सत्यनारायणाची पुजा गावांमध्ये हे अत्यंत साध्या प्रकारे केली जाते. हे पुजेचे मूळ रुप, हा साधेपणा अजुनही आमच्या घरातील पुजेमध्ये टिकून राहिला आहे. ऋतूकालानुसार उपलब्ध असणारी फुले, फळे, दुर्वा सत्यनारायण देवतेला वाहून शिऱ्याचा प्रसाद बनवावा आणि आप्तेष्टांना सोबत घेऊन सत्यनारायण देवतेचे पूजन करावे. ही सत्यनारायणदेवतेच्या पुजेमागची मूळ संकल्पना!
ज्यावेळी भाऊंनी ही पुजा सुरू केली त्यावेळी पाटील कुटुंबीय एकत्र घट्ट विणले गेले होते. शेती आणि शेतीला पूरक असे उद्योग यावरच संपूर्ण पाटील कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालत असे. काळानुसार पाटील कुटुंबीयांनी विविध नोकरी, व्यवसायक्षेत्रात पदार्पण केले. दैनंदिन जीवनातील एकमेकांशी येणारा संपर्क कमी झाला. या पुजेच्या निमित्ताने सर्वांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट, निवांतपणे काही क्षण गप्पा मारणे हेसुद्धा या गुरुपौर्णिमेच्या पूजेनिमित्त साध्य होते.
या पूजेमध्ये बऱ्याचशा गोष्टी अजूनही पूर्वापार जशाच्या तशा चालत आल्या आहेत. वाडीतून केळीची छोटी रोपे आणून चौरंगाभोवती मखर सजविणे, वाडीतील तुळस, दुर्वा इत्यादी पूजेसाठी आवश्यक सामुग्री गोळा करणे या गोष्टी अजूनही ही त्याच श्रद्धेने पार पाडल्या जातात. गावातील जुनी मंडळी अजूनही मोठ्या श्रद्धेने सत्यनारायणाच्या पूजेला आपली हजेरी लावतात, जुन्या आठवणी निघतात! या जुन्या आठवणी ऐकून नेहमीप्रमाणे आम्ही मंडळी खुश होतो.
खरंतर हा मोसम खूप पावसाचा! बाकी गावकरी मंडळीपासून आम्ही एका पाण्याच्या ओढ्याने (स्थानिक भाषेत वळ) वेगळे काहीसे वेगळे पडलो आहोत. सर्व मंडळी पुर्वी या पाण्यातून बिनधास्तपणे पूजेसाठी अथवा गणपतीमध्ये जुन्या घरी गणपती दर्शनासाठी येत जात करीत. परंतु आता या ओढ्यातून मार्गक्रमण करण्याची इच्छाशक्ती विविध कारणांमुळे नाही.
केवळ पाटील कुटुंबीयच नव्हेतर आजीच्या माहेरचे घरत कुटुंबीय, गावातील घरत, वर्तक कुटुंबीय, मोठ्याआईच्या माहेरचे वर्तक कुटुंबीय ही सारी मंडळी वर्षानुवर्षे पावसाचा मुकाबला करीत सत्यनारायणाच्या पूजेला येत असतात. या साऱ्यांना भेटून खूप बरं वाटत असतं! काळाच्या ओघात यातील काही जुनी मंडळी आपल्यातून निघून गेली, त्यांच्या आठवणीसुद्धा या प्रसंगाने पुन्हा एकदा निघतात ! पुजा करण्यासाठी किशोर भटजी आले होते! या किशोरभटजींचे कुटुंबीय पाटील कुटुंबीयांचे परंपरागत पौरोहित्य सांभाळणारे! हाही भुतकाळाशी जोडणारा एक दुवा! वयोमानापरत्वे बेन, जिजी ह्यांचं मुंबईहुन येणं कमी झालं आहे !
उपस्थित मंडळींशी बोलताना एक गोष्ट मात्र प्रकर्षानं जाणवली. उपस्थितांमध्ये हे बहुतांश जुनी मंडळी होती. नवीन पिढीतील बरेचजण विविध कारणांमुळे पूजेला येऊ शकले नाहीत. परंपरेच्या हातातून निसटून जाऊ पाहणाऱ्या अनेक अनमोल दुव्यांपैकी हाही एक दुवा ठरणार नाही ना ही एक नकोशी वाटणारी भावना या निमित्ताने जाणवून गेली.
जितकं जमेल तितका हा पुजेचा वारसा टिकवावा हा विचार मनात नक्कीच आहे!
श्री सत्यनारायणदेवताय नमः !