मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

गुरुवार, १८ जानेवारी, २०१८

संयम - आधुनिक चालीरिती

रागात संयम बाळगायला हवा हे आपण सर्व ऐकुन असतो आणि जमेल तेव्हा हे तत्त्व पाळण्याचा प्रयत्न देखील करत असतो. पण हल्ली नव्यानं एक गोष्ट मला जाणवली ती म्हणजे बहुतांशी गोष्टीला प्रतिक्रिया देण्याची सवय सुद्धा घातक बनु शकते. 

आधीच्या पिढीला प्रतिक्रिया देण्यासाठी तुलनेनं कमी माध्यमं उपलब्ध आणि त्यांची व्याप्ती कमी विस्तृत होती. एखाद्या कडक नवऱ्याबरोबर संसार केला हे सांगायला सुद्धा काही स्त्रियांनी सत्तरी गाठायची वाट पाहिली असेल. हल्ली तसं नाही, आपल्याला काही वाटलं तर आपण ज्याच्याबाबतीत हे वाटलं त्या व्यक्तीला शक्य असेल तर थेट आणि नसेल तर सांकेतिक शब्दांत सोशल मीडियावर सांगतो. आपण दिलेली प्रतिक्रिया बऱ्याच जणांपर्यंत पोहोचते आणि त्यातील काही टक्के लोकांना ती आवडते. ज्यांना आवडते त्यातील काही टक्के आपल्याला तसं सांगतात सुद्धा, पण ज्यांना आवडत नाही त्यातील बहुतांशी लोक आपल्याला हे सांगत नाहीत पण कुठंतरी त्यांच्या आपल्याविषयीच्या मतात, आपल्याबरोबरच्या वागण्यात फरक पडतो. एकदंरीत काय तर बहुतांशी वेळा आपली प्रतिक्रिया आपल्यासोबतच ठेवणं हे हितकर ठरु शकतं. जर तुम्हांला विवादात पडणं जाणीवपुर्वक आवडत असेल तर मग मात्र ठीक!

नेहमी प्रतिक्रिया देण्याप्रमाणे सोशल मीडियावरील आपलं रुप म्हणजे व्हाट्सअँपचा DP, फेसबुकचे प्रोफाईल चित्र वारंवार बदलण्याची सवय काही जणांना असते. मला सुद्धा आहे. ह्या सवयीवरुन माणसाचा स्वभाव कसा आजमावा ह्याविषयी सुद्धा बरेच मेसेज येत राहतात. मी ह्याबाबतीत ऍटिट्यूड बाळगुन आहे. ह्या गोष्टीवरुन लोकांनी माझ्या स्वभावाचं निदान करु नये असे मला वाटतं. "It's my life" च्या धर्तीवर हा माझा DP, हे माझं फेसबुकचे प्रोफाईल चित्र, मला वाटेल तेव्हा मी बदलणार असं मला वाटतं! पण त्यामुळं आपल्या FB मित्रांना मात्र नाहक त्रास होतो. बदलला फोटो की लाईक केलाच पाहिजे वगैरेचे मैत्रीक बंधन वगैरे !!

अजुनही काही लोक मात्र ह्या बाबतीत प्रचंड संयम बाळगुन असतात. ते फारशी प्रतिक्रिया कुठं देत नाहीत, त्यांचा DP, प्रोफाईल चित्र वर्षोनुवर्षे कायम असतं. ह्या लोकांविषयी मी संमिश्र भावना बाळगुन आहे. आदर ही त्यातील एक भावना आहे. बाकीच्या भावना हे माझं वैयक्तिक मत आहे आणि ते स्वतःजवळ ठेवणं उत्तम! 

आपण महान आहोत ही भावना बऱ्याच लोकांच्या मनात हल्ली उफाळुन येऊ लागली आहे. माझ्या मनात सुद्धा ती बऱ्याच वेळा येते. खरंतर ऑफिसात काही वेळा आणि मुंबईत कार चालवताना नेहमीच ही भावना आवश्यक असते. पण बाकीच्या वेळा ह्या भावनेचं debriefing करणं आवश्यक असतं. महानतेच्या ढगात तरंगत असताना एकदम वास्तवाच्या धावपट्टीवर लँडिंग करावं लागलं तर धक्का बसु शकतो आणि त्यामुळं आपल्याला वास्तववादी उंचीवरुन उड्डाण करायला मदत करणारे मित्र आवश्यक असतात. तुम्ही कितीही उंचीवर उड्डाण करतअसाल तरीही त्याहुन अधिक उंचावरुन जाणारी विमानं नेहमीच असतात. पण आपल्याकडे वरच्या दिशेनं पाहायची तयारी हवी. 

सारांश - इथं सारांश वगैरे काही नाही. मनाला आलं लिहिलं. पण जर थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या व्यक्तिमत्वाच्या अनेक छटा असतात त्यातील किती सर्वांसमोर आणायच्या हा ज्याचा त्याचा प्रश्न ! आणि त्या सर्वांसमोर आणताना स्वानंदासोबत परभावना सुद्धा लक्षात घ्यायच्या का हा प्रत्येकाचा निर्णय! 

२ टिप्पण्या:

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...