मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

गुरुवार, २७ एप्रिल, २०१७

RT

दुनियेतील खट्याळ माणसं आपल्यासमोर आली की कसं बरं वाटतं! मस्ती करण्याच्या ज्या काही खुमखुमी आपल्या अंगात सुप्त रूपानं वावरत असतात त्या प्रत्यक्षात कोणीतरी करताना पाहुन धन्य वाटतं. काही खट्याळ माणसांचा खट्याळपणा त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्टपणे उठून दिसतो. ह्या खट्याळपणाला ते स्वतः निरागसपणा म्हणतात. ज्याप्रमाणं लहानपणी निरागस बालक सर्वांचं आवडतं असतं; 





त्याचप्रमाणं आपला हा निरागसपणा आपल्या तरुणपणी सुद्धा आपल्याला तरुणीच्या कंपूत लोकप्रिय बनवत असणार अशी ह्या खट्याळ / निरागस लोकांची मनोमन समजुत / खात्री असते. 





आजच्या पोस्टचा विषय असाच एक निरागस चेहऱ्याचा RT ! 


वरती बसलेला भगवान जसा प्रत्येक माणसाच्या पाप पुण्याचा हिशोब ठेवतो तसाच त्याने व्हाट्सअँप / फेसबुकवर वापरलेल्या शब्दांचा सुद्धा ठेवतो ही RT ची समजुत असावी. त्यामुळं HD म्हणजे हॅपी दिवाळीच्या धर्तीवर HNY, HH, HC, HGP वगैरे शॉर्टफॉर्ममध्ये RT कडून येणाऱ्या मेसेजची आपल्याला सवय करून घ्यावी लागते. अशीच सवय झाल्यावर मग काही दिवसापुर्वी मी उगाचच HGF ची वाट पाहत राहिलो!  


ह्याच शॉर्टफॉर्मवरुन आठवण झाली ती PC ची! साध्या जगात वावरणाऱ्या मला  PC म्हणजे संगणक ह्याच्या पलीकडं काही माहित नव्हतं ! बऱ्याच प्रयासानं PC म्हणजे प्रियांका चोप्रा हे सुद्धा असू शकतं हे माझ्या गळी पाडण्यात सामाजिक मीडियाने हातभार लावला. ह्या धक्क्यातुन मी सावरत नाही तोवर RT साहेब सतत PC PC असा घोष करु लागले. कालांतराने RT हे परिणिती चोप्रा ह्यांचे फॅन असल्याची त्यांनी कबुली दिली. बऱ्याच संशोधनानंतर दोघंही फॅरेक्स बेबी आहेत त्यामुळं ह्या फॅन प्रकरणाच्या मूळ कारणाचा आम्हा सर्वांना साक्षात्कार झाला! 

RT आणि माझी ओळख आमच्या शाळेच्या माजी विद्यार्थी महासंघाच्या कार्यक्रमांच्या माध्यमातुन झाली. तसा आमच्या वयांमध्ये एक तपाहून अधिक फरक! काही वर्षांपूर्वी मी काहीसा कर्मठ वृत्तीचा होतो. नव्या पिढीतील सर्व मंडळी काहीशी भरकटलेली, उथळ असतात असा मी उगाचच समज करुन घेतला होता. पण RT आणि अशा काही मंडळींची माजी विद्यार्थी महासंघाच्या विविध कार्यक्रमातून भेट होत राहिली आणि वयाच्या तिशीला आता पोहोचत आलेली मंडळी योग्य वेळी संयत विचार करतात आणि परंपराचा मान ठेवतात हे जाणवलं आणि आपली संस्कृतीचा वारसा योग्य हाती पडेल ह्याची खात्री झाली. 


RT हा एक वसईतील उभरता, नावाजलेला छायाचित्रकार! ह्यात त्याच्या छायाचित्रण कौशल्याचा वाटा किती आणि त्याच्या उच्चभ्रु कॅमेराचा वाटा किती अशी शंका अरसिक लोक उगाचच व्यक्त करीत राहतात. आपल्या कार्यालयीन जबाबदारीच्या निमित्तानं RT भारतभर भ्रमण करत राहतो. तिथं गेल्यावर तिथली प्रेक्षणीय स्थळं आपल्या कॅमेरात पकडण्याची त्याची खासियत! त्यामुळं आपल्याला भारतभरातील वैविध्यपूर्ण स्थळांचं उत्कृष्ट छायाचित्रण घरबसल्या पाहायला मिळतं! 













राहुलचे fb वर २ हजारहुन जास्त  मित्र! परंतु "FB वर हजारो मित्र आणि रस्त्यावर विचारत नाही कुत्रं!" ह्या परिस्थितीच्या उलटी स्थिती! राहुलला जिवाला जीव देणारे हजारो मित्र वसई आणि देशभर आहेत! आणि हो मी फक्त मित्रांचे बोलतोय! अशाच एका मित्राचं हे मनोगत!


उत्तम छायाचित्रकार म्हणून नाव लौकिक मिळवलेला पण काढलेल्या हजारो फोटो काढताना माझा एकही फोटो न काढणारा *राम** तरीही माझा खास मित्र RT.
त्याची आणि माझी ओळख झाली ती १४ वर्षांपूर्वी कला क्रिडा महोत्सवाचे व्यवस्थापन करताना. तेव्हापासूनच अगदी गुबदुल, हसरा राहुल माझा मित्र झाला तो अगदी जवळचा. वय, शिक्षण, शाळा ते अगदी रहाण्याचे ठिकाण हि आमचे वेगळे आणि दूर. पण म्हणतात ना शैतान नेहमी मैत्री टिकवून असतात. तसे आम्ही कला क्रिडा नंतर देखील नेहमी ओर्कुट, fb किंवा मधेच कधी भेटून टच मध्ये रहायचो.
सकाळी मेसेज नाही म्हणजे राहुल रोमिंगला आहे. आम्ही स्मार्ट आहोतच पण स्मार्ट फोनमुळे जवळीक जास्त होत गेली. fb, wa मुळे मग रोजच टवाळक्या सुरु झाल्या. एखादी related पोस्ट असली कि मग common frd ना tag करून त्यांची खेचायची. त्याहून हि महत्वाचे श्रेयस जोशीच्या कमेंटची मारणे म्हणजे आमचे आद्य कर्तव्य सुरु झाले. 
राहुल आणि माझे जास्त tuning जमण्याचे कारण म्हणजे टवाळकी, मजा मस्करी हे common गुण. आम्ही शांत आणि न हसता कधीही राहू शकत नाही. ३ वर्षापूर्वी आमचा एक whatsapp ग्रुप सुरु झाला. २-३ जण सोडले तर बाकीचे अनोळखी. पण काही दिवसांत आम्ही ग्रुपचे कर्दनकाळ ठरलो. मेंबरची खेचणे, चिडवणे, मुद्दामून भांडण करणे आमचे रोजचे कार्य. कळ केली नाही असा एकही दिवस नाही. या १४ वर्षाच्या मैत्रीत आमचे टायमिंग अगदी अचूक आहे कि, आम्ही एकत्र असलेल्या ४-५ ग्रुप मधला कोणताही ग्रुप असो. आम्ही perfect एकच टार्गेट शोधतो. आणि मग तो पार उखडे पर्यंत आम्ही शांत बसत नाही. सुगंधा ताईना चिडवणे असो किंवा आमचे संतसूर्य संदेश भाऊ असोत. त्यांच्या प्रत्येक सोशल हालचालीवर नजर ठेवून कळ काढण्याची सवय आणि perfect timing कधी चुकले नाही. त्यामुळे कोणत्याही ग्रुप मध्ये काहीही चुकीच घडो पण वाईट आम्हीच. 
एखादा कार्यक्रम याला नको असेल तर मात्र मला सोबत न घेता त्या प्लानची वाट लावण्यात हा माहीर. उगाच वाद, कळ काढत लोकांना भडकवत प्लानची मारण्यात तो मास्टर आहे. “ग्रुप मध्ये चूक असले तरी हार न मानणे हा हि खूप मोठा गुण आहे”
हुशार, नेहमी मदतीला तत्पर हे त्याचे positive गुण.  

 असा हा लोकांना sample वाटून संपल्यावर मग देतो सांगणारा, बर उशिरा देईल ती सुध्दा १५ दिवसांत expire sample देणारा, कुठे बाहेर जाताना मला १०-१५ मिनिट वाट बघायला लावणारा, आणि आजपर्यंत माझा एकही फोटो काढणारया राहुलच्या पुढील वाटचाली साठी लक्ष लक्ष शुभेच्छा.

राहुल तसा धार्मिक देखील त्यामुळं त्यानं वारी केली तेव्हा फारसं कोणाला आश्चर्य वाटलं नाही. त्या वारीच्या वेळेचे त्याने काढलेले काही उत्कृष्ट फोटो !








फॅरेक्स बेबी असला म्हणुन काय झालं, RT फिटनेसच्या बाबतीत कोणतीच हयगय करत नाही. योगा क्लास असले की "मॅट आणायची का?" असले प्रश्न विचारुन तो वातावरणनिर्मिती करतो. काहींना हा "चार आण्याची कोंबडी बारा आण्याचा मसाला !" असला प्रकार वाटतो.  काही वास्तववादी माणसं त्याला "घड्याळात सकाळचे सात वाजलेले कधी पाहिलेत का?" असं विचारुन त्याचा उत्साह खंडित करण्याचा प्रयत्न करतात. परंतु वातावरणनिर्मिती करुन अजुन दोन-चार लोकांना योगा करण्यास प्रवृत्त करावं हाच त्याचा निरागस हेतू असतो. दुर्गम किल्ल्यांवर ट्रेकिंग करणं हा तर RT चा आवडता छंद! इथं पहा ना! त्यानं किती सहजगत्या दुर्गम चढण पार केली आहे! 



ही पोझ  आणि बाळ RT ह्यांच्यामध्ये किती हे साधर्म्य! 


वसईत मराठी भाषेची श्रीमंती जागृत ठेवण्यासाठी विविध माध्यमाद्वारे प्रयत्न केले जातात. वाढदिवस, विशेष परदेशवारी, मोटारगाडी खरेदी अशा खास प्रसंगी एक खास ग्रुप मराठी भाषेतील श्रीमंत विशेषणांचा आणि नवीन टॅग लाईनचा  वापर करुन वातावरणनिर्मिती करतो. ह्यात RT चा मोठा पुढाकार असतो! अशी काही पोस्टर्स! 










आपलं कार्यालयीन काम सांभाळून हे सर्व करायचं म्हणजे उत्साह दांडगा हवा!  RT कडे त्याची काही कमी नाही. "Live life to its fullest" ह्या उक्तीवर RT चा पुर्ण विश्वास! त्यामुळं प्रत्येक ठिकाणच्या केवळ खवैय्यांना ज्ञात असलेल्या उपहारगृहांची त्याला आधीच माहिती असते! त्या त्या ठिकाणच्या चविष्ट व्यंजनांची आपल्याला माहिती होते. घरचा शाकाहारी असलेला RT अधूनमधून नायगाव स्टेशनवरील ताज्या माश्यांची छायाचित्रं FB वर टाकतो आणि वर त्यात केवळ छायाचित्रण अशी कॉमेंट टाकायला विसरत नाही. परंतु RT जवळून माहित असलेली मंडळी मात्र त्या फोटोतील माशाचं सद्यकालीन वास्तव्य कोठे असेल ह्याविषयी निःशंक असतात.  

माजी विद्यार्थी महासंघातर्फे आयोजित करणाऱ्या बॉक्स क्रिकेट स्पर्धेची २००२ बॅच सतत चार वर्षे विजेती! राहुल ह्या संघाचा स्वयंघोषित व्यवस्थापक! ह्यावर्षी त्याला खेळण्याची संधी मिळाली. एक षटक सुद्धा टाकण्यास मिळालं. आपण फलंदाजाच्या दिशेनं सोडलेला हा चेंडू जगातील आतापर्यंतचा सर्वोत्तम फिरकी चेंडू आहे ह्याविषयी १००% खात्री असलेली त्याची ही गंभीर मुद्रा!




पावसाळा आला आणि एका महिन्यात वसईतील विहिरी भरल्या की राहुल आणि मित्रमंडळ आपलं सूर कौशल्य दाखविण्यासाठी वसईतील विहिरी धुंडाळत फिरतं. आपलं हे कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी ते विहीर मालकांना आपली फी लावत नाहीत हे विहीर मालकांचं सुदैव! अशीच गेल्या पावसाळ्यातील ही एक प्रसन्न मुद्रा! 





अशा छायाचित्रणात उगाचच अमॅझॉन जंगल वगैरे ठिकाणं टॅग करुन निरागस मित्रांना फसविण्यात ह्या मंडळाचा हातखंडा! ह्या मंडळात महर्षी डोंगरे ह्यांचा समावेश आहे. वसईतील सर्वोकृष्ट सुरपटू अशी त्यांची ख्याती आहे! २०२० ऑलिम्पिक खेळात ह्यातील काही मंडळींना सहभागाची संधी मिळो ही शुभेच्छा! ह्या मंडळींना फसविण्यासाठी काही कायम बकरे ./ बकऱ्या लागतात. दिलदार मनाची सुगंधाताई ह्यावेळी स्वतःहुन पुढं होते. फसविले जाण्यात सुद्धा किती धन्यता मिळते हे सुगंधाताईंच्या प्रसन्न मुद्रेवरून सिद्ध होते! 




RT ची गणना FB चं चेक-इन फीचर वापरण्यात आघाडीवर असलेल्या जगातील पहिल्या १० लोकांत होते. ज्या उत्साहानं तो मुंबई विमानतळावर चेक-इन करतो त्याच उत्साहानं पंजाबातील चहाच्या टपरीसुद्धा करतो.  वरती त्यांच्या खास मित्रांनी उल्लेखल्या प्रमाणे एखादा विसरला गेलेला मुद्दा उकरून काढण्यात RT चा हात कोणी धरणार नाही! ह्यासाठी FB वर दोन तीन वर्षापूर्वीची पोस्ट जाऊन लाईक करणे अथवा त्यावर कॉमेंट करणे हे तंत्र मी त्याच्याकडून नव्याने शिकलो! धन्यवाद RT!! 

RT हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व!  मला त्यातील केवळ मोजके पैलू अनुभवता आले आणि केवळ ह्या मर्यादित माहितीवर ही पोस्ट लिहिली जाऊन  त्याच्या मी न अनुभवलेल्या कळा- गुणांना मला न्याय देता आला नाही ह्याची खंत लागुन राहिली असती.  परंतु निष्काम समाजयोगी / संतसुर्य, महर्षी, अजातशत्रू प्रशांत, सुगंधाताई , विनू  ही वसईतील सामाजिक जीवनातील नामवंत मंडळीनी  आपल्या अमुल्य माहितीभांडारातून बाकीचे सप्तपैलू भरून काढण्यास फार मोठा हातभार लावला, त्याबद्दल त्यांचे मनःपुर्वक आभार! FB वरील बाकीचे २३५६ मित्र आपल्या कॉमेंट्सद्वारा बाकीची माहिती आपणास देतीलच ह्याविषयी मी निःशंक आहे!

मंगळवार, १८ एप्रिल, २०१७

निष्काम समाजयोगी !



सद्यकालीन महाराष्ट्रदेशी नवलेखक. नवकवी ह्यांच्या प्रतिभेला प्रचंड अंकुर फुटले आहेत. पहिल्या पावसानं रानात दबून राहिलेलं प्रत्येक बीज नवजीवनाचा घोष करीत ज्याप्रमाणं जमिनीबाहेरडोकावतं त्याप्रमाणं हे सारे मराठी भाषेचे नवशिलेदार सोशल मीडियाचं विश्व व्यापून टाकत आहेत.  आठ - दहा वर्षांपूर्वी मराठी भाषेचं भवितव्य काय हा सर्वांना सतावणारा प्रश्न सध्या तरी मागे पडलेला दिसतोय!

कितीही नाकारलं तरी ह्या सर्व नवशिलेदारांना मनात कोठेतरी जनांकडून स्वीकृतीची वा कौतुकाची आस असते. ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर दाद देण्यात आपला समाज फारसा प्रसिद्ध नाही. त्यामुळं हे सर्व नवशिलेदार मनातून काहीसे खट्टू असतात. आजची पोस्ट ह्या नवशिलेदारांना आवर्जुन दाद देणाऱ्या संदेशभाऊ वर्तक ह्यांना समर्पित!

संदेशभाऊ हे वसईतील मुळगाव गावातील! ह्या गावाला वैचारिक नेतृत्व देणाऱ्या समाजधुरिणांचा वारसा लाभला आहे. संदेशभाऊ हे ह्या मुळगाव गावातील ह्यापारंपरिक विचारसरणीचं प्रतिनिधित्व करतात. वसईतील सांस्कृतिक जीवनातील परंपरेचा अभ्यास असणं हा एक आवश्यक निकष त्यांनी सहजगत्या पूर्ण केला आहे. पारंपरिक विचारसरणीचा वारसा पुढे चालवताना त्यांनी आधुनिक जगातील संकल्पनांना आपलंसं केलं आहे आणि त्यामुळं डिजिटल इंडिया पासून त्यांच्या कार्यक्षेत्रातील विमानाची रडारप्रणाली अशा विविध विषयांवर ते सहजगत्या आपली मतं नोंदवू शकतात!

सोशल मीडियाचं  एक नाजुक अंग म्हणजे तुम्ही ह्यावर जर अतिसक्रिय असाल तर तुम्हांला टीकाकारांच्या टोमण्याला. तिरकस टिपण्णीला तोंड द्यावं लागतं . अशा  केवळ एका टिपण्णीनं सार्वजनिक जीवनातील आपला गाशा गुंडाळणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही. संदेशभाऊ ह्या सर्वांपेक्षा वेगळे ठरतात ते ह्यामुळं ! त्यांच्यावर खेळीमेळीची टीका करणाऱ्या त्यांच्या सुहृदांची फौजच्या फौज वसईत उभी आहे! तरीही नाराज न होता ते आपलं सामाजिक कार्य सुरु ठेऊन आहेत. 

त्यांच्या प्रतिक्रियेने मला सुद्धा बऱ्याच वेळा हुरूप मिळाला आहे. आजची ही पोस्ट अशा ह्या काहीशा अनाम संदेशभाऊना समर्पित! आपण एक व्यक्ती नसून परंपरा आणि आधुनिकता ह्यांचा उत्कृष्ट मिलाफ असणारी संस्था आहात आणि आपल्या कॉमेंट्सची कृपादृष्टी आम्हां पामरांवर सदैव असू द्यावी ही विनंती ! 

शनिवार, १५ एप्रिल, २०१७

गवाक्ष



गेले १० - १५ दिवस सौमिल दौऱ्यावर होता. तिलोत्तमाला आपल्या जीवनात काही फारसा फरक जाणवला नव्हता. नाही म्हणायला गेलं तर विवाहानंतरच्या सुरुवातीच्या नावीन्याच्या दिवसानंतर समांतर रेषेतील आयुष्याची त्या दोघांना सवय झाली होती. 

दुपारची उन्हं खिडकीतुन आत येऊ पाहत होती. आपल्या जीवनात शिरू पाहणाऱ्या पण नकोशा असणाऱ्या माणसांप्रमाणं ह्या क्षणाला तिलोत्तमाला ही किरणंसुद्धा नको होती. तिला हवा होता एकांत! आपल्या मनात क्षणाक्षणाला घोंघावणाऱ्या आणि सदैव बदलत राहणाऱ्या विचारांची संगत तिला पुरेशी होती. आपल्या भोवतालचं साधं गाव अचानक नाहीसं होऊन तिथं आपल्या मनातील विविध भाव आपापली घरं उभारुन राहताहेत असं तिला वाटू लागलं होतं. समोरचं घर होतं ते औदासिन्याचं, त्याच्या पलीकडं निर्विकारतेचं वगैरे वगैरे !! दुःख, आनंद अशा टोकाच्या भावना शोधून सापडत नव्हत्या. त्यांची घरं कुठं असतील ह्याचा ती शोध घेऊ लागली. पश्चिमेकडं अजून अधिक झुकलेल्या दिनकराच्या लुडबुडणाऱ्या किरणांनी तिची विचारशृंखला खंडित केली. 

आपण दोघांनी मिळून आयुष्य अगदी एंजॉय करायचं असं सुरुवातीला सौमिल कधीतरी बोललेला तिला अधुरंसं आठवत होतं. पण नंतर मात्र जसजसं आयुष्य पुढं सरकत गेलं तसं ह्या समांतर रेषेतील आयुष्याची त्या दोघांना सवय झाली होती. तिलोत्तमा होती प्रसिद्ध चित्रकार! अमूर्त चित्रकारितेत तिचा बराच नामलौकिक होता. सौमिल होता एक उच्चपदस्थ शास्त्रज्ञ! म्हटलं तर दोघांची आयुष्यं सामान्यतेच्या बऱ्याच पलीकडं कुठंतरी अज्ञातात वावरणारी! पण ह्या अज्ञाताच्या प्रचंड विश्वात ते दोघं सुद्धा शेकडो मैल दूरवर होते. "आपण दूरवर आहोत ह्याचं दुःख नाही पण तुझ्याकडं पोहोचण्यासाठी नक्की कोणत्या दिशेला शोध घ्यायचा ह्याची यत्किंचितही कल्पना मला नाही ह्याची खंत आहे!" अशाच एका दुर्मिळ सानिध्याच्या क्षणी सौमिल म्हणाला होता. 

समोरच्या अर्धवट पूर्ण केलेल्या चित्राकडं  तिलोत्तमाची नजर गेली. अमूर्तातील कोणत्याही विशिष्ट आकाराचं तिला वावडं नव्हतं. एखादा विशिष्ट आकार काढताना फक्त त्या क्षणाशी आपण प्रामाणिक राहायचं इतकं तिला ठाऊक होतं. नंतर त्या चित्राचं विश्लेषण करणारी समीक्षक मंडळी त्या चित्रातील गर्भितार्थ समजुन घेण्यासाठी तिचा अगदी पिच्छा पुरवीत. त्यांनाही एखादं असं वेगळंसं स्मितहास्य देऊन तो क्षण निभावून नेण्याची कला तिनं चांगली साध्य केली होती. 

रेषा समांतर का धावतात - एकत्र येऊन एका रेषेत धावणं त्यांना जमत नाही म्हणून की समांतरतेच्या पलीकडील कोन स्वीकारल्यास वाढत जाणारं अंतर जो दुरावा निर्माण करेल तो सहन करण्याची ताकत नसते म्हणून! आपल्याच चित्रातील दोन समांतर रेषांकडे पाहून तिलोत्तमा विचार करत होती. 

आपली चित्रकला अमूर्त! त्यातून कोणता बोध घ्यायचा ते आपण आपल्या रसिकांवर सोपवून देतो. कारण आत्मविश्वासपूर्वक त्यातला अर्थ सांगायचा आपल्यात आत्मविश्वास नाही!  हा विचार येताच तिलोत्तमा काहीशी हादरली. हा विचार झटकून टाकायचा प्रयत्न करू लागली. पण तो विचार तसाच पुढं येत राहिला; अगदी त्या सूर्यकिरणाप्रमाणं! जशी चित्रकला तशी आपल्या आयुष्याची समांतरता! कारण सौमिलच्या रेषेजवळ स्वतःहून जाणं आपल्याला जमलं नाही! आपलं त्यानं कौतुक करावं ही आपली भावना आपल्या मनातच दाबून ठेवली आपण! कारण स्वतःहून कोणत्या भावनेला मोकळं करणं आपल्या स्वतःच्या स्वभावातच नव्हतं आपल्या! आपण उघडपणे ह्या समांतरतेविषयी कधी खंत व्यक्त केली नसली तरी एका रेषेतील आयुष्य किती आल्हाददायक असतं ह्याविषयीचं औत्सुक्य आपल्याला कधीच दाबून टाकता आलं नाही! 

तो विचार असाच आपला मार्ग संक्रमित करीत तिलोत्तमाला पूर्ण अस्वस्थ करुन गेला. तिची शांतता पुरती भंग करीत! आपल्या स्वकेंद्रिततेवर आपल्याच विचारानं इतका घणाणती घाव घालावा ह्याचं वैषम्य तिला लागून गेलं. समोरील गवाक्ष अर्धवट उघडी होती. आपलं आयुष्य आपण त्या गवाक्षाच्या उघड्या भागातून पाहिलं की काचेतून ह्याचाही तिला आता उलगडा होत नव्हता! बहुदा आपण बाहेर कधी पाहिलंच नाही केवळ आपण आतल्या आत घुटमळत राहिलो अशी समजूत तिनं करून घेतली. ह्या विचारानं तिला बरंच बरं वाटलं. सायंकाळचा थंड वारा एव्हाना त्या अर्ध्या खिडकीतून आत येऊ लागला होता. खिडकी बंद करत घोटभर दुध घेऊन तिलोत्तमा आपल्या अमूर्ताच्या पूर्णत्वाच्या प्रयत्नात गढून गेली.    
(संपूर्णतः काल्पनिक )

शनिवार, ८ एप्रिल, २०१७

खंत ५०१ ची!



गाव  - कोपरगाव 
स्थळ - गावाचा पार 
ज्योतिषी जोशी आपला जामानिमा घेऊन एका कोपऱ्यात बस्तान ठोकुन बसले होते . अधुनमधून अंगाला लागलेल्या घामाच्या धारा पंच्याने पुसून काढता काढता एप्रिलमध्येच उन्हानं इतकं बेजार केलं असताना मे महिन्यात आपला कसा निभाव लागणार ह्या चिंतेनं त्यांना पुरतं बेजार केलं होतं . उन्हाच्या चिंतेनं इतकं ग्रासलं असताना देखील चष्म्याच्या फ्रेमच्या वरून त्यांचे डोळे रस्त्याकडं लागले होते . आजच्या दिवसात एकही गिऱ्हाईक फिरकलं नाही तर कसं काय होणार हे त्यांना समजत नव्हतं. आपल्या ज्योतिष्यशास्त्राच्या आधारे आज आपल्याकडं एकतरी भाविक येणार की नाही ह्याचा सुद्धा आपल्याला उलगडा करता येऊ नये ह्याची चिडचिड मनातल्या मनात दाबुन धरण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडं दुसरा उपाय देखील नव्हता. 

अचानक एक चांगलं सुटबूट घातलेलं भारदस्त व्यक्तिमत्व आपल्या दिशेनं येताना त्यांना दिसलं. ह्याला चांगलाच गंडा घातला की महिनाभराची तजवीज होऊन जाईल  ह्या विचारानं त्यांची मुद्रा अचानक प्रसन्न झाली. आपली बैठक आवरून आणि मुद्रेवर भारदस्त हावभाव आणून त्यांनी उगाचच आपल्यासमोरील पोथीवाचनाचा आभास निर्माण केला. 

व्यक्ती - नमस्कार बुवा!

क्षणभर वाचनात मग्न असल्याचा आव आणुन मग जोशीबुवांनी नजरेनं त्यांना बसण्याची खुण केली. अजून काही वेळ तरी पोथीवाचनाचं नाटक सुरु ठेवणं आवश्यक होतं. गेली कित्येक वर्ष आपण नेमकं तेच पान का वाचत बसतो आणि तरीही आपल्याला त्याचा उलगडा का होत नाही ह्याची खंत करणं त्यांनी हल्ली सोडून दिलं होतं. शेवटी एकदा आपली साधना आटपून त्यांनी त्या व्यक्तीकडं आपला मोर्चा वळविला. 

जोशीबुवा - नाव ?
व्यक्ती - ५०१!

जोशीबुवांची मुद्रा काहीशी त्रस्त झाली. पण अधुनमधून असल्या टग्या माणसांशी त्यांची गाठ पडायची त्यामुळं पहिल्या प्रश्नात हार न मानण्याची त्यांनी सवय करुन घेतली होती. 

जोशीबुवा - जन्मस्थळ 
व्यक्ती - भारत 

हे बेणं जरा पोहोचलेलं आहे ह्याची मनोमन बुवांनी स्वतःला जाणीव करुन दिली. 

जोशीबुवा - जन्म दिनांक , वेळ 
व्यक्ती - नक्की माहित नाही, पण जन्म किमान दहा हजार वर्षांपूर्वीचा !

नाक्यावर आपल्या ओळखीची माणसं वावरत आहेत ना ह्याची बुवांनी फ्रेमच्या वरून नजर फिरवुन खातरजमा करून घेतली. कुडमुड्या ज्योतिष्याला भुताची सदिच्छा भेट वगैरे बातमी पेपरात छापुन येईल ह्याची त्यांनी एव्हाना मानसिक तयारी करुन घेतली होती. 

जोशीबुवा - अं  अं 
जोशीबुवांची ही स्थिती पाहून त्या व्यक्तीनं अगदी हळुवार आवाजात त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली!

व्यक्ती -  जोशीबुवा ! तुम्हांला दिलेल्या  त्रासाबद्दल अगदी क्षमस्व ! मी आहे  संख्यारेषेवरील  ५०१!  माझ्या जीवनात अचानक गेल्या आठवड्यात  जी काही  अभूतपूर्व  घडामोड झाली  त्यामुळं  मी अगदी हबकून गेलो आहे. तुम्ही  पंचक्रोशीतील नावाजलेले  ज्योतिषी , तुम्हीच मला वाचवु  शकाल अशी  आशा मनी बाळगुन मी आपणाकडे आलो आहे! 

क्षणभरात जोशीबुवांच्या  मनात असंख्य भावनांनी थैमान घातलं. बालपणी दैत्यापेक्षा ज्याची त्यांना भिती वाटायची आणि दहावीच्या परीक्षेत ३५ गुण मिळवून उत्तीर्ण झाल्यावर ज्याच्याशी आपलं जीवनभरातील नातं संपलं असा सुस्कारा त्यांनी सोडला होता त्या खलनायक गणितातील एक पात्र ५०१ त्यांच्यासमोर अगदी जिवंतरूपात हजर होतं आणि वर गयावया करुन त्यांच्याकडं मदतीची याचना करीत होतं. बहुदा आपल्या गणिताच्या मास्तरांनीच ह्याला पाठवलं असावं अशी त्यांनी मनोमन आपली खात्री करुन घेतली. काहीही झालं तरी आल्या प्रसंगाला तोंड देणं भाग होतं. 

जोशीबुवा - मला नक्की समजलं नाही! नक्की झालं तरी काय ?
५०१ (काहीशा निराश चेहऱ्यानं) - मला वाटलं तुमच्या सारख्या ज्ञानी माणसाला हे तात्काळ कळलं असणार! पण बरोबर आहे जेव्हा ग्रहच चांगले नसतात त्यावेळी अशा गोष्टी घडणारच!

हे पात्र गणितातील असलं तरी ह्याची मराठी भाषा देखील चांगली आहे! बुवांनी मनोमन दाद दिली. 

५०१ - अहो सरकारने असा काही निर्णय घेतला की माझी अगदी धुतल्या तांदळासारखी प्रतिमा मलीन झाली! 

जोशीबुवांच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला! लहानपणी सतत डोळ्यासमोर फिरणारी एक प्रतिमा त्यांना आठवली. आई वैतागली की ह्याचीच सोबत देत त्यांना न्हाणीघरात कपडे धुवायला पिटाळायची!
जोशीबुवा - अहो ५०१, इतके निराश का होता? काळ बदलला तशा लोकांच्या सवयी सुद्धा बदलणार ना !  आणि ५०१ बार तर बऱ्याच आधी कालबाह्य झाला आहे!

५०१ - अहो साहेब, कशाला जुन्या जखमांना पुन्हा उजाळा देता आहात? ५०१ बारचं दुखणं तर मी केव्हाच विसरुन गेलोय!

जोशीबुवा - मग? गेल्या आठवड्यात झालंय तरी काय?

५०१ - (अत्यंत निराश चेहऱ्यानं) - अहो साहेब असं काय करता! सरकारनं महामार्गापासुन ५०० मीटरच्या आत मद्याच्या दुकानांना बंदी घातली हे तुम्हांला माहित नाही काय?

जोशीबुवा - (रागीट मुद्रेनं) - मला माहित नसणार हे कसं शक्य आहे! मलादेखील त्याचा फटका बसलाय! पण त्या निर्णयाचा आणि तुमचा काय संबंध? 

५०१ - अहो भारतभर जो तो आता दारूची नवीन दुकानं टाकतोय आणि जिकडतिकडं म्हटलं जातंय - ५०१ मीटरवर दुकान टाका! माझी अगदी धुतल्या तांदळासारखी प्रतिमा मलीन झाली! 

इतकं उच्च मराठी ऐकण्याची सवय नसल्यानं बुवांना त्रास होऊ लागला!

जोशीबुवा - (संतापून ) तुम्हांला बजावून सांगतोय अगदी उच्च दर्जाची मराठी भाषा वापरणं सोडून द्या ! तुमचं घराणं कोणतं आणि अभिमान बाळगता तो दुसऱ्या घराण्याचा!

५०१ - (चढ्या स्वरात) - मी आपल्या घराण्याचा का अभिमान बाळगू! केवळ १६७ आणि ३ होते म्हणून मी मूळ संख्या (प्राईम नंबर) होता होता वाचलो! बाकी सगळा भाव मिळतो तो ५०० ला! 

५०१ ने आपल्या मनातील खंत बोलुन दाखविली.  मूळ संख्या वगैरे संज्ञा ऐकून जोशीबुवांनी आपला संताप आवरता घेतला. 

जोशीबुवा - ह्यावर एकच उपाय आहे! 
५०१ - (आशा पल्लवित होऊन) - कोणता? कोणता?? लवकर सांगा!
जोशीबुवा - नाशकाला मला सोबत घेऊन चला! चांगली ग्रहशांती करू! चांगली ग्रहशांती झाली की सरकारला सद्बुद्धी सुचेल आणि हा निर्णय ते मागं घेतील!

५०१ - (खुशीनं) नशीब माझं! देवाच्या कृपेनं अजुनही चांगली माणसं ह्या दुनियेत अस्तित्वात आहेत! नाहीतर ती सरकारमधील माणसं! ५०० मीटरपर्यंत दारूची दुकानं नसली म्हणून काय लोकं १ किमी आत जाऊन दारू पिऊन रस्त्यावर यायची थांबणार का? आणि वाहनचालकाचा परवाना देण्यासाठी योग्य परीक्षा घ्या म्हणावं! मंद गतीनं जाणाऱ्या जड वाहनांनी डाव्या मार्गिकेतून क्रमण करावं हे जाऊन सांगा म्हणावं! ओव्हरटेक करताना कोणती काळजी घ्यावी हे समजावून सांगा सर्वांना! आपल्या वाहनांचा व्यवस्थित निगराणी करा म्हणावं! ह्या सगळ्या प्रकरणात उगाचच माझी धुतल्या ... 

धुतल्या शब्दानं जोशीबुवांच्या मुद्रेवरील बदललेले भाव बघताच ५०१ ने आपलं बोलणं आवरतं घेतलं!

५०१ - चला निघतो मी! 

ही घ्या दक्षिणा असं म्हणत ५०१ ने ५०० ची करकरीत नोट आणि एका रुपयाचं नाणं जोशीबुवांच्या हाती ठेवलं ! 

५०१ दक्षिणा पाहून जोशीबुवा अगदी प्रसन्न झाले होते. 

जोशीबुवा - बघा मिस्टर ५०१! शुभकार्यासाठी तुम्ही तुमचीच निवड केली की नाही ! आणि हो उद्या महामार्गावर सोमरसपान करुन वाहन हाकणाऱ्या चालकास पकडल्यास तो स्वतःची सुटका करून घ्यायला मात्र कसला वापर करणार! ५०० चे नोटेचाच ना!  

जोशीबुवांचं हे वाक्य ऐकताच मात्र ५०१ अगदी प्रसन्न मुद्रेनं आपल्या परतीच्या मार्गाला निघाला !

सोमवार, ३ एप्रिल, २०१७

हँडवॉश



प्रत्यक्षातील सामाजिक जीवनात लोकसंपर्कापासून दुरावलेली जनता इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे होणाऱ्या मेंदूसंभ्रमाची शिकार होण्याची शक्यता वाढीस लागते. मेंदूसंभ्रम करण्यासाठी विविध कंपन्या स्त्रिया आणि लहान मुलं ह्यांना आपलं लक्ष बनवतात. डासांपासून संरक्षण, झटपट बनणारे खाद्यपदार्थ, हातांची स्वच्छता, घरबसल्या उपलब्ध असणारे मुलांच्या करमणुकीचे पर्याय ह्यासाठी चांगले खासे पारंपरिक उपाय उपलब्ध असताना केवळ आपली उत्पादनं खपवायची म्हणुन दृक, ध्वनी अशा विविध माध्यमांतुन चुकीच्या संदेशांचा मारा केला जातो. एक सुखी कुटुंबाच्या चित्रात हे सर्व घटक आवश्यकच आहेत असा हळुहळू बालकांचा आणि काही प्रौढांचा समज होऊ लागतो. 

ह्या संभ्रमापासुन वाचविण्यासाठी काही घटकांचं अस्तित्व आवश्यक असतं. उदाहरणार्थ तुमचा कॉमनसेन्स, तुमचा जनसंपर्क, तुमच्या ज्ञानाविषयी तुमची असणारी खात्री आणि समुहासोबत वाहत जाण्याच्या इच्छेला थोपवून धरण्याचं तुमचं मनोबल! 
कॉमनसेन्स  - अर्थात बुद्धी ताळ्यावर असणं. सार्वजनिक  माध्यमातून जी काही जाहिरात आपणासमोर प्रदर्शित होते तिचं लक्ष्य समाजातील केवळ १० टक्के लोक असुन त्यात आपण नाही आहोत असा समज तुम्ही स्वतःपाशी बाळगा! बरंचसं काम साध्य होईल! 
तुमचा समाजातील जनसंपर्क दांडगा असल्यास तुम्ही जाहिरातीला बळी पडण्याची शक्यता कमी होते. ही मंडळी पारंपरिक दृष्टिकोन चांगल्या प्रकारे जोपासतात. 
तुमच्या ज्ञानाविषयी तुमची असणारी खात्री आणि समुहासोबत वाहत 
जाण्याच्या इच्छेला थोपवून धरण्याचं तुमचं मनोबल हे सुद्धा महत्वाचे घटक!

ह्या पोस्टचं कारण काय तर म्हणे हँडवॉशने सतत हात स्वच्छ करत राहणं हे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं तितकसं चांगलं नाही हे नव्यानं प्रकाशित झालेलं संशोधन! अत्यंत योग्य असं संशोधन! 

होतंय काय की मुलांशी पालकांचा कमी होत चाललेला संपर्क ह्या जाहिरातदारांच्या फायद्याचा ठरतोय. एखादी चुकीची गोष्ट सतत सांगितली की ती बरोबर वाटू लागते त्याचप्रमाणं ह्या जाहिरातदारांनी अशा अनेक चुकीच्या गोष्टीचं ब्रेनवॉशिंग (मेंदूसंभ्रम) आपल्या मुलांवर केला आहे. ही मुलं ज्यावेळी पुढे जाऊन पालक बनतील त्यावेळी हँडवॉश, पिझ्झा, डोरेमॉन, ह्या गोष्टीचे स्वतः पुरस्कर्ते बनतील. हे सर्व सरसकट संपुर्ण समाजात घडत आहे असं मी म्हणत नाही. अजुनही बराचसा सुजाण पालकवर्ग अस्तित्वात आहे. पण ह्यातील बराचसा सामाजिक जीवनात सक्रिय नाही आणि त्यामुळं सोशल मीडियावर मात्र मेंदूसंभ्रम करणाऱ्या लोकांची चलती सुरु आहे. 

जाता जाता मुलं कार्टून बघतात म्हणून स्वतःचं व्हाट्सअँप चेक करता करता तक्रार करण्याऐवजी एक साधा पत्त्यांचा कॅट विकत आणा आणि मुलांबरोबर मेंढीकोट, सात-आठ असे प्राथमिक खेळ खेळा. किमान एक आठवडा तरी डोरेमॉन तुमच्या घरी फिरकणार नाही! 

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...