मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ३० जुलै, २०२२

पर्वताचं पर्वतपण

 


घराची खिडकी उघडली की समोर एक महाकाय पर्वत मला दर्शन देतो. ह्या पर्वताची अनेक रुपं मला भावत रहातात. कधी त्याचं शिखर हिमाच्छादित असतं, कधी त्याचा बहुतांश भाग हिरव्यागार झाडीनं व्यापलेला असतो तर प्रखर ग्रीष्म ऋतूत त्याच्या पायथ्याशी काहीसा रखरखीतपणा जाणवतो. आपल्या बाह्यरुपानं आपल्या मनःस्थितीवर परिणाम करुन घेणं पर्वताच्या स्वभावातच नसावं अशी माझी समजुत! त्यामुळं ह्या सर्व परिवर्तनांना स्थितप्रज्ञासारखा सामोऱ्या जाणाऱ्या पर्वताचं मला भारी कौतुक ! 

मी खूप आनंदात असलो की पर्वताकडं मोठ्या आशेनं पाहतो, पर्वत माझं कौतुक करेल म्हणून ! पर्वत कौतुक करण्यात काहीच उणा पडत नाही पण मी ह्या आनंदाच्या भरात वाहत जाणार नाही ह्याची योग्य ती काळजी घेतो. मी दुःखी असलो, निराश झालो की पर्वत माझा एकमेव आधार असतो. पर्वत सहानभूती वगैरे दाखवत नाही. माझं बोलणं फक्त शांतपणे ऐकून घेतो. मनातील शल्यं मी बोलुन अथवा त्यांची मनातल्या मनात मी उजळणी करेपर्यंत  तो तिथं केवळ माझ्यासाठी हजर असतो. त्याला माझ्यासाठी सदैव उपलब्ध राहण्यापलीकडं दुसरं काही काम नसावं का ही शंका माझा पिच्छा सदैव पुरवत राहते. पण तो माझ्यासाठी उपलब्ध नसला तर माझं काय होईल ह्या भितीपोटी त्या शंकेचा पाठपुरावा करण्याचं धारिष्ट्य माझ्यात नसतं. 

एके दिवशी नवलच घडलं ! पर्वताकडं पाहताक्षणी ह्याचं काहीतरी बिनसलं आहे हे मला जाणवलं. मी पर्वताला विचारलं, "पर्वता, पर्वता, काय झालं रे?" सुरुवातीला पर्वत काही बोलेना. पण मी ही इरेला पेटलो होतो. मला खरोखरच पर्वताची काळजी वाटत होती की माझ्यासाठी पर्वताचं पर्वतपण नसण्याची होती ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं धारिष्ट्य माझ्यात नव्हतं.पर्वताची मनधरणी करण्यासाठी अर्थातच मला कित्येक दिवस लागले. मी ही काहीसा अबोला धरला त्याच्याशी. शेवटी एका सायंकाळी पर्वत बोलता झाला. 

"तू माझ्याकडं मोठ्या आदरानं पाहतोस, माझ्या स्थितप्रज्ञतेचं तुला कौतुक वाटतं ह्याची मला पुरेपूर जाणीव आहे. माझ्या रुपानं  तुझ्या आयुष्यात एक स्थैर्य पुरवणारा कायमस्वरुपी आधार आहे ह्या गोष्टीचा मला आनंद आहे. तुझ्याच नव्हे तर ह्या भूतलावरील बहुसंख्य लोकांच्या आयुष्यात काय घडत आहे हे मला माझी इच्छा असो वा  नसो दिसत रहातं. माझ्या अंगाखांद्यावर लाखो वृक्षवेली, हजारो पशु पक्षी, जीव जन्म घेतात, आनंदात बालपण घालवतात, तारुण्याच्या उन्मादात मोजके क्षण घालवतात आणि त्यानंतरच्या प्रदीर्घ जबाबदारीच्या आयुष्यानंतर शेवटी जीवनाच्या अंतिम सत्याला सामोरे जातात. माझ्या अंगावर एका ओहोळाच्या रुपात जन्म घेणारी नदी जेव्हा पठारावर पोहचेपर्यंत एक विशाल रुप धारण करते आणि रुपगर्वितेप्रमाणं गावागावातून लोकांची आयुष्यं फुलवत जाते हे ही मी पाहतो."

"हे सर्व पाहून माझ्या मनात काहीच खळबळ माजत नसावी असंच तुम्हां साऱ्यांना वाटत असावं. निर्मात्यांनी सृष्टीची निर्मिती केली तेव्हा मी स्वखुशीनं पर्वतपण स्वीकारलं असावं अशीच सोयीस्कर समजूत तुम्ही साऱ्यांनी करुन घेतली असावी. तो काळच वेगळा होता. आदर्शवादी होता. ज्येष्ठांनी माझी निवड केली ती काही विशिष्ट योग्य कारणांमुळं ह्याची मला जाणीव होती. त्यामुळं त्यांचा हा निर्णय मी शिरोध्याय मानला. पर्वताचं पर्वतपण असणं ही समाजाची गरज असते ह्याची जाणीव सर्वांना होती. त्यामुळं मी हे पर्वतपण जरी सुरुवातीला स्वखुशीनं स्वीकारलं नसलं तरीही कालांतरानं ते माझ्या अंगवळणी पडलं"

"काळ बदलत चालला. महत्वाकांक्षा आणि सोबतीला वृथा अभिमान सर्वत्र पसरत चालला. टेकड्यांना सुद्धा पर्वत बनण्याची स्वप्नं पडू लागली. टेकड्यांनी पर्वत बनण्याची स्वप्नं बघण्यात गैर काही नाही. पर्वत बनावं ते विशाल होऊन, उंची गाठून! ते जमत नाही म्हणून मुळच्या पर्वताचं खच्चीकरण करुन त्याला आपल्या बरोबरीला आणण्याचा प्रयत्न करणं चुकीचं आहे. माणसांना मोजक्या महाकाय पर्वतांची गरज आहे, असंख्य टेकड्यांची नाही"

अचानक पर्वताच्या चेहऱ्यावर वेदनेचे भाव दिसू लागले. "असं हे व्यक्त होणे माझ्या व्यक्तिमत्वात बसत नाही आणि खरंतर मी चुकलोच ! " पर्वताने आपल्या मनोगताचा शेवट केला. पर्वताची उंची काहीशी कमी झाली होती. ही व्यथा व्यक्त करणं हे त्याच्या भुमिकेला शोभेसं नव्हतं. 


त्यानंतर पर्वतानं मौन स्वीकारलं ते आजतागायत कायम आहे.  

रविवार, १७ जुलै, २०२२

२०२२ - अमेरिका दौरा


गेल्या दोन वर्षातील कोरोनामुळे प्रवासावर आलेल्या निर्बंधांमुळं अमेरिकेतील ऑफिसात जाणं झालं नाही. जसजसे मागील वर्षी प्रवासावरील निर्बंध उठू लागले तेव्हा हळूहळू हैदराबाद कार्यालयात फेऱ्या सुरू झाल्या. जून महिन्यात अमेरिकेतील ऑफिसमध्ये अमेरिकेतील विविध कार्यालयांत काम करणाऱ्या सहकाऱ्यांना एका विशिष्ट प्रशिक्षणासाठी नेवार्क डेलावेअर येथील ऑफिसात बोलावण्यात आले होते. मी सध्या जी भूमिका बजावत आहे त्या अनुषंगानं या प्रशिक्षणाच्या निमित्ताने मीही तिथे गेलो. या दौऱ्यातील काही महत्त्वाची महत्त्वाच्या नोंदी आणि त्या अनुषंगानं आलेली काही छायाचित्रं असं ह्या पोस्टचे स्वरूप असणार आहे.

परदेश दौरा म्हटला की तुमच्या बॅग्सचे पॅकिंग हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो. जर आपण नियमित परदेश प्रवासाला जात असाल तर आपण याबाबतीत काहीसे सुसज्ज असता. परदेश प्रवासासाठी आवश्यक असणारी यादी आपल्याकडे सदैव तयार असते. अनुभवी माणसं केवळ पाच-सहा तासात परदेश प्रवासासाठी लागणाऱ्या बॅग्स भरतात असं ऐकिवात आहे. मी याबाबतीत पूर्णपणे माझ्या पत्नीवर अवलंबून आहे!

एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही चेक-इन बॅगमध्ये तुमचे सर्वस्व भरता कामा नये. चेक-इन बॅग तुमच्यासोबत वेळच्या वेळी इच्छित स्थळी पोहोचणार नाही ही एक कधीही घडू शकणारी शक्यता आहे. म्हणून तुम्ही तुमच्या सोबत असलेल्या केबिन बॅग्समध्ये परदेशातील पहिले दोन-तीन दिवस तुम्ही आपला जीवनक्रम निभावू शकाल इतक्या सामानाची तजवीज करायला हवी.

आता आपण क्रमाने चेक-इन बॅगमध्ये भराव्या लागणाऱ्या गोष्टींची यादी बघूयात.
१. तुमचे घरगुती वापराचे कपडे
२. तुमचे कार्यालयीन वापराचे कपडे
३. अमेरिकेतील हवामानासाठी विशिष्ट ऋतूनुसार आवश्यक असणारे कपडे
४. अमेरिकेतील सहकाऱ्यांसाठी तुम्ही जर काही भारतीय मिठाई घेऊन जात असाल तर त्या सुद्धा चेक-इन बॅगमध्ये असाव्यात.
५. मला अजूनही पूर्णपणे खात्री नसलेला मुद्दा म्हणजे भारतीय औषधं! चेक-इन बॅग मध्ये ही आपण किती बिनधास्तपणे आपण नेऊ शकतो ह्याविषयी मी काहीसा साशंक आहे. गेल्या दोन-तीन अमेरिका फेरीतील अनुभवानुसार चेक-इन बॅगेचं अमेरिकेतील आगमनाच्या विमानतळी (पोर्ट ऑफ एन्ट्री) इथं सखोल परीक्षण झाल्याचं माझ्या तरी अनुभवात नाही.
६. जी काही कुटुंब दीर्घकालीन वास्तव्यासाठी अमेरिकेत जातात ती कुटुंब चेक-इन बॅगमध्ये जवळपास मिनी संसार घेऊन जातात. परंतु यावेळच्या माझ्या अनुभवानुसार केवळ दोन आठवड्यासाठी जरी तुम्ही जात असाल तरी कुकर आणि चहा पावडर, साखर इत्यादी मूलभूत गोष्टी तुमच्या चेक-इन बॅगमध्ये असणं केव्हाही उत्तम!

आता आपल्या सोबत केबिन लगेजमध्ये भरण्याच्या गोष्टींची यादी पाहूयात! चेक-इन बॅग वेळच्यावेळी न पोहोचण्याच्या आणीबाणीसदृश्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी यामध्ये सुद्धा कार्यालयीन आणि घरगुती वापरांच्या कपड्याच्या किमान दोन जोड्या त्यासोबत सॉक्स वगैरे असणे इष्ट! इथं तुमचे चार्जर वगैरे प्रकार चालू शकतात. पावर बँकच्या चेकिंग बॅगमध्ये असण्यावर बहुदा निर्बंध असतात. साधारणतः तुम्ही जितके दिवस परदेशात वास्तव्य करणार असाल त्या दिवसांच्या ८५ - ९०% इतके मास्क केबिन लगेज मध्ये असावेत.

तुमची सर्वात महत्त्वाची कागदपत्रं तुमच्यासोबत केबिन लगेजमध्येच असावीत. यामध्ये तुमचा पासपोर्ट, तुमच्या तिकिटांच्या छापील प्रती, लसीकरणाचा दाखला आणि तुम्ही अमेरिकेत कशासाठी नक्की जात असाल जात आहात हे सिद्ध करणारी काही कागदपत्रं हे महत्त्वाचे घटक आहेत. ही कागदपत्रं खास करून जर तुम्ही बिझनेस व्हिसावर अमेरिकेत जात असाल तर आवश्यक असतात. यात एका विशिष्ट उच्च पातळीवरील अमेरिकन पदाधिकाऱ्याकडून तुम्हाला आलेले आमंत्रण पत्र (Invitation Letter) आणि तुमच्या विविध बैठकींचा तपशील असणे उत्तम. आत्तापर्यंत जरी मला याबाबत कोणी विचारले नसले तरी या कागदपत्रांच्या अनुपलब्धतेवरुन अथवा त्यातील पुरेशा माहितीच्या अभावामुळं अमेरिकन पोर्ट ऑफ एन्ट्रीला तिथल्या अधिकाऱ्यांनी काही जणांना जेरीस आणल्याची उदाहरणं आहेत. मोबाईल मध्ये तिकिटं, लसीकरण दाखला असताना त्यांच्या छापील प्रती का घेऊन जाव्यात हा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो. तर ह्यात मोबाईल वापरण्याच्या क्षमतेचा अभाव हे कारण नसून मोबाईलमधील प्रतींचा बॅकअप असणे हा हेतू आणि छापील प्रत त्वरित दाखवू शकतो हे कारण आहे.

अमेरिकन प्रवासासाठी अर्थात तुमच्याकडे पुरेसे परकीय चलन अर्थात डॉलर असणे आवश्यक आहे. बोरिवलीमध्ये भारतीय चलन घेऊन डॉलर देणारी काही व्यवस्थापिक आस्थापने आहेत. तुमच्याकडे ज्या देशाचे चलन हवे आहेत त्या देशाचा व्हिसा, तुमच्या प्रवासाची तिकिटे, तुमच्या पासपोर्टची महत्त्वाची तीन पाने, तुमच्या पॅन कार्डची छायाप्रत इत्यादी महत्त्वाचे घटक आवश्यक आहेत. ही कागदपत्रं दिल्यानंतर तुम्हाला केवळ १५ ते ३० मिनिटांत आवश्यक ते अमेरिकन डॉर्लर्स मिळू शकतात.

यावेळचा माझा अमेरिका प्रवास हा ब्रिटिश एअरवेजने मुंबई ते लंडन आणि लंडन ते फिलाडेल्फिया असा होता. मुंबई ते लंडन हे उड्डाण ब्रिटिश एअरवेजच्या अखत्यारीत येतं. लंडन ते फिलाडेल्फिया हे उड्डाण अमेरिकन एअरलाईन ब्रिटिश एअरवेजच्या कोडखाली ऑपरेट करतं. अशा पद्धतीला पार्टनर एअरवेज असे म्हणण्याची पद्धती आहे. करोना काळातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे तुमच्या लसीकरण दाखल्यावर तुमचा पासपोर्ट क्रमांक असणे आवश्यक आहे. सर्वसाधारण परिस्थितीत तुमच्या लसीकरण दाखल्यावर तुमचा आधार क्रमांक असतो परंतु परदेश प्रवासात तुमच्या आधारकार्डची वैधता तपासून पाहण्याची अपेक्षा परदेशी अधिकाऱ्यांकडून ठेवणं काहीसं अवास्तव आहे. त्यामुळं त्या दाखल्यावर तुमच्या पासपोर्टची नोंद असणे आवश्यक आहे. भारतीय सरकारने केलेल्या एकंदरीत संगणकीकरणाचा आणि डिजिटलायजेशनचा अत्यंत चांगला अनुभव आपल्याला इथे येतो. कोविन साइटवर Raise an issue हा पर्याय निवडून केवळ एका मिनिटात तुम्हाला आधारकार्डऐवजी तुमचा पासपोर्ट नंबर अपडेट करता येतो. हा पासपोर्ट क्रमांक अपडेट करत असताना काळजीपूर्वक करावा कारण तेथील माहितीनुसार तुम्हाला पासपोर्ट क्रमांक केवळ एकदाच अपडेट करता येतो.

मी एअरटेलचा आंतरराष्ट्रीय प्लॅन सक्रिय केला होता. त्यानुसार अमेरिका, इंग्लंड आणि अन्य देशांमधून मी थेट दूरध्वनी करु शकत होतो आणि डेटा सुद्धा वापरु शकत होतो. इतकं सारं असलं तरी ह्या साऱ्या प्रवासात माझं एक दिवस wordle खेळायचं राहून गेलं आणि १२० दिवसांची श्रुंखला मोडली गेली.

मी अमेरिकेला जाण्याच्या एक आठवडाआधी अमेरिकन सरकारने प्रवासाआधी गेल्या २४ तासात केलेली निगेटिव्ह आरटीपीसीआर टेस्ट आवश्यक असण्याची अट शिथिल केली होती. तरी देखील एक काळजी घेण्याची पद्धत म्हणून मी जाण्याच्या दिवशी ही टेस्ट करून घेतली ती नकारात्मक आल्याने मी सुटकेचा निश्वास टाकला.

माझे मुंबई ते लंडन हे फ्लाईट सकाळी एक वाजून ५५ मिनिटांनी होते. रात्रौ साडेनऊ वाजता माझ्या कार्यालयाने माझ्यासाठी कॅब बुक केली होती. त्यावेळी थोडासा पावसाने पिरपिर चालू केली होती. चालकाने मास्क न घातल्यामुळे मी काहीशी नापसंती व्यक्त केली. त्यामुळे सुरू झालेला आमचा सुसंवाद बंद झाला. मुंबई एअरपोर्टला पोहोचल्यावर ब्रिटीश एअरवेजच्या बिजनेस क्लासच्या चेकिंग कक्षाकडे मी प्रस्थान केले. संपूर्ण प्रवासात फक्त एकदाच माझे व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट तपासण्यात आले, ते इथं! मी केवळ एकच चेकइन बॅक घेऊन जात असल्याबद्दल ब्रिटिश एअरवेजच्या चेक-इन करणाऱ्या महिला कर्मचारीने आश्चर्यवजा आनंद व्यक्त केला.

मुंबई विमानतळावरील बिझनेस क्लासचे सेक्युरिटी चेक-इन पूर्वी डावीकडे टोकाला होते. ते आता अगदी उजवीकडे टोकाला गेले आहे. तिथे पोहोचताना जरी मला वेळ लागला असला तरी तिथे माझ्यापुढे केवळ एकच प्रवासी होता. त्यामुळे माझी सुरक्षा तपासणी अत्यंत व्यवस्थितपणे पार पडली. त्यानंतर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी माझ्याकडे रोखून पाहिले आणि तेथील कॅमेराकडे मला रोखून पाहण्यास सांगितले! बहुदा हल्ली फिंगरप्रिंटचा चेक काढून टाकण्यात आला आहे. कोरोनाचे साईड इफेक्ट असावेत.

मुंबई विमानतळाच्या T2 टर्मिनलवर खटकण्यासारखी एक गोष्ट म्हणजे इमिग्रेशननंतर अंतर्देशीय आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करणारे प्रवासी एकत्र येतात. परंतु नंतर हे बऱ्याच विमानतळावर असते हे माझ्या लक्षात आले. नियोजित वेळेच्या बऱ्याच आधी मी सुरक्षा तपासणी आणि इमिग्रेशन या सोपस्करांची पूर्तता केली असल्यामुळे माझ्याकडे अंमळ वेळ होता. त्यामुळे अदानी बिझनेस लाउंज मध्ये मी माझा मोर्चा वळवला. इथं फारसं काही खाण्याची माझी इच्छा नव्हती. त्यामुळे मी तेथील विविध फारशा आकर्षक नसलेल्या तरीही ब्लॉगसाठी उपयोगी असणाऱ्या अशा काही गोष्टींची छायाचित्रं घेण्यात वेळ घालवला.






एक वाजून ५५ मिनिटाचे विमान काही वेळाने गेटवर आले. मी सतत १ वाजून ५५ मिनिटांचा उल्लेख का करत आहे अशी शंका मनात आल्यास ही वेळ मला बाटा बुटांच्या किमतीची आठवण करुन देत असल्यानं हे घडत असावे. आधी कुटुंबासोबत असणाऱ्या सर्व प्रवाशांना बोलावण्यात आले . त्यानंतर बिझनेस क्लासमधील लोकांना बोलवण्यात आले. ब्रिटिश एअरवेजचा बिझनेस क्लास मधील आसनव्यवस्था दोन प्रकारची असल्याचं मी अनुभवलं आहे. पारंपरिक आसनव्यवस्थेत आजुबाजूला विरुद्ध दिशेनं तोंड केलेल्या आणि झोपण्याची व्यवस्था असलेल्या दोन सीट असतात. हा अत्यंत वैतागवाणा प्रकार आहे. ह्या दोन सहप्रवाशांच्या मध्ये एक काचेचं पार्टीशन असतं. स्थानापन्न झालेलो मी !



दोन वाजता एअर होस्टेसने संत्रा रस आणि अन्य काही पर्याय आमच्यापुढे ठेवले. बाकी इथं मी हे नमूद करु इच्छितो की इथं पुरुष आणि स्त्री होस्टेस सारख्या संख्येनं असतात. मी अर्थातच संत्रा रस घेतला. त्यानंतर पुढील नऊ तास आम्ही विमानात असणारच होतो. विमानानं उड्डाण केल्यानंतर सर्व मंडळी अगदी गुणी बाळांप्रमाणे आपल्या सीटचे बिछान्यात रूपांतर करून, आपली अंथरुणं पांघरून झोपी गेली. मीही आजूबाजूला पाहिलं आणि एकंदरीत आपण सुद्धा झोपणंच इष्ट असावं असा विचार करून मीही झोपी गेलो. परंतु केवळ तीन ते चार मी तास झोपू शकलो. इथं संत्रा ज्यूस आणि इतर द्रवपदार्थ ह्यातील फरक प्रकर्षानं जाणवतो.

आता इथं एक प्रकार घडत होता. आमचा प्रवास काही प्रमाणात रात्रीसोबत चालला होता. म्हणजे जसे आम्ही पश्चिमेकडे जात होतो तसं रात्र त्या दिशेनेच पुढे चालली होती. तरीही आमचा प्रवास हा वायव्य दिशेने चालला असल्यामुळे आणि माझ्या प्रवासाची तारीख ही २० जून असल्याने (हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असणाऱ्या २१ जूनचा शेजारी) त्यामुळे साधारणतः स्थानिक वेळेनुसार तीन ते चार वाजताच सूर्याचं तांबडं आकाशात फुटू लागलं. हे अत्यंत विहंगम दृश्य होतं. मी दर पाच-सहा मिनिटांनी खिडकी उघडून या विहंगम दृश्याचे फोटो काढत होतो.





हा शेवटचा फोटो काढला तेव्हा खिडकी उघडल्यानं अंधाऱ्या विमानात लख्ख प्रकाश आला. बहुधा कोण्या सहप्रवाशाच्या झोपेत व्यत्यय आला असावा. त्यामुळं एअर होस्टेसने तात्काळ येऊन मला खिडकी बंद करण्याची विनंतीवजा सूचना केली. हो एक गोष्ट सांगायची राहूनच गेली की मला खरंतर विंडो सीट मिळाली नव्हती. परंतु एका जोडप्याला (दोघांनाही की केवळ पत्नीला हे मी खात्रीलायक रित्या सांगू शकत नाही) जवळजवळ बसायचे असल्यामुळे त्यांनी त्यांची विंडो सीट मला फार विनंतीपूर्वक देऊ केली. मी मोठ्या आनंदाने ही हा पर्याय स्वीकारला.

थोडया वेळानं त्याच हवाई सुंदरीनं बाहेर आता अगदी नयनरम्य दृष्य आहे, आपण खिडकी उघडू शकता असे मला सांगितलं. आता स्थानिक वेळ सकाळचे पाच असली तरीही सूर्य मोठ्या प्रखरतेने तळपत होता.



हीथ्रो विमानतळावर उतरण्याआधी भरपेट नाश्ता देण्यात आला.


हीथ्रो एअरपोर्टला उतरल्यानंतर मला टर्मिनल तीन वर पोहोचायचे होते. हीथ्रो एअरपोर्ट हे जगातील अत्यंत वर्दळीचे विमानतळ आहे. इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की भारतातून हीथ्रो एअरपोर्टला येणारी विमाने बहुदा टर्मिनल पाचला येतात असा माझा अनुभव आहे. हे टर्मिनल पाचसुद्धा एक मोठे प्रकरण आहे. इथं गेट ए, गेट बी, गेट सी अशी तीन गेट्स आहेत. आतापर्यंतच्या माझ्या अनुभवानुसार मुंबईहून हीथ्रो एअरपोर्टला जाणारी विमान टर्मिनल पाचच्या गेट सी वर उतरतात त्यानंतर आपल्याला विमानतळात धावणाऱ्या छोट्या मेट्रो ट्रेनने टर्मिनल पाचच्या गेट ए कडं यावं लागतं. त्यानंतर गेट अ कडून बस मध्ये बसून आपल्याला टर्मिनल तीन वर यावं लागतं. टर्मिनल तीनवर आल्यावर तिथे पुन्हा एकदा आपल्याला सेक्युरिटी सुरक्षा तपासणीला सामोरे जावं लागतं. तिथं बिजनेस क्लासला बहुदा वेगळी रांग नसल्याने मला गर्दीचा सामना करावा लागला. इथं आपला क्रमांक आल्यावर वेगवेगळ्या ट्रेमध्ये आपण आपलं सर्व सामान सुरक्षा तपासणीसाठी ठेवावं. यात तुमच्या केबिन बॅग, बेल्ट, मोबाईल, वॉलेट कंगवा तत्सम गोष्टींचा समावेश होतो. तुम्ही ज्यावेळी सुरक्षा तपासणीच्या दालनातून जाता त्यावेळी तुमच्या हातात केवळ पासपोर्ट आणि बोर्डिंग पास असणे अपेक्षित आहे. या सुरक्षा दालनात तुम्ही ज्या पद्धतीने उभं राहायला हवं त्या स्थितीत एक माणसाची प्रतिमा उभी केलेली असते. आपण त्यानुसार उभं राहावं आणि तेथील सुरक्षा अधिकाऱ्यांनी मानेनं खुणावताच पुढे यावं. आपलं लक्ष त्याच वेळी सुरक्षा कक्षातील मार्गीकेतून जाणाऱ्या आपल्या सर्व सामानाकडे असणं अपेक्षित आहे. आपल्या अपरोक्ष कोणत्याही अनोळखी माणसानं आपल्या सामानात काही संशयास्पद गोष्टी टाकू नये याची काळजी आपणच घ्यायला हवी.

सुरक्षातपासणी झाल्यानंतर आपल्याला टर्मिनल तीनवर असणाऱ्या योग्य त्या गेटकडे प्रस्थान करावं लागतं माझं गेट २८ खूप लांबवर होतं. ते तिथे पोहोचेपर्यंत अमेरिकेला जाणाऱ्या विमानातीलअर्धेअधिक प्रवासी विमानात चढले होते. तेथील सुरक्षितता अधिकाऱ्यांनी माझ्या मॅकला बाजूला घेऊन त्याची बहुता जैविक हल्ल्याच्या दृष्टीने तपासणी केली. ह्यात काही धोका नाही ह्याची त्यांची खात्री होताच त्यांनी मला पुढे जाऊन दिलं. हे विमान अमेरिकन एअरलाइन्सने ऑपरेट केलेलं असून यांचा बिझनेस क्लास हा माझ्या खूप आवडीचा आहे इथेच प्रत्येकाला स्वतंत्र कक्ष आहे त्याचा हा फोटो.


लंडनचे विमानातून दिसणारं रुप खूप सुंदर आहे. मुख्य शहरात उंचच उंच इमारती दिसत असल्या तरी उपनगरात हिरव्यागर्द झाडीत निळीशार सरोवरे आणि त्यातून धावणारी वाहनं पाहायला खूप छान वाटतं. भारतीय संघ ह्यावेळी इंग्लंडमध्ये पहिली कसोटी खेळत असल्यानं सकाळी एखाद्या मैदानावर ते सराव करताना दिसताहेत का ह्याचा मी शोध घेत होतो. विराटला काही सल्ले द्यायचे होते.



वरती जे केबिनसाठी कक्ष आहेत ते प्रत्येक प्रवाशासाठी स्वतंत्र आहे. त्यामुळे आपण निःशंकपणे आपले सर्व सामान तिथे ठेवू शकतो. इथं माझ्या कंपनीतील एडमिनने माझ्यासाठी दोन्ही प्रवासात हिंदू मिल हा पर्याय निवडला होता. त्यामुळे मला अत्यंत आरोग्यदायी असे भोजन मिळाले पण त्याचवेळी मेनू मध्ये असलेल्या विविध रुचकर आणि प्रलोभनीय अशा पर्यायांकडे मला नाईलाजानं दुर्लक्ष करावे लागलं ही काहीशी दुर्दैवाची बाब.

इथं खूप आरोग्यदायी जेवण मिळाले. सुरुवातीला हा स्टार्टर मेनू!



याच्यामध्ये बहुदा पालापाचोळाच होता हे खरंतर प्राजक्ताच्या आवडीचं अन्न हा स्टार्टर मेनू आहे हे मी विसरलोच होतो. त्यामुळं यावरच आपल्याला गुजराण करावी लागणार असे माझी समजूत झाल्यामुळे मी त्यातील बहुसंख्य पदार्थ मनाविरुद्ध खाऊन पोट भरले. परंतु एअर होस्टेसने मग नंतर मला मेन कोर्स आणून दिल्यावर माझा चेहरा बहुधा बघण्यासारखा झाला असावा. मेन कोर्स सुद्धा अत्यंत आकर्षक असाच होता.



तो खाल्ल्यानंतर आता बहुदा आपलं पोट भरलं असावं अशी माझी समजूत झाली होती. परंतु समोर आलेल्या डेझर्टला पाहून ती समजूत मी सोयीस्कररित्या दूर सारली.



आता अचानक या बिझनेस क्लासमधल्या खिडक्या अंधाऱ्या झाल्या होत्या. गुगलवर How Do Newer Planes control the tint on their windows? असा शोध घेतला असता रहस्यभेद होईल. पण माझा हा पहिलाच अनुभव असल्यानं बाहेर अंधार झाला की काय असे मला वाटू लागले. एका काळोख्या मोठाल्या ढगातून विमान चाललंय की काय असं मला वाटू लागलं. केव्हाही आता turbulence सुरु होईल ह्याची मी मानसिक तयारी केली होती. आम्हां सर्वांना झोपण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण व्हावी ह्यासाठी अमेरिकन एअरलाइन्सने उचललेले हे पाऊल होते. परंतु इथे काळे ढग आले असावेत अथवा पुन्हा सूर्योदय व्हायचा की आहे की काय अशी माझी काही काळ चुकीची समजूत झाली होती!!

इथल्या बिझनेस क्लासमध्ये जो बेल्ट होता त्यात कमरेला बांधायच्या बेल्टसोबत खांद्यावरून येणारा सुद्धा बेल्ट होता. हे दोन बेल्ट एका ठिकाणी एकमेकाला मिळत होते. भरपेट जेवण आटपल्यानंतर मला झोपायची इच्छा नव्हती. त्यामुळे मी समोर असलेल्या स्क्रीनवर विमानाचा मार्ग आणि विविध चित्रपट पाहू लागलो. पुढील सात तासांत मनीषा कोइरालाचा अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय कुटुंबाचा एक चित्रपट, एका शेफच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात चाललेल्या संघर्षाचा चित्रपट आणि डायनाच्या आयुष्यावर आधारित चित्रपट असे तीन चित्रपट पाहिले.

अधूनमधून विमान योग्य मार्गानं चाललं आहे ह्याची मी खातरजमा करुन घेत होतो. जागरुक नागरिक म्हटलं की ह्या गोष्टी कराव्याच लागतात.


हे बहुदा अमेरिकत उतरण्याआधी दिलेलं मिनी जेवण !


फिलाडेल्फिया विमानतळावर उतारण्याआधी दिसलेला जलसाठा !




विमान वेळेआधीच पोहोचले. फिलाडेल्फिया इथं सव्वा बाराची अपेक्षित वेळ असताना ते त्याआधीच वीस मिनिटं तिथं उतरले. आम्ही वेळेआधी आल्यामुळे विमानतळावर तेथील इमिग्रेशन अधिकारी तयारीत नव्हते. त्यामुळे आम्हाला पंधरा-वीस मिनिटे विमानातच थांबावं लागलं. इमिग्रेशनच्या रांगेत माझा सुरुवातीच्या चार-पाच जणांत क्रमांक होता. त्याने मला नेहमीचे प्रश्न विचारले. माझी बॅग यायला थोडा वेळ लागला. माझा सहकारी मला घेण्यासाठी विमानतळावर आला होता.

हॉटेलची रूम ही अत्यंत प्रशस्त आहे. याच हॉटेलमध्ये मी मागच्या दोन वेळा राहिलो होतो. त्यामुळे काहीसं परिचयाचं असं हे हॉटेल. ह्या रूमचे आणि भोवतालच्या परिसराची काही छायाचित्रे!








अमेरिकेत काही गोष्टी अनाकलनीय असतात. दिवसाला दीडशे डॉलर्सच्या पलीकडं रूमचे भाडं असताना तुम्हांला खोलीत पाण्याची बाटली उपलब्ध करुन देण्यात येत नाही. इथं आल्यावर आंघोळ करून स्थिरस्थावर होईपर्यंत दुपारचे साडेतीन झाले होते. मग मी साडेसहापर्यंत झोप काढली. इथल्या हॉटेलमध्ये सोमवार ते गुरुवार संध्याकाळी एक गेस्ट ऍप्रिसिएशन डिनर नावाचा प्रकार असतो. मी पावणेसातला धावत धावत जाऊन त्यातलं काही अन्नप्रकार हादडले.

पुढील दोन दिवस आमच्या कंपनीतील अमेरिकेच्या विविध भागातून आलेले जवळपास सव्वाशे पदाधिकारी आणि अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरुन आलेला आमचा प्रशिक्षक असे आमचे उत्तम प्रशिक्षण होते. इथं खाण्यापिण्याची मुबलक रेलचेल होती. पहिल्याच दिवशी प्रशिक्षकांने सर्वात लांबवरून या प्रशिक्षणासाठी कोण आले आहे असा प्रश्न विचारला. त्यात अमेरिका युरोप सोडून लांबच्या भागातून आलेला मी एकमेव होतो. त्यामुळे मी खूप प्रसिद्ध झालो. आमचं टेबल सर्वात पुढे होते. पुढील दोन दिवस तो प्रशिक्षक काही झालं तरी माझ्याकडे बोट दाखवत असे आणि सांगत असे की "हा बघा हा आदित्य अजूनही जागा आहे! म्हणजे मी चांगलं शिकवत असीन बहुतेक!" एकंदरीत प्रशिक्षण खूपच चांगलं होतं. या कालावधीत काही ओळखीचे लोक बऱ्याच वर्षानंतर पुन्हा भेटले आणि काही नव्या ओळखी झाल्या. त्यानंतर मग बुधवारी संध्याकाळी माझे आधीचे व्यवस्थापक केनसोबत आम्ही रात्रीचे जेवण घेतले.

गुरुवारी सकाळी आम्हाला एक ईमेल आले ज्यात आमच्या टेबलवर बसलेली आमची एक सहकारी करोना पॉझिटिव्ह असल्याचे आम्हाला सांगण्यात आले होते आणि त्यामुळे आम्ही पुढील दोन दिवस घरून किंवा हॉटेलमधूनच काम करावे अशी आम्हांला सूचना करण्यात आली होती त्यानुसार मी गुरुवार शुक्रवार हॉटेलमधूनच काम केले. शुक्रवारी सकाळपासून मला देखील सर्दी आणि कफ आणि डोकेदुखी यांचा त्रास सुरू झाला. ही नेहमीची सर्दी असावी अशी मी स्वतःची समजुत घालत होतो आणि सोबत आणलेल्या काही गोळ्यांवर माझा उपचार सुरू केला. परंतु थकवा येऊ लागला होता मी दिवसभर ऑफिसचे कॉल घेऊन संध्याकाळी साडेचारनंतर झोपी गेलो. आता मला जनसंपर्क कमीत कमी करायचा असल्यामुळे मी उबेर इट्स नावाचे ॲप इन्स्टॉल केले. भोवतालच्या भारतीय उपहारगृहातून जेवण मागवण्यास सुरुवात केली. परंतु इथं ऑर्डर केल्यापासून ते जेवण तुमच्यापर्यंत पोहोचेस्तोवर साधारणतः दीड ते दोन तास वेळ जात असे.

शनिवारी न्यु इंग्लिश स्कूल, वसई शाळेचा बालपणीपासूनचा माझा मित्र अजय हटकर मला भेटायला आला होता. मला सर्दी झाली आहे हे कळल्यामुळं त्यानं घरगुती काढा आणि त्याच्या पत्नीने घरी बनवलेली कोलंबी बिर्याणी सुद्धा आणली होती. माझे नेहमीचे सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार हे शाकाहाराचे दिवस परदेशी असताना मी जमेल तितकेच पाळतो. त्यामुळे शनिवार असला तरी त्या स्वादिष्ट कोलंबी बिर्याणीचा मी आस्वाद घेतला. शनिवारी संध्याकाळी माझा हैदराबाद कार्यालयातील सहकारी सत्या ह्याचं सुद्धा आगमन झाले. परंतु मला सर्दी खोकला झाल्यामुळे तो माझ्यापासून दूरच राहणं इष्ट होते. तरीही त्याला भाड्यानं कार घ्यायची असल्यानं आम्ही Enterprise Rental Cars च्या दुकानात गेलो. कार घेऊन परतताना कॉस्को (Costco) मध्ये सत्याने काही अत्यावश्यक (!!!) खरेदी केली. मी उगाचच ते फोटो मित्रांना पाठवले. नंतर आम्ही Olive Garden मध्ये जाऊन जेवण पॅक करुन घेतलं.





सोमवारी मला ऑफिसला जायचे होते म्हणून रविवारी संध्याकाळी आम्ही माझी टेस्ट करून पाहिली आणि त्यात मी पॉझिटिव्ह निघालो. मला खरंतर सर्दी खोकला आणि डोकेदुखी याच्या पलीकडे काहीच त्रास होत नव्हता परंतु ती टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे मी ऑफिसला जाऊ शकत नव्हतो. त्या पुढील तीन-चार दिवस माझी सर्दी खोकला कायम राहिलं.

माझी बहीण निऊ अमेरिकत असते. माझ्या सर्दी खोकल्याची बातमी तिला कळताच ती अगदी चिंतेत पडली. खरंतर अमेरिकेत येऊनसुद्धा मी तिला भेटायला येत नाही म्हणून ती नाराज होती, पण आता मी चार तासांत तुझ्याकडं येऊ शकते, तू अजिबात काळजी करु नकोस असा मोठा दिलासा तिनं दिला. त्यामुळं मला अगदी बरं वाटलं. भारतातील घरचे लोक सुद्धा खूप दिलासा देत होते. अजय दररोज चौकशी करत होता.

ह्या आठवड्यात खरंतर अमेरिकेतील उच्चपदस्थ वरिष्ठ व्यवस्थापकांसोबत प्रत्यक्षातील १:१ बैठकीचं आयोजन केले होते. परंतु ह्या अनावस्था प्रसंगामुळं ह्या सर्व बैठकी आणि अजूनही इतर महत्वाच्या मिटींग्स झूमवरुनच घ्याव्या लागल्या. मी कामात पूर्णपणे वाहून घेतलं होतं. गेल्या भेटीपासून मला जेट लॅग खूप सतावत आहे. मला सकाळी अडीच वाजता जाग आली की परत झोप येतच नसे. त्यात भर म्हणून international roaming सुरुवातीचे काही दिवस सुरु ठेवल्यानं आणि भ्रमणध्वनी शांत अवतारात न ठेवल्यानं भारतातील अनेक कॉल येत राहिले.

अमेरिका देश कितीही चांगला असला तरी तेथील वैद्यकीय सुविधेत सुधारणेस प्रचंड वाव आहे. आजारी पडण्यासाठी हा अजिबात योग्य देश नाही. माझ्या सुदैवानं मला अजिबात ताप न आल्यानं बुधवार सकाळपर्यंत मी बऱ्यापैकी ठणठणीत झालो होतो. पण जर मला खरोखरच जास्त त्रास झाला असता तर मोठा अनावस्था प्रसंग ओढवला असता. तुम्हांला लगेचच डॉक्टरची अपॉइंटमेंट मिळणे जवळपास अशक्य गोष्ट आहे. त्यामुळं बहुतेक सर्वजण इमर्जन्सी (तात्काळ) सुविधेचा वापर करु पाहतात. त्यामुळं तिथं प्रचंड प्रमाणात लोक असतात. तुम्हांला सर्वप्रथम एक डॉक्टर येऊन पाहून जातो. तुम्ही अजुन काही तास जगणार आहात ह्याची खातरजमा केल्यावर तुम्हांला पुढील काही तास निरीक्षणाखाली ठेवलं जातं. मग कधीतरी तुमचा तपासणीसाठी क्रमांक लागतो! 

परक्या देशात सतत आठवडाभर खोलीत एकटं राहणं ही काहीशी कठीण गोष्ट आहे. साधा चहा, वरणभात ह्या गोष्टी सुद्धा अत्यंत महत्वाच्या वाटू लागतात. रुममध्ये खरंतर स्वैयंपाक करण्याची सोय होती. पण मी सामुग्री नेली नव्हती. सहकाऱ्यांकडून हे मागवू शकलो असतो पण इतक्या थोड्या दिवसांसाठी त्यांना माझ्या संपर्कात आणणं मला योग्य वाटलं नाही. त्यामुळं सकाळी हॉटेलच्या नाश्त्याच्या ठिकाणी अगदी कमी गर्दीच्या वेळी जाऊन दूध, फळं, ब्रेड अशा काही मोजक्या गोष्टी उचलून रुममवर आणणं, दुपारी भारतीय जेवण मागवणे ह्यावर मी पुढील काही दिवस काढले. काम भरपूर असल्यानं दिवसा विचार करायला वाव मिळत नसे. संध्याकाळी पाचनंतर टीव्हीवर कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवणं हा छंद मी स्वतःला लावून घेतला. त्याच वेळी विम्बल्डन सुरु झाल्यानं चांगली सोय झाली. रुममधून बाहेर दिसणारे दृश्य अगदी परिचयाचं झालं होतं. हॉटेलभवतालच्या परिसराची ही काही छायाचित्रं !




भारतीय उपहारगृहातून मागविलेल्या सांबार भाताचा फोटो ! 

बुधवार सकाळनंतर चेहऱ्यावर आलेलं हसू !


Never Say Die ह्या उक्तीप्रमाणं मी माझ्या परीनं हॉटेल रुममधून का होईना पण ह्या भेटीचा पुरेपूर व्यावसायिक उपयोग करुन घेण्याचा प्रयत्न केला. पण 
जर हे प्रकरण उद्भवलं नसतं तर नक्कीच अजून खूप काही करता आलं असतं. पण हे कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं हे ध्यानात घेऊन मी माझी समजूत काढली. ही गोष्ट पूर्ण आयुष्याच्या दृष्टिकोनातून पाहिली असता अनेक अमेरिका भेटीतील एका भेटीत हे असं झालं असा विचार केला तर वाटणाऱ्या खंतेची तीव्रता नक्कीच कमी झाली. घरच्या सर्व मंडळींनी दिलेल्या आधारामुळे, निऊच्या अमेरिकेत असण्यामुळं, अजय जवळ आहे हा दिलासा असल्यानं, सर्व मित्रांच्या आधारानं ह्या प्रसंगातून मी बाहेर पडलो. 

शुक्रवारी सायंकाळी परतीचे विमान होते. अजूनही अशक्तपणा असल्यानं इतका जवळपास चोवीस तासांचा प्रवास झेपेल की नाही ह्याविषयी मी आणि सर्वजण म्हटलं तर चिंतेतच होतो. प्रवासाची सुरुवात थोडी कठीणच झाली. अमेरिकन स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनिमित्त आलेल्या Long Weekend च्या शुक्रवारी सायंकाळी मी प्रवास सुरु केला. त्यावेळी फिलाडेल्फिया विमानतळावर खूप गर्दी होती. तिथल्या लाउंज मध्ये अर्ध्या तासांची प्रतीक्षा करावी लागणार होती. त्यामुळं सर्वसामान्य कक्षात मास्क न घातलेल्या लोकांसोबत मी पुढील अडीच तास बसून होतो. तिथून काढलेला हा एक फोटो!  



एकदा अमेरिकन एअरलाईन्सच्या विमानात प्रवेश केल्यावर मला हायसं वाटलं. तिथून विमानानं उड्डाण केल्यानंतरचा हा एक सुंदर व्हिडीओ !  


तिथं रात्रीचं जेवण घेतल्यावर मी गाढ झोपी गेलो. त्यामुळं मला पुढील प्रवासासाठी हुरूप आला. लंडनला विमान पोहोचेस्तोवर सकाळ होणार होती. सकाळी नाश्त्याला तुम्हांला उठवायचे का ह्या हवाई सुंदरच्या (हो सुंदर) प्रश्नाला मी होकारार्थी उत्तर दिलं. 

फिलाडेल्फिया ते लंडन आणि लंडन ते मुंबई ह्या प्रवासात मिळालेल्या जेवणाचे, मेन्यूचे  काही फोटो! 









फिलाडेल्फिया ते लंडन ह्या प्रवासात मास्कचा वापर ऐच्छिक होता तर लंडन ते मुंबई ह्या प्रवासात तो अनिवार्य होता. त्यामुळं हीथ्रो विमानतळावर जर तुमच्याकडं मास्क नसेल तर कृपया विमानतळावर खरेदी करा अशी सूचना करण्यात आली. विमानात त्यांच्याकडं मास्क होते पण सर्वांना पुरतील इतक्या प्रमाणात नव्हते. 

लंडन ते मुंबई प्रवासातील काही दृष्य ! 


भारतात प्रवेश करताना तुमच्याकडं 
एअर सुविधा हा फॉर्म एकतर ऑनलाईन भरला असणे  किंवा भरलेल्या फॉर्मची छापील प्रत असणे आवश्यक आहे असे नमूद करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात कोणीही त्याची तपासणी केली नाही. विमानतळावरील सर्व सोपस्कार पार पाडून कंपनी कारमध्ये बसलो आणि सुटकेचा निःश्वास टाकला. पुढील दोन तीन दिवस घरात मास्क घालून काढले आणि मग मला घरच्यांनी सुरक्षित घोषित केले! 
इति अमेरिका देशस्य २०२२ यात्रानाम अहवाल संपूर्णम ! (दहावीला पन्नास गुणांचे संस्कृत असल्यानं चूकभूल द्यावी घ्यावी!)

(तळटीप - ह्यात अजून खूप काही लिहिण्यासारखं आहे. पण पोस्ट प्रसिद्ध करण्याचा उतावीळपणा असल्यानं आताच प्रसिद्ध करत आहे.जसं काही आठवत जाईल तशी पोस्ट उपडेट करत जाईन आणि हो शुद्धलेखनच्या चुकाही !) 

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...