ऐकायला काहीसं आश्चर्यकारक वाटेल पण अमेरिकेत अधिकृतरीत्या निवृत्तीचे वय नाही. पण तुम्हांला जर सोशल सेक्युरिटीचे फायदे मिळण्यासाठी पात्र ठरायचे असेल तर ६२, ६५, ६६ वगैरे वर्षे महत्वाची ठरतात. पोस्टची सुरुवात ह्या विषयाने करण्याचं कारण की अमेरिकेतील जीवनशैलीच्या सरासरी उच्च आकडेवारीनुसार माणसं साठीनंतर सुद्धा मानसिकदृष्ट्या सक्षम राहतात आणि त्यामुळं ती व्यावसायिकदृष्ट्या / सामाजिकदृष्ट्या सक्रिय राहणं पसंत करतात.
अवतीभोवती इतक्या समस्या असताना देखील भारतात सुद्धा एका विशिष्ट गटाचे राहणीमान हळुहळू सुधारत आहे. हा गट बौद्धिक, सामाजिकदृष्ट्या अगदी सक्रिय आहे आणि स्वतःची योग्य काळजी घेण्याच्या दृष्टिकोनामुळं पुढील अनेक वर्ष सक्रिय राहील ह्यात तिळमात्र शंका नाही. ही झाली चांगली बाजू! आता दुसरी बाजू. अमेरिकेत माणसं आपल्याला एखादा चांगला छंद लावून घेतात. जंगलात फिरणं, पर्वतांवर कूच करणं वगैरे वगैरे! आपल्याकडे सुद्धा ह्या बाबतीत हल्ली चांगली प्रगती दिसुन येत आहे. ह्या सर्वांमागे एक अदृश्य, न बोलला जाणारा हेतू असतो. एखाद्या देशातील, क्षेत्रातील मुख्य बौद्धिक, आर्थिक घडामोड ज्या ठिकाणी होत असते तिथं तरुणाईनं कब्जा केलेला असतो. ह्या मुख्य कंपुत जेष्ठांना सामावुन घेण्याची मर्यादित भुक असते. केवळ मोजक्या जेष्ठांना ह्यात वाव असतो बाकीचे जण ह्यात हळुहळू डावलले जातात. अजुन एक महत्त्वाचा मुद्दा - वय आणि कार्यालयातील उच्चपद समप्रमाणात असायलाच हवं हा आपल्याकडं असणारा मोठ्या प्रमाणावरील (गैर) समज! आपल्या कुवतीनुसार कायम एखादया मध्यमपदावर राहण्यास मानसिकरीत्या तयार असणारा जेष्ठ विरळाच! कालांतराने ह्या परिस्थितीत नक्कीच फरक होणार!
लेखाचा मुख्य मुद्दा! काही वर्षात ही तांत्रिकदृष्टया, शारीरिक आणि मानसिक सक्षम अशा साठीतील तरुणाईची मोठी फौज आपल्याभोवती अस्तित्वात येणार! त्यावेळी त्यांच्या ह्या सक्रियेतला वाव देणारं एखादं समांतर क्षेत्र एक समाज म्हणून आपल्याला निर्माण करावं लागणार किंवा एक व्यक्ती म्हणुन प्रत्येकानं आपापली सोय करावी लागणार! म्हणायला गेलं तर एक संधी आहे - आपण अजुनही असलेली शहर अधिक कोंबून भरण्याची मानसिकता धरुन आहोत. जर आपण नवीन शहरं निर्माण करण्याचा अथवा गावांकडे परतण्याचा निर्णय घेतला, जिद्द दर्शवली तर अशा विधायक कार्यात ही सक्रिय मंडळी मोठा हातभार लावू शकतील!
ही सर्व चर्चा आमच्या कौटुंबिक WhatsApp गटावरील! तिथं निशांकने म्हटल्याप्रमाणं कदाचित ही फार मोठी समस्या नसेल देखील! पण केवळ आरामदायक खोलीत बसुन असली मोठाली पोस्ट लिहिताना मला मात्र उगाचच ह्या समस्येचं रूप गंभीर वाटत राहणार!
मराठी दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा!