या वर्षीची पहिली अमेरिकावारी दिनांक १७ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीमध्ये पार पडली. अमेरिका भेटीचा हा वृत्तांत! ह्या वृत्तांतामध्ये प्रामुख्यानं आपणांस विमानातून आणि हॉटेलच्या खोलीतून टिपलेली छायाचित्रं आढळतील. कार्यालयीन बाबींचा थेट संदर्भ न देण्याचं धोरण मी कटाक्षानं पाळत असल्यानं तिथं घडणाऱ्या घटनांचा उल्लेख करण्याचं मी टाळतो.
दिनांक १७ फेब्रुवारी
सकाळी दोन वाजता मुंबईहून उड्डाण करणारे ब्रिटिश एअरवेजचे विमान माझं आवडतं! रात्री दहा वाजता घरातून आपण बाहेर पडलं की घरच्यांना वेळच्या वेळी झोपता येणं, मुंबई ते लंडन आणि लंडन ते फिलाडेल्फिया हे तुलनेनं समान अंतराचे टप्पे, लंडनला असणारा अगदी कमी नाही किंवा अगदी दीर्घ नाही असा तीन तासांचा थांबा आणि बडेजाव नसलेलं पण व्यवस्थित असं जेवण हे माझ्या आवडीमागची मुख्य कारणं.
मुंबईहून विमानाने अडीच वाजता उड्डाण केले की पुढील नऊ तास हे झोप, दोन वेळची जेवणं, विमानाचा युरोपकडे जाणारा मार्ग आपल्या समोरील स्क्रीनवर पाहत राहणं आणि जागं असल्यास वेगवेगळे चित्रपट पाहणे अशा विविध उपक्रमांमध्ये व्यतित करावे लागतात.
माझ्यासाठी खास भारतीय शाकाहारी जेवण पूर्ण प्रवासासाठी नोंदविलं गेलं होतं. माझी त्याला मान्यता नव्हती. त्यामुळं ह्यातून माझी सुटका होईल का अशी पृच्छा मी प्रवासात नम्रपणे करत होतो. एक दोन वेळा ती मान्यसुद्धा झाली. मुंबई ते लंडन प्रवासात विमानानं उड्डाण केल्यानंतर जेवण आणि लंडनला सकाळी उतरण्याआधी नाश्ता असा आपला पाहुणचार केला जातो. जेवणामध्ये सुरवातीला स्टार्टर म्हणून जो प्रकार असतो त्यात भरपूर फळं, हिरवागार पाला असतो. त्यामुळं आपल्याऐवजी ससा आणून आसनस्थ करायला हवा असा विचार क्षणभर माझ्या मनात येऊन गेला. नाश्त्याच्या वेळी समोर उपमा पाहून मी कृतकृत्य झालो. आधीच मुंबई लंडन प्रवासातील विमानातील वातावरण आपण भारतातच आहोत की काय अशी शंका निर्माण करण्याजोगं असतं, त्यात ह्या हिंदू शाकाहारी जेवण पर्यायाच्या निवडीने भर घातली.
जूनमध्ये लंडनला तुम्ही जात असाल तर उड्डाणानंतर काही तासांतच सूर्योदय झाल्यानं आकाशातील लख्ख प्रकाश आपली सोबत करत राहतो. हिवाळ्यात मात्र तांबडं फुटण्यासाठी आपल्याला अगदी लंडन येईस्तोवर वाट पाहावी लागते. लंडन विमानतळ परिसराची विमानातून टिपलेली नयनरम्य रूपं !
भारतातून लंडनला येणारी विमान बऱ्याच वेळा टर्मिनल पाचवर येतात. मग तिथून आपल्याला मेट्रो, बसचा वापर करत टर्मिनल तीनवर येऊन अमेरिकेला जाणारं विमान पकडावं लागतं. सवय असली की हा प्रकार सोपा वाटतो पण नवख्या माणसाला मात्र सूचनाफलकांच्या आणि गरज पडल्यास तेथील अधिकाऱ्यांस विचारत पुढं जावं लागतं.
लंडन ते फिलाडेल्फिया हा प्रवास अमेरिकन एअरलाईन्सच्या विमानानं झाला. तिथं सावळागोंधळ होता. बहुधा त्यांच्या पूर्वनियोजित विमानात काही गोंधळ झाला असावा म्हणून त्यांनी तात्काळ दुसऱ्या विमानाची सोय केली. पण हे जुनाट विमान होते आणि मला मिळालेले आसन गैरसोयीचे होते. अजून त्यांनी मला प्रतिक्रिया विनंती ई मेल पाठवलं नाहीये. जर पाठवलं तर चांगलीच प्रतिक्रिया देईन त्यांना ! इथंही सश्याचा आहार. तरी डावीकडील पालापाचोळा मला नको हे सांगितलं आणि ती डिश तो घेऊन गेल्यानंतर मला छायाचित्र घेण्याची आठवण झाली !
अमेरिका, युरोपातील नागरिकांना सर्व काही गोष्टी थंड सेवन, प्राशन करण्याची सवय. लंडनहून विमान निघण्याआधी विमानातील वातानुकूलित यंत्रणा अगदी जोरात काम करू लागली. डोक्यावरील थंड हवेचा फवारा मारणाऱ्या छोट्या पंख्याला बंद करत, चेकइन बॅगेतील टोपी डोक्यावर चढविण्याची वेळ आली. पुढील दोन आठवड्यात मुकाबला कराव्या लागणाऱ्या थंड हवामानाची आधीच पूर्वसूचना मिळाल्यानं आणि त्यात तिथं सर्दी, फ्लूची साथ पसरली असल्यानं मी अगदी बचावात्मक पवित्रा स्वीकारला होता.
स्ट्रॉबेरी आणि सफरचंद ज्युस!
तुलनेनं लंडन अमेरिका प्रवास कमी कालावधीचा! नवीन राजवट असल्यानं इमिग्रेशन अधिकारी थोडे जास्त प्रश्न विचारेल ह्याची जाणीव होतीच. अपेक्षेनुसार त्यानं ९० सेकंद विविध प्रश्न विचारून मग प्रवेश दिला. मनात कितीही इच्छा निर्माण झाली तरीही ह्या अधिकाऱ्यांशी मुद्द्याला सोडून गप्पा मारणं किंवा विनोदनिर्मिती करण्याचा प्रयत्न करणं टाळावं.
बॅगा ताब्यात घेतल्यानंतर उबेर टॅक्सीने 350 Rocky Run Pkwy, Wilmington, Delaware इथं असलेल्या होमवूड सुइट्सच्या दिशेनं प्रस्थान केलं. २०१७ सालापासून कोविडचा अपवाद वगळता दर वर्षी इथंच येत असल्यानं हे हॉटेल, परिसर, कर्मचारी वर्ग ओळखीचा आहे. दोन्ही टीव्हीवर माझ्या स्वागताचे संदेश झळकत होते. ग्रबहब ह्या झोमॅटोसारख्या अँपवरून मी माझं जेवण मागवत राहिलो.
ह्या भेटीत सुद्धा सकाळी एक - दीडच्या सुमारास जाग येण्याचा सिलसिला कायम राहिला. भेटीच्या उत्तरार्धात पुन्हा झोप येण्याच्या शक्यतेत वाढ झाली हीच काय ती प्रगती. अमेरिकेतील बहुसंख्य भागात हवेचा दर्जा अत्यंत चांगला असतो. हॉटेलच्या रूममधून सूर्योदयाच्या आसपास दिसणारी ही सुंदर दृश्यं! पहिल्या फोटोत मराठी भाषेतील तांबडं फुटणं ह्या शब्दप्रयोगाची प्रचिती येते !
गेल्या काही भेटीत मी साखर, चहा पावडर सोबत घेऊन जातो. सकाळी उठल्यानंतर दुधाळ चहा घेण्यासारखं सुख नाही!
अमेरिकेतील थंड हवामान आणि मनसोक्त आहार ह्यामुळं चेहरा टवटवीत दिसू लागतो असा माझा (गैर) समज! त्यामुळं दिवसागणिक प्रगती होत आहे का हे जाणून घ्यायला मी जमतील तितके सेल्फी काढत राहतो. मुख्य फोन साधा असल्यानं आणि केवळ छायाचित्रणासाठी आयफोन घेऊन गेल्यास परतताना कस्टम अधिकाऱ्यांकडून होऊ शकणाऱ्या संभाव्य प्रश्नावलीला टाळण्यासाठी आयफोन नेला नसल्यानं सर्व छायाचित्रं साध्या फोननेच काढली आहेत.
सायंकाळीसुद्धा सूर्याची आणि भोवतालच्या परिसराची सुंदर दृश्यं आपल्यासमोर येत राहतात.
सकाळच्या नाश्त्यात scrambled अंडी, बटाटयाच्या काचऱ्या हा दररोज असणारा सामायिक मेनू. बाकी फळांचे, ज्यूसचे अनेक पर्याय उपलब्ध ! दुसऱ्या दिवसापासूनच तापमान शून्याखाली गेल्यानं सतत जॅकेट, टोपी घालून राहणं हे ओघानं आलंच.
खोलीत सकाळी येणारी सूर्याची किरणं मला छायाचित्रणाच्या विविध संधी उपलब्ध करून देत होती.
१८, १९ ला डेलावेर येथील प्रामुख्यानं आज्ञावली विकसित करणाऱ्या माझ्या संघासोबत भेटीगाठी केल्यानंतर २० तारखेला डाउनटाऊन भागातील प्रामुख्यानं बिझनेस असणाऱ्या कार्यालयातून काम केलं. इथलं कार्यालय आपलं जुनेपण अजूनही काही प्रमाणात टिकवून आहे. इथे वर्षानुवर्षे आमच्या कंपनीत काम करणारी जुनी अनुभवी अमेरिकन मंडळी बहुसंख्येनं आहेत. ह्या लोकांकडे सखोल ज्ञान असतं. त्यामुळं अगदी थोड्या वेळात आपण बरंच काही समजावून घेऊ शकतो. खरंतर २० तारखेला ह्या कार्यालयातून काम करत असताना बराच वेळ भुरुभुरु बर्फ पडत राहिला. कार्यालयातून छायाचित्रण करणं योग्य नसल्यानं मी ही मनोहारी दृश्यं टिपू शकलो नाही. गेल्या पंधरा वर्षात माझ्या कारकिर्दीच्या जडणघडणीत मोलाचा वाटा बजाविणारे केन, आनंद आणि अशोक ह्यांच्या सोबत दर अमेरिकेत भेट घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न राहतो. आर्क्टिक ब्लास्टने निर्माण केलेल्या प्रचंड थंडीला न जुमानता आम्ही यंदाही २० तारखेला रात्रीच्या जेवणाच्या निमित्तानं भेटलो. जुन्या रम्य आठवणींना उजाळा मिळाला. वसईतील मित्रांसोबत जशा गप्पा रंगतात त्याची आठवण झाली.
२१ तारखेला आमच्या विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी जर्सी सिटीतील कार्यालयात जायचं होते. विल्मिंग्टन रेल्वेस्थानक आमच्या २० तारखेला भेट दिलेल्या डाऊनटाऊन कार्यालयाच्या बाजूलाच आहे. तिथं सकाळी उबेरने गेलो. एक आजोबा प्रचंड थंडीला न जुमानता कार चालवत होते. त्यांनी त्यांची जुनी गाणी बजाविणारे FM रेडिओ स्टेशन सुरु ठेवलं होते. त्यांची परवानगी न घेता त्यांचं घेतलेलं हे छायाचित्र! क्षमस्व आजोबा! जुन्या माणसांचं, त्यांच्या वागण्याचं निरीक्षण करणं हा माझा आवडता छंद. जुनी माणसं देश, धर्म ह्यांच्या सीमेपलीकडील एक समान वागणं आपल्यासमोर आणतात. वाटेत एक अपघात झालेली कार दिसली. "हल्लीची पिढी कशी गाड्या चालवते?" ह्या भावना व्यक्त करणारे वाक्य आजोबा म्हणाले. मी त्यांच्याशी संवाद साधण्याचा थोडाफार प्रयत्न करून पाहिला. पण त्यांना फारसा रस नसावा असं जाणवताच मी गप्प राहिलो.
बाहेर असलेल्या वजा सोळा सदृश्य तापमानाला तोंड देण्यासाठी सज्ज असलेला आदित्य. आपणच करावे आपल्या प्रतिमेचं कौतुक !
अँमट्रेक ही अमेरिकेतील दीर्घपल्ल्याची रेल्वेवाहतूक करणारी संस्था! ह्या ट्रेनचे तिकीट अरुण आणि मी काढले होते. तळमजल्यावर बैठकीसाठी व्यवस्था होती. दीर्घपल्ल्याच्या विविध गंतव्यस्थळाला जाणाऱ्या गाड्या कोणत्या फलाटावर येणार ह्याची सूचना देणारे इंडिकेटर तिथे होते. आम्ही पाच मिनिटं आधी आमच्या फलाटावर गेलो. ती पाच मिनिटंसुद्धा थंड वारे, तापमान ह्यांचा मुकाबला करताना तासभरासदृश्य वाटली. आम्ही स्थानापन्न झालो. तिकीट तपासनीस आला, त्यानं आमचे अँपमधील QR स्कॅन केले. सर्वजण आपल्या संगणकावर काम करत होते, झूम बैठकीवर हजर राहत होते.
अगदी वेळेवर गाडी पेन स्टेशनला पोहोचली. त्यानंतर पुन्हा उबेर करून आम्ही जर्सी सिटीतील कार्यालयात पोहोचलो. न्यूयॉर्क शहर दूरवरून आपणास खुणावत राहते. दिवसभरात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत बैठकी उत्तमरित्या पार पडल्यानं मनात समाधानाची भावना निर्माण झाली. कार्यालयाच्या बाजूलाच एक छोटेखानी मॉल आहे. तिथं चहापानासाठी जाताना हडसन नदीवरून येणाऱ्या थंड वाऱ्यांनी माझी त्रेधातिरपीट उडविली. पुन्हा एकदा अँमट्रेकने आम्ही डेलावेरला पोहोचलो. इथं वाहनतळावर असणारी गर्दी थोडीशी वेगळ्या वर्गातील होती. पण स्थानकावर पोलिसांचा पुरेसा राबता असल्यानं चिंतेचं कारण नाही असं अरुण म्हणाला. सायंकाळची ट्रेन वेळेआधीच डेलावेरला आली. जणू काही आपण आपल्या गावी परतलो असं मला वाटत राहिलं. उबेरमध्ये शिरताक्षणी ग्रबहबवरून होनेस्ट ह्या भारतीय उपहारगृहातून ह्या भेटीत मला आवडू लागलेलं सँडविच मागविलं. आमची आणि त्या सँडविचची हॉटेलवर पोहोचण्याची वेळ अगदी दोन - तीन मिनिटाच्या फरकानेच होती. जबरदस्त नियोजन आदित्य !!
ताजातवानं होऊन त्या प्रशस्त खोलीत शुक्रवारी रात्री सँडविचचा आस्वाद घेताना समाधानी म्हणतात ना तसं वाटत होतं. प्रचंड थंडीत पहिला आठवडा कार्यालयीन कामाच्या बाबतीत बराच चांगला गेला होता.
२२ फेब्रुवारी हा ह्या भेटीतील एकमेव निवांत दिवस असणार होता. सकाळी सवडीने नाश्ता वगैरे करून श्रीकांतसोबत भटकंतीला बाहेर पडलो. शनिवार असला तरीही घरून Exception Approval घेऊन Scrambled eggs आणि चिकनचा एक चविष्ट प्रकार ह्यांचा आस्वाद घेतला.
COSTCO, JCPenny, Macy इत्यादी दुकानांना भेटी दिल्या. घरी उगाचच व्हिडिओ कॉल करून हे घेऊ का ते घेऊ अशी पृच्छा करत शेवटी फार मोजकी खरेदी केली. उपहारगृहात बफे जेवणाचा आस्वाद घेऊन अडीच वाजता मी रूमवर परतलो. दोन तास मस्त ताणून दिली. मग मस्त चहा करून आठवडाभराचे कपडे हॉटेलच्या laundry मध्ये धुतले. हॉटेलच्या स्वागतकक्षात ह्या धुलाईसाठी तिथल्या यंत्रात टाकण्यासाठी आवश्यक असणारी क्वार्टर्सची नाणी मिळतात. प्रथम अर्धा तास धुलाई, मग तासभर वाळविणे असे जवळपास दोन तास ह्या प्रकारात जातात. रविवारी प्लेनोला जायचं असल्यानं बॅग्स भरण्यात हे दोन तास घालविले.
ह्या हॉटेलविषयी मला किंबहुना इथं वास्तव्य करणाऱ्या आमच्या कंपनीतील सर्वांनाच खूप विश्वास आहे. माझ्या दोन्ही चेकइन बॅग्स मी इथेच सोडून जाणार होतो. फक्त लॅपटॉप बॅग आणि एक केबिन बॅग घेऊन मी प्लेनो / डॅलसला निघालो होतो. रविवारी सकाळी चार वाजल्यापासून भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरु झाल्यानं त्या दिवशीच्या जेटलॅग विषयी तक्रार नव्हती. विमान साडेबाराचं होतं. आम्ही साडेदहापर्यंत विमानतळावर पोहोचलो. अमेरिकेतील विमानतळावरील सुरक्षाव्यवस्था TSA (Total Security Administration) ही संस्था सांभाळते. जर तुमचं स्टेटस TSA Precheck approved असेल तर तुमच्यासाठी वेगळी रांग असते. जर हे नसेल तर मात्र तुम्हांला सविस्तर सुरक्षातपासणीला सामोरे जावं लागतं जे कधी कधी काहीसं अपमानास्पद पातळीवर जाऊ शकतं.
साधारणतः पावणेबाराच्या सुमारास प्राधान्यक्रमानुसार विमानात प्रवेश करण्यास सुरुवात झाली. कागदोपत्री फिलाडेल्फिया ते डॅलस हा विमानप्रवास एकंदरीत तीन तास चाळीस मिनिटांच्या आसपास आहे. फिलाडेल्फियाची स्थानिक वेळ डॅलसच्या एक तास पुढे आहे. त्यामुळं आम्ही डॅलसला स्थानिक वेळेनुसार साडेतीनला वगैरे पोहोचणे अपेक्षित होतं. मी आदल्या दिवशी चेकइन करायला विसरल्याने माझा ग्रुप मागचा होता.
माझी विमानात प्रवेश करण्याआधी केबिन लगेजमधील जागा संपत आल्यानं आमच्या सर्वांच्या बॅग्स चेक - इन करण्यास बंधनकारक करण्यात आलं. ही शक्यता त्रासदायक आहे. एकतर ही बॅग आपल्यासोबत कायम असेल असं गृहितक असल्यानं आपण तिला लॉक वगैरे केलेलं नसतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपण ह्यातील सर्व सामान पूर्ण व्यावसायिक पद्धतीनं पॅक न केल्याची शक्यता असते. असो ही माझी केबिन बॅग विमानाच्या पोटात जाण्याचा क्षण मला भावनाविवश करून गेला. ही तीच बॅग जी मागच्या वर्षी होमवूड सुइट्समध्ये विसरून आलो होतो. तू मला प्रत्येकवेळी संकटात टाकतोस असं ती बॅग मला नक्कीच म्हणाली असणार!
विमानात आम्ही स्थानापन्न झालो. बहुतांश अमेरिकन सहप्रवासी असणाऱ्या विमानातील वातावरण काहीसं वेगळं असतं. सर्व प्रवासी विमानात शिरल्याची घोषणा करण्यात आली. पण बराच वेळ काहीच होईना तेव्हाच मनात शंकेची पाल चुकचुकली. आणि मग थोड्याच वेळात विमानाच्या तपासणीत टायर पंक्चर असल्यानं तुम्हां सर्वांना विमानातून बाहेर पडावं लागेल अशी घोषणा केली गेली. संपूर्ण विमान विविध विस्मयकारक उद्गारांनी भरून गेलं. परंतु नाईलाज असल्यानं आम्ही सर्व बाहेर पडलो. सुदैवानं श्रीकांत सुद्धा माझ्या सोबत होता. विमान उड्डाणाची नवीन वेळ दोन दहा अशी देण्यात आली होती. आम्ही सबवेचे सँडविच घेतले. भारतात आणि अमेरिकेत मिळणाऱ्या सबवे सँडविचमध्ये जमीनअस्मानाचा फरक असतो. तिथलं सँडविच बरंच चविष्ट असतं.
२:१०, २:४०, ३:१० अशा नवनवीन वेळा येत राहिल्या. नक्की काय होत आहे ह्याविषयी कोणतीच माहिती पुरवली जात नव्हती. मागच्या जूनमध्ये आपल्या एअर इंडियाने तीन चार तासाचा विलंब होताच लगेचच नाश्त्याची कुपन्स सर्व प्रवाशांना दिली होती. ज्या प्रवाशांना डॅलसहुन दुसरं विमान पकडून पुढं जायचं होतं त्यांची काय हालत झाली असेल देव जाणे. त्यांना कस्टमर केयर केंद्राकडे जाण्याची सूचना देण्यात येत होती. शेवटी पुन्हा साडेतीन वाजता आम्ही विमानात प्रवेश केला. सर्व प्रवाशी आले आहेत आता थोड्या वेळात आपण उड्डाण करू अशी घोषणा सुद्धा करण्यात आली. पण पुन्हा एकदा पंधरा वीस मिनिटं काहीच झालं नाही. आता मात्र प्रवाशांचा संयम सुटत चालला होता. विमानाला रनवे वर खेचून घ्यायला आवश्यक असणारी मंडळी उपलब्ध नाहीयेत असं न पटणारं कारण वैमानिकाने दिलं. आता मात्र दोन प्रवाशांचा संयम पुरता सुटला किंवा ते पुरते घाबरले. आम्हांला ह्या विमानातून प्रवासच करायचा नाही, आम्हाला उतरू द्या असे ते म्हणाले. हे दोघे उतरत आहेत, तुम्हांला उतरायचं आहे का असे वैमानिकाने सर्वांना विचारलं. आता मात्र विमानात भीतीची अदृश्य लहर पसरली. माझ्या समोरील सीट्सवर एक तरुण, त्याची मैत्रीण आणि बहुदा तिची आई असे तिघे बसले होते. तो तरुण अगदी संतप्त झाला. त्यानं हवाईसुंदरीला नक्की काय होत आहे असा प्रश्न विचारला. तिच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं त्यानं दुसऱ्या वयस्क हवाईसुंदरीकडे पृच्छा केली. नक्की काय झालं माहिती नाही पण ती पहिली हवाईसुंदरी आली. माझ्याकडं रोखून का पाहतोयस, attitude का दाखवतोयस असं तिने त्याला विचारलं. प्रसंग हाताबाहेर जाईल की काय अशी शंका माझ्या मनात निर्माण झाली. सुदैवानं तसं काही झालं नाही. विमान नियोजित वेळेपेक्षा चार तास उशिरा निघाल्यास पूर्ण पैसे परत द्यावे लागतात असे माझ्या समोरील युवक मोठ्यानं बोलत राहिला. कदाचित त्याच्या बोलण्यात तथ्य असावं. विमानानं साडेचारला उड्डाण केलं. डल्लासला उतरताना टायरने नीट राहावं ही प्रार्थना मारुतीरायाकडं करत मी मारुतिस्तोस्त्र बोलण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर दररोज प्रार्थना करत असलेल्या देवांचे, ब्रह्म्याचं स्मरण केलं. विमान व्यवस्थित उतरलं, बॅगसुद्धा व्यवस्थित आली.
हेच ते विमान आणि तो दिसणारा त्याचा टायर !
डॅलस निवू, निशांकचे गांव. पण निऊ सध्या भारतात आली असल्यानं निशांक मला भेटायला हॉटेलवर आला. एका भारतीय उपहारगृहात आम्ही अत्यंत चविष्ट चिकन बिर्याणी आणि तंदुरी चिकन खाल्लं. गप्पांना पुरेसा वेळ मिळाला नाही, पण चांगली चर्चा करून त्यानं मला परत हॉटेलवर सोडलं. इथलं हॉटेल Hyatt Regency फ्रिस्को. हॉटेल आलिशान, माझी खोली चौदाव्या मजल्यावर. तिथून शहराचा सुंदर नजराणा दृष्टीस पडत होता.
सोमवारी कार्यालयातून परत आल्यानंतर रुमवरून घेतलेली ही छायाचित्रं !
हॉटेल आलिशान असलं तरी माझ्या प्राथमिक गरजा जसे की सकाळी गरम पाणी करण्यासाठी गॅस, मायक्रोवेव्ह, इस्त्री वगैरे खोलीत उपलब्ध नव्हते. क्लिष्ट सूचना असणारे कॉफी मशीन होते. ह्याआधी अशा मशिनमधून मी पाणी गरम केलं आहे पण ह्यावेळी माझ्याकडं तितका संयम नव्हता.
डेलावेर हे एक तास पुढं असल्यानं आम्ही साडेसात वाजता कार्यालयात पोहोचण्याचा प्रयत्न करणार होतो. सकाळी पाच वाजता उठल्यावर त्रयोदशीच्या चंद्रकोरीचे विहंगम दर्शन झाले. "आदित्य तू आयफोन आणायला हवा होता!" मला अंतर्मनाने सुनावलं. दहा मिनिटांनी चंद्राला पुन्हा पाहायला गेलो तर संपूर्ण परिसराला धुक्यानं वेढलं होतं. चंद्र सोडा समोरील रस्ता, त्यावरील वाहनं देखील गायब झाली होती. एखाद्या हॉलिवूड थरारपटात परग्रहवासीयांनी पृथ्वीचा ताबा घेतल्यावर ज्या काही अनाकलनीय घटना घडतात त्यापैकी हा प्रकार असावा असं वाटून गेलं.
इथं आमच्या कॉर्पोरेट नोंदणीमध्ये नाश्ता समाविष्ट होता. जरी प्रत्यक्ष मांडून ठेवलेल्या नाश्त्याची छायाचित्रं घेतली नसली तरी प्लेटमध्ये घेतलेले हे काही पदार्थ. एकंदरीत उच्चभ्रू म्हणता येईल असा हा प्रकार होता.
हॉटेल ते ऑफिससाठी शटलसेवा होती. साडेसात वाजता सुद्धा धुक्याचा विळखा शहराभोवती होता. त्यात परग्रहवासीयांना शोधण्याचा अयशस्वी प्रयत्न मी करत राहिलो.
प्लॅनोची आमची टीम खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय आहे. इथिओपिया, दक्षिण कोरिया, नेपाळ, व्हिएतनाम, अमेरिकन आणि एक भारतीय असे वेगवेगळ्या देशातील सदस्य ह्या संघात आहेत. त्यांच्याशी दीड दिवस सविस्तर चर्चा केली, टीम लंच केलं. ह्या ऑफिसात माझी भाची इशा सुद्धा काम करते. तिची भेट घेतली. सायंकाळी संकल्प ह्या भारतीय उपहारगृहात पुन्हा एकदा चविष्ट जेवणाचा आस्वाद घेतला.
मंगळवारी सकाळी चेक आऊट करायचं होतं. त्यामुळं पुन्हा एकदा लवकर उठलो. चतुर्दशीची चंद्रकोर उगवत्या सूर्याच्या सोबतीनं दर्शन देत होती. अमेरिकेत मंगळवारी महाशिवरात्री असेल असं आधी घोषित करण्यात आलं होतं. बऱ्याच वेळा अमेरिकेत भारतापेक्षा एक दिवस आधी हिंदू सण साजरे करण्यात येतात असं मला श्रीकांतने सांगितलं. पण जर आपल्याला चंद्रकोर दिसली तर मग महाशिवरात्री कशी काय असू शकते हा प्रश्न मला पडला. श्रीकांत मला भेटताच महाशिवरात्री उद्या असेल असं सांगण्यात आलं आहे असं तो म्हणाला. बुधवारी सकाळी इथं असायला हवं होतं असं मला वाटून गेलं, अमावास्येचा पूर्ण अंधारा चंद्र कदाचित दृष्टीस पडला असता.
Croissant, बटाटे आणि फळांचा आस्वाद घेणारा मी! ह्यानंतर भरभरून फळांची प्लेट मी घेतली. अमेरिकेतील बेरी वर्गातील फळांना तुलना नाही! अत्यंत सुंदर चव असते त्यांची !
२००२ साली फिनिक्स मध्ये सहकारी असणारा अजय भेटायला आला. त्याच्याबरोबर भोजन जरा जास्तच रंगले. त्यामुळं ३:२० चे परतीचे विमान पकडण्यासाठी थोडी चिंतेची परिस्थिती निर्माण झाली. पण शेवटी व्यवस्थित विमान मिळाले. रविवारच्या अगदी उलट अनुभव इथं आला. विमानाने वेळेवर उड्डाण केले, वेळेत डेलावेरला अलगदपणे उतरले. चेक-इन बॅग्स नसल्यानं आम्ही बाहेर पडलो. पुन्हा उबेर आणि पुनश्च: ते सँडविच. ह्यावेळेला गणित चुकलं, सँडविच जरा आधीच येऊन स्वागतकक्षात माझी वाट पाहत राहिलं.
हॉटेलवाल्यांकडून माझ्या दोन चेक-इन बॅग्स ताब्यात घेऊन पुन्हा एकदा चेक-इन केलं. रात्री किचन भागात थोडं छायाचित्रण केलं.
बुधवारी डेलावेर मध्ये पुन्हा बैठकींना हजेरी लावली. गुरुवारी सकाळी चेक आउट केलं. त्या आधी काढलेला हा सेल्फी! काहीशा दगदगीच्या वेळापत्रकामुळं आणि जेट लॅगमुळे ह्या भेटीत चेहरा फारसा जास्त काही टवटवीत झाला नाही. गुरुवारी तीन वाजता ऑफिसातून विमानतळासाठी उबेर केली. अशा प्रकारे रविवार, मंगळवार आणि गुरुवार असे तीन दिवस फिलाडेल्फिया विमानतळावर मी हजर होतो.
ब्रिटिश एअरवेजचे हे विमान अगदी आलिशान होते. बहुतांश सहप्रवासी उच्चभ्रू अमेरीकन, ब्रिटिश होते. लंडनला पोहोचण्यासाठी केवळ सहा तास लागतील असे वैमानिकाने सांगितलं. हीथ्रो विमानतळावर सकाळी सहा आधी अधिक ध्वनीप्रदुषण करणाऱ्या विमानांना उतरण्यास परवानगी नसल्यानं वैमानिकाने फिलाडेल्फियाला थोडा टाईमपास केला असावा. परतीच्या प्रवासात अनुकूल अशा tailwind मुळे विमानं कमी वेळात लंडनला पोहोचतात. हा प्रवास उत्तर ध्रुवीय प्रदेशातून होत असतो. ह्या सहा तासात मला मोजकी झोप लागली.
लंडनला सहाच्या आसपास उतरल्यानंतर साडेनऊला मुंबईचे विमान होते. अमेरिकेला गुरुवारी सायंकाळी सहा चाळीसला निघालेलं विमान लंडनला स्थानिक वेळेनुसार सकाळी सहा वाजता उतरलं. लंडनहून शुक्रवारी सकाळी साडेनऊला निघालेलं विमान मुंबईत खरंतर शनिवारी सकाळी सव्वाबारा वाजता उतरणार होतं. पण बहुदा शेपूटवाऱ्यांनी जास्तीच जोर लावल्यानं ते शुक्रवार रात्री ११:५० लाच मुंबईत उतरलं. पण मी विमानातून बाहेर पडेस्तोवर शनिवार उजाडला होता. अशा प्रकारे ह्या आठवड्यात मी रविवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार विमानात होतो असे मी सांगू शकतो!
लंडन ते मुंबई प्रवासात खिडकीची सीट मिळाली किंवा मिळवली होती. लंडनला उड्डाण केल्यानंतर काही सुरेख छायाचित्रं मिळाली.
ढगांच्या घनदाट अशा थराच्या वरील पृष्ठभागावर कोण्या कलाकारानं केलेलं हे अप्रतिम नक्षीकाम पहा!
समुद्राच्या निळ्याशार पाण्यावर पडलेल्या ढगांच्या सावल्या किती मनोहर दिसत आहेत.
आता वेळ होती भोजनाची. पुन्हा एकदा भारतीय शाकाहारी आहार! लंडन ते अमेरीका प्रवासात माझ्या विनंतीचा मान राखत माझ्यासाठी खास मागविलेल्या शाकाहारी भोजनाला डावलून त्यांनी मला चिकनची चविष्ट डिश आणून दिली होती. इथं मात्र असं काही घडलं नाही. कक्षात सहकुटुंब भारतीय प्रवास करत होते. लहान मुलं गडबड करत वावरत होती. भारतात परतण्याची जाणीव इथूनच होत होती.
आखातात असताना सूर्य मावळला.
मुंबईला दोन तास असताना अशी दिव्यांची रांग दिसली. नक्की काय असावं ह्याचा उलगडा झाला नाही.
पुन्हा एकदा मला भारतीय नाश्त्याचा आग्रह करण्यात आला. मी निग्रह दाखवून फक्त ब्रेड आणि चहा आणून देण्याची विनंती केली. त्या दोन एअरहोस्टेसना बहुदा वाईट वाटत राहिलं. त्यांनी पुन्हा एकदा तुझं मत बदललं तर नाही ना असं विचारलं. मी माझ्या मतावर ठाम राहिलो. शेवटी त्यांनी मला दोन ब्रेड, चहा आणि चविष्ट स्वीट डिश आणून दिली. संपूर्ण प्रवासात त्यांनी मला ज्या ज्या वेळी ड्रिंक्स घेणार का विचारलं त्या त्या वेळी मी कायम लिंबूपाणी सांगितलं. त्यामुळं उतरताना त्या माझ्याकडं आदरानं पाहत असल्याचा भास मला होत राहिला.
अमेरिकेतील आहाराने जरा तंदुरुस्त झालेला मी विमानातून बाहेर पडणाऱ्या पहिल्या दहा प्रवाशांमध्ये होतो. इमिग्रेशनपर्यंत असणारा जवळपास एक किलोमीटरचा पल्ला मी जोरजोरात पार केला तेव्हा मी बहुदा दुसरा होता. बॅग्स यायला दहा पंधरा मिनिटं लागली. मी एक वाजून वीस मिनिटांनी घरी पोहोचलो आणि दोन वाजून दहा मिनिटांनी निद्राधीन झालो. रात्री आणि दुपारी चांगली झोप झाल्यानं आजच्या दिवसातच हा वृत्तांत लिहून झाला.
उद्यापासून कार्यालयीन कामावर लक्ष ! ह्या भेटीत सकाळी प्रसन्न चित्तानं कार्यालयात जाऊन काम करण्याचा आनंद लुटला. प्रदूषणमुक्त वातावरणाचा माणसाच्या कार्यक्षमतेवर किती अनुकूल परिणाम होतो ह्याची पुन्हा एकदा प्रचिती घेतली. एक सकारात्मकता घेऊन मी परतलो आहे. मुंबई मला कसं वागवते ते पाहुयात. पण एक गोष्ट खरी कसाही असला तरी आपल्या देशात परतण्याची प्रत्येक वेळ पुन्हा मनात समाधानाची एक लहर निर्माण करून जाते!
आता भारतात मला जेट लॅगने सतावू नये ह्यासाठी कृपया परमेश्वराकडे प्रार्थना करा.
खूप सुंदर वर्णन
उत्तर द्याहटवाWell written. Kudos to your hobby and discipline! Is that Honest’s Bahubali sandwich? We all like it too 😀
उत्तर द्याहटवाखूप छान प्रवास वर्णन ,,,,,,,,,समीर कर्णिक
उत्तर द्याहटवाधन्यवाद समीर!
हटवाWELL WRITTEN ADITYA
उत्तर द्याहटवाVERY NICE