मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, २३ मार्च, २०१६

Substance Vs Style

ऑफिसात एका चर्चेत हा विषय निघाला. उच्चपदस्थ व्यक्तीकडे कोणती गोष्ट असणे महत्त्वाचे आहे Substance (अर्थात सखोल ज्ञान ) की Style (भुरळ घालणारे व्यक्तिमत्व). अर्थात बऱ्याच उत्तराचा ओघ दोन्ही गोष्टी असायला हव्यात असाच होता. 

हल्लीच व्यावसायिक जीवन म्हणा की वैयक्तिक जीवन! प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाला अनेक कंगोरे असणं आवश्यक बनलं आहे. कारण आपल्या जीवनात ज्या ज्या लोकांशी संपर्क येतो त्या सर्वांशी चांगल्या वागणुकीची एक विशिष्ट पातळी ठेवणं आवश्यक आहे. नाहीतर होतं काय की लोक तुम्हांला तोंडावर काही बोलत नाहीत पण हळुहळू तुम्हांला ते टाळत जातात आणि मग तुम्ही मागे पडत जातात. पुर्वी असं नव्हतं. एखादा विद्वान माणुस सर्वांशी किंवा अगदी आपल्या पत्नीशी सुद्धा तुसडेपणाने वागला तरी ते खपुन जायचं किंबहुना जितका माणुस जास्त विद्वान तितका तो जास्त तऱ्हेवाईकपणे वागणार अशीच लोकांची अप्रत्यक्ष समजुत होती. 

क्षणभर पुन्हा व्यावसायिक जीवनाकडे! एका उच्चपदस्थ व्यवस्थापकाकडे substance आणि style ह्या दोघांच्या किमान पातळ्या असणं आवश्यक असतं. उदाहरण म्हणायचं झालं तर समजा ज्ञानाची आणि व्यक्तिमत्त्वाची कमाल पातळी १०० टक्के असेल तर कोणताही माणुस एक उच्चपदस्थ बनण्यासाठी त्याच्याकडे ह्या दोन्ही गोष्टींच्या किमान ७० टक्के पातळ्या असाव्यात. म्हणजे एखादा माणुस substance वर ७२ आणि style वर ७५ टक्के असेल तर तो चालुन जाईल. पण १०० टक्के substance आणि ५० टक्के style वाला चालणार नाही किंवा १०० टक्के style आणि ६० टक्के substance वाला सुद्धा चालणार नाही.  इथे लक्षात घ्या की ७० टक्के हा आकडा मी उदाहरण म्हणुन घेतला. प्रत्यक्ष जीवनात विशिष्ट भुमिकेनुसर हे प्रमाण बदलत राहतं. एका वर्षभरात ज्या विविध प्रसंगाला एखाद्या भुमिकेतील उच्चपदस्थ व्यक्तिमत्त्वाला तोंड द्यावं लागतं त्यानुसारह्या दोन्ही गुणधर्मांच प्रमाण बदलत राहतं. आणि ह्या भुमिकेच्या वर असलेलं व्यवस्थापक मंडळ हे प्रमाण ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं. 

व्यावसायिक जीवनात शिरणारा माणुस सुरुवातीला ह्या दोन्ही घटकांचं नैसर्गिक मिश्रण घेऊन येतो. ह्या जीवनात तग धरण्यासाठी मग तो आपल्या क्षमतेनुसार आपल्या व्यक्तिमत्त्वात बदल घडवून आणून ह्या दोन्ही गुणधर्मांचे हवं तितकं मिश्रण आणण्याचा कसोशीनं प्रयत्न करतो. पण एका विशिष्ट क्षणी ह्यातील एका गुणधर्माची तो त्याला शक्य असलेली कमाल मर्यादा गाठतो, मग त्याने Glass Ceiling गाठलं असं आपण म्हणु शकतो. 

शेवट वैयक्तिक किंवा सार्वजनिक जीवनाकडे! एक समाज म्हणून आपण Style ला अवास्तव महत्त्व देऊ लागलो आहोत असं वाटावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आधुनिक घरं, महागड्या गाड्या, आकर्षक व्यक्तिमत्त्व, रुबाबदार बोलणं ह्या सर्व गोष्टीच्या मोहापायी आपण मुळ पायाला म्हणजेच substance अर्थात ज्ञानाला एक समाज म्हणुन दुय्यम स्थान देऊ लागलो आहोत. त्यामुळेच एक समाज म्हणुन आपण कितवर पुढे जाऊ ह्याचं Glass Ceiling आपण लवकरच गाठु असं भय मला वाटू लागलं आहे.

शनिवार, १९ मार्च, २०१६

परीक्षेचे दिवस !


सालाबादप्रमाणे सध्या परीक्षेचे दिवस सुरु आहेत. आणि नेहमीप्रमाणे सध्याच्या चुका लक्षात घेता पुढील वर्षी कसा सुधारित पद्धतीने अभ्यास करायचा ह्याची जोरदार चर्चा घरोघरी सुरु असेल. त्या निमित्तानं आजची ही पोस्ट! 

सर्वसाधारण परीक्षा देणारा विद्यार्थी विचारात घेता त्या घटनेमध्ये खालील घटक येतात

१> ज्ञानस्त्रोत
ह्यात पुस्तके आणि नोटस (वह्या) ह्यांचा समावेश होतो.
पुस्तकांमध्ये परीक्षेच्या दृष्टीने १०० टक्के ज्ञान असते. नोटस मध्ये पुस्तकांतील महत्त्वाचा भाग समाविष्ट केला गेला असतो

साध्या परीक्षांमध्ये नोटसच्या आधारे पुर्ण गुण मिळवता येतात. पण जसजशी परीक्षांची क्लिष्टता वाढत जाते तसतसे पुर्ण गुण मिळविण्यासाठी पुस्तकांचे वाचन अपरिहार्य बनतं.  
 
२> ज्ञानस्त्रोत ते मेंदु हा प्रवास 
वर्षभर विद्यार्थी अभ्यास करत असतात. त्यावेळी ज्ञानस्त्रोतातील माहिती मेंदूत साठवली जाण्याची प्रक्रिया चालु राहते. काही माहिती जशीच्या तशी साठविता येते जसे की महाराष्ट्राची राजधानी मुंबई. ह्यामध्ये मेंदूला ज्ञानस्त्रोतील माहितीचे पृथ्थकरण करण्याची आवशक्यता नसते. परंतु एखादं गणिती प्रमेय समजावून घेताना त्यामागील तत्व सुद्धा मेंदूत साठवावं लागतं

आमचे शाळेतील राऊत सर आम्हांला उदाहरणे देऊन सांगायचे की हा मुलगा एकपाठी आहे. म्हणजे ज्ञानस्त्रोतील कोणतीही माहिती एकदा वाचली की त्याच्या मेंदूत कायमची स्थिरावते. पण अशी काही उदाहरणे सोडली तर बहुतेकांना ज्ञानस्त्रोतील माहितेचे दोन तीन वेळा वाचन केल्याशिवाय ती त्यांच्या मेंदूत स्थिरावत नाही

३> मेंदूमध्ये ज्ञानाची साठवण 

मेंदुमध्ये ज्ञान कसे साठविलं जातं ह्याविषयी अनेक शास्त्रीय सिद्धांत असतीलआणि मी त्याविषयी अनभिज्ञ आहे. पण संगणक माहिती कशी साठवतो ह्याविषयी गुगल केले असता अगदी पहिल्या फटक्यात अशी माहिती सापडते

The data transfers from disk -> main memory (RAM)(temporary storage) -> CPU cache (smaller temporary storage near the CPU for frequently accessed data) -> CPU (processing). The CPU cache is a smaller, faster memory space which stores copies of the data from the most recently used main memory locations.Mar 31, 2014

तसंच काहीसं आपण मेंदुविषयी म्हणु शकतो. ज्यावेळी आपण वर्षभर अभ्यास करीत असतो त्यावेळी माहिती डिस्कवर साठवली जाते
  
४> परीक्षेच्या दिवशी / आदल्या दिवशी केला जाणारा अभ्यास 
जेव्हा आपण परीक्षेच्या दिवशी / आदल्या दिवशी अभ्यास करतो त्यावेळी आपण ही माहिती RAM किंवा मेन मेमरीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो

समजा आपल्याला आदल्या दिवशी अभ्यासच न करता पेपरला बसविलं किंवा आपण परीक्षेला दुसऱ्याच विषयाचा अभ्यास करून गेलो असु तर 
तर आपणास डिस्कवरील माहितीवर अवलंबुन राहावं लागेल. आणि मग आपल्या गुणांवर विपरीत परिणाम होईल.

वर्षभर अभ्यास करताना, ह्या आदल्या दिवसाच्या आपल्या धोरणाविषयी सुद्धा नियोजन करणे आवश्यक असतं. समजा सकाळचा पेपर असेल तर रात्री झोपण्याआधी बहुतांशी सर्व अभ्यासक्रमाची उजळणी करणे आवश्यक असते. काहींना रात्री जागुन अभ्यास करणे झेपतं तर काहींना सकाळी उठून! आपल्याला आपली शक्तीस्थाने माहिती हवीत!


> प्रश्नपत्रिका आणि उत्तर देण्याची प्रक्रिया

प्रश्नपत्रिका आपल्या हातात येते. पहिला प्रश्न आपल्या मेंदुरुपी संगणकाकडे इनपुट म्हणुन येतो. घटक ४ च्या (तात्कालिक अभ्या) जोरावर आपण प्रामुख्याने मेन मेमरीमधील माहिती वापरून प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करतो. उत्तर लिहिताना सर्व माहिती CPU cache मध्ये आणुन आपण उत्तरे लिहित असतो

बुजुर्ग लोक सल्ला देतात की ज्या प्रश्नांची उत्तरे हमखास माहित आहेत ते प्रश्न प्रथम सोडवावेत. हमखास माहित आहेत ह्याचा अर्थ असतो की ज्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या मेन मेमरीमध्ये आहेत असे प्रश्न. समजा आपण प्रथम आदल्या दिवशी न वाचलेल्या धड्यांवरील प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला तर आपण डिस्कवरील माहिती मिळविण्याचा प्रयत्न करतो. आणि असा प्रयत्न करताना मेन मेमरीतील माहितीपर्यंत पोहोचण्याचा आपला मार्ग काहीसा धुसर होऊ शकतो

ज्यावेळी आपण एक विशिष्ट प्रश्न सोडविण्यास घेतो त्यावेळी तो प्रश्न आपल्या मेंदूकडे इनपुट म्हणुन पोहोचतो. आपला मेंदू ह्या प्रश्नाचे विश्लेषण करून मग त्याचे ढोबळमानाने खालील तीन प्रकारात वर्गीकरण करतो.

> प्रथम प्रकार - ह्यात प्रश्नाचे उत्तर आपल्या मेन मेमरीमध्ये एका जागी एकत्र स्वरुपात साठविलेले असते. महाराष्ट्रात घेतली जाणारी खरीप पिके कोणती? हा ह्या प्रकारातील एक प्रश्न. इथं मेंदू साठविलेल्या त्या विशिष्ट जागी जाऊन ते उत्तर मिळवितो आणि मग आपल्या हातांशी समन्वय साधुन त्याचे उत्तर उत्तरपत्रिकेवर लिहुन घेतो

> द्वितीय प्रकार - हा प्रकार सुद्धा म्हणायला गेला तर सरळधोपट. प्रश्नांचे उत्तर सोपे असते पण ते वेगवेगळ्या ठिकाणी साठविलेले असते. मेंदुला ह्या विविध ठिकाणी जाऊन ह्या प्रश्नासंबंधित माहिती मिळवावी लागते आणि मग त्याचे संकलन करुन ते एकत्रित स्वरुपात उत्तरपत्रिकेवर लिहुन घ्यावे लागते

समजा प्रश्न असा असेल की भारतातील विविध राज्यांतील प्रमुख उद्योगधंदे कोणते? आता समजा पुस्तकात प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळा धडा असेल तर आपणास आपल्या मेंदूतील प्रत्येक राज्याची माहिती साठविलेल्या भागापर्यंत पोहोचावे लागेल आणि मग त्याचे संकलन करुन उत्तर द्यावे लागेल. तरीही इथे आपला मेंदू फक्त माहितीचे संकलन करतो , एखादा विशिष्ट निर्णय मात्र त्याला ह्या कालावधीत घ्यायचा नसतो

> तिसरा प्रकार

इथं आपल्या मेंदुला उपलब्ध माहितीचे विश्लेषण करुन आपलं मत नोंदवायचं असतं. उदाहरणे खालील प्रमाणे 

  • एखादी घटना प्रश्नपत्रिकेत दिलेली असते आणि त्या घटनेच्या संदर्भात त्यातील एखाद्या व्यक्तिरेखेने कसं वागलं पाहिजे ह्यावर मत नोंदविणे. 
  •  एखादी व्यावसायिक जगातील requirement देऊन त्यावर उत्तर म्हणुन एखादी आज्ञावली बनविण्यास सांगणे.   
ह्या असल्या प्रकारात मेंदुचा विश्लेषणाचा कप्पा जागृत करावा लागतो. प्रत्येक मेंदुची जी क्षमता असते त्यानुसार मग प्रश्नाचे विश्लेषण करुन उत्तर बनविलं जातं आणि उत्तरपत्रिकेवर नोंदवलं जातं
पहिल्या दोन प्रकारात उत्तर लिहण्याची सुरुवात करतानाच उत्तराचं अंतिम रूप आपल्या मेंदुत तयार असतं तर तिसऱ्या प्रकारात उत्तर लिहित असतानाच मेंदू ते विकसित करत जातो

येत असलेले सर्व प्रश्न सोडवुन झाल्यावर आपण मग प्रथम कटाक्षात ज्यांची उत्तरे माहित नाहीत अशा प्रश्नांकडे वळतो. अशा वेळी मेंदू डिस्कवरील माहितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. जर समजा येत असलेले सर्व प्रश्नांची आपण अगदी मनासारखी उत्तरे दिली असतील तर मग डिस्कवरील माहितीपर्यंत पोहोचण्याची आपली क्षमता अगदी फॉर्मात असते आणि मग अशा वेळी ह्या प्रश्नांची आपण उत्तर देण्याची शक्यता वाढीस लागते. अर्थात अशा प्रश्नांना उत्तरे देण्यात आपला अधिक वेळ जातो कारण माहिती डिस्कवर असते

सर्व प्रश्न आटोपले आणि वेळ बाकी असेल तर मग आपण उत्तरपत्रिका चेक करावयास लागतो. ह्यावेळी मेंदू आपण माहिती व्यवस्थित मिळवुन कागदावर उतरविली आहे की नाही आणि आपण जे विश्लेषण केलंय त्याची वैधता तपासून पाहतो


> सराव पेपरांचे महत्व

दहावी बारावी सारख्या महत्वाच्या परीक्षांच्या वेळी आपण सराव परीक्षा देण्यावर भर देतो. ह्यावेळी प्रामुख्याने आपण आपल्या मेंदुच्या मेन मेमरी आणि डिस्कवरील माहितीपर्यंत पोहोचण्याच्या वेगाची, विश्लेषण क्षमतेची आणि उत्तरे उत्तरपत्रिकेवर उतरवुन पाहण्याच्या क्षमतेची चाचपणी करत असतो

त्याचबरोबर कोणत्या धड्यांना जास्त महत्त्व द्यावे, कोणत्या प्रकारचे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत, सर्वच प्रश्न compulsory आहेत की काही optional आहेत ह्याची माहिती मिळते. काही धडे नाही केले तरी चालू शकते का हे ही समजते

एखाद्या विषयाचा अभ्यास करताना त्यात आपलं गुणांचं वास्तववादी लक्ष्य किती आहे हे माहित असणं सुद्धा महत्त्वाचं

> उत्तरपत्रिका तपासणी  - परीक्षक
जर प्रश्नपत्रिका बहुतांशी वर उल्लेखलेल्या प्रकार १ आणि २ पद्धतीच्या प्रश्नांनी भरलेली असेल तर परीक्षक हा घटक गौण ठरतो. पण तिसऱ्या प्रकारच्या प्रश्नांमध्ये आपण दिलेलं उत्तर हे इनपुट म्हणून परीक्षकाच्या मेंदूपर्यंत पोहोचत असतं. परीक्षकाने आधीच बहुतांशी प्रश्नांची आदर्श उत्तरे आपल्या मेंदूत ठरवून ठेवलेली असतात. हे उत्तरांचे इनपुट आलं की मग तो त्या आदर्श उत्तरांशी त्याची तुलना करतो. आदर्श उत्तरापेक्षा वेगळ्या धाटणीच्या उत्तराकडे किती मोकळेपणाने हा परीक्षक पाहु शकतो ह्यावर तुमचं भवितव्य अवलंबुन असतं

विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाचे एक विशिष्ट तंत्र असते. अभियांत्रिकी शाखेत ज्याने आदल्या दिवशी नाईट मारली नाही असा विद्यार्थी मिळणे कठीण! ह्यावेळी डिस्क आणि मेन मेमरीमध्ये माहिती एकाच वेळी साठविली जाते. अशा वेळी परीक्षेच्या ३ तासांच्या कालावधीत झोपेविना असलेल्या आपल्या मेंदूची कार्यक्षमता शाबूत ठेवणे हे एक अधिक आव्हान आपल्यासमोर असते.


ही पोस्ट थोडी लांबली. उद्देश एकच पुढील वर्षी अभ्यास करताना डिस्कमध्ये डेटा भरताना आदल्या दिवशी मेन मेमरीत कसा आणाल ह्याचा आणि पेपर चालु असताना कसे वागाल ह्याचा सुद्धा काही प्रमाणात अभ्यास करून ठेवा!

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...