मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, ३० डिसेंबर, २०१५

भावनाकल्लोळ!

प्रत्येक वर्षाच्या शेवटी मला काहीसं भावनाविवश व्हायला होतं. म्हणजे आयुष्यातील एक वर्ष संपलं, शांततेचा आणि पूर्णत्वाचा शोध सुरूच राहिला. हल्लीचं गडबडीच आयुष्य पाहता भावनाविवश व्हायला सवड मिळणं ही सुद्धा एक चैनच म्हणायला हवी. ही चैन मला ह्या आठवड्यात परवडली. 

आयुष्यात पंचविशी - तिशीपर्यंत कसा अगदी उत्साहपूर्ण काल असतो. आपल्याजवळ आयुष्यात भव्य दिव्य करण्यासाठी अगदी अफाट वेळ आहे अशी भावना मनात व्यापून राहिलेली असते.त्यामुळे एक विशिष्ट मार्गच धरून ठेवायला पाहिजे असला विचार क्वचितच मनात येतो. त्यामुळे ह्या कालावधीत मनाला आवडतील असे निर्णय घेतले जातात. थोड्या कालावधीत एखादा निर्णय न आवडल्यास त्याहून पूर्णपणे वेगळा असा दुसरा निर्णय सुद्धा घेतला जातो. पण त्यानंतर सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत आयुष्याच्या तिशीच्या आसपास किंवा विवाहानंतर काहीसा बदल घडून येतो. माणसाचे प्रथम प्राधान्य हळूहळू स्थैर्याच्या शोधाकडे वळत जातं. काही कलंदर लोक असतात ती आयुष्यभर आपल्या मर्जीने वागत राहतात. 

जगात समस्या अनेक आहेत. मुंबईसारख्या शहरात राहायचं झालं तर बऱ्याच वेळा तुम्हांला सर्व जग हे समस्यांनी भरल्याचा भास होऊ शकतो. आणि मग आपण आपलं आणि आपल्या जीवाभावाच्या माणसांचं आयुष्य सुखमय करण्याचा जो प्रयत्न चालविला आहे त्याला कितपत अर्थ आहे असा विचार मनात येतो. अशा वेळी तुम्ही दोन प्रकारे विचार करू शकता. एक म्हणजे संपूर्ण जगाच्या समस्या मला सोडवायच्या आहेत. किंवा मला फक्त माझ्या समस्यांवर लक्ष केंद्रित करून माझा संसार सुखाने चालवायचा आहे.  ह्यातील कोणतीही एक टोकाची भुमिका घेणं हे चुकीचं! आपली सद्यस्थिती लक्षात घेता त्यानुसार स्वार्थ आणि समाजकारण ह्यात समन्वय साधावा.ज्यावेळी अगदीच असुरक्षित वाटू लागतं तेव्हा फक्त आपल्या संसारावर आणि त्यातील समस्यांवर लक्ष केंद्रित करावं. अशा वेळी समस्या सोडविल्या जाण्याची शक्यता वाढीस लागते. 

हल्ली ऑफिसात सर्वांनाच भन्नाट कामं असतात.  अगदी एका वेळी वेगवेगळी २५ - ३० कामं तुमच्या समोर आ वासून उभी ठाकलेली असतात. प्रत्येक कामाच्या बाबतीत ते आदर्शपणे पूर्ण करण्याची एक पद्धत आपल्या मनात असते. पण बऱ्याच वेळा ते शक्य नसतं आणि त्यामुळे अगदी अंगाशी आलं की ते काम कसबसं पूर्ण करून दिलं जातं. आताशा एक नवीन पद्धत रूढ होत चालली आहे. कामाचा मूळ गाभा कशाही रुपात पूर्ण झाला असो पण अंतिम स्वरुपात ते जेव्हा सादर केलं जातं तेव्हा त्याचं प्रदर्शनी रुप अगदी आकर्षक बनवलं जातं. ह्या आकर्षणीकरणाच्या अट्टाहासापायी मूळ मुद्दा बऱ्याच वेळा गायब गेला जातो किंवा मूळ मुद्द्यात काही ठोस जीव नाही ह्या बाबीपासून यशस्वीपणे लक्ष खेचलं जातं. 

मुलांना आयुष्यात सर्वोत्तम गोष्टी लाभाव्यात म्हणून घरातील आईवडील सतत कष्ट करीत राहतात. म्हटलं तर मराठी समाजाची ही परंपरा आहे. पण जर मी कुटुंबासाठी दीर्घकाळ उपलब्ध राहायला हवा असू आणि ते सुद्धा माझ्या सर्वोत्तम क्षमतेनिशी तर अधुनमधून मलादेखील माझ्या आवडीने फुरसतीचे क्षण मिळाले पाहिजेत ही बाब पालकांनी आपल्या मुलांना सांगायला हवी. हल्लीच्या युगात मुलांमध्ये स्वकेंद्रित दृष्टीकोन निर्माण होण्याची दाट शक्यता असते अशा वेळी त्यांना दुसऱ्यांच्या आवडीनिवडीची, त्यांना आवश्यक असलेल्या "स्पेस" ची योग्य वेळी जाणीव करून द्यायला हवी. 

कॉलेजात असताना खास मित्र म्हणायचा, "कॉलेजात प्रत्येकाला एक तरी आवडती कन्यका असावी! मग अभ्यासात काहीतरी चांगलं करून दाखविण्याचा प्रयत्न केला जातो!". मध्यंतरी बऱ्याच वर्षांनी भेटल्यावर डोळे मिचकावून तो म्हणाला, "कॉलेजात काय अजुनही प्रत्येकाला एक तरी आवडती कन्यका असावी!" ही आठवण सांगायचं कारण म्हणजे आयुष्यात प्रत्येक वेळी आपल्याला भेडसावणारी एक तरी समस्या असतेच. आणि मग त्या समस्येचे रूप कसेही असो आपल्या दृष्टीने ती सर्वात गहन समस्या बनून राहते. त्यामुळे जोवर आपल्या समस्यांकडे तटस्थपणे पाहण्याची क्षमता आपण विकसित करत नाहीत तोवर आपलं काही खरं नाही.आपण स्वतःवर आणि स्वतःच्या प्रतिमेवर खूपच प्रेम करतो आणि तेच आपल्या चिंतेचे मूळ बनून राहते असं मला बऱ्याच वेळी आढळून आलं आहे. एका विशिष्ट मर्यादेपलीकडे गोष्टी गेल्यांस सर्व काही विसरून जावे आणि मस्तपैकी गाणी ऐकत बसावे. 

आमचा समाज सोमवंशीय क्षत्रिय समाज. वसई, विरार, केळवा, माहीम, वाणगाव, चिंचणी, बोर्डी ह्या भागात प्रामुख्याने वास्तव्य करून राहणारा. शेतजमिनेचे काहीसं पाठबळ लाभलेला. आर्थिक स्थिती फारशी श्रीमंतीकडे झुकणारी नसली तरी प्रचंड उत्सवप्रिय आणि बरीच नातीगोती जपणारा! त्यामुळं होतं काय की वर्षातील बराच काळ आमच्या समाजातील लोक समारंभात दंग असतात. लग्नाला दीड दोन हजार लोक उपस्थित असणं ही नित्याची बाब, त्यात आदल्या दिवशी मुहूर्ताला सुद्धा किमान पाचशे लोकांना आमंत्रण. ही आमंत्रण सुद्धा इतकी जोरदार की समजा आमंत्रण करून एखादा उपस्थित राहिला नाही की मग यजमानांचा रोष पत्करावा लागणार. त्यानंतर बारसे वगैरे सुद्धा धुमधडाक्यात करण्याची पद्धत. आता त्यात वाङ्निश्चय ह्या कार्यक्रमाची भर पडली आहे. हा कार्यक्रम सुद्धा जवळजवळ लग्नाइतक्याच धुमधडाक्यात साजरा होतो. ह्या कार्यक्रमात किंवा मुहूर्ताच्या दिवशी रसिक मंडळीसाठी सोमरसपानाची खास सोय करण्याची पद्धत रुजू झाली आहे. आता एकाने केलं की दुसरा करणार आणि मग काही दिवसात ही प्रथा म्हणून रूढ होणार. 

मुळच्या शेतीप्रधान असलेल्या ह्या आमच्या समाजातील मागच्या एक दोन पिढ्यांनी शिक्षणक्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली. पण ह्या प्रगतीचा प्रसार अजून दूरगामी झाला नाही. ज्यांच्यापर्यंत ही शैक्षणिक प्रगती पूर्णपणे पोहोचली नाही त्यांनी सणासमारंभाचा सोस कमी ठेवावा अशी माझी नम्र विनंती!

एकंदरीत शिक्षणावर अवलंबून असणारा मध्यमवर्गीय समाज एका स्थित्यंतरातून जात आहे. म्हटलं तर तसा तो नेहमीच जात असतो असा गेले काही वर्षांचा इतिहास सांगतो. पण हल्ली एक मोठा फरक जाणवू लागला आहे आणि तो म्हणजे समाजातील बहुसंख्य मध्यमवर्गीय जनतेला शाश्वततेची हमी देणारं, दिशा दर्शविणारं नेतृत्व अस्तित्वात नाही. ह्यात मला कोणतही राजकीय विधान करायचं नाहीयं. आपलं जीवन इतकं गतिमान बनलं आहे की कोणालाही पुढील १०-१५ वर्षे मी ह्याच एका क्षेत्रात नोकरीला असेन किंवा मी हाच नोकरीधंदा करत राहीन असे छातीठोकपणे सांगता येत नाही. ह्या अशाश्वततेमुळे लोक हपापलेल्याप्रमाणे पैसा कमावायच्या मागे लागल्याचं दिसतं. ४० -४५ च्या आसपास एखादं पर्यायी क्षेत्र पोटापाण्यासाठी निवडायची वेळ आपणा सर्वांवर येईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ह्या गोष्टीसाठी एक समाज म्हणून आपण तयार आहोत का हा लाखमोलाचा प्रश्न. आणि एखादा चाळीशीतील माणूस पर्यायी व्यवसायाच्या शोधात सहा महिने घरी बसला तर त्याला आपण विविध प्रश्न विचारून सतावणार नाही ह्याची हमी देऊ शकू का?

समाजात अजून एक बाब प्रकर्षाने जाणवते. तंत्रज्ञानाने दैनंदिन जीवन इतकं व्यापून टाकलं आहे आणि ह्या तंत्रज्ञानाशी ज्यांना जुळवून घेता आलं नाही अशा वयोवृद्ध पिढीला त्यामुळे काहीसा न्यूनगंड निर्माण झाला आहे. परंपरेनुसार वयोवृद्ध पिढी तरुण पिढीच्या उत्साही आणि क्वचितच बेतालपणाकडे झुकणाऱ्या वागण्यावर अंकुश ठेवण्याचं काम करीत असे. परंतु काहीसा आत्मविश्वास गमावलेली ही ज्येष्ठ नागरिकांची पिढी तरुण पिढीला काही लगाम घालत नसल्याने तरुण पिढी काही प्रमाणात बेताल सुटली आहे असं काही काळ वाटत होते. परंतु तंत्रज्ञानाचा हा अतिरेक एव्हाना तरुण पिढीतीलच काही लोकांना खटकू लागल्याने तेच हळुहळू ह्याला आवर घालत आहेत असे आशादायी चित्र दिसू लागले आहे. 

इंग्लिश माध्यमातील शाळांचा सर्वत्र प्रसार झाला आहे. वागण्यात, सभाधीटपणात आणि पोशाखाच्या बाबतीत मुलं अधिकाधिक स्मार्ट बनत चालली आहेत. पण गणित, भाषेचे व्याकरण ह्या सारख्या विषयात मातृभाषेत शिकणारी मुले ज्या सहजतेने प्रभुत्व गाजवत असत ते मात्र आज अभावानेच दिसत आहे. 

एखाद्या विषयावर सखोल अभ्यास करून मग आपलं मत बनविणे किंवा मांडणे ह्यात सर्वसामान्य जनता दिवसेंदिवस खूप मागे पडत चालली आहे. त्यामुळे सोशल मीडियातून उपलब्ध झालेल्या वरवरच्या माहितीवरून आपलं मत बनविण्याची वृत्ती वाढीस लागली आहे. आणि त्यामुळे इतिहासातील थोडंसं सत्य घेऊन मग त्याला चकचकीतपणाचा मुलावा देऊन आकर्षक ऐतिहासिक चित्रपट वगैरे बनविण्याचे धाडस हल्ली प्रचलित झालं आहे. 

सोशल मीडियाद्वारे मित्रमंडळी, नातेवाईक लोकांशी सतत संपर्कात राहण्याचं काहीसं दडपण सर्वांवर वाढीस लागलं आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्यात अधूनमधून बरेच व्यत्यय येत राहतात. आणि सखोलपणे एखादा विषय अभ्यासण्याची, एखाद्या पुस्तकाचे, गाण्याचे खोलवर रसग्रहण करण्याची संधी दवडण्याची शक्यता निर्माण होत चालली आहे. 

प्रवासाची आवड समाजात वाढीस लागली आहे ही एक उत्तम गोष्ट झाली आहे. ह्यामुळे जगभरातील उत्तमोत्तम गोष्टी, प्रथा हळूहळू आपल्या समाजात रूढ होण्याची शक्यता वाढीस लागली आहे. 

आहाराविषयी अधिकाधिक लोक जागरूक होत चालले आहेत. आणि दैनंदिन आहारात शाकाहार, पालेभाज्या ह्यांचं प्रमाण वाढीस लागलं आहे. परंतु आठवडाभर दाखविलेली शिस्त समारंभात किंवा साप्ताहिक सुट्टीच्या वेळी बाहेर हॉटेलात जाऊन केलेल्या आहारामुळे वाया जाण्याच्या शक्यता वाढीस लागल्या आहेत. मद्यपानाचे वाढते प्रमाण हा ही एक जबरदस्त चिंतेचा विषय होत चालला आहे. ह्यात काही एक वर्ग असा आहे की जो मद्यपान किती आणि कधी करायचं ह्यावर पूर्ण नियंत्रण ठेऊ शकतो. पण बाकीचे लोक मात्र आपल्या पायावर धोंडा मारून घेत आहेत असंच म्हणावं लागेल.

शांतपणे ब्लॉग पोस्ट्स लिहायची चैन संपली. उद्या सुट्टीचा शेवटचा दिवस! परवापासून नवीन वर्ष आणि कामाच्या व्यापात पुन्हा एकदा गढून जाणं ओघानेच आलं. दरवर्षी जरा स्मार्टपणे काम करण्याचा निर्धार मी करतो जो पहिले काही दिवस टिकतो. ह्या वर्षी तसला काही निर्धार करायचा नाही हाच निर्धार मी केलाय. आदित्य म्हणून जे काही योग्य वाटतंय ते करायचं आणि आयुष्याच्या एका नवीन वर्षाला सामोरं जायचं हाच नववर्षाचा संकल्प!

आपल्या सर्वांना २०१६ वर्ष सुखासमृद्धीचं जावो ही शुभेच्छा! आपण माझ्या ब्लॉगला दिलेल्या उत्साहवर्धक प्रतिक्रियांबद्दल आपले मनःपूर्वक आभार. आपला हा लोभ असाच कायम राहावा ही विनंती! 

सोमवार, २८ डिसेंबर, २०१५

केळीचे सुकले बाग

ह्या आठवड्यात घेतलेल्या सुट्टीत वर्षभरात whatsapp वर जमवलेली मराठी गाणी निवांतपणे ऐकत होतो. काही मराठी गीतांमध्ये रूपकात्मक अलंकार अगदी खुबीने वापरण्यात येत असे. मनातली खंत अगदी साध्या शब्दात सांगितली तर मग ते गीत कसलं? साध्या शब्दात सांगायचं झालं तर माणसाने लेख लिहावा. गीत लिहायचं झालं तर आजुबाजूला असणारा निसर्ग पाहावा. तो तर इतका सर्वव्यापी की आपल्या मनीची खंत त्यातल्या एखाद्या उदाहरणात तर दिसणारच. 

लक्ष वेधून घेणारे पहिलं गीत होतं, केळीचे सुकले बाग! लौकिकार्थाने तरारून वाढ होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व काही गोष्टी मिळून सुद्धा हे केळीचं बाग मात्र सुकत चाललं आहे. त्याला पाणी, सावली देऊन सुद्धा त्याची भरभराट होत नाहीये. 

एखाद्या बाह्यरूपाने सुखी दिसणाऱ्या संसारात अंतर्मनाने दुःखी असणाऱ्या स्त्रीची व्यथा सांगणारं हे गीत आहे हे सांगण्यासाठी कोण्या विद्वानाची गरज नाही. स्त्रीला सुखी ठेवण्यासाठी केवळ तिला घर, पैसा, कपडालत्ता देऊन भागत नाही तर तिच्या मनाला समजून घेणारा साथीदार हवा असा हा ह्या गीताचा आशय! 

ही व्यथा व्यक्त करणारी स्त्री काही वर्षापूर्वीची असावी. केवळ गीत जुने आहे म्हणून मी असे म्हणत नाही, पण मला क्षणभर असं वाटून गेलं. थोडसं मला सुधारून मी असे म्हणतो की अशी स्त्री हल्ली शहरात आढळण्याची शक्यता कमी झाली आहे. काही वर्षे , दशके मागं गेलं की मनीच्या व्यथा मनी बाळगण्यात समाधान मानण्याची मानसिकता बाळगणारा एक वर्ग होता. जसा हा वर्ग स्त्रियांमध्ये होता त्याचप्रमाणे तात्कालीन मराठी मध्यमवर्गसुद्धा हीच मानसिकता बाळगून होता असं माझं मत आहे. 

संसारात स्त्रीची मानसिक घुसट व्हायची कारणं काय असावीत ? ह्यासाठी केवळ तिचा नवरा, तिची सासरची मंडळीच जबाबदार असायची का? ह्यावर थोडा विचारविनिमय करणे हा ह्या पोस्टचा हेतू.
पूर्वीची परिस्थिती पाहता काही मुख्य मुद्दे समोर येतात 
१> अगदी ८० वर्षापूर्वी वगैरे स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जाणं आणि ज्यामुळे तिला आर्थिक स्वावलंबन नसणं. संसारासाठी लागणाऱ्या प्रत्येक रुपयासाठी नवऱ्यापुढे हात पसरावा लागणं. 
२> त्यानंतरच्या काळात शिक्षकी पेशात नोकरी करण्यासाठी जरी स्त्रिया पुढे सरसावल्या तरी स्वतः कमावलेल्या पैशाचा विनियोग कसा करावा ह्याचं स्वातंत्र्य त्यांना नसे. 
३> केवळ आर्थिक स्वातंत्र्य ही एक बाब झाली पण घरात मिळणारी वागणूक, घरात घेतल्या जाणाऱ्या निर्णयात मतप्रदर्शनाचा हक्क ह्या बाबतीत सुद्धा स्त्रियांना फारसा वाव नसे आणि त्यामुळे भरल्या संसारात उपरेपणाची भावना निर्माण होई. 
४> लहानपणी ज्या आवड, छंद जोपासले त्यांच्याशी लग्नानंतर अचानक फारकत घ्यावी लागे. आणि मग आयुष्यभर केवळ ही खंत मनी बाळगावी लागे.
५> आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे नवऱ्याशी भावनिक संवादाचा अभाव! ज्याच्यासोबत अख्खं आयुष्य घालवायचं त्याच्याशी जर संवाद साधता येत नसेल तर मग परिस्थिती कठीणच! आणि बालपणीच्या मैत्रिणी दुरावल्या की आयुष्यात निखळ मैत्रीला सुद्धा वाव कमीच राहणार! 

ही झाली पूर्वीची परिस्थिती. अजूनही गावात ही परिस्थिती असण्याची शक्यता आहे. ह्यात स्त्रीच्या ह्या स्थितीला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीत एक स्त्रीच म्हणजे तिची सासू, लग्न न झालेली नणंद असण्याची शक्यता जास्तच! अजून एक महत्वाचा मुद्दा. संवाद साधून परिस्थिती बदलण्याची जिद्द दाखविण्याचा. ह्या बाबतीत ह्या स्त्रिया काहीशा कमी पडल्या असाव्यात. 

काळ बदलत गेला. आपल्या आईची ही घुसमट पाहत मुली मोठ्या होत गेल्या. मुलींच्या प्रत्येक पिढीनं आपल्याला जमतील तितके बदल घडवत आणले. काहींनी शिक्षण, उद्योग ह्याद्वारे आर्थिक स्वावलंबन प्राप्त केलं. ह्या आर्थिक स्वावलंबनाचा आधार घेत त्यांनी आपल्या कुटुंबात आपलं स्थान निर्माण केलं आणि मग आपली घुसमट थांबवली. 
काहीजणींनी भोवतालच्या परिस्थितीचे नीट निरीक्षण केलं. काळ बदलत चालला होता. एकत्र कुटुंबपद्धती हळूहळू कालबाह्य ठरत चालली होती. राजाराणीचा संसार अस्तित्वात आला होता. इथं ह्या स्त्रियांनी आपल्या नवऱ्याच्या मानसिकतेचा अभ्यास करण्यात वेळ घालवला. त्याच्या दृष्टीने महत्वाच्या गोष्टी कोणत्या, त्याची कमकुवत स्थाने कोणती ह्याचा त्यांनी अचूक वेध घेतला आणि संसारातील आपलं स्थान व्यवस्थित प्रस्थापित केलं. 

पोस्टच्या ह्या वळणावर ज्यामुळे ही पोस्ट सुचली ते हे गीत!

केळीचे सुकले बाग असुनिया पाणी
कोमेजलि कवळी पानं असुनि निगराणी

अशि कुठे लागली आग जळती जसे वारे
कुठे तरी पेटला वणवा, भडके बन सारे

किती दूरचि लागे झळ आंतल्या जीवा
गाभ्यातिल जीवनरस, सुकत ओलावा

किती जरी घातले पाणी, सावली केली
केळीचे सुकले प्राण बघुनि भवताली


पुन्हा विचार करता ह्यात नवऱ्याबरोबर संवादाचा अभाव असल्याने निर्माण झालेल्या खंतीमुळं हे गाणं सुचलं असावं असं वाटून गेलं. 

पुढे गाणी ऐकत गेलो आणि अजून त्याच धर्तीवर अजून एक गीत ऐकायला मिळालं. ह्या गीताचं विवेचन करायला नकोच. सर्व भावना अगदी समर्पकरीत्या मांडण्यात आल्या आहेत.

सर्वस्व तुजला वाहुनी माझ्या घरी मी पाहुणी
सांगू कसे सारे तुला, सांगू कसे रे याहुनी

घरदार येते खावया, नसते स्मृतींना का दया ?
अंधार होतो बोलका वेड्यापिशा स्वप्‍नांतुनी

माझ्या सभोंती घालते माझ्या जगाची भिंत मी
ठरते परि ती काच रे, दिसतोस मजला त्यातुनी

संसार मी करिते मुका दाबून माझा हुंदका
दररोज मी जाते सती आज्ञा तुझी ती मानुनी

वहिवाटलेली वाट ती, मी काटते दररोज रे
अन्‌ प्राक्तनावर रेलते छाती तुझी ती मानुनी


आता पुन्हा एकदा स्त्रियांच्या विशेषतः शहरी स्त्रियांच्या बदलत्या मानसिकतेकडे! संसारातील आपलं स्थान स्थापित करून काहीजणी थांबल्या नाहीत तर त्यांनी मिळालेल्या स्वातंत्र्याचा काहीसा गैरवापर करून परिस्थिती पालटवली. मी एका माजी शालेय विद्यार्थी संघाच्या whatsapp मंडळाचा सदस्य आहे. तिथल्या पुरुष मंडळीना लग्नाच्या वाढदिवशी 'शहीददिन' अशा स्वरूपाचे अभिनंदनाचे संदेश येतात. आता मी वाट पाहतोय ती "सुकला नारळ तो , उंच वाढून सर्वांहुनी" अशा गीताची. 

एक आशास्थान . . ज्याप्रमाणे काही काळ पूर्वीच्या मुलींनी परिस्थितीचे निरीक्षण करून बाजी पालटली तसंच काही हल्ली वाढणाऱ्या मुलांच्या बाबतीत होत असावं!

शनिवार, २६ डिसेंबर, २०१५

वारसदार - अंतिम भाग

नीलाने आमदारकीच्या कामात मोठा रस घेतला होता. पक्षश्रेष्ठींना सुद्धा पक्षाच्या प्रतिमेसाठी असा नवीन तरुण चेहरा उपयोगी पडत असल्याचं जाणवत होतं. आणि त्यामुळे काहीशा कमी महत्वाच्या उपक्रमात नीलाला सरकारचं प्रतिनिधित्व करायला मिळत होतं. असाच एक परिसंवाद होता "भारत आणि पूर्वकालीन मध्य पूर्व सोविएट रशियातील संघराज्य - शैक्षणिक संबंध". नीलाने बरीच खटपट करून माहिती गोळा केली आणि हा परिसंवाद गाजवला. तिला एकंदरीत खूपच बरं वाटलं. 

कुलकर्णीनी आपलं मित्तल संशोधन अभियान मोठ्या जोरात चालूच ठेवलं होतं. ह्यात पुरावे तसे मिळत होते पण असल्या पुराव्यांविरुद्ध वर्षोनुवर्षे खटले चालू ठेवण्याची क्षमता मित्तल बाळगून असणार ह्याच्याविषयी कुलकर्णी आणि राव ह्यांच्यात एकमत होतं. त्यामुळे त्यांना शोध होता एखाद्या अगदी ठोस पुराव्याचा! गेले काही दिवस हे दोघं रावांच्या घरी बसूनच उपलब्ध कागदपत्रांचा अगदी बारकाईने तपास घेत होते. सुशांतदेखील सध्या बंगलोरात असल्याने त्यांना वेळेचं कसलंच बंधन नव्हतं. 

अशीच एक शुक्रवारची रात्र होती. आज कुलकर्ण्यांना दोनच काहीच फाटलेली कागदपत्रं त्यांच्या विश्वासू माणसाने पाठवून दिली होती. दिवसभर वेळ न मिळाल्याने मग ते ती कागदपत्रे तशीच घेऊन रावांकडे आले होते. नेहमीप्रमाणे आदरातिथ्य करून राव कागदपत्रांची पाहणी करण्यास बसले. काही क्षणातच त्यांच्या नजरेत चमक दिसली. "कुलकर्णी बहुदा मासा पक्का सापडला आपल्याला!" त्यातील एका कागदावरील एका नोंदिकडे अंगुलीनिर्देश करून राव म्हणाले. 

पुढील काही दिवस ह्या नोंदीच्या आधारे त्यांनी बराच पुरावा गोळा केला. आता इतक्या भरभक्कम पुराव्यात कसलीच कसर राहिली नाही असे रावांना वाटत असतानाच कुलकर्णीनी एक मुद्दा काढला. "राव, हे कागदपत्र मिळालं असतं तर मित्तलला कोणीच वाचवू शकलं नसतं!" कुलकर्णीचा हा आवेश पाहून राव विचारात पडले. कुलकर्णी जे म्हणत होते ते कागद होतं मंत्रालयातील आणि ते मिळवायचं म्हटलं तर सरळ मार्गाने मिळण्यासारखं नव्हतं. आणि सध्या तर रावांचा मंत्रालयातील प्रवेश बंदच झाला होता. 

सुधीरराव रात्री बिछान्यावर तळमळत होते. गीताबाईंना त्यांचं काहीतरी बिनसलं आहे हे समजत होतं. "काय झालंय तुम्हांला?" शेवटी न राहवून त्यांनी रावांना विचारलं. मग बराच वेळ राव त्यांना आपली कहाणी सांगत बसले. गीताबाईंना ह्यातलं फारसं काही समजत होतं अशातली गोष्ट नाही पण त्या उगीचच मान डोलावत होत्या. शेवटी रावांनी आपलं बोलणं थांबवलं तेव्हा गीताबाई अचानक म्हणाल्या, "आपली नीला तर असेल ना मंत्रालयात, मग तिला आणायला सांगा ना हे कागदपत्र!" रावांच्या डोक्यात हा विचार आला नव्हता हे शक्य नव्हतं पण नीलाला आपल्या सुडाच्या राजकारणात सामील करण्याचा त्यांचा अजिबात इरादा नव्हता आणि त्यामुळेच ते इतके दिवस ही गोष्ट टाळत होते. पण आता गीताबाईच्या बोलण्यानं त्यांच्या विचारचक्राला चालना मिळाली. नीलाला ह्यातलं फारसं काही न सांगता कोणाच्या मध्यस्थीने फक्त ती कागद स्वीकारायला सांगुयात अशा विचाराने त्यांच्या मनात उचल खाल्ली. एकदा का ही कागदपत्रं आपल्या हातात सापडली की मग नीलाला ह्या प्रकरणापासून पूर्णपणे दूर ठेवण्याचा त्यांनी मनोमन निर्धार केला. 

मंत्रालयातील गृहसचिवांच्या कपाटातील ही कागदपत्रे बाहेर काढून त्यांची छापील प्रत काढण्याचे जोखमीचं काम करायला कोण तयार होईल हा मोठा प्रश्न होता. केवळ पैसे देऊन काम करणारे मिळाले असते पण पुढे ही गोष्ट गुप्तसुद्धा ठेवता आली पाहिजे. राव आणि कुलकर्णी ह्यांच्या नजरेसमोर अनेक नाव तरळली पण कोणाविषयी छातीठोकपणे खात्री अशी देताच येईना. शेवटी मग कुलकर्णीनी गृहसचिवांच्या मदतनीसांपैकी एकावर आपलं लक्ष केंद्रित केलं. गृहसचिव एका विशिष्ट वेळी साधारणतः आपल्या कक्षाबाहेर जातात आणि त्यावेळी बऱ्याच वेळा कक्षाला लॉक केलेलं नसतं अशी त्यांना माहिती मिळाली होती. आणि ह्या वेळातच हा मदतनीस ही विशिष्ट क्रमांकाची फाईल बाहेर काढणार होता. 

बऱ्याच दिवसांनी नीलाला जरा फुरसत मिळाली होती. आमदारबाईंनी आपली नवीकोरी गाडी काढून त्या आपल्या आईसोबत खरेदीला बाहेर पडल्या होत्या. गाडी सुशांतच्या घरासमोरून जात होती तेव्हा अचानकपणे विचार येऊन तिने ड्रायव्हरला गाडी थांबावयाला सांगितली.  अचानक ब्रेक मारायला लागल्यामुळे ड्रायव्हर वैतागलाच आणि मॉलच्या बोलीने बाहेर पडायला तयार झालेली आईसुद्धा वैतागली. 

आईचा हा वैताग रावांच्या घरात शिरताना सुद्धा कायम होता. पण मग गीताबाई आणि सुधीररावांच्या अगत्यपूर्ण स्वागताने ती मनोमन खुश झाली. नीलाला आज सुशांतची अगदी खूप आठवण आली होती आणि त्यामुळेच अचानक त्याच्या घरी वळण्याचा तिनं निर्णय घेतला होता. तो तर बंगलोरमध्ये असणार ह्याची तिला माहिती होतीच पण तिचा आणि त्याचा आजकाल थेट संपर्क नव्हता. आमदारकी स्वीकारल्यानंतर उगाच कोणी पराचा कावळा करायला नको म्हणून ती सुशांतशी संपर्क करायचं टाळत होती. 

अगदी पहिल्यांदा भेटत असूनसुद्धा तिच्या आईची आणि गीताबाईची चांगलीच गट्टी जमली. खरेतर चौघंही दिवाणखान्यात बसले होते पण कोणत्या तरी खमंग पदार्थाच्या पाककृतीच्या गप्पा निघाल्या आणि त्या दोघी स्वयंपाकघरात गेल्या. रावांनी हीच संधी साधली आणि अगदी मोजक्या शब्दात आपली योजना नीलेच्या कानी घातली. मंत्रालयातून एक फाईल आणायची आहे इतकंच त्यांनी नीलेला सांगितलं. खरतरं नीला असल्या बाबतीत सावधान असायची पण आज मात्र सुशांतच्या विचारात गर्क असल्याने म्हणा किंवा खुद्द राव ही विनंती करीत असल्याने तिने हे काम करायचं स्वीकारलं. 

जोपर्यंत राव आणि कुलकर्णी हे दोघंच योजना आखीत होते तोवर त्या योजनेच्या गोपनियेतेविषयी शंका घेण्याचे काम नव्हते. पण आता गृहसचिवांचा मदतनीस आला होता. 

आजचा दिवस तसा खुशीतच घालवून नीला घरी परतली होती. उद्या परत मंत्रालयात कामासाठी जायचं होतं. अचानक तिच्या फोनची रिंग वाजली. बंगलोरचा क्रमांक दिसताच मनात निर्माण होणारी तिची सुखद शंका सुशांतच्या आवाजाने खात्रीत परिवर्तित झाली. पुढील तासभर ते दोघं बोलत होते. सुशांत काहीसा बदलल्यासारखा वाटत होता. अगदी मोकळेपणाने बोलत होता. बहुदा कॉर्पोरेट जगात राहून बदलला असेल किंवा दूर राहून त्याला आपलं स्थान कळलं असावं. ह्यातील दुसराच अंदाज खरा असावा अशी आशा नीला करीत होती. 
दुसऱ्या दिवशी दुपारी मित्तल आपल्या कार्यालयात खुशीतच बसला होता. एक मोठं प्रोजेक्ट मंजुरीच्या वाटेवर व्यवस्थित कूच करीत होतं आणि अजून काही शेकडो कोट्यावधी रुपयांची त्याच्या संपत्तीत भर पडणार होती. त्या खुशीत असतानाच त्याच्या फोनची बेल खणखणली. फोनच्या संभाषणाच्या काही मिनिटातच त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. त्याने हे आणि आधीची काही प्रोजेक्ट मिळविण्यासाठी केलेल्या अवैध मार्गाचे पुरावे असलेली फाईल कोणीतरी मंत्रालयाच्या बाहेर काढायचा प्रयत्न करतेय हे फोनवर बोलणारा त्याचा खबऱ्या भाटिया सांगत होता. "फाईल बाहेर गेलेय की जाणारेय!" आपलं डोकं जरा शाबूत ठेऊन मित्तलने विचारलं. " कक्षातून बाहेर पडली आता काही वेळात मंत्रालयातून बाहेर पडतेय!" इतकं सांगून भाटियाने फोन ठेवला. 


मित्तल प्रचंड खवळला होता. आता ह्या प्रकरणाची फाईल बाहेर  पडून जर मीडियाच्या हातात सापडली तर मात्र आयुष्यभर मेहनत करून बनविलेलं साम्राज्य काही क्षणात उद्ध्वस्त होऊ शकलं असतं. ह्या कारस्थानाच्या मागे कोण असावं ह्याची माहिती भाटियाला मिळाली नव्हती. ही फाईल सध्या कोणाकडे आहे हे सुद्धा त्याला माहित नव्हतं. साऱ्या गोष्टी माहित करून मी थोड्या वेळातच फोन करतो असे त्याने मित्तलला सांगितलं होतं. इतक्यात मित्तलच्या डोक्यात एक विचार आला  शांत झाला. ही फाईल बाहेर पडली तर मित्तल सोबत अनेक मोठ्या धेडांचे भवितव्य धोक्यात आलं असतं आणि त्यातील काही माहिती मुख्यमंत्री बळवंतरावांना सुद्धा अडचणीत आणू शकणारी होती. शांतपणे मित्तलने बळवंतरावांचा फोन फिरविला. 

राव आणि कुलकर्णी काहीशा चिंतीत स्थितीत एका सदनिकेत घडामोडींचा आढावा घेत होते. नीलाने फाईल बाहेर काढली की ती वाटेत तिच्याकडून घ्यायची आणि मग तात्काळ वार्ताहर परिषद बोलवायची असा त्यांचा बेत होता. वार्ताहर परिषदेची तयारी सुद्धा कुलकर्णीनी करून ठेवली होती. अचानक दारावर जोरात धक्क्यांचा आवाज आला. "अरे कोण आहे? काही पद्धत वगैरे आहे की नाही!" असे बोलतच कुलकर्णी जागेवरून दरवाजा उघडण्यासाठी उठले. त्यांना दरवाजा उघडण्याची गरजच पडली नव्हती. दरवाजा मोडून पडला होता.

मोडलेली काही हाडं आणि काळेनिळे झालेले डोळे अशा अवस्थेत राव आणि कुलकर्णी ह्यांना त्या बंगल्यात आणलं गेलं होतं. फाईलीचा पुढचा प्रवास कसा चालला आहे हे ओळखण्यात भाटियाला यश मिळालं नव्हतं आणि हे दोघेसुद्धा तोंड उघडायला तयार नव्हते म्हणूनच ह्या जोडगोळीची अशी अवस्था करण्यात आली होती.  

त्या बंगल्यात दोघांना एका अंधाऱ्या खोलीत कोपऱ्यात ढकलून देण्यात आलं होतं. "अजून तोंड उघडलं की नाही!" समोरून एक आवाज आला. राव आता मात्र अगदी घाबरून गेले. इतका अंधार असला आणि इतका मार खाल्ला असला तरी बळवंतरावांचा आवाज ओळखण्याइतपत त्यांचा मेंदू शाबूत होता. आपल्या ह्या योजनेचा बळवंतरावांना फटका बसू शकतो हे आपण कसं ताडलं नाही ह्याचा त्यांना ह्या क्षणी प्रचंड पश्चाताप होत होता. पण आता डोकं शांत ठेवण्याची वेळ होती. मित्तलशी वैर वगैरे संपवून टाकावंच लागणार ह्याचा त्यांनी त्याच क्षणी निर्णय घेतला. परंतु बहुदा उशीर झाला होता. अचानक समोरच्या संगणकाची स्क्रीन उजळली. आणि हातपाय बांधलेला सुशांत त्यांच्या नजरेस पडला.  


"ती फाईल आमदार नीलाकडे आहे" रावांचे हे अंधारातील बोल सुशांतच्या कानी अगदी उकळत्या लोहरसाप्रमाणे पडले. "बाबा बाबा कुठे आहात तुम्ही?" तो अगदी आतुर होऊन म्हणाला. त्याच क्षणी खोलीतले दिवे उजळले. आपल्या बाबांची हालत पाहून सुशांत अगदी कासावीस झाला. इतक्यात अगदी छद्मी हास्य करीत मित्तल खोलीत प्रकटला. "आणि आमदार नीला कोठे आहेत?" "बाबा तिच्याविषयी काही माहिती ह्या द्रुष्ट लोकांना अजिबात सांगू नकात!" सुशांतचे हे बोल त्याच्या पाठीवर पडलेल्या आणखी एका प्रहाराने अर्धवटच राहिले. 

पुढच्या काही मिनिटातच भाटियाने नीलाचा ठावठिकाणा लावला होता. नीलाला ह्या फाईलमध्ये इतके काय महत्वाचे असेल हे माहित नव्हते. त्यामुळे ती तशीच एका कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी पुण्याला निघाली होती. ड्रायव्हर जाधवने एव्हाना कार एक्प्रेस वे वर आणली होती. आणि अचानक त्याच्या फोनची रिंग वाजू लागली. चार पाचदा कट करून त्याने शेवटी वैतागून फोन सायलेंट मोड वर ठेवला. सहजच त्याची नजर बाजूने धावणाऱ्या कारवर गेली आणि त्याच्या हृदयाचा ठोका चुकला. त्यातील एका माणसानं कोणाला कळणार नाही अशा प्रकारे गन नीलावर रोखली होती.  त्याने आपलं सर्व कौशल्य पणाला लावून गाडी अगदी वेगानं पुढे काढली. नीला मात्र मागच्या सीटवर एक पुस्तिका वाचण्यात दंग होती. त्यामुळे तिला ह्या थरारनाट्याचा अजिबात पत्ता नव्हता. 

सुशांतला एव्हाना व्हिडियो कॉल मधून बाजूला करण्यात आलं होतं. "तिला त्या फायलीत काय आहे किंवा हे प्रकरण कशाबद्दल आहे हे अजिबात माहित नाही हो!" राव अगदी कळवळून मित्तलला सांगण्याचा प्रयत्न करीत होते. " आपल्या लोकातील गोष्टी आपसात मिटवावयाच्या ही साधी अक्कल तुम्हांला दाखवता आली नाही. तरी शेवटी तुम्ही आपली माणसं आणि सुशांत तुमचं रक्त! पण त्या पोरीचा काय भरवसा! अगदी पूर्वीपासून तिच्या अंगात बंडखोरी ठासून भरली आहे आणि आता आम्हांला ह्या बाबतीत आम्हांला अजिबात चान्स घ्यायचा नाहीये!" असे म्हणत मित्तलने फोनवर असलेल्या आपल्या माणसाला खुण केली ती पाहून रावांना धसकाच बसला. नीलाविषयी पित्यासम मायेने त्यांचं हृदय भरून आलं आणि धाय मोकलून ते रडू लागले. 

जाधवने मोठ्या शिताफीने कार पुढे आणली खरी पण आता डाव्या बाजूने एका कारने त्याला अगदी धोकादायकरित्या ओवरटेक केलं. नीलाला एव्हाना काहीतरी गडबड होतेय ह्याचा सुगावा लागला होता. "जाधव इतकी जोरात कार का चालवताय? थोडी हळू चा … " नीलाचे हे वाक्य मागून जोरात येणाऱ्या एका ट्रकने तिच्या कारला दिलेल्या धक्क्याने अपूर्णच राहिलं होतं. 

"नव्या उमेदीच्या आमदार नीला ह्यांचं एक्प्रेसवे वरील अपघातात दुःखद निधन!" दुसऱ्या दिवशीच्या सर्व वर्तमानपत्रांची पहिली पाने ह्या बातमीने भरून गेली होती. नीलाच्या आईवडिलांची परिस्थिती वर्णनापलीकडे होती. 

सहा महिन्यानंतर 
"बघा राव तुम्ही इतकी वर्षे राजकारणात काढलीत पण तुम्हांला इतकं हळवं झालेलं कधी पाहिलं नाही. त्या मुलीला विसरा आता आणि सुशांतला म्हणावं ते RBS चे खूळ विसर आणि परत ये!" मित्तल रावांची समजूत घालत होते. 

दोन वर्षांनी 
सुशांत आणि मित्तल ह्यांच्या मुलीचा लग्नसोहळा अगदी थाटामाटात चालू होता. आमदार सुशांतच्या लग्नसोहळ्याला मात्तबर राजकारणी आणि उद्योगपती ह्यांची हजेरी लागली होती. रावांच्या राजकीय कारकिर्दीला आणि मित्तलांच्या उद्योगसाम्राज्याला लाभला होता एक समर्थ वारसदार!!

सुशांत सर्व पाहुण्यांच्या स्वागतात वरकरणी जरी गढला असला तरी त्याच्या नजरेसमोर येत होती ती नीला आणि त्याची पहिली भेट. 

सिग्नलला बाईक थांबवून त्याने क्षणभरासाठी हेल्मेट बाजूला केलं तशी बाजूच्या कारची काच वर झाली. "हॅलो सुशांत!" कारमधून एक मंजुळ आवाज आला.

नीला मला माफ कर! पण मी शांत बसणार नाही. मी तुला न्याय मिळवून देईनच. स्टेजवर आलेल्या बळवंतरावांच्या हातात हात मिळविताना सुशांतच्या मनात हेच विचार घोळत होते. 

(समाप्त)

भाग १
http://patil2011.blogspot.in/2015/08/blog-post_5.html
भाग २
http://patil2011.blogspot.in/2015/08/blog-post_8.html
भाग ३
 http://patil2011.blogspot.in/2015/08/blog-post_9.html
भाग ४
 http://patil2011.blogspot.in/2015/08/blog-post_15.html
भाग ५
 http://patil2011.blogspot.in/2015/08/blog-post.html
भाग ६ 
 http://patil2011.blogspot.in/2015/08/blog-post_29.html
भाग ७
 http://patil2011.blogspot.in/2015/09/blog-post.html
भाग ८
 http://patil2011.blogspot.in/2015/10/blog-post.html




शनिवार, १९ डिसेंबर, २०१५

कट्यार काळजात घुसली!!






बरेच दिवस बघायचा राहून गेलेला "कट्यार काळजात घुसली" हा चित्रपट पाहायचा योग आज आला. तसा योग गेल्या शनिवार रविवारी सुद्धा आला होता पण 'कट्यार काळजात घुसली' चित्रपट पाहायचा की 'मुंबई पुणे २' बघायचा ह्या चर्चेत कोणताही चित्रपट न पाहता सुट्टी तशीच गेली. पण आज सकाळी वर्तमानपत्रे उघडताच लक्षात आलं की मुंबई पुणे तर चित्रपटगृहातून गायब झाला आहे आणि 'कट्यार काळजात घुसली' अगदी मोजक्या चित्रपटगृहात सुरु आहे त्यामुळे अधिक विलंब न लावता इंटरनेट वरून त्याची तिकिटे बुक करून ठेवली. ह्या माध्यमातून तिकीट आरक्षित करताना काही जास्तीचा अधिभार लावला गेला. काळाची पावले ज्या दिशेने चालली आहेत ते पाहता हे चुकीचं वाटलं. 

चित्रपट निव्वळ अप्रतिम! ह्या चित्रपटाचं सौंदर्य अनेक निकषांवर खरं ठरणारं ! चित्रपटातील वातावरणनिर्मिती ज्याप्रकारे केली ते सुंदर आणि चित्रपटातील प्रत्येक फ्रेममध्ये जे एक सुसंस्कृत वैभव / श्रीमंती दाखवली गेली ती मनाला मोहवून गेली. चित्रपटाचा आरंभच "सूर निरागस होवो गणपती" ह्या शंकर महादेवन ह्यांच्या अप्रतिम गीतानं होतो. ह्या गीताचे सुरेल सूर कानात साठवावेत की की त्या सुंदर नृत्याला आणि श्रीमंती वैभवाला नयनात साठवून घ्यावं हा पडलेला प्रश्न!

बहुतेक सर्वच मराठी दर्दी रसिक ह्या कथानकाशी परिचित असल्याने ही कथा सविस्तरपणे सांगण्याची तशी गरज नाही. पंडित भानूशंकर शास्त्री आणि खानसाहेब ह्यांच्यातील स्पर्धेची ही कहाणी. पंडित शास्त्री विश्रामपूर संस्थानाचे राजगायक! खांसाहेबांना खरंतर मीरतहून तेच विश्रामपूरला आणतात. त्यांच्यातर्फे खांसाहेबांना थोडीफार मदत होतेच पण खांसाहेबांची गरिबी मात्र कायमच राहते. पत्नीच्या कटकटीला कंटाळून ते मग पंडित शास्त्रींसोबत राजदरबारात जुगलबंदी करतात. राजगायक ठरविण्यासाठी सुरु असलेली ही जुगलबंदी पंडित शास्त्रीच जिंकतात. आणि मग ही त्यांची विजयाची मालिका पुढील चौदा वर्षं सुरूच राहते. केवळ ही जुगलबंदी जिंकण्यात यश लाभलं नाही म्हणून खांसाहेबांसारख्या एका जातीच्या कलावंताला बाकी कोणत्याच मार्गे काहीच अर्थलाभ होत नाही ही काहीशी न पटण्यासारखी गोष्ट! असो पण ह्या इर्षेने त्यांच्या मनात एक प्रकारचा मत्सर निर्माण होतो. आणि ह्या परिस्थितीचे चटके प्रत्यक्ष सहन करणारी त्यांची पत्नी मग एकदा कट करून पंडित शास्त्रींना शेंदूर खायला देऊन त्यांचं गाणंच कायमच बंद करून टाकते. गाणं म्हणजे जीव की प्राण असणारे पंडित शास्त्री हा धक्का सहन झाल्याने सर्वांपासून दूर निघून जातात. मग मागे उरते ती त्यांची कन्या उमा आणि त्यांच्या शोधार्थ आलेला त्यांचा शिष्य सदाशिव! 
खांसाहेब आपल्या पत्नीला तिच्या दृष्ट कृत्याची सजा म्हणून तलाक देतात. त्यांची मुलगी झरिना हिला हा प्रकार अजिबात पटलेला नसतो. केवळ आपल्या पत्नीला तलाक देऊन राजगायकाचं पद भूषवायचा आणि वैभव उपभोगण्याचा नैतिक अधिकार खांसाहेबांना प्राप्त होत नाही असं तिचं स्पष्ट मत असतं. 
मग सुरु होतो तो आपल्या गुरुकडून मिळालेल्या ज्ञानाला पुर्णत्वाला नेण्यासाठीचा सदाशिवचा यज्ञ! उमेकडे असलेल्या काही लिखित नोंदींच्या आणि राजकवीकडे असलेल्या पंडित शास्त्रींच्या ग्रामोफोन रेकॉर्डच्या आधारे तो आपली कला उंचीवर नेण्याचा प्रयत्न करीत असतो. ह्यातील प्रत्येक माध्यमातील पूर्णत्व गाठल्यावर सुद्धा त्याला समाधानप्राप्ती होत नाही. आपण केवळ पंडित शास्त्री ह्यांची नक्कल करीत आहोत असं त्याला वाटत राहतं. मग येतो राजकवी आणि सदाशिव ह्यांच्यातील कला आणि विद्या ह्यातील फरक स्पष्ट करण्याचा प्रयत्न करणारा प्रसंग! विद्या ही गुरु शिष्याला शिकवू शकतो पण कला ही आतून यावी लागते. विद्येने माणूस जगाला जिंकू शकतो पण कलेने स्वतःला जिंकतो वगैरे वगैरे!! ह्यातील सर्वच संवाद लक्षात नाही राहिले त्यामुळे काहीसं हे वर्णन माझ्या समजुतीचे असण्याचा संभव!

सदाशिव आणि पंडित शास्त्री ह्यांच्यातील सदाशिवच्या लहानपणातील काही प्रसंग अगदी सुरेख रंगले आहेत. पंडित शास्त्री आपल्या गायनसामर्थ्याने रात्री काजव्यांना प्रकाशित करतात आणि त्या प्रकाशाने सर्व आसमंत प्रकाशून जातो हा त्यातला एक प्रसंग! ह्या प्रसंगाच्या चित्रीकरणातील वैभव अगदी सुखावून जातं. शेवटी स्वयंप्रकाशित काजवे एकत्र येऊन शास्त्रींनी पाण्यात विझवलेल्या दिव्याची ज्योत पुन्हा प्रकाशित करतात ह्यातील काव्यात्मकता केवळ अवर्णनीय!  आणि लहानपणी आपल्या गायनाने काजव्यांना प्रकाशित करण्याचा अयशस्वी प्रयत्न करणारा सदाशिव शास्त्रींच्या शोधात चौदा वर्षांनी ज्यावेळी येतो त्यावेळी उमेला आपली खुण पटविण्यासाठी ह्याच काजव्यांचा वापर करतो हे ही अगदी मस्तच!

ह्या चित्रपटातील राजाच वैभव, संगीतक्षेत्रात असलेलं भारतातील विविध राजघराण्याची समृद्धी हे सारं पाहून मनाला एक प्रश्न पडतो. हे आपण सारं का गमावलं? ह्या चित्रपटातील राजदरबारी दिसणाऱ्या इंग्रजाच्या अस्तित्वाला दोष देत आपण ह्याचं थोडक्यात उत्तर शोधून आपलं समाधान करून घेऊ शकतो. पण खरं उत्तर आहे ते काळाची पावलं ओळखून योग्य ते बदल करण्यात एक समाज म्हणून आपणास आलेलं अपयश! आणि हो उच्चवर्गीयांनी आपल्या समाजातील स्थानाचा आधी करून घेतलेला दुरुपयोग आणि मग बाकीच्या वर्गाने गेले कित्येक वर्षे समाजकारणाचा मिळविलेला ताबा!

मृण्मयी देशपांडे  आधीच माझी आवडती अभिनेत्री! सोज्ज्वळ सौंदर्य आणि अभिनयाची जबरदस्त जाण! चौदा वर्षाने भेटलेल्या आपल्या प्रेमाला म्हणजेच सुबोधला भेटल्यानंतर होणारी मनःस्थिती तिनं आपल्या बोलक्या डोळ्यांनी अगदी अचूक व्यक्त केली आहे. ह्यात आपल्या प्रियकरापासून दूर राहिलेल्या प्रेयसीला विरह संपल्याने होणारा जसा आनंद आहे तसंच आपल्या पित्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेऊ शकणारा साथीदार आला ह्याची लढाऊ वृत्ती देखील आहे. 

सुबोध भावेच्या देखणेपणावर काय बोलावं! एक राजबिंडा कलाकार. गाण्याच्या लयी, ताल आपल्या हावभावातून आणि मुद्राभिनयातून त्याने ज्या प्रकारे व्यक्त केली आहे त्याविषयी त्याची दाद द्यावी तितकी थोडी! ह्या दोघांतील प्रणयाला कथानक वाव देत नाही आणि आविष्कारस्वातंत्र्याच्या नावाखाली दिग्दर्शकाने तसा प्रयत्न केला सुद्धा नाही ही बाब वाखाणण्याजोगी!  नाहीतर मग भावे आणि भन्साली ह्यांच्यात फरक काय तो राहिला! 

पुढे कोणी तरी ह्या दोघांना घेऊन एक रोमॅंटिक चित्रपट काढावा ही आपली मनातील इच्छा! ह्या गुणी अभिनेत्रीच्या अभिनयाला वाव देणाऱ्या मालिका, चित्रपट तिला मिळाले पण तिच्या सौंदर्याला पूर्ण वाव देणारा चित्रपट कोणीतरी काढावा!

सचिन ह्यांनी साकारलेली खांसाहेबांची भुमिका , त्यांचा अभिनय अवर्णनीयच! खरंतर कथा लिहिताना खांसाहेबांच्या व्यक्तिरेखेवर काहीसा अन्यायच झाला असं वाटून घेतच मी चित्रपटगृहाच्या बाहेर पडलो. सतत चौदा वर्षे हरल्यावर ते जिंकतात ते सुद्धा कपटाने, सदाशिवला सुद्धा हरवितात ते त्याचा घसा ऐनवेळी बसल्याने असं काहीसं त्यांच्या दर्जात्मक कलेला वाव न देणारी व्यक्तिरेखा त्यांच्या वाट्याला आली आहे. पण ह्या व्यक्तीरेखेतील जे खानदानीपण अपेक्षित आहे ते निभावून नेण्यासाठी सद्यकालीन अभिनेत्यांमध्ये सचिनशिवाय दुसरं कोणी योग्य ठरलं नसतं हे चित्रपट पाहून आल्यावर जाणवतं. पडत्या काळातील एका जाणकार कलाकाराला पदोपदी होणाऱ्या अपमानाने वाटणारी खंत त्यांनी आपल्या केवळ नजरेतून व्यक्त केली आहे. खरंतर सचिन ह्यांनी मध्यंतरी विविध मालिकांतून जे महागुरू प्रकरणाचे खूळ माजवलं होतं त्यामुळे मी त्यांच्या चाहतेपणापासून काहीसा दूर गेलो होतो पण आज हा चित्रपट पाहून अगदी जाणकार सचिन भेटल्याचा आनंद झाला.  सदाशिव आपल्या घराण्यातील एक चालीला उचलून ती दरबारात पेश करतो त्यावेळी त्यांना होणारा राग त्यांनी अगदी आवेगाने व्यक्त केला आहे. बाकीच्या लोकांसाठी ही एक मामुली गोष्ट असेल पण जसं साता समुद्रांचे मंथन करून एक शिंपला शोधून काढला जातो त्याचप्रमाणे अनेक पिढ्यांनी वर्षोनुवर्षे रियाज करून एखाद्या गाण्यातील एक जागा, एक लय शोधून काढली असते ती जर सहजासहजी कोणी चोरत असेल तर संताप तर येणारच! मला सचिनच आणि खांसाहेबांच म्हणणं अगदी सोळा आणे पटलं!

शंकर महादेवन एक उत्तम गायक! अभिनयाचा हा त्यांचा पहिलाच प्रयत्न! पहिलाच प्रयत्न ते जाणवत. असो हळूहळू प्रगती होईल!

खरं म्हटलं तर ह्या चित्रपटाचं विश्लेषण लिहायचं म्हटलं तरी संगीताची थोडीतरी जाण असावी नाहीतरी असला अनाठायी प्रयत्न करू नये! पण म्हटलं इतकं सौदंर्य अनुभवलं तर आपल्या अकलेने का होईना दोन शब्द तर लिहावेत! साडेसातला चित्रपट संपल्यावर भूगर्भात दोन मजले खाली विसावलेल्या गाडीला बाहेर काढून शनिवारच्या तुलनेने कमी असलेल्या मुंबईच्या वाहतुकीतून घरी पोहोचण्यास सव्वाआठ झाले. परतताना गाडीतलं वातावरण अगदी भारावलेलं होतं. "सूर निरामय होवो" हे सुरात म्हणण्याचा प्रयत्न सोहम उघडपणे करत होता तर मी मनातल्या मनात! माझं हे भारावलेलं पण गेले दोन तास टिकून आहे आणि त्यातच ही पोस्ट लिहिली. 

सुबोधच कौतुक करावं तितकं थोडं! आयुष्यातील बराचसा भाग आपण पैसा साठवून ठेवण्याच्या प्रयत्नात घालवतो. आपआपल्या क्षमतेनुसार प्रत्येकानं संस्मरणीय असं आयुष्यात काहीतरी करण्याचा एकदा तरी प्रयत्न करावा! सुबोध, तुझ्या आयुष्यातील एक संस्मरणीय तू नक्कीच घडविलंस! कॉलेजात असताना कधीतरी एका सुंदर मुलीला पाहून मित्र म्हणाला होता, "दिसावं तर हिच्यासारखं! नाहीतर दिसूच नये!" त्याची आज आठवण झाली. बनवावा चित्रपट तर 'कट्यार काळजात घुसली' सारखा नाहीतर बनवूच नये! घरी आल्यावर सवयीने टुकार मालिका लावल्या गेल्या. पण कट्यारीचा प्रभाव इतका होता की दोन मिनिटातच दूरदर्शन संच बंद करण्याची बुद्धी आम्हांस झाली. आज कसं सर्व काही भव्य दिव्य वाटतंय! 

सांगता एका समर्पक अशा नाट्यगीताने!

घेई छंद, मकरंद, प्रिय हा मिलिंद
मधुसेवनानंद स्वच्छंद, हा धुंद

मिटता कमलदल होई बंदी भृंग;
परि सोडिना, ध्यास, गुंजनात दंग


आवडत्या गोष्टीचा ध्यास, आस्वाद अगदी मनापासून मुक्तपणे घ्यावा. हा आस्वाद घेताना कधीही दैनदिन जीवनातील चिंतेला थारा देऊ नये! त्याचप्रमाणे पुन्हा एकदा एका अभिरुचीपूर्ण कलेकडे आपण सर्वांनी वळूयात का?

रविवार, १३ डिसेंबर, २०१५

योग्य - अयोग्य संभ्रम !!

मध्यमवर्गीय माणसे विशेष करून मराठी मध्यमवर्गीय माणसे आपल्या आयुष्यातील जो काही वेळ विचार करण्यात घालवितात त्यातील बराचसा भाग भोवताली घडणाऱ्या घटना योग्य किंवा अयोग्य आहेत ह्याविषयी विचार करण्यात व्यतित करत असावेत असा माझा संशय आहे.

लहानपणी मोठ्या लोकांकडून आपले लाड करून घ्यावेत हे आपल्या नजरेतून योग्य असते. जस जसं आपण मोठे होत जातो तसतसं भोवतालची परिस्थिती आपल्याला घडवत जाते. 

काही जणांच्या बाबतीत जबाबदारी अगदी लवकर अंगावर पडते आणि मग स्वकेंद्री दृष्टीकोन बदलावा लागतो. अशा व्यक्तींना मनातून आपल्याला स्वच्छंदी वागता यावं हे योग्य असे वाटत असतं पण परिस्थितीमुळे आपण जबाबदारी घ्यावी हे योग्य आहे अशी लवचिकता ते दाखवितात. म्हणजे ह्या उदाहरणात मनातील योग्यपणाची व्याख्या आणि व्यावहारिक योग्यपणाची व्याख्या ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी बनतात. 

काही जणांच्या बाबतीत अगदी बरेच मोठे होईपर्यंत त्यांच्यावर जबाबदारी पडतच नाही आणि त्यामुळे हा स्वकेंद्री दृष्टीकोन बराचसा कायम राहतो. मनातील योग्यपणाची व्याख्या आणि व्यावहारिक योग्यपणाची व्याख्या सारखी ठेवण्याची चैन अशा व्यक्तींना परवडू शकते. 

विद्यार्थीदशेतील जीवनप्रवासात आईवडिलांच्या योग्यपणाची व्याख्या म्हणजे मुलाने खूप अभ्यास करावा अशी असू शकते आणि सर्वच मुलांना ही अपेक्षा योग्य आहे हे मान्य नसतं. आणि त्यामुळे मग ह्या अवस्थेत आईबाप आणि मुलं ह्यांच्यात खटके वाजण्याची शक्यता वाढीस लागते. 

आयुष्यातील ह्या स्थितीपर्यंत योग्य आणि अयोग्यतेच्या व्याख्या ह्या मेंदूतून नियंत्रित केल्या गेलेल्या असतात. मग अचानक असं वय येतं जिथे माणसं प्रेमात पडण्याची शक्यता वाढीस लागते. आणि मग मेंदूने सांगितलेली योग्य - अयोग्यतेची व्याख्या धुडकावून देणारी अजून एक भावना निर्माण होते. ह्या भावनेस प्रेम असे संबोधून ती हृदयातून निर्माण होत असावी अशी पूर्वापार चालत आलेली समजूत आहे. काही लोकांच्या बाबतीत ही प्रेमभावना मेंदूच्या योग्य अयोग्यतेच्या व्याख्येला आवश्यक काळापर्यंत थोपवून ठेवते आणि असे लोक मग प्रेमविवाह करतात. 

विवाहानंतर परिस्थिती काहीशी क्लिष्ट बनते. आपल्यासोबत चोवीस तास वावरणारी अशी एक व्यक्ती येते जिने आपल्यासोबत योग्य अयोग्यतेच्या आपल्या व्याख्या आणल्या असतात. म्हणजे अशावेळी नवऱ्याच्या मेंदूतून येणारी आणि हृदयातून येणारी योग्य अयोग्यतेचि व्याख्या अशा दोन व्याख्या आणि पत्नीने आणलेल्या अजून दोन व्याख्या अशा एकूण चार व्याख्या एकत्र नांदू लागतात. ह्या एकूण चार व्याख्यांचा सारासार अभ्यास करून नव्याने जोडप्यासाठीच्या म्हणून पुन्हा दोन एकत्रित नवीन व्याख्या बनवायची गरज असते. पण बहुदा ह्या विषयावर आपण कधीच विचार करत नाही आणि मग दोन व्याख्यांची एक जोडी एका बाजूला आणि दुसरी जोडी दुसऱ्या बाजूला असा धमाल सामना चालू होतो. एकत्र कुटुंबात तर अन्य सदस्यांच्या ह्या व्याख्यांच्या आवृत्या आजूबाजूला नांदत राहतात आणि मग परिस्थितीत अजून मनोरंजकता वाढीस लागते. 

कालांतराने काही विवाहित जोडपी मग घरात शांतता ठेवेल ते निर्णय योग्य अशी समजुतीची भुमिका घेतात आणि आपल्या मेंदू / हृदयाच्या योग्य अयोग्यतेच्या व्याख्या बासनात ठेवून देतात. 

आतापर्यंत वर्णन केलेला संभ्रम वैयक्तिक आयुष्यातील! सामाजिक जीवनात आपल्या भोवताली घडणाऱ्या घटनांविषयी सुद्धा योग्य अयोग्यतेविषयी प्रत्येकाची आपली अशी मते असतात. आणि आपली मते सार्वजनिक माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचवणे योग्य की अयोग्य ह्या विषयी सुद्धा प्रत्येकाची मते असतात. काळ जसजसा पुढे जातो तसतशी लोक बदलत जातात, योग्य अयोग्यतेच्या व्याख्या त्या त्या समाजात बदलत जातात. कोणत्याही समाजात ज्या गटाने हे बदल लवकर अंगिकारले असा एक वर्ग आणि जे अजूनही जुन्या विचारांना कवटाळून बसलेले आहेत असा एक वर्ग एकत्र नांदत असतात. हे गट नांदत असतात पण सुखाने नांदत असतात असे आपण म्हणू शकत नाहीत. अशावेळी ज्यांनी जुन्या विचारांना धरून ठेवले आहेत अशा वर्गाचा बऱ्याच वेळा नव्यांनी अंगिकारलेल्या जीवन पद्धतीविषयी संताप होत असतो. आणि सार्वजनिक समारंभात अशांचा संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता कायम अस्तित्वात असते. 

आता जाता जाता थोडं विषयांतर! आपण बाकींच्यापेक्षा काहीसे थोडे वेगळे आहोत अशी भावना सर्वांच्या मनात असते. माझ्या मनात सुद्धा आहे. हे ज्या वेळी मला जाणवलं त्यावेळी मग मी मनातल्या मनात बराच त्रागा केला. यॊग्य अयोग्यतेविषयी बराच उहापोह केला. मग मला जाणवलं की एका विशिष्ट समाजातील , ठिकाणातील व्यक्तींची एक काहीशी सारख्या प्रमाणातील विचारधारणा असते. फरक असतो पण तो दूरवरून पाहता अगदी नगण्य वाटावा असा! म्हणजे एखादा विचार करतो तो ६५.९ च्या पद्धतीने तर दुसरा करतो ६५.८५५ च्या पद्धतीने तर तिसरा ६५.६५ ने! हे सगळे एकमेकाला बाकीच्या लोकांपेक्षा वेगळे समजतात ते ०.००५ च्या किंवा ०.२५ वैचारिक वेगळ्या पद्धतीने! पण जो ७५च्या पद्धतीने विचार करणारा असतो तो मात्र ह्या सर्वांना एकाच पातळीवर गणत असतो. आणि ह्यातील प्रत्येकाला वाटणारे वेगळेपण कसे अयोग्य आहे अशी भावना जोपासत असतो! 

शेवटी यॊग्य अयोग्यतेच्या संभ्रमात कितपत पडून राहावं हा ज्याचा त्याचा निर्णय!!

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...