मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, २३ नोव्हेंबर, २०२५

सुखदुःखाच्या तळ्यात मळ्यात !





सदैव अस्तित्वात असणारा जगातील विरोधाभास दिवसेंदिवस नवनवीन उंची गाठत असावा. एकीकडे ट्रिलियन डॉलर्स वार्षिक उत्पन्न असणारी व्यक्ती ह्या भुतलावर अस्तित्वात आहे, तर दुसऱ्या टोकाला ज्यांच्या पुढील अनेक पिढयांना मुलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागणार आहे अशी माणसं सुद्धा इथं नेटानं जीवन जगत आहेत. वर्णपटाच्या ह्या दोन टोकांमध्ये सुखदुःखाच्या तळ्यात मळ्यात खेळ खेळणारे आपण सामान्य ! 

ज्याला कोणतीही व्याधी नाही तो सुखी माणुस ही व्याख्या बहुतांशी भागात त्रिकालाबाधित राहणार आहे असा माझा समज होता. पण जगात घडणाऱ्या घटना पाहिल्या, ऐकल्या की ह्या समजुतीला तडा जातो. नायजेरियात ३०० हुन अधिक मुलांचं अपहरण केल्यानं शाळा बंद ठेवाव्या लागल्या आहेत. आपण कुठं जन्माला येतो हे आपल्या हाती नसतं पण त्यामुळं इतका जमीनअस्मानाचा फरक पडतो हे जाणून घ्यायला हवं. दिवसेंदिवस हवामान बेभरंवशाचं होणार आहे. शहरी नागरिकांना त्याचा फारसा फरक पडत नाही, एखाद्या दिवशी कदाचित अचानक आलेल्या पावसात भिजावं लागणं, किंवा पाणी साचल्यामुळं कारमध्ये अडकून बसायला लागणं अशी काहीशी आपल्या समस्यांची व्याप्ती असु शकते. पण ह्या अकाली पावसामुळं ज्यांची हाताला आलेली पिकं वाया जाण्याच्या घटना सातत्यानं घडू लागल्या आहेत अशा शेतकऱ्यांनी कोणाच्या तोंडाकडं पाहावं ? खेड्यातील तरुणांना लग्न जमविण्याच्या समस्या येऊ लागल्यानं त्यांनी गेल्या काही महिन्यात राजकीय नेत्यांना पत्र लिहिण्याच्या घटना सातत्यानं प्रसिद्ध होत आहेत. आज महाराष्ट्र टाइम्सच्या संवाद पुरवणीत आलेला लेख ह्या समस्येच्या विविध कंगोऱ्यांचा वेध घेतो.  ही खरी तर मोठी समस्या आहे पण आपल्या भोवतालच्या उथळ विषयांच्या गोंधळात ह्यावर चर्चा होतच नाही. 

एक समाज म्हणून निःशंकपणे आपण उथळपणाची कास धरली आहे. यु ट्यूबवरील रील्स पाहणे हे ह्या उथळपणाच्या वर्णपटाचं एक टोक तर दुसरीकडं कसोटी सामन्यात पाहुण्या संघाला नामोहरम करण्यासाठी आखाडेरुपी खेळपट्टी बनविणं हे दुसरं टोक! शांतपणे घरात बसून गहन विषयावरील ग्रंथांचं पठण करून विद्येची आराधना करणारा युवक सापडणे अपेक्षित नसलं तरीही केवळ लक्ष वेधुन घेण्यासाठी बहुतेक वेळा संस्कारांचा त्याग करून रील्स बनविणं हे एक पतन आणि अशी रील्स पाहत वेळ घालवुन आपल्या मेंदूला त्याच्या सम्यक स्थितीपासून खाली खेचणं हे दुसऱ्या प्रकारचं पतन! 

आपल्याभोवताली निर्माण होणारं ध्वनी प्रदुषण हा एक अजून चर्चेला घेण्यासारखा विषय!  आपल्या भोवतालच्या लोकांना त्रास होतोय ह्याची जाणीव एक तर ह्या जोरानं फटाके वाजविणाऱ्या, वाजत गाजत मिरवणूक नेणाऱ्या, मेट्रोत जोरानं बोलणाऱ्या / संगीत वाजविणाऱ्या अथवा ध्वनिवर्धकाचा वापर करून कार्यक्रम करणाऱ्या लोकांना नसावी अथवा त्याची पर्वा ते करत नसावेत. एक समाज म्हणून आपण नक्कीच मुजोर बनत चाललो आहोत का हा प्रश्न मला भेडसावत आहे. 

आता मी हा केवळ प्रश्न उपस्थित करत आहे. ह्यावर दीर्घ विचारमंथन करावं अशी आशा करावी ही सुद्धा परिस्थिती उरली नाही. सखोल विश्लेषण करण्याची क्षमता, मानसिकता आपण गमावून बसलो आहोत. आपल्याला हवे आहेत ते तात्काळ परिणाम ! 

लेखात समाविष्ट केलेली चित्रं गेल्या आठवड्यातील एका बैठकीनंतर आयोजित केलेल्या जेवणातील काही पदार्थांची.  पदार्थांचा सादरीकरण स्तर निर्विवादपणे उच्च, चवही छान! सर्वांनी त्या पदार्थांचं तोंडभरून कौतुक केलं. मला कुठंतरी चुकल्यासारखं वाटत होतं. तिथुन बाहेर पडल्यावर दोघं सहकारी म्हणालं, सगळं काही ठीक पण दाल मखनी, चावल, सब्जी ह्यानं जे समाधान मिळतं ते ह्यात नाही. मला जाणवणारी वरणभाताची उणीव अजून कोणाला तरी जाणवली ह्यात मला खूपच समाधान मिळालं. 

आपल्या शहरी जीवनाचं असंच काही झालं आहे नाही का? सादरीकरणाच्या उच्च स्तराच्या मोहात आपण ती मूळ मूल्य कुठंतरी गमावून बसलो आहोत. सद्यपिढीत ही मूल्यं कुठंतरी ह्रदयात दडून असल्यानं अशा काही प्रसंगी हे शल्य बाहेर पडतं. पण पुढच्या एक दोन पिढीत ही मूल्यंच हृदयातुन गायब होतील का हे भय आहे. 

खंत कशा कशाची करावी? वेगानं वितळून गायब होण्याचं भय असणाऱ्या A23a ह्या हिमनगाची की अदृश्य होणाऱ्या मुल्यांची ! 
    

सुखदुःखाच्या तळ्यात मळ्यात !

सदैव अस्तित्वात असणारा जगातील विरोधाभास दिवसेंदिवस नवनवीन उंची गाठत असावा. एकीकडे ट्रिलियन डॉलर्स वार्षिक उत्पन्न असणारी व्यक्ती ह्या भुतलाव...