मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

मंगळवार, २४ एप्रिल, २०१८

मस्त्यगाथा !!



वसईत मांसाहारी लोकांचे प्रमाण लक्षणीय आहे. या लक्षणीय वर्गामध्ये माझादेखील समावेश होतो. आता या सर्व मांसाहारी लोकांना सरसकट एका वर्गात बसविता येणे कठीण आहे. काही लोकांची झेप मांसाहाराच्या विशिष्ट प्रकारांपुरता मर्यादित असते तर काही लोक मांसाहाराचे उपलब्ध सर्व प्रकार अजमावुन पाहतात. 

मी ज्या मांसाहारी वर्गात मोडतो त्या वर्गाच्या मांसाहाराचे दोन मुख्य प्रकार केले असता चिकन / मटण हा पहिला प्रकार आणि मासे हा दुसरा प्रकार म्हणता येईल. माशांमध्ये सुद्धा वर्गीकरण करायचे झाले तर पापलेट आणि पापलेट सोडून बाकी सर्व मासे असे दोन मुख्य प्रकार म्हणता येतील. वसईतील काही पुरुष मंडळी बाजारात मासे आणायला जातात. बहुदा लग्नानंतर या प्रकारास सुरुवात होते. स्वानुभवावरून मी हे विधान केलं असावं. ज्यावेळी पुरुष मंडळी मासेबाजारात आणि खास करून होळी बाजारात येतात त्यावेळी तिथल्या
कोळिणींची खास प्रतिक्रिया होत असावी असा माझा अंदाज आहे. पुरुषवर्गाच्या आगमनानंतर माशांचे दर आपसूक काही टक्क्याने वरती जात असावेत. ही बाब गेल्या काही वर्षांच्या अनुभवाने मी शिकलोअसावो असं मला वाटतं. ज्या दराने मी मासे विकत आणले तो दर मी केव्हाच घरी सांगत नाही.  मी बाजारात मासे आणायला जाण्याआधी ही अट कबूल करून घेतली आहे. मासे प्रत्यक्ष खरेदी करण्याआधी संपूर्ण बाजारात एक चक्कर मारावी आणि थोडीशी चाचपणी करावी आणि मगच खरेदी करावी असा अनुभवी लोकांचा सिद्धांत आहे. परंतु मी मात्र मोजक्या कोळिणींकडुनच मासे विकत घेणे पसंत करतो. यामध्ये loyalty या प्रकाराचा काही प्रभाव पडत असावा असा माझा अंधविश्वास आहे. 

वसईच्या होळी बाजारात मासे विकत घेणे आणि बोरिवलीला मासे विकत घेणे यामध्ये बराच फरक आहे. बोरिवलीला लोक फारशी घासाघीस करीत नाहीत. कोळिणींचा धाक असावा ! होळीबाजारात कोळिणीने सांगितलेल्या किमतीच्या बरोबर अर्ध्या किमतीवर आपण घासाघीस सुरू करावी असा सर्वसाधारण सिद्धांत आहे.  त्यावेळी कोळीण जे काय म्हणेल त्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रगल्भता निर्माण होण्यासाठी काही महिने अथवा वर्षे  यांची तपस्या आवश्यक आहे. थोड्या वेळाने दोन्ही पक्ष काही बोलत नाहीत हे पाहून एक पक्ष नमते घेतो आणि मग खऱ्या बोलाचालीला सुरुवात होते. साधारणतः सुरुवातीच्या सांगितलेल्या किंमतीच्या ६५% च्या आसपास आपल्याला जर मासे खरेदी करता आले तर आनंद मानावा.  बाजारात आपल्या काही परिचयाची माणसे आपल्या आजूबाजूला वावरत असतात आणि आपण खरेदी केलेल्या माशांनंतर ते आपल्याला किंवा कोळीणीला कितीला मासे घेतले हा प्रश्न विचारतात. हा फार मोठा अवघड प्रसंग असतो. पुरुष मंडळी उगाचच माशांचे भाव वाढवुन ठेवतात असा सर्वसाधारण समज असतो. 

होळीबाजारात अजून एक प्रकार पहावयास मिळतो. जर मासा मोठा असेल आणि एका माणसाला त्याचे प्रमाण जास्त होणार असेल तर दोघं मिळून मासा विकत घेण्याची पद्धती आहे.  ह्यात  दोघांचा एकमेकांवर आणि कोळीणीवर विश्वास असतो असणे आवश्यक आहे. ग्राहकाने किमतीविषयी जास्त कटकट केल्यास आधी मासे खा मग पैसे दे हा कोळिणींचा आवडता डायलॉग आहे. 

आता वळूयात या पोस्टच्या चित्राविषयी! या चित्रात दाखवलेली कोळीण आमच्या घरी मागील रविवारी मासेविक्रीसाठी आली होती.  "मावरं" या टिपिकल हेल काढलेल्या तिच्या हाकेनं गल्लीतील इच्छुक लोक आपसूक घराबाहेर आले. तिनं "catch of the day" असलेल्या ६ पापलेटची किंमत पाच हजारापासून सुरु केली. वर उल्लेखलेल्या तत्त्वाचा वापर करून आणि त्यात अजूनही थोडी घट करून आम्ही दोन हजार रुपयापासून माशाच्या किमतीच्या सौद्यास प्रारंभ केला. तिने २००० रुपये किंमत ऐकल्यावर आम्हाला एक लुक दिला.  त्यानंतर मी तिला फोटोसाठी खास मुद्रा देण्याची विनंती केली आणि तिने ती लगेच मान्य सुद्धा केली. 

आमच्या घरातील बरीच तज्ज्ञ मंडळी गोळा झाली होती. २००० किंमतीवर एकमत होणे शक्य नाही हे समजल्यावर तिला दुसरी कोणती किंमत ऑफर करावी याविषयी आमचं एकमत होत नव्हते. काहीजण २२०० म्हणत होते तर काहीजण अडीच हजार! शेवटी वैतागुन माझ्या उद्योगाला लागलो.  शेवटी अर्ध्या तासानंतर हा सौदा २७०० रुपये किंमतीला पार पडला. 

आता परत वळूयात वसईतील माशांच्या प्रकाराकडे! पापलेट हा महागडा प्रकार असला तरीच चवीच्या दृष्टीने माझा विशेष आवडत नाही. काहीशी कंटाळवाणी / बोरिंग अशी त्याची चव असते. 

त्यानंतर क्रमांक होतो रावस आणि सुरमई यांचा! हे दोन मासे हल्ली किंमतीच्या बाबतीत पापलेटची स्पर्धा करू लागले आहेत. त्यानंतर एक प्रकार आहे तो म्हणजे काळा सरंगा याला स्थानिक भाषेत हलवा असेसुध्दा म्हणतात.  खाऱ्याचे अनेक प्रकार असतात. त्यात घोळीचं खारं हा लोकप्रिय प्रकार आहे. याची किंमतसुद्धा अव्वाच्या सव्वा बनू शकते.  यामध्ये काट्याचं म्हणून एक प्रकार असतो. 

त्यानंतर आहेत  बोंबील मांदेली हा प्रकार ! हे मासे किंमतीच्या दृष्टीने तसे परवडणारे असतात! बोरिवलीत  शंभर रुपयाला 5 बोंबील देऊन तुम्हाला अक्षरशः लुबाडलं जाते. परंतु वसईत जर तुम्ही सुदैवी असाल तर तुम्हांला हे चांगले स्वस्त मिळू शकतात.  कोलंबी हा एक एव्हरग्रीन प्रकार आहे. कोळिंबीचे आमटे करुन  खावे किंवा कांदा फ्राय करावा! ती कशीही केली तरी चविष्टच लागते! कोळिंबीचे सुद्धा बरेच प्रकार आहेत.  खाडीची कोळिंबीचे आणि बाकी इतर! कोळिंबीच्या छोट्या प्रकाराला करंदी असे म्हणतात. करंदी साफ करणे म्हणजे डोकेफोड असते त्यामुळे ज्या कोळीणी करंदी साफ करून देतात. त्या खास लोकप्रिय असतात बाकी मग स्पेशलिटी प्रकारांमध्ये काले (clams) या प्रकाराचा समावेश होतो.  हे  फक्त जानेवारी महिन्याच्या कालावधीत आणि आसपास उपलब्ध होतात. 

अजुन उल्लेखनीय मासे म्हणजे खाटखूट, काटे वगैरे ! पुर्वी काट्याचे मासे घरी बऱ्याच वेळा आणले जायचे आणि त्यावेळी काटे बाजुला काढून मासे खाताना बराच वेळ लागायचा. एक - दीड तास वगैरे पण चव मात्र अप्रतिम असायची !

बोय नावाचा माशांचा प्रकार सुद्धा प्रसिद्ध आहे. परंतु हे विकत घेण्याआधी विशेष काळजी घ्यावी लागते. जिथं बोय मासे आढळतात तिथं काही वेळा रॉकेलचा फवारा मारुन त्यांना बेशुद्ध केलं जातं असं मी ऐकलं आहे. त्यामुळं हे विकत घेण्याआधी जाणकार मंडळी त्यांना हुंगून पाहतात. असले प्रकार मला झेपत नसल्यानं मी बोय विकतच घ्यायला जात नाही. 

बांगडा हा मासा सुद्धा खवय्या लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. पण बहुदा तो पचायला जड असावा. दिलीप वेंगसरकर १९८७ रिलायन्स विश्वचषकाच्या इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्याआधी बांगडे खाऊन आजारी झाल्यानं आपण सामना हरलो. आणि त्यामुळं सुद्धा मी बांगडे खात नाही. 

मासे खरेदीच्या वेळी त्यांचे कल्ले तपासुन पाहायची पद्धत आहे. ते दाबुन त्यातून पांढरं पाणी निघालं तर मासा ताजा असं काही लोक म्हणतात. परंतु हा ही प्रकार करुन दाखवायला कोळीणीला सांगायचं धारिष्ट्य माझ्यात नसल्यानं मी गप्प बसतो. आणि घरी आल्यावर कधी कधी माझी हजेरी घेतली जाते. पुरुष मंडळी जास्त पैसे देऊन मासे विकत घेण्यामागे कोळिणींचा विश्वास संपादन करुन त्यांनी आपली फसवणूक करु नये हे एक कारण असावं. 

मे महिन्यात वसईतील बावखल, विहिरी आटल्या की त्यातील सिलोनी वगैरे मासे उपलब्ध होतात. पूर्वी कलकत्ता, चिवडा वगैरे मासे सुद्धा आमच्या बावखलात मिळत ! चिंबोरीचा उल्लेख केल्याशिवाय मस्त्यगाथा पुर्ण होणार नाही ! बावखलात उन्हाळ्यात चिंबोऱ्या काठाला आल्या की पकडायला सोप्या जात. 

तरीही मी पडलो प्राथमिक पातळीवरील मासे खाणारा आणि त्यामुळं अनेक माश्याचे प्रकार इथं उल्लेखाशिवाय राहून गेले असणार! त्याबद्दल त्या माश्यांची आणि रसिकांची माफी मागतो !

काही प्रसंगी घरी मासे घेऊन येणाऱ्या कोळीणी अत्यंत मोक्याच्या क्षणी येतात. जुलै महिन्यात धुवांधार पाऊस पडत आहे, अंगणात सर्वत्र पाणी साचलं आहे, आणि बाजारात जाऊन मासे आणण्याचा आदेश मिळाला आहे! अशा वेळी ही कोळीण ताजे बोंबील आणि सोबत कोळंबी घेऊन अंगणात येते ! मासे विकत घेऊन साफ करुन भांड्यात पडतात आणि मग घरभर पसरतो तो कालवणाचा आणि तळलेल्या बोंबलाचा घमघमाट ! रविवारच्या लोकसत्तेचा अग्रलेख डोळ्यात भरतो पण डोक्यात शिरत नाही! सुख वगैरे जे काय म्हणतात ते हेच असावं ! 

शुक्रवार, २० एप्रिल, २०१८

Bigg Boss



"जर तुला त्रास होत असेल तर तु ही मालिका बघतोस कशाला?" अशी काही जणांची प्रतिक्रिया ही पोस्ट वाचुन होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसात ह्या कार्यक्रमाचे एपिसोड पाहिले आणि मनात काही विचार आले. 

बिग बॉस म्हणा की बिग ब्रदर; मुख्य प्रवाहातील कलाकार ह्यात येण्याची शक्यता फारच कमी. त्या कलाकारांना इतका कालावधी केवळ ह्या कार्यक्रमाला देणं शक्य होणार नाही. आणि त्यामुळं बाकीच्या सर्व प्रकारातील म्हणजे ज्यांची कारकीर्द उताराला लागली आहे किंवा ज्यांची मुख्य प्रवाहात समाविष्ट होण्याची सुतराम शक्यता नाही असेच कलाकार ह्या प्रकारात सहभागी होत असणार असं काहीसं धारिष्ट्याचं विधान मी करु इच्छितो. 

मराठीत हा कार्यक्रम आणायला नको होता ही आमची (पत्नी समाविष्ट) खरी खंत! एकाच बंद घरात इतका काळ इतकी माणसं एकत्र राहिली की एकतर त्यांची डोकी ताळ्यावर राहणं कठीणच ! आणि त्यात त्यांचं वागणं खरोखरीचे की पुरस्कर्त्यांनी घडवून आणलेलं ह्यात संशय घ्यायला जबरदस्त वाव! काही स्पर्धकांना कपड्यांचा सेन्स नाही. ह्या काळात काही पुरुष - स्त्री कलावंताचं उघडपणे किंवा लपूनछपून फ्लर्टींग चालु होणार वगैरे वगैरे ! 

आता वळूयात प्रेक्षकांकडे! प्रेक्षक अशा मालिकांकडे आकर्षित का होतात हा महत्वाचा प्रश्न ! सुसंस्कृतपणापासून दूरवर असलेले काही प्रकार आपल्याला फुकटात घरबसल्या पहायला मिळालेत तर पाहून घेऊयात ही मनोवृत्ती आपल्या प्रेक्षकांना ह्या मालिकांकडे आकर्षित करते! आश्चर्य किंवा खंत वाटली ती रेशम टिपणीस आणि काही प्रमाणात उषा नाडकर्णीला ह्या मालिकेत सहभागी होताना पाहुन !

पैसा सर्वांचे किती प्रमाणात अधःपतन करणार आहे हे येणारा काळच ठरवणार आहे! IPL, Bigg Boss ह्या सर्व अशुद्ध प्रकारांच्या अशुद्धतेविषयी जाणीव तरी नवीन पिढीला करुन देणं इतकंच किमान आपल्या हाती आहे. आणि ही जाणीव करुन देताना आपलं बोलणं हे त्यांना जुन्या पिढीची कटकट ह्या सदरात मोडावंसं वाटणार नाही इतकं किमान कौशल्य आपल्या अंगी बाळगता येणं आवश्यक आहे. येणारा काळ नेहमीच माणसांना नवीन कौशल्याची साद देत असतो, पण बहुतांशी माणसं केवळ बदलत्या काळाला दोष देण्यात धन्यता मानतात.   
     
जाता जाता ह्या Bigg बॉसच्या नादात कोणा सहभागी कलावंताच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होऊ नये इतकीच प्रार्थना ! 

मंगळवार, १७ एप्रिल, २०१८

कोकण २०१८ - भाग ५



खरंतर कोकण सहलीच्या शेवटच्या काही दिवसांचं प्रवासवर्णन बाकी आहे. पण कधी कधी बराच काळ असा येतो जेव्हा लिहावंसच वाटत नाही. एकतर शब्द रुसुन बसतात किंवा मनाच्या कप्प्यात इतके अवघडून बसून राहतात की त्यांची सांगड लावणे कठीण जाते. मनातील हा गोंधळ मनातच रहावा म्हणुन ही शेवटच्या काही दिवसातील बहुतांशी चित्ररुपी पोस्ट!!






मावळता दिनकर, दुरवर पसरलेले आम्रवृक्ष, लांबवर दिसणारा रत्नाकर 
ह्या अथांग चित्राच्या एका कोपऱ्यात इंचभर जागा माझ्यासाठी असूद्यात !!







निसर्गाची असंख्य रुपं उघड्या डोळ्यांनी पहा 
मनातील गुंतागुंतीचा वृथा अभिमान आपसूक नाहीसा होतो !! 





सागराच्या लाटा - हे पाषाणा तु कितीही कठोर असलास तरीही माझ्या प्रयत्नांतील सातत्यापुढं तुझा निभाव लागणं कठीणच आहे !!











आलिशानतेच्या मनातील प्रतिमेला मुर्त रुपात आणण्याचा मनुष्याचा यत्न !!







एक अकेला इस शहर में .... 

निरागसतेचे प्रतिक



मनाचा तळ आपला आपणच शोधायला हवा !



लक्षावधी माणसांच्या गर्दीत वेगानं परतण्याची ओढ !!


कालयंत्रा ये इथं आणि मला घेऊन चल प्राचीन कोकणात !!!


समाप्त 

शनिवार, ७ एप्रिल, २०१८

कोकण २०१८ - भाग ४







मत्स्यालयातील मासे पाहून आम्ही बाहेर पडलो. आता आमची वाटचाल मालगुंडच्या दिशेने होणार होती.  मालगुंड हे गाव गणपतीपुळेपासून साधारणतः चार-पाच किमी अंतरावर असावे. एकंदरीत मालगुंड हे आकाराने गणपतीपुळेपेक्षा मोठं असावं परंतु बहुतांशी लोकांना गणपतीपुळे हे देवस्थानामुळं जास्त माहित आहे. मत्‍स्यालय पहाताना एक गोष्ट ध्यानात आली. पूर्वी इंटरनेटव्याप्ती कमी असल्यामुळं आपली ज्ञानाची जिज्ञासा शमवण्यासाठी लोक मोठ्या संख्येने अशा ठिकाणी जात असत. परंतु आता इंटरनेटमुळे सर्व काही घरबसल्या उपलब्ध होत असल्याने आपण एखाद्या विषयाविषयी थोडीफार माहिती करून घेऊन शांत बसण्याची शक्यता जास्त असते. 

मालगुंडला आमच्या निवासस्थानाचे नाव माडाच्या बनात हे होते.  नावानुसार ओळीने लावलेल्या नारळांच्या झाडांच्या सानिध्यात हे हॉटेल वसलेलं आहे. विविध खोल्यांना त्या जवळ लागवड केलेल्या नारळांच्या जातीनुसार नावं देण्यात आली आहेत. आमच्या खोलीचं नाव बनवली असं होतं. या हॉटेलविषयी मी नक्कीच  प्रशंसोद्गार काढून इच्छितो. 






एकंदरीत हॉटेलच्या रूममधील सर्व सुविधा अतिउत्कृष्ट होत्या आणि सर्व कर्मचारीवर्गसुद्धा अत्यंत नम्रतेने आणि तत्परतेने सर्व सुविधा
पुरवीत होता. आम्ही गेलो त्यावेळी तिथं काहीशी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. तिथला खानसामा उष्माघातामुळे आजारी पडला होता आणि ॲम्ब्युलन्समधून त्याला गणपतीपुळे इथे घाईघाईने नेणे भाग पडले होते. व्यवस्थापकाने याबाबतीत आमच्याकडे दिलगिरी व्यक्त करून आम्हाला एक किलो मिटर अंतरावर असलेल्या स्वाद या शाकाहारी उपहारगृहाचा पत्ता दिला. 

स्वाद हे उपहारगृह आम्हाला अत्यंत आवडले. साधारणतः ११५ रुपयांमध्ये अत्यंत आरोग्यपुर्ण अशी शाकाहारी थाळी होती. त्यामध्ये गरमागरम चपात्या, पांढराशुभ्र भात, (जो चपात्या संपल्यावर आणला जातो) भोपळी मिरची भाजी, लोणचं,  पापड आणि ताक ( उन्हाळ्यात मराठी माणसाला जे काही सुचू शकतं ते सर्व) उपलब्ध होते.  मनाने तृप्त होऊन आम्ही जेवणानंतर बाहेर पडलो. 

या सहलीचे ज्यावेळी आम्ही नियोजन करीत होतो त्यावेळी खरंतर एखाद्या घरी जाऊन राहून होम स्टेचा पर्याय निवडावा असे माझे म्हणणे होते.  परंतु यावेळी ज्यावेळी माझ्या बहिणीच्या यजमानांनी त्यांच्या मित्राकडे (जो आम्हाला या सहलीचे नियोजन करून देत होता) चौकशी केली त्यावेळी त्यांनी आम्हाला एका गोष्टीचे स्पष्टीकरण दिले. 
तुम्ही ज्यावेळी home stay पर्यायाची निवड करता त्यावेळी तुम्हाला कोकणी पद्धतीचे शाकाहारी आणि मांसाहारी असे चविष्ट जेवण उपलब्ध होण्याची शक्यता वाढीस लागते. परंतु न्हाणीघर आणि तत्सम सुविधांच्या बाबतीत प्रत्येक ठिकाणी standard सुविधा उपलब्ध असतीलच याची हमी देता येत नाही आणि त्यामुळेच त्याने आम्हाला रिसॉर्टचा पर्याय सुचवला होता. 

माडाच्या बनात दुपारच्या वेळी एक मस्त वामकुक्षी काढून मग आम्ही सायंकाळी समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने निघालो. माडाच्या बनात या रिसॉर्टच्या मालकाची रिसॉर्टच्या मागे बरीच मोठी अशी वाडी आहे आणि आंब्याच्या सुद्धा बागा आहेत.  गणेशगुळे येथील अनुभवानंतर आमचा आत्मविश्वास वाढीस लागला होता.  या मालकाच्या वाडीतील वांग्यांवर आमची नजर पडली आणि मग त्याला आम्ही संध्याकाळच्या जेवणात वांग्यांचं भरीत करण्याचं सुचवलं. आमच्यासाठी ज्या वांग्याचा बळी पडला असावा ते हे वांगं !!



गणपतीपुळे येथील समुद्र किनारा सुंदर आहे याविषयी कोणाचेच दुमत होणार नाही. परंतु तो अत्यंत गर्दीचा आणि commercialized
असा समुद्रकिनारा बनला आहे. त्यामुळं गणपतीपुळे आणि मालगुंड या दोन उपलब्ध पर्यायांपैकी आम्ही मालगुंड किनाऱ्याची निवड केली.  पुढील दोन तासाच्या अनुभवानंतर ही निवड अचूक असल्याचं समाधान वाटलं.  

आपण सुट्टी घेऊन शहरांपासून दूरवर का जातो हा प्रश्न स्वतःला विचारून पहा. तसं म्हटलं तर शहरापासून दूर जाणे  हे प्रत्येक वेळी शक्य होतं असं नाही. परंतु सुट्टीचा मुख्य उद्देश कोणता मला विचारलं
तर माझं याबाबतीतलं मत सुस्पष्ट आहे. आपण नेहमीच्या आयुष्यात व्यावसायिक तणाव शहरी जीवनातील समस्या यामुळे त्रासलेले असतो.  आणि त्यामुळे आपलं मूळ रुप आपल्यापासून दूर जात असतं अशी आपली धारणा होत असते. आपलं मूळ रुप नक्की कसं आहे हे आपण सांगू शकत नाही पण आपल्या बालपणीच्या अवताराची आपण या मूळ रुपाशी तुलना करू शकतो.  मी आपल्या सुट्टीमध्ये आपलं सद्यकालीन रुप विसरून आपल्याला ज्ञात असलेल्या मूळ रुपाच्या म्हणजेच आपल्या बालपणीच्या रुपाच्या जितकं जवळ जाता येईल तितका जाण्याचा प्रयत्न करतो. समुद्रकिनारा, हिमशिखरे, दाट जंगले ह्यांच्या सानिध्यात आपण हा प्रयत्न अधिक यशस्वीरित्या करु शकतो अशी माझी धारणा आहे. 

मालगुंडच्या समुद्रकिनाऱ्यावर सुद्धा मी नेमके हेच करीत होतो. तिथे असलेल्या मोजक्या लोकांच्या उपस्थितीमुळे माझ्या या मनसोक्त वागणुकीला प्रोत्साहन मिळाले. सोहम, संदीपभाई आणि मी समुद्राच्या विविध लाटांशी मनसोक्त खेळलो. 



समुद्राच्या लाटा विविध प्रकारच्या असतात. काही लांबवरुन मोठ्या रुपात येणाऱ्या लाटांचा जोर समुदकिनाऱ्यापाशी येईस्तोवर कमी झालेला असतो याउलट काही लाटा समुद्रकिनाऱ्याजवळ येताना जोर पकडू लागतात. 







ह्या लाटांच्या खेळांमध्ये शंखशिंपल्यांचा खेळसुद्धा पहावयास मिळाला. काही खेकडेसदृश्य जीव ह्या शिंपल्यांच्या आधारे ह्या लाटांसोबत समुद्रकिनाऱ्याच्या जवळ येत होते आणि मग पुन्हा परत नव्या परतणाऱ्या लाटांसोबत समुद्रात फेकले जात होते. 







निसर्गाची करणी अगाध आहे त्याच्या मनात नक्की काय आहे हे समजून घेण्याची ताकद नक्कीच मनुष्याकडे नाही. सव्वासात वाजेपापर्यंत आम्ही समुद्रकिनाऱ्यावर आमचं वावरणं सुरू ठेवलं होतं. सायंकाळी मस्तपैकी वांग्याचं भरीत खाऊन आम्ही निद्राधीन झालो. 

दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही लवकर उठून गणपतीपुळे येथील गणेशाच्या दर्शनासाठी निघालो. हा आठवड्यातील मधला दिवस असल्याने मंदिरात फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे गणेशाचं आम्हाला व्यवस्थित दर्शन घेता आले. गणपतीपुळे येथील गणेशाभोवतालची प्रदक्षिणा ही मला खूप आवडते. निसर्गरम्य परिसरातून साधारण एक किलोमीटर अंतर आपण अनवाणी पायाने चालत असतो. शक्यतोवर मौन बाळगून ही प्रदक्षिणा करावी आणि गणेशाचं चिंतन करावे.  देवाकडे मागावं की न मागावं हा ज्याचा त्याचा प्रश्न! एकंदरीत प्रदक्षिणा वीस मिनिटांत सावकाश पार पाडून आणि गणेशाच्या प्रसादाचे भक्षण करून आम्ही प्रसन्न मनाने ह्या मंदिराच्या आवारातून बाहेर पडलो. 


ह्यानंतरचा आमचा टप्पा होता तो म्हणजे प्राचीन कोकण हे एक ठिकाण प्राचीन कोकण हे ठिकाण एका छोट्या टेकडीवर बसवलं आहे असं म्हणता येईल. या उद्यानाचा हेतू अत्यंत उदात्त असा आहे. मराठी माध्यमाच्या झपाट्याने कमी होणाऱ्या प्रमाणामुळं आपल्या संस्कृतीशी असणारी नवीन पिढीची नाळ तुटत चालली आहे. त्यामुळं त्यांना आपल्या संस्कृतीशी ओळख ही शाळेबाहेरच्या माध्यमातून करून द्यावी लागणार आहे. प्राचीन कोकण ह्या उद्यानात नेमकं हेच केलं गेलं आहे. पूर्वापार कोकणात अस्तित्वात असलेल्या विविध पेशांतील जोडप्यांच्या जीवनसरणीचे दर्शन घडवून देण्याचा एक अतिशय उत्कृष्ट असा प्रयत्न ह्या उद्यानातून घडवण्यात आला आहे. 

ह्या उद्यानाचे फोटोच इतके सविस्तरपणे आपल्याला या जीवनसरणी विषयी सांगतात की मी त्यावर अधिक भाष्य करणं योग्य ठरणार नाही.  या फेरफटक्यात त्यासोबत आमच्यासोबत असणारी गाईड आम्हाला बऱ्यापैकी चांगली माहिती देत होती. परशुरामाची मूर्तीसुद्धा इथे होती परशुराम जिंकलेली सर्व पृथ्वी दान करून टाकली होती. त्यामुळं स्वतःला वास्तव्य करण्यासाठी म्हणून त्यांनी समुद्राशी लढाई करून समुद्राला काही अंतर मागे लोटलं आणि स्वतःच्या वास्तव्यासाठी भूमी निर्माण केली आणि हीच ती कोकण भूमी असं गाईड म्हणाली असा मला पुसटसं आठवतं.  पुढं ती विविध व्यावसायिकांच्या घराच्या रचनेविषयी आणि त्यांच्या आयुधांविषयीसुद्धा उत्कृष्ट माहिती देत होती. आपण जर ह्या भागात ह्या भागाला भेट दिलीत आणि आपल्यासोबत शालेय जीवनात असणारं  एखादा बालक असेल तर प्राचीन कोकण ह्या उद्यानाला भेट देणे अत्यंत उचित ठरेल. 






















कोकणातील उष्ण हवामानाला तोंड देण्यासाठी बनवण्यात आलेली कौलारू छपरांची संरचना! 

या संरचनेमुळे किंवा त्यातील द्विस्तरीय कौलामुळे बाहेरील उष्ण हवामानापासुन घराचे काही प्रमाणात संरक्षण होते. अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे या भेटीत काही नवीन शब्दांचा मला उलगडा झाला. चव्हाटा म्हणजे कोकणातील गावातील एक दैवत असून कोकणात वास्तव्य करणाऱ्या भूतांपासून हे गावातील लोकांचं संरक्षण करतं. आता इथे जी काही माहिती दिली आहे त्या माहितीची वैधता त्याच्या गाईडच्या ज्ञानावर आणि माझ्या स्मरणशक्तीवर अवलंबून असल्याने त्यात काही चुका आढळल्यास तज्ञानी दुर्लक्ष करावं. 

प्राचीन कोकण मधुन बाहेर आल्यावर आदित्य नामाचा महिमा !



(क्रमशः )

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...