मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

मंगळवार, २६ जानेवारी, २०१६

स्नेहसंमेलन गाथा !!

१९८८ साली दहावी उत्तीर्ण झालेली आमची न्यु इंग्लिश स्कुलची बॅच! २००८ साली विशाल पाटीलच्या अथक प्रयत्नाने आम्ही पुन्हा एकदा एकत्र जमलो. थोडथोडके नव्हे तर जवळपास ६५ - ७०! त्यामुळे उत्साहित होत आम्ही दरवर्षी २६ जानेवारी रोजी भेटण्याचं आम्ही निश्चित केलं. 

२००९ साली आम्ही आमच्या आवडत्या शिक्षकांचा गौरव करण्याचं आम्ही ठरविलं. त्यावेळी साधारणतः आम्ही ४० -४५ आणि जवळपास ४० गुरुजन ह्यांच्या सोबतीनं एक हृदयस्पर्शी सोहळा झाला. 

का कोणास ठाऊक, पण २०१० सालापासुन मात्र स्नेहसंमेलनास हजर राहणाऱ्या आमच्या सहविद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची घट होत गेली. आणि सध्या ही संख्या साधारणतः वीसच्या आसपास स्थिरावली आहे.  आज २६ जानेवारी २०१६. आमच्या बॅचचे २६ किंवा २५ जानेवारीस होणारं सलग ९ वे स्नेहसंमेलन! बाजुच्याच वर्गात १९८३ बॅचने सुद्धा आज स्नेहसंमेलन आयोजित केलं होतं. तिथं जवळपास ७० जण उपस्थित होते आणि वर्ग अगदी गजबजून गेला होता. 

गप्पांच्या ओघात विषय निघाला २००८ ते २०१६ एक आढावा! जवळपास वीस वर्षांनी उत्साहाने एकत्र आलेली मंडळी पुन्हा का दुरावली? त्यातील चर्चेतील काही मुद्दे आणि काही माझे विचार!

१> आमच्या बॅचने दरवर्षी केवळ शाळेतच भेटण्याचा निर्णय घेतला होता. केवळ गेल्या वर्षी एक बदल म्हणून तो मोडला गेला. पण दरवर्षी ह्या एकाच मार्गाने भेटण्यात बहुदा काही मंडळींना रस नसावा अशी शक्यता आता वाटू लागली आहे. 

२> आज स्नेहसंमेलनाच्या दरम्यान आमच्या सर्वांचे आवडते भिडे सर आले. त्यांना मुख्याध्यापकांच्या प्रशिक्षण शिबिरात जायचं असल्याने ते अगदी घाईत होते पण तरीही त्यांनी आमच्यासाठी काही मिनिटे वेळ काढला. बोलता बोलता त्यांनी एक लाखमोलाचा सल्ला दिला. तुम्ही इतक्या नित्यनेमानं एकत्र येता तर मग काहीतरी विधायक कार्यात गुंतवून घ्या. ह्या बाबतीत त्यांचं उदाहरण आदर्श म्हणुन समोर ठेवण्यासारखं आहे. सहकारी बँक, देवालय, शिक्षण संस्था ह्या सर्वात त्यांनी स्वतःला निवृत्तीनंतर गेली बारा वर्षे गुंतवून ठेवलं आहे. गुंतवून ठेवलं आहे म्हणण्यापेक्षा त्यात त्यांनी अत्यंत मोलाचं असं कार्य पार पाडलं आहे. 

३> विधायक कार्याचं म्हणाल तर आमच्या बॅचने तशी सुरुवात केली होती ती शाळेसाठी निधी गोळा करून. पण शाळेच्या ज्या इमारतीसाठी हा निधी गोळा केला त्या इमारतीला वापरात येण्यासाठी उशीर झाल्यानं हा निधी काही वर्षं पडून राहिला. आणि त्यामुळं काहीजण दुखावले गेले. मग शेवटी न्यू इंग्लिश स्कुल माजी विद्यार्थी महासंघ आमच्या मदतीस धावून आला. प्राथमिक शाळेच्या वर्गाचे नुतनीकरण, शाळेसाठी संगणक अशा विधायक कार्यासाठी हा निधी वापरण्याची त्यांनी आम्हांला संधी उपलब्ध करुन दिली. पण काहीजण जे मुख्य प्रवाहातून बाजूला झाले ते कायमचेच! 
ह्यात एक बाब लक्षात घेण्याजोगी! जवळच्या मित्रांत, नातेवाईकांमध्ये समजा काही कारणास्तव गैरसमज झाला तर तो उघडपणे त्या व्यक्तीसमोर बोलुन दाखवून त्या गैरसमजाचा चर्चेने सामंजस्यपणे तोडगा काढण्याच्या पद्धतीचा आपल्या समाजात बहुतांशी अभावच दिसतो. 

४> मध्यंतरी लोकसत्तेत लेख वाचला होता. ह्या स्नेहसंमेलनात मोठ्या उत्साहाने हजेरी लावलेल्या पण नंतर पुन्हा इतक्या वर्षानंतरसुद्धा पुन्हा त्याच मुलांनी सर्व घडामोडींचा ताबा घेतल्याने नाराज झालेल्या एका माजी विद्यार्थ्याचे ते मनोगत होते. बहुतांशी माजी विद्यार्थ्यांसाठी ह्या आठवणी रम्य असतात पण त्यातील काहीसा नावडता भाग जर प्रामुख्याने पुन्हा एकदा समोर येणार असेल तर मात्र लोकांना अशा प्रसंगापासून दूरच राहावंस वाटू शकतं. कमी झालेल्या उपस्थितीमागे हे असले काही कारण असू शकेल का?

सर्व घडामोडींचा ताबा घ्यायची कोणाची इच्छा असल्यास त्याने स्वतःहून पुढे यावं ही विनंती!

५> हल्ली सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाने प्रत्यक्ष भेटणं किंवा फोनवर बोलणं सुद्धा कमी झालं आहे. त्यामुळे २००८ साली प्रत्यक्ष घरी जाऊन केली गेलेली आमंत्रण आता whatsapp वरील मेसेजवरून होतात किंवा फेसबुकाच्या एका इवेंटवर भागविली जातात. दुसऱ्यांना आमंत्रण करताना स्वीकारार्ह असलेली पद्धती आपल्याला आमंत्रण करताना मात्र बहुदा आपल्याला पसंत नसते. 

६> शालेय जीवनात साधी असणारी सर्वांची आयुष्य कायमची तशी राहत नाहीत. काहींच्या वैयक्तिक आयुष्यात खूप व्यग्रता येऊ शकते किंवा त्यांना अनेक अडी अडचणींचा मुकाबला करावा लागत असू शकतो. त्यामुळे शाळेच्या स्नेहसंमेलनाला हजर राहणे हे नक्कीच त्यांच्या प्राधान्य क्रमात नसणार! कदाचित मनात दाट इच्छा असुन देखील!

> अजुन एक मुद्दा! आपण शालेय जीवनानंतर अनेक मित्र जोडतो. कलेची, एखाद्या खेळाची, वाचनाची आवड, किंवा एखादा छंद आपणा सर्वांना एकत्र जोडतो. ह्या मित्रांना आपण बऱ्याच वेळा भेटत असतो तो ह्या एका बंधाच्या ओढीने! पण कधीकधी शालेय मित्रांना एकत्र जोडणारा बंध केवळ बालपणातील शाळेच्या आठवणी इतकाच राहतो आणि त्यामुळे  ही वार्षिक भेट  प्राधान्यक्रमात मागे ढकलली जाते

आज चर्चेअंती काही बदल करून पाहण्याचा निर्णय आम्ही घेतला. केळव्याला सहकुटुंब सहल हा त्यातला एक निर्णय! जे वर्गमित्र काही वर्षे पुन्हा दुरावले आहेत त्यांना पुन्हा संपर्कात ठेवण्याचा निर्धार काहींनी व्यक्त केला. 

आशावादी अशा ह्या मित्रांना भेटून नक्कीच बरं वाटलं. समस्या कोणाला चुकल्या नाहीत की कोणालाही आयुष्य परिपुर्ण बनवता आलं नाही, पण सद्यस्थितीत सुधारणा करण्याची इच्छा बाळगणाऱ्या आणि सतत प्रयत्नशील राहणाऱ्या आपल्या बालमित्रांच्या संगतीत वर्षातील काही तास व्यतीत करणं केव्हाही उचित आहे! 

इति स्नेह संमेलन गाथायाम नव अध्यायम संपूर्णम!!

शनिवार, १६ जानेवारी, २०१६

आवर्तन - भाग २



गावाच्या वेशीपर्यंत आलेल्या समस्त गावकरी लोकांकडे अजेयाने स्थिर नजर टाकली. एक मोठा दीर्घ श्वास टाकला आणि मोठ्या स्वरात "येतो मी" म्हणत त्याने गावकऱ्यांचा निरोप घेतला. 
काही वेळातच दाट जंगलाचा रस्ता सुरु झाला होता. जंगलात शिरण्याआधी त्याने एक वेळा ज्योतीची दिशा आपल्या मेंदूत घट्ट नोंदवुन ठेवली होती. आता रस्त्याच्या खुणा सुद्धा अगदी विरळ होत चालल्या होत्या. पाठीशी लावलेल्या अनेक शस्त्रांपैकी एक योग्य ते शस्त्र घेत त्याने त्या घनदाट जंगलातून मार्ग काढण्याचा आपला प्रयत्न चालू ठेवला होता. अचानक त्याला मागे पडलेल्या पालापाचोळ्यातून पावलांचा आवाज ऐकू आला. एव्हाना तो अगदी सावध झाला होता. ह्या इतक्या दाट जंगलात पावलांचा आवाज येताच तो काहीसा आश्चर्यचकित झाला. त्याने मोठ्या शिताफीने एका झाडामागे दडला. मिनिटभरातच मागून एक मनुष्याकृती येताना त्याला दिसली. बहुदा अजेयाची चाहूल न लागत असल्याने ती आकृती विचारात पडली होती आणि तिच्या चालण्याचा वेग मंदावला होता. 
ही व्यक्ती आपल्या मागावर आहे असा पक्का ग्रह अजेयाने करुन घेतला होता. त्यामुळे आपण दडलेल्या झाडाच्या जवळ ती व्यक्ती येताच अजेयाने शिताफीने त्या व्यक्तीस जमिनीवर लोळवले आणि त्या व्यक्तीच्या उराशी आपला भाला टेकवून "कोण आहेस तू ? आणि माझा पिच्छा का करीत आहेस?" असे मोठ्या क्रोधाने विचारलं. त्या व्यक्तीचा पेहराव जरी पुरुषाचा असला तरी अजेयाला त्या व्यक्तीने आतापर्यंत केलेल्या प्रतिकारावरून काहीतरी गडबड जाणवली होती. 
"मी मैथिली आहे, अजेया!" भाल्याचे टोकापासून कशीबशी आपली सुटका करून घेत ती म्हणाली. 
"तू आणि इथे?" मोठ्या आश्चर्याने अजेयाने विचारलं. "तुला माझ्यासोबत येण्यास परवानगी कोणी दिली?" 
"कोणाची परवानगी'घेण्याची मला गरज वाटली नाही! इतक्या अज्ञात संकटाने भरलेल्या मार्गाने तु एकटा जाणार आणि तुझ्या सोबतीला तुझी मदत करायला कोणीच नसणार हा विचार मला काही पटला नाही!" मैथिली ठाम स्वरात म्हणाली. 
"मी ज्या मार्गावरून चाललो आहे ती एक मोठी तपस्या आहे. तिथं मला कोणतीही लक्ष विचलित करणारी प्रलोभनं नको आहेत!" अजेय काहीशा नाराजीच्या स्वरात म्हणाला. 
"तुझी तुझ्या ध्येयावरील श्रद्धा अटल असेल तर कोणतेही प्रलोभन तुला विचलित करू शकणार नाही! बाह्यजगतातील घटकांवर आपलं यश अपयश अवलंबून आहे असे मानणाऱ्या सामान्य जनांपैकी तू नाहीयेस ह्याची मला ठाम खात्री आहे!" मैथिली एका दमात म्हणाली. 
त्या दोघांचं हे बौद्धिक बराच काळ टिकलं होतं. शेवटी तू माझ्या पुढे न जाता मागेच चालत राहायचं आणि जोवर तू संकटात सापडत नाहीस तोवर माझ्या नजरेस पडायचं नाही ह्या अटीवर अजेयाने तिचं त्याच्या सोबत येणं मान्य केलं. 

प्रवास अधिकाधिक खडतर होत चालला होता. दाट जंगल आणि तीव्र चढ ह्यामुळे वेगाने अंतर कापण्यास कठीण जात होतं. मध्ये अचानक काहीसा विरळ जंगलाचा भाग आला. त्यावेळी अजेयाच्या डोक्यात एक विचार आला, त्यानं झाडावर सरसर चढून पाहिलं. प्रवास ज्योतीच्या दिशेने योग्यच चालला होता. अधुनमधून पावलांच्या आवाजाने अजेय मैथिलीची चाहूल घेत असे. जंगलातील खाण्यायोग्य फळांचाच काय तो पोटासाठी आधार होता. त्यातली काही फळे मागे ठेवण्याची तो काळजी घेत असे.

दिवसांची गणती करण्यात फारसा मतलब नव्हता. दिवाकर आकाशात असला की त्या जंगलातील अंधार काहीसा कमी होई इतकंच! एके दिवशी असाच प्रवास चालू असताना अचानक नदीच्या पाण्याचा खळखळ आवाज अजेयाच्या कानी पडला. ह्या आवाजाने त्याच्या चित्तवृत्ती उल्हसित झाल्या. धावतच तो त्या आवाजाच्या दिशेने धावला. त्या थंडगार पाण्यात आपलं अंग झोकून देताना त्याला झालेल्या आनंदाला सीमा नव्हती. त्यात मनसोक्त डुंबत असताना अचानक त्याच्यावर एक जोरदार पंज्याचा घाव पडला. त्या घावाने आपला तोल गमावुन बसलेला अजेय पाण्यात खोलवर ढकलला गेला. पण काही क्षणातच त्याने स्वतःला सावरलं. त्या हिंस्त्र सिंहाशी त्याचा आता जोरदार मुकाबला सुरु झाला होता. आपल्या विशाल बाहूंनी त्या वनराजाला अजेयाने घट्ट जखडून ठेवलं होतं. तरीही त्या वनराजाने आपल्या तीक्ष्ण दातांनी त्याच्या बाहूंवर खोलवर घाव केले. अजेयाला हा मुकाबला क्षणाक्षणाला कठीण जाऊ लागला होता. अचानक हवेतून उड्डाण करीत आलेल्या एका मनुष्याकृतीने सिंहाच्या पाठीवर भाल्याचा एक जीवघेणा घाव केला. आणि त्यानंतर मात्र अजेयाने त्या वनराजावर बाजी पालटवली. काही वेळातच त्या वनराजाचा निष्प्राण देह पाण्यात तरंगू लागला होता. 
पुढील कित्येक दिवस अजेयाचा नियम मैथिलीला मोडावा लागला. वनराजाने केलेल्या घावाच्या जखमा खुप खोलवर होत्या. मनोभावे केलेल्या सेवेमुळे त्या लवकरच भरल्या गेल्या. हवाई हल्ल्याने आपल्याला वाचवणाऱ्या मैथिलीचे आभार कसं मानायचं ह्याचा काही काळ अजेयाने विचार केला, पण बहुदा उत्तर न सापडल्याने त्याने तो विचार सोडून दिला. कदा त्या जखमांतून सावरुन गेल्यावर मात्र अजेय पुन्हा पुर्वीच्याच जोमाने मार्गक्रमणास लागला. आणि आपल्या नियमाची सुद्धा तितक्याच कठोरपणे अंमलबजावणी करून!

अधिक उंची गाठल्याने वातावरणात थंडावा वाढला होता. अजेयवर त्याचा कसलाही परिणाम झाला नसला तरी मैथिलीला मात्र ही बोचरी थंडी जाणवू लागली होती. त्यावर तिच्याकडे उपाय होता म्हणा. वृक्षांच्या दाट पर्णांची खास वस्त्रे बनवुन तिने आपलं रक्षण करुन घेतलं होतं. मार्गात आता काहीसा बदल जाणवु लागला होता. जंगल काहीसं विरळ होऊ लागलं होतं. आणि एका वळणावर अचानक दृश्य अचानक पालटलं. अचानक एक रम्य नगरीचा नजारा अजेयासमोर आला. इतक्या उंचावर इतकी आखीव रेखीव नगरी पाहुन अजेयाला आश्चर्य वाटलं. तो त्या नगराच्या दिशेने कुच करण्याचा विचार करीत काही पावलं पुढे जातो इतक्यात आकाशातून उड्डाण करीत काही सैनिक त्याच्या दिशेने येताना त्याला दिसले. अजेयाने सुद्धा काही काळ त्यांना आपल्या उड्डाणकलेचा प्रताप दाखविला. त्या सैनिकांना आपल्याला पकडणं कठीण जाणार हे अजेय समजुन चुकला होता. शेवटी त्याने थकल्याचे नाटक करीत त्यांच्या ताब्यात जाणं पसंत केलं

"ओ हो आतापर्यंत शतकातून केवळ एकदाच ह्या जमातीच्या माणसांचं आपल्याला दर्शन होत असे. आता गेल्या वीस वर्षातील हा दुसरा!" एका दिमाखदार सिंहासनावर बसलेल्या राजाच्या बाजुला बसलेली एक वयोवृद्ध स्त्री आपल्या किरक्या स्वरात उच्चारली. "ही बहुदा राजमाता असावी" अजेयाने मनात ग्रह बांधला. राजा मात्र गंभीर मुद्रेत बसला होता. ह्यांची आणि आपली भाषा एकच आहे ह्याचा मनातल्या मनात अजेयाला आनंद झाला. दरबाराचा थाट अगदी शाही होता. सुवर्णाने बनलेलं सिंहासन अगदी झळाळून दिसत होतं. दरबारात जागोजागी हिऱ्यांनी जडलेली झुंबरं छताला टांगलेली दिसत होती. राजाच्या बाजूला बसलेली खाशी मंडळी आपल्या चषकातील द्रवाचे प्राशन करण्यात मग्न होती. ह्या सर्वांचं अगदी बारकाईने निरीक्षण करण्यात गुंतलेल्या अजेयाच्या नजरेतुन राजाने आपल्या उजव्या बाजूच्या खास मंत्र्याला केलेली खुण सुटली नाही

काही क्षणांतच दरबारात हवेत गिरक्या घेत काही सैनिक आले. आणि त्यांच्यासोबत मग सरकत्या खुर्च्यांवर बसुन वेगाने येणारी काही वयोवृद्ध मंडळी त्याला दिसली. त्यांना बघताच अजेय दचकलाच. ही वयोवृद्ध मंडळी निःशंकपणे त्याच्या जमातीतील होती. गावाच्या मध्यभागी असलेल्या प्रार्थनेच्या ठिकाणी लावलेल्या रेखीव चित्रात त्यातील काही चेहरे पाहिल्याचे त्याला स्मरत होते. "म्हणजे ज्योतीच्या शोधात गेलेल्या ह्या आपल्या पुर्वजांची मजल ह्या नगरीच्या पुढे गेलीच नाही म्हणायची!" मनातल्या मनात अजेयाने विचार केला

काही क्षणांतच ह्या मंडळींनी अजेयाला घेरलं. आपल्या ज्ञातीची पारंपारिक प्रार्थना ऐकुन अजेय काहीसा भावुक झाला. मग त्यातील सर्वात वयोवृद्ध गृहस्थाने अजेयाचा हात हाती घेतला. आता साऱ्या दरबाराचे लक्ष त्या दोघांकडे लागुन राहिलं होतं
"हे सिरीनगरीच्या नवयुवका! ह्या वैभवशाली सुवर्णनगरीत तुझे स्वागत असो! मित्रांसाठी अपरंपार मैत्री आणि शत्रुंसाठी अनंत शत्रुत्व देणाऱ्या ह्या नगरीतील लोकांसोबत कोणतं नातं जोडायची तुझी इच्छा आहे हे तु ह्या सर्वांसमोर स्पष्ट करावं अशी आमची इच्छा आहे. केवळ तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगतो की तुझ्याप्रमाणे आम्हांला सुद्धा हा निर्णय घ्यायची वेळ आली होती आणि आम्ही ह्या नगरीचे मित्र बनण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्या निर्णयाची गेली चारशे वर्षे तरी मला अजिबात खंत करावी लागली नाही!" 
त्याचे इतके जोरदार भाषण ऐकून अजेय खचितच प्रभावित झाला होता. म्हणजे त्याच्या चारशे वर्षे वयाच्या उल्लेखाने! क्षणभर विचारात पडलेल्या त्याला पाहुन तो वयोवृद्ध माणूस पुन्हा त्याला आठवण करता देता झाला
 "आपला निर्णय तु त्वरितच ह्या दरबारी लोकांना सांगावास असे मला वाटत आहे!" 

"हे सिरीनगरीच्या ज्ञानी पितामहा!" अजेयाची ही प्रस्तावना त्या वृद्ध माणसास फारशी आवडली नसल्याचं त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं
"मी पुर्वी जरी सिरीनगरीचा रहिवासी असलो तरी मला आता सुवर्णनगरीचा नागरिक म्हणूनच संबोधिलेल आवडेल!" त्या वृद्ध माणसाने त्याला जाणीव करून दिली
"ठीक आहे! तर मला इतक्या घाईघाईने निर्णय घेण्यास जमणार नाही!" खंबीर स्वरात अजेय उदगारला  
"तुला निर्णय आताच घ्यावा लागेल!" राजाच्या बाजुला बसलेला त्याचा प्रधान क्रुद्ध स्वरात ओरडला
"मग माझा निर्णय नाही असाच असेल!" अजेयाने सुद्धा आपला खंबीर बाणा दर्शविला
"पकडा ह्या उद्धट युवकाला!" प्रधान राग अनावर होत म्हणाला
आपल्या अंगावर येणाऱ्या सैनिकांच्या समाचारासाठी अजेयने मानसिक तयारी केलीच होती. त्याने आपले बाहु इतके फुगविले की त्याचे बंध जोरात उन्मळुन पडले. एक हवेत उंच उडी मारत त्याने काहीशा कमकुवत दिसणाऱ्या सैनिकाच्या हातातील भाला आपल्या ताब्यात घेतला आणि आपल्या रक्षणार्थ त्या भाल्याचा वापर करीत त्याने विविध दिशेने आपल्या अंगावर चालुन येणाऱ्या सैनिकांना चुकवत दरबाराबाहेर झेप घेतली
(क्रमशः)

शुक्रवार, १५ जानेवारी, २०१६

आवर्तन - भाग १

(प्रस्तावना - गूढ कथेचा हा प्रयत्न! ही कथा मानवी इतिहासातील कोणत्या ज्ञात काळात घडली हे शोधण्याचा प्रयत्न करू नये. कथेचं शीर्षक, त्यातील घटना ह्यांची संगती लावण्याचा प्रयत्न करू नये. ही आहे एक मुक्त कथा! जर चांगली भट्टी जमली तर पूर्ण करीन नाहीतर … )


वर्षानुवर्षे चाललेला आपला शिरस्ता कायम ठेवत अप्रमेया स्नान आटपून अंगणात आली. वयानुसार क्षीण होत चाललेल्या आपल्या नजरेला अजून ताण देत तिनं दुरवरच्या डोंगरावर नजर टाकली. अचानक तिच्या डोळ्यात जोरदार चमक भरली. त्या दुरवरच्या महाकाय पर्वतावर एक मिणमिणती ज्योत पेटलेली तिच्या अधु नजरेस दिसली. "अजेया ! अजेया " तिच्या ह्या तीव्र स्वरातील हाकेनं तिचा तरुण नातु धावतच अंगणात आला. तिच्या थरथरत्या हातांनी दर्शविलेल्या दिशेने त्याने पाहिलं आणि तो ही स्तब्ध झाला. 

दूरवरच्या त्या महाकाय पर्वतावर ज्योत पेटली जाणे ही काही साधीसुधी घटना नव्हती. गेली कित्येक सहस्त्र वर्षे ह्या समुहाने त्याची प्रतीक्षा केली होती. दर शतकात ह्या समुहातील सर्वात साहसी युवकाची ह्या कामासाठी निवड केली जाई आणि त्याला मोठ्या आशेने सन्मानपुर्वक निरोप दिला जाई.  पण इतक्या सहस्त्र वर्षांत ना ह्यातील एकही साहसी वीर परतला होता ना ज्योत पेटली गेली होती. गेल्या वीस वर्षांपूर्वी अप्रमेयाचा थोरला मुलगा कपाली ह्याने ज्ञातीतील सर्व युवकांचा नायक म्हणून अनेक काठीण्यपातळीच्या परीक्षेनंतर स्थान मिळविले होते आणि प्रथेनुसार तो त्या ज्योतीच्या शोधार्थ निघाला होता. आपल्या मुलाच्या विरहाचे हे दुःख अप्रमेयाने गेली कित्येक वर्षे उराशी बाळगलं होतं. मनी एकच आस बाळगली होती, आपला पुत्र इतिहासात अजरामर व्हावा. आज ही आस पूर्ण झाली होती. 

अजेयाने एव्हाना आपला पिता मेधराज ह्यास ह्या घटनेविषयी सुचित केलं होतं. थोड्याच वेळात ही बातमी पुर्ण गावभर झाली होती. गावाच्या मध्यभागी असणाऱ्या मैदानात सर्व गावकरी जमा झाले होते. गावात सर्वात वयस्क असणारे जांबुवंत ह्यांच्या सभोवताली सर्वजण जमा झाले होते. मुखियाने शंख जांबुवंत ह्यांच्या हाती दिला. जांबुवंतांनी आकाशाकडे रोखून पाहिलं सुर्य अजुनही माथ्यावर आला नव्हता. काही क्षणांनंतर त्यांनी जोराने शंख फुंकिला. शंखाचा असला नाद गावकऱ्यांनी आजवर कधीही ऐकला नव्हता. अचानक आकाशात पक्षांची दाटी झाली. विविधरंगी, विविध आकाराचे पक्षी मुक्त विहार करू लागले. त्यातील काही प्रकारचे पक्षी तर गावकऱ्यांनी आपल्या आयुष्यात पुर्वी कधी पाहिले सुद्धा नव्हते. आतापर्यंत मंदगतीने संचार करणारे मेघ आता वेगाने संक्रमण करू लागले होते. सुर्याला झाकोळून टाकण्याचा त्यांचा इरादा स्पष्ट होता. अप्रमेयाची नजर त्या ढगांमधील एका मोकळ्या जागेत गेली. तिथून तिला स्वर्गलोकाचे स्पष्ट दर्शन होत होते. संदेश स्पष्ट होता. लहानपणापासुन ऐकलेली ही गोष्ट खोटी नव्हती तर! तिचं पृथ्वीवरील वास्तव्य संपत आल्याचा हा इशारा होता. 

ह्या एकंदरीत प्रकाराने सर्वांच्या मनात क्षणभर एक अनामिक भिती दाटली होती. अजेयाला मात्र हृदयात एका उत्स्फुर्त भावनेनं उचंबळून आलं होतं. जांबुवंत आपली तीक्ष्ण नजर सर्व गावकऱ्यांवर फिरवीत होते. सर्वांच्या नजरा भयाने जमिनीकडे झुकल्या होत्या. एकच धाडसी युवक त्यांच्याकडे पाहण्याचं धारिष्ट्य दाखवू शकत होता आणि तो म्हणजे अजेय! जांबुवंतांनी आपली नजर अजेयाच्या नजरेशी भिडविली. बराच वेळ ही नजरबंदी चालू होती. शेवटी जांबुवंतांना आपली नजर झुकवावी लागली. आपल्या पराजयात ह्या समूहाचे हित आहे ह्या भावनेनं प्रसन्न होत त्यांनी शंख पुन्हा हाती घेतला. आताच्या शंखनादाने मात्र सर्व काही प्रसन्न होऊन गेलं. भयप्रद पक्षी, काळे मेघ आकाशातून गायब झाले. 

"कपालीच्या स्वागतासाठी समुहातर्फे अजेया त्याच्या मार्गावर जाईल!" जांबुवंतांच्या ह्या घोषणेने प्रफुल्लित होत समूहाने चित्कार केला. अनेक पक्षी अजेयाच्या माथ्यावर येऊन नृत्य करू लागले. समुहातील काही  व्यक्ती मात्र ह्या घोषणेवर नाराज होत्या. त्यात एक होती अजेयाची आई अनुप्रिता आणि दुसरी म्हणजे एक युवती मैथिली! ह्या छोट्या वस्तीला एका दाट जंगलाने व्यापलेलं होतं. ह्या वस्तीपलीकडे कसं जग आहे ह्याची जाणीव कोणालाच नव्हती. हे सारं खरं असलं तरी ह्या समुहातील प्रत्येकाला त्या दूरवरच्या ज्योतीने आकर्षित केलं होतं. त्या ज्योतीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग संकटाने भरलेला आहे ह्याची जाणीव प्रत्येकाला होती. त्यामुळेच कपालीविषयीच्या अभिमानाने प्रत्येकाचा ऊर भरून आला होता. पण आपल्या इतक्या प्रिय अजेयाला पुन्हा त्या संकटात टाकण्याच्या कल्पनेने त्या दोघींच्या अंगावर काटा उभा राहिला होता. 

(क्रमशः)

सोमवार, ११ जानेवारी, २०१६

नटसम्राट - एक सामाजिक शिकवण!!




काल संध्याकाळी नटसम्राट हा एक उत्तम चित्रपट पाहिला. मला हा चित्रपट पाहण्यासाठी प्रोत्साहित करणारा माझा मेव्हणा स्वप्निल सावेचे खास आभार! स्वप्निलला मराठी संस्कृतीची उत्तम जाण आहे आणि मराठी संस्कृतीच्या जोपासनेसाठी तो आपल्या परीने शक्य ते प्रयत्न करत असतो.  

ह्या चित्रपटाचे विश्लेषण करण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे गणपत आप्पा बेलवलकर ह्यांच्या व्यक्तीरेखेचे आणि ह्या चित्रपटातून मांडल्या गेलेल्या कथेचे विश्लेषण आणि दुसरा म्हणजे ह्या नाटकातील / चित्रपटातील कथेतून आपणास कोणता सामाजिक बोध घेता येईल ह्याविषयीचे विश्लेषण! मी इथे दुसरा मार्ग स्वीकारतो आहे. पुढे कधी ह्या नाटकाच्या मूळ संहितेचे सखोल वाचन केलं तर पहिला मार्ग स्वीकारायचा प्रयत्न करीन. 

आप्पा बेलवलकर नाटक ह्या व्यवसायातून व्यवस्थित अर्थाजन करून व्यावसायिक जीवनाच्या एका टप्प्यावर निवृत्तीचा निर्णय घेतात. हा निर्णय घेताना आपण अंतर्मनाने समोर प्रेक्षकात पाहू शकणाऱ्या दिग्गजांचे समाधान आता करू शकत नाही आहोत किंवा त्यांना अभिनयाच्या नवीन खोलीपर्यंत पोहोचवू शकत नाही आहोत म्हणून हा निर्णय अशी भावना असते. 

आपलं राहते घर मुलाच्या नावे आणि आर्थिक गुंतवणूक मुलीच्या नावे करुन ते आर्थिक जबाबदारीतून मोकळे होण्याचा प्रयत्न करतात. सुरुवातीला सुरळीत चाललेल्या संसारात मग हळूहळू छोट्या मोठ्या कुरबुरींना सुरुवात होते. आपल्या नातीला मायेचा लळा लावणाऱ्या आप्पांची आपल्या मूळ स्वभावाला, सवयींना बदलत्या काळानुसार नवीन वळण लावण्याची तयारी नसते. तोंडी येणारे अपशब्द, दारूचे व्यसन, नातीला स्नेहसंमेलनात लावणी करायला लावणे ह्या प्रकारांनी मुलगा आणि सून अप्पांवर नाराज होत राहतात. 

ही काही केवळ आप्पांच्या घरातील कहाणी नाही; ही आपल्या समाजाची प्रातिनिधिक कहाणी म्हणता येईल. दोन पिढ्या एका घरात नांदत असतात. एका पिढीचे व्यावसायिक जीवन संपून गेलं असतं आणि ती आता निवृत्तीजीवन जगत असते आणि त्यामुळे जीवनात काहीसा मोकळेपणा आलेला असतो, प्रत्येक गोष्ट अगदी गांभीर्याने घ्यायला नको असा काहीसा दृष्टीकोन विकसित झालेला असतो. ह्याउलट दुसरी पिढी व्यावसायिक जीवनात सक्रिय असते. तिथे अनुभवायला लागणारा No Non-sense दृष्टीकोन घरीसुद्धा बऱ्याच प्रमाणात आणण्याची त्यांची मनोवृत्ती असते. खास करून घरातील सून आपल्या नवीन पिढीला बाह्यजगासाठी सक्षम बनविण्यासाठी झटत असते. आणि त्यामुळे जुन्या पिढीने दिलेली काहीशी वेगळ्या पठडीतील शिकवणुक तिला बऱ्याच अंशी खटकत असते. 

मुद्दा सामंजस्याचा आहे. आजोबा आजी घरात नातवंडांना भावनिक सुरक्षिततेची जाणीव करुन देत असतात. जुन्या काळच्या मुल्यांची कळत नकळत शिकवण देत असतात. पण त्यांच्या काही गोष्टी नवीन काळाला अनुसरून नसतात. 
नवीन पिढी वरवर पाहायला गेलं तर काहीशी उद्धट आणि अगदी व्यावहारिक दृष्टीकोन बाळगणारी आणि स्वार्थी वाटू शकते. पण ह्यामागे ह्या पिढीची बाह्यजगात वावरण्यासाठी आपल्या नवीन पिढीला तयार करण्याची धडपड असू शकते. 
हे दोन दृष्टीकोन बाळगणारी दोन पिढ्यांची माणसे एका घरात वावरताना खटके उडण्याचे प्रसंग तर येणारच. पण हे प्रसंग किती झटपट विसरून आपण पुन्हा एकत्र नांदू शकतो हे महत्वाचे. आपल्या समाजात पुर्वीपासून मोडेन पण वाकणार नाही ही मनोवृत्ती आढळते. तीच काही प्रमाणात आपला घात करते.

बेलवलकरांचा आपल्या मुलांविषयीचा दृष्टीकोन काहीसा पूर्वग्रहदुषित वाटतो. मुलीचे लग्न झालं की ती मनाने परकी झाली असा समज त्यांनी आधीपासूनच करून घेतला आहे. आपल्या मुलाला फारसं स्वतंत्र व्यक्तिमत्व नाही असा त्यांचा समज विविध प्रसंगातून दिसतो. मुलगा आणि नंतर मुलगी ह्यांच्याशी एकदा गैरसमज झाल्यावर परत चर्चा करण्याची त्यांची तयारी दिसत नाही. 
आता मुलांच्या बाजूने! आपल्या वडिलांनी संपत्तीची सोय करून दिली असली तरी मुलाला आपल्या बायकोच्या आपलं मुल कसं वाढवायचं आहे ह्याच्या अपेक्षांना तोंड द्यावासा वाटतंय. मुलीला आपल्या नवऱ्याच्या कारकिर्दीची आपल्या वडिलांच्या बेजबाबदार बोलण्याने हानी होणार नाही ह्याची चिंता आहे. पण ह्या दोघांनीही वडिलांशी एकत्रपणे एकांतात बोलून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित चित्र वेगळं दिसू शकलं असतं. एका क्षणी सुनील बर्वे म्हणतो "म्हातारपण म्हणजे एक दुसरं बालपण असतं!" त्यावेळी मृण्मयी अगदी समर्पक वाक्य बोलते "पण मी त्यांच्यासाठी आई कोठून आणू!" पूर्वी म्हातारपणी स्त्रिया काही प्रमाणात ही आईची भुमिका बजावत पण हल्ली हे प्रमाण कमी होत चाललं आहे. 

एक निरीक्षण! बरीच माणसे आपल्या माणसांवर प्रेम किंवा द्वेष अगदी टोकाचं करतात. पण काळ बदलत चालला आहे. आपल्याला भावनिक संतुलन गाठीत ह्या दोन भावनांमधील सुवर्णमध्य साधता आला पाहिजे. आणि हो अजून एक! घरातील जवळच्या माणसाशी संवादकला साधता येणे ह्याचे संस्कार करण्याची मोठी गरज आपल्या समाजात आहे. बरीचशी नाती केवळ संवादाच्या अभावाने मोडताना आपण पाहतो. 

हे ह्या चित्रपटाचे खरं परीक्षण नव्हे! पण आपण सर्वांनी हा चित्रपट पाहावा तो आपल्या कुटुंबासाठी आपण ह्या चित्रपटाद्वारे कोणती शिकवण घेऊ शकतो ह्या उद्देश्याने! आणि ह्या पोस्ट्चा सुद्धा तोच उद्देश!

नाना पाटेकर आणि विक्रम गोखले ह्यांचा अभिनय लाजबाब! त्यांच्या अभिनयाविषयी अधिक बोलण्याची माझी पात्रता नाही. पण मराठीतील ह्या दोघा दिग्गजांना आणि बाकीच्या आघाडीच्या कलाकारांना एकत्र आणून एक यादगार कलाकृती बनविणाऱ्या महेश मांजरेकरांचे कौतुक करावे तितके थोडके! मला भावला तो सुनील बर्वेचा अभिनय आणि त्याची व्यक्तिरेखा! आजच्या समाजात वाढत्या प्रमाणात दिसणाऱ्या समंजस पुरुषवर्गाचे त्याने उत्तम प्रतिनिधित्व केलं असं मला वाटून गेलं! 

मंगळवार, ५ जानेवारी, २०१६

लग्नसमारंभ आणि पेहेराव!

यंदा लग्नाचा सणकून मोसम होता. २३ नोव्हेंबर पासून ते ३ जानेवारीपर्यंत एकंदरीत ९ - १० लग्नांची, वाङ्निश्चय, मुहूर्ताची अशा बऱ्याच कार्यक्रमांची  निमंत्रणे होती. आमच्या लग्नानंतर पत्नीने सुरुवातीला काही प्रयत्न करून पाहिले. म्हणजे मी शेरवानी, कुर्ता आणि तत्सम वर्गातील पेहेराव घालावा, लग्नात फेटा घालावा वगैरे वगैरे! ह्या विषयावर बरीच चर्चा, बौद्धिक वगैरे झालं आणि मग शेवटी तिने हात टेकले. हा माणूस काही बदलायचा नाही ही गोष्ट ती मग समजून चुकली. 

तिने माझ्या पेहेरावाकडे लक्ष देणे सोडून दिल्यावर मी मोकळा सुटलो. काळ्या ते निळ्या ह्या रंगांना समाविष्ट करून त्यामधील कोणत्याही शेडची एक पँट आणि जो ऑफिसला चालू शकेल असा एक शर्ट हाच लग्नाचा पोशाख हे माझ्या मनानं ठरवून टाकलं. मागच्या वर्षीपर्यंत हे सर्व खपून गेलं, पण यंदाच्या वर्षी अनेक समारंभ एका मागोमाग आल्याने थोडी पंचाईत झाली. 

स्त्रिया हिशोब ठेवण्यात कितपत चोख असतात ह्याविषयी मी काही भाष्य करू इच्छित नाही कारण हा स्फोटक विषय होऊ शकतो. पण कोणत्या लग्न समारंभात आपण कोणती साडी नेसली हे त्यांना बऱ्यापैकी आठवत असतं. काहींना तर दुसऱ्यांनी सुद्धा कोणती साडी नेसली हे सुद्धा आठवतं. त्यामुळे कोणत्याही दोन लग्नात जर साधारणतः सारखा पाहुणावर्ग अपेक्षित असेल तर साडी रिपीट करण्याची पद्धत त्यांच्यात नसते. बाकी लग्नाच्या मोसमात टेलरने शेवटच्या दिवसापर्यंत कपडे न शिवणे किंवा ऐन लग्नसमारंभात कपडे आणून देणे असले प्रकार स्त्रियांच्या बाबतीत होत असताना मी पाहिलं आहे, त्यामुळे एका तासात एकाच दुकानातून चार पाच शर्ट घेण्याच्या माझ्या क्षमतेबद्दल मी आदर बाळगून आहे!!

पुन्हा वळूयात माझ्याकडे! तर एका महिन्यात इतके सततचे समारंभ आल्याने मी थोडा चिंतेत पडलो. साधारणतः लाईट निळा, प्लेन किंवा थोडा चेक्सचा शर्ट असेल तर तो दोन तीन लग्नात घातला तरी लोकांच्या नजरेत भरत नाही असा माझा अनुभव! पण यंदाच्या दिवाळीतील खरेदीत, किंवा भाऊबीजेत भेट मिळालेले काही शर्ट्स अगदी नजरेत भरण्यासारखे होते. त्यामुळे ते कितीही चांगले असले तरीही ते परत घालण्याचे धारिष्ट्य माझ्यानं झालं नाही.  

थोडं गंभीर होऊयात! माझ्यात किंवा माझ्यासारख्या काहीजणांत लग्नसमारंभात मिरविण्याचा उत्साह का नाही? एक तर लोकांनी आपल्याकडे फारसे लक्ष दिलेलं अशा स्वभावाच्या माणसांना नको असते. लग्नसमारंभात हजेरी लावून आपण वयोमानानुसार आपल्यावर पडलेली जबाबदारी पार पाडत असतो अशी प्रामाणिक भावना आमच्या मनात असते. माझं एक अजून गुपित! लग्नातील जेवणाचा मनसोक्त आस्वाद घेण्यासाठी आपण नेहमीच्या सरावाच्या पेहरावात असणे चांगलं असं माझं प्रामाणिक मत! आणि आपण कितीही खर्च केला, कितीही वेळ घालवला तरी आपला पेहराव लोकांच्या ते काही फार काळ लक्षात राहत नाही अशी आमची विचारधारणा! 

माझ्यासारखी लोक लग्न वगैरे समारंभ म्हणजे नेहमीच्या जीवनरगड्यामध्ये येणारे काही थांबे असे मानून जीवन जगतो तर उत्साही लोकांची मात्र नेहमीचं जीवन हे दोन समारंभाच्या मध्ये येणारे वेळ भरण्याचे माध्यम अशी विचारसरणी असते.

बाकी यंदाचा लग्नाचा मोसम बऱ्यापैकी आटोपला आणि मी हुश्य केलं. ह्या आठ -नऊ लग्नात मी किती शर्ट्स वापरली हे एक मोठं गुपित! आता ही शर्ट हळूहळू ऑफिसात वापरायला काढायला हरकत नाही!! ह्या मोसमातील नऊ लग्नातील माझा सर्वात उत्साही चेहरा! 

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...