मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, २६ ऑक्टोबर, २०१५

शोध स्वः त्वाचा !!

हल्ली चाकोरीबद्ध आयुष्य जगण्याला जनांच्या नजरेतून फारशी किंमत राहिली नाही. जे काही करायचे ते स्वानंदासाठी, स्वतःच्या विकासासाठी. ह्या विकासातून कुटुंबाचा आर्थिक विकास साधला जातो आणि मग कुटुंबातील अन्य सदस्यांचा बाकीचा विकास आपोआप साधला जाईल अशी हल्लीची सर्वमान्य विचारधारणा आहे. मी बराच काळ ह्याला वैचारिक विरोध केला. कालबाह्य म्हणून सतत गणना केली जाऊ लागल्यावर मी माझे मत सार्वजनिकरित्या मांडणे हल्ली सोडून दिले आहे किंवा अगदी कमी केले आहे. 
काल अचानक पाब्लो नेरुदा या नोबेल पारितोषिक विजेत्या जगप्रसिद्ध कवीची एक कविता वाचनात आली. 


तुम्ही प्रवासाला नाही जात,
भटकत नाही.
तुम्ही वाचतच नाही काही,
जगण्याच्या हाका पडतच नाहीत तुमच्या कानावर,
चुकून कधी नाही देत तुम्ही
स्वत:च्याच पाठीवर शाबासकीची थाप.
याचा अर्थ,
तुम्ही मरताय हळूहळू.

स्वत:चं मन मारून, तडजोड करून जगता तुम्ही.
मायेनं कुणी मदत करायला येतं, तर तेही
नाकारता तुम्ही.
याचा अर्थ, तुम्ही मरताय हळूहळू.

सवयीेंचे गुलाम बनता आहात तुम्ही,
रोज त्याच त्या मळक्या वाटेवर चालताय तुम्ही,
चुकून कधी नव्या रस्त्यानं जाऊन पाहत नाही,
चुकून कधी वाट चुकत नाही,
परक्या अनोळखी माणसांना भेटत नाही,
त्यांच्याशी काही बोलत नाही,
अंगावर चढवत नाही, नवेकोरे पूर्वी न
वापरलेले रंग.
याचा अर्थ, तुम्ही मरताय हळूहळू.

छातीत धडधडतच नाही तुमच्या,
तुमचं पॅशन काय हेच आता आठवत नाही तुम्हाला,
भावनांचा अतिरेकी कल्लोळ नाही जाणवत आतल्या आत,
नाही तुटत पोटात,
नाहीच येत पाणी डोळ्यात.
याचा अर्थ, तुम्ही मरताय हळूहळू.

या कामात मन रमत नाही, असं वाटतं;
तरीही तुम्ही चिकटून बसता
त्याच नोकरीला.
नाही पटत ‘त्या’ व्यक्तीशी तरी,
संपलंय प्रेम हे माहितीये तरी,
तुम्ही रेटत बसता ते नातं,
आयुष्य बदलण्याचा धोकाच नको म्हणता,
सोडत नाही चाकोरी,
झपाटून झोकून देत नाही स्वत:च्या
स्वप्नांसाठी स्वत:ला,
तोलूनमापून सुरक्षित जगण्याचे सल्ले झुगारून देत,
एक संधीही देत नाही स्वत:ला,
स्वत:साठी जगण्याची.
आयुष्यच बदलून टाकण्याची.
याचा अर्थ
तुम्ही मरताय...
हळूहळू...

- पाब्लो नेरुदा

प्रथमदर्शी मला ही कविता आवडली. मी अगदी लाईक वगैरे ठोकला. पण पुन्हा वाचली; अजून एकदा वाचली. मग मात्र मी काहीसा अस्वस्थ झालो. ह्यातील बरेचसे मुद्दे मला लागू होतायेत असे मला वाटू लागलं. म्हणजे मी अगदी तोलूनमापून अरसिक वृत्तीने आयुष्य जगतो की काय असे ह्या कवीला म्हणायचं आहे असा समज मी करून घेतला. 

माझा कंपनीतला बॉस नेहमी सांगत असतो. "महत्वाच्या चर्चेच्या वेळी भावनात्मक विचार करणे सोडून द्या! कोणी एखादा मुद्दा आपल्याविरुद्ध मांडला की तो आपल्यावर वैयक्तिक हल्ला आहे असे समजणे सोडून द्या. तरच तुम्ही ह्या जगात टिकू शकाल!" 
हेच तत्व मी इथे अवलंबिण्याचे ठरविले. पहिल्या कडव्यातील काही गोष्टी जसे की भटकणे, वाचणे हे मी मर्यादित प्रमाणात हल्ली मी करतो. पण भारतातील बराच मोठा वर्ग असा आहे की ज्यांना ह्या बाबतीतील आपल्या इच्छा कौटुंबिक जबाबदारीपायी पूर्ण करता येत नाही. अगदी मन मोडून राहावं लागतं. सर्व पाश सोडून ते काही आपल्या मनाच्या इच्छा पूर्ण करू शकत नाहीत काय? त्यांना अडवतो तो आपल्या मागे आपल्या चिमुरड्या बालकांचे कसे होईल ह्याचा विचार! आपली लठ्ठ पगाराची ऑफर / नोकरी सोडून घरी सांसारिक जबाबदारी सांभाळण्यासाठी बसलेल्या गृहिणीच्या मनात काय भावनाकल्लोळ चालला असेल ह्याची आपण कल्पना करू शकतो. 

पुढे एक ओळ भयंकर खटकली. 

नाही पटत ‘त्या’ व्यक्तीशी तरी,
संपलंय प्रेम हे माहितीये तरी,
तुम्ही रेटत बसता ते नातं,



कोण्या एका व्यक्तीशी पटणे वा न पटणे ही काही एकमार्गी प्रक्रिया नव्हे. एका व्यक्तीच्या स्वभावाच्या समजा "क्ष" म्हणजे १५ छटा असतील आणि त्याच्या जीवनसाथीच्या २०! म्हणजे कोणत्याही वेळी एकूण ३०० पैलूच्या जोडीच्या शक्यता त्या संसारात नांदू शकतात. त्यातील काही आनंददायी असतील तर काही दुःखदायी! आपल्या जीवनसाथीचा कोणता पैलू त्या क्षणी सक्रिय आहे आणि त्याची आपला पैलू बदलायची त्या क्षणी क्षमता काय आहे हे जाणून घेऊन गरज पडल्यास त्या क्षणी आनंद निर्माण करणारा आपल्या स्वभावाचा पैलू जागृत करणे म्हणजे संसारातील खरं प्रेम! मोठाल्या कविता, सुंदर भेटी ही सर्व प्रेमाची रूपं महत्वाची आहेतच पण संसारात हा आता वर्णिलेला मुद्दा फार महत्वाचा!

अजून एक मुद्दा! सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील एक दिवस निर्विघ्न पार पाडण्यासाठी त्या माणसाला किती संघर्ष करावा लागतो ह्या विषयी बोलण्याची आपल्याकडे पद्धत नाही. सकाळी घरच्या जबाबदाऱ्या पार पाडून अत्यंत तणावपूर्वक असा प्रवास करून सामान्य माणूस ऑफिसात पोहोचतो आणि त्यानंतर तिथल्या कामाच्या आणि माणसांच्या बदलत्या रुपाला तोंड देत तो आपले ध्येय पार पाडतो. कर्तुत्ववान, यशस्वी लोकांचे कौतुक करण्याची पद्धत पूर्वापार चालत आली आहे पण सामान्य माणसाच्या संघर्षाला आणि त्यातून त्याने / तिने साध्य केलेल्या छोट्या छोट्या यशाला नगण्य मानण्याची चूक कोणी करू नये. 

आयुष्याच्या एका वळणावर मुलाबाळांच्या जबाबदाऱ्या संपतात किंवा कमी होतात अशा वेळी आपल्याला संधी मिळू शकते स्वः त्वाचा शोध पुन्हा एकदा घ्यायची! आणि त्यावेळी ह्या कवितेतील बोध घ्या! पुन्हा उफाळून उठा! आणि आपल्या इच्छा पुऱ्या करा. आणि पाब्लोला  ठणकावून सांगा "आम्ही हळूहळू मेलो नव्हतो! आम्ही नव्या पिढीच्या जीवनांकुराला जोपासण्यात मग्न होतो!" 

हे सगळे भावना बाजूला ठेवून सुचलेले विचार! काल मात्र भावनांच्या भरात एक उत्तर दिलेच!

चाकोरीबद्ध आयुष्य जगणे ही आमची पहिली पसंद कधीच नव्हती!
पण नेत्रदीपक काही करण्यासाठी जबाबदाऱ्या झुगारून देणे आम्हांला पटले नाही!!! 
 

रविवार, ११ ऑक्टोबर, २०१५

सरमिसळ - २०१५ !!

गेल्या वर्षी मी whatsapp वर का नाही अशी पोस्ट लिहिली आणि ह्या वर्षी whatsapp ला सामील झालो. मी आदर्शवादी उरलो नाही की whatsapp ला सामील झालो ह्याचे खास स्पष्टीकरण द्यावे. गेल्या चार पाच महिन्यातील माझ्या संचारानंतर काही जाणवलेल्या गोष्टी.

१) इथे गैरसमज, मानापमान ह्या गोष्टींना खूप वाव आहे. आपल्याच ग्रुप मधला एखादा आपल्या अपडेट्सना मुद्दाम लाईक करत नाही, आपण एखादा महत्त्वाचा अपडेट टाकला की मुद्दाम दुसराच अपडेट टाकून बाकीच्या लोकांचे लक्ष वेधून घेतो वगैरे वगैरे. 

२)मग काही लोक अनवधानाने नाराज होतात. ग्रुप सोडतात, किंवा अचानक आपला सक्रियपणा सोडून निष्क्रिय बनतात. पण इथेही बऱ्याच वेळा लोकांना दुःखद अनुभव येतो. म्हणजे लोकांना काहीतरी फरक जाणवेल आणि मग ते आपल्याला विचारतील, "काय झालं?" असे घडण्याची शक्यता त्यांना वाटत असते. पण बऱ्याच वेळा इतर लोकांना ह्या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही किंवा असे आपणास वाटण्याची शक्यता असते. पण कित्येकदा लोक खूप कामात गर्क असतात किंवा इतका विचार करण्याची तसदी घेत नाही. अधून मधून मनाला बरे वाटण्यासाठी किंवा स्वतःचे कौतुक करून घेण्यासाठी आपण whatsapp ला सामील झालो आहोत ह्याचे भान ठेवावं. 

३) मला इथे एक गोष्ट खटकली ती म्हणजे ग्रूप मध्ये एखादा निवर्तल्याची बातमी टाकली जाते आणि काही तासातच लोक विनोद वगैरे टाकायला सुरुवात करतात. माझ्या मते त्या दिवसापुरतं तरी लोकांनी थोडं शांत राहायला हरकत नाही. 

४) एक गोष्ट मात्र खरी की सद्यपिढीशी सतत संपर्कात राहायला हे माध्यम उपयोगात पडतं. 

५) इथे विविध गटात आपल्याला खूप आदर्शवादी विचार ऐकायला मिळतात. लोक त्यांना लाईक वगैरे करतात. मी ह्या बाबतीत मात्र फारसा उत्साही नसतो. हे आदर्शवादी विचार वाचायला वगैरे ठीक असतात पण ते जीवनाचा संघर्षाची उत्तरे अगदी सोप्या तत्त्वात सांगण्याचा प्रयत्न करतात. 

६) आयुष्य इतकं सोपं अजिबात राहिलं नाही. सतत बदल घडवून आणण्याचा मनुष्याचा हव्यास त्याच्या मानसिक स्वास्थाच्या मुळाशी येणार आहे. अभियांत्रिकी शाखेनंतर माहिती आणि तंत्रज्ञान, व्यवस्थापन ही भारतात मोठ्या पगाराच्या नोकऱ्या देणारी क्षेत्रे. पण इथे शाश्वतता क्षणभंगुर असते. आपण ज्या कंपनीत काम करतो तिथलं व्यवस्थापन, त्यांची धोरणे, आपल्या कामाचं स्वरूप, आपले सहकारी ह्यांचं एक चित्र आपल्याला मनातल्या मनात रेखाटून ठेवावं लागतं आणि त्यानुसार आपली धोरणं आखावी लागतात. प्रत्येक दिवसअखेर ह्या चित्रात काय बदल झालेत आणि त्यामुळे आपल्या धोरणात काय बदल घडून आणावेत ह्याचा विचार करावा लागतो. ज्या क्षेत्रात स्थैर्य आहे अशाही क्षेत्रात आपण लोकांचे आयुष्य किती त्रासदायक करता येईल ह्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. अभियांत्रिकी शाखेत शिकविणाऱ्या शिक्षकांनी डॉक्टरेट केल्याशिवाय त्यांचा पुढील वेतनश्रेणीसाठी विचार केला जाणार नाही ही ह्यातीलच एक बाब! जणू काही ह्या शिक्षकांच्या शिकविण्याच्या दर्ज्यावर त्यांच्या डॉक्टरेटचा मोठा परिणाम होणार आहे. 

७) दुसऱ्या मुद्यात म्हटल्याप्रमाणे लोक फारसा विचार करण्याची तसदी घेत नाहीत. पण हे पूर्ण विधान नाही. लोक दुसऱ्यांच्या बाबतीत फारसा विचार करण्याची तसदी घेत नाहीत. पण स्वतःच्या बाबतीत मात्र ते अगदी जागरूक असतात. सोशल मीडियात दुसऱ्यांच्या बाबतीत फारसा विचार न करण्याची वृत्ती ज्या वेळी प्रत्यक्ष जीवनात डोकावू पाहते त्यावेळी मात्र गंभीर परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे आपला सामाजिक जीवनातील प्रत्यक्ष सहभाग कायम ठेवणे आवश्यक आहे. 

आता काही दुसऱ्या विषयांकडे! गेल्या आठवड्यात दगडी चाळ चित्रपट पाहिला. चित्रपट चांगला आहे. कथा काल्पनिक आहे. अंकुश चौधरीचा चित्रपटातील वावर अगदी सहजरीत्या आहे. पूजा सावंत दिसलीय सुरेख आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे तिचा अभिनय अगदी सहजसुंदर वाटतो!  मकरंद देशपांडे अगदी अरुण गवळीसारखाच दिसतो. पण गंभीरता राखण्याचा नियम पाळताना अभिनयाच्या बाकी छटा दाखवायला फारसा वाव मिळाला नाही असं मला वाटून गेलं. 
ह्या चित्रपटातील मला वाटलेली मुख्य त्रूट म्हणजे हाणामारीचे प्रसंग फारसे वास्तववादी झालेच नाहीत. अगदी सुरुवातीला मामा आमदारावर हल्ला करतो तो प्रसंग किंवा लग्नाच्या वरातीचा खोटा बहाणा निर्माण करून एका मोठ्या असामीस पोलीस संरक्षणातून बाहेर काढतो हे न खुललेले प्रसंग! मराठी चित्रपटांची संख्या झपाट्याने वाढतेय पण कथा, चित्रीकरणावर घेतली जाणारी मेहनत किंवा वेळ आणि बजेट ह्यांचे गणित अजूनही फारसं जमताना दिसत नाही. हा चित्रपट मी वसईला ३ ऑक्टोबरला म्हणजे प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्या दिवशी पाहिला. चित्रपटगृहात अवघे २० - २५ लोक होते. वसई म्हणजे चित्रपटाची लोकप्रियता आजमावून पाहण्यासाठी योग्य उदाहरण नसले तरी पण हे चित्र योग्य नाही. 

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे ह्यांच्या उपक्रमाला दाद द्यावी तितकी कमी! ह्यावर बरेच लेख वाचनात आले. दरवर्षी पडणाऱ्या पावसावर एकाच प्रकारचे पिक घेण्याची मनोवृत्ती सोडावी हा एक महत्त्वाचा विचार त्यातून समजला. मुख्य म्हणजे आपण आत्महत्या करून आपल्या मागे राहणाऱ्या कुटुंबियांची स्थिती काहीच सुधारत नाही आहोत ह्याच भान ह्या शेतकऱ्यांनी राखायला हवं. मुख्य म्हणजे ह्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा प्रयत्न करावयास हवा. प्रत्येक गावात पाणी साठविण्याची छोटी तळी वगैरे निर्माण करायला हवीत. अण्णा हजारे ह्यांनी राळेगणसिद्धीचा असाच पाणी साठवणुकीची व्यवस्था करून कायापालट केला होता असे मागे वाचनात आले होते. त्याचे अनुकरण करता येईल काय ह्याचा विचार करायला हवा. मुख्य म्हणजे राजकारणी लोकांना कायमस्वरुपात हा प्रश्न सोडविण्यात स्वारस्य नसणार हे सर्वांनी समजून घ्यायला हवे. त्यामुळे स्थानिक / गावपातळीवर एखादा तरुण नेता निवडावा आणि त्याचे म्हणणे सर्वांनी ऐकून गावात मोठे वृक्ष लागवड करावेत. सुबाभूळ हे असेच कमी पाण्यावर वाढणारे आणि जनावरांना चाऱ्यासाठी उपयोगी पडणारे झाड! त्याची आणि संबंधित वृक्षांची लागवड करता येईल ह्याचा विचार करावा. आपले शेत एखादी कंपनीप्रमाणे चालवावे अशीही पोस्ट वाचली. त्यात सुद्धा मिश्रपिकांचा पर्याय सुचविण्यात आला होता.

विविध विषय मांडले! विषयांची खोली गाठली गेली नाही. पूर्वीच्या काळी बहुतांशी लोक ज्या गोष्टी करायचे त्यात खूप खोलवर जायचे कारण विद्या / ज्ञान ह्यांना पैशात रूपांतरित करायचं दडपण नसायचं. काळ बदलला बहुतांशी लोकांनी विविध कारणांचा बहाणा निर्माण करून स्वतःमागे पैसे कमवायचा सोस लावून घेतला आहे. पण ज्ञान, तत्वनिष्ठता सर्व काही मागे पडत चालले आहे. समाज बदलवू शकत नसलो तरी आपल्या घरी तरी ह्या मूल्यांना टिकविण्याचा आटोकाट प्रयत्न करूयात!

शनिवार, ३ ऑक्टोबर, २०१५

वारसदार - भाग ८

"आई कालच माझा वाढदिवस साजरा झाला आणि आज सकाळसकाळी तुला ही कसली चेष्टा सुचतेय?" आईने मोठा धीर करून ही बातमी नीलाच्या कानावर तिच्या हातात दुधाचा कप देताना घातली आणि तिची ही अपेक्षित अशीच प्रतिक्रिया तिच्या कानावर पडली. मग बाबांना मध्ये पडावे लागेल. बाबांनी सुध्दा आईच्या बातमीला दुजोरा दिल्यावर नीला मात्र अगदी कॉलेजला जायला उशीर होत असताना देखील थांबली. हे प्रकरण अगदीच गंभीर दिसत होते. "ठीक आहे! मी विचार करते" असे म्हणून आपली सॅक उचलून ती कॉलेजला निघाली.  
नेहमीची बस पकडून ती आत शिरली. आज कसं कोणास ठाऊक पण एका स्टॉपनंतर तिला खिडकीजवळची सीट मिळाली सुद्धा!! बसताक्षणी तिचं विचारचक्र सुरु झालं. ह्या पक्षाचे तिकीट म्हणजे विजयाची बरीच शक्यता होती. आपलं आयुष्य अगदी बदलून जाणार होतं. पण अचानक आपली निवड करण्यामागच कारण तिला समजेना. पक्षात इतके इच्छुक असताना पक्ष आपली निवड का करेल? म्हणजे ह्या मागे रावांचा हात असणार! पण राव केवळ आपल्या नियोजनकौशल्यावर खुष होऊन इतकं मोठं पाऊल उचलतील ह्याची तिला खात्री वाटत नव्हती. म्हणजे नक्कीच त्यांच्या मनात दुसरा कोणता तरी विचार असणार! दुसरा कोणता म्हणजे? आमदारकी आपल्याच घरात राहावी असं तर त्यांच्या मनात नसणार ना? नीलाच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. कॉलेजचा स्टॉप जवळ आला होता. उगाच सुताने स्वर्ग गाठू नकोस! बसमधून उतरता उतरता तिने स्वतःला बजावलं. आठव्या सत्राच्या सबमिशनचा आज शेवटचा दिवस होता. सबमिशन आटोपता आटोपता दुपारचे चार वाजले. आता दोन आठवड्याची अभ्याससुट्टी समोर होती. सर्व मुलांचे लक्ष ह्या दोन आठवड्यात अभ्यासाचा पर्वत कसा उचलायचा ह्याकडे होते. पण नीलाच्या मनात मात्र दुसरंच वादळ सुरु होते. तिला दोन दिवसात मोठा निर्णय घ्यायचा होता. तिची भिरभिरणारी नजर सुशांतला शोधतेय हे शलाकाला कळायला नेहमीप्रमाणे वेळ लागला नाही. "तो कॉम्पुटर लॅब मध्ये असावा!" नेहमीप्रमाणे अगदी गंभीर चेहरा करत आणि नजर दुसरीकडे ठेवत शलाका म्हणाली. आज तिच्या ह्या सुज्ञतेला दाद देण्याचाही नीलाचा मूड नव्हता. त्या दोघी कॉम्पुटर लॅबच्या बाहेरून चक्कर मारायला आणि सुशांत लॅबमधून बाहेर पडायला एकच गाठ पडली. "सुशांत मला तुझ्याशी काही बोलायचं!" तिच्या ह्या अनपेक्षित वाक्याने सुशांत काहीसा आश्चर्यचकित झाला. कॉलेजबाहेरच एक हॉटेल होते तिथं दोघं निघाली. बरेच दिवस दोघांचं असं काही बोलणं झालं नव्हतं. त्या दोघांना एकत्र चालताना पाहून त्यांच्याकडे फिरून फिरून वळणाऱ्या नजरांकडे लक्ष देण्याचे सुद्धा भान आज नीलाकडे नव्हते. पण सुशांतला मात्र बरंच टेन्शन आलं होतं. म्हटलं तर आज कॉलेजातला शेवटचा दिवस होता. ह्या नंतर अभ्याससुट्टी आणि मग दोन आठवडा भर चालणारी परीक्षा! त्यानंतर सर्व पक्षी उंच आकाशात भरारी घ्यायला निघून जाणार होते. त्यातील कोण्या दोघांना एकत्र घरटे वसवायची इच्छा असल्यास त्यांना दोघांना आताच निर्णय घ्यायचा होता. पण हा निर्णय घ्यायचा अधिकार आणि मुख्य म्हणजे घरटे उभारायची ताकद ह्या दोघांकडे होती का हा महत्वाचा प्रश्न होता. 
"सुशांत मला तुझ्या बाबांच्या पक्षाकडून आमदारकीच्या तिकीटाची ऑफर देण्यात आली आहे!" नीलाच्या ह्या पहिल्याच वाक्याने सुशांत अगदी भुईसपाट झाला. त्याच्या चेहऱ्यावरील हावभावावरून ह्याला ह्या प्रकरणातील काहीच माहिती नाही ह्याची नीलाला खात्री पटली. "मग तू काय ठरवलं आहेस?" बाकी काहीच न सुचल्यामुळे तो हे वाक्य बोलून गेला. नीलाला काय उत्तर द्यायचं हे उमगत नव्हतं. सुशांतला ह्या प्रकरणातील काहीतरी माहित असेल आणि तो आपल्याला हा निर्णय का घेतला गेला ह्याची अधिक माहिती देऊ शकेल अशी जी आशा तिने ऊरी बाळगली होती ती निष्फळ ठरली होती. आपल्या दोघांच्या भवितव्याविषयी काय असं त्याला विचारावं असाही विचार तिच्या मनात क्षणभर आला. पण निर्णय घेण्याच्या बाबतीत आजस्तोवर सुशांतने तिला पूर्ण निराश केलं होतं आणि आजही ह्याच्याकडून फारशी काही अपेक्षा करावी असं काही वेगळं चिन्ह तिला दिसत नव्हतं. "बघू काय करायचं ते! आई बाबा म्हणतील तेच मी करीन!" तिच्या चेहऱ्यावरील निराशा सुशांतला स्पष्ट दिसत होती. "चल मग निघुयात! तुला अभ्यास करायचा असेल नाही!" नीला म्हणाली. खरं तर तिरक्यात बोलण्याचा तिचा स्वभाव नव्हता पण आज सुशांतकडून तिची पूर्ण निराशा झाली होती आणि म्हणून हे वाक्य तिच्या तोंडून गेलं होतं. "एक मिनिट थांब नीला!" सुशांतच्या चेहऱ्यावर प्रथमच तिला खंबीर भाव दिसत होते. "मला तु आवडतेस! माझं तुझ्यावर प्रेम आहे असं मला वाटत पण प्रेम ह्या विषयाची गहनता समजण्याइतपत माझी पात्रता आहे असं मला वाटत नाही! मला तुझ्याशी लग्न करायची इच्छा म्हटलं तर आहे पण माझं माझ्या करियर मध्ये स्थिरस्थावर होणे मला अधिक महत्त्वाचं  वाटत! मला स्थिरस्थावर व्हायला किती वेळ लागेल हे मला माहित नाही! पण ज्या दिवशी मी स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभा असेन त्या दिवशी मी तुला साद घालीन आणि माझ्या सादेला प्रतिसाद द्यायला तू जर त्या दिवशी तयार असशील तर मग आपल्या दोघांत कोणीच येऊ शकणार नाही!" गेले दोन तीन वर्षे आपल्या मनातील विचार सुशांतने एका दमात सांगून टाकले होते. आणि शेवटी त्याने नीलाचा हात हातात घेऊन आश्वासकपणे हळूच दाबला होता. 
आकाशातील सर्व मळभ दूर झाल्यासारखं नीलाला वाटत होतं. "थॅंक यू सुशांत! थॅंक यू सो मच!!" वेटरला बिल आणण्याची खूण करत नीला म्हणाली. इतकं बोलून अगदी भावनाविवश झालेल्या सुशांतमध्ये तिला अडविण्याचे सुद्धा तभान राहिलं नव्हतं. त्याचं आपल्याकडे लक्ष नाही हे पाहून नीलाने हळूच रुमालाने आपल्या डोळ्यात येऊ पाहणारे आनंदाश्रू पुसले होते. 
"कुलकर्णींना सांगा मी निवडणूक लढवायला तयार आहे!" रात्री आईबाबा आणि नीला असे सर्वजण जेवायला बसले असताना नीला सहजपणे म्हणाली. दोघांच्याही तोंडातला घास तोंडातच राहिला. आपली पोरगी इतका मोठा निर्णय इतक्या लगेच घेईल ह्यावर विश्वास ठेवणं त्यांना काहीसं कठीण जात होतं. 
पुढचे काही दिवस अगदी धामधुमीत गेले. एका २१ वर्षाच्या अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या मुलीला मुख्य राजकीय पक्षाने तिकीट देण्याची बातमी राज्यपातळीपर्यंत जाऊन पोहोचली. त्यामुळे नीलाने अर्ज दाखल करण्याच्या दिवशी मीडियाचे बरेच लोक हजर राहिले. नशिबाने निवडणूक एक महिन्यावर होती. त्यामुळे अर्ज भरून आल्यावर नीला थेट अभ्यासात गुंतली. तिने पुन्हा एकदा अभ्यासात स्वतःला झोकून दिलं. आठव्याचे पेपर चांगले गेले. म्हणजे अजूनही चांगले जाऊ शकले असते पण इतक्या सगळ्या व्यवधानाकडे पाहता ठीक गेले. 
आणि मग मात्र तिने प्रचारात स्वतःला झोकून दिलं. पक्षाची यंत्रणा अगदी सुसज्ज होतीच आणि एका तरुण चेहऱ्याला तिकीट मिळालं म्हणून सर्व तरुणाई अगदी बेहद्द खुष होती. फेसबुक, whatsapp वरील प्रचार खुद्द नीला सांभाळत होती आणि पारंपारिक प्रचार कुलकर्णी सांभाळत असल्याचं चित्र दिसत होतं. असं असलं तरी पडद्यामागून राव सर्व सूत्र सांभाळत होते. आणि एका प्रचार सभेला  खुद्द सुशांतने हजेरी लावली तेव्हा नीलाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आयुष्याचे रंग अगदी हातात आल्यासारखं तिला वाटत होतं. ह्या सगळ्या सुसूत्र प्रचारामुळे विरोधकांनी आधीच हार मानल्यात जमा होती. नीलाचे आईवडील मात्र अगदी बेचैन होते. आपली अगदी छोटी मुलगी अचानक मोठी झाली होती आणि आता तिच्याशी दोन शब्द बोलणं सुद्धा अशक्य झालं होतं. 
निवडणूक शांतपणे पार पडली. आणि निकालाचा दिवस उजाडला. अगदी पहिल्या फेरीपासूनच अपेक्षेनुसार नीलाने मोठी आघाडी घ्यायला सुरुवात केली होती. आणि मग नीलाचा विजय घोषित होताच सर्वत्र उत्साहाला उधाण आलं!! एका मध्यमवर्गीय घरातील मुलगी आमदार झाली होती.
आठव्याचा निकाल जाहीर झाला. आणि तिथेही नवनिर्वाचित आमदारांनी विशेष प्राविण्य मिळवलं होतं. आता RBS ला जॉईन होणे शक्य नव्हते. सुशांत एकटाच बंगलोरला निघाला होता. 
राव आणि कुलकर्णी आनंदात घरी बसले होते. रावांचे राजकीय पुनर्वसन करण्याच्या प्रक्रियेतील पहिली पायरी नीलाच्या विजयाने साध्य झाली होती. आता रावांना आर्थिक घोटाळ्यातील आरोपांपासून मुक्त करणे आवश्यक होते. आणि त्यासाठी त्यांना मित्तलवर लक्ष केंद्रित करावे लागणार होते. ही योजना कशी आखायची ह्याचा विचार राव करीत होते. बरीच मेहनत करावी लागणार अशी चिन्ह दिसत होती. "राव हे प्रकरण इतकं काही कठीण नाही! ही पहा मी बनवलेली योजना!!" असं म्हणत कुलकर्णीनी एक फाईल रावांच्या हाती सुपूर्त केली. काहीशा आश्चर्यचकित झालेल्या रावांनी जसजशी त्यातील कागदपत्रे चाळावयास सुरुवात केली तसतसे त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचे भाव दिसू लागले. पूर्ण फाईल चाळून त्यांनी बाजूला ठेवली तेव्हा रात्रीचा एक वाजला होता. कुलकर्णी अजूनही बाजूलाच बसले होते. रावांनी प्रसन्न मुद्रेने त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. "मित्तल आता पहा! बुद्धीबळाच्या खेळातील धमाल!!" रावांनी एक आत्मविश्वासपूर्वक गर्जना केली!
(क्रमशः) 

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...