लहानपणी आपण सर्वजण किंवा मी राक्षसाच्या गोष्टींनी अगदी भयभीत होत असू. राक्षस बहुदा गावाजवळील टेकडीवर राहायचा. राक्षसाचा देह महाकाय. त्याला भूक लागली की तो दणादण पावलं टाकीत टेकडीवरुन, पर्वतावरुन खाली उतरत असे. राक्षसानं टेकडीवर रहावं की पर्वतावर हे बहुदा त्याच्या आकारमानावर अवलंबुन असावं.
वाचलेल्या सर्व गोष्टींत राक्षस आणि गावकरी ह्याच्यात व्यवस्थित सामंजस्य होते. बकासुराला महिन्याला गाडाभर अन्नधान्य दिलं की तो गावकऱ्यांना बाकीचे दिवस त्रास देत नसे. ह्याआधीचे राक्षस इतके समजुतदार होते की नाही हे समजायला मार्ग नाही. राक्षसाला मोजकी कामे असावीत. दिवसाचं, आठवड्याचं किंवा महिन्याचं एकदाच खाऊन घ्यावं आणि मग झोपी जावं. पुन्हा भूक लागली की टेकडी, पर्वत जे काही असेल ते उतरावं आणि ...
गोष्टीत कधी वाचलं नाही पण बहुदा राक्षस एकटेच टेकडीवर रहात असावेत. त्यांनाही कदाचित समूहाने राहणाऱ्या माणसांचा हेवा वाटत असावा. ते ही कदाचित रात्री एकटेच टेकडीवर आकाशातील तारकांकडे पाहून उदास गाणी म्हणत असावेत. ह्याचाच परिणाम असेल बहुदा पण कालांतरानं राक्षस त्यांच्या मूळ रुपांतून नाहीसे झाले. एकट्यानं मनुष्यजातीपासुन वेगळं राहणं त्यांना कदाचित आवडलं नसावं. त्यांच्यात उत्क्रांती होत गेली. हळुहळू राक्षस मनुष्यरुपात बाकीच्या माणसांसोबत येऊन राहू लागले.
ह्या पर्वाच्या सुरुवातीच्या कालावधीत कदाचित बाह्यरुपाद्वारे राक्षस आणि इतर मनुष्यगण ह्यांच्यातील फरक समजू शकत असावा. पण त्यामुळं आपल्याला अजुनही वेगळी वागणुक मिळतेय ह्याला कंटाळून राक्षसांच्या उत्क्रांतीच्या पुढील टप्प्यात मनुष्य आणि राक्षस ह्यांच्या बाह्यरुपातील उरलासुरला फरकही नाहीसा झाला. आता राहिला होता तो केवळ विचारातील, वागण्यातील फरक.
बाकीचा मनुष्यगण इतक्या कालावधीत गप्प बसला होता असे नाही. राक्षसाचे गुणधर्म, विचारसरणी ओळखायला आणि त्यावर मात करायला शस्त्रासोबत मंत्र, बोधपर कथा, संस्कार इत्यादी मार्गांचा अवलंब केला गेला. मनुष्यानं आपल्यावर अजुनही पूर्ण विश्वास ठेवला नाही ह्याचं राक्षसाला खूप वाईट वाटलं असणार. त्यामुळं हळूहळू राक्षसानं आता मनुष्यांच्या मनांत प्रवेश करायला सुरुवात केली. बहुतांश सर्व माणसांच्या वागण्यात आता हे गुण दिसु लागले आहेत.
त्यामुळं वाचकहो, अवतीभोवती टेकडी दिसलं तरी त्यावर राक्षस कुठे दिसतोय का ह्याचा शोध घेऊ नका!