनी अत्यंत स्वादिष्ट असं इडली सांबर, खिचडी, वडे आणि खीर असे भोजन बनविले होते. 
 

नवरात्र असल्यानं सकाळचा नाश्ता आता मर्यादित पण आरोग्यपूर्ण अशा शाकाहारी पर्यायांनी युक्त होता. 


कार्यालयातील अंतिम दिवशी पुन्हा त्याच खिडकीतून फोटो काढला. दशलक्ष पानांपैकी दीड लक्ष वगैरे पानं गळाली असावीत. शरद ऋतूतील पानांचे रंग पूर्ण बहरात यायला अजून दोन तीन आठवड्यांचा अवधी होता.  


पुन्हा एकदा बॅग्स भरण्याचा सोपस्कार पार पडला! हॉटेलमध्ये मला मोठी रूम देण्यात आली होती. तिचं भाडं नेहमीच्या भाड्यापेक्षा खूपच जास्त होतं. मी ह्या मोठ्या खोलीची विनंती केली नव्हती असं सांगताच  लगेचच मला अधिकच्या भाड्याचा परतावा देण्यात आला. फिलाडेल्फिया विमानतळावरील छायाचित्रण !


सायंकाळी उड्डाण करण्याआधी विमानाच्या गवाक्षातून मावळतीच्या सूर्याचे टिपलेलं एक लोभस दृश्य !




आकाशात अत्यंत गूढ असं वातावरण होतं. करड्या रंगांच्या मेघांनी सर्व आसमंत व्यापून टाकला होता. 
 









ह्या सर्व करड्या रंगांच्या ढगात एक गूढ असं लाल रंगाचं विवर दिसत होतं. विमान त्या दिशेनं घेऊन जावं अशी वैमानिकाला विनंती करावी की काय असा मनात विचार येऊन गेला. 







नवरात्र असल्यानं शाकाहारी पर्याय तो ही अमेरिका इंग्लंड विमानात मिळेल ह्याची खात्री नव्हती. पण एअर होस्टेसने मेन कोर्समधील तिसरा पर्याय पुर्ण शाकाहारी असल्याची छातीठोकपणे खात्री दिल्यानंतर मी त्याचा आस्वाद घेतला.  तो खूपच चविष्ट असल्यानं तो खरोखरच शाकाहारी असावा की नाही ह्याविषयी मनात शंकेचे दाट ढग निर्माण झाले. 




इतक्या मनमोकळ्या छायाचित्रणामुळं एव्हाना भ्रमणध्वनीची बॅटरी तीस टक्क्यावर आल्यानं धोक्याची घंटा वाजवली गेली.  

पुन्हा एकदा लंडन आणि पुन्हा एकदा ती फ्रुट प्लेट ! ह्यावेळेस मात्र त्यांच्या साऊथ लाउंजला भेट दिली! 

उगाचच काढलेला फोटो !


पुन्हा एकदा ब्रिटिश एअरवेजची ती भयानक बैठक व्यवस्था ! ह्यावेळी मला खिडकीचे आसन असल्यानं मी चिंतामुक्त होतो. बॅटरी पंचवीस टक्क्यावर आल्यानं मर्यादित छायाचित्रण!  मी पुन्हा एकदा भ्रमणध्वनी रिचार्ज का केला नाही हा प्रश्न विचारू नकात!

मध्येच एकदा खिडकी उघडून पाहिली असता अगदी वैराण डोंगराळ भाग दिसला. लगेचच नकाशा उघडून आपण कुठं आलो आहोत ह्याची शहानिशा केली. 



काही वेळानंतर खूप दूरवर दिसलेली ढगांची रांग !


विमान वीस मिनिटं वेळेआधी मुंबईला उतरलं. इमिग्रेशन पर्यंत दीड किलोमीटर पर्यंतचे अंतर झपाट्यानं पार केलं. पहिल्या वीस बॅग्स मध्ये माझ्या दोन्ही बॅग्स आल्या. उतरल्यापासून दीड तासात घरात पाऊल टाकलं. 

दहा दिवसांत कार्यालयीन काम व्यवस्थित पार पडलं. सकाळी लवकर जात असल्यानं एकाग्रता अगदी वरच्या पातळीवर होती. अमेरिकेतील बदलत्या वातावरणाची झलक प्रवेश करताना इमिग्रेशन, कस्टमपासुनच जाणवली. इथला निसर्ग मोहवत राहिला. इथं येऊन सुद्धा केवळ भारतीय लोकांच्यातच मिसळून राहण्याची आपली मानसिकता खटकत राहिली.  बरीच कुटुंब भारतातील कुटुंबापेक्षा अधिक धार्मिक असल्याचं पुन्हा एकदा दिसलं. तिथं जन्मापासुन वाढलेली भारतीय मुलं त्यांच्याच वर्गात शिकण्यासाठी भारतातून आलेल्या मुलांशी दुजाभाव करतात हे ऐकून थक्क झालो. इथं लग्न करण्यासाठी २०० पाहुण्यांना बोलावून लग्न करण्याचा खर्च २००००० अमेरिकन डॉलर्स इतका असतो. बऱ्याच वेळा मुलं आणि पालक मिळून हा खर्च करतात.   

अमेरिकन प्रशासनानं व्हिसाच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयामुळं निर्माण झालेली अस्वस्थता बऱ्याच खोलवर पर्यंत पोहोचल्याचं जाणवत राहिलं.  सद्य परिस्थितीत आर्थिक गणितांची मोठी जुळवाजुळव करून अमेरिकेला कायम वास्तव्य करण्याच्या हेतूनं खटाटोप करणे योग्य नव्हे ह्या निष्कर्षापर्यंत मी खूप आधीच येऊन पोहोचलो आहे, त्याला ह्या भेटीत दुजोरा मिळाला. शहरातील निसर्गाला किमान धक्का देत उभारलेली टुमदार घरं, तिथल्या प्रसन्न तरीही काहीशा भावाकुल बनविणाऱ्या सायंकाळी सारं काही पुन्हा एकदा आवडलं. आपल्याला निसर्गाचा थोडाही आदर का करता येत नाही हा यक्ष प्रश्न खूपच सलत राहिला.  कदाचित आपली अमेरिकेतील संख्या मर्यादित राखणं हाच योग्य निर्णय असावा ह्या धक्कादायक निष्कर्षापर्यंत मी येऊन पोहोचलो ! रेल्वे तिकिटाचा परतावा असो की हॉटेलच्या खोलीच्या अधिकच्या भाड्याचा परतावा असो, जे काही नियमानुसार योग्य आहे ते तात्काळ करण्याची अमेरिकन माणसांची वृत्ती पुन्हा अनुभवली. सर्व काही आपल्याला भारतात बसुन सुद्धा शिकण्यासारखं !

शनिवार, २० सप्टेंबर, २०२५

अमिश जीवनपद्धती

आमचं अमेरिकेतील कार्यालय विल्मिंग्टन डेलावेर इथं आहे. तिथल्या एका सहकाऱ्याशी गप्पा मारत असताना त्याच्या तोंडून अमिश लोकांच्या वसाहतीविषयी उल्लेख ऐकला. ह्या लोकांविषयी आधी काही माहितीपट पाहिले होते. ह्या चर्चेनंतर ह्या वसाहतीला प्रत्यक्ष भेट देण्याची इच्छा निर्माण झाली. २०२३ साली जून महिन्यात ह्या वसाहतीला भेट देण्याची संधी मिळाली. त्या भेटीच्या वृतांताआधी थोडा अमिश जीवनपद्धतीचा आढावा घेणं इष्ट ठरेल. 

अमिश जीवनपद्धतीचा उगम कसा झाला ह्याचा इतिहास जाणून घेणं ही एक मनोरंजक बाब आहे.  सोळाव्या शतकात जन्मतःच  ख्रिस्त धर्माची दीक्षा देण्याच्या प्रथेच्या विरोधात सुरु झालेली चळवळ कालांतरानं चांगलीच फोफावली. ह्या पंथाची मुलभूत तत्त्वं नम्रता,  समुदायभावना,  उर्वरित (अमिश व्यतिरिक्त) जगापासून वेगळं जीवन जगणं, अहिंसा आणि साध्या जीवनसरणीला अंगीकारणे ह्यावर आधारित आहेत.  हे सर्व ऑर्डनुंग (Ordnung) नावाच्या अलिखित आचारसंहितेने मार्गदर्शित असते. थोडक्यात म्हणायला गेलं तर आधुनिकीकरणामुळं होणाऱ्या अनिष्ट परिणामांपासून आपल्या समुदायाचं संरक्षण करावं असा विचार ह्या मूलभूत तत्वांमागे / आचारसंहितेमागे  दिसतो. 

ह्या मुलभूत तत्वांकडे थोडं विस्तारानं पाहता व्यक्तीपेक्षा देव आणि समाजाला प्राधान्य देणे,  गैर- अमिश समाजापासून जाणीवपूर्वक वेगळं राहणं,  वादविवाद / संघर्षांचे निराकरण केवळ अहिंसेच्या मार्गाने करणे, साधे वस्त्र, ग्रामीण जीवन, आणि आधुनिक समाजातील गुंतागुंतीचे किंवा चैनीचे घटक टाळणे ह्या बाबी समोर येतात.

ऑर्डनुंग ही एक अलिखित आचारसंहिता दैनंदिन जीवनातील अनेक पैलूंना दिशा देत  समाजातील मूल्ये व परंपरांचे पालन सुनिश्चित करते. श्रद्धेची कबुली दिल्यानंतरच प्रौढ व्यक्तींना बाप्तिस्मा दिला जातो, त्यानंतर त्यांचा चर्च समुदायात औपचारिक प्रवेश होतो. तंत्रज्ञानाचा स्वीकार हा केवळ समुदाय आणि परंपरेवर होणाऱ्या परिणामांच्या आधारे होतो. घरातील फोन, टीव्ही, इंटरनेट, आणि गाड्या नाकारल्या जातात. त्याऐवजी घोडागाडी (buggies) वापरणे पसंत केले जाते. सरकारी योजना किंवा सामाजिक सुरक्षा यावर अवलंबून राहण्याऐवजी अमिश समाज आपले संसाधन एकत्र करून गरजूंना मदत करतो. यात त्यांचा देवावरील विश्वास आणि सामुदायिक जबाबदारी स्पष्ट होते.  औपचारिक शिक्षण साधारणतः आठवीपर्यंतच दिले जाते. त्यानंतरचे शिक्षण प्रामुख्याने प्रौढ जीवनासाठी आवश्यक कौशल्ये, कुटुंबाचा व्यवसाय आणि समाजातील व्यवहारांवर केंद्रित असते.  

विल्मिंग्टनपासून कारने साधारणतः सव्वा तासाच्या अंतरावर पेनसिल्व्हेनिया राज्यात ही अमिश लोकांची वसाहत आहे.  प्रवासात दुतर्फा पसरलेल्या हिरव्यागार वृक्षांच्या नजाऱ्यानं मन अगदी प्रसन्न झालं.  

अमिश लोकांच्या वसाहतीचे एक वैशिष्ट्य म्हणजे खूप दूरवरून दिसणारे कॉर्न silos. मक्याच्या पिकाचं भरघोस उत्पादन करून त्यांच्या साठवणीसाठी हे उभारण्यात येतात. स्थानिक शेतीत उत्पादित पिकांचा वापर करावा हे ह्यामागील तत्त्व !


अमिश गावात आपले स्वागत आहे हे सांगणारा हा बोर्ड ! 


इथं आम्ही अमिश गावात फेरफटका मारण्यासाठी प्रत्येकी सव्वीस डॉलर्सचे बसचे तिकीट घेतले. बस सुटायला काही वेळ असल्यानं आम्ही पार्कात फेरफटका मारण्याची संधी दवडली नाही. तिथं मेंढा, मोर, वळू, बदके असे विविध प्राणी गुण्यागोविंदाने नांदत होते. अर्थातच बदके सोडून बाकी सर्वांना बंदिस्त करून ठेवलं होतं. 



समाधिस्थ अवस्थेतील वळू ! 


अनेक शतके अमिश लोक दळणवळण माध्यम म्हणून जिचा वापर करतात ती ही बग्गी !


अमिश लोकांनी बनविलेली परंपरागत आयुधं इथं व्यवस्थित मांडून ठेवली होती. 




अमिश वसाहतीतील एकवर्गीय शाळेची प्रतिकृती इथं बनविण्यात आली होती. 



नियोजित वेळी आम्ही बसमध्ये प्रवेश केला.  बसचे चालक एक वयस्क अमेरिकन गृहस्थ होते. त्यांचा आवाज अगदी खणखणीत होता.  त्यांनी आम्हांला अमिश लोकांविषयी खूप छान माहिती दिली. ही माहिती मी आता इथं नमूद करतोय.  

पुढील दीड तासभर आपण अमिश लोकांच्या वसाहतीचा फेरफटका मारणार आहोत. अमिश लोक त्यांच्या चेहऱ्याचे फोटो घेऊ देणे पाप समजतात. त्यामुळं तुमच्यापैकी कोणी जर त्यांचे फोटो घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हांला तात्काळ बसमधून उतरविले जाईल.  इथं एक तर तुम्ही अमिश असता किंवा इंग्लिश ! अमिश घरात फोन नसतो. काही काळापूर्वी त्यांनी आणीबाणीच्या परिस्थितीत फोन असावा अशी विनंती केली. त्यामुळं त्यांना काही घरांबाहेर फोन बसविण्यास परवानगी देण्यात आली. इंग्लिश माणसाचं घर अमिश माणसानं विकत घेतलं की त्याला घरातील विद्युतपुरवठा खंडित करावा लागतो. त्यासाठी त्याच्याकडं एक वर्षाची मुदत असते. 

अमिश लोक शेतीसाठी आधुनिक उपकरणांचा वापर करत नाहीत. तंबाखू हे मुख्य पिकांपैकी एक पीक आहे. ऍलोपॅथी उपचारप्रणाली वापरण्यावर त्यांचा भर नसतो. प्रामुख्यानं ते होमिओपॅथीचा वापर करतात. परंतु अगदीच आणीबाणी उद्भवली तर ते मोठ्या इस्पितळातसुद्धा जातात. बहुतांश वेळा ते बिलाचा भरणा रोकड पैशानं करतात. आणि ते थेट पैसे देत असल्यानं त्यांची घासाघीस करण्याची क्षमता अगदी चांगली असते. 

अमिश विवाहसंस्था ! 

अमिश मुलगा मुलीकडे  आपल्या प्रेमाची थेट वाच्यता करू शकत नाही. त्याआधी तिच्या आईवडिलांची परवानगी घेणं आवश्यक असते. मुलीला लग्नाच्या मागणीला नकार देण्याचा अधिकार असतो. अमिश ज्ञातीत घटस्फोटाला परवानगी नाही. लग्नाआधी पाच वर्षांपर्यंत मुलगा - मुलगी एकत्र राहू शकतात. ह्या काळात त्यांनी एकमेकाला चांगल्या प्रकारे समजून घेणं अपेक्षित असते. ह्या दोघांनी एकदा लग्नाला संमती दर्शविली की बिशपच्या परवानगीने लग्नाची घोषणा होते. नोव्हेंबर ते डिसेंबर ह्या कालावधीत हिवाळ्यामुळं शेतीची कामे थंडावली असतात. त्यामुळं ह्याच काळात बहुतांश अमिश लग्ने होतात. लग्ने मंगळवार किंवा गुरुवारी होतात. अमिश स्त्रियाच लग्नातील जेवण बनवितात. लग्नाला साधारणतः ३०० ते ५०० लोक उपस्थित राहतात. दुपारचे भोजन अगदी साग्रसंगीत असते. त्यानंतर नवविवाहित दांपत्याला आलेल्या भेटी उघडण्याचा कार्यक्रम असतो. सायंकाळी मोजके लोक भोजनासाठी असतात. दुपारच्या मेजवानीतील उरलेले पदार्थ ह्या भोजनात समाविष्ट असतात. 

अमिश शाळेत स्त्रिया शिक्षिकेची भुमिका बजावतात. शाळा फक्त आठवीपर्यंत असते. शाळेत फक्त गणित आणि इतिहास हे विषय शिकविले जातात. महिला शिक्षिकेचा विवाह झाल्यानंतर ती शाळेत शिकवू शकत नाही. 

हा माहितीजालावरून घेतलेला फोटो!  ह्या बग्गीची किंमत चौदा हजार अमेरिकन डॉलर्सपर्यंत जाऊ शकते. बग्गीला टायर लावण्यास अजून बिशपमार्फत परवानगी देण्यात आली नाही.  अमिश लोकांच्या वसाहतीतून मार्गक्रमण करताना जर तुमच्या पुढं बग्गी असेल तर तिला मागं टाकून पुढं जाणं उचित नाही. 


अमिश शेती 


अमिश माणसाने केलेली शेती आणि इंग्लिश माणसानं केलेली शेती ह्यात मूलभूत फरक असतात. अमिश माणूस मक्याच्या दोन भागांमध्ये गवताची लागवड करतो. गवताने जमिनीची धूप थांबावी असा उद्देश ! अमिश माणूस जमिनीच्या उंचसखल भागानुसार पिकांची लागवड करतो. प्रत्येक अमिश कुटुंबाकडं सरासरी ३० ते ६० एकर जमीन असते. बस ड्रायव्हरने एक शेत दाखविले. त्या शेतकऱ्याचे शेत ह्या सरासरीला अपवाद होतं. त्याच्याकडं १०० एकर जमीन आहे. त्याची तीन मुले त्याला शेतीच्या कामात मदत करतात. 



अमिश लोक जमिनीचा पोत सुधारण्यासाठी पीक फेरपालट, नैसर्गिक खतांचा वापर, पारंपरिक बियाणे इत्यादी पद्धतींचा वापर करतात. इंग्रजीमध्ये heirloom seeds ह्या नावानं ओळखली जाणारी ही बियाणे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केली जातात, अनेक वर्षांपासून जतन करून ठेवलेली असतात. ती विशिष्ट भागात किंवा कुटुंबात वाढलेली असतात आणि त्यांच्या चव, रंग आणि त्या ठिकाणच्या हवामानाला जुळवून घेण्याची क्षमता ह्या खास गुणधर्मांसाठी ओळखली जातात.  ही बियाणे हायब्रीड नसल्यानं त्यांच्यापासून तयार होणाऱ्या वनस्पती पुन्हा त्याच प्रकारची फळे किंवा फुले देतात. ह्या बियाणांद्वारे निर्माण झालेल्या उत्पादनामध्ये औद्योगिक शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या बियाणांद्वारे मिळणाऱ्या फळ, पीक ह्यापेक्षा जास्त चव असते. 

अमिश स्त्रिया रविवार व्यतिरिक्त बाकीचे सर्व दिवस कपडे धुतात. पुलीचा वापर करून कपडे उंचावर वाळविण्यासाठी दोरीवर टांगलेले असतात. प्राण्यांनी ते खराब करू नयेत हा त्यामागील हेतू ! एकंदरीत अमिश पुरुष घरकामात मदत करत असल्याचा उल्लेख आढळला नाही. 



आता आम्ही अमिश लोकांच्या उत्पादनांची विक्री करणाऱ्या दुकानाकडं आमचा मोर्चा वळविला. मोठ्या आकाराच्या टोमॅटो आणि टरबुजांनी आमचं लक्ष वेधून घेतलं. 



पुढील दालनात अनेक परंपरागत, नक्षीकाम केलेल्या आणि जीवनावश्यक वस्तू विक्रीस ठेवल्या होत्या. 






परतीच्या मार्गावर असताना मनात विचारांचं वादळ निर्माण झालं होतं. ह्या भेटीनं मनात अनेक प्रश्न निर्माण केले होते. काळानुसार अनिवार्य मानला जाणारा मनुष्यजातीच्या उत्क्रांतीचा प्रवास सर्वांनीच स्वीकारला आहे ह्या समजुतीला मोठा धक्का देणारी ही भेट आणि अमिश समाजाची जीवनसरणी ! त्यांची तत्त्वं, आचारसंहिता आदर्शवादाकडं झुकणारी! अजुनही बऱ्यापैकी त्यांचं पालन करण्यात हा समाज यशस्वी ठरला आहे. पण उर्वरित जगात आलेली आधुनिकतेची त्सुनामी लाट अत्यल्प प्रमाणात जरी ह्या समाजातील पुढील पिढीपर्यंत पोहोचली तर हा समाज त्याला थोपवू शकेल का हा यक्षप्रश्न ! 

रविवार, ७ सप्टेंबर, २०२५

शॉर्ट्स गाथा

बालपणी झालेले संस्कार, शिकवणुक सहजासहजी विसरले जात नाहीत.  त्यांच्यासोबत तात्कालीन चालीरिती पण मनात रुजल्या गेल्या आहेत. काळानुसार चालीरिती बदलत राहतात पण बदलत्या काळातील वस्त्र परिधान करण्याच्या आधुनिक चालीरिती मनात काही अगंभीर विचार निर्माण करतात. 

लहानपणी फक्त लहान मुलंच शॉर्ट्स (Shorts - आखूड विजार - हा मराठी ब्लॉग असल्यानं मराठी शब्द एकदा का होईना वापरतोय!) घालून घराबाहेर पडत, शाळेत जात वगैरे वगैरे! मोठी माणसं मात्र फुल पँट (लांबी विजार) परिधान करूनच बाहेर पडत. त्याकाळातील माझ्यासारख्या "जमेल तेव्हा कर्मठ" माणसानं हल्ली माणसं कशी धोतर, टोपी वगैरे परिधान न करता बाहेर पडतात असा लेख लिहिला असावा. असो, त्यावेळची लहान मुलं मोठी झाली पण त्यांची शॉर्ट्स प्रति निष्ठा मात्र कायम राहिली. हे समजण्यासारखं होतं पण ज्या व्यक्ती आमच्या लहानपणी तरुण होत्या आणि तात्कालीन चालीरितीप्रमाणे फुल पँट परिधान करत असत; त्यांतील बऱ्याच जणांनी आपली निष्ठा शॉर्ट्सला बहाल केल्याचं हल्ली वारंवार आढळून येत आहे. 

माझ्या एका मित्राशी बोलताना हा विषय निघाला. त्याचंही हेच निरीक्षण होतं. परंतु शॉर्ट्स परिधान करून सार्वजनिक जीवनात वावर करणाऱ्या आपल्या समवयस्क आणि  ज्येष्ठ नागरिकांसाठी 'शॉर्ट्स आचारसंहिता' लागू करावी असे त्याचं म्हणणं पडलं. 'शॉर्ट्स आचारसंहिता' हा शब्द ऐकताच माझ्या भुवया माझ्या नकळत उंचावल्या गेल्या. ते पाहून त्यानं आपलं म्हणणं स्पष्ट करण्यासाठी बाह्या सरसावल्या.  त्याच्या म्हणण्यातील काही ठळक मुद्दे !

१.  सार्वजनिक जीवनात शॉर्ट्स परिधान करण्याची पद्धती पाश्चिमात्य देशांतून आपल्याकडं आली. ह्या पद्धतीचा स्वीकार करणाऱ्या व्यक्तीनं शारीरिक तंदुरुस्तीची एक विशिष्ट पातळी गाठणं आवश्यक आहे. मी त्याच्या ह्या मुद्द्याचा तात्काळ विरोध केला.  शारीरिक तंदुरुस्तीची एक विशिष्ट पातळी गाठण्यासाठीच ह्यातील बरेच सज्जन बाहेर पडतात हा मुद्दा तुझ्या लक्षात कसा येत नाही ह्यावर मी आश्चर्य व्यक्त केलं. तरीही ही विशिष्ट पातळी म्हणजे तुला काय अभिप्रेत आहे असा रोखठोक प्रश्न मी त्याला विचारला. त्यावर त्याच्याकडं उत्तर तयार होतं. तो म्हणाला, एक विजेचा दिवा उजव्या किंवा डाव्या बाजूला पेटवून आपण काटकोनातील समोरच्या दिशेकडं तोंड करून उभं राहिलं असता दिव्याच्या समोरील भिंतीवर पडलेल्या आपल्या छायेत वर्तुळाचा कंस, अर्धाकृती व्यास वगैरे दिसता कामा नये. आपलं पोट वगैरे सुटलेलं असता कामा नये हे त्याला म्हणायचं आहे हे कळायला मला थोडा वेळ लागला. 

२. घरी परिधान करायच्या शॉर्ट्स (ह्याला मराठी भाषेतील सर्वमान्य असणारा शब्द मी महत्प्रयासानं टाळत आहे) सार्वजनिक ठिकाणी परिधान करण्याचा आत्मविश्वास जरी तुमच्याकडे असला तरी सार्वजनिक जीवनात तुम्हांला वावरताना पाहणाऱ्या लोकांच्या अनुभवाविषयी तुम्ही थोडीतरी अनुकंपा बाळगावी.  त्याचा हा मुद्दा ऐकून मला सकाळी बाजारात दृष्टीस पडणाऱ्या  अनेक व्यक्तींची आठवण झाली. त्याचा हा मुद्दा मी मनापासून मान्य केला.  शॉर्ट्सचा थ्री फोर्थ हा राजमान्य प्रकार परिधान करणे उचित राहील. ह्यात आपल्या जवळील असलेल्या तथाकथित शॉर्ट्स ला पाऊण मापावर आणण्याचा दीडशहाणपणा करू नये. 

३. शॉर्ट्स परिधान करायचंच  झाल्यास वर साजेसा असा टी शर्ट घालणे योग्य राहील. त्याला शॉर्ट्स मध्ये खोचणं उचित नाही. टी शर्ट आणि शॉर्ट्स ह्यांच्यात रंगसंगती असावी.  "हे जरा थोडं अति होतंय असं नाही का वाटत तुला ? " मी न राहवुन माझ्या मनातील बोललो. 

मित्रानं गंभीर चेहरा केला. तो बोलता झाला, "आदित्य, एक समाज आपला अतिआत्मविश्वास सध्या ओसंडून चालला आहे. पण सार्वजनिक ठिकाणी वावरताना काही मार्गदर्शक तत्वांचे पालन करणं आवश्यक आहे. आपण आपल्या देशात आहोत ना, मग आम्हांला हवं तसं वागलं तर काय हरकत आहे असा विचार करणं चुकीचं आहे, कारण हल्ली आपल्यापैकी बरेच परदेशी जातात आणि तिथं आपण इथल्या काही सवयी घेऊन जातो. त्यामुळं एक समाज म्हणून आपल्या प्रतिमेला तडा जाऊ शकतो"

विषयाला फारच गंभीर वळण लागलं होतं. मी वातावरण थोडं हलकं करण्यासाठी त्याला विचारलं, "मग काय सार्वजनिक जीवनात शॉर्ट्स परिधान करण्यासाठी परवाना वगैरे लागू करण्याचा विचार आहे का तुझा ?" तो ही लगेचच हसला. म्हणाला सार्वजनिक जीवनात शॉर्ट्स घालून वावरताना फोटो असल्यास पाठवून दे, मग कळवतो. 

पोस्टच्या सुरुवातीला दिलेला फोटो त्याला पाठवला आहे. अजून काही त्याचं उत्तर आलं नाही ! बघुयात. बाकी सर्व पोस्टभर काही वाचकांना शॉर्ट्स ऐवजी शॉटस (मद्याचा इवलासा घोट) ची सतत आठवण येत राहिल्यास अपेक्षाभंगाबद्दल क्षमस्व ! 

रविवार, ३१ ऑगस्ट, २०२५

भारताचे पितामह - दादाभाई नवरोजी


मराठी शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकांत ज्यांच्याशी आपला परिचय झाला, ज्यांच्या आदरणीय व्यक्तिमत्त्वांनी आपल्याला भारावून सोडलं अशा व्यक्ती बऱ्याच वर्षांनी अचानक वर्तमानपत्रे, मासिके ह्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सामोऱ्या येतात तेव्हा मन त्या आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलायला लागतं. भावनामय अवस्थेतून बाहेर आल्यानंतर त्या लेखातील सखोल माहिती वाचल्यानंतर अशा व्यक्तींच्या ज्ञानाविषयी प्रचंड आदराची भावना निर्माण होते. अशीच भावना भारतीय राष्ट्रवादाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादाभाई नवरोजी ह्यांच्याविषयी आज त्यांच्या जन्म द्विशताब्दीनिमित्त लोकसत्तेने प्रसिद्ध केलेल्या दोन लेखांमुळं निर्माण झाली. एका ऋषितुल्य व्यक्तिमत्वाविषयी निरंजन राजाध्यक्ष आणि गोविंद तळवळकर ह्या अभ्यासू लेखकांनी लिहिलेल्या लेखांतील काही महत्वाचे मुद्दे माझ्या मतांसहित इथं उद्धृत करत आहे. गोविंद तळवळकर ह्यांच्या व्यासंगाविषयी बोलण्याचं धारिष्टय मी करू नये. 

आजच्या काळात अर्थशास्त्रज्ञांची एक मोठी फौज दिमतीला घेऊन एखादी वित्तीयसंस्था देशाचं आर्थिक उत्पादन मोजण्याचं काम करते. दादाभाईंनी केवळ कागदोपत्री असलेल्या माहितीच्या आधारे एकट्यानं हा भार उचलला. शेतकऱ्यांकडून घेतलेल्या कर्जाच्या माहितीच्या आधारे भारताच्या कृषी उत्पादनाचा अंदाज बांधून त्यांनी त्याला खाणकाम, वन उत्पादन आणि इतर क्षेत्रातील उत्पन्नाची जोड दिली. त्यांच्या अंदाजानुसार त्याकाळी असलेलं भारताचं ३४० कोटी वार्षिक उत्पन्न (दरडोई केवळ २० रुपये) आपल्याला तत्कालीन भीषण दारिद्याची जाणीव करून देते. अत्यंत धक्कादायक मुद्दा म्हणजे त्याकाळी तुरुंगात असणाऱ्या कैद्यांचे पोषण हे बाहेर असलेल्या मुक्त नागरिकांपेक्षा चांगल्या प्रकारे होत असे. 

कालांतरानं दादाभाई नवरोजी ह्यांनी जी 'ड्रेन थिअरी' मांडली त्यात भारतातून निर्माण होणारी संपत्ती विविध मार्गानं कशी देशाबाहेर नेली जात आहे ह्याच्या विविध मार्गांचा उल्लेख करण्यात आला होता. ब्रिटिश प्रशासकांचं प्रचंड पगार, त्यांना मिळत असणारं सेवानिवृत्ती वेतन, भारतात मिळणाऱ्या फायद्याचं ब्रिटनमध्ये हस्तांतरण इत्यादी मुख्य मुद्यांचा समावेश होतो. अर्थात त्यांच्या ह्या ड्रेन थिअरी मधील अनेक गृहीतकांविषयी काही प्रश्न उपस्थित निर्माण करण्यात आले.  पण आपल्या लेखाच्या शेवटी राजाध्यक्ष ह्यांनी दोन अत्यंत महत्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहेत. पहिला मुद्दा म्हणजे कोणत्याही देशात राजकीय स्वातंत्र्य, समाजसुधारणा ह्यांच्या जोडीला आर्थिक प्रगती महत्वाची आहे ह्याची जाणीव दादाभाई ह्यांनी त्याकाळी निर्माण केली. दुसरा मुद्दा म्हणजे देशप्रेम दाखविण्यासाठी फक्त आंदोलने करण्याऐवजी माहिती आणि आकडेवारी वापरून लोकांचे प्रबोधन करण्याचा मार्ग त्यांनी निवडला. हे दोन्ही धडे आजच्या भारतासाठी उपयुक्त आहेत असे सांगून राजाध्यक्ष ह्यांनी आपल्या लेखाची सांगता केली आहे. 

पहिल्या मुद्यात उल्लेखलेल्या राजकीय स्वातंत्र्य, समाजसुधारणा आणि आर्थिक प्रगती ह्या तीन घटकांचा आजच्या काळात विचार करता काही मुद्दे डोळ्यासमोर येतात. राजकीय स्वातंत्र्याचा आजच्या काळात अभिप्रेत असणारा सखोल अर्थ कोणता? शहरात समाजसुधारणेच्या इच्छित ध्येयांपेक्षा आपण नको तितके पुढे आलो आहोत पण खेड्यांमध्ये मात्र अजूनही बरंच काही गाठायचं आहे आणि आर्थिक प्रगतीची नक्की व्याख्या काय ? पर्यावरणाच्या होणाऱ्या हानीकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करू शकतो का? 

दादाभाई नवरोजी ह्यांना बहुदा आपण राजकारणी असे संबोधू शकणार नाही. तरीही एका राष्ट्रीय नेत्यानं कशी अभ्यासू वृत्ती दाखवायला हवी त्याचे ते एक उत्तम उदाहरण होते. सखोल अभ्यास करणाऱ्या नेत्यांचे प्रमाण आजच्या काळात नक्कीच वाढायला हवं असा विचार मनात आल्यावाचून राहत नाही. 

गोविंद तळवळकरांचा लेख हा त्यांच्या पुस्तकातील संपादित अंश आहे. त्यात काही समान मुद्दे आहेत. पण भारतातील गरिबीसाठी केवळ इंग्रजांना जबाबदार धरणं कितपत योग्य आहे ह्याचा योग्य ऊहापोह ह्या लेखात करण्यात आला आहे. इंग्रजांनी अधिक जकातीद्वारे भारतातील वस्त्रउद्योग, जहाजबांधणी उद्योग ह्यांना कसे पद्धतशीर मार्गानं अधोगतीस लावलं ह्याची सविस्तर माहिती इथं देण्यात आली आहे. दादाभाई नवरोजी ह्यांनी आपल्या पन्नास वर्षाच्या सार्वजनिक जीवनातील बराच काळ इंग्लंडमध्ये व्यतित केला. त्यामुळं व्यापार आणि उद्योग ह्यांचं महत्त्व त्यांना पटलं आणि इंग्लंडमधील आधुनिक विचारांची ओळख त्यांना मिळाली. त्याच्या प्रभावामुळं त्यांनी व्यापार आणि उद्योगाला प्रोत्साहन देण्याचा दृष्टिकोन १८६० सालापासूनच अवलंबिला. 'द्रष्टा' नेता म्हणतात त्याचं हे उत्तम उदाहरण! 

लेखाच्या पुढील भागात दादाभाई, डिग्बी,  कर्झन, के. टी. शहा ह्या तज्ञांनी मांडलेल्या एकंदरीत राष्ट्रीय उत्पन्न आणि त्या अनुषंगानं काढण्यात येणारं दरडोई उत्पन्न ह्या आकड्यात कसा फरक होता आणि त्यामागील कारणं ह्यांचा ऊहापोह करण्यात आला आहे. दीडशे वर्षापुर्वी सुद्धा प्रगत विचारसरणी  आणि सखोल अभ्यासू वृत्ती ह्यांची सांगड घालणारे नेते आपल्याला लाभले होते हे आपलं सुदैव ! 'भारतीय आर्थिक राष्ट्रवादाची गंगा ह्या उदात्त ध्येयानं प्रेरित झालेल्या महर्षीनं परिवर्तित केली'  विचाराला प्रवृत्त करणाऱ्या वाक्यानं ह्या लेखाचा शेवट होतो. 

ह्या दोन लेखांनी माझ्यावर आज बराच सकारात्मक प्रभाव पाडला आहे. प्रतिकुल  परिस्थितीत (आजच्या काळाच्या तुलनेत ज्ञानसंपादनास करावे लागणारे अथक परिश्रम) दादाभाई ह्यांनी सखोल अभ्यासाद्वारे ब्रिटिश साम्राज्यशाहीशी अधिकृत मार्गानं आर्थिक राष्ट्रवादासाठी कसा लढा दिला ह्याचं वर्णन मला उत्साहित करून गेलं.  मोठं ध्येय प्राप्त करायचं असेल तर कठोर परिश्रमाला पर्याय नाही हे आपल्याला जरी माहीत असलं तरी दैनंदिन जीवनाच्या रगड्यात ही शिकवणूक कुठंतरी मनाच्या कोपऱ्यात ढकलली जाते. असे लेख ह्या शिकवणुकीला पुन्हा एकदा आपल्या मुख्य विचारांच्या प्रवाहात घेऊन येतात. सद्यपरिस्थितीत काहीसं निराश झालेलं मन पुन्हा एकदा अथक परिश्रमाची कास धरण्यास सज्ज होतं. धन्यवाद साप्ताहिक सुट्टीच्या दिवसातील पुरवण्या !  

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...