मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, २१ डिसेंबर, २०२०

माझे बुद्धिबळाचे प्रयोग !

सध्या मी Chess.com ह्या संकेतस्थळाचे सदस्यत्व पत्करले आहे. इथं एका वेळी तीन - चार लाख सदस्य ऑनलाईन असतात. दिवसाला लाखोंच्या संख्येनं सामने खेळले जातात. 


सध्या मी दहा मिनिटांच्या अवधीचे खेळ खेळतो. इथं आपण खेळण्याची इच्छा व्यक्त करण्याचा अवकाश की ही साईट आपणासाठी एक आपल्या तोडीचा एक प्रतिस्पर्धी निवडते आणि सामना सुरु होतो. सध्या माझा स्कोर १३०० आणि १४०० च्या मध्ये घुटमळतो आहे. त्यामुळं प्रतिस्पर्धी सुद्धा त्याच गुणवत्तेचे येतात. 

माझा खेळ सुधारावा म्हणुन मी सध्या बुद्धिबळाचे यु ट्यूबवर व्हिडिओ पाहत आहे. गुगलवर सर्च सुद्धा करत आहे. ह्यातुन समजलेल्या आणि बुद्धिबळाच्या काही मुलभूत संकल्पना ! 

Disclaimer - १३०० चे गुणांकन हे सरासरी खेळाडूचे गुणांकन मानलं जात असल्यानं ह्या खालील संकल्पना केवळ प्राथमिक माहिती  म्हणुनच वाचाव्यात !

१. बुद्धिबळात सुरुवातीच्या खेळीच्या काही विशिष्ट साचेबद्ध पद्धती असतात. त्यांना Standard Opening म्हणुन संबोधिले जाते. जगातील आघाडीच्या खेळाडुंनी अशा ह्या साचेबद्ध पद्धतीचा खुप खोलवर अभ्यास केलेला असतो. सुरुवातीच्या पंधरा  - वीस खेळी ह्या Standard Opening चा भाग असु शकतो. अशा वेळी हे दोन्ही खेळाडु प्रचंड वेगानं सुरुवातीच्या ह्या खेळी खेळतात. आता इथं दोन्ही खेळाडु त्या Standard Opening नुसार खेळत असणार हे अभिप्रेत असतं. इथं समजा एखाद्या नवख्या खेळाडूने एखादी वेगळीच खेळी केली तर अनुभवी खेळाडु त्या खेळीतील त्रुटीचा फायदा घेत त्या नवख्या खेळाडूला नामोहरम करु शकतो! 

२. सुरुवातीच्या काही खेळींमध्ये बुद्धिबळाच्या पटाच्या मध्यभागी असलेल्या चार घरांवर ताबा मिळविणे हे ध्येय असते. 


सुरुवातीला वजीर बाहेर काढण्याची पद्धत फारशी अवलंबली जात नाही. त्यामुळं राजा, वजीर  ह्यांच्या समोरील प्यादी, उंट आणि घोडे ह्यांच्या मदतीने ह्या चार घरांवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. Four Knight Opening ही ह्याच प्रकारात मोडणारी साचेबद्ध सुरुवात ! 



बुद्धिबळाच्या पटावरील प्रत्येक घराला एक विशिष्ट नाव असते. डाव्या कोपऱ्यातुन उजवीकडे a,b,c,d,e,f,g,h अशी नावे दिली जातात. खालुन वर रांगांना १-२-३-४-५-६-७-८ अशी नावं दिली जातात. 

कधीतरी मान्यवर खेळाडु सुरुवातीच्या खेळांमध्ये आपल्या एका प्याद्याचा बळी देऊन नंतरच्या खेळासाठी अनुकूल जागा काबीज करण्याचा प्रयत्न करतात. त्याला Queen / King's Gambit असे संबोधिले जाते. 

केंद्रीय चार घरांवर ताबा मिळविण्यासाठीच्या खेळ्या खेळुन झाल्या की खेळाडु आपल्या हद्दीपलीकडील पुढील दोन रांगांवर आपल्या सोंगट्या हलविण्याचा किंवा आपल्या सोंगट्यांद्वारे त्या रांगांवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करु लागतात. 

प्यादी हे बुद्धिबळातील महत्वाचं सोंगटे आहे. ह्या प्याद्यांनी रांग बनविली तर ती प्रतिस्पर्धी खेळाडूसाठी डोकेदुखी बनु शकते. 


बुद्धिबळाचे वेळेच्या बंधनानुसार वेगवेगळे प्रकार करण्यात आले आहेत.शीघ्रगतीच्या (रॅपिड चेस) बुद्धिबळाच्या खेळात तुम्हांला वेळेच्या मर्यादा लक्षात घेऊन झटापट खेळ्या खेळाव्या लागतात. इथं आघाडीचे खेळाडु मनातल्या मनात पुढील पाच सहा खेळ्यांचा विचार करु शकतात. इथं permutation and combinations प्रकार लक्षात घ्यावा लागतो. ह्या शक्यतांची वेगानं आणि अचुकतेनं विचार करण्याची तुमच्या मेंदुची क्षमता जितकी जास्त तितके तुम्ही चांगले खेळाडु असता !

प्याद्यांना १, उंट - घोड्यांना प्रत्येकी ३ गुण, हत्तीला ५ गुण, वजिराला नऊ गुण असे गुणमापन केले जाते. तरीही दोन हत्तीच्या बदल्यात वजीर देणे हा काही नेहमीच फायद्याचा सौदा असतोच असे नाही. बुद्धिबळाच्या खेळात आरंभीचा खेळ, मध्य सत्रातील खेळ आणि शेवटाचा खेळ अशा दृष्टीनं सुद्धा पाहिलं जाऊ शकते. वजीर ही अत्यंत महत्वाचे सोंगटी असल्यानं मध्य सत्रापर्यंत त्याला आपल्या अर्धभागात ठेवणं राजमान्य मानलं जात असावं. 

राजाला सुरक्षित ठेवणं हा बुद्धिबळाच्या खेळातील महत्वाचा हेतु! त्यामुळं किल्ला करणे ही एक खास खेळी बुद्धिबळात आहे. किल्ला करण्याआधी राजाने एकसुद्धा हालचाल केली नसावी. किल्ला हा पटाच्या दोन्ही बाजुंना करता येतो. जरी किल्ला करण्यानं राजा सुरक्षित होत असला तरी त्याच्यासमोरील प्याद्यांवर हल्ला करुन प्रतिस्पर्धी तुम्हांला बेजार करु शकतो. त्याप्रमाणं किल्ला केलेल्या राजासमोरील एकही प्यादं हलविले नसेल तर त्याच्या रांगेत येऊन हत्ती अथवा वजिराने शह दिल्यास चेकमेट होण्याची शक्यता असते ! 

घोडा हा अडीच घरे जातो. घोडा हे एकमेव सोंगटे असे आहे की त्याच्या खेळीला वजिराकडे पर्यायी उत्तर नसते. म्हणजे उंटाची तिरपी चाल, हत्तीची सरळ चाल, प्याद्याचे एक घर तिरपे आक्रमण ह्या सर्वांच्या कक्षेत वजीर आला तर तो प्रतिहल्ला चढवु शकतो. परंतु घोड्याची चाल वजीर प्रतिआक्रमणाने मोडु शकत नाही. सर्वात धोकादायक खेळी म्हणजे घोडा अशा घरात येणे जिथुन तो राजाला शह आणि वजिरावर आक्रमण करु शकतो. अशावेळी घोडयाला मारता आले नाही तर आपणास वजीर गमवावा लागतो. त्यामुळं घोडा मध्यरेषेच्या पलीकडे आला की त्यावर खास लक्ष ठेवले पाहिजे ! 

बाकी प्यादी एक एक घर पुढे सरकत अंतिम रेषेपर्यंत पोहोचली की तिचा वजीर, हत्ती, उंट, घोडा वगैरे करण्याची मुभा आपणास असते. त्यामुळं प्यादं सहाव्या रांगेत पोहोचले की त्यावर विशेष लक्ष द्यावे. 

एका रांगेत असलेले दोन हत्ती विशेष ताकदवान असु शकतात. ते समोरच्या वजिराला सुद्धा धमकी देऊ शकतात. खेळ ज्यावेळी शेवटच्या टप्प्यात पोहोचतो त्यावेळी प्रतिस्पर्धी चेकमेट होण्यासाठी तुमच्याकडे विशिष्ट सोंगट्या असाव्या लागतात. 

१) राजा + वजीर 

२) राजा +  हत्ती 

३) राजा + दोन उंट 

४) राजा + दोन घोडे 

ह्या सर्व प्रकारात स्टेलमेट नावाचा सुद्धा एक प्रकार असतो. राजाला शह दिला नसताना सुद्धा जर त्याला हलण्यासाठी घर उपलब्ध नसेल तर स्टेलमेट होतो. आपली नाजुक परिस्थती असताना स्टेलमेट करुन घेणे ही कौशल्याची बाब आहे. 

बुद्धिबळ का खेळावं? विविध शक्यतांचा वेगानं अभ्यास करुन त्यातील योग्य शक्यता ओळखता येण्यासाठी, एकाग्रता वाढविण्यासाठी नक्कीच ह्या खेळाचा उपयोग होतो. तणावाखाली सुद्धा समतोल बुद्धीनं विचार करण्याची सवय होण्यास मदत होते. ह्या पोस्टमध्ये आधी आपण स्टॅंडर्ड ओपनिंग्स हा प्रकार पाहिला. ह्यात तुम्हांला ह्या खेळ्या लक्षात ठेवाव्या लागतातच परंतु प्रतिस्पर्धी खेळाडूने जर त्यात एखादा बदल घडवुन आणला तर त्यालाही प्रतिखेळी तात्काळ शोधता यायला हवी !

आता माझं chess.com मधील भविष्य काय? गेल्या आठवड्यात मी ही साईट जॉईन केली. सुरुवातीला १२०० - १३०० गटातील खेळाडूंचा मुकाबला करणे सोपं गेलं. पण आता १३०० - १४०० गटातील खेळाडु खुप तयारीनिशी येत आहेत. ह्यात एक शक्यता अशी आहे की प्रत्येक सामन्यातील चुका जर का मी लक्षात ठेऊ शकलो तर मी पुढे जाईन ! नाहीतर .... 

© आदित्य पाटील 

(प्रतिमा माहितीआंतरजालावरुन साभार !)

शनिवार, १२ डिसेंबर, २०२०

आयुर्वेदिक तेल - पुर्वतयारी














सालाबादप्रमाणे होणाऱ्या व्यवस्थापकीय मंडळींच्या चिंतन सोहळ्याला यंदा करोनाच्या कृपेने घरुन हजेरी लावली. भारतातील तीन शहरे आणि अमेरिकेतील तीन भिन्न टाईम झोन मधील मंडळी उपस्थित होती. ह्या व्हर्च्युअल सोहळ्यामुळं काही अधिक गोष्टींसाठी नियोजन करावं लागलं.  पाच दिवसांत साधारणतः ३० जणांनी आपल्या प्रेसेंटेशनचे  झुमवर सादरीकरण केले. जवळपास शंभर मंडळी आपल्या प्रेसेंटेशनवर लक्ष ठेवून असताना समजा अचानक आपल्या इंटरनेट पुरवठादाराला कंटाळा आला व  काहीशी गंमत करावी वाटली तर आपलं इंटरनेट जोडणी गटांगळ्या खाणार आणि आपण झुमवर स्तब्ध आणि निशब्द होणार!  मग अशावेळी दोन तीन सेकंदात आपल्या साथीदाराने लगेचच आपण बोलत असतो तो दुवा घेऊन लगेच बोलायला सुरुवात करायला हवी ! वगैरे वगैरे ! 

काही गोष्टी चांगल्या सुद्धा झाल्या.  उगाचच खाण्याचा अतिरेक टळला. सहकाऱ्यांना सोबत म्हणुन आपण कोकचे ग्लासच्या ग्लास रिचवतो तेही टळले. प्रेसेंटेशननंतर प्रत्येक टेबलवर खोल उडी (Deep Dive) म्हणुन जे चर्चासत्र असतं त्यात वेळेचे बंधन पाळायला फार कठीण ! पण झुमच्या ब्रेकआऊट विंडोंना लोकांच्या उच्चपदाची वगैरे काही चिंता नव्हती. त्यामुळं ठरलेल्या मिनिटाला कोणीही कितीही तावातावाने बोलत असो, लोकांना मुख्य रूममध्ये परत आणुन सोडलं जात होतं. 

ह्या सगळ्याचा साईड इफेक्ट घरी झाला. घरचे वातावरण मी अगदी गंभीर करुन टाकले. सर्वांना मोठ्यानं बोलायला वगैरे बंदी घालण्यात आली. कर्फ्युच लावला म्हणा ना ! पण जसजसा आठवडा पुढे सरकु लागला तसतसा घरच्या सदस्यांचा संयम ढळु लागला. तुझं तु बघुन घे वगैरे संवाद होतील की काय अशी शंका निर्माण झाली. शेवटी एकदाचा शुक्रवार उजाडला आणि मावळला देखील ! परिसंवादाची यशस्वी सांगता झाली. आता सर्वासमोर होताना सांगता यशस्वीच होते. खरं काय ते नंतर सविस्तर कळेलच ! 

शुक्रवार संपला तसं आठवडाभरातील कृत्यांचा जाब देण्याची वेळ आली.  Quality Time, Team Building activity वगैरे शब्दांचा वर्ड क्लाऊड माझ्याभोवती काल रात्रीपासुन पिंगा घालु लागला. सुरुवात मुलानं केली. तो सध्या ऑनलाईन बुद्धिबळ खेळतोय. काही स्टँडर्ड खेळींचा अभ्यास वगैरे करतोय. बऱ्याच दिवसांनी त्याच्याशी खेळत होतो. त्यानं कोणत्या तरी चांगल्या सुरुवातीचा अवलंब केला. पण चौथ्या पाचव्या खेळीत मी पुर्णपणे अनपेक्षित खेळी केली. तोच प्रकार मी पुढील काही खेळीत केला! तो खूप वैतागला! "बाबा हे बरोबर नाही ! ते कसे स्टॅंडर्ड खेळीच खेळतात ?" ! "अरे पण मला त्या स्टॅंडर्ड वगैरे काय म्हणतात त्या खेळी माहीतच नाहीत ! मग?" मी म्हणालो. त्या वैतागानेच बहुतेक तो हरला. Quality Time मधला Quality वर्ड क्लाऊड मधुन अंधुक होत गायब झाला. 

आज सकाळी Team Building activity घोषित करण्यात आली! आपण आयुर्वेदिक तेल बनवुयात असे घोषित करण्यात आले. तसं काहीतरी वेगळा प्रयोग होणार आहे ह्याची चाहुल काल बाजारात जाताना १०० ग्राम कलौंजी आणा असं सांगितलं त्यावेळीच लागली होती. हल्ली नवीन मराठी / हिंदी शब्द माहिती होण्याची वेळ क्वचित येते ! काल ती कलौंजीने आणली !

आयुर्वेदिक तेल बनविण्यासाठी लागणारी कच्ची सामुग्री !

मोहरी 

मेथी दाणे 

लवंग 

आवळा 

कांदा (खिसलेला)

मेंदीची पाने 

जास्वंदीची पाने 

जास्वंदीची फुले 

तुळशीची पाने 

ब्राह्मि 

माका 

कडीपत्ता 

दुर्वा 

ह्यातील जास्वंदीच्या पानांपासून पुढील गोष्टी गोळा करण्याचा Team Building Activity मध्ये समावेश करण्यात आला होता. जास्वंदीची पाने, फुले, कडीपत्ता आणि दुर्वा ओळखायला सोप्या! पण ब्राह्मी, माका ह्यांनी जरा मेहनत करायला लावली! शनिवार सकाळ असल्यानं ओ माकारीना गाणे सुद्धा आठवलं. पण सर्व गोष्टी एकत्र झाल्यावर त्यांचे एकत्रित दर्शन डोळ्याला सुखावुन गेले! 

कच्ची सामुग्री गोळा करुन देण्यापुरता माझा Team Building Activity मधील सहभाग मर्यादित होता असं गृहीतक मी केलं आहे! जर पुढील काही दिवसांत  आयुर्वेदिक तेल - एक प्रयोगशाळा अशी पोस्ट आली तर हे गृहीतक चुकीचं होतं हे सुज्ञांनी समजुन जावं !


शनिवार, २१ नोव्हेंबर, २०२०

Ecosystem - परिसंस्था


 

भुतलावरील प्रत्येक व्यक्ती ही जगाची, देशाची, राज्याची, कंपनीची, सोसायटीची आणि तत्सम मानवनिर्मित प्रत्यक्ष वा आभासी सीमारेषांची अथवा गटांची सदस्य असते. ह्या प्रत्येक गटात समाविष्ट झाल्यावर ही व्यक्ती त्या गटाच्या संस्कृतीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत राहते. ह्या सर्व प्रकाराकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातुन पाहणारी ही आजची पोस्ट ! 

ह्या पृथ्वीवरील जीवसृष्टीची उत्क्रांती गेले कोट्यवधी वर्षी होत आहे. ह्या  प्रक्रियेमध्ये विविध जीव वेगवेगळ्या स्वरुपात भुतलावर अवतीर्ण झाले. त्यातील काही जीवांनी भोवतालच्या वातावरणातील बदलाला यशस्वीरीत्या तोंड दिले, तर काहींना ही बाब जमली नाही. डायनासॉरसारखे काही जीव परिसंस्थेच्या जीवनकालातील काही काळ बाकीच्या जीवांवर वर्चस्व गाजवु शकले, पण कालांतरानं झालेल्या बदलाला तोंड देता न आल्यानं नष्ट झाले. 

हे झाले एक दृश्य उदाहरण. पण आपल्याभोवती अशा अनेक परिसंस्था अदृश्य स्वरुपात अस्तित्वात असतात. आपण ह्या परिसंस्थेतील प्रभावशाली घटकांना एकतर ओळखण्यात कमी पडतो किंवा त्यांच्याशी कशा प्रकारे वागावं ह्याचा शास्त्रीय दृष्टीनं विचार करुन ते प्रत्यक्षात अंमलात आणण्यात कमी पडतो. अशा काही परिसंस्थेच्या उदाहरणांकडे वळण्याआधी आपण परिसंस्थेत अस्तित्वात असणाऱ्या प्रत्येक सदस्याच्या स्थानाविषयी बोलुयात. 

परिसंस्थेत एखादी सदस्या  ज्यावेळी प्रवेश करतो त्यावेळी तिला जी भुमिका दिली गेली असते त्या भूमिकेनुसार परिसंस्थेवर प्रभाव टाकण्याची  एक विशिष्ट क्षमता प्रदान केली गेली असते. विशिष्ट भुमिकेत राहुन परिसंस्थेवर प्रभाव टाकण्याची एक मर्यादा असते. ह्या मर्यादेपलीकडे प्रभाव टाकण्यासाठी सदस्याला वेगळ्या भुमिकेत शिरावं लागतं. वेगळ्या भुमिकेत स्वतःच्या  इच्छेनुसार हवं तेव्हा शिरता येत नाही. परिसंस्थेने प्रभावी भुमिकेत शिरकाव करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे घालुन दिली असतात. ह्या मार्गदर्शक तत्वानुसार विशिष्ट प्रभावी भुमिकेत शिरण्यासाठी आपण बाकी इच्छुकांपेक्षा अधिक पात्र आहोत हे त्या परिसंस्थेतील निर्णय घेणाऱ्या पंचमंडळींना प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष मार्गानं पटवुन देण्याची जबाबदारी आपली असते. 

वरील परिच्छेदाचे महत्व काय हे समजुन घेण्यासाठी आपण विशिष्ट उदाहरण पाहुयात! एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील एका विशिष्ट कंपनीत काम करणारा कर्मचारी त्या कंपनीतील एका विशिष्ट विभागात बनल्या गेलेल्या परिसंस्थेचा घटक असतो. काही कर्मचाऱ्यांना आपलं जे काही स्थान आहे ते फक्त टिकवुन ठेवण्यात रस असतो. जोवर बाह्य घटक ह्या परिसंस्थेच्या समीकरणांवर घातक हल्ला चढवत नाहीत तोवर ह्या कर्मचाऱ्यांचे आयुष्य स्थिर चालु शकते. मंदीसारख्या बाह्य घटकांमध्ये ह्या कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात खळबळ माजविण्याची क्षमता असते. 

कंपनीत काही जणांना प्रगतीच्या शिड्या वेगाने चढुन जायची इच्छा असते. इथं त्यांना परिसंस्थेच्या समीकरणांचे खोलवर ज्ञान असणे आवश्यक असते. कोणत्याही यशस्वी कंपनीमध्ये वरिष्ठ पदांवरील व्यक्तींना आपलं स्थान टिकविण्यासाठी सातत्यानं उत्कृष्ट कामगिरीची आवश्यकता भासते. उत्कृष्ट कामगिरीच्या व्याख्या वेगानं बदलत राहतात. त्यामुळं ह्यातील काही वरिष्ठ पदांवरील व्यक्ती त्या स्थानांवरुन बाहेर फेकल्या जातात आणि कनिष्ठ पदातील व्यक्तीला ह्या स्थानावर जाण्याची संधी मिळु शकते. बऱ्याच वेळा अशी घटना ह्या कनिष्ठ व्यक्तीच्या ध्यानीमनी नसताना घडु शकते. त्यामुळं आपण आपल्या कामगिरीद्वारे, आचरणातून परिसंस्थेकडे सातत्यानं योग्य संदेश पाठवत आहोत ह्याचं भान राखणं आवश्यक असतं. 

काही परिसंस्थेतील समीकरणं by default एखाद्या व्यक्तीच्या अंगी असलेले कौशल्य, त्या व्यक्तीची देहबोली ह्यासाठी अनुकूल असतात. त्या परिसंस्थेत ही व्यक्ती लवकर स्थिरावते, तिची वाढ जोमानं होते. तर काही वेळा ही समीकरणं प्रतिकुल असतात. मग व्यक्तीची चिडचिड होण्याची शक्यता निर्माण होते. एखाद्या परिसंस्थेत आपण स्वीकारलो गेलो आहोत की नाही ह्याचे पुरेसे संदेश परिसंस्था आपल्याकडं पाठवत राहते. हे संदेश आपल्यासाठी आहेत आणि त्यांचा नक्की अर्थ काय हे जाणुन घेण्याची परिपक्वता आपणाकडे हवी. काही जणांना हे अजिबात समजत नाही. अशावेळी अशी माणसं सदैव चिडचिड करत राहतात; पर्यायानं स्वतःचा  आणि परिसंस्थेचा वेळ घालवितात, नुकसान करतात. 

परिसंस्थेतील संघर्षाच्या एका विशिष्ट मर्यादेपलीकडे आपल्यासाठी अनुकूल दुसऱ्या परिसंस्थेचा शोध घेणं इष्ट असतं. परंतु सद्य परिसंस्थेपेक्षा अधिक योग्य नवीन परिसंस्था शोधणं आणि तिथं स्थिरावणं हे कष्टदायी काम असतं, त्यात अनिश्चितता बऱ्याच मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळं बरेच लोक ह्या धोक्याला सामोरे जाण्यास तयार होत नाहीत. पण मग ह्या जाणीवपुर्वक निर्णयानंतर स्वतःची आणि भोवतालच्या लोकांची कमीतकमी चिडचिड व्हावी इतका तरी प्रयत्न करावा. 

कंपनीतील आयुष्य हे परिसंस्थेचे केवळ एक उदाहरण! लग्नानंतर मोठ्या एकत्र कुटुंबात प्रवेश करणारी सुन, मोठ्या सोसायटीच्या व्हाट्सअँप ग्रुपवर प्रवेश करणारा सदस्य अशी अनेक उदाहरणे आहेत जिथं परिसंस्थेची संकल्पना लागु पडते! 

जाता जाता आहिस्ता आहिस्ता ह्या चित्रपटातील निदा फाजली आणि खय्याम ह्या गुणवान जोडगोळीची ही संरचना ! 

कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता 

कहीं जमीं तो कहीं आसमा नहीं मिलता !

मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२०

Being हनुमा विहारी आणि चेतेश्वर पुजारा !



प्रत्येक व्यावसायिक भुमिका आपली एक वेगळीच काठिण्यपातळी घेऊन येते.  आज आपण शिरणार आहोत चेतेश्वर पुजारा, हनुमंता विहारि ह्या गुणी खेळाडूंच्या भुमिकेत ! खंडप्राय अशा संपूर्ण भारत देशाचे लक्ष वर्षातील बहुतांश वेळा T20 व एक दिवसीय सामन्यांकडं लागुन राहिलेलं असतं. वर्षातील सात-आठ महिने ह्याच  प्रकारचं झटपट क्रिकेट खेळलं जातं! हे अगदी झगमगाटात खेळलं जाणारं क्रिकेट; जिथं सर्व देशातील क्रिकेट समजणारा, अर्धवट समजणारा चाहतावर्ग लक्ष ठेवून असतो! 

पण विशिष्ट महिन्यात कसोटी क्रिकेट सामन्यांना महत्त्व येतं! जसं की नोव्हेंबर ते मार्च हा भारतातील कसोटी सामन्यांचा मोसम! आता चेतेश्वर, हनुमंताच्या भूमिकेत जाऊन विचार करुयात ! हे दोघे वर्षातील सात-आठ महिने भारतीय संघाच्या क्रेंद्रिय गटापासुन (Core Group) पासून दुरावलेले असतात. बापुडे एकलव्याप्रमाणे आपला सराव चालू ठेवतात.  त्यांना सरावासाठी कोणत्या प्रकारचे गोलंदाज उपलब्ध असतील याविषयी फारशी आशादायक परिस्थिती नसावी.  सौराष्ट्र अथवा तेलंगणातील काही स्थानिक गोलंदाजांपुढे किंवा बॉलिंग मशीनपुढे पाच सहा महिने  महिने सराव करून अचानक मग ऑस्ट्रेलियात जाऊन हॅझलवूड, स्टार्क सारख्या दिग्गज गोलंदाजांपुढं आंतरराष्ट्रीय सामना खेळायला सज्ज होणे हे  काही येरागबाळ्याचं काम नव्हे.  

त्यात सुद्धा दोन शक्यता निर्माण होतात.  फलंदाजीला अनुकूल अशा खेळपट्टीवर सामना खेळला जात असेल तर सलामीचे फलंदाज, तिसर्‍या-चौथ्या क्रमांकाचे फलंदाज मनसोक्त फलंदाजी करून घेतात. त्यामुळे हनुमंता विषयी मला जास्तच सहानुभूती वाटते.  फलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर त्याचा क्रमांक येण्यासाठी बराच वेळ जावा लागतो , ज्यावेळी त्याची फलंदाजी येते त्यावेळी बऱ्याच वेळा वेगाने धावा करण्याची सुद्धा गरज भासू शकते.  याउलट ज्या वेळी गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टी असते त्यावेळी आघाडीचे फलंदाज नांगी टाकू शकतात. मग हनुमंता आणि पुजारासारख्यांना डाव सांभाळण्याची जबाबदारी पेलावी लागते. 

ह्या पोस्टचा मुख्य मुद्दा असा की आपले सहकारी प्रसिद्धीच्या झोतात वर्षभर न्हाऊन निघत असताना या दोघांचा वर्षभरातील बराचसा काळ मात्र  एकलव्याप्रमाणे तपस्या करण्यात जातो. जगापुढे आपलं कौशल्य दाखवण्याच्या त्यांना फार मोजक्या संधी मिळतात. त्या मोजक्या संधी गमावल्या तर त्यांच्या कामगिरीवर टीका करण्यासाठी देशातील हजारो समीक्षक आणि लाखो चाहते आपल्या लेखण्या आणि समाजमाध्यमांचा आधार घेण्यासाठी सज्ज असतात. सद्यकालीन इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनच्या जमान्यातसुद्धा पुजारा आणि हनुमंतासारखे साधक अस्तित्वात आहेत. त्यांचं महत्त्व पटवून देण्यासाठी ही छोटीशी ब्लॉग पोस्ट! त्यांच्यापासुन काहीसा धडा आपण घेऊ शकतो! आपण आपलं काम मग ते  वलयांकित जगापासुन कितीही दूर असलं तरीही त्यावरील आपली श्रद्धा कायम ठेवावी ! जगातील प्रत्येक काम हे महत्वाचं आहे; लाखोंनी त्याची नोंद घ्यायला हवी असा अट्टाहास नको ! नेकीनं केलेल्या प्रत्येक कामाची नोंद जगातील योग्य व्यक्ती घेतातच !  

रविवार, २५ ऑक्टोबर, २०२०

स्वच्छंदी मेंदु !




आपला मेंदु बराच वेळ पुर्णपणे आपल्याला सेवा देत नाही किंवा आपलं ऐकत नाही असं हल्ली मला जाणवु लागलं आहे. ऑफिसच्या काही अत्यंत महत्वाच्या मिटींग्समध्ये तो कदाचित आपल्या सेवेसाठी १००% उपलब्ध असावा. कारण आपण ज्या देहात वास्तव्य करत आहोत त्या देहाला मुलभूत गरजा भागविण्यासाठी अर्थप्राप्ती करण्याची गरज आहे; ही अर्थप्राप्ती करण्यासाठी ह्या मिटींग्समध्ये ह्या देहाच्या मालकानं सर्वोत्तम कामगिरी करणे आवश्यक आहे; ह्या सर्वोत्तम कामगिरीसाठी त्याला आपल्या साहाय्याची गरज आहे हे तो जाणुन असतो. 

बाकीच्या बऱ्याच वेळी हा मेंदु multitasking च्या नावाखाली गोंधळ घालत असतो. खरंतर एखाद्या १५ मिनिटाच्या विशिष्ट कालावधीत दोन गोष्टी करणं ह्याला आपण जे multitasking म्हणतो ते चुकीचं आहे. कारण त्यातील एका विशिष्ट क्षणी आपण ह्यातील एकच गोष्ट करत असतो. एका विशिष्ट क्षणाला मीटिंगमधील संभाषण पुर्णपणे ग्रहण करणं आणि त्याच क्षणी आपल्या बॉसला मी तुमच्या ह्या मताशी सहमत नाही हे कळवणं ह्याला खरं  multitasking म्हणतात!!!

आता ह्याबाबतीत खुप शास्त्र असतं. काही काळापुर्वी ज्यावेळी तुम्ही नियमित ऑफिसला जात होता त्यावेळी तुम्ही नेहमीच्या रस्त्यानं कार चालवत न्यायचात. त्यावेळी कारसारथ्य करताना तुमच्या मेंदुला फारसं काम पडत नसे कारण तुमची subconscious memory बहुदा तुम्हांला मदत करत असते. आता इथं subconscious memory किंवा दुसरी कोणती मेमरी ह्याविषयी मी खात्रीलायकरित्या सांगु शकत नाही. पण मेंदुची बरीच क्षमता मोकळी राहत असल्यानं मेंदु बाकी दुसरा विचार करायला मोकळा असे! आता इथं मेंदु बऱ्याच वेळा ऑफिसातील गोष्टीचा विचार वगैरे करत असेल. पण हे विचार भरकटलेल्या ढगांसारखे असतात. त्यातुन काही ठोस निकाल लागण्यास क्वचितच मदत होते ! आता लॉकडाऊन संपल्यावर मेंदूला आणि जी कोणती मेमरी आहे तिला रस्ता आठवेल ना ह्याची चिंता करु नका कारण गुगल मॅप असेल !

काहीसा वेगळा प्रश्न रात्रीअपरात्री जाग आल्यावर निर्माण होतो. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीकडे तीन नोटपॅड असतात. पहिला म्हणजे संगणकातील / भ्रमणध्वनीतील नोटपॅड अँप, दुसरा पुर्वी ज्याला नोंदवही म्हणत तो पेनाने नोंदी करण्याचा नोटपॅड आणि तिसरा म्हणजे तुमच्या मेंदुतील नोटपॅड ! होतं असं की मेंदुला ऑफिसातील प्रश्न कसे सुटू शकतील ह्याविषयी प्रचंड बुद्धिमान कल्पना नेमक्या ह्याच वेळी सुचतात! आता ह्यांची नोंद ठेवण्यासाठी खात्रीचा उपाय म्हणजे पहिले दोन नोटपॅड ! परंतु अशा वेळी धडपड करत ह्या पहिल्या दोन नोटपॅडचा शोध घेणे हे गृहशांततेच्या दृष्टीनं धोकादायक असु शकतं ! त्यामुळं आपल्या तिसऱ्या नोटपॅडवर विश्वास ठेवत सकाळी सारे काही आठवेल अशी श्रद्धा बाळगणं इतकंच आपल्या हाती असतं ! आता मेंदुला ह्याच वेळी पुर्ण सक्रिय व्हायची गरजच काय हा माझा प्रश्न !

हल्लीची अजुन एक गोष्ट ! मी हल्ली पुजा करताना स्तोत्रपठण करतो. हे स्तोत्र दहा वेळा म्हणायचं असतं. परंतु देव्हाऱ्यातील देवांना गंध लावणं, फुलं वाहणे ह्या सर्वांमध्ये मी स्तोत्र कितीवेळा पठण केलं आहे हा आकडा बऱ्याच वेळा मी विसरतो. मग कमीवेळा पठण नको म्हणुन जास्तीचं म्हणतो. इथं मी माझ्या मेंदुच्या एकाग्रतेच्या अभावाला दोष देतो !  

एकंदरीत काय तर ह्या मेंदुच्या स्वच्छंदी वागण्यानं मी त्रस्त झालो आहे. ह्या मेंदुची आणि माझी बैठक ह्या आठवड्यात बोलविण्याचा माझा मानस आहे ! तुम्हांला माझ्या बाजुने काही मुद्दे सुचत असतील तर जरुर कळवा !

शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२०

सई बिराजदार - एक मराठी मैत्रीण !







 

हल्ली सुरु असलेल्या मालिकांमध्ये सुसह्य अशी मालिका म्हणजे माझा होशील ना  ? सुसह्य अशासाठी की प्रेक्षकांना आपल्याकडं खेचुन घेण्यासाठी उगाचच ह्यात थिल्लर गोष्टींचा आधार सध्या तरी घेण्यात आलेला नाही.  मालिकेत चित्रित करण्यात आलेलं आदित्य आणि त्याच्या मामांचं घर हा एक संस्कृतीचा उत्तम ठेवा ! एका कुटुंबप्रमुखाच्या आज्ञेत बाकी सर्व मंडळी गुण्यागोविंदानं कशी राहु शकतात ह्याचं वास्तववादी  चित्रण इथं आढळतं. कुटुंबप्रमुख ह्या पदावरील व्यक्तीचं प्रत्येक मत, त्याचं वागणं कुटुंबातील सर्व व्यक्तींना पटत असतं असं नाही, किंबहुना पटत नसतंच ! तरीही सर्वजण एकत्र राहतात. एकत्र का राहायचं ह्याचा प्रश्न कोणाला पडत नाही. पुर्वीच्या काळी दुसरा पर्याय नव्हता म्हणुन एकत्र राहायचे सारे ! आजच्या काळात पर्याय आहेत म्हणुन बरेचजण विखुरले ! मागच्या काळातील एकत्र राहण्यातील ज्या ज्ञात चुका आहेत त्या ओळखुन पुन्हा जिव्हाळ्याच्या माणसांना एकत्र आणता येईल का?  असो हा दुसऱ्या एका लेखाचा विषय !

आजच्या पोस्टचा विषय - सई बिराजदार! मालिकेतील आदित्यची  मैत्रीण ! प्रत्येक मराठी युवकाला अशी एक मैत्रीण असावीच ! मालिकेतला आदित्यचं सध्याचं चित्रण मध्यमवर्गीय वर्गातील ! अनेक संस्कृतीप्रिय मामांसोबत एकत्र राहणारा आदित्य आपसुक शिस्तबद्ध बनलेला आहे. आपल्याहुन मोठ्या पिढीसोबत बराच काळ व्यतित करावा लागत असल्यानं त्याच्या स्वभावात काहीसं गांभीर्य आलं आहे. महत्प्रयासानं पहिली नोकरी मिळाली असली तरी तिथला खाष्ट बॉस त्याला पहिल्या नोकरीच्या आनंदाच्या भावनेपासुन वंचित ठेवत आहे. अशा वेळी अचानक भेटलेली सई !

एखाद्या सुंदर तरुणीकडं प्रेयसी म्हणुन पहायचं असेल तर आपलं घराणं, आपलं शिक्षण, आपला पगार हे घटक  तिच्या घराण्याच्या जावई म्हणुन असलेल्या अपेक्षांना पुऱ्या पडणाऱ्या असाव्यात ही बऱ्याच मराठमोळ्या तरुणांची विचारसरणी ! बहुदा मराठी मुलं आपल्या आईवडिलांच्या आणि इतर मोठ्या मंडळींच्या संसाराचं जरा जास्तच निरीक्षण करत राहतात. त्यामुळं प्रेम क्षणभर पण बाकीचं कर्तव्य आयुष्यभर हीच भावना त्यांच्या मनात प्रामुख्यानं राहते. इथंही आदित्य सईला मैत्रिण म्हणुनच स्वीकारतो तो बहुदा ह्या घटकांमुळं ! तिला आपण आयुष्यात सुखी ठेवू शकणार नाही ह्या त्यानं समज करुन घेतला आहे! मनानं आदित्य कदाचित वीस - तीस वर्षे मागच्या काळात वावरत असावा असं मानल्यास वावगं ठरणार नाही !

सई ! सुंदर, श्रीमंतीचा आत्मविश्वास बाळगुन असणारी पण गर्व नसणारी, रोखठोक बोलणारी,  पारंपरिक संस्कारांविषयी आदर बाळगणारी सई ! आपल्या मनाविरुद्ध आपले आईवडील ज्याच्याशी आपलं लग्न लावुन देत आहे अशा श्रीमंत डॉक्टरला स्पष्ट नकार देणारी बंडखोर सई !आदित्य भेटल्यावर आपण त्याच्या प्रेमात  पडलो आहोत हे तिला तात्काळ कळलंय ! मुली ह्या बाबतीत मुलांपेक्षा स्मार्ट असतातच म्हणा ! पण तिच्यावर संस्काराचा अदृश्य प्रभाव आहे ! तिचे वडील जरी तिच्या आईच्या सईसाठी श्रीमंत वर शोधण्याच्या प्रयत्नांना वरवर साथ देत असले तरी ते बहुदा संस्कारप्रिय आहेत. मुलींचा स्वभाव काहीसा वडिलांवर जात असल्यानं सईसुद्धा संस्कारी ! आपल्याला आदित्य जरी आवडत असला तरी तो ह्या क्षणी प्रेमाचा इजहार (वजनदार उर्दु शब्द) करण्यास तयार नाही ह्याची तिला जाणीव आहे. तिला त्याविषयी घाई नाही ! तो आपल्याशी मोजकं बोलला, अधूनमधून दिसला तरी तिला ते पुरेसं आहे ! 

सई खट्याळ आहे. फार काळ हा खट्याळपणा दाबुन ठेवणं तिला जमणारं नाही! त्यामुळं गंभीर-गंभीर आदित्याची ती अधुनमधून खोडी काढते! ह्या आठवड्यात तर तिनं हद्दच केली ! शिस्तप्रिय आदित्यला तिनं एक दिवस एकदम बिनधास्त वागायला पटवलं ! खुप धमाल केली त्या दोघांनी ! त्रास देणाऱ्या बॉसची सुद्धा त्यांनी फिरकी घेतली!  
पण मग बॉसनं ओरडल्यावर आदित्यचं हे बिनधास्तपणाचं उसनं अवसान गळुन पडलं ! त्याच्यातल्या कर्तव्यदक्ष भावनेनं त्याच्यावर पुर्ण ताबा मिळविला. उगाच सईच्या नादी लागुन आपण हा मस्तीखोरपणा केला असं त्याला वाटलं ! मग त्याच्या तब्येतीची काळजी करत त्याला ऑफिसला जाऊ नको असं सांगणाऱ्या सईला तो वाटेल ते बोलला! चटकन तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती तात्काळ तिथुन निघुन गेली ! पण तो चक्कर येऊन पडला हे कळताच तात्काळ धावत त्याच्या घरी आली ! 

ह्या मालिकेच्या पट्कथाकारांचं, निर्मात्यांचं अभिनंदन ! ह्या क्षणापर्यंत त्यांनी एका सुंदर, मराठी संस्कृतीशी नातं राखणाऱ्या कलाकृतीची निर्मिती केली आहे ! पुढं आदित्य - सईचं काय होईल ? लग्न झालं तर हे नातं असंच सुंदर राहील का? अशा प्रश्नांचा उगाच विचार करायला नको ! काही गोष्टी, काही क्षण गोठवुन ठेवावेत असे असतात, अशाच वळणावर असलेली ही मालिका! 
नितांतसुंदर अभिनयाबद्दल सई, आदित्य आणि मामा मंडळींचं खूप अभिनंदन ! 

गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२०

जीवनगाणे गातच राहावे

यंदा लॉकडाऊन आणि त्याच्या अनुषंगानं आलेल्या वर्क फ्रॉम होममुळे वसईत राहण्याची सुवर्णसंधी लाभली.  मे महिन्यापासूनअंगणात नियमितपणे झाडांना पाणी देण्यास सुरुवात केली. त्यामुळे साधारणतः  जून महिन्यात पहिल्या पावसानंतर उगवणाऱ्या अनेक इवलीशी रोपटी मे महिन्यातच जमिनीबाहेर डोकावली होती. बहुदा हा नियमित पाणी देणारा कोण हे कुतूहल त्यांनी बाळगलं असावं. एकदा ही छोटी मंडळी आपल्या विश्वासावर जमिनीबाहेर आली की मग पाऊस पडेस्तोवर त्यांची काळजी घेणं ही माझी जबाबदारी होती. त्यांना असंच सोडणं इष्ट नव्हतं. 

मग जूनमध्ये सुरू झालेल्या पावसाने या बालमंडळींची चांगली काळजी घेतली.  सर्व घटक जुळून आल्यामुळं तेरड्याला जून महिन्यातच पहिलं फूल आलं. यंदा पाऊस खूप नियमितपणे पडत राहिला.  त्यामुळे सर्व फुलझाडं, मोठाले वृक्ष बहरत गेले.  यातील काही कायमस्वरूपी झाडं तर काही हंगामानुसार आपलं सौंदर्याविष्कार करुन सर्वांना प्रफुल्लित करुन गायब होणारी किंवा फुलांचा बहर आवरता घेणारी ! अशाच तीन झाडांची यावर्षी कॅमेरामध्ये टिपलेली ही वेगवेगळी रुपं!

तेरडा 

जुनमधील पहिलं फुल ! 


ऑगस्ट पहिल्या आठवड्यातील पुर्ण बहर 


आज सकाळ !  त्याला बिचाऱ्याला जोरदार पाऊस आणि आता सुरू झालेला प्रखर उन्हाचा तडाखा झेपला नाही !  


Well Played तेरडा ! पुढील वर्षी पुन्हा भेटु !

लीली सदैव बारा महिने अंगणात असेल. पण तिचा फुलांचा बहार संपत आला आहे! लिलीच्या रोपट्यांना जुलैमध्ये आलेला पहिला बहार !



फुले येण्यासाठी ह्या लिलीमधून एक लांबवर दांडा येतो. एका दांड्यातून चार ते पाच लिलीची फुलं उमलतात. ही फुलं दोन तीन दिवस राहतात. मग फुलं कोमेजतात. 



लिलीचे ऑगस्टमधील बहारदार रुप !


आता आज सकाळी पाहिलेलं बहुदा या पावसाळ्यातील हे शेवटचं फुल!



लीलीसोबत अंगणात असलेली गुलाबी पिवळ्या फुलांची इवली इवली रोपटी! त्यांना वॉटर लीली म्हणतात असं मनु म्हणाली!


पाणी नियमित दिलं तर ही छोटुली  बहुधा अशीच राहतील. आता त्यांच्या बिया या प्रकर्षानं दिसू लागल्या आहेत. निसर्गक्रम सुरु राहायला हवा ना !


मन काहीसं उदास होतं. तेरडा, लिली,  वॉटरलिली ही सर्व मंडळी आता पुढील पावसाळ्यापर्यंत दिसणार नाहीत म्हणून! पण हा तर निसर्गाचा जीवनक्रम नाही का? जन्माला आलेला प्रत्येक जीव आयुष्य जगुन एक दिवशी या भुतलावरील आपलं अवतारकार्य समाप्त करुन सर्वांचा निरोप घेणारच ना?

आता पुढील काही दिवसांत लक्ष वेधले जाणार आहे ते बाकीच्या फुलझाडांकडे आणि काही  रानटी झुडपांकडे! हे पहा एक जास्वंदीचे फूल!जणू काही आयपीएल सामन्यातील समालोचकापुढे माइक धरावा तसे ते माझ्या पुढे येऊन राहिलं !!




आज सकाळी एक  मशरूम छत्री अचानक माझ्या नजरेस पडली! 



पोस्टच्या शेवटी एक हे अस्सल रानटी झुडुप ! नाव वगैरे नाही पण त्यामध्ये एकवटलेलं रानवट सौंदर्य!


जीवन चलने का नाम !  

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...