प्रत्येक व्यावसायिक भुमिका आपली एक वेगळीच काठिण्यपातळी घेऊन येते. आज आपण शिरणार आहोत चेतेश्वर पुजारा, हनुमंता विहारि ह्या गुणी खेळाडूंच्या भुमिकेत ! खंडप्राय अशा संपूर्ण भारत देशाचे लक्ष वर्षातील बहुतांश वेळा T20 व एक दिवसीय सामन्यांकडं लागुन राहिलेलं असतं. वर्षातील सात-आठ महिने ह्याच प्रकारचं झटपट क्रिकेट खेळलं जातं! हे अगदी झगमगाटात खेळलं जाणारं क्रिकेट; जिथं सर्व देशातील क्रिकेट समजणारा, अर्धवट समजणारा चाहतावर्ग लक्ष ठेवून असतो!
पण विशिष्ट महिन्यात कसोटी क्रिकेट सामन्यांना महत्त्व येतं! जसं की नोव्हेंबर ते मार्च हा भारतातील कसोटी सामन्यांचा मोसम! आता चेतेश्वर, हनुमंताच्या भूमिकेत जाऊन विचार करुयात ! हे दोघे वर्षातील सात-आठ महिने भारतीय संघाच्या क्रेंद्रिय गटापासुन (Core Group) पासून दुरावलेले असतात. बापुडे एकलव्याप्रमाणे आपला सराव चालू ठेवतात. त्यांना सरावासाठी कोणत्या प्रकारचे गोलंदाज उपलब्ध असतील याविषयी फारशी आशादायक परिस्थिती नसावी. सौराष्ट्र अथवा तेलंगणातील काही स्थानिक गोलंदाजांपुढे किंवा बॉलिंग मशीनपुढे पाच सहा महिने महिने सराव करून अचानक मग ऑस्ट्रेलियात जाऊन हॅझलवूड, स्टार्क सारख्या दिग्गज गोलंदाजांपुढं आंतरराष्ट्रीय सामना खेळायला सज्ज होणे हे काही येरागबाळ्याचं काम नव्हे.
त्यात सुद्धा दोन शक्यता निर्माण होतात. फलंदाजीला अनुकूल अशा खेळपट्टीवर सामना खेळला जात असेल तर सलामीचे फलंदाज, तिसर्या-चौथ्या क्रमांकाचे फलंदाज मनसोक्त फलंदाजी करून घेतात. त्यामुळे हनुमंता विषयी मला जास्तच सहानुभूती वाटते. फलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर त्याचा क्रमांक येण्यासाठी बराच वेळ जावा लागतो , ज्यावेळी त्याची फलंदाजी येते त्यावेळी बऱ्याच वेळा वेगाने धावा करण्याची सुद्धा गरज भासू शकते. याउलट ज्या वेळी गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टी असते त्यावेळी आघाडीचे फलंदाज नांगी टाकू शकतात. मग हनुमंता आणि पुजारासारख्यांना डाव सांभाळण्याची जबाबदारी पेलावी लागते.
ह्या पोस्टचा मुख्य मुद्दा असा की आपले सहकारी प्रसिद्धीच्या झोतात वर्षभर न्हाऊन निघत असताना या दोघांचा वर्षभरातील बराचसा काळ मात्र एकलव्याप्रमाणे तपस्या करण्यात जातो. जगापुढे आपलं कौशल्य दाखवण्याच्या त्यांना फार मोजक्या संधी मिळतात. त्या मोजक्या संधी गमावल्या तर त्यांच्या कामगिरीवर टीका करण्यासाठी देशातील हजारो समीक्षक आणि लाखो चाहते आपल्या लेखण्या आणि समाजमाध्यमांचा आधार घेण्यासाठी सज्ज असतात. सद्यकालीन इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनच्या जमान्यातसुद्धा पुजारा आणि हनुमंतासारखे साधक अस्तित्वात आहेत. त्यांचं महत्त्व पटवून देण्यासाठी ही छोटीशी ब्लॉग पोस्ट! त्यांच्यापासुन काहीसा धडा आपण घेऊ शकतो! आपण आपलं काम मग ते वलयांकित जगापासुन कितीही दूर असलं तरीही त्यावरील आपली श्रद्धा कायम ठेवावी ! जगातील प्रत्येक काम हे महत्वाचं आहे; लाखोंनी त्याची नोंद घ्यायला हवी असा अट्टाहास नको ! नेकीनं केलेल्या प्रत्येक कामाची नोंद जगातील योग्य व्यक्ती घेतातच !