मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ६ जानेवारी, २०१८

Avalanche


बर्फमय डोंगराळ प्रदेशात आपलं आकारमान वाढवत अतिशय वेगानं खाली येणाऱ्या बर्फाला Avalanche म्हणतात. ह्या प्रदेशात ह्या घटनेची शक्यता सदैव गृहित धरुन रहावं लागतं. ज्यावेळी उंचावरील बर्फावर कार्यरत असणारी बलं बर्फाच्या एकत्र राहण्याच्या शक्तीपेक्षा अधिक बलवान होतात तेव्हा बर्फाच्या घसरणीला सुरुवात होते. उतरणीवर हा बर्फ आपल्यासोबत अधिकाधिक वस्तुमान गोळा करत जातो आणि क्षणार्धात अगदी छोट्या प्रमाणात सुरु झालेल्या क्रियेचं अगदी भयावह विध्वंसक घटनेत रुपांतर होते. उतारावरील बर्फाची ह्या घटनेला प्रतिकार करण्याची असक्षमता त्याला ह्या घटनेत सहभागी बनवते आणि ह्या घटनेच्या विध्वसंकरुपात भर घालण्यात कारणीभुत ठरवते. 
  
समाजरचनेत ज्यावेळी स्वतःची ठाम मतं नसणारा रिकामटेकडा असा मोठा वर्ग अस्तित्वात असतो त्यावेळी समाजातसुद्धा अशा  Avalanche सदृश्य विध्वंसक घटना होण्याची शक्यता गृहित धरुनच सदैव जगावं लागतं. हा प्रकार समाजात ज्यावेळी घडतो त्यावेळी ह्या घटनेशी विविध घटक संबंधित असतात. 

हिमस्खलन (Avalanche) मध्ये उंचावरील बर्फाच्या एका विशिष्ट बिंदूवर कार्यरत असणारी बलं बर्फाच्या एकत्र राहण्याच्या शक्तीपेक्षा अधिक बलवान होतात. समाजातसुद्धा अशा घटनांची सुरुवात अगदी छोट्या ठिकाणी होते.  

हिमस्खलन (Avalanche) मध्ये जिथं विध्वंसक घटना सुरु होते तिथल्या फुटीर शक्तीला विशिष्ट स्थानाचा (उंचीचा) फायदा मिळतो. तिथं अगदी नाममात्र स्वरुपात सुरु झालेली घटनेला गुरुत्वाकर्षणाच्या बलाची जोड मिळुन विध्वंसकतेचा प्रभाव बर्फाच्या समुहावर विस्तारणे शक्य होते. समाजात ह्यासाठी निष्क्रिय समाजमानसावर ज्यांचा प्रभाव पडू शकेल अशा प्रसारमाध्यमाची मदत घेतली जाते. 

इथं तीन घटक आहेत. त्यातील दोन कर्ते आणि एक कर्म. प्रसारमाध्यमं आणि विध्वंसक वृत्तीचा रिकामटेकडा वर्ग हे कर्ते आणि निष्क्रिय समाजमानस हे कर्म. ह्या समाजमानसाला घरात भयभीत करायचं झालं तर प्रसारमाध्यमं आणि घराबाहेर भयभीत करायचं झालं तर विध्वंसक वृत्तीचा रिकामटेकडा वर्ग ह्यांचा आधार घेतला जातो. 

समाजातील विध्वंसक घटनांचं प्रमाण एका विशिष्ट प्रमाणापेक्षा वाढलं तर प्रसारमाध्यमांच्या अस्तित्वावरच घाला येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 

हिमस्खलन (Avalanche) घटना विशिष्ट हंगामात म्हणजे हिवाळ्यात घडतात. समाजातील अशा घटनांचे प्रमाण सुद्धा विशिष्ट हंगामात म्हणजे निवडणुकीच्या काळात पद्धतशीररित्या वाढवलं जाण्याची शक्यता असते. 

हिमस्खलन घटना आणि समाजातील विध्वंसक घटना ह्यांचं साधर्म्य इथंच संपतं. जसजसं राजकीय पक्ष संगणकाचा आधार मतदारांच्या वर्गीकरणासाठी अधिकाधिक प्रमाणात घेऊ लागतील तसतसं अशा कृत्रिमरीत्या घडवुन आणलेल्या विध्वंसक घटनांचं आणि समाजमानसाला प्रभावित करण्यासाठी पसरविलेल्या चुकीच्या बातम्यांचे प्रमाण वाढत जाणार. ज्यांना पुर्ण बहुमत मिळवणं शक्य नसल्याची जाणीव आहे त्यांना सामाजिक बांधीलकी कमी प्रमाणात असते हे कित्येक वेळा दिसुन आलं आहे. केवळ आपलं अस्तित्व टिकवणं हाच एक मसुदा त्यांच्यापाशी असतो. 

भविष्यात अशा घटना घडण्याची शक्यता गृहित धरुनच सर्वांना वावरावं लागणार आहे. जो कोणता सत्ताधारी पक्ष आहे त्यावर अशा घटनांना सामोरं जाण्याची प्रशासनाची क्षमता वर्धित करण्याची जबाबदारी मोठ्या प्रमाणात येणार. ह्यात राज्यात / देशात कुठं हिमस्खलनात परिवर्तित होऊ शकणाऱ्या विध्वंसक घटनांच्या बारकाईनं लक्ष ठेवणं / त्यांना नियंत्रणात ठेवणं, समजा असा avalanche सुरु झालाच तर सोशल मीडियावर पसरविल्या जाणाऱ्या संदेशावर नियंत्रण ठेवणं हे सर्व प्रकार येणार आणि ह्या सर्वासाठी संगणकांचा वापर प्रभावीपणे करावा लागणार. पक्षीय फायद्यासाठी संगणकाचा वापर आणि राष्ट्रहितासाठी संगणकाचा वापर ह्यातील लक्ष्मणरेषा जबरदस्त काळजीपुर्वक आखावी लागणार. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...