मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शुक्रवार, २० एप्रिल, २०१८

Bigg Boss



"जर तुला त्रास होत असेल तर तु ही मालिका बघतोस कशाला?" अशी काही जणांची प्रतिक्रिया ही पोस्ट वाचुन होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसात ह्या कार्यक्रमाचे एपिसोड पाहिले आणि मनात काही विचार आले. 

बिग बॉस म्हणा की बिग ब्रदर; मुख्य प्रवाहातील कलाकार ह्यात येण्याची शक्यता फारच कमी. त्या कलाकारांना इतका कालावधी केवळ ह्या कार्यक्रमाला देणं शक्य होणार नाही. आणि त्यामुळं बाकीच्या सर्व प्रकारातील म्हणजे ज्यांची कारकीर्द उताराला लागली आहे किंवा ज्यांची मुख्य प्रवाहात समाविष्ट होण्याची सुतराम शक्यता नाही असेच कलाकार ह्या प्रकारात सहभागी होत असणार असं काहीसं धारिष्ट्याचं विधान मी करु इच्छितो. 

मराठीत हा कार्यक्रम आणायला नको होता ही आमची (पत्नी समाविष्ट) खरी खंत! एकाच बंद घरात इतका काळ इतकी माणसं एकत्र राहिली की एकतर त्यांची डोकी ताळ्यावर राहणं कठीणच ! आणि त्यात त्यांचं वागणं खरोखरीचे की पुरस्कर्त्यांनी घडवून आणलेलं ह्यात संशय घ्यायला जबरदस्त वाव! काही स्पर्धकांना कपड्यांचा सेन्स नाही. ह्या काळात काही पुरुष - स्त्री कलावंताचं उघडपणे किंवा लपूनछपून फ्लर्टींग चालु होणार वगैरे वगैरे ! 

आता वळूयात प्रेक्षकांकडे! प्रेक्षक अशा मालिकांकडे आकर्षित का होतात हा महत्वाचा प्रश्न ! सुसंस्कृतपणापासून दूरवर असलेले काही प्रकार आपल्याला फुकटात घरबसल्या पहायला मिळालेत तर पाहून घेऊयात ही मनोवृत्ती आपल्या प्रेक्षकांना ह्या मालिकांकडे आकर्षित करते! आश्चर्य किंवा खंत वाटली ती रेशम टिपणीस आणि काही प्रमाणात उषा नाडकर्णीला ह्या मालिकेत सहभागी होताना पाहुन !

पैसा सर्वांचे किती प्रमाणात अधःपतन करणार आहे हे येणारा काळच ठरवणार आहे! IPL, Bigg Boss ह्या सर्व अशुद्ध प्रकारांच्या अशुद्धतेविषयी जाणीव तरी नवीन पिढीला करुन देणं इतकंच किमान आपल्या हाती आहे. आणि ही जाणीव करुन देताना आपलं बोलणं हे त्यांना जुन्या पिढीची कटकट ह्या सदरात मोडावंसं वाटणार नाही इतकं किमान कौशल्य आपल्या अंगी बाळगता येणं आवश्यक आहे. येणारा काळ नेहमीच माणसांना नवीन कौशल्याची साद देत असतो, पण बहुतांशी माणसं केवळ बदलत्या काळाला दोष देण्यात धन्यता मानतात.   
     
जाता जाता ह्या Bigg बॉसच्या नादात कोणा सहभागी कलावंताच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होऊ नये इतकीच प्रार्थना ! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...