मध्यंतरीच्या काळात सर्व ठिकाणी स्नेहसंमेलनाची लाट पसरली होती.
शालेय जीवनानंतर वीस-पंचवीस वर्षे दूर गेलेली मित्रमंडळी एकत्र येऊ लागली होती. ह्या एकत्र येण्यामागे सोशल मीडियाचा महत्त्वाचा हातभार लागला होता. पूर्वी एखाद्या माणसाला शोधणे म्हणजे त्याच्या घरी जाणं किंवा त्याच्या दूरध्वनी क्रमांकावर त्याच्याशी संपर्क साधणे हेच उपलब्ध साधने होती. त्यामुळे समजा एखाद्या मित्राने आपलं घर बदललं असेल किंवा तो शहर सोडून गेला असेल तर त्याला संपर्क करणे अत्यंत कठीण होत असे. परंतु सोशल मीडियाने मात्र यातील बहुसंख्य समस्यांचं उत्तर आपल्याला उपलब्ध करून दिलं होतं. बरीचशी मित्र मंडळी फेसबुक, ट्विटर यासारख्या सामाजिक माध्यमांवर उपलब्ध असायची किंवा आहेत. त्यामुळे त्यांना एकदा का या माध्यमांवर शोधून काढण्यात यश मिळालं की मग पुढील मार्ग सुकर होत असे. आणि असा एक मित्र मिळाला की तो अजुन काही जणांना आपल्या गटात सहभागी करून घेत असे. अशा या साखळी पद्धतीमुळे बरेच मित्र एकत्र येऊन अशी अनेक स्नेहसंमेलन यशस्वी होण्यात हातभार लागला.
बहुतांशी वेळा या सर्व स्नेहसंमेलनाचे पहिले पुष्प अत्यंत यशस्वीपणे पार पडते. कित्येक वर्षानंतर एकत्र आलेली मित्रमंडळी मोठ्या उत्साहानं एकमेकांना भेटायची, एकमेकांची चौकशी करायची, शालेय जीवनातील आठवणींना उजाळा द्यायची आणि पुन्हा एकत्र भेटण्याचं आश्वासन देऊन एकमेकांचा निरोप घ्यायची. यानंतर मात्र अनेक गोष्टी पडद्यामागे घडायच्या. जसे की आपल्या सर्वच मित्रमंडळीच्या बदललेल्या स्वभावाला लगेचच सरावून घेणं प्रत्येकाला जमायचंच असं नाही. आपण त्या व्यक्तीच्या जुन्या प्रतिमेला मनात घट्ट धरून बसलेलो असतो आणि मग काहीवेळा त्या व्यक्तीचं बदललेलं रूप आणि स्वभाव आपल्याला जमत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे या स्नेहसंमेलनात बरेच वेळा असे होतं की मोजकी माणसे जास्त पुढाकार घेतात आणि पुढील सर्व भेटींमध्ये आपल्याला ज्या गोष्टींमध्ये अधिक रस असतो त्याच गोष्टींचा प्राधान्य देण्याची त्यांची मानसिकताअसते. एकदा पहिल्या भेटीचा टप्पा पार पडला की पुढील भेटीत सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची वृत्ती असणे आवश्यक असते. परंतु फार मोजक्या मित्रमंडळींनी ही मानसिकता दर्शविली. त्यामुळे झालं असं की बाकीची सर्व स्नेहसंमेलन दोन-तीन वर्षानंतर आपसूक बंद पडली. पण आमच्या वसईत मात्र एक असा गट आहे की जो गेले कित्येक वर्ष नित्यनेमाने आपलं हे एकत्र येण्याची सवय सतत टिकवुन आहे.
आणि ही बॅच आहे ती म्हणजे १९८५ बॅच! आता ही बॅच सातत्याने कशी काय भेटत राहते ह्या प्रश्न माझ्या मनात घोळत होता. माझ्या आधीच्या पोस्टमध्ये याचा सहज म्हणून मी उल्लेख केला असता डोंगरे सरांनी मला याचा जाब विचारला. आता डोंगरे सरांनी जाब विचारल्यावर त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याची हिंमत तुम्ही वसईत राहत असाल तर करू शकत नाही. त्यामुळे यावर उपाय म्हणून माझ्या मनातील विचार आणि त्याबाबत या बॅचची नोंदवलेली मतं इथे मी मांडु मांडत आहे.
१) कोणताही गट सातत्याने जर संपर्कात राहायला हवा असेल तर त्या गटांमध्ये एक अदृश्य अशा केंद्रीय गटाचे अस्तित्व असायला हवं. हा अदृश्य (किंवा दृश्य असला तरी सुद्धा चालेल) गट बॅचचे हित ही बाब प्राधान्यक्रमावर ठेवून सक्रिय असायला हवा. ज्या क्षणी वैयक्तिक मसुदा हा बॅचच्या हिताच्या आड येऊ लागतो त्याक्षणी मात्र या गटाचे सातत्य आणि मग पर्यायानं अस्तित्व धोक्यात येऊ शकते. नक्कीच १९८५ बॅचमध्ये अशा केंद्रिय गटाचं अस्तित्व काहीशा उघडपणे दिसून येतं आणि ही मंडळींची जबाबदारी ही बऱ्यापैकी अधोरेखित केली गेली आहे. या गटाने आपल्या स्नेहसंमेलनात ती एक कोणताही एकसुरीपणा येणार नाही यासाठी उपक्रमातील वैविध्य कायम ठेवलं आहे. ज्यावेळी ही मंडळी एकत्र येतात त्यावेळी नक्कीच करमणुकीच्या कार्यक्रमासाठी बहुतांशी वेळ राखून ठेवला गेला असला तरीपण उरलेल्या वेळात काही गंभीर विषयांवर चर्चा करणे हे अनिवार्य असते. आता हे गंभीर विषय म्हणायला गेलात तर शाळेच्या उपक्रमासाठी बॅचचा सहभाग, सामाजिक उपक्रमातील सहभाग या सर्व गोष्टींचा विचार केला जातो आणि त्यावर सर्वांची अनुमती घेतली जाते.
२) तुम्ही कितीही जवळचे मित्र असाल तरी ज्यावेळी तुम्ही बर्याच सातत्याने हे एकत्र भेटत असतात त्यावेळी जी काही आर्थिक उलाढाल होते त्यामध्ये पारदर्शकता असणं आवश्यक असतं. आणि ही बॅच प्रामुख्याने केंद्रीय गट या पारदर्शकतेची पुरेपूर काळजी घेतो आणि जे काही आर्थिक निर्णय आहे ते बहुमताने घेतले जातील याची काळजी घेतली जाते.
३) आता अजून एक महत्वाचा मुद्दा ज्यावेळी तुम्ही संसारात पूर्ण जबाबदारीची भूमिका निभावत असता त्यावेळी जर तुम्ही तुमचा कार्यालयापलीकडचा वेळ सातत्याने सामाजिक उपक्रमात घालवलात तर तुमच्या कुटुंबियांना नक्कीच त्याविषयी आक्षेप घेण्याची इच्छा होऊ शकते. त्यामुळे एका विशिष्ट वळणावर तुम्हाला जर हे तुमचं सततचं भेटणं टिकवायचं असेल तर तुम्हाला कुटुंबीयांना त्यात समाविष्ट करून घेणे अनिवार्य ठरतं. आणि याबाबतीत १९८५ समुहाने उत्तम कामगिरी बजावली आहे असे म्हणता येईल. त्यांच्या सर्वच नाही पण बऱ्याचशा स्नेहसंमेलनात किंवा भेटण्यामध्ये त्यांचे कुटुंबीय सुद्धा समाविष्ट असतात. त्यामुळे हा वैयक्तिक पातळीवरील सामाजिक event न राहता कौटुंबिक पातळीवरचा सामाजिक कार्यक्रम बनतो. यात अजून एक गोष्ट! जे माझं वैयक्तिक मत आहे; स्नेहसंमेलनात ज्यावेळी कुटुंबाला सहभागी करून घ्यायची वेळ येते त्यावेळी बऱ्याच वेळा मुलांना आपल्या पत्नींना सहभागी करून घेण्यात काही आक्षेप नसतो. परंतु आपल्या नवरा मुलींना मात्र आपल्या नवर्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यासाठी पुरेपूर इच्छा नसते कारण आपल्या स्वातंत्र्यावर काहीशी गदा येऊ शकते अशी त्यांची भावना असते. ह्या समूहानं हा प्रकार सुद्धा यशस्वीरित्या सांभाळला असावा असे म्हणता येईल.
४) तुम्ही ज्यावेळी कुटुंबियाच्या अनुपस्थितीत भेटत असता त्यावेळी असणारी चेष्टामस्करीची पातळी आणि ज्यावेळी तुम्ही कुटुंबीयांसोबत भेटता त्यावेळची चेष्टामस्करीची पातळी वेगळी असायला हवी आणि ह्याच भान या बॅचने बऱ्यापैकी सांभाळले आहे.
५) आता दोन महत्वाच्या गोष्टी आणि ज्या गोष्टींमुळे बऱ्याच वेळा एका विशिष्ट गटातील लोक दुरावली जाण्याची शक्यता असते. ह्यातील पहिली गोष्ट म्हणजे मदिराप्राशन! ह्या बॅचने ज्यावेळी मुली एकत्र भेटत असतील त्यावेळी मदिराप्राशन कटाक्षाने दूर ठेवण्याची काळजी घेतलेली दिसून येतं. दुसरी गोष्ट म्हणजे हल्ली असं आढळून येतं ही बरीच मंडळी ही एक तर राजकीय क्षेत्रात पक्षांशी निगडित असतात किंवा त्यांची एका विशिष्ट राजकीय विचारांशी कडवी बांधिलकी असते. ही बांधिलकी त्यांना इतकी महत्त्वाची वाटत असते की त्यापुढे आपल्या लहानपणापासून चालत आलेल्या मैत्रीचा बळी देण्यास देखील ते तयार असतात परंतु या बॅचने मात्र याविषयी बरीच प्रगल्भता दाखवली आहे. कोणाच्याही राजकीय विचारांवर आक्षेप नाही किंवा चर्चेस विरोध नाही परंतु ही चर्चा एका विशिष्ट पातळीवर थांबवणे हे केंद्रीय गटाने बऱ्याच प्रमाणात यशस्वीरित्या दाखवला आहे.
६) बऱ्याच वेळा असं होतं की एखादा सहकारी / सहअध्यायी बाह्यजगात खूप यशस्वी असतो आणि हे आपलं यशस्वीपण मिरवून घेण्यासाठी म्हणून ह्या स्नेहसंमेलनांचा वापर एक प्लॅटफॉर्म म्हणून करण्याची मानसिकता काही जणांत दिसून येते. आणि त्यामुळे होतं काय की ती व्यक्ती आणि त्याचे जवळचे एक-दोन मित्र हे अशा एकत्र येणाऱ्या समारंभाचा पूर्ण कब्जा घेतात आणि त्यामुळे बाकीचे लोक हळूहळू दुखावले आणि मग दुरावले जातात. या बॅचमध्ये सर्व लोकांनी हा प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली आहे हे जाणवून येते.
७) या बॅचमधील केंद्रीय गटामध्ये वसईत राहणाऱ्या आणि वसईत यशस्वी कारकीर्द घडवणाऱ्या लोकांचे प्रमाण उल्लेखनीय प्रमाणात दिसून येते. त्यामुळे सातत्याने या एकत्रीकरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करणे या मंडळींना बऱ्यापैकी साध्य होतं. आता परत वळूया ते कुटुंबांना एकत्र घेऊन मिळण्याच्या तयारीविषयी! ही मंडळी जेवणाचे कार्यक्रम आयोजित करतात त्यावेळी चूल बंद आणि डबा संस्कृती हे दोन प्रकार आढळून येतात. याचा अर्थ असा होतो की तुमचे कुटुंबीय तुमच्या सोबत समारंभासाठी आले नसतील तर तुम्ही त्यांच्यासाठी म्हणून कार्यक्रमात बनवले गेलेले खाद्यपदार्थ डब्यात घेऊन घरी जाऊ शकता. आता खरतर हा झाला आळशीपणा!! परंतु अशा या आळशी वृत्तीला सामाजिक जाणिवेचे गोंडस नाव देऊन ही बॅच हा प्रकार अत्यंत लोकप्रियकरत असल्याचं आढळून येते. त्यामुळे यजमानावर मेन्यूतील सर्व पदार्थ भरपूर प्रमाणात बनवणे बंधनकारक दिसते . यजमान हा सातत्याने मंडपात फिरताना दिसतो. एकतर तो तुम्हांला मनापासुन आग्रह करत असावा किंवा उरलेले पदार्थ डब्यासाठी पुरेसे होतील की नाही याविषयी आपल्या मेंदूत गणित जुळत असावा!!!
८) जीवनातील सर्व रसांचे अनुभव स्नेहसंमेलनात यायला हवेत आणि यातील एक रस आहे तो म्हणजे विनोद!! आता विनोद निर्मिती सातत्याने करायची म्हटली म्हणजे तुमच्यासमोर याच गटातील दोन-तीन बकरे असणं आवश्यक आहे आणि या व्यक्ती ज्यांना सातत्याने लक्ष्य केलं जातं त्यांनीसुद्धा विनोद हे घेण्याची खेळ खेळीमेळीने घेण्याची तयारी दाखवली हवी!! या गटात असे हक्काचे बरेच ग्राहक आहेत आणि त्यांना लक्ष्य करून विनोद निर्मिती केली जाते परंतु या विनोद निर्मितीचा दर्जा आणि हा नेहमी अभिजात ठेवला जातो किंवा जात असावा!!
९) आता वळूयात या गटातील स्वभाववैशिष्ट्याविषयी!! आता प्रत्यक्ष व्यक्तींची नावे घेणार नाही परंतु वर्णनावरून त्यांना ओळखणे फार कठीण जाणार नाही.
पहिली व्यक्ती जिला विनोदाची आणि शाब्दिक कोटींची उत्तम जाण आहे!! शालजोडीतील देण्यात आणि दिलेले समजून घेण्यात ह्या व्यक्तीचा हात कोणी धरू शकणार नाही. एकंदरीत कोणत्याही चर्चेचा दर्जा एका विशिष्ट पातळीच्या खाली जाणार नाही याची काळजी ही व्यक्ती घेत असावी. आता वळुयात दुसऱ्या व्यक्तीकडे!! ही व्यक्ती अत्यंत शालीन स्वभावाची अशी आहे. अत्यंत शांत आणि सुसंस्कृत असा ह्या व्यक्तीचा स्वभाव आहे आणि त्यामुळे या गटाचा सुसंस्कृतपणा कायम राहण्यास खूपच मदत होते. त्यानंतर आपण वळूयात ते या गटातील गायक मंडळींकडे!! यातील काही खरोखरीचे गायक उत्तम गायक आहेत जे मैहफिल अगदी रंगतदार करुन टाकतात तर काहीजण असेही आहेत की त्यांच्याकडे गुणवत्तेची दैवी देणगी नसली तरी जबरदस्त उत्साह आहे!! स्वानंद हेच कवीचे सर्वोत्तम पारितोषिक होय असे वाक्य दहावीच्या पुस्तकात होते. ह्या गटाच्या एका कार्यक्रमाला मी हजेरी लावली होती त्यावेळी अशा या आत्मविश्वासाने भारून गेलेल्या व्यक्तींची गाणी ऐकण्याचा दुर्मिळ योग आला!! परंतु या गटाचे मोठेपण असे की त्यांनी ह्या उत्साहमूर्तीला पुरेपूर प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळे या कार्यक्रमात एकंदरीत जबरदस्त मजा आली!!
आता सारांशाकडे वळण्याआधी काही इतर गोष्टी ! ही बॅच प्रत्येक महिन्यातील पहिल्या आठवड्यात मागील महिन्यांत ज्यांचे वाढदिवस झाले त्या सर्वांना एकत्र बोलावून केक कापण्याचा समारंभ साजरा करते. त्यामुळे सातत्य कायम ठेवण्याच्या प्रयत्नात एक वैयक्तिक झालर येते.
वसईच्या जवळपास जो दुर्गम असा ग्रामीण भाग आहे तिथं ही मंडळी जाऊन आपलं सामाजिक कार्य करत असतात. आता ह्यात सुद्धा पावसाळ्याच्या मौसमात हे सामाजिक कार्य करता करता सहलीचा हेतु आपसुक साध्य होतो.
सामाजिक कार्य करताना काही वेळा बॅचपलीकडं जाऊन ते वसईतील मान्यवर लोकांना सहभागी करुन घेतात. आणि ह्यामुळं ह्या पोस्टच्या शेवटी जे फोटो समाविष्ट केले आहेत त्यात ह्या बॅचबाहेरील वसईतील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्वाचा फोटो तुम्हांला दिसेल !!
आपल्या बॅचमधील सर्व मित्र मैत्रिणींना सहभागी होता यावं ह्यासाठी होम पिकअप आणि होम डिलिव्हरीची सोय कारवाले सदस्य करुन देतात.
न्यू इंग्लिश स्कुलच्या त्या काळी ज्या बॅच होत्या त्यांच्या काही सामायिक खासियत असायच्या. त्यावेळी बहुतांशी मुलं मुली एकमेकांशी बोलत नसत. ह्या बॅचमध्ये ह्या विषयावर चर्चेला हात घातला असता एकमत आढळुन येत नाही. ह्यातील विशिष्ट मुलांकडे संशयाची सुई झुकताना दिसते. त्या काळच्या बॅचची अजुन एक खासियत म्हणजे त्यावेळच्या मुली ह्या मुलांवर खार खाऊन असायच्या. आपल्या वर्गातील मुलांची शिक्षकांकडे तक्रार करण्याची अगदी सुक्ष्म संधी सुद्धा त्या सोडत नसत. अर्थात ह्या विषयांवर आता ३३ वर्षानंतर चर्चा केली असता एकमत होण्याची शक्यता नसल्यानं मी हा विषय जास्त ताणुन धरला नाही. परंतु ह्या सर्व शोधप्रकरणात ह्या बॅचची मुले इंदिरा गांधी ह्यांचं हेलिकॉप्टर पाहण्यासाठी वर्गाबाहेर खिडकीतुन उद्या मारुन बाहेर पळाली होती अशी काहीशी १००% खात्रीलायक नसलेली बातमी हाती आली होती. अजुन बरणी वगैरे फोडण्याच्या प्रकाराची कुजबुज सुद्धा ऐकू आली पण त्याचा फारसा पाठपुरावा मी केला नाही.
आता वळुयात ते काहीसे सारांशाकडे!! वर उल्लेखलेले घटक हे महत्त्वाचे असले तरी सर्वात महत्त्वाचा घटक मात्र वेगळाच आहे!! तुमच्या मनामध्ये आपल्या बालमित्रांना मित्रांसोबत वेळ घालवण्याची मनापासून इच्छा असणे हे सर्वात महत्त्वाचे!! ही इच्छा जर तुमच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत वरच्या स्थानावर असेल तर तुम्ही बाकीचे सर्व अडथळे दूर करू शकता. सतत संघर्षाने व्यापलेल्या या जीवनात आपलं असं जिव्हाळ्याचं बेटं अचानक गवसतं आणि अनपेक्षितरित्या सापडलेल्या ह्या जिव्हाळ्याच्या बेटाला धरून ठेवण्याची प्रबळ इच्छा या गटात आढळून येते!!
या गटाच्या आतापर्यंतच्या वाटचालीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा!!!
आता पाहुयात ती ह्या बॅचच्या सामाजिक बांधिलकीची आणि स्नेहसंमेलनाची झलक दर्शविणारी काही छायाचित्रे !!