२६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी ह्या २९ दिवसांत चांगलीच भटकंती झाली. त्यातील बहुतांशी प्रवास कामानिमित्त आणि एक जवळचा प्रवास शालेय स्नेहसंमेलनासाठी झाला. एकंदरीत आठ वेळा विमानानं उड्डाण केलं. त्यासोबत आठ वेळा लँडिंग सुद्धा झालं हे ओघानं आलंच.
अमेरिकेतील दोन ठिकाणच्या टीमची भेट झाली. विल्मिंग्टनला एक ऑफसाईट झालं. ऑफसाईटमध्ये चांगली चर्चा झाली. इशा कार्यालयात भेटायला आली. बराच वेळ तिच्या अमेरिकन जीवनाविषयी बोलली. निशांक, निऊकडे चार दिवस मस्त गप्पा मारल्या. निरंजना, शर्व, निशांकची बहीण ममता भेटले. होळीवरचा आशय तिथं भेटला, त्याच्यासोबत मस्त जेवण केलं. विल्मिंग्टनला शालेय वर्गातील अजय, नंदा भेटायला आले. त्यांच्या आणि कल्पेशसोबत (नंदाचे यजमान) सुद्धा चांगली चर्चा झाली. प्लॅनोला नवीन संघाशी ओळख झाली. तिथं भारतातून स्थलांतरित झालेले मित्र भेटले. झूमवर नेहमी बोलणारा फेमी पुन्हा प्रत्यक्षात भेटला. भारतीय आणि अमेरिकन रेस्टोरंटमध्ये स्वादिष्ट अन्नावर चांगला आडवा हात मारला. शनिवार सकाळी निऊसोबत कार्यसिद्धी हनुमान मंदिरात जाऊन आलो. योगायोगानं तिथं त्याचवेळा सुरु झालेल्या आरतीला उपस्थित राहण्याचं भाग्य मिळालं.
विल्मिंटन कार्यालय, तिथले सहकारी, तिथलं हॉटेल ह्याची अगदी सवय झाली आहे. सकाळी साडेसातला कार्यालयात जाऊन साडेचारच्या आसपास घरी निघण्यासारखं सुख नाही. थंड हवामान आणि स्निग्ध / दुग्धजन्य पदार्थांचं सेवन केल्यानं चेहरा उजळला असे प्राजक्ता म्हणाली . मुंबईत आठवडाभरात तो पूर्वीसारखा दमलेला झाला ही गोष्ट वेगळी! अमेरिकेतील यंदाचा जेट लॅग माझ्यासोबत मित्रत्वाने वागला. मध्यरात्री एक वाजता जरी त्यानं मला उठवलं तरी नंतर दोन तासानं झोपू देण्याची कृपा त्यानं माझ्यावर केली.
अमेरिकेत हॉटेलवरून निघताना तिथंच एक केबिन बॅग सोडून येण्याचा विसरभोळेपणा मी केला. पण त्यातील शर्ट आणि मोबाईल चार्जर परवा अमेरिका, हैदराबाद ते भारतातील ऑफसाईट अशा मार्गानं माझ्यासोबत पोहोचले. मूळ चार्जर परतल्याने भ्रमणध्वनीची कळी खुलली!
नेहमीप्रमाणं ह्यावेळी कमी खायचं पासून सुरवात करत आता पुढील आठवड्यात फक्त गलका, दुधी, पडवळ खायचं अशी समजूत घालत विमानात आलेले बहुतांश सर्व पदार्थ हादडले. त्यात काही वेळानं आता इतकं खाल्लं तर अजून थोडं जास्त खाल्लं तर काय फरक पडतो अशा स्वतःच स्वतःच्या घातलेल्या समजुतीचा भाग होता. त्यामुळं तिथं निघताना जो काही फिट आदित्य होता तो विमानातील चोवीस तासांत जरा सुटला.
गेल्या रविवारी शालेय मित्रांचं वार्षिक स्नेहसंमेलन झालं. अधिकाधिक लोकांनी आपलं मनोगत मांडल्यानं मोगॅम्बो खुश हुआ! व्यक्त होणं ही मनुष्याची आवश्यक गरज आहे हे आता अधिकाधिक लोकांना जाणवु / पटू लागलं आहे. त्याहून महत्वाचं म्हणजे ते आता व्यक्त होण्यासाठी पुढं येऊ लागले आहेत. बहुतांश मित्रमैत्रिणींनी मुद्देसूद विचार मांडले. परत आल्यानंतर आईला प्रथमच भेटल्यावर तिनं तब्येतीविषयी समाधान व्यक्त करतानाच थोड्या सुटलेल्या पोटाकडं व्यायामाकडं दुर्लक्ष करू नकोस असा मोलाचा सल्ला दिला.
गुरुवार, शुक्रवार कंपनीतील सीनियर लोकांचं ऑफसाईट झालं. विविध विषयांवर चांगली चर्चा झाली, पुढील काही वर्षांच्या नियोजनाविषयी बौद्धिकं घेण्यात आली. ह्या चर्चेसोबत पुन्हा एकदा सुग्रास भोजन, नाश्त्याचे (दोन्ही वेळा) अगणित पर्याय आपल्याला मोहात पाडण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. कौतुकाची बाब म्हणजे मी ह्यावेळी मात्र स्वतःवर नियंत्रण ठेवलं. शुक्रवारी रात्री मुंबईला परतीसाठी मूळ वेळ पावणेअकरा असलेल्या विमानाची उड्डाणवेळ पाच वेळा पुढे ढकलली जात शेवटी ते पहाटे पाच वाजता मुंबईला निघालं. पण सोबत सात सहकारी असल्यानं सुरुवातीला आलेला संताप, चीड नंतर एका धमाल चर्चेत आणि गेम्समध्ये घालवलेल्या एका चांगल्या आठवणीत परिवर्तित झाले.
शनिवारी सकाळी घरात परतल्यावर पुढील काही महिने तरी आपली भ्रमणकक्षा फक्त मुंबई, वसईपर्यंत मर्यादित ठेवणार असं आश्वासन मी दिलं. बघुयात !!!
ह्या सर्व भ्रमंतीतील हे निवडक फोटो!