मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, १ मार्च, २०२५

२०२५ अमेरिका भेट वृत्तांत


या वर्षीची पहिली अमेरिकावारी दिनांक १७ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीमध्ये पार पडली. अमेरिका भेटीचा हा वृत्तांत!  ह्या वृत्तांतामध्ये प्रामुख्यानं आपणांस  विमानातून आणि हॉटेलच्या खोलीतून टिपलेली छायाचित्रं  आढळतील. कार्यालयीन बाबींचा थेट संदर्भ न देण्याचं धोरण मी कटाक्षानं पाळत असल्यानं तिथं घडणाऱ्या घटनांचा उल्लेख करण्याचं मी टाळतो. 

ह्या पोस्टच्या पुढील भागात छायाचित्रांच्या संदर्भानं वर्णन येईल. त्याआधी भेटीचा आढावा घेणारे काही प्रमुख मुद्दे! ह्या भेटीत विल्मिंग्टन (डेलावेर), जर्सी सिटी आणि प्लेनो, फ्रिस्को (टेक्सास) ह्या ठिकाणांच्या कार्यालयांना भेटी दिल्या. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या,  टीम, सहकाऱ्यांच्या  भेटी, वर्षभराचे धोरण आखण्यासाठी आयोजिलेल्या बैठकी हे ह्या भेटीचे मुख्य हेतू होते.  उणे नऊ (थंड वाऱ्यांमुळं उणे सोळा वाटणारं) तापमान, दोन मिनिटं सुद्धा रस्त्यावर चालणं अशक्य करणारे जर्सी सिटीमधील बोचरे वारे,  डॅलसला जाताना वेळीच लक्षात आलेला विमानाचा पंक्चर टायर आणि त्यामुळं निर्माण झालेलं नाट्य इत्यादी  ह्या भेटीतील संस्मरणीय घटना. 

दिनांक १७ फेब्रुवारी 

सकाळी दोन वाजता मुंबईहून उड्डाण करणारे ब्रिटिश एअरवेजचे विमान माझं आवडतं!  रात्री दहा वाजता घरातून आपण बाहेर पडलं की घरच्यांना वेळच्या वेळी झोपता येणं, मुंबई ते लंडन आणि लंडन ते फिलाडेल्फिया हे तुलनेनं समान अंतराचे टप्पे, लंडनला असणारा अगदी कमी नाही किंवा अगदी दीर्घ नाही असा तीन तासांचा थांबा आणि बडेजाव नसलेलं पण व्यवस्थित असं जेवण हे माझ्या आवडीमागची मुख्य कारणं.   


मुंबईहून विमानाने अडीच वाजता उड्डाण केले की पुढील नऊ तास हे झोप, दोन वेळची जेवणं,  विमानाचा युरोपकडे जाणारा मार्ग आपल्या समोरील स्क्रीनवर पाहत राहणं  आणि जागं असल्यास वेगवेगळे चित्रपट पाहणे अशा विविध उपक्रमांमध्ये व्यतित करावे लागतात. 

माझ्यासाठी खास भारतीय शाकाहारी जेवण पूर्ण प्रवासासाठी नोंदविलं गेलं होतं. माझी त्याला मान्यता नव्हती. त्यामुळं ह्यातून माझी सुटका होईल का अशी पृच्छा मी प्रवासात नम्रपणे करत होतो.  एक दोन वेळा ती मान्यसुद्धा झाली.  मुंबई ते लंडन प्रवासात विमानानं उड्डाण केल्यानंतर जेवण आणि लंडनला सकाळी उतरण्याआधी नाश्ता असा आपला पाहुणचार केला जातो. जेवणामध्ये सुरवातीला स्टार्टर म्हणून जो प्रकार असतो त्यात भरपूर फळं, हिरवागार पाला असतो. त्यामुळं आपल्याऐवजी ससा आणून आसनस्थ करायला हवा असा विचार क्षणभर माझ्या मनात येऊन गेला. नाश्त्याच्या वेळी समोर उपमा पाहून मी कृतकृत्य झालो. आधीच मुंबई लंडन प्रवासातील विमानातील वातावरण आपण भारतातच आहोत की काय अशी शंका निर्माण करण्याजोगं असतं, त्यात ह्या हिंदू शाकाहारी जेवण पर्यायाच्या निवडीने भर घातली.  





जूनमध्ये लंडनला तुम्ही जात असाल तर उड्डाणानंतर काही तासांतच सूर्योदय झाल्यानं आकाशातील लख्ख प्रकाश आपली सोबत करत राहतो. हिवाळ्यात मात्र तांबडं फुटण्यासाठी आपल्याला अगदी लंडन येईस्तोवर वाट पाहावी लागते. लंडन विमानतळ परिसराची विमानातून टिपलेली नयनरम्य रूपं ! 



भारतातून लंडनला येणारी विमान बऱ्याच वेळा टर्मिनल पाचवर येतात. मग तिथून आपल्याला मेट्रो, बसचा वापर करत टर्मिनल तीनवर येऊन अमेरिकेला जाणारं विमान पकडावं लागतं. सवय असली की हा प्रकार सोपा वाटतो पण नवख्या माणसाला मात्र सूचनाफलकांच्या आणि गरज पडल्यास तेथील अधिकाऱ्यांस विचारत पुढं जावं लागतं. 

लंडन ते फिलाडेल्फिया हा प्रवास अमेरिकन एअरलाईन्सच्या विमानानं झाला. तिथं सावळागोंधळ होता. बहुधा त्यांच्या पूर्वनियोजित विमानात काही गोंधळ झाला असावा म्हणून त्यांनी तात्काळ दुसऱ्या विमानाची सोय केली. पण हे जुनाट विमान होते आणि मला मिळालेले आसन गैरसोयीचे होते. अजून त्यांनी मला प्रतिक्रिया विनंती ई मेल पाठवलं नाहीये. जर पाठवलं तर चांगलीच प्रतिक्रिया देईन त्यांना ! इथंही सश्याचा आहार. तरी डावीकडील पालापाचोळा मला नको हे सांगितलं आणि ती डिश तो घेऊन गेल्यानंतर मला छायाचित्र घेण्याची आठवण झाली !

अमेरिका, युरोपातील नागरिकांना सर्व काही गोष्टी थंड सेवन, प्राशन करण्याची सवय. लंडनहून विमान निघण्याआधी विमानातील वातानुकूलित यंत्रणा अगदी जोरात काम करू लागली. डोक्यावरील थंड हवेचा फवारा मारणाऱ्या छोट्या पंख्याला बंद करत, चेकइन बॅगेतील टोपी डोक्यावर चढविण्याची वेळ आली. पुढील दोन आठवड्यात मुकाबला कराव्या लागणाऱ्या थंड हवामानाची आधीच पूर्वसूचना मिळाल्यानं आणि त्यात तिथं सर्दी, फ्लूची साथ पसरली असल्यानं मी अगदी बचावात्मक पवित्रा स्वीकारला होता. 




स्ट्रॉबेरी आणि सफरचंद ज्युस! 


तुलनेनं लंडन अमेरिका प्रवास कमी कालावधीचा! नवीन राजवट असल्यानं इमिग्रेशन अधिकारी थोडे जास्त प्रश्न विचारेल ह्याची जाणीव होतीच. अपेक्षेनुसार त्यानं ९० सेकंद विविध प्रश्न विचारून मग प्रवेश दिला. मनात कितीही इच्छा निर्माण झाली तरीही ह्या अधिकाऱ्यांशी मुद्द्याला सोडून गप्पा मारणं किंवा विनोदनिर्मिती करण्याचा प्रयत्न करणं टाळावं. 



बॅगा ताब्यात घेतल्यानंतर उबेर टॅक्सीने 350 Rocky Run Pkwy, Wilmington, Delaware इथं असलेल्या होमवूड सुइट्सच्या दिशेनं प्रस्थान केलं. २०१७ सालापासून कोविडचा अपवाद वगळता दर वर्षी इथंच येत असल्यानं हे हॉटेल, परिसर, कर्मचारी वर्ग ओळखीचा आहे. दोन्ही टीव्हीवर माझ्या स्वागताचे संदेश झळकत होते. ग्रबहब ह्या झोमॅटोसारख्या अँपवरून मी माझं जेवण मागवत राहिलो. 

ह्या भेटीत सुद्धा सकाळी एक - दीडच्या सुमारास जाग येण्याचा सिलसिला कायम राहिला. भेटीच्या उत्तरार्धात पुन्हा झोप येण्याच्या शक्यतेत वाढ झाली हीच काय ती प्रगती. अमेरिकेतील बहुसंख्य भागात हवेचा दर्जा अत्यंत चांगला असतो. हॉटेलच्या रूममधून सूर्योदयाच्या आसपास दिसणारी ही सुंदर दृश्यं! पहिल्या फोटोत मराठी भाषेतील तांबडं फुटणं ह्या शब्दप्रयोगाची प्रचिती येते !






गेल्या काही भेटीत मी साखर, चहा पावडर सोबत घेऊन जातो.  सकाळी उठल्यानंतर दुधाळ चहा घेण्यासारखं सुख नाही! 




अमेरिकेतील थंड हवामान आणि मनसोक्त आहार ह्यामुळं चेहरा टवटवीत दिसू लागतो असा माझा (गैर) समज! त्यामुळं दिवसागणिक प्रगती होत आहे का हे जाणून घ्यायला मी जमतील तितके सेल्फी काढत राहतो.  मुख्य फोन साधा असल्यानं आणि केवळ छायाचित्रणासाठी आयफोन घेऊन गेल्यास परतताना कस्टम अधिकाऱ्यांकडून होऊ शकणाऱ्या संभाव्य प्रश्नावलीला टाळण्यासाठी आयफोन नेला नसल्यानं सर्व छायाचित्रं साध्या फोननेच काढली आहेत. 


सायंकाळीसुद्धा सूर्याची आणि भोवतालच्या परिसराची सुंदर दृश्यं आपल्यासमोर येत राहतात. 






सकाळच्या नाश्त्यात scrambled अंडी,  बटाटयाच्या काचऱ्या हा दररोज असणारा सामायिक मेनू. बाकी फळांचे, ज्यूसचे अनेक पर्याय उपलब्ध ! दुसऱ्या दिवसापासूनच तापमान शून्याखाली गेल्यानं सतत जॅकेट, टोपी घालून राहणं हे ओघानं आलंच. 



खोलीत सकाळी येणारी सूर्याची किरणं मला छायाचित्रणाच्या विविध संधी उपलब्ध करून देत होती. 


१८, १९ ला डेलावेर येथील प्रामुख्यानं आज्ञावली विकसित करणाऱ्या माझ्या संघासोबत भेटीगाठी केल्यानंतर २० तारखेला डाउनटाऊन भागातील प्रामुख्यानं बिझनेस असणाऱ्या कार्यालयातून काम केलं. इथलं कार्यालय आपलं जुनेपण अजूनही काही प्रमाणात टिकवून आहे. इथे वर्षानुवर्षे आमच्या कंपनीत काम करणारी जुनी अनुभवी अमेरिकन मंडळी बहुसंख्येनं आहेत. ह्या लोकांकडे सखोल ज्ञान असतं. त्यामुळं अगदी थोड्या वेळात आपण बरंच काही समजावून घेऊ शकतो. खरंतर २० तारखेला ह्या कार्यालयातून काम करत असताना बराच वेळ भुरुभुरु बर्फ पडत राहिला. कार्यालयातून छायाचित्रण करणं योग्य नसल्यानं मी ही मनोहारी दृश्यं टिपू शकलो नाही. गेल्या पंधरा वर्षात माझ्या कारकिर्दीच्या जडणघडणीत मोलाचा वाटा बजाविणारे केन, आनंद आणि अशोक ह्यांच्या सोबत दर अमेरिकेत भेट घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न राहतो. आर्क्टिक  ब्लास्टने निर्माण केलेल्या प्रचंड थंडीला न जुमानता आम्ही यंदाही २० तारखेला रात्रीच्या जेवणाच्या निमित्तानं भेटलो. जुन्या रम्य आठवणींना  उजाळा मिळाला. वसईतील मित्रांसोबत जशा गप्पा रंगतात त्याची आठवण झाली. 

२१ तारखेला आमच्या विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी जर्सी सिटीतील कार्यालयात जायचं होते. विल्मिंग्टन रेल्वेस्थानक आमच्या २० तारखेला भेट दिलेल्या डाऊनटाऊन कार्यालयाच्या बाजूलाच आहे. तिथं सकाळी उबेरने गेलो. एक आजोबा प्रचंड थंडीला न जुमानता कार चालवत होते. त्यांनी त्यांची जुनी गाणी बजाविणारे FM रेडिओ स्टेशन सुरु ठेवलं होते. त्यांची परवानगी न घेता त्यांचं घेतलेलं हे छायाचित्र! क्षमस्व आजोबा! जुन्या माणसांचं, त्यांच्या वागण्याचं निरीक्षण करणं हा माझा आवडता छंद. जुनी माणसं देश, धर्म ह्यांच्या सीमेपलीकडील एक समान वागणं आपल्यासमोर आणतात. वाटेत एक अपघात झालेली कार दिसली. "हल्लीची पिढी कशी गाड्या चालवते?" ह्या भावना व्यक्त करणारे वाक्य आजोबा म्हणाले.    मी त्यांच्याशी संवाद साधण्याचा थोडाफार प्रयत्न करून पाहिला. पण त्यांना फारसा रस नसावा असं जाणवताच मी गप्प राहिलो. 




बाहेर असलेल्या वजा सोळा सदृश्य तापमानाला तोंड देण्यासाठी सज्ज असलेला आदित्य.  आपणच करावे आपल्या प्रतिमेचं कौतुक !


अँमट्रेक ही अमेरिकेतील दीर्घपल्ल्याची रेल्वेवाहतूक करणारी संस्था! ह्या ट्रेनचे तिकीट अरुण आणि मी काढले होते. तळमजल्यावर बैठकीसाठी व्यवस्था होती. दीर्घपल्ल्याच्या विविध गंतव्यस्थळाला जाणाऱ्या गाड्या कोणत्या फलाटावर येणार ह्याची सूचना देणारे इंडिकेटर तिथे होते. आम्ही पाच मिनिटं आधी आमच्या फलाटावर गेलो. ती पाच मिनिटंसुद्धा थंड वारे, तापमान ह्यांचा मुकाबला करताना तासभरासदृश्य वाटली. आम्ही स्थानापन्न झालो. तिकीट तपासनीस आला, त्यानं आमचे अँपमधील QR स्कॅन केले. सर्वजण आपल्या संगणकावर काम करत होते, झूम बैठकीवर हजर राहत होते. 


अगदी वेळेवर गाडी पेन स्टेशनला पोहोचली. त्यानंतर पुन्हा उबेर करून आम्ही जर्सी सिटीतील कार्यालयात पोहोचलो. न्यूयॉर्क शहर दूरवरून आपणास खुणावत राहते. दिवसभरात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत बैठकी उत्तमरित्या पार पडल्यानं मनात समाधानाची भावना निर्माण झाली.  कार्यालयाच्या बाजूलाच एक छोटेखानी मॉल आहे. तिथं चहापानासाठी जाताना हडसन नदीवरून येणाऱ्या थंड वाऱ्यांनी माझी त्रेधातिरपीट उडविली.  पुन्हा एकदा अँमट्रेकने आम्ही डेलावेरला पोहोचलो. इथं वाहनतळावर असणारी गर्दी थोडीशी वेगळ्या वर्गातील होती. पण स्थानकावर पोलिसांचा पुरेसा राबता असल्यानं चिंतेचं कारण नाही असं अरुण म्हणाला. सायंकाळची ट्रेन वेळेआधीच डेलावेरला आली. जणू काही आपण आपल्या गावी परतलो असं मला वाटत राहिलं. उबेरमध्ये शिरताक्षणी ग्रबहबवरून होनेस्ट ह्या भारतीय उपहारगृहातून ह्या भेटीत मला आवडू लागलेलं सँडविच मागविलं. आमची आणि त्या सँडविचची  हॉटेलवर पोहोचण्याची वेळ अगदी दोन - तीन मिनिटाच्या फरकानेच होती. जबरदस्त नियोजन आदित्य !!


ताजातवानं  होऊन त्या प्रशस्त खोलीत शुक्रवारी रात्री सँडविचचा आस्वाद घेताना समाधानी म्हणतात ना तसं वाटत होतं. प्रचंड थंडीत पहिला आठवडा कार्यालयीन कामाच्या बाबतीत बराच चांगला गेला होता. 

२२ फेब्रुवारी हा ह्या भेटीतील एकमेव निवांत दिवस असणार होता. सकाळी सवडीने नाश्ता वगैरे करून श्रीकांतसोबत भटकंतीला बाहेर पडलो. शनिवार असला तरीही घरून  Exception Approval घेऊन Scrambled eggs आणि चिकनचा एक चविष्ट प्रकार ह्यांचा आस्वाद घेतला. 






COSTCO,  JCPenny, Macy इत्यादी दुकानांना भेटी दिल्या. घरी उगाचच व्हिडिओ कॉल करून हे घेऊ का ते घेऊ अशी पृच्छा करत शेवटी फार मोजकी खरेदी केली. उपहारगृहात बफे जेवणाचा आस्वाद घेऊन अडीच वाजता मी रूमवर परतलो. दोन तास मस्त ताणून दिली. मग मस्त चहा करून आठवडाभराचे कपडे हॉटेलच्या laundry मध्ये धुतले. हॉटेलच्या स्वागतकक्षात ह्या धुलाईसाठी तिथल्या यंत्रात टाकण्यासाठी आवश्यक असणारी क्वार्टर्सची नाणी मिळतात. प्रथम अर्धा तास धुलाई, मग तासभर वाळविणे असे जवळपास दोन तास ह्या प्रकारात जातात.  रविवारी प्लेनोला जायचं असल्यानं बॅग्स भरण्यात हे दोन तास घालविले. 

ह्या हॉटेलविषयी मला किंबहुना इथं वास्तव्य करणाऱ्या आमच्या कंपनीतील सर्वांनाच  खूप विश्वास आहे. माझ्या दोन्ही चेकइन बॅग्स मी इथेच सोडून जाणार होतो. फक्त लॅपटॉप बॅग आणि एक केबिन बॅग घेऊन मी प्लेनो / डॅलसला निघालो होतो. रविवारी सकाळी चार वाजल्यापासून भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरु झाल्यानं त्या दिवशीच्या जेटलॅग विषयी तक्रार नव्हती. विमान साडेबाराचं होतं. आम्ही साडेदहापर्यंत विमानतळावर पोहोचलो. अमेरिकेतील विमानतळावरील सुरक्षाव्यवस्था TSA (Total Security Administration) ही संस्था सांभाळते. जर तुमचं  स्टेटस TSA Precheck approved असेल तर तुमच्यासाठी वेगळी रांग असते. जर हे नसेल तर मात्र तुम्हांला सविस्तर सुरक्षातपासणीला सामोरे जावं लागतं जे कधी कधी काहीसं अपमानास्पद पातळीवर जाऊ शकतं. 

साधारणतः पावणेबाराच्या सुमारास प्राधान्यक्रमानुसार विमानात प्रवेश करण्यास सुरुवात झाली. कागदोपत्री फिलाडेल्फिया ते डॅलस हा विमानप्रवास एकंदरीत तीन तास चाळीस मिनिटांच्या आसपास आहे. फिलाडेल्फियाची स्थानिक वेळ डॅलसच्या एक तास पुढे आहे. त्यामुळं आम्ही डॅलसला स्थानिक वेळेनुसार साडेतीनला वगैरे पोहोचणे अपेक्षित होतं.  मी आदल्या दिवशी चेकइन करायला विसरल्याने माझा ग्रुप मागचा होता. 

माझी विमानात प्रवेश करण्याआधी केबिन लगेजमधील जागा संपत आल्यानं आमच्या सर्वांच्या बॅग्स चेक - इन करण्यास बंधनकारक करण्यात आलं. ही शक्यता त्रासदायक आहे. एकतर ही बॅग आपल्यासोबत कायम असेल असं गृहितक असल्यानं आपण तिला लॉक वगैरे केलेलं नसतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपण ह्यातील सर्व सामान पूर्ण व्यावसायिक पद्धतीनं पॅक न केल्याची शक्यता असते. असो ही माझी केबिन बॅग विमानाच्या पोटात जाण्याचा क्षण मला भावनाविवश करून गेला. ही तीच बॅग जी मागच्या वर्षी होमवूड सुइट्समध्ये विसरून आलो होतो.  तू मला प्रत्येकवेळी संकटात टाकतोस असं ती बॅग मला नक्कीच म्हणाली असणार! 

विमानात आम्ही स्थानापन्न झालो. बहुतांश अमेरिकन सहप्रवासी असणाऱ्या विमानातील वातावरण काहीसं वेगळं असतं. सर्व प्रवासी विमानात शिरल्याची घोषणा करण्यात आली.  पण बराच वेळ काहीच होईना तेव्हाच मनात शंकेची पाल चुकचुकली. आणि मग थोड्याच वेळात विमानाच्या तपासणीत टायर पंक्चर असल्यानं तुम्हां सर्वांना विमानातून बाहेर पडावं लागेल अशी घोषणा केली गेली. संपूर्ण विमान विविध  विस्मयकारक उद्गारांनी भरून गेलं. परंतु नाईलाज असल्यानं आम्ही सर्व बाहेर पडलो. सुदैवानं श्रीकांत सुद्धा माझ्या सोबत होता. विमान उड्डाणाची नवीन वेळ दोन दहा अशी देण्यात आली होती. आम्ही सबवेचे सँडविच घेतले. भारतात आणि अमेरिकेत मिळणाऱ्या सबवे सँडविचमध्ये जमीनअस्मानाचा फरक असतो. तिथलं सँडविच बरंच चविष्ट असतं. 

२:१०, २:४०, ३:१० अशा नवनवीन वेळा येत राहिल्या. नक्की काय होत आहे ह्याविषयी कोणतीच माहिती पुरवली जात नव्हती. मागच्या जूनमध्ये आपल्या एअर इंडियाने तीन चार तासाचा विलंब होताच लगेचच नाश्त्याची कुपन्स सर्व प्रवाशांना दिली होती. ज्या प्रवाशांना डॅलसहुन दुसरं विमान पकडून पुढं जायचं होतं त्यांची काय हालत झाली असेल देव जाणे. त्यांना कस्टमर केयर केंद्राकडे जाण्याची सूचना देण्यात येत होती. शेवटी पुन्हा साडेतीन वाजता आम्ही विमानात प्रवेश केला.  सर्व प्रवाशी आले आहेत आता थोड्या वेळात आपण उड्डाण करू अशी घोषणा सुद्धा करण्यात आली. पण पुन्हा एकदा पंधरा वीस मिनिटं काहीच झालं नाही. आता मात्र प्रवाशांचा संयम सुटत चालला होता. विमानाला रनवे वर खेचून घ्यायला आवश्यक असणारी मंडळी उपलब्ध नाहीयेत असं न पटणारं कारण वैमानिकाने दिलं. आता मात्र दोन प्रवाशांचा संयम पुरता सुटला किंवा ते पुरते घाबरले. आम्हांला ह्या विमानातून प्रवासच करायचा नाही, आम्हाला उतरू द्या असे ते म्हणाले. हे दोघे उतरत आहेत, तुम्हांला उतरायचं आहे का असे वैमानिकाने सर्वांना विचारलं. आता मात्र विमानात भीतीची अदृश्य लहर पसरली. माझ्या समोरील सीट्सवर एक तरुण, त्याची मैत्रीण आणि बहुदा तिची आई असे तिघे बसले होते. तो तरुण अगदी संतप्त झाला. त्यानं हवाईसुंदरीला नक्की काय होत आहे असा प्रश्न विचारला. तिच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं त्यानं दुसऱ्या वयस्क हवाईसुंदरीकडे पृच्छा केली. नक्की काय झालं माहिती नाही पण ती पहिली हवाईसुंदरी आली. माझ्याकडं रोखून का पाहतोयस, attitude का दाखवतोयस असं तिने त्याला विचारलं. प्रसंग हाताबाहेर जाईल की काय अशी शंका माझ्या मनात निर्माण झाली. सुदैवानं तसं काही झालं नाही. विमान नियोजित वेळेपेक्षा चार तास उशिरा निघाल्यास पूर्ण पैसे परत द्यावे लागतात असे माझ्या समोरील युवक मोठ्यानं बोलत राहिला. कदाचित त्याच्या बोलण्यात तथ्य असावं. विमानानं साडेचारला उड्डाण केलं. डल्लासला उतरताना टायरने नीट राहावं ही प्रार्थना मारुतीरायाकडं करत मी मारुतिस्तोस्त्र बोलण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर दररोज प्रार्थना करत असलेल्या देवांचे, ब्रह्म्याचं स्मरण केलं.  विमान व्यवस्थित उतरलं, बॅगसुद्धा  व्यवस्थित आली. 

हेच ते विमान आणि तो दिसणारा त्याचा टायर !



डॅलस निवू, निशांकचे गांव. पण निऊ सध्या भारतात आली असल्यानं निशांक मला भेटायला हॉटेलवर आला. एका भारतीय उपहारगृहात आम्ही अत्यंत चविष्ट चिकन बिर्याणी आणि तंदुरी चिकन खाल्लं. गप्पांना पुरेसा वेळ मिळाला नाही, पण चांगली चर्चा करून त्यानं मला परत हॉटेलवर सोडलं. इथलं हॉटेल Hyatt Regency फ्रिस्को. हॉटेल आलिशान, माझी खोली चौदाव्या मजल्यावर. तिथून शहराचा सुंदर नजराणा दृष्टीस पडत होता. 




सोमवारी कार्यालयातून परत आल्यानंतर रुमवरून घेतलेली ही छायाचित्रं !




हॉटेल आलिशान असलं तरी माझ्या प्राथमिक गरजा जसे की सकाळी गरम पाणी करण्यासाठी गॅस, मायक्रोवेव्ह, इस्त्री  वगैरे खोलीत उपलब्ध नव्हते. क्लिष्ट सूचना असणारे कॉफी मशीन होते. ह्याआधी अशा मशिनमधून मी पाणी गरम केलं आहे पण ह्यावेळी माझ्याकडं तितका संयम नव्हता. 



डेलावेर हे एक तास पुढं असल्यानं आम्ही साडेसात वाजता कार्यालयात पोहोचण्याचा प्रयत्न करणार होतो. सकाळी पाच वाजता उठल्यावर त्रयोदशीच्या चंद्रकोरीचे विहंगम दर्शन झाले. "आदित्य तू आयफोन आणायला हवा होता!" मला अंतर्मनाने सुनावलं. दहा मिनिटांनी चंद्राला पुन्हा पाहायला गेलो तर संपूर्ण परिसराला धुक्यानं वेढलं होतं. चंद्र सोडा समोरील रस्ता, त्यावरील वाहनं देखील गायब झाली होती. एखाद्या हॉलिवूड थरारपटात परग्रहवासीयांनी पृथ्वीचा ताबा घेतल्यावर ज्या काही अनाकलनीय घटना घडतात त्यापैकी हा प्रकार असावा असं वाटून गेलं. 

इथं आमच्या कॉर्पोरेट नोंदणीमध्ये नाश्ता समाविष्ट होता. जरी प्रत्यक्ष मांडून ठेवलेल्या नाश्त्याची छायाचित्रं घेतली नसली तरी प्लेटमध्ये घेतलेले हे काही पदार्थ. एकंदरीत उच्चभ्रू म्हणता येईल असा हा प्रकार होता. 


हॉटेल ते ऑफिससाठी शटलसेवा होती. साडेसात वाजता सुद्धा धुक्याचा विळखा शहराभोवती होता. त्यात परग्रहवासीयांना शोधण्याचा अयशस्वी प्रयत्न मी करत राहिलो. 


प्लॅनोची आमची टीम खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय आहे. इथिओपिया, दक्षिण कोरिया, नेपाळ, व्हिएतनाम, अमेरिकन आणि एक भारतीय असे वेगवेगळ्या देशातील सदस्य ह्या संघात आहेत. त्यांच्याशी दीड दिवस सविस्तर चर्चा केली, टीम लंच केलं. ह्या ऑफिसात माझी भाची इशा सुद्धा काम करते. तिची भेट घेतली. सायंकाळी संकल्प ह्या भारतीय उपहारगृहात पुन्हा एकदा चविष्ट जेवणाचा आस्वाद घेतला. 

मंगळवारी सकाळी चेक आऊट करायचं होतं. त्यामुळं पुन्हा एकदा लवकर उठलो. चतुर्दशीची चंद्रकोर उगवत्या सूर्याच्या सोबतीनं  दर्शन देत होती. अमेरिकेत मंगळवारी महाशिवरात्री असेल असं आधी घोषित करण्यात आलं होतं. बऱ्याच वेळा अमेरिकेत भारतापेक्षा एक दिवस आधी हिंदू सण साजरे करण्यात येतात असं मला श्रीकांतने सांगितलं. पण जर आपल्याला चंद्रकोर दिसली तर मग महाशिवरात्री कशी काय असू शकते हा प्रश्न मला पडला. श्रीकांत मला भेटताच महाशिवरात्री उद्या असेल असं सांगण्यात आलं आहे असं तो म्हणाला. बुधवारी सकाळी इथं असायला हवं होतं असं मला वाटून गेलं, अमावास्येचा पूर्ण अंधारा चंद्र कदाचित दृष्टीस पडला असता. 




Croissant, बटाटे आणि फळांचा आस्वाद घेणारा मी! ह्यानंतर भरभरून फळांची प्लेट मी घेतली. अमेरिकेतील बेरी वर्गातील फळांना तुलना नाही! अत्यंत सुंदर चव असते त्यांची ! 


२००२ साली फिनिक्स मध्ये सहकारी असणारा अजय भेटायला आला. त्याच्याबरोबर भोजन जरा जास्तच रंगले. त्यामुळं ३:२० चे परतीचे विमान पकडण्यासाठी थोडी चिंतेची परिस्थिती निर्माण झाली. पण शेवटी व्यवस्थित विमान मिळाले. रविवारच्या अगदी उलट अनुभव इथं आला. विमानाने वेळेवर उड्डाण केले, वेळेत डेलावेरला अलगदपणे उतरले. चेक-इन बॅग्स नसल्यानं आम्ही बाहेर पडलो. पुन्हा उबेर आणि पुनश्च: ते सँडविच. ह्यावेळेला गणित चुकलं, सँडविच जरा आधीच येऊन स्वागतकक्षात माझी वाट पाहत राहिलं. 


हॉटेलवाल्यांकडून माझ्या दोन चेक-इन बॅग्स ताब्यात घेऊन पुन्हा एकदा चेक-इन केलं.  रात्री किचन भागात थोडं छायाचित्रण केलं.












बुधवारी डेलावेर मध्ये पुन्हा बैठकींना हजेरी लावली. गुरुवारी सकाळी चेक आउट केलं. त्या आधी काढलेला हा सेल्फी! काहीशा दगदगीच्या वेळापत्रकामुळं आणि जेट लॅगमुळे ह्या भेटीत चेहरा फारसा जास्त काही टवटवीत झाला नाही. गुरुवारी तीन वाजता ऑफिसातून विमानतळासाठी उबेर केली. अशा प्रकारे रविवार, मंगळवार आणि गुरुवार असे तीन दिवस फिलाडेल्फिया विमानतळावर मी हजर होतो. 


ब्रिटिश एअरवेजचे हे विमान अगदी आलिशान होते. बहुतांश सहप्रवासी उच्चभ्रू अमेरीकन, ब्रिटिश होते. लंडनला पोहोचण्यासाठी केवळ सहा तास लागतील असे वैमानिकाने सांगितलं. हीथ्रो विमानतळावर सकाळी सहा आधी अधिक ध्वनीप्रदुषण करणाऱ्या विमानांना उतरण्यास परवानगी नसल्यानं वैमानिकाने फिलाडेल्फियाला थोडा टाईमपास केला असावा. परतीच्या प्रवासात अनुकूल अशा tailwind मुळे विमानं कमी वेळात लंडनला पोहोचतात. हा प्रवास उत्तर ध्रुवीय प्रदेशातून होत असतो. ह्या सहा तासात मला मोजकी झोप लागली. 


लंडनला सहाच्या आसपास उतरल्यानंतर साडेनऊला मुंबईचे विमान होते. अमेरिकेला गुरुवारी सायंकाळी सहा चाळीसला निघालेलं विमान लंडनला स्थानिक वेळेनुसार सकाळी सहा वाजता उतरलं. लंडनहून शुक्रवारी सकाळी साडेनऊला निघालेलं विमान मुंबईत खरंतर शनिवारी सकाळी सव्वाबारा वाजता उतरणार होतं. पण बहुदा शेपूटवाऱ्यांनी जास्तीच जोर लावल्यानं ते शुक्रवार रात्री ११:५० लाच मुंबईत उतरलं. पण मी विमानातून बाहेर पडेस्तोवर शनिवार उजाडला होता. अशा प्रकारे ह्या आठवड्यात मी रविवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार विमानात होतो असे मी सांगू शकतो! 

लंडन ते मुंबई प्रवासात खिडकीची सीट मिळाली किंवा मिळवली होती. लंडनला उड्डाण केल्यानंतर काही सुरेख छायाचित्रं मिळाली. 







ढगांच्या घनदाट अशा थराच्या वरील पृष्ठभागावर कोण्या कलाकारानं केलेलं हे अप्रतिम नक्षीकाम पहा! 



समुद्राच्या निळ्याशार पाण्यावर पडलेल्या ढगांच्या सावल्या किती मनोहर दिसत आहेत. 








आता वेळ होती भोजनाची. पुन्हा एकदा भारतीय शाकाहारी आहार! लंडन ते अमेरीका प्रवासात माझ्या विनंतीचा मान राखत माझ्यासाठी खास मागविलेल्या शाकाहारी भोजनाला डावलून त्यांनी मला चिकनची चविष्ट डिश आणून दिली होती.  इथं मात्र असं काही घडलं नाही. कक्षात सहकुटुंब भारतीय प्रवास करत होते. लहान मुलं गडबड करत वावरत होती. भारतात परतण्याची जाणीव इथूनच होत होती. 










आखातात असताना सूर्य मावळला. 


मुंबईला दोन तास असताना अशी दिव्यांची रांग दिसली. नक्की काय असावं ह्याचा उलगडा झाला नाही. 
पुन्हा एकदा मला भारतीय नाश्त्याचा आग्रह करण्यात आला. मी निग्रह दाखवून फक्त ब्रेड आणि चहा आणून देण्याची विनंती केली. त्या दोन एअरहोस्टेसना बहुदा वाईट वाटत राहिलं. त्यांनी पुन्हा एकदा तुझं मत बदललं तर नाही ना असं विचारलं. मी माझ्या मतावर ठाम राहिलो. शेवटी त्यांनी मला दोन ब्रेड, चहा आणि चविष्ट स्वीट डिश आणून दिली. संपूर्ण प्रवासात त्यांनी मला ज्या ज्या वेळी ड्रिंक्स घेणार का विचारलं त्या त्या वेळी मी कायम लिंबूपाणी सांगितलं. त्यामुळं उतरताना त्या माझ्याकडं आदरानं पाहत असल्याचा भास मला होत राहिला.



अमेरिकेतील आहाराने जरा तंदुरुस्त झालेला मी विमानातून बाहेर पडणाऱ्या पहिल्या दहा प्रवाशांमध्ये होतो. इमिग्रेशनपर्यंत असणारा जवळपास एक किलोमीटरचा पल्ला मी जोरजोरात पार केला तेव्हा मी बहुदा दुसरा होता. बॅग्स यायला दहा पंधरा मिनिटं लागली. मी एक वाजून वीस मिनिटांनी घरी पोहोचलो आणि दोन वाजून दहा मिनिटांनी निद्राधीन झालो. रात्री आणि दुपारी चांगली झोप झाल्यानं आजच्या दिवसातच हा वृत्तांत लिहून झाला. 

उद्यापासून कार्यालयीन कामावर लक्ष ! ह्या भेटीत सकाळी प्रसन्न चित्तानं कार्यालयात जाऊन काम करण्याचा आनंद लुटला. प्रदूषणमुक्त वातावरणाचा माणसाच्या कार्यक्षमतेवर किती अनुकूल परिणाम होतो ह्याची पुन्हा एकदा प्रचिती घेतली. एक सकारात्मकता घेऊन मी परतलो आहे. मुंबई मला कसं वागवते ते पाहुयात. पण एक गोष्ट खरी कसाही असला तरी आपल्या देशात परतण्याची प्रत्येक वेळ पुन्हा मनात समाधानाची एक लहर निर्माण करून जाते! 

आता भारतात मला जेट लॅगने सतावू नये ह्यासाठी कृपया परमेश्वराकडे प्रार्थना करा. 

रविवार, २६ जानेवारी, २०२५

२०२४ अनुभव - भाग २


१. मनःस्वाथ्यासाठी लोक खरोखर संघर्ष करताना दिसताहेत. मी सुद्धा करतोय. माझा संघर्ष वेगळा आहे, तुमचा वेगळा असेल. जीवनातील एका क्षणी आपल्याला त्या क्षणापर्यंत ज्या गोष्टींसाठी आपण संघर्ष केला त्या गोष्टींतील काही प्रमाणातील निरर्थकता जाणवू लागते. मग आपण जीवनमार्ग नव्यानं रेखाटू इच्छितो. आपल्या जबाबदाऱ्या, चाकोरीबाहेरील निर्णय घेण्यासाठी लागणारी धमक वगैरे घटक आपल्या पुढील प्रवासाची दिशा ठरवतात. 

२. आमच्या क्षेत्रात 'Decision Engine' नावाचा एक प्रकार असतो. त्या बापड्याला सर्व माहिती पुरवली की तो आपल्याला एक निर्णय देतो जसे की ह्या ग्राहकाला कर्ज द्यायचं की नाही, द्यायचं झाल्यास किती द्यावं की निर्णय घेण्यासाठी अधिक माहितीची विनंती करावी. आपल्या प्रत्येकाच्या डोक्यात सुद्धा असंच एक किंवा काहींच्या डोक्यात अनेक 'Decision Engine' असतं / असतात.अगदी सोप्या सोप्या गोष्टी जसं की कुठं काय बोलावं, लिहावं इथून सुरु होणाऱ्या निर्णयापासून ते कार्यालयातील सर्वात मोठ्या आर्थिक परिणाम होऊ शकणारे निर्णय घेण्याचं काम हे Decision Engine (DE) करत असते. प्रगल्भ व्यक्तींकडं गोष्टींच्या क्लिष्टतेनुसार वेगवेगळी DE असावीत असा मला संशय आहे. 

प्रत्येक व्यक्ती आपल्या डोक्यावर अनेक जबाबदाऱ्या घेऊन वावरत असते. कोणत्याही दिवशी, महिन्यात, वर्षात आपण ठरवलेली सर्व कामं पूर्ण होण्याची शक्यता शून्य असते. परंतु प्रत्येक दिवस, महिना, वर्ष ह्यांच्या आरंभी समोरील कामांचा प्राधान्यक्रम ठरविणं, त्यात वेळोवेळी योग्य फेरफार करणं आवश्यक आहे. ह्यासाठी तुमच्या त्या DE ची प्रगल्भता निर्णायक भूमिका बजावते. 

कार्यालय असो की घर, आपली जी भूमिका आहे त्या भूमिकेला अनुसरून योग्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करता यायला हवं. 

तुमच्या मेंदूत किती Decision Engines आहेत, ती भरकटलेली आहेत का वगैरेची जाणीव करून घ्या. माझं तसं ठीकठाक आहे असं मला वाटतंय. मी रात्री घरी परत येताना फक्त पूर्ण झालेल्या कामांचा विचार करून आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो. 

फक्त एक ते ऑनलाईन बुद्धिबळ खेळण्याचं २०२१ सालापासून लागलेलं व्यसन गेले एक वर्ष दूर ठेवलं होतं, ते परत सुरु झालंय!! 

३. हल्ली लोकांना दुःखी राहणं अजिबात झेपत नाही असं मला वाटू लागलंय. दुःखापासून दूर पळण्यासाठी मदिराप्राशन हा एक मार्ग लोक वापरतात. त्यासोबत अवतीभोवती विविध कार्यक्रम, पार्टी ह्यांचे आयोजन करून त्यात मग्न राहण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून दुःखाचा विसर पडावा किंवा चांगलं वाटण्यासाठी नवीन कारणं मिळावीत. माझं तरी म्हणणं आहे की दुःखी असणं ह्यात काही वावगं नाही. जीवन हा शक्यतांचा खेळ आहे. दुःखापासून, समस्यांपासून काही काळासाठी दूर पळण्यासाठी आपण ज्या उपायांचा वापर करत आहोत ते उपाय भविष्यात नवीन दुःख तर निर्माण करणार नाहीत ना ह्याचा निर्णय तुमच्या Decision Engine ला घ्यायला लावा. 

जानेवारी महिन्यात महिलावर्ग हळदीकुंकू कार्यक्रमाचं आयोजन करतात. वर्षअखेरीस लागून असलेल्या सुट्टीचा काळ संपल्याचे दुःख विसरण्यासाठी हे कार्यक्रम आयोजित केले जातात अशी मला शंका आहे. 

४. तीस चाळीस वर्षांपूर्वी ज्या गोष्टी अगदी साध्या पद्धतीनं पण त्या गोष्टींच्या  मूळ हेतूला धक्का न पोहोचवता सादर केल्या जात, त्याच आता उगाचच धांगडधिंगाणा करत सादर केल्या जातात. ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे दूरदर्शनच्या कृष्णधवल युगात सादर केले जाणारे संगीताचे कार्यक्रम! फक्त आणि फक्त गाण्याच्या मूळ गाभ्यांकडं लक्ष केंद्रित करून हे सादर केले जात असत. आता कुठंतरी सादरीकरण आकर्षक करण्याच्या नादात दर्जाकडे काही प्रमाणात दुर्लक्ष होत असावं असं वाटत राहतं. 

५. आमच्या कार्यालयात एक गोष्ट पाळण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्येकानं स्वतःच्या धोरणात्मक विचारांसाठी, क्लिष्ट आज्ञावली लिहिण्यासाठी सलग दोन-तीन तास राखून ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. ही कामं करण्यासाठी तुम्हांला "झोन" मध्ये जाणं आवश्यक असतं. त्यामुळं स्वतःही उगाचच बैठकीमध्ये गुंतवून घेऊ नये आणि दुसऱ्यांना सुद्धा गुंतवू नये. वैयक्तिक आयुष्यात सुद्धा आपला वेळ जपता यायला हवा. इथं योग्य प्रकारे नाही म्हणायला शिकणं ही गोष्ट आत्मसात करता यायला हवी. योग्य कारणासाठी नाही म्हणणं हा काही गुन्हा नव्हे हे ध्यानात घ्या! 

६. कार्यालय असो की घर, कोणत्याही संवादातून आपल्याला कोणता निर्णय अपेक्षित आहे ह्याची तो संवाद सुरु करण्याआधी जाणीव असावी. तो निर्णय सर्वसमावेशक पद्धतीनं घेता यावा ह्यासाठी चर्चेला योग्य दिशेनं वळण देता यायला हवं. ही प्राथमिक पातळीवरील कला बहुसंख्य लोकांकडे नसते. त्यामुळं सर्वत्र गोंधळ माजलेला दिसतो. 

७. आयुष्यात आनंदाची वा दुःखाची घटना घडली असता अगदी टोकाची प्रतिक्रिया न देण्याचा प्रयत्न करावा. Time Machine च्या आधारे साधारणतः पाच वर्षे पुढे जाऊन ह्या घटनेचे त्याकाळी परिणाम किती प्रमाणात असतील ह्याचा विचार करून मगच संयत प्रतिक्रिया द्यावी. 

(कदाचित क्रमश: पण बहुतेक नाही !)


सोमवार, ६ जानेवारी, २०२५

२०२४ अनुभव - भाग १


२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय लिहायचं ह्याविषयी काहीच ठरवलं नाही. 

१.  आयुष्यातील एका विशिष्ट टप्प्यावर कोणत्याही व्यक्तीस ढोबळमानानं तीन प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. 
अ. पालकांविषयीची जबाबदारी 
ब. अपत्यांविषयीची जबाबदारी 
क. व्यावसायिक जबाबदारी
माझ्या कार्यालयातील मला सतत मार्गदर्शन करणाऱ्या व्यवस्थापकाने ह्याविषयी मोलाचा सल्ला दिला. ह्या तिन्ही जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांना वेगवेगळ्या कप्प्यांत विभागणे अत्यावश्यक असते. ज्यावेळी आपण कोणतीही एक जबाबदारी पार पडत असतो त्यावेळी दुसऱ्या जबाबदारीविषयीचे विचार कटाक्षानं दूर ठेवावेत. काहीसं भावनाशून्य माणसासारखं वागावं लागतं पण पर्याय नसतो. 

२. तुम्ही कितीही प्रयत्न करा, वर्षभरात काही वेळा तुम्ही काही मोठ्या व्यावसायिक, वैयक्तिक घोडचुका करणारच.  ह्या घोडचुका करणारे आपण कसे मूर्ख आहोत ह्याविषयी विचार करण्यापेक्षा ह्यातून लवकर कसं बाहेर येता येईल ह्याचा विचार करणं इष्ट राहील. आपण त्या परिस्थितीत तसे का वागलो / बोललो; तसा निर्णय का घेतला ह्याविषयी विचार करावा. त्यामागील आपली विचारसरणी, आपलं व्यक्तिमत्व ह्याविषयी शांतपणे चिंतन करावं. ह्यात हळूहळू जमेल तितका बदल घडवत राहावा. 

३. कोणतेही महत्वाचं काम करताना आपण आपल्या सर्वोत्तम शारीरिक, मानसिक स्थितीत असायला हवं. त्यामुळं अशा व्यावसायिक बैठकीच्या वेळी आपल्याला आवश्यक अशी झोप घेणं, आपल्याला झेपणारा आहार घेणं, आपली मनस्थिती चांगली ठेवणाऱ्या लोकांशी संपर्क ठेवणं / ती बिघडवू शकणाऱ्या लोकांशी संपर्क टाळणं ह्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावं. 

४. आपल्या वैयक्तिक, व्यावसायिक जीवनातील महत्वाच्या व्यक्ती कोणत्या हे नक्की ठाऊक असावं. ही संख्या मर्यादित असावी. ह्या व्यक्तींना नक्की काय आवडतं, काय नाही हे जाणून घेण्यासाठी प्रयत्न करावेत. जमेल तितकं त्याप्रमाणं वागावं. 

५. मला आयुष्यातील सर्वात आनंद देणारी गोष्ट - झाडांना, दुर्वा ह्यांना दररोज पाणी देणं. त्यांना येणारे अंकुर, कळ्या ह्यांचं निरीक्षण करावं. अशा झाडांवर येणारा एखादा इवलासा पक्षी जेव्हा आपण फवाऱ्यानं छोटी आंघोळ घातलेल्या झाडावरील जलबिंदू छोट्या चोचीनं टिपतो तो सुवर्णक्षण !

६. मला हे सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या चांगल्या कामगिरीनं आनंदित होणं किंवा दारुण पराभवानं निराश होणं ह्या भावनांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवण्यात मी यश मिळविलं आहे. भारतीय क्रिकेटपटूंच्या वैयक्तिक दैदिप्यमान कामगिरीचे आकडे किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील त्यांचे सर्वोच्च मानांकन हे सर्व काही झुट (हा शब्द मुद्दाम वापरला) आहे. 

७. जर तुम्ही ९५% आहार हा घरी बनविलेला घेत असाल, रात्री साडेसातपर्यंत भोजन घेत असाल तर वैद्यकीय चाचण्यांपासून दूर राहणं इष्ट ! त्या चाचण्यांमधून नक्कीच काहीतरी निष्पन्न होत राहणार. 

८. आपण सर्वजण स्वतःच्या प्रेमात पडलेलो असतो. ह्यात काही वावगं नाही. पण ह्याचा आपल्या वागण्यात कुठं अतिरेक होतोय का ह्याची जाणीव होणं आवश्यक आहे. ही जाणीव असल्यावर जाणीवपूर्वक हा अतिरेक करायचा असेल तर करावा. काही लोकांना ह्या अतिरेकाच्या परिणामांविषयी चिंता न करण्याची चैन परवडू शकते. आपण त्यातले आहोत का ह्याची जाणीव असावी. 

(बहुतेक क्रमश: पण नक्की नाही !)

बुधवार, २५ डिसेंबर, २०२४

ABB Villa Bordi





बोर्डी हे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर गुजरातच्या सीमेवर वसलेलं एक शांत गाव.  गावाची लोकसंख्या अजूनही विरळ अशी म्हणावी असल्याने बोर्डी आपलं गांवपण टिकवून आहे.  बोर्डीने आपलं हे गांवपण हे असंच टिकवून ठेवावं अशी माझी मनोमन इच्छा! पूर्वी बोर्डीची एक शैक्षणिक केंद्र म्हणून ख्याती होती. अजूनही इथं मोठ्या संख्येनं विद्यार्थी वसतिगृहात वास्तव्यास असतात. बोर्डी हे चिकूच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. चिकूच्या फळबागा इथं मोठ्या प्रमाणात आढळून येतात.  फेब्रुवारी महिन्याच्या सुमारास इथं सुप्रसिद्ध अशा 'चिकू फेस्टिवल' चे सुद्धा आयोजन केले जातं.  बोर्डीला लांबलचक असा समुद्रकिनारा लाभला आहे.  अशा विविध कारणांसाठी  बोर्डी हे एक पर्यटनस्थळ म्हणून जाणकार पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. 

एखादं गाव पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्धीस आलं की अर्थातच तिथं विविध रिसॉर्टचे पेव फुटतं.  शांत पर्यटक म्हणून भारतीय पर्यटकांची अजिबात ख्याती  नाही. आम्ही पैसा मोजून आलो आहोत, त्यामुळे आम्ही इथं आमच्या मर्जीनं  वागू असा काहीसा मुजोरपणा दुर्दैवानं रिसॉर्टमध्ये काही वेळा पाहायला मिळतो.  माझ्यासारख्या शांततेच्या शोधात असलेल्या अनेक पर्यटकांच्या सृष्टीनं ही अत्यंत त्रासदायक गोष्ट ठरते.  त्यामुळे आम्हांला बऱ्याच वेळा अशी रिसॉर्ट्स नकोशी वाटतात. 

शांतताप्रिय पर्यटकांसाठी खाजगी निवासस्थानी वास्तव्य करणे हा एक पर्याय उपलब्ध असतो.  २० ते २२ डिसेंबर दरम्यान आम्ही बोर्डी येथील ABB Villa ह्या अतिसुंदर बंगल्यात वास्तव्य केलं.  आम्ही अनुभवलेलं एक सुंदर वास्तव्य सर्वांसोबत शेअर करावं या उद्देशाने लिहलेली ही ब्लॉग पोस्ट! 

बोर्डी गावाची सायंकाळी लवकरच निद्राधीन होणारं गांव अशी ख्याती पूर्वीपासून आहे.  बालपणी आम्ही आजोळी राहायला जात असू,  त्यावेळी साडेसात वाजता रात्रीची जेवणं आटपून गावकरी चिडीचूप निद्राधीन होत असत.  ABB Villa मध्ये सुद्धा आम्हांला  हाच अनुभव आला.  हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे सहानंतरच अंधाराने आपले साम्राज्य प्रस्थापित केले होते.  थंडी जोरदार होती.  मुंबईतील लोकांना ही थंडी प्रचंड आहे असे वाटण्याची दाट शक्यता आहे.  आम्ही वसईतून आल्याने आम्ही सुरुवातीला काहीसे आत्मविश्वासपूर्ण होतो.  परंतु थोड्या वेळातच आम्ही लोकरीच्या कपड्यांचा आधार घेतला.  एबीबी व्हिला हा अत्यंत एकांताच्या ठिकाणी म्हणावा असा आहे.  जवळपास ५० -१००  मीटर अंतरापर्यंत तुम्हाला कुठेही वस्ती दिसत नाही.  या संपूर्ण परिसरात फक्त एकटे दुकटे  बंगले आहेत. त्यामुळे नीरव शांतता म्हणजे काय याचा अनुभव इथं तुम्हांला येतो. 

श्रीकांत पाटील हे या बंगल्याचे मालक. या बंगल्याचा आराखडा त्यांनी मोठ्या कल्पकतेने रचिला आहे.  खालच्या मजल्यावर एक आणि पहिल्या मजल्यावर दोन अशी एकूण तीन मोठ्या बेडरूम्स, खालील मजल्यावर प्रशस्त बैठकीची खोली, लागूनच असलेले मोठाले स्वयंपाकघर,  भोवताली निळ्याशार पाण्यानं भरलेला तरणतलाव, गच्चीवर सोलार पॅनल, परिसरात विविध प्रकारच्या फुलझाडांची, फळझाडांची लागवड.  अशा निसर्गरम्य वातावरणात तीन दिवस आम्ही मोठ्या आनंदात राहिलो. 

पर्यटकांच्या दृष्टीने येथील वास्तव्य हे सुखकारक व्हावं यासाठी श्रीकांत पाटील यांनी छोट्या छोट्या गोष्टींचा सविस्तर विचार केला आहे.  तीव्र हिवाळ्याची शक्यता लक्षात घेऊन प्रत्येक बेडरूममध्ये पुरेशा प्रमाणात ब्लॅंकेट पुरवली आहेत. पहिल्या मजल्यावर दोन बेडरूम्सच्या बाहेर दोघाजणांना झोपण्यासाठी मोठा बिछाना, ब्लॅंकेटस उपलब्ध आहेत. घरातील फ्रीज हा जीवनावश्यक जिन्नसांनी भरलेला असतो. थंड फरशीमुळे पाहुण्यांना सर्दी होऊ नये म्हणून स्लीपरचे जोड इतका सखोल विचार श्रीकांत ह्यांनी केला आहे.  थेट बागेतून टीपॉयवर पहुडलेली सफेद वेलचीची केळी आम्हांला खुणावत होती. बागेत मोठाल्या बोरांचे झाड होतेच. एक काका बंगल्याची आणि आजूबाजूच्या परिसराची अत्यंत आपुलकीने निगराणी राखत होते. आम्हांला आमच्या वास्तव्यात त्यांनी हवा तेव्हा कित्येकदा गरमागरम चहा बनवून दिला. सकाळी आंघोळीसाठी गरमागरम बंबाचे पाणी उपलब्ध होते. आपण किती वाजता उठणार हे फक्त श्रीकांत ह्यांना कळविले की काका बंब त्यावेळी सुरु करत असत.  

आम्ही एका विवाह समारंभासाठी इथे आलो असल्याने आमचे वेळापत्रक अगदी व्यस्त होते. त्यामुळं आम्हांला गच्चीवर जाऊन आकाशाचे निरीक्षण करण्याची संधी मिळाली नाही.  परंतु सवडीने येणाऱ्या पर्यटकांसाठी ही मोठी सुवर्णसंधी असेल.  आसमंतात कुठेही कृत्रिम प्रकाश अस्तित्वात नसल्याने आकाशातील अत्यंत मंद तारे सुद्धा केवळ डोळ्यांनी सुद्धा दिसू शकतील. लोकरीच्या कपड्यांनीसुद्धा आमची थंडी न गेल्याने श्रीकांत यांनी आमच्यासाठी शेकोटीची व्यवस्था केली. आमच्यातील उत्साही मंडळींनी लगेचच शेकोटी पेटवण्यात पुढाकार घेतला.  थोड्याच वेळात त्या शेकोटीच्या उबेचा  आनंद लुटण्यासाठी आम्ही सर्वजण शेकोटीभोवती गोळा झालो.  बऱ्याच वर्षांनी एका थंड प्रदेशात शेकोटीचा आनंद घेण्याचा अनुभव अविस्मरणीय असा होता.  

श्रीकांत हे माझे मोठे बंधू संजीव यांचे खास मित्र.  त्यामुळे त्यांनी आमच्यासाठी शुक्रवारी रात्री एका चविष्ट मटन बिर्याणीचे आयोजन केले होते.  ही चविष्ट मटन बिर्याणी खाऊन आम्ही सर्व तृप्त झालो. त्यानंतर संजीव आणि श्रीकांत यांनी आपल्या सुरेख गायनानं आमचे मनोरंजन केले. रात्रीचे अकरा वाजले होते. बोर्डीच्या मापकदंडानुसार ही मध्यरात्रीनंतरची वेळ!  सकाळी लवकर उठून लग्न समारंभाला आम्हाला हजर राहायचे असल्याने आम्ही झोपायच्या तयारीत होतो. तेव्हा बोर्डीतील प्रसिद्ध शेतकरी आणि सुप्रसिद्ध 'द जंगल फार्म' चे (The Jungle Farm) मालक सूर्यहास चौधरी यांचे आगमन झाले.  त्यानंतर गप्पांना बहर आला.  पूर्वीच्या काळातील आठवणींपासून सुरू झालेल्या गप्पा सद्यकाळातील शेती उत्पादन आणि शेती उत्पादनातील विविध समस्या इथपर्यंत येऊन पोहोचल्या.  सूर्यहास हे पारंपरिक पद्धतीने शेती करतात. The Jungle Farm ला ह्यावेळी अगदी धावती भेट दिली. पण लवकरच सवडीने भेट देऊन त्यावर मोठी पोस्ट लिहिण्याचा मानस आहे. सकाळी उठण्याचे भान ठेवून आम्ही बारा वाजता गप्पा आटोपत्या घेतल्या.  या निसर्गरम्य थंड वातावरणात झोप ही अत्यंत गाढ असते.  त्यामुळे केवळ पाच ते सहा तास झोपलो असलो तरी सकाळी प्रसन्नचित्ताने आम्ही उठलो. 

परिसरात चिकू,बोरं, पपई, आंबे यांच्या झाडांसोबत विविध प्रकारची गुलाबं, जास्वंदी, सदाफुली आणि मला नावं माहिती नसलेले अनेक फुलं यांचा समावेश आहे.  खास वैशिष्ट्य म्हणजे रुद्राक्षाचे झाड! श्रीकांत आणि त्यांची पत्नी बाबा अमरनाथ ह्यांच्या आशीवार्दानं पवित्र झालेली ह्या झाडाची रुद्राक्षे प्रत्येक जोडप्याला भेट देतात. हा एक खास अनुभव !   

इथे अत्यंत शुद्ध अशा निळ्याशार पाण्याचा तरणतलाव आमच्यातील काही जणांना खुणावत होता.  परंतु इतक्या थंड वातावरणात भल्या पहाटे त्यात डुंबण्याची हिंमत नसल्याने म्हणा किंवा लग्नाला जाण्याची घाई असल्याने म्हणा या तरणतलावाचा आनंद लुटण्याची संधी आम्हांला गमवावी लागली. परंतु जे कोणी पर्यटक सवडीने या ठिकाणी जातील, त्यांना या तरणतलावातून बाहेर काढणे हे जिकरीचे काम असेल हे नक्कीच मी सांगू इच्छितो. 

या बंगल्याकडे जाण्याचा रस्ता शेवटची पाच मिनिटे अत्यंत खडबडीत असा आहे.  सुरुवातीला आम्ही काहीसे कंटाळले होतो.  परंतु हा खडबडीत असा रस्ता असल्याने तिथे अजिबातच वाहतूक नाही त्यामुळे शांतता अबाधित  राहते ह्याची जाणीव ज्यावेळी आम्हांला झाली त्यावेळी त्या रस्त्याच्या खडबडीतपणाचे आम्ही आभार मानले.  हल्लीच्या मुंबईत जो कोणी राहतो त्याला शांततेचे इतके मोल आहे की आपण शांततेसाठी जंग जंग पछाडू शकतो.  दुर्दैव म्हणावे पण ही वस्तुस्थिती आहे. 

अत्यंत शांततामय परिसरात आकर्षक वातावरणात वैयक्तिक आवडीनिवडी ध्यानात घेणारी एक अविस्मरणीय सहल जर तुम्हांला अनुभवायची असेल तर ABB Villa Bordi ला भेट देणे तुम्हांला क्रमप्राप्त आहे! श्रीकांत पाटील हे ९८२००२०४४९ ह्या भ्रमणध्वनी क्रमांकावर उपलब्ध आहेत. 

आम्ही घेतलेली परिसरातील काही छायाचित्र !










शनिवार, ९ नोव्हेंबर, २०२४

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

 


दोन पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर होत राहतं. आयुष्य हा मोठा कालावधी आहे. त्यामुळं ज्या कालावधीत आपल्या ह्या नात्यात थोडाफार तणाव निर्माण होतो त्यावेळी काही काळ शांत राहणं योग्य असं माझं मत! काही वर्षात संदर्भ बदलतात, आपण दुसऱ्या भुमिकेत प्रवेश करतो त्यावेळी आपल्याला आपल्या नातेवाईकांच्या भूतकाळातील भुमिकेमागील विचारसरणी अधिक स्पष्टपणे समजू शकते. त्यामुळं कधीही कोणाविषयी टोकाचे गैरसमज करून घेऊ नयेत. प्रत्येकजण आपल्या भूमिकेत थोड्या प्रमाणात का होईना बरोबर असतो, प्रत्येकाच्या वागण्याबोलण्यामागे काही तरी कारण असतं.

आम्ही वाढलो तो काळ वेगळा होता. भारतानं मुक्त आर्थिक धोरण स्वीकारलं नव्हतं. माझ्या पहिली नोकरीत (जी मी पहिल्या आठवड्यातील गुरुवारी सोडली) मला मोजका पगार मिळणार होता. माहिती आणि तंत्रज्ञान संबंधित नोकऱ्या भारतात अत्यल्प प्रमाणात असल्यानं पारंपरिक नोकऱ्यांवर अवलंबून राहावं लागत होतं. पारंपरिक नोकऱ्यांचे प्रमाण अगदी कमी होतं. त्यावेळी असलेल्या कमी पगारांमुळं स्वतःच घर घेण्याचा विचार जर केलाच तर तो वयाच्या चाळीस - पंचेचाळीशीनंतर करावा अशी मनोधारणा होती.

घरातील आर्थिक परिस्थिती चांगली असली तरीही पैसे जपून वापरावेत ही मानसिकता होती. हॉस्टेलला जाताना आठवड्याभरासाठी शंभर रुपये घेऊन जात असू, आणि ते ही पुरेसे होत. वसई स्टेशन ते रमेदी हे तिकीट बहुदा एक रुपया होते. ह्या बससाठी आम्ही अर्धा अर्धा तास स्टेशनवर वाट पाहत असू.

हे सर्व सांगण्याचा हेतू हा केवळ त्याकाळची आर्थिक परिस्थिती कशी होती हे सांगणं इतकाच आहे. अशा परिस्थितीत सुद्धा आम्ही बऱ्यापैकी आनंदी होतो. 'दिल ही छोटा, छोटी सी आशा !' असला प्रकार होता. मी फारसा महत्वाकांक्षी नव्हतो. आयुष्यावर नियंत्रण मिळवावं असं वाटावं इतका आत्मविश्वास बहुदा नव्हता. अशी पार्श्वभूमी सोबतीला घेऊन आम्ही व्यावसायिक जीवनात आणि त्यानंतर वैवाहिक जीवनात प्रवेश करणार होतो. केवळ प्रामाणिक मनोभावनेने व्यावसायिक, वैवाहिक जीवनात प्रयत्न करत जीवन व्यतित करावं ही मानसिकता होती आणि जी आमची एक मोठी जमेची बाजू होती.

त्यानंतर आयुष्य जसं उलगडत गेलं तसं आम्ही त्याला स्वीकारलं. आयुष्यातील सुरुवातीच्या काळात मिळालेल्या शिकवणुकीमुळं भविष्यात जर बिकट परिस्थिती उद्भवली तर आपल्याजवळ अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याइतकी तरी बचत असावी हा विचार आम्ही कायम आयुष्यभर बाळगला. २००४ साली अमेरिकेत असताना निर्वासित लोकांच्या निवाराघरात जाऊन मी स्वयंपाक केला होता. वीस - पंचवीस कोबी कापले होते. त्यावेळी तिथल्या संचालिकेने सांगितलेले बोल माझ्या सदैव लक्षात राहिले आहेत. ती म्हणाली, "ही लोक ह्या निर्वासितांच्या छावणीत राहत आहेत म्हणून ह्यांच्याकडे तुच्छतेनं पाहू नका. अमेरिकेतील कोणत्याही मध्यमवर्गीय माणसाचे ओळीनं तीन - चार निर्णय चुकीचे ठरले तर त्याच्यावर ही पाळी येऊ शकते." हे वाक्य जरा जास्तच प्रमाणात माझ्या डोक्यात भरून राहिलं आहे.

हल्लीच्या काळात विवाह का करावा हा मोठा गहन प्रश्न बनला आहे. माणसं जसजशी आर्थिकदृष्ट्या अधिकाधिक स्वावलंबी होत चालली तसतसं हे घडणं क्रमप्राप्तच होतं. विवाहानंतर जीवन परिपूर्ण होतं असं आपण छातीठोकपणे सांगू शकतो का? नक्कीच नाही. कोणताही माणूस परिपूर्ण नसतो, कोणतंही जोडपं आदर्शवत नसते. माणसाला आयुष्यभर आपल्या सर्व त्रुटींसह स्विकारणारं, आपली सर्व भयं ज्याला अगदी मोकळेपणानं सांगू शकतो, ज्याला हक्काने आपल्या महत्त्वाच्या क्षणी हाक मारु शकतो असं कोणीतरी हवं असतं. लहानपणी ही भूमिका बजावणारे आईवडील, भावंडं आयुष्यभर आपल्याला पुरे पडू शकत नाहीत. आपला साथीदारच आपल्याला अशी साथ देऊ शकतो किंबहुना त्यानं/ तिनं अशी साथ द्यावी अशी अपेक्षा असते. बहुतेक सर्वांसाठी एकटेपणा हा सर्वात मोठा शत्रू ठरू शकण्याची शक्यता असते. मराठीत म्हण आहे - 'रिकामी मन सैतानाचे घर' ! माणूस एकटा राहिला की मनात नको नको ते विचार येतात, खाण्यापिण्याच्या वेळांवर, आहारावर नियंत्रण राहत नाही. माणसाला फारसा मोकळा वेळ मिळू न देणं हा विवाहसंस्थेचा एक छुपा फायदा आहे.

आता चर्चेचा ओघ "योग्य साथीदाराची निवड कशी करावी ?" ह्या मुद्दयाकडे नेऊयात. आयुष्यभर आनंदानं विवाहबद्ध राहणं ही फार मोठी गोष्ट आहे. आयुष्यभराच्या कालावधीत पती पत्नी दोघांच्या स्वभावात बरेच बदल घडत असतात. लग्नाआधी समोरच्या माणसाची जी ओळख आपल्याला असते ती बहुदा हिमनगाच्या पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगणाऱ्या भागाइतकी असते. माणसाचं खरं रूप त्याच्यासोबत चोवीस तास राहायला सुरुवात केल्यानंतर समजायला लागतं. पण ह्यात एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी. आपल्याला आपणच किती कळलो आहोत हा महत्वाचा मुद्दा आहे. लग्नाआधीचं स्वातंत्र्य काही / बऱ्याच प्रमाणात लोप पावतं. पण ही काही नकारात्मक गोष्ट नाही. लग्नानंतर आपल्याला आपली ओळख पटली आणि साथीदाराच्या वागण्याची कल्पना आली की आपण आपल्यात योग्य असे बदल घडवून आणून ह्या नात्यात गोडवा आणू शकतो. Every relationship needs a owner. हे स्वामित्व स्त्री किंवा पुरुष ह्यापैकी कोणीही घेऊ शकतं. ह्या स्वामित्वात मला नक्की काय अभिप्रेत आहे? सुरुवातीच्या काळात काही वेळा शाब्दिक अपमान सहन करावा लागणं, घर टापटीप ठेवण्याची जबाबदारी घेणं, वाद झाल्यावर इगो बाजूला ठेऊन काही वेळानं पुन्हा संवाद सुरु करण्यात पुढाकार घेणं अशा काही गोष्टींचा समावेश होतो. आपल्या साथीदाराला नक्की काय आवडतं, कोणती गोष्ट अजिबात खपत नाही ह्याची अभ्यासपूर्ण माहिती करून घेणं हे महत्वाचं असतं.

हे मुद्दे लक्षात घेता आपला साथीदार व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी असणे ही सुखी वैवाहिक जीवनातील एकमेव महत्वाची गोष्ट नाही हे आपल्या ध्यानात येईल. हल्ली स्त्रिया सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने प्रगती करत आहेत. त्यामुळे अशा प्रत्येक स्त्रीने आपल्यापेक्षा वरचढ असा साथीदार मिळावा अशी अपेक्षा बाळगणं योग्य ठरणार नाही. लौकिकार्थाने कमी यशस्वी नवऱ्याकडे एक चांगला माणूस म्हणून पाहणं हे महत्त्वाचे आहे. कोणत्याही व्यक्तीच्या पार्श्वभूमीवरून (background) त्याविषयी पूर्वग्रह बनवू नये. 

साथीदाराने आपल्या महत्वाच्या क्षणी आपल्यासाठी उपलब्ध असणं ही प्रत्येक विवाहित व्यक्तीची महत्वाची गरज असते. आणि हे उपलब्ध असणं हे केवळ त्या जागी असण्यानं नव्हे तर मनानं तिथं पूर्णपणे असण्यानं असावं. साथीदाराविषयी असणारी Empathy हा वैवाहिक जीवनाच्या यशस्वीतेसाठी आवश्यक असणारा सर्वात मोठा घटक आहे. ही Empathy आपल्या वागण्यातून, आपल्या संवादशैलीतून प्रतित व्हायला हवी. हे सर्व मुद्दे काहीसे विस्कळीत स्वरूपात मांडले आहेत पण ह्यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे एखाद्या व्यक्तीचं व्यावसायिक यश हा एकमेव मुद्दा आपल्या साथीदाराची निवड करताना डोळ्यासमोर नसावा.

ह्यापुढील  विचार अस्ताव्यस्त असणार आहेत. त्यामुळं संयम बाळगावा ही विनंती.

१. अमेरिकेत २००७ सालापर्यंतच्या वास्तव्यात माझ्या संपर्कात आलेल्या काही अमेरिकन सहकाऱ्यांच्या बाबतीत एक समान धागा दिसून आला होता. ह्या सर्वांच्या पहिल्या लग्नाची परिणिती घटस्फोटात झाली होती. पण त्यामुळं हताश न होता त्यांनी दुसरं लग्न केलं होतं आणि त्यात मात्र हे पठ्ठे गुण्यागोविंदानं नांदत होते. माझा त्यावेळचा माईक त्या कालावधीत माझ्याशी बऱ्यापैकी मोकळेपणानं बोलायचा. त्यानंच एकदा सहजपणं सूचित केलं की पहिल्या लग्नबंधनात प्रवेश करताना ही माणसं बहुदा अवास्तव अपेक्षा बाळगत असावीत. पण दुसऱ्या लग्नात मात्र त्यांचे पाय जमिनीवर आलेले असतात, सहचारिणीशी जुळवून घेण्यासाठी जे काही बदल घडवून आणावे लागतात त्यांची मानसिक तयारी त्यांनी केलेली असते. काहीसा मनोरंजक मुद्दा!

२. अमेरिकेत असताना अजून एक गोष्ट वारंवार जाणवायची. सार्वजनिक आयुष्यात बरेच नियम सामोरे यायचे आणि सर्वजण त्यांचं अगदी काटेकोरपणे पालन करायचे. त्यामुळं आयुष्य अगदी सुरुळीतपणे पार पडायचं. रस्त्यावरील सिग्नलचे पालन,मार्गिकांना उगाचच छेद न देणारे चालक, मोठाल्या दुकानात वर्षोनुवर्षे मिळणाऱ्या ताज्या भाज्या, मासे, केक ह्यामुळं मेंदूवर ताण असा पडायचा नाही. आपल्या देशात कसा मेंदू अगदी सतर्क अवस्थेत राहतो. कार चालवताना उजव्या, डाव्या बाजूने अचानक अवतीर्ण होणारे बाईक / रिक्षावाले, वाटलं म्हणून समोरून आत्मविश्वासानं रस्ता पार करणारा पादचारी ह्यामुळं मेंदू जागृत असतो. ह्या उदाहरणातून घेण्याचा मुद्दा हा की आपल्या मेंदूला एकदा की सुस्पष्ट पर्याय उपलब्ध असलेले आयुष्य जगायची सवय झाली की थोडी जरी क्लिष्ट परिस्थिती आली की तो बिचारा गोंधळून जातो.

३. वरील उदाहरणाचा दाखला घेऊन एकत्र आणि विभक्त कुटुंबपद्धतीत वाढलेल्या मुलांचा विचार करूयात. एकत्र कुटुंबात वाढलेल्या मुलांना आयुष्यात चूक किंवा बरोबर, आनंद किंवा वाईट ह्यामधील ज्या असंख्य छटा आयुष्य आपल्यासमोर सादर करू शकतं त्या दैनंदिन जीवनात अगदी सहजासहजी पाहायला मिळायच्या. त्यामुळं लग्नाला (आयुष्यातील अशी एक घटना जी आपल्यासमोर चूक किंवा बरोबर ह्यामधील अगणित शक्यता सादर करू शकतं) सामोरं जाताना ही मुलं अजाणतेपणी त्यासाठी सज्ज झालेली असायची. "दैनंदिन आयुष्यात तू चुकलास" असं कोणी सांगितलं तर मोठा प्रलय आला अशी परिस्थिती उद्भवत नाही ही शिकवणूक एकत्र कुटुंबपद्धतीनं दिल्यानं नवरे मंडळींना सतत त्यांच्या चुका दाखविल्या गेल्या तरीही आपण आयुष्यात काही बरोबर करूच शकत नाही असा न्यूनगंड वगैरे निर्माण होत नसे.

४. वरील उदाहरणाचे दूरगामी परिणाम झाले. स्त्रियांना एकत्र कुटुंबपद्धतीत स्वातंत्र्य अनुभवायला न मिळाल्यानं त्यांच्या मनात स्वातंत्र्याची आस निर्माण झाली. हळूहळू त्याचं परिवर्तन प्रत्यक्ष आचरणात यायला लागलं. काहींनी ही स्वातंत्र्याची कास स्वतः धरली तर काहींनी हे बीज आपल्या पोटात वाढणाऱ्या पुढच्या पिढीकडं सुपूर्द केलं. पुढील पिढीला अनुकूल वातावरण मिळाल्यानं त्यांनी आपल्या आचारविचारांतून ह्या स्वातंत्र्याला कवटाळलं. हे स्वातंत्र्य मिळालं, ज्याची आस धरली ते मिळाल्याचा déjà vu क्षण आला. पण पुढं काय? आयुष्य खूप दीर्घकालीन असतं. विविध टप्प्यावर ते आपल्याला एकच प्रश्न वारंवार विचारत राहतं. गतआयुष्यातील आपल्या निर्णयांचं परीक्षण करायला भाग पाडत राहतं. नव्या पिढीनं हा मुद्दा ध्यानात घ्यायला हवा.

५. Giving it back to Society - समाजऋणाची परतफेड - मनुष्यजातीच्या आरंभीस बलवान टोळ्यांनी वर्चस्व प्रस्थापित केलं. त्यानंतर बुद्धिमान माणसांनी आपल्या बुद्धीद्वारे हळूहळू समाजव्यवस्थेचा ताबा घेतला. पुढं हे चालू ठेवायचं असेल तर सुशिक्षित स्त्री - पुरुषांनी आपला वंश पुढे वाढवायला हवा. ह्या मुद्द्यामुळं मला बुरसटलेल्या विचारसरणीचा संबोधिण्यात येण्याची शक्यता ध्यानात घेऊन सुद्धा मी हा मुद्दा उपस्थित करत आहे.

६. सद्यपिढीने दाखविलेला संवादकलेचा प्रचंड अभाव - सद्य पिढीनं विवाहसंस्थेविषयी बहुतांश नकारात्मक संदेश नवीन पिढीपर्यंत पोहोचवले. चाळीस - पन्नास वर्षे संसार केलेली जोडपी सुद्धा जेव्हा सर्वांसमोर एकमेकांचा अपमान करतात, पूर्ण आयुष्याचा फक्त आणि फक्त नकारात्मक हिशोब मांडतात, तेव्हा ही विवाहसंस्था फक्त दिखाऊ / दांभिक आहे का असा विचार नवीन पिढीच्या मनात आल्याशिवाय राहत नाही. विवाहसंस्थेच्या बाबतीत व्यक्त केल्या जाणाऱ्या नकारात्मक संदेशाच्या तुलनेत अगदी खरेखुरे वाटणारे सकारात्मक संदेश तुलनेनं खूपच कमी आढळतात.

७. तिरंगी सामना - हा केवळ माझा सिद्धांत आहे. ह्या सिद्धांत मांडल्यामुळं मी वेडा आहे अशा निष्कर्षापर्यंत तुम्ही कृपया येऊ नकात. सर्वशक्तिमानानं विश्वाची निर्मिती केली. मनुष्यानं हळूहळू आपल्या बुद्धीचे प्रताप दाखविण्यास सुरुवात केली. भूमातेवरील सर्वोत्तम बुद्धिमान माणसांनी जर आपल्या प्रज्ञेचा पुरेपूर वापर केला तर कधीतरी ते आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या वर्चस्वाला आव्हान देऊन कदाचित आपल्याला विस्थापित करतील असं भय हल्ली सर्वशक्तिमानाला वाटू लागलं असावं. त्यामुळं मनुष्यांना विचलित करण्यासाठी त्यानं संगणकांच्या माध्यमातून AI / ML चा किडा आपल्या डोक्यात घुसवला आहे. AI / ML ने सुसज्ज झालेले संगणक भविष्यात सर्वशक्तिमान आपल्या बाजूनं ओढून घेईल आणि मग सुरु होईल तो सर्वशक्तिमान आणि AI / ML ने सुसज्ज झालेले संगणक एका बाजूला आणि बुद्धिमान माणसं दुसऱ्या बाजूला असा लढा ! आता ह्या सर्वात विवाहसंस्थेचा संबंध काय हे अजून तुम्हांला कळलं नसेल तर सांगू इच्छितो की बुद्धिमान मनुष्यांच्या मनात "पुढील पिढी निर्माण करण्याचं प्रयोजनच काय?" असल्या नसत्या शंका निर्माण करण्याचं काम सर्वशक्तिमान करत आहे. नवीन पिढीनं हे लक्षात घेणं आवश्यक आहे.

लेखाची सुरुवात कुठं झाली आणि शेवट कुठं झाला !! असो मी आणि लेख जरी भरकटला असला तरी ह्यातील महत्वाचे मुद्दे ध्यानात घ्यावेत ही विनंती ! आणि मुद्दा ७ हा खासच आहे, त्यावर नक्की विचार करा!!


सोमवार, २१ ऑक्टोबर, २०२४

बालपणात (अति) गुंतलो मी !

 



युरोप प्रवासवर्णनाची शेवटची दोन - तीन पुष्पं गुंफायला काही कारणांमुळं अक्षम्य दिरंगाई होत आहे. 'देर से आये पर दुरुस्त आये' असं काही तरी म्हणतात ते हे दोन - तीन भाग लिहिल्यानंतर खरं ठरावं अशी आशा ! पुढील भाग कधी येणार अशी पृच्छा एकाही वाचकाने न केल्यानं त्या गोष्टीचं दडपण नाही ही चांगली गोष्ट !

'बालपणातील दिवस खरे सुखाचे दिवस' असं हल्ली बऱ्याच वेळा ऐकायला मिळतं. ह्या विधानाविषयी मला आक्षेप नाही. आयुष्यातील ह्या सुवर्णकाळात मनानं जर आपण जास्तच गुंतून राहिलो तर आयुष्यातील इतर गोष्टींवर परिणाम होऊ शकतो का ह्याचा उहापोह करण्याचा हा प्रयत्न. ही माझी वैयक्तिक मतं असून त्यांचा कोणत्याही विशिष्ट गटावर , गावावर रोख नाही हे आधीच मी स्पष्ट करू इच्छितो. सोमवारी सकाळी हा लेख लिहिण्याचा भुंगा डोक्यात शिरल्यानं हा लेख अति संक्षिप्त स्वरूपात असणार आहे. 

१. आपलं बालपण अगदी सुखात गेलं असेल तर आपण नक्कीच सुदैवी आहात. ह्या सुखी बालपणामागे आईवडील, लहान मोठी भावंडं आजी - आजोबा, काका, काकू , आत्या, मामा, मामी, मावशी ह्या मंडळींचा मोठा हातभार होता. आता आपण जसा बालपणीच्या आठवणींचा गवगवा करतो आहोत तसा गवगवा करण्याची संधी ह्या मंडळींना मिळाली होती का हे आठवून पाहण्याचा प्रयत्न करा. 

२. बालपण सुखात गेलं, तुम्ही मोठे झालात. आता नवीन जबाबदाऱ्या आल्या, नवीन भूमिकांत तुम्ही प्रवेश केलात. मुलांच्या लहानपणी त्यांचे व्यवस्थित लाड केलेत. विशीत पोहोचलेल्या मुलांशी सुसंवाद सुरु ठेवण्यासाठी, त्यांच्या समस्या खरोखर जाणून घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न केलेत का? उत्तर होकारार्थी असेल खूप छान. तुमचं अभिनंदन. पण नसेल तर मग आताच विचार करायला हवा. आतापर्यंत घडलेलं आपलं व्यक्तिमत्व आपल्याला बालपणी मिळालेल्या शिकवणुकीमुळं घडलं. नवीन भूमिका, जबाबदाऱ्या पेलविण्यासाठी ह्या व्यक्तिमत्वाला नवीन पैलू पाडण्याचं काम तुम्ही केलंत का?

३. आतापर्यंत नोकऱ्या, व्यवसायही व्यवस्थित पार पाडलेत. इतक्या वर्षांची गुंतवणूक केल्यानं आता अधिक जबाबदारी असणाऱ्या संधी तुम्हांला कदाचित खुणावतील. त्या स्वीकारण्यासाठी आवश्यक असणारी नवीन कौशल्यं अवगत करण्याची, अधिक वेळ देण्याची गुंतवणूक करायला तुम्ही सज्ज आहात ना? मुद्दा असा आहे की अशी संधी मिळत असेल तर ती दवडू नका.  अशा सामोऱ्या येणाऱ्या संधींचा स्वीकार करा. बालपणीच्या स्मृती मधुर आहेतच, त्या सवंगड्यांसोबत असलेले आपले बंध अतुलनीय आहेत . पण सद्यकाळात सुद्धा अशा आठवणी घडू शकतात, असे बंध जुळू शकतात हेही कुठंतरी लक्षात असायला हवं.  

शनिवार, १४ सप्टेंबर, २०२४

रस्त्यावरील पडद्यावर दाखविले जाणारे चित्रपट - वसईतील आठवणी




काल आमच्या शाळेच्या व्हाट्सअँप ग्रुपवर गावात मैदानावर तात्पुरता पडदा उभारून त्यावर दाखविल्या जाणाऱ्या शिणुमाविषयीची एक पोस्ट आली. आमचे शालेय मित्र अगदी जाणकार आहेत. असा शालेय जीवनातील कालावधीतील आठवणींशी संबंधित विषय निघाला की खूप मस्त चर्चा होते. १९८० - १९९० कालावधीतील जुन्या आठवणींचं भांडार उघडलं जातं. लहानपणी माझा संचार प्रामुख्यानं घर, घराभोवतालचा परिसर आणि शाळा ह्या ठिकाणांपुरता मर्यादित असल्यानं ह्या "रस्ता -मैदान सिनेमा" संबंधित आठवणीत मी भर घालू शकलो नाही. पण काल ग्रुपवर मित्रांनी व्यक्त केलेल्या ह्या आठवणींचं संकलन करण्याचा हा एक प्रयत्न ! ह्या रम्य आठवणी सांगितल्याबद्दल सर्वांचं मनःपुर्वक आभार !

सिनेमा पडदा / प्रोजेक्टर व्यावसायिक - त्या काळात रमेदी विभागातील तेली कुटुंबीय, पारनाक्यावरील भाटकर कुटुंबीय आणि होळीवरील फडके हे तीन व्यावसायिक वसई गांव आणि भोवतालच्या परिसरात सिनेमा पडदा / प्रोजेक्टर ही सेवा पुरवत असत. 

तत्कालीन वसई ग्रामस्थांच्या मनोरंजन विश्वात पडद्यावर दाखविले जाणारे चित्रपट अगदी महत्वाचे स्थान बाळगून होते. त्यामुळं कामगारदिनानिमित्त होणाऱ्या सत्यनारायण पूजेनंतर रात्री कोणता चित्रपट दाखवावा, गावातील तीन व्यवसायिकांपैकी कोणाकडून ही सेवा उपलब्ध करून घ्यावी हे निर्णय घेण्यासाठी कार्यकारी मंडळ घमासान चर्चा करत असे. घमासान हे विशेषण शक्यतो युद्धाच्या संदर्भात वापरलं जातं. कालच्या चॅटवर हे विशेषण चर्चेसाठी वापरण्यात आलं.  ह्यावरून ह्या चर्चेची तीव्रता, त्यात गुंतल्या गेलेल्या भावना ह्याचा अंदाज बांधता येतो.  

ह्या व्यावसायिकांच्या निवड प्रकियेमध्ये त्यांच्याकडं जातीने जाऊन उपलब्ध असलेल्या चित्रपटांची यादी पाहणे, प्रिंटचा दर्जावर  कार्यकारी मंडळातील सदस्यांमध्ये होणारे बौद्धिक हे अत्यंत महत्वाचे टप्पे असत. चित्रपट मराठी असावा की हिंदी ह्यावरून सभासदांमध्ये दोन तट पडत. इंग्लिश चित्रपट सार्वजनिक ठिकाणी कुटुंबासमोर दाखवू नये हे तारतम्य सर्व सभासद बाळगून असल्यानं तिसरा तट पडत नसे. मराठी विरुद्ध हिंदी वादाला शमविण्यासाठी आळीतील जुनीजाणती मंडळी पुढाकार घेत असत. 

आळीतील बालगोपाळांचा ह्या पिक्चरच्या निवडप्रक्रियेत सहभाग नसला तरी सत्यनारायणाच्या पूजेची वर्गणी गोळा करण्यासाठी ही मंडळी आपल्या आळीबाहेर, वडीलधारी मंडळींनी आखून दिलेल्या हद्दीबाहेर जाऊन सुद्धा वर्गणी गोळा करत असत. त्यांच्या ह्या व्रात्य हरकतींमुळं वसईतील दोन आळींमधील गुण्यागोविंदाच्या संबंधांना बाधा आल्याचं उदाहरण ऐतिहासिक बखरींमध्ये आढळत नाही. 

एप्रिल महिन्यात तत्कालीन वसईतील शालेय मुलांच्या जीवनात आळीत दोन किंवा तीन शिफ्टमध्ये रबरी चेंडूने क्रिकेट खेळणे, गोळेवाल्याकडून दहा पैशाला एक गोळा (अधिक रंगासहित) खाणे, शेजारच्या आळीतील कैऱ्या दगडानं पाडून त्यात मसाला, मीठ टाकून कोशिंबीर (हा अगदी पांढरपेशा मराठी शब्द झाला) करून खाणं वा पन्हं बनवून पिणं  आणि तीस एप्रिलला घोषित होणाऱ्या निकालाची वाट पाहणं ह्याव्यतिरिक्त फारसं काही इंटरेस्टिंग नसल्यानं कामगारदिनानिमित्त दाखविल्या जाणाऱ्या ह्या चित्रपटांशी संबंधित घडामोडी एप्रिल महिना थोडाफार मनोरंजक बनवत असत. पूजेनंतर झालेल्या प्रीमियर शो नंतर उर्वरित सुट्टी ह्या शोच्या आठवणी आळवण्यात जाई. 

अजूनही तेली कुटुंब डिजिटल प्रोजेक्टर, स्क्रीन, डिजिटल पडदा भाड्याने देण्याच्या व्यवसायात आहेत. फक्त सिनेमा ग्राहकांनी निवडायचा आणि त्यांनीच स्वतःच्या  मोबाईलवरून किंवा लॅपटॉप वरून प्रोजेक्टरला कनेक्ट करायचा हे बदल घडून आले आहेत. 

सार्वजनिक ठिकाणी पडदा उभारून पिक्चर दाखवणारी वसईतील प्रसिद्ध ठिकाणं 

इथं बऱ्याच वेळा सिनेमा ऐवजी पिक्चर ह्या शब्दाचा जाणीवपूर्वक वापर करण्यात आला आहे. तत्कालीन बरेच नागरिक पिक्चर हाच शब्दप्रयोग करीत. 
  • कोळीवाडा, पोलीस लाईन, पारनाका ह्या ठिकाणी असे सार्वजनिक ठिकाणी  प्रदर्शित होणारे चित्रपट पाहता येत असत. 
  • खोचीवडा, भंडारआळी, नायगाव, दरपाळे, खोचीवडा कोळीवाडा, किरवली, पापडी बाजार, पापडी ब्राह्मणआळी, वसई पारनाका, प्रभूआळी, झेंडा बाजार, चोबारे, चणेबोरी, भुईगांव ह्या ठिकाणी सुद्धा ह्या चित्रपटांचा आनंद लुटता येत असे. 
  • वसईत पूर्वी बहुतेक देवतलाव जवळ एक चंद्रलेखा नावाचे walk in थिएटर होते. तिकडे खुर्च्या नव्हत्या. जाऊन थेट जमिनीवर बसून picture बघावा लागे असे ऐकिवात आहे. लगेचच ह्या माहितीला दुजोरा देण्यात आला. "मी चंद्रलेखाला 'दुनिया मेरी जेब मे' हा सिनेमा पहायला गेलो होतो... without entry pass" असे मुख्य जाणकारांनी तात्काळ सांगितलं. 
  • रमेदी दत्त मंदिर इथं "वो कौन थी" हा चित्रपट पाहिल्याची आठवण काढण्यात आली.  
सहअध्यायी मंडळींनी नोंदविलेल्या आठवणी इथं सादर करीत आहे. 
  • हनुमान जयंतीनिमित्त झेंडाबाजारात दरवर्षी जत्रा भरायची. त्यानंतर रात्री पडद्यावर सिनेमा दाखवित असत.
  • झेंडाबाजारात संजय दत्तचा रॉकी चित्रपट पाहिला असल्याचं आठवतं असं जाणकार म्हणाले. ह्यावरून संजय दत्त ह्यांच्यासारखी पिळदार देहयष्टी बनविण्याची सुप्त इच्छा जाणकार बाळगून होते ह्या जुन्या दाव्याला पुष्टी मिळते. 
  • किल्लाबंदरला जाणारी शेवटची बस गेली की (बहुदा) रस्त्यावर पडदा उभारून चित्रपट दाखवला जात असे. उपलब्ध परिस्थितीत मार्ग कसा काढावा हे ह्या उदाहरणातून अगदी उत्तमरित्या आपल्यासमोर उभं राहतं. 
  • बाजीपुर कॉलेजच्या मैदानावर दरवर्षी सत्यनारायणाच्या पूजेच्या फडके, होळी ह्यांच्याकडून आणलेला भयपट दाखवला जाई. इतरांना रात्री घाबरलेले बघून  भारी वाटायचे. ह्या विधान मानवी स्वभावाच्या एका महत्वाच्या पैलूचा उलगडा आपल्याला होतो. फडके ह्यांच्याकडे रामसे बंधूंच्या चित्रपटांचा भरपूर खजिना असायचा असे जाणकार म्हणाले. 
  • आता जिथे सुरतवाला complex आहे तिथे लहानपणी सुरतवाला चाळ होती. त्यासमोर देसाई वाडा आणि चाळ होती. "जागृती मित्र मंडळ" ही आमच्या वाड्यातली सक्रिय संस्था. गेल्या काही वर्षांपासून ते सुरतवाला इथं सार्वजनिक गणपती बसवतात. पूर्वी दरवर्षी  डिसेंबर महिन्यात सकाळी वार्षिक सत्यनारायण पूजा आणि रात्री शेवटची बस गेली की पडद्यावरचा चित्रपट असे. सिध्दार्थनगर आणि पोलीस लाईन मधले लोक पडद्याच्या पलीकडे बसत ( त्यामुळे त्यांना अमिताभ right handed आणि धर्मेंद्र left handed दिसत असे). ही अत्यंत मनोरंजक माहिती पुरविण्यात आली. उलट्या बाजूनं बसून चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना चित्रपटाचा खराखुरा आनंद मिळत असावा का ह्याविषयी जाणकारांनी आपलं मत व्यक्त करावं. 
  • पोलिस लाईनीत गणेशोत्सव एप्रिल-मे महिन्यांत सार्वजनिक सत्यनारायणाची पूजा असायची. ह्या दोन दिवशी पडद्यावर चित्रपट दाखवला जायचा. नंतरच्या काळात VCR आले..भाड्याने VCR आणि कॅसेट आणून रात्री तीन चित्रपट दाखवले जायचे. तरीदेखील एक दिवस मात्र पडद्यावरचा चित्रपट असायचाच. त्यावेळी शाळेला हरितालिका ते अनंत चतुर्दशी अशी सुट्टी असायची .
  • आम्ही सर्व मित्र, भावंडं फाटक आळीत दरवर्षी सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी फाटक आळीत सिनेमा बघायला जायचो. 'बॉम्बे टू गोवा' हा चित्रपट बघितलेला मला आठवतोय.
  • खोचिवड्यात दरवर्षी त्यावर्षीचा सर्वात हिट पिक्चर (जसं की शोले, जानी दुश्मन, जॉनी मेरा नाम, दिवार) आणून लोकांना त्याचा आनंद लुटण्याची संधी दिली जात असे. 
  • माझ्या  दरपाळे गावात पण मे महिन्यात पडद्यावर पिक्चर असायचा.
  • वसई मार्केटमधील नगरपालिकेच्या नाट्यगृहात पुजा असताना पडद्यावर सिनेमा दाखवला जायचा.विपुल स्विट कॉर्नर ते बाफना क्लॉथचा कॉर्नर असा पडदा लावायचे. एकदा सिनेमा चालू असताना कस्टम ऑफिसर फियाटमधुन आला. पब्लिकला माहिती नव्हते. त्याला जाऊन दिलं नाही म्हणून त्याने फायरींग केले.पब्लिकने त्याची गाडी फोडली. तेव्हापासून सिनेमा बंद झाला.
  • पडद्यावर सिनेमा पाहणे ही एक पर्वणीच असायची. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. तेव्हा रस्त्यावर चित्रपट बघायलाही काही वाटायचं नाही  स्वतःचं आसन, पाणी आणि खाऊ घेऊन योग्य जागा निवडून बसायचं ,खरंच किती छान होते ना दिवस! 
  • वसईच्या मार्केटमध्ये वसईतील मोठं नाट्यगृह होते. इतरवेळी तेथे फुलवाल्या व भाजीपालावाले बसायचे.
आता चर्चेचा ओघ वसईतील स्थायी स्वरूपातील चित्रपटगृहांकडे वळला. 

वसईतील चित्रपटगृहं - प्रभात, जानकी, सपना, पार्वती K. T. Vision.
  • त्याकाळी असलेल्या वसई विरार आणि परिसरातील थिएटरची नाव ठिकाणासहित सांगा? असा प्रश्न जाणकारांनी बाकी सदस्यांसमोर उपस्थित केला. 
    • वुडलँड - विरार,  धनंजय (नालासोपारा), पार्वती व के. टी. विज़न (वसई स्टेशन), जानकी व सपना - वसई गाव असे अचूक उत्तर तात्काळ दुसऱ्या जाणकारांनी दिलं.  
  • प्रभात चित्रपटगृहाचं नूतनीकरण करून त्याला मग 'जानकी' असं नांव देण्यात आलं. 
  • प्रभात सिनेमामध्ये कोणी कुठला सिनेमा बघितलेला आहे असा स्मरणशक्तीला ताण देणारा प्रश्न जाणकारांनी उपस्थित केला. 
    • प्रभात थिएटरमध्ये राज कपूरचा एक सिनेमा पाहिला होता. राज कपूरच्या मागे पोलिस किंवा गुंड लागले असतात आणि तो पळत असतो. अशी माहिती पुरविण्यात आली. 
    • प्रभात मध्ये मी दादा कोंडके यांचा "राम राम गंगाराम" हा पिक्चर पाहिला होता असं जाणकार म्हणाले. 
    • प्रभातमध्ये बघितला आहे एकच, आता नाव आठवत नाही. ह्या उत्तराला मदत करण्यासाठी जाणकार पुन्हा धावून आले. कदाचित तो "बाळा गाऊ कशी अंगाई" हा चित्रपट असावा असं मत त्यांनी व्यक्त केलं.  
  • जानकी चित्रपटगृह जेव्हा सुरू झाल तेव्हा पहिला सिनेमा कोणता होता? हा पुन्हा आत्यंतिक काठिण्य पातळीचा प्रश्न जाणकारांनी उपस्थित केला. थोड्याच "नसीब" हे अचूक उत्तर देण्यात आलं.  जाणकारांनी लगेचच मी हा चित्रपट FDFS पाहिला होता ही मौल्यवान माहिती पुरवली. FDFS म्हणजे First Day First Show हे उमगायला मला बराच वेळ लागला. FDFS ची हौस पुरविण्यासाठी अडीच रुपयांचं तिकीट दहा रुपयाला घेतलं होतं असे जाणकार म्हणाले. तत्कालीन वसईतील जीवनखर्चाचा अंदाज बांधण्याच्या दृष्टीनं ही अत्यंत मौल्यवान माहिती आहे. 
  • "नसीब" नंतर कर्झ हा चित्रपट होता अशी उपयुक्त माहिती पुरविण्यात आली. 
  • आताच मला जाणकारांनी दहावीच्या मे महिन्याच्या सुट्टीत दिलेली अजून एक मौल्यवान माहिती आठवली. फेअर आणि लव्हली क्रीम लावून तीन तास सिनेमागृहात बसल्यास चेहरा अगदी उजळून निघतो असं ते त्यावेळी म्हणाले होते. 
  • त्याकाळी शाळेतर्फे सुद्धा मुलांना जानकी आणि सपना चित्रपटगृहात निवडक चित्रपट पाहण्यासाठी नेण्यात येत असे. 
    • शिवाजी महाराजांच्या जीवनावरील चित्रपट दाखविण्यात आला होता.
    • "श्यामची आई, लॉरेन अँड हार्डी हे सपना येथे तर रॉबिनहूड हा जानकी थेटरला पाहायला गेल्याचे मला आठवते. श्यामची आई सिनेमा पाहायला गेलो होतो तेव्हा भरपूर पाऊस पडत होता" असं जाणकार म्हणाले. 
    • छोटा चेतन हा त्रिमितीय चित्रपट पाहण्यासाठी नेण्यात आलं होतं. 
  • जानकीला तिकिटं तीन प्रकारची होती. लोअर स्टॉल, अप्पर आणि बाल्कनी. मज्जा यायची. पण एक असे होते की जानकी व सपनावाले एकावेळी कधीच सारखे सारखे चित्रपट प्रदर्शित करत नसत. 
  • दुकानात मिळणाऱ्या शाळेच्या वह्यांवर पण चित्रपटाचे नाव असे. मला शोलेची वही आठवते. 
  • अनोखा बंधन चित्रपट एकानं जानकीमध्ये तर दुसऱ्यानं सपना चित्रपटगृहात पाहिला होता .
  • वडील आम्हाला रवींद्र महाजनी ,अशोक सराफ ,अरुण सरनाईक यांचेच चित्रपट दाखवायचे अशी तक्रारवजा माहिती पुरवण्यात आली. 
  • सपना आणि जानकी ह्या दोनच टॉकीज मध्ये पिक्चर बघितलेत; पार्वती आणि के. टी. व्हिजनला कधी बघितले नाहीत. हे विधान गावातील बऱ्याच मुलांच्या बाबतीत लागू होते. सिनेमा पाहण्यासाठी खास स्टेशनला जाण्याची हौस वा चैन पुरविण्याच्या मनःस्थितीत पालक नसायचे. 
  • दिलीप प्रभावळकर यांचा एक डाव भुताचा हा चित्रपट जानकी टॉकीज ला पाहिला आहे. 
  • दादा कोंडके यांचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्ये आहे. त्यांचे सलग नऊ चित्रपट गोल्डन जुबीली झालेले आहेत.
  • दादा कोंडके ह्यांच्या आणि त्यांच्या चित्रपटांच्या ख्यातीमुळं त्यांचा "गनिमी कावा" हा एकमेव चित्रपट पाहिला गेल्याचं उदाहरण सामोरे आले.
  • माझी आठवण - आमचं महामंडळ सव्वीस जानेवारी, एक मे अशा दिवशी जानकी थेटरमध्ये चित्रपटाचा शो आयोजित करत असत. बहुदा मोहोळ कुटुंबीय त्यांना चित्रपटगृह विनामूल्य उपलब्ध करून देत असत. 
  • वसई गावातील मर्यादित लोकसंख्या आणि गावातील दोनच सिनेमागृहे ह्यामुळं सुट्टीच्या दिवशी कुतूहलापोटी एखादा पिक्चर पाहायला जावं आणि नेमके शिक्षक समोर यावेत असे दुर्धर प्रसंग मित्रमंडळींवर ओढवले आहेत. अशा वेळी शिक्षकांनी बहुदा मुद्दाम कानाडोळा करून पुढं कधीच ह्या प्रसंगाची चर्चा केली नाही. 
ह्या चर्चेअखेरीस "चित्रपट" आणि "रस्ता चित्रपट" या विद्यपीठाचे कुलगुरूपद जाणकार ह्यांना  देण्यात येत आले.

अशा चर्चा जुन्या काळातील आठवणींना उजाळा देतात. कमी पैशात जीवन कसं सुखी होतं, एकमेकांशी स्पर्धा करण्याची भावना अस्तित्वात असली तरी जाणवण्याइतकी कशी प्रखर नव्हती हे आठवून बरंही वाटतं पण त्याच वेळी आजच्या जगात जे काही मिळवलं त्यासाठी गमावलेल्या अमूल्य गोष्टींची आठवण येऊन मन खंतावतं. 

युरोप सहलींचे उर्वरित भाग पुढील महिनाभरात नक्की प्रसिद्ध करण्यात येतील. 

सप्टेंबर अमेरिका दौरा - आजी क्रमांक २ आणि जेफ मार्श

डॅलस लाऊंजमध्ये तामिळ आजी, ब्रिटिश एअरवेजचे कर्मचारी आणि माझं नाट्य सुरु असताना फावल्या वेळात माझे निरीक्षण सुरु होते. माझ्या आसनावरून मला ग...