रविवारी आपण सर्वांनी भारताचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहानं साजरा केला. भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा ! रविवारी सकाळी वडिलांनी आम्हांला पहिल्या स्वातंत्र्यदिनी शाळेत मिठाई दिली होती अशी आठवण काढली.आजच्या घडीला ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळण्याचा क्षण प्रत्यक्ष पाहिला अशी मोजकी मंडळी आहेत. त्यामुळं बहुतांशी नागरिकांना स्वातंत्र्याचं खरं मोल समजत असेल का हा प्रश्न डोळ्यासमोर उभा रहातो. सद्ययुगात स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर ते कशापासून हा प्रश्न रविवारी सकाळपासून माझ्या डोक्यात घोंघावत होता. गॅझेट्सपासुन स्वातंत्र्य हे बऱ्याच जणांचं मत असण्याची शक्यता आहे. अशा मनःस्थितीत असताना सायंकाळी मी स्वतः संगणकापासून दूर जाऊन वर्तमानपत्र वाचनाकडं वळलो.
लोकरंगमध्ये राजरत्न भोजने ह्यांचा "स्वगत ... ध्येयहीन तरुणाईचे !" हा एक उत्तम लेख वाचावयास मिळाला. ह्या लेखातील काही महत्वाचे मुद्दे
१. नक्की करायचंच काय " हा आजच्या तरुणाईला भेडसावणारा प्रश्न
२. थोड्याथोडक्यानं समाधान न मानणाऱ्या आणि स्वतःकडून असामान्य अपेक्षा बाळगणाऱ्या हा प्रश्न अधिक त्रास देत आहे
३. अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम आता मायबोलीतून आणि दुसरीकडे मराठी शाळांना विद्यार्थ्यांची वानवा असा विरोधाभास
४. Uncertainty Principle (Heisenberg) - आजच्या तरुणांच्या मनावर घिरट्या घालणाऱ्या भविष्याला घेरुन असलेल्या अनिश्चिततेच्या प्रश्नांवर कुणीतरी आपलं लक्ष वेधून घेत आहे का? नोकरी मिळविण्याची अनिश्चितता , नोकरी टिकविण्याची अनिश्चितता, योग्य मोबदला मिळेल की नाही ह्याची अनिश्चितता, हा मोबदला भविष्यासाठी पुरेसा ठरेल की नाही ह्याची अनिश्चितता, मन मारुन काम करत राहिल्यानं मानसिक समाधान न मिळण्याची अनिश्चितता, ध्येयपूर्ती होईल की नाही ह्याची अनिश्चितता, जगाच्या पटलावर नावलौकिक मिळेल की नाही ह्याबाबत अनिश्चितता
आता माझे मुद्दे
मुलांशी सुसंवाद
फार थोड्या उदाहरणांत पालकांना तरुण पिढीशी सुसंवाद साधता येतो. एकतर पूर्णपणे संवादाचा अभाव नाहीतर दोघांतील एक पिढी सांगेल तसं दुसऱ्यांनी ऐकायचं हेच बऱ्याच उदाहरणांत पाहायला मिळतं.
१) जेव्हा केव्हा तुम्ही मुलांशी चर्चेस सुरुवात करता त्यावेळी "ठेव तो मोबाईल बाजूला आणि मग बोल माझ्याशी" अशी सुरुवात केली तर मग संपलंच. अमेरिकन सहकारी म्हणतात त्याप्रमाणं You lost me there अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा सुरुवातीनंतर मुलं तुमचं बोलणं कितपत मनापासून ऐकून घेतील ह्याविषयी शंकाच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या काळातील एखादं दुसरं उदाहरण देऊन मग मुलांना बोलण्याची संधी द्यावी. नुसतं ज्ञान पाजळु नये. नाहीतरी एका क्षणी त्यांच्या मनात तुमच्या परीक्षणाचे विचार येण्यास सुरुवात होते.
२) मुलांशी चर्चा करताना आपण किती आत्मविश्वासानं बोलतो आहोत हा महत्वाचा घटक. बऱ्याच वेळा आपण अगतिकतेने बोलत असतो. पुढील काळ कठीण असणार आहे असाच एकंदरीत आपल्या बोलण्याचा सूर असतो. मग अशा वेळी मुलांनी तुमचं बोलणं गांभीर्यानं का घ्यावं? जर तुम्ही आम्हांला पुढील काळासाठी आत्मविश्वास देऊ शकत नसाल तर किमान उगाचच फारशी उपयोगी न पडणारी जुन्या काळातील उदाहरणं देऊन आमचा मूड खराब करु नकात अशीच त्यांची मनोधारणा दिसून येते.
३) दर पिढीनुसार मुलांच्या भावविश्वातील पालकांनी व्यापलेला टक्का कमी होत जाणार आहे. तुम्ही तुमच्या पालकांवर जितक्या प्रमाणात अवलंबून होता तितक्या प्रमाणात मुलं तुमच्यावर अवलंबून नसणार. आजच्या जगात स्वावलंबी बनणं ही काळाची आवश्यकता आहे. ह्या स्वावलंबितेचा side effect म्हणजे त्यांचे तुमच्या पासून काही प्रमाणात दूर जाणं ! त्यामुळं ही बाब वैयक्तिक पातळीवर घेता कामा नये.
४) ज्या प्रमाणात पालक आता सोशल मीडियावर व्यक्त होत चालले आहेत ते बहुदा नवीन पिढीला आवडत नसावं असा माझा कयास आहे. म्हणजे त्यांचा आक्षेप सोशल मीडियावर व्यक्त होण्यावर नसुन ते व्यक्त होणे सतत चर्चेच्या रुपानं घरात रेंगाळत राहण्याला असावा.
५) भोजने ह्यांनी वर्णिलेली अनिश्चितता आहे हे अगदी शंभर टक्के खरे. पण ह्या अनिश्चिततेची बहुसंख्य कारणे बाह्य जगात नसून आपल्या मनात आहेत. आपण सर्वांनी स्वतःला सिद्ध करण्याचं खूळ डोक्यात घेतलं आहे. प्रत्येकानं आपल्याला सिद्ध करायलाच हवं का? कदाचित समाजाच्या ज्या विविध संक्रमणावस्था असतील त्यातील एक ही असावी. कालांतरानं एक समाज म्हणून आपल्याला ह्या सिद्धतेच्या मागे धावण्यातील फोलपणा ध्यानात येऊन आपला कल आपल्या स्वभावाला अनुकूल असे राहण्याकडे वळेल.
६) आता मुख्य मुद्दा म्हणजे हे मुलांना पटवून द्यायचं कसं ? खूप पैसा कमवावा, खूप खर्चावा हा आजच्या जगताचा मूलमंत्र आहे. आधीच्या पिढीनं वेगळं जग पाहिलं असल्यानं ते बहू पैसा कमवावा, बहू पैसा खर्चावा ह्या तत्वाच्या विरोधात विचार करण्याचं त्यांच्याकडं स्वातंत्र्य आहे. पण मुलांना मात्र जीवन जगण्याचा हा एकमेव मार्गवाटत असावा.
बहुदा वरील विचार सुसंगतपणे मांडण्यात मला अपयश आलंय. पण हेच आजच्या पिढीच्या मानसिक गोंधळाचं प्रतीक आहे. आपले विचार आणि भोवतालची परिस्थिती / भविष्यकालीन जगाची दिशा ह्याची सांगड घालण्यात जो आपला गोंधळ होत आहे त्यातून बाहेर पडण्यात एक समाज म्हणून आपल्याला यश मिळावं हीच ह्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाची आवश्यकता आहे!