८ नोव्हेंबर नंतर आपल्या सर्वांच्या जीवनात बरीच उलथापालथ झाली. आयुष्यातील अशाश्वततेचा आपण एका अनपेक्षित पातळीवर अनुभव घेतला. ह्या निमित्ताने मनातील विविध विचारांचा हा आढावा!
१> संयम - आपला बराचसा संयम नेहमी प्रवासात खर्ची कामी यायचा. आता आपणास ATM / बँकेच्या रांगेत संयम दाखवावा लागला. पाऊण तास रांगेत उभं राहिल्यानंतर आपल्या आधीच्या माणसाला पैसे मिळावेत आणि आपला क्रमांक येताच ATM ने "संपले रे माझे पैसे! उद्या पुन्हा प्रयत्न कर!" असं म्हणावं हा अनुभव सुद्धा मी घेतला. आपल्यासारखे समदुःखी रांगेत उभे असताना सर्वांचा विचार करुन केवळ एकाच कार्डचा वापर करुन पैसे काढावेत जेणेकरुन रांगेतील अजुन एका माणसाला पैसे मिळु शकतील ही सामाजिक जाणीव काही जणांनी दाखविली तर काहींनी नाही!
ह्या निमित्ताने आपणा सर्वांच्या मनातील अजून एक भयाचं प्रदर्शन झालं ते म्हणजे भारतातील अफाट लोकसंख्येचं भय! आपल्या पिढीचं कसबसं निभावलं; आपल्या पुढील पिढीचं काय होणार हे भय आपल्या सर्वांच्या (किंवा बऱ्याच जणांच्या)मनात आहे. ह्यावर उपाय म्हणुन काहीजण परदेशात स्थलांतरित होतात, बरीचजण पै पै साठवून पुढील पिढीला काही आधार जमा करतात. बऱ्याच वेळा हे भय स्पर्धात्मक पातळीवर कमी पडण्याचं नसतं तर समाजात जो दांडग्या वृत्तीचा प्रभाव वाढीस लागला आहे तो पुढील काही वर्षात कोणतं रूप धारण करेल ह्याविषयीच्या असणाऱ्या साशंकतेमुळं असतं. मध्यमवर्गीय माणसं सेकंड होम करुन आपलं पुढील पिढीच्या भवितव्याच्या साशंकतेबद्दलच आपलं कर्तव्य आटोपतात तर काही हपापलेली माणसं पुढील दहा पिढ्यांना पण पुरून उरेल इतकी संपत्ती गोळा करतात.
नवीन नोटांच्या बाबतीत सुद्धा हेच आढळलं! मला समजा भाजीवाली, कामवाली ह्यांना देण्यासाठी पुढील आठवडाभरासाठी ३ हजार रुपयांची गरज आहे तर ते ३ हजार मिळाल्यावर सुद्धा काहीसं कमी गर्दीचं ATM दिसल्यावर मी पुन्हा रांगेत उभा राहणार! कारण हेच की समजा अचानक ATM काही दिवस बंद पडली तर हे मनातील भय!
२> राष्ट्रीय एकात्मता - एक राष्ट म्हणून आपणास एकत्र आणणारे घटक म्हणजे आपली सेना, क्रिकेटर आणि अधूनमधून केजरी.. ह्या नोटांनी सुद्धा आपणास एक राष्ट्र म्हणून मोठ्या प्रमाणावर एकत्र आणण्यास हातभार लावला. समाजातील अफाट वेगाने प्रचंड संपत्ती गोळा केलेल्या काही लोकांविषयी सामान्य जनतेच्या मनात राग आहे. आणि अशा लोकांना सध्या अस्तित्वात असणारे कायदे काही करू शकत नाहीत ह्याविषयी प्रचंड संताप आहे. ह्या नोटबंदी प्रकरणाने अशा लोकांना काही प्रमाणात तरी त्रास झाला असावा अशी सामान्यांची समजूत आहे आणि त्यामुळं आपल्याला त्रास झाला तरी चालेल पण ह्या निर्णयाला पाठिंबा द्यायला हवा ही मनोवृत्ती बऱ्याच प्रमाणात आढळून येते.
३> नवीन तंत्रज्ञान - आमच्या वसईत चिन्मय गवाणकर आणि तरुण पिढी काही सामाजिक संस्थांमार्फत सामाजिक उपक्रम राबवित असतात. नोटबंदी ही एक सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याची संधी म्हणून ह्या गटानं 'डिजिटल वसई' हा उपक्रम वसईत राबवू घातला आहे. ह्या उपक्रमाअंतर्गत आपल्या दुकानात कॅशलेस / डिजिटल पद्धतीनं पेमेंट कसं स्वीकारायचं ह्या विषयी वसईभरातील दुकानदारांना मार्गदर्शन केलं जाणार आहे! अत्यंत कौतुकास्पद असा हा उपक्रम आहे!
शेवटी एक सारांश - आपल्या जीवनावर अनिष्ट परिणाम करु शकण्याची क्षमता असणारे काही घटक (अफाट लोकसंख्या, भविष्यातील नोकरीधंद्यांची अशाश्वतता, कोलमडू शकणारी वाहतूक व्यवस्था) सभोवताली अस्तित्वात आहेत. पण त्या सर्वांकडे दुर्लक्ष करुन आपण आपलं जीवन एका परिपूर्ण चित्राप्रमाणं चाललंय असं समजून जगत असतो. हयातील कोणताही घटक केव्हातरी आपला हिसका दाखवणारच! त्यामुळं त्यावेळी आपला संयम दाखवणं, बदल घडवू पाहणाऱ्या सामाजिक उपक्रमांना आपल्यापरीनं प्रोत्साहन देणं ह्या गोष्टीतरी किमान आपण करु शकतो!